आपले दिग्दर्शक रेल्वेचे सीन्स दाखवताना अनेकदा तपशीलांकडे दुर्लक्ष करतात. एरव्हीच्या सहज जाणवणार्या अचाटपणापेक्षा हे थोडे वेगळे आहे. रेल्वे सीन्स मधे जर ढोबळ पणे एक गाडी दाखवत आहेत इतक्याच इण्टरेस्ट ने तुम्ही हे सीन्स पाहिलेत तर कदाचित काहीच खटकणार नाही. पण जरा 'रेल फॅन च्या नजरेतून' पाहिलेत अशा सीन्स मधल्या तपशीलाच्या चुका लगेच जाणवतील आणि पटतील.
काही वेळा खूप तपशीलात न शिरता सीन असतो. फक्त एका रॅण्ड्म गाडीच्या टपावरून. तेथे काही गोची असण्याची शक्यता कमी असते. काही जुन्या गाण्यांमधे डब्याच्या आतले सीन्स आहेत. ते डबे समोरासमोर सीट्स असलेले असावेत त्या काळी. त्या गाण्यांतही खूप डीटेल्स मुळात नसतात. शोले मधला सीन व इतरही अनेक चित्रपटातील सीन्स आहेत ज्यात सहजपणे काही गोची दिसत नाही. शोले मधे त्या मालगाडीच्या ट्रेलर मधे सीन ओपन होतो. तेव्हा ती गाडी पुढे चाललेली असते. मग हल्ला झाल्यावर थांबते व डाकू उलटी न्यायला लावतात. नंतर धर्मेन्द्र इंजिनात गेल्यावर पुन्हा मूळ दिशेला नेउ लागतो. मधे हे सगळे ट्रेलर मधून बाहेर पडून डाकूंशी लढतात. गाडीला वेगवेगळ्या प्रकारच्या वॅगन्स आहेत. पण कोण नक्की कसा कोठे जातो याच्या विचार करायला आपल्याला वेळ मिळत नाही, कारण सीन अत्यंत वेगवान आणि थरारक आहे. यातील चुका काढायच्या झाल्या तर सीन सेकंदासेकंदाला पॉज करून बाजूला गाडीचे चित्र काढून त्यावर ते प्लॉट करावे लागेल.
सुदैवाने इतर दिग्दर्शक इतका त्रास करून घेत नाहीत ;)
प्राचीन काळापासून आपल्या पब्लिकला काही सीन्स चा अर्थ माहीत असतो. पडद्यावर दोन फुले आपटली की काय झाले हे उघड असते. तसेच एखाद्या खेड्यापाड्यात सुरूवात झाल्यावर १५-२० मिनीटांनी एक रॅण्डम आगगाडी फुल पडद्यावर दाखवली म्हणजे नायक मुंबईला गेला हे ही पब्लिक ला कळते. मग त्या आगगाडीचा सीन प्रत्यक्ष बंगाल मधला का असेना.
कधी कधी एरव्ही चांगल्या सीन मधे रेल्वे तपशीलांकडे दुर्लक्ष केल्याने गोची जाणवते. उदा: 'आप की कसम' मधले 'जिंदगी के सफर मे' हे अतिशय सुंदर गाणे. या गाण्याचे चित्रीकरण खरे तर खूप सुरेख आहे. अतिशय उदास खिन्न वातावरण आणि किशोर चा जबरी आवाज. एका कडव्यात त्याला मुमताज आठवते तेव्हा तिच्या बाजूला एकदम फुललेली फुले आणि हिरवेगार सीन्स तर याच्या बाजूला एकदम पतझड वाले सीन्स सगळे मस्त जमले आहे.
पण हा त्या गाडीत येउन बसतो आणि ती गाडी निघते. तेथे दिसणारा फाटा बहुधा कल्याणजवळचा आहे जेथे एक मार्ग कर्जत कडे आणि दुसरा कसार्याकडे जातो. पुढे बोगदेही दिसतात. पण ते इग्नोर केले तरी क्लिअरली दिसते की तो इलेक्ट्रिफाइड ट्रॅक आहे. मात्र इतर सीन्स मधे कोळश्याच्या इंजिनात ते कोळसे घालतात ते सीन्स आहेत. तसेच गाडी निघते तेव्हा टीपिकल स्टीम इंजिन सुरू होताना चाकाजवळ येणारी वाफ, सहसा फक्त स्टीम इंजिनांच्या चाकांना असणारे ते कनेक्टिंग रॉड्स वगैरे दिसतात. त्या इंजिनाच्या आगीतून त्यांना काही "डायरेक्शन" दाखवायचे होते का माहीत नाही पण बाकी सुंदर चित्रीकरण, आवाज, संगीत सगळेच जमून आलेल्या या गाण्यात हे विसंगत वाटते.
तरीही ठीक आहे. ट्रॅक इलेक्ट्रिफाइड असला तरी ७० च्या दशकात स्टीम इंजिने अनेक ठिकाणी वापरात होती (नंतरही होती). मध्य रेल्वेने खूप लौकर बदलली. विशेषतः मुंबईजवळ प्रवासी गाड्यांना इलेक्ट्रिकच बहुतांश वापरत. पण इथे इंजिन दाखवलेलेच नाही. त्यामुळे शक्ती सामंता ला बेनेफिट ऑफ डाउट :)
अशा गोच्या तुम्हाला अनेक ठिकाणी जरा खोलात गेलात तर सापडतीलः
- रा.वन मधला लोकलचा सीन. धमाल आहे. पण ती गाडी बांद्रा स्टेशनवर आहे - असे आवर्जून स्क्रीनवर येते. पश्चिम रेल्वेच्या मार्गावर. प्रत्यक्षात गाडी पाहिलीत तर मध्य रेल्वेची आहे. एक दोन सीन्स मधे तर फेक लोकल आहे. कशावर तरी लोकलच्या इंजिनाचे डेकोरेशन आहे. आता मध्य रेल्वेबद्दल मुंबईकर म्हणतील ती हार्बर लाइन ची असेल बान्द्र्याला असेल तर. होल्ड युअर ऑब्जेक्शन :) जरा थांबा. पुढे ती गाडी मस्तपैकी भायखळा स्टेशनातून जाते. हे हार्बर लाइन वर येतच नाही, कारण ती लाइन सॅण्डहर्स्ट रोडवरून च वरती उचलली आहे. लेको तुम्ही जर मध्य रेल्वेची लोकल वापरली आहे, तो ट्रॅक वापरला आहे तर स्टेशनची नावे वेस्टर्न ची कशाला?
- रजनीच्या पिक्चर मधे लॉजिक शोधायचा प्रयत्नच मुळात विनोदी आहे. पण तरी हा एक सीन बघा, 'शिवाजी- द बॉस'. इथे नीट पाहिलेत तर त्याचा पाय तेथे अडकायची शक्यता दिसत नाही. कारण ट्रॅक स्विच तेथे गॅप सोडेल. का ते पुढच्या काही सीन्स मधे जे लिहीले आहे त्यावरून बघा
- आमिर च्या गुलाम मधल्या त्या १०:१० की दौड सीन मधे हे गृहीत धरलेले आहे की त्या येणार्या लोकल्स चा वेग रोज सेम असतो. अगदी रात्रीची वेळ धरली तरी हे खरे नाही हे लोकल्स ने प्रवास करणार्यांना पटेल. लोकलचा वेग कमीजास्त असू शकतो असे धरले तर त्या सीन मधल्या कौशल्याला काही अर्थ नाही.
असे फुटकळ बरेच आहेत. पण काही यापेक्षा मोठे ब्लूपर्स असलेले सीन्सः
जब वी मेट
हा ही एक सुंदर चित्रपट. गाणी एकदम मस्त. पण सुरूवातीला असलेल्या ट्रेन चेस मधे इतका गोंधळ घातला आहे! त्यात काही गोष्टी आवर्जून चुकीच्या दाखवायचे कारणही कळत नाही. पहिले म्हणजे ट्रेनचे जे लाँग शॉट्स आहेत त्यात ती चक्क मॉडेल ट्रेन वाटते. इथे दुसराही एक ब्लूपर आहे. ज्या टॅक्सी मधे ते बसतात, त्यात बसतानाच्या सीन मधे पुढे फ्लॅप आहे. मग वरतून घेतलेल्या अँगल्स मधून जे सीन्स आहेत त्यात ती फ्लॅप नाही. मग रतलाम ला पोहोचतात तेव्हा ती फ्लॅप परत आलेली आहे :)
आता रतलाम. हे पश्चिम रेल्वेवरचे मोठे जंक्शन आहे. राजधानी एक्सप्रेस चे जे फक्त ३-४ स्टॉप्स आहेत त्यात हे आहे. या पिक्चर मधे ते अगदीच लहान गावचे स्टेशन वाटते. मग तेथे गाडी येते. इथे आणखी विनोद आहे. ती गाडी म्हणे - "पंजाब मेल". तीही मुंबई हून दिल्लीला चाललेली. इथे दोन गोच्या आहेत. एक म्हणजे "मुंबई" असे ढोबळ सहसा म्हणत नाहीत. मुंबई व दिल्लीचे चे कोणते टर्मिनस ते सांगतात. तरी ठीक आहे सांगितले असेल. पण दुसरे म्हणजे ही ट्रेन मुंबई-फिरोजपुर अशी जाते. फार जुनी आणि फेमस गाडी आहे. पहिल्यांदा त्याच्याही पुढे जायची पेशावरपर्यंत. मग फाळणीनंतर फिरोजपूर पर्यंत केली. करीनाला दिल्लीला जायचे आहे म्हणून मधल्या स्टेशन वर फक्त दिल्लीपर्यंतची अनाउन्समेण्ट करणार नाहीत :)
पण खरा विनोद आणखी बेसिक आहे. पंजाब मेल ही मध्य रेल्वेची गाडी आहे. मुंबईहून दिल्लीला दोन वेगळे मार्ग आहेत. एक मध्य रेल्वेचा - जो कसारा, इगतपुरी, भुसावळ, भोपाळ वगैरेहून जातो. दुसरा पश्चिम रेल्वेचा - जो बडोदा, रतलाम वगैरे वरून जातो. पंजाब मेल यातील पहिल्या रूट ने जाते. म्हणजे ती रतलाम वरून मुळातच जात नाही!
वास्तविक त्या चेस सीन मधे तसे काही अतर्क्य नाही. मग रेल्वेच्या डीटेल्स च्या बाबतीत इतक्या ढोबळ चुका का आहेत कल्पना नाही. पंजाब मेल च्या जागी राजधानी एक्सप्रेस म्हणून काम झाले असते - जी मुळात दिल्लीपर्यंतच जाते आणि रतलामला थांबते ही!
यादों की बारात
सलीम जावेद च्या स्क्रिप्ट मधे असा फ्लॉ फार क्वचित सापडेल. या पिक्चरच्या शेवटी अजितच्या मागे धरम लागतो. तो व इम्तियाज धावताना रेल्वे रूळांवरून धावतात व मधे सिग्नल पडतो, रूळ सरकतात व अजितचा पाय त्यात अडकतो असा तो सीन आहे. यात सर्वात ढोबळ दिसणारी गोची म्हणजे नंतर येणारी जी गाडी आहे तिला जे इंजिन आहे ते शंटिंग करता वापरले जाणारे आहे - म्हणजे तुम्हाल स्टेशन मधे कधी थोडे डबे इकडून तिकडे नेणे वगैरे करताना तसे इंजिन अजूनही दिसेल. कधी यार्ड मधली गाडी प्लॅटफॉर्म वर लावताना वापरतात. हे इंजिन फार वेगात जात नाही. यात दाखवलेले अंतर आहे तेवढ्या दुरून माणसे दिसली तर ते आणखी हळू करून सहसा थांबवतील.
पण मोठी गोची पुढे आहे. अजित जसा उभा आहे त्या संदर्भाने पाहिले तर त्याच्या समोरून येणारा तो ट्रॅक आहे तो तसाच सरळ अजितच्या मागे जातो व समोरूनच त्याच्या डाव्या बाजूने एक साइड लाइन येउन मिळते - तेथे प्लॅटफॉर्म आहे. आता अजितचा पाय अडकला कारण तो रूळ सरकला आणी मेन लाइन ला चिकटला. हे केव्हा करतील? जर बाजूच्या साइड लाइन वरून गाडी येणार असेल तर तिला मेन लाइन वर घ्यायला. पण इथे गाडी येते ती तर थेट समोरून येते. म्हणजे तिला लाइन क्लिअर द्यायला तो रूळ तसा चिकटणारच नाही! तेथे गॅपच हवी. किंबहुना स्विच पोझिशन तशी असेल तर ती यात दाखवलेली गाडी तेथे अडकेल किंवा घसरेल.
बाकी ते स्टेशन वगैरे दिसते त्यावरून हा स्विच कोठूनतरी रिमोटली न होता स्टेशनजवळून कोणीतरी मॅन्युअलीच केलेला असण्याची शक्यता जास्त होती. इतक्या लोकांत कोणीच तेथे धावत जाउन का ती गाडी थांबवू शकत नाहीत माहीत नाही :)
तूफान
अमिताभच्या "तूफान" मधे असाच गोंधळ आहे. केतन देसाई यांनी मनमोहन देसाई लॉजिक वापरायचा प्रयत्न केला पण तो आधीचा स्पार्क यात नव्हता. यातील क्लायमॅक्स मधे कमल कपूर चा पाय अमिताभ मुद्दाम अडकवतो. इथे सीन यादों की बारात सारखाच आहे. पण प्रत्यक्षात गाडी त्याच्या जवळ येताच अमिताभ पुन्हा त्याला मोकळा करतो व तो उडी मारतो. आता रूळ तेथे न चिकटल्याने गाडी तेथून सरळ पुढे जायला हवी. पण पुढच्याच सीन मधे ती वळून गेलेली दिसते - जी तो रूळ चिकटला असता तेथे, तरच गेली असती :)
बाकी यात त्या कमल कपूर ला ती गाडी त्याच ट्रॅक वरून जाणार आहे हे माहीत असते, अमिताभला ती सगळी स्विच सिस्टीम माहीत असते, तो तो स्विच हलवेपर्यंत या रूट वरून एक रॅण्डम गाडी चाललेली आहे हे रेल्वेवाल्यांच्या लक्षात येत नाही वगैरे अचाट लॉजिक सोडून देऊ. हा शैतान सिंग म्हणे बिकानेर वरून उधमपूर हवाईअड्ड्याकडे निघालेला असतो - बिकानेर जवळच कोठेतरी कोकण असावे. कारण तेथे नागोठण्याजवळ असलेले "भिसे टनेल" सुद्धा स्पष्ट दिसते :)
पूर्वी पेण, रोहा वगैरे भागात रेल्वे ट्रॅफिक नसल्याने तेथील ट्रॅक्स शूटिंग करता वापरत. तेच इथे वापरलेले दिसतात.
वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई
इथे अजय देवगणचा तो सीन आहे ज्यात एक ट्रक इकडून तिकडे नेण्याकरता तो आख्खा ट्रॅकच उपसून काढतो. यात उल्हासनगर स्टेशन दाखवले आहे. तेथे एक डिझेल इंजिन वाली गाडी उभी आहे. तेथून सिंगल ट्रॅक जाताना दिसतो. आता उल्हासनगर म्हणजे कल्याणजवळ. ते गेली अनेक दशके इलेक्ट्रिफाइड ट्रॅक वर आहे. त्यामुळे यातली कथा ६० च्या दशकातील असली तरी चुकीचा आहे तो सीन. तसेच तेथील ट्रॅक्स सुद्धा किमान दुहेरी आहेत अनेक वर्षे. आणि पूर्वी सहसा पॅसेंजर गाड्यांना तेथे डिझेल इंजिने लावत नसत, गेल्या काही वर्षांत लावू लागले. आणि माझ्या आठवणीत उल्हासनगर ला थांबणारी थ्रू ट्रेन पाहिली नाही. कारण कल्याण जवळच आहे.
दुसरे म्हणजे आख्खे रूळ काढण्यापेक्षा तेथे ८-१० पोती माती टाकून किंवा काही लाकडी फळ्या लावून जरा लेव्हल तयार करून ट्रक का नेत नाहीत कल्पना नाही. तसेही तेथे रस्ता ऑलरेडी होता असे त्या शॉट मधे दिसते. कदाचित रीटेक्स मुळे तयार झाला असावा :)
द बर्निंग ट्रेन
यात तर ब्लूपर्स ची रेलचेल आहे. फार पूर्वी या पिक्चर वर लिहीलेले होते मायबोलीवर. मला सर्वात गंमत वाटली तो भाग म्हणजे या गाडीतून रीतसर उतरणार्यांपेक्षा दारातून थेट वरती टपावर जाणारे, खिडक्यांच्या गजाला धरून इकडे तिकडे जाणारे आणि वेळोवेळी खाली फेकले गेलेले असेच जास्त असतील :) धर्मेन्द्र प्लॅटफॉर्मवरून बाइकवरून येउन गाडी पकडतो गार्डाच्या डब्याचे दार धरून तेव्हा तो गाडीच्या उजव्या बाजूने पकडतो. मात्र मग अचानक डाव्या बाजूने गार्डाचे दार ठोठावतो. तेथे धावत्या गाडीच्या दारात बाहेर उभ्या असलेल्या त्याला तो गार्ड आत न घेता "अरे जाओ यहाँसे" ही म्हणतो. तेथे पुढच्या लंब्याचौड्या संवादांआधी धरम ने "कोठे?" असे विचारावे असे मला वाटले होते :)
या गाडीचे सर्व डबे आतून जोडलेले असूनही कोठेही जायचे म्हंटले की हे हीरो लोक असतील तेथून थेट टपावर जाउनच पुढे जातात. मधे एकदा तर एक 'Not to be loose shunted' लिहीलेली वॅगन सुद्ध दिसते. असा ज्वालाग्राही पदार्थ असलेली वॅगन नव्या सुपर एक्स्प्रेस च्या पहिल्या ट्रिपलाच ट्रेनच्या डब्यांमधे लावून टाकणे हे सेफ्टी प्रोटोकॉल प्रमाणेच असावे :) मात्र ती वॅगन एरव्ही दिसत नाही.
इंजिन मधला बॉम्ब फुटतो त्यानंतर एक दोन स्टेशन्स मधून ती गाडी जाताना तेथील सिग्नलमन ला गाडी फार जोरात जात आहे, ड्रायव्हर ने सिग्नल दिला नाही वगैरे तपशील दिसतात. पण इंजिनातून धूर येत होता हे दिसत नाही. तो धूर पुढच्या स्टेशन - रतलाम- पर्यंत गायब होतो. बहुधा दिवाळीचा बॉम्ब असावा.
बाकी गमती त्या लेखात मिळतील
ही मधेच वॅगन लावायची पद्धत गाडीत हीरो लोक असले की वापरत असावेत. कारण मोहब्बतें मधेही उदय चोप्राच्या एण्ट्रीला एक ओपन वॅगन होती पॅसेंजर गाडीच्या मधेच.
कभी हाँ कभी ना
हे सर्वात धमालः
शाहरूख आणि दीपक तिजोरी गाणे गात गात गोव्याच्या वास्को स्टेशन वर येत आहेत. तिकडे एकदम घरी येताना उत्सुक वगैरे दिसणारी सुचित्रा कृष्णमुर्ती गाडीत आहे, अगदी पाच मिनीटात उतरणार अशा थाटात. म्हणजे गाडी हे गाणे संपता संपता वास्को ला पोहोचणार असावी.
एकच प्रॉब्लेम आहे. सुचित्रा कृष्णमुर्ती ज्या गाडीत आहे ती गाडी गाणे चालू असताना कसारा घाटात आहे. तेथेही ती गाडी किमान तीनदा इंजिनांचे मॉडेल बदलते - कारण वरकरणी सारखी दिसली, तरी ही तीन वेगवेगळी इंजिने आहेत. हे WCM-5 , हे बहुधा WCM-1, आणि हे WCM-2 :) त्यातही इंजिने फक्त मुंबई-पुणे व मुंबई-इगतपुरी या मर्यादित रूटपर्यंतच वापरली जाणारी डीसी ट्रॅक्शन वाली इंजिने आहेत. त्यामुळे ही गाडी गोव्याच्या आसपाससुद्धा असू शकत नाही. मधे एकदा आपल्याला कसारा घाटातील १२४ किमीचा मार्करही दिसतो. गाडी नक्की कोठे चालली आहे माहीत नाही पण कोणत्याही दिशेला असली तरी तेथून त्या काळात वास्को ला जायला १२-१४ तास लागतील. अजून एक छोटासा प्रॉब्लेम. ही ब्रॉडगेज गाडी अशीच्या अशी वास्कोला जाउ शकत नाही. मधे मिरज किंवा कोठेतरी या सर्व लोकांना मीटर गेजच्या गाडीत बसावे लागणार आहे (सर्व मार्ग ब्रॉडगेज होणे हे बरेच नंतर झाले). मग ती पुढे जाईल. तोपर्यंत हे दोघे गाणे गात बसणार असे दिसते. नाहीतर इतका वेळ स्टेशन वर येउन बसणार. पण काहीतरी चमत्कार असावा. कारण गाणे संपता संपता तिची गाडी आपोआप वास्को जवळ येते. आता ती गाडी छानपैकी मीटर गेज झालेली आहे तसे इंजिन बदलून . शाहरूख त्या गाडीच्या शेजारच्या रोडवरून उरलेले कडवे म्हणत चालला आहे. आणि लगेच रिपीट चमत्कार! गाडी त्यानंतर दोन मिनीटांत वास्को स्टेशनात शिरताना पुन्हा तेवढ्यात एक नवीनच इलेक्ट्रिक इंजिन लावून पुन्हा ब्रॉडगेज झालेली आहे!
गाण्यात हीरो व हीरॉइन कपडे बदलतात वगैरे आपण पाहिले आहे. इथे गाडी इंजिनेच नव्हे तर गेजही बदलते! :)
बाकी असंख्य असतील. सापडले की लिहीन. तुम्हीपण लिहा
ज्यांना माहीत नाही त्यांना शीर्षकाचा संदर्भः बीबीसीआय आणि जीआयपी या पूर्वीच्या खाजगी रेल्वे कंपन्या. आता पश्चिम रेल्वे व मध्य रेल्वे साधारण तेच भाग कव्हर करतात. आणि तो याचा डबा तिकडे जोडण्याचा संदर्भ :)
निरीक्षणे आवडली
तुम्ही पुरुष आहात असे समजून सांगतो......
अशा चुका बायकोबरोबर पिक्चर पाहताना काढू नका !!!
दिल तो पागल है या सिनेमात पौर्णिमेला येणारा व्हॅलेंटाइन डे असा खास प्रसंग आहे. त्यात रात्री बारा वाजतात तेव्हा माधुरी दीक्षित आपल्या खिडकीतून क्षितिजापासून १५-२० अंश वर आलेला पूर्णचंद्र बघते. पौर्णिमेला येणाऱ्या व्हॅलेंटाइन डे ला १२ वाजता असा चंद्र पाहणे हा काहीतरी स्पेशल रोमॅण्टिक वगैरे इव्हेण्ट म्हणून सिनेमात दाखवला आहे. त्यावेळी "पौर्णिमेला १२ वाजता चंद्र डोक्यावर असायला हवा; खिडकीतून कसा दिसेल?" असं मी म्हटल्यावर, "पुन्हा पिक्चरला तुझ्याबरोबर येणार नाही" अशी आकाशवाणी झाली होती.
========================
>>इथे अजय देवगणचा तो सीन आहे ज्यात एक ट्रक इकडून तिकडे नेण्याकरता तो आख्खा ट्रॅकच उपसून काढतो.
अजय देवगणची सुपरमॅन ताकद दाखवणे हा उद्देश असतो.
========================
>>काही जुन्या गाण्यांमधे डब्याच्या आतले सीन्स आहेत. ते डबे समोरासमोर सीट्स असलेले असावेत त्या काळी.
हे कळलं नाही. अजूनही तसेच असतात डबे; वातानुकूलित कुर्सीयान सोडून. साधे डबे असोत की शयनयान.
बाकी रुळांचे टर्न आउट वगैरेच्या चुका काढणे हे कै च्या कै आहे.
कुणाच्या...
कुणाच्या?
कुणाच्याही
कुणाच्याही
अय्या
तुम्ही कुणाच्याही बायकोबरोबर सिनेमा पाहता!!!
त्यात काय? तुमच्या
त्यात काय? तुमच्या बायकोबरोबर पण पाच सहा वेळा गेलो आहे. तिने तुम्हाला सांगितलं नाही का?
नेहमी कामाचं बोला(वं).
बिनमहत्त्वाच्या गोष्टींबद्दल बायकोशी बोलायला मी काय पुरुष आहे!
दुसर्यांच्या बायकांच्या बरोबर
दुसर्यांच्या बायकांच्या बरोबर गेलात तरी पिच्चर बघाता???
समोरासमोर म्हणजे मेट्रोत
समोरासमोर म्हणजे मेट्रोत भितींकडे असतात तसे म्हणायचे असेल.
बाकी रेल्वेकडे दिवस वेळ आणि गाडी हवी नको कळवून ते देतील त्यात सिनेमावाले चित्रिकरण उरकतात. बाकी चैन्नई एक्स्प्रेसनंतर दूधसागर ट्रॅकवर गर्दी वाढली. कोळशाच्या एंजिनात जी धकधक आहे ती इले/डिझेलमध्ये कशी येईल?
लेखाचा विषय मस्त.
IMDB च्या Goofs मध्ये घाला.
मनोरंजक निरीक्षणे आहेत.
IMDB च्या Goofs मध्ये घाला.
फार निरीक्षण
लेख आवडला. पण हे काय लिहिता ? आम्हाला तुमच्या सिने-परीक्षणाची खरी तहान आहे. ती लिहा ना! आठवडा जाऊ दे, महिन्याला एक लिहिलंत तरी चालेल. शुद्धनिषाद नंतर आम्हाला कोणाची परीक्षणे आवडलीच नव्हती.
उल्हासनगर...
हे तितकेसे खरे नाही. पुण्याहून मुंबईला जाणारी इंद्रायणी एक्सप्रेस उल्हासनगरला सर्रास थांबते.
म्हणजे, अधिकृतरीत्या नाही. (रेल्वे वेळापत्रकात१, २ अशा थांब्याची नोंद तुम्हाला आढळणार नाही.) आणि दररोज नित्यनेमानेसुद्धा नाही. पण थांबते. अनेकदा थांबते.
..........
१ हे अजूनही छापले जात असेल तर.
२ हे बहुधा इंग्रजी भाषेतील आजवरचे सर्वोत्कृष्ट फिक्शन मानता यावे.
शिवाय पाशिंजर थांबत असे. आता
शिवाय पाशिंजर थांबत असे. आता दिवसा त्या मार्गावर धावणारी पाशिंजर नाही.
रात्री एक शिर्डी फास्ट पॅसेंजर असते ती थांबते.
खरंय
पुण्याहून मुंबईला जाणारी इंद्रायणी एक्सप्रेस उल्हासनगरला सर्रास थांबते.
म्हणजे, अधिकृतरीत्या नाही. (रेल्वे वेळापत्रकात१, २ अशा थांब्याची नोंद तुम्हाला आढळणार नाही.) आणि दररोज नित्यनेमानेसुद्धा नाही. पण थांबते. अनेकदा थांबते.
कारण ड्रायव्हरला U.S.A. वाल्या व्यापाऱ्यांचा हप्ता असतो.
पिके मध्ये १२२९० ने संजय दत्त
पिके मध्ये १२२९० ने संजय दत्त दिल्ली ला जातो जी खरे तर नागपूर मुंबई दुरांतो आहे.
यादोंकी बारात मधला सीन टीव्हीवर
दूरदर्शनवर त्या नटाची मुलाखत पुन्हा-पुन्हा दाखवत. त्या मुलाखतीत नट सांगे "वठवताना अत्यंत धोकादायक, इंजिन अगदी अंगावर येईस्तोवर मी रुळावर थांबून होतो" म्हणून, आणि मग हा सीन दाखवत.*
बाळपणातही मला (१) मनुष्याचा वेगळा, इंजिनचा वेगळा, असे शॉट असताना जिवाला धोका कुठला? आणि (२) हे शंटिंगचे इंजिन कशाला दाखवतायत? हे प्रश्न पडत असत.
*मी मुलाखतच (अनेकदा) बघितलेली आहे, चित्रपट बघितलेला नाही.
धन्यवाद्
धन्यवाद लोकहो
थत्तेचाचा - नोटेड. :). ते समोरासमोर म्हणजे मेरे हुजूर च्या गाण्याची लिन्क दिली आहे तसे. अचरटबाबा म्हणतात तसे मेट्रो ही बरोबर.
तिरशिंगराव - मलाही लिहायचे आहेच पण सुचले नाही बऱ्याच दिवसांत्
बादवे शिवाजी द बॉसमधे
बादवे शिवाजी द बॉसमधे दाखवलेले सारे रेल्वे (आणि इतरही बरेचसे) सीन्स पुण्यात चित्रित झाले आहेत. विशेषत: रेल्वेवाला बहुतेक हडपसरच्या जवळपास कुठेतरी झालाय बहुतेक.
नाव शिवाजी आणि चित्रण पुण्यात
नाव शिवाजी आणि चित्रण पुण्यात...काय संगती आहे, एकच नंबर!!!!
बाकी फारेंड्रावांचा लेख म्हणजे काय बोलावे? त्यांनी दिलेल्या लिंका अभ्यासोन मगच प्रकटावे असे ठरवलेय, तोवर फक्त _/\_
गमतीदार निरीक्षणं. आम्ही
गमतीदार निरीक्षणं. आम्ही हिंदी सिनेमे बघताना डिसबिलिफ इतका सस्पेंड करून ठेवतो की अशा मायनर गोष्टींकडे लक्षही जात नाही.
अं?
नक्की काय टांगता याचा विचार करून दिमाग का चक्का जाम झाला.
विचार कर करून
दिमाग का दही हुवा, दही टांगून ठेवल्यावर उसका चक्का हुवा, फिर वो जाम हुवा
प्यार तो होना ही था
अजय देवगण आणि काजोलच्या प्यार तो होना ही था मध्ये एक मोठा भौगोलिक घोळ घातलाय. आपल्या बॉयफ्रेंड ने आपल्याला फसवलय आणि नवीन पोरगी पटवली आहे हे कळल्यावर काजोल त्याच्या बॉयफ्रेंडला भेटायला पॅरिस वरून मुंबईत येते(बहुधा चित्रपटात मुंबई असा उल्लेख नाही पण शहर मुंबई आहे हे लगेच कळतं).
तिला समजतं की ते दोघे ' पालम बीच ' या ठिकाणी फिरायला गेलेत. हे कळल्यावर काजोल अजय देवगण ची मदत घेऊन पालम बीचला ट्रेन ने जायला निघते.
पण वाटेत ' शामला कोट ' नावाचं स्टेशन लागतं जे अजय देवगणचं गाव आहे तिथे ते दोघे काही दिवस थांबतात.
आता हे शामला कोट टिपिकल पंजाबी सरसो के खेत , शेतात ट्रॅक्टर वगैरे असलेलं. अजय देवगण ला सगळे पुत्तर , मुंडा , काजोलला कुडी वगैरे म्हणत असतात. पोशाख, बोलणं पण सगळ्यांचं पंजाबी.
आता बॉलीवुड चं पंजाब ओबसेशन समजू शकतो.
पण मुंबई वरून अरबी समुद्रातील ठिकाणी रेल्वेने जायच तर महाराष्ट्र गोवा किंवा अगदीच दक्षिणेला केरळ. बरं पालम बीच ही जागा बंगालच्या उपसागरात आहे म्हटल तर तामिळनाडू, आंध्र , बंगाल, ओरिसा लागेल.
पण मुंबईवरून समुद्र असलेल्या ठिकाणी निघालेली ट्रेन मधेच पंजाब मध्ये कशी पोचेल
बरं पालम बीच हे केवळ गावाचं नाव आहे आणि समुद्र वगैरे तिथे काही नाही असं मानल तर तिथे पोचल्यावर सगळे समुद्राच्या वाळूत खेळताना बागडताना दिसतात.
ही गोष्ट किती तरी वर्ष माझ्या डोक्यात होती. दोन तीन जणांना सांगण्याचा प्रयत्न केला पण त्यांना यात काय विशेष वाटलं नाही.
या पोस्ट चा निमित्ताने आज मन मोकळं झालं.
हा हा हा
समुद्रही दाखवायचा आणि पंजाबी पैसेवाल्यांना खुशही करायचं, दोन्ही कसं जमवणार!
...
तसेच, नायक जर परदेशास रवाना होत असेल, तर एक विमान टेकऑफ घेताना दाखवतात. विमान एअर इंडियाचेच असावे लागते. मग भले एअर इंडियाची त्या स्पेसिफिक परदेशास सेवा असो वा नसो. (किंवा, असलीच, तर भले ती अंतिम गंतव्यस्थानाकरिता सोयिस्कर असो वा नसो.)
(विमान कोणत्या स्पेसिफिक मॉडेलचे - जसे, जम्बोजेट - असते किंवा कसे, हे निरीक्षिलेले नाही. अभ्यास वाढवावा लागेल.)
.
(धागा वर आणण्याकरिता तथा जुने प्रतिसाद दृश्य करण्याकरिता.)