मला समजलेलं पोस्ट ट्रुथ, १४० अक्षरांत - अपौरुषेय
ऐसीअक्षरे
मला समजलेलं पोस्ट ट्रुथ, १४० अक्षरांत
- अपौरुषेय
'खरं ते माझं' नको, ‘माझं आणि माझ्या पक्षाचंच ते खरं’ म्हणा. बाकी सारी फेक न्यूज!
नंदन
नंदन
पोस्टट्रुथ : बातम्या आणि प्रचारकीच्या गजबजाटात आपल्या पूर्वकल्पना तथ्यापलिकडील मूलभूत सत्य असल्याची प्रचीती.
धनंजय
धनंजय
सत्य हे अंतिम किंवा निखळ वगैरे असतं या समजुतीला जोरदार धक्का देणारं ते पोस्ट ट्रुथ, माझ्या दृष्टीला/मतीला कळणारं, जाणवणारं, इतरांच्या दृष्टीने कदाचित कल्पित अशी सत्याची एक वेगळी मिती दाखवणारं, ख-याच्या पलिकडलं पण खोट्याच्या अलिकडलं एक माझं असं वैयक्तिक सत्य. कलाकाराचे संवेदनशील मन भौतिक जगाने स्विकारलेल्या सत्याच्या पलिकडच्या संदिग्ध जगात प्रवेश करते तेव्हा त्याच्या कलाकृतीतून दिसते ते पोस्ट ट्रुथ.
शर्मिला फडके
शर्मिला फडके
सत्याचा आग्रह न धरता ते सामाजिक समिकरणातला केवळ एक घटक मानणे आणि तर्क, गणित, भाषाशास्त्र ह्या साधनांचा वापर करुन सत्याची प्रस्थापना करण्याऐवजी विश्वासपुर्ण वाटेल असे आभासी वातावरण तयार करणे.
राहुल बनसोडे
राहुल बनसोडे
सध्याच्या काळात सोशल मिडीयावर रियल्ली रियल ट्रूथ म्हणून जे काहीही पोस्ट केलं जातं आणि मुद्दाम ठरवून व्हायरल केलं जातं तेच पोस्ट-ट्रूथ!
विसुनाना
विसुनाना
पोस्ट ट्रुथ म्हणजे 'अस्मिताधिष्ठित सत्यानुनय'. थोडक्यात, 'माझ्या अस्मितांसाठी जे सोयीस्कर आहे तेवढंच मी सत्य म्हणून स्वीकारणार' ही मनोवृत्ती, वागणूक, आणि त्यातून निपजणारं ‘आम्ही विरुद्ध ते’ स्वरूपाचं राजकारण व तदनुषंगिक व्यक्तिनिरपेक्ष सत्याची पायमल्ली.
राजेश घासकडवी
राजेश घासकडवी
सत्य-असत्याकडे अधिक स्पष्टपणे पाहण्यासाठी जिथे आपापल्या रुचीप्रमाणे आणि समजुतींप्रमाणे, वेगवेगळ्या रंगांचे, आकारांचे आणि पॉवरचे रेडिमेड चष्मे सोशल मीडियाच्या झगमगत्या बाजारात सहजपणे विकत घेता येतात असे अत्याधुनिक, अतिविद्वानी आणि अतिचाणाक्ष लोकांचे जग म्हणजे पोस्ट ट्रूथ जग. सत्य तसेही सापेक्षच असते, पण त्या चष्म्यांना आपापल्या आवडीप्रमाणे, हवा तसा रंग देणे सर्वसामान्यांसाठी विनाशुल्क आणि सहजसाध्य करणाऱ्या सोशल मीडियाला माझा कडकडीत सॅल्यूट!
रुची
रुची
पोस्ट ट्रूथ म्हणजे सत्य कसं का असेना, भावनांना चेतवून जनतेला बनवणे... इथे जनता आपल्याला सांगितले गेलेल्या तथाकथित सत्यावर तुफान विश्वास ठेवते, हे विशेष!!!
भडकमकर मास्तर
भडकमकर मास्तर
वास्तवाचं निर्दोष आकलन म्हणजे सत्य असं नरहर कुरुंदकर लिहितात. पोस्ट ट्रूथ हे वास्तवाला आपल्याला हवा तो आकार देणं आहे. साध्या भाषेत 'सत्याचा अपलाप' आहे. सत्यशोधन ही एक थकवणारी प्रक्रिया आहे हे अमान्य करणारी राजकीय भूमिका असं पोस्ट ट्रूथबाबत म्हणता येईल. पण मग यात नवीन ते काय? तर 'तात्विक मंजुरी' नवीन आहे.
उत्पल
उत्पल
पोस्ट ट्रूथ काळात उदयाला आणण्यात येणारं आभासी सत्य आता वेताळासारखं बोकांडी बसतं. आणि त्यामध्ये आपल्याला जर प्रश्न पडले तर आपल्या डोक्याची शंभर छकलं वेताळाच्या पायाशी पडतात. अंतिम विजय वेताळ ह्या सत्याचा होतो.
सतीश तांबे
सतीश तांबे
व्हाईटवॉशिंग
https://en.wikipedia.org/wiki/Whitewashing_(censorship)