Skip to main content

सध्या काय वाचताय? - भाग २६

बऱ्याचदा एखादे पुस्तक आवडते, वाचता वाचता त्याबद्दल थोडेफार सांगावेसे वाटते, पण सविस्तर समीक्षक लेख लिहायचा उत्साह किंवा वेळ नसतो. तरीही, अशा चर्चेने नवीन पुस्तकांची ओळख होते, दुसऱ्यांना ती शोधून काढावीशी वाटतात, आणि कोणी वाचून त्याबद्दल सविस्तर मत मांडल्यास नवीन चर्चेचा धागाही निघू शकतो. धागा जिवंत राहिला की प्रत्येक दोन-तीन दिवसांनी डोकावून नवीन प्रतिसाद वाचायला मजा येते. स्थळाच्या नियमांप्रमाणे चर्चेत भाग घेणाऱ्यांनी फक्त शीर्षक एवढेच न देता, पुस्तक-लेखाबद्दल एक-दोन का होईना ओळी लिहाव्यात अशी अपेक्षा आहे.
=========
'किशोर'चे अंक चाळता चाळता त्यातली एक गोष्ट दिसली.
http://kishor.ebalbharati.in/Archive/include/pdf/1998_10.pdf
पान. क्र. ९
रोचक आहे गोष्ट

टवणे सर Wed, 29/11/2017 - 04:40

The atheist Muslim : a journey from religion to reason - अलि रिझवी
निरिश्वरवाद, अद्न्येयवाद, श्रद्धा यावरची पुस्तके वाचणे हा माझा छंद झाला आहे. त्या मालिकेतले हे एक सुंदर आत्मकथन आहे. डॉ. रिझवींनी एका मुसलमानाच्या बाजूने लिहिलेले हे पुस्तक टोकाचे/अतिरेकी न होता विषयावर राहते. हिचन्स असो वा अयान हिरसी अली, सर्वांना त्यांनी ओढलेले आसूड झेपत नाहीत आणि तिटकारा येतो. त्यापेक्शा रिझवींनी लिहिलेले सामान्य माणसाला टोकाचे झिडकारणारे वाटणार नाही.

Ride out the dark: Christabel Bielenberg
जगात अनेक राष्ट्रात उजव्या/राष्ट्रीय/कडव्या विचारसरणींचा प्रभाव वाढताना दिसत आहे, बहुतेक ठिकाणी सरकारेही अश्या पक्शांची आहेत. हंगेरीमध्ये मी स्वत: हे स्थित्यंतर पाहिले जेव्हा विक्टर ओर्बानच्या फिदेस पक्शाने सत्ता २/३ बहुमताने मिळवली व घटनेत बदल सुरु केले. आता फिदेस मवाळ भासेल अश्या जबॉक पक्शाला मते मिळत आहेत. भारतात मोदी अंधभक्त व द्वेष्टे विरोधक दिसत आहेतच. अगदी माझ्या जवळच्या नातलगांशी बोलताना त्यांच्यातला बदल प्रकर्शाने जाणवत आहे. या पार्श्वभुमीवर 'जर्मनीत हिटलर' आला तेव्हा तिथल्या जनतेने त्याच्यामागे जाण्याचा निर्णय का घेतला या विषयावर वाचायचे ठरवले आहे. हे त्या मालिकेतले पहिले पुस्तक. नुकतेच सुरु केले आहे. अतिशय सुस्पष्ट भाषेत लिहिले आहे. लेखिका मूळची ब्रिटिश, ३४साली जर्मन माणसाशी लग्न करुन जर्मन नागरीक झाली, नवरा व ती दोघेही हिटलर विरोधी चळवळीत सक्रिय राहिले. युद्ध संपेपर्यंत ती जर्मनीतच राहिली. त्या दहा वर्षांची कहाणी तिने या पुस्तकात मांडली आहे.

हे पुस्तक या दुव्यावरुन मला मिळाले. https://www.theguardian.com/books/2003/nov/17/top10s.hitler.thirdreich

बॅटमॅन Wed, 29/11/2017 - 12:24

In reply to by टवणे सर

दोन्ही पुस्तके अतिरोचक वाटताहेत. ते रिझवीचे तर फारच जास्त.

बायदवे नास्तिक पण आणि मुस्लिम पण ही काय भानगड आहे? असं काही नसतं.

अनु राव Wed, 29/11/2017 - 16:13

In reply to by बॅटमॅन

बायदवे नास्तिक पण आणि मुस्लिम पण ही काय भानगड आहे?

येस, नास्तिक मुस्लिम म्हणजे थोथांड आहे. सापाच्या अनेक तोंडांपैकी हे एक नव्यानी उगवलेले तोंड आहे.

बॅटमॅन Wed, 29/11/2017 - 17:51

In reply to by अनु राव

असेच म्हणतो. आजवर एकाही मुसलमानाला "मी नास्तिक आहे आणि तरीही मुसलमान आहे" असे म्हणताना ऐकले/पाहिले/वाचले नाही. मी टेररिस्ट नाही, लिबरल आहे वगैरे म्हणतील पण नास्तिक आणि मुसलमान हे दोन्ही एक नव्हेत याबद्दल आयसिसपासून लिबरल मुसलमानांपैकी सर्वांचे एकमत आहे असे दिसते.

पुंबा Wed, 29/11/2017 - 18:10

In reply to by बॅटमॅन

पण नास्तिकाला कशाला असेल मुस्लिम असण्याचा सोस? धर्माशी जोडले गेलेले सांस्कृतिक संचित तर हवे पण देव तर मानणार नाही, त्यामुळे मुस्लिम राहत नाही असा तिढा असणारे फार नसतील असे वाटते. असे लोक वाढत जावोत. थोडक्यात डॉकिन्स म्हणतो तसे कल्चरल मुस्लिम्स. धर्मप्रसृत टेनेट्स नाकारणारे, पण सांस्कृतीक वारसा ठेऊ इच्छिणारे, कुराण, हादिस, शरिया न मानणारे. (जावेद अख्तरसारखे? फॉर दॅट मॅटर बेटमॅनना हवे असणारे उदा. जावेद अख्तर असू शकते.)

बॅटमॅन Wed, 29/11/2017 - 18:11

In reply to by पुंबा

धर्माशी जोडले गेलेले सांस्कृतिक संचित तर हवे पण देव तर मानणार नाही, त्यामुळे मुस्लिम राहत नाही असा तिढा असणारे फार नसतील असे वाटते

असे म्हणणे हिंदूंसाठी सोपे आहे. त्यांच्याकडे ती सोय नाही. काफिर परवडले पण मुर्तद नको असा खाक्या असतो एकूण, कारण काफिर कन्वर्ट होऊ शकतो. मुर्तद अर्थात इस्लाम त्यागणारा तो त्यांचे लेखी सर्वांत डेंजरस. त्याला माफी नसते. तस्मात उघडपणे बोलत नाहीत फारसे कुणी. आणि जे बोलतात त्यांच्यावर प्रचंड प्रेशर असते वगैरे तर आहेच, शिवाय विचारवंतही "इतकं रॅडिकल कशाला बोलायचं" वगैरे बोलून त्यांनाच परत बोल लावतात, इफेक्टिवली मुल्लामौलव्यांना चुचकारतात. मुसलमानांवर टीका करणाऱ्यांपैकी तारेक फतेह हे नाव अतिफेमस आहे. तोदेखील नास्तिक आहे असे म्हणतच नाही. मी आणि अल्ला यांच्यामध्ये मुल्लाचे काम नाही इतकीच त्याची भूमिका आहे. मुळात अल्लाच नाकारतो असे तो कधीच म्हणत नाही. इर्शाद मांझीचाही पवित्रा तोच आहे. बहुतेक लोक असेच आहेत.

इब्न वर्राक, हमेद अब्देल-समाद हे दोनच लोक उघडपणे इस्लाम नाकारणारे पाहिलेत आजवर. अयान हिरसी अलीबद्दल मला तितकी माहिती नाही. तिचा स्टान्स नक्की कसा आहे? मी आणि अल्ला यांमध्ये मुल्ला नको असा आहे की अल्ला वगैरेच नको असा आहे?

इब्न वर्राकने "व्हाय आय ॲम नॉट अ मुस्लिम" नामक पुस्तक लिहिले. हमेद अब्देल-समाद याने "द केस अगेन्स्ट द प्रॉफेट" हे पुस्तक लिहिले. यांना जहालमतवादी म्हणून जे लोक निकालात काढू पाहतात त्या मूर्खांना एवढेही कळत नाही की अशाने इफेक्टिवली आर्थोडॉक्स इस्लामलाच बळ मिळतेय.

पुंबा Wed, 29/11/2017 - 18:23

In reply to by बॅटमॅन

जावेद अख्तर म्हणतो माझे कुठलेही रिलिजियस बिलिफ्स नाहीत. माझा कुठल्याही देवावर विश्वास नाही. हे इस्लाम धर्म नाकारणंच आहे की. म्हणजे भारतात चालतं असं असावं किंवा हे फार प्रचलित झालेलं नसावं. भारतात चालतं असं असेल तर भारतीय इस्लाम हा अरेबियन इस्लामपेक्षा वेगळाय(जास्त पोथीनिष्ठ नसणे, बऱ्यापैकी टॉलरन्ट असणे, भारतीय समाजासारखे) हेच सिद्ध होतं.
अयान हिरसी अलीची भाषणं ऐकलीयेत. जबरदस्त बाई आहे. आपली बरखा तिला शहाणपणा शिकवायला गेली होती, तोवाला व्हिडियो पूर्ण पहा.

त्या मूर्खांना एवढेही कळत नाही की अशाने इफेक्टिवली आर्थोडॉक्स इस्लामलाच बळ मिळतेय.

अगदी अगदी. हिचन्स, डॉकिन्स, डेनेट किंवा सॅम हॅरीस यांच्यावर टिका जेवढे उदारमतवादी करतात(ते पण इस्लामचाच केवळ कैवार घेत) तेवढे रिलिजियस कट्टर्स नसतील करत.(आजकाल पहाल तर ह्या लोकांच्या युट्युब कमेंट्सखाली हिंदू कट्टर पण बरेच दिसायलेत बरं का..)

बॅटमॅन Wed, 29/11/2017 - 18:27

In reply to by पुंबा

जावेद अख्तरचे ते विधान मला माहिती नव्हते. धन्यवाद. उत्तम आहे.

असे जेनेरिक न बोलता अल्लावर विश्वास नाही असे त्याने म्हटले असते तर ते अजून डिरेक्ट झाले असते, पण ठीकाय. तेवढा तोही हुशार असावा. :)

बरखा दत्त डोक्यावर पडलेली आहे यात कै शंकाच नाही. तो व्हिडिओ पाहतो.

आजकाल पहाल तर ह्या लोकांच्या युट्युब कमेंट्सखाली हिंदू कट्टर पण बरेच दिसायलेत बरं का..

ई तो साला होना ही था. लांगूलचालनाचा प्रतिसाद असा येणारच.

बायदवे, "हिंदूंचे इस्लामीकरण" असा शब्दप्रयोग कधीही चांगल्या अर्थाने वापरलेला पाहिला नाही. तेव्हा त्यांना विचारलं पाहिजे की बाबांनो इस्लाम जर शांतीप्रिय वगैरे आहे तर मग असा शब्दप्रयोग तुम्ही चांगल्या अर्थाने केला पाहिजे, तसे का केले जात नाही? :)

पुंबा Wed, 29/11/2017 - 19:00

In reply to by बॅटमॅन

मुस्लिमांची समस्या(सुशिक्षित, विचारी वगैरे) अशी वाटते की कुराणात अन हदिसात अनेक त्रुटी, दुष्ट कल्पना, कालबाह्य उदाहरणे आहेत, त्या पटत तर नाहीत, त्यांचा आधार घेऊन दहशतवाद पसरवणाऱ्यांना तर विरोध करायचाय पण हा विरोध करताना ज्या कुराणजन्य कल्पनांना पकडून बसलोय त्या तर सोडायच्या नाहीत कारण मुस्लिम असण्यासाठी त्यांना धरून असणे क्रमप्राप्तच आहे. त्यात बदल घडवून आणायचे किंवा निदान आधुनिक, संविधानिक मुल्यांना अनुसरून त्यांचे इंटरप्रिटेशन करायचे हे इस्लाम सोडून जाणे आहे असा समज(उर्वरीत लोकांमध्ये असणारा). समाजात तर रहायचे पण धार्मिक टेनेट्स पाळायची नाहीत असे शक्य न होणे हे मुळात लोकांंमुळे असावे.(तरी भारतात हे शक्य असावे.)
क्लोझेट मध्ये नास्तिक असणारे मुस्लिम नक्की असतील असा मला विश्वास आहे. कारण इस्लाम एवढा 'मँडेटरी' धार्मिक श्रद्धा आणि आधुनिक द्न्यान यांच्यात विसंगती असणारा दुसरा धर्म नाही. ज्यांना ही विसंगती दिसेल ते उघड नाही तरी आपापल्या पुरता तरी धर्म सोडून देत असतील.
शिवाय अल्लाला मानणारे पण पैगंबर, कुराण, हादिस वगैरे नाकारणारे, धर्माधिष्ठीत बंधनांपेक्षा संवैधानिक मुल्ये महत्वाची मानणारे मुस्लिम्स असतील असेही वाटते(फेबुवरील तबिश आलम हे अशाप्रकारचे उदाहरण वाटते, हमिद दलवाई देखिल अशाच प्रकारचे असावेत). हे तीन प्रकारचे लोक पुढे येत नसतील/नाहीत ते लोकांंमुळे. थोडक्यात इस्लाम सुधारू शकणारे लोक मुस्लिमांमुळे पुढे येऊ शकत नाहीत. उदारमतवादी 'खरं तर शांतीचा धर्म पण दहशतवाद्यांमुळे बदनाम झाला' अशी ओरड करून मुसलमानांना आणखी अंधारात ठेवतात.

बॅटमॅन Wed, 29/11/2017 - 19:03

In reply to by पुंबा

मुस्लिमांची समस्या(सुशिक्षित, विचारी वगैरे) अशी वाटते की कुराणात अन हदिसात अनेक त्रुटी, दुष्ट कल्पना, कालबाह्य उदाहरणे आहेत, त्या पटत तर नाहीत, त्यांचा आधार घेऊन दहशतवाद पसरवणाऱ्यांना तर विरोध करायचाय पण हा विरोध करताना ज्या कुराणजन्य कल्पनांना पकडून बसलोय त्या तर सोडायच्या नाहीत कारण मुस्लिम असण्यासाठी त्यांना धरून असणे क्रमप्राप्तच आहे. त्यात बदल घडवून आणायचे किंवा निदान आधुनिक, संविधानिक मुल्यांना अनुसरून त्यांचे इंटरप्रिटेशन करायचे हे इस्लाम सोडून जाणे आहे असा समज(उर्वरीत लोकांमध्ये असणारा). समाजात तर रहायचे पण धार्मिक टेनेट्स पाळायची नाहीत असे शक्य न होणे हे मुळात लोकांंमुळे असावे.(तरी भारतात हे शक्य असावे.)

स्पॉट ऑन! अगदी असेच.

क्लोझेट मध्ये नास्तिक असणारे मुस्लिम नक्की असतील असा मला विश्वास आहे.

बरेच आहेत असे म्हणतात, विशेषत: इराणात.

शिवाय अल्लाला मानणारे पण पैगंबर, कुराण, हादिस वगैरे नाकरणारे मुस्लिम्स असतील असेही वाटते.

बाकी हादिस वगैरे एकवेळ असो पण फक्त अल्लाला मानणारे आणि पैगंबर व कुराण न मानणारे मुसलमान असतील असे वाटत नाही. फारसी म्हण आहे- बा खुदा दीवाना बाशद, बा मोहम्मद होशियार! "अल्लाबद्दल पाहिजे ते बोला पण महंमदाबद्दल बोलताना खबर्दार!". शिवाय पैगंबर आला म्हणजे सोबत कुराणही आलेच. सबब ही क्याटेगरी अस्तित्वात असेलसे वाटत नाही. अल्लाबद्दलच बोलायचे तर अरब ख्रिश्चन लोकही देवाला अल्ला असेच म्हणतात, कारण अरबी भाषेत देव म्हणजेच अल्ला आणि अल्ला म्हणजेच देव. क्लासही तोच, इन्स्टन्सही तोच. तस्मात अल्ला इज नेसेसरी बट नॉट सफिशियंट फॉर बीइंग मुस्लिम.

पुंबा Wed, 29/11/2017 - 19:14

In reply to by बॅटमॅन

फारसी म्हण आहे- बा खुदा दीवाना बाशद, बा मोहम्मद होशियार! "अल्लाबद्दल पाहिजे ते बोला पण महंमदाबद्दल बोलताना खबर्दार!". शिवाय पैगंबर आला म्हणजे सोबत कुराणही आलेच. सबब ही क्याटेगरी अस्तित्वात असेलसे वाटत नाही. अल्लाबद्दलच बोलायचे तर अरब ख्रिश्चन लोकही देवाला अल्ला असेच म्हणतात, कारण अरबी भाषेत देव म्हणजेच अल्ला आणि अल्ला म्हणजेच देव. क्लासही तोच, इन्स्टन्सही तोच. तस्मात अल्ला इज नेसेसरी बट नॉट सफिशियंट फॉर बीइंग मुस्लिम.

हम्म. पटतंय.
ओशो म्हणतो तसे धर्म सोडून देणारे आणी तरीही धार्मिक असणारे लोक वाढले पाहिजेत सगळ्याच धर्मात, अतिशय प्रायव्हेट बाब म्हणून परमात्म्याचा थांग घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या आस्तिक, धार्मिक तरीही कुठल्याच धर्माच्या नसणाऱ्या लोकांचं प्रमाण आधी वाढले पाहिजे, नास्तिकांचे वाढेल तेव्हा वाढेल.

बॅटमॅन Wed, 29/11/2017 - 19:22

In reply to by पुंबा

ओशो म्हणतो तसे धर्म सोडून देणारे आणी तरीही धार्मिक असणारे लोक वाढले पाहिजेत सगळ्याच धर्मात, अतिशय प्रायव्हेट बाब म्हणून परमात्म्याचा थांग घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या आस्तिक, धार्मिक तरीही कुठल्याच धर्माच्या नसणाऱ्या लोकांचं प्रमाण आधी वाढले पाहिजे, नास्तिकांचे वाढेल तेव्हा वाढेल.

अशा लोकांना ट्रोल करणे ही सध्याची चालू फ्याशन वगैरे आहे.

अनु राव Wed, 29/11/2017 - 19:23

In reply to by पुंबा

अल्लाला मानणारे पण पैगंबर, कुराण, हादिस वगैरे नाकारणारे, धर्माधिष्ठीत बंधनांपेक्षा संवैधानिक मुल्ये महत्वाची मानणारे मुस्लिम्स असतील असेही वाटते

पुंबा, तुम्हाला मुसलमान म्हणजे कोण ह्याची व्याख्याच माहिती नसावी किंवा उगाचच वेड घेउन पेडगावला जातायत. खालील नीट वाचा.

मुसलमान म्हणजे पैगंबराला मानणे मस्ट आहे आणि नुस्ते इतकेच नाही तर पैगंबर हाच शेवटचा प्रेषित आहे हे मानणे पण मस्ट आहे. ( अहमदिया लोक कोणातरी एका अहमद ला पैगंबरानंतरचा प्रेषित मानतात म्हणुन त्यांची पाकिस्तान आणि अक्ख्या जगात कत्तल चालु आहे. )
ह्या डेफिनिशन मुळे नास्तिक सोडाच पण अल्ला मानणारा पण पैगंबराला नाकारणारा सुद्धा मुसलमान होऊ शकत नाही.

वर बॅटोबा म्हणाला तसे एकवेळ हिंदु/क्रिश्चन खपवुन घेतले जातील पण नास्तिक आणि पैगंबराला नाकारणारे मेलेच समजा.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 29/11/2017 - 23:02

In reply to by अनु राव

अनुतैतर फतवा काढणाऱ्या मौलवी निघाल्या की! मला वाटत होतं, अनुतै सांस्कृतिक हिंदू असतील. सॉरी हा अनुतै.

पुंबा Thu, 30/11/2017 - 10:52

In reply to by अनु राव

अहो पण तरीदेखिल अहमदिया स्वत:ला मुस्लिमच मानतात ना?
तसेच नास्तिक असणारे स्वत:ला मुस्लिम मानणारे असणारच नाहीत असे कसे?
मुल्ला, मौलवी ठरवतात तोच इस्लाम कशावरून असे म्हणणारे किती तरी मुस्लिम फेबुवरच दिसतात.

अनु राव Thu, 30/11/2017 - 11:17

In reply to by पुंबा

अहो अहमदिया स्वताला काय समजतात ते महत्वाचे नाही. ते स्वताला ज्या ग्रुप ला जोडु पहात आहेत ते त्यांना काय समजतात हे महत्वाचे आहे.

नास्तिक असणारे स्वत:ला मुस्लिम मानणारे असणारच नाहीत असे कसे?

अहो व्याख्याच वेगळी आहे. मुस्लीम समजले जाण्याचे जे बेसिक पॅरॅमिटर आहेत तेच पूर्ण होत नसताना, कोणी काय समजते ह्याला काही अर्थ आहे का?

लोखंड स्वताला सोने समजु लागले म्हणुन ते सोने होते का? काही तार्तिक, शास्त्रीय टेस्ट्स नाहीत का?

टवणे सर Thu, 30/11/2017 - 03:52

नास्तिक आणि मुस्लिम हा विरोधाभास असला तरी एव्हडी चर्चा करण्याआधी बायस बाजुला ठेवून पुस्तक वाचावे. धर्मशास्त्राच्या अंगाने मुस्लिम मनुष्य नास्तिक असू शकत नाही. हिंदू धर्मातला माणुस नास्तिक असू शकतो हे विधान कायद्यातील पळवाटेसारखे आहे. मुळात हिंदू ही व्याख्या अतिलवचिक असल्याने ती हवी तशी वाकवता येते. हिंदू धर्मातल्या विविध पंथांतल्या अनुयायांना नास्तिक राहून त्या पंथांचे अनुयायी राहणे शक्य आहे का? सनातन धर्माचे पालन करणारापण नास्तिक असू शकत नाही, अनिरुद्ध बापूंना भजणारा नास्तिक असू शकतो का? जैन धर्मीयसुद्धा नास्तिक असू शकत नाही अँड सो ऑन.
मुस्लिमधर्मीय कुराण, म. पैगंबर, हदीस या बाहेर जात नाहीत, संकुचित आहेत, अतिरेकी वृत्ती बळावलेली आहे हे आरोप मनुष्याच्या इतिहासात विविध धर्मांवर वेळोवेळी झालेले (जस्टिफाइड) आहेतच. एकेकाळी ख्रिश्चन धर्मप्रसारकांनी कितीतरी संस्कृत्यांची वाट लावली आहे. हिंदू समाजाने आपल्यातल्याच एका मोठ्या समुदायाला सब-ह्युमन ठरवून अंतर्गत मानसिक दहशतवाद अनेक शतके चालवलाच.
मेरी कमीज तेरे कमीजसे सफेद म्हणणे स्वत:चा अहंभाव कुळवारणे ठरेल.

आता समाजशास्त्रीय अंगाने बघितल्यास, जरी एखादा मुस्लिम नास्तिक झाला तरी सांस्कृतिक/सामाजिकदृष्ट्या तो बहुतकरुन मुस्लिमच राहील. उदा. मी नास्तिक असलो तरी माझ्या खाण्याच्या सवयी, घरातील नातेसंबंध, मुलांची नावे हे मराठी हिंदू छापाचेच राहते. एव्हडेच कशाला माझ्या मुलाचे नाव ऐकून अति-तिरकस मंडळीं 'काय फुकाचा दलित प्रेमी असल्याचा आव आणतो' हे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे दाखवून देतात इथे अमेरिकेत.
एखादा मुस्लिम घरात जन्मलेला नास्तिक मनुष्य ईद साजरी करेल, त्याच्या खाण्यापिण्याच्या सवयी तो ज्या भागातला मुस्लिम आहे तिथल्या राहतील. उदा. आमच्या मिरजेतला एखादा मुसलमान नास्तिक झाला तरी दख्खनी भाषेत लीलया बोलेल, मुलाचे नाव हमीद, समीर किंवा तसेच काहितरी ठेवेल, त्याच्या घर, त्यातले फर्निचर, खिडक्या, दारे, पडदे, गच्चीला केलेली सजावट, फरश्यांचे डिझाइन बघून मिरजेतला कुठलाही मनुष्य सांगेल हे घर मुसलमानाचे आहे. मग भले ते घर ब्राह्मणपुरीत असो. तर या मनुष्याला आपली पार्श्वभुमी, समाज, सवयी, संचित याचा न्युनगंड न बाळगता ते चालवत नास्तिक असण्याचा अधिकार खचितच आहे.

चिंतातुर जंतू Thu, 30/11/2017 - 12:07

In reply to by टवणे सर

>>आता समाजशास्त्रीय अंगाने बघितल्यास, जरी एखादा मुस्लिम नास्तिक झाला तरी सांस्कृतिक/सामाजिकदृष्ट्या तो बहुतकरुन मुस्लिमच राहील. <<

सहमत. माझे असे नास्तिक मुस्लिम मित्र आहेत. त्यांचा देवावर विश्वास नाही, कोणतेही कर्मकांड करत नाहीत. मुस्लिम राजकारणाविषयी त्यांची मतं तीव्र उदारमतवादी आहेत. (समान नागरी कायदा, स्त्रियांना समान हक्क, वगैरे). दारू पितात, पोर्क खातात. नाव, घरात होणारं खाणं वगैरे गोष्टी मात्र पारंपरिक मुस्लिम आहेत. उदा. दालचा, शीरखुर्मा इ. सारखे पदार्थ करायला मी त्यांच्या घरी शिकलो. त्यात एक शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार विजेता आहे. एक भौतिकशास्त्राचं प्राध्यापक जोडपं आहे. शिवाय, जावेद अख्तर आणि शबाना आझमींचा एक बालमित्र आहे. त्याच्या घरी मी जावेद-शबाना दंपतीला काही वेळा भेटलो आहे. त्यांच्याही बाबतीत हेच सांगू शकतो.

बॅटमॅन Thu, 30/11/2017 - 12:53

In reply to by टवणे सर

एकूण रेकॉर्ड पाहता हिंदूंची कमीज बऱ्यापैकी जास्त सफेद आहेच. ते एक असो.

बाकी तुम्हीही मिरजेचे हे ऐकून आनंद वाटला.

विवेकसिन्धु Thu, 30/11/2017 - 11:14

एक शंका: अल्लाह आणि खुदा ह्या दोन termsचे exact connotation काय आहे?
कारण एक पाकिस्तानी सहकारी, मी जेंव्हा जेंव्हा त्याला "खुदा हाफीज" म्हणायचो, तेंव्हा तेंव्हा न चुकता मला "अल्लाह हाफीज" म्हणायचा. त्याचे स्पष्टीकरण: अल्लाह सगळ्यांचा असतो, पण खुदा फक्त मुसलमानांचा असतो. तस्मात् शंका.

बॅटमॅन Thu, 30/11/2017 - 12:56

In reply to by विवेकसिन्धु

खुदा हा फारसी शब्द तर अल्ला हा अरबी शब्द हे तर आहेच.

अल्ला हा शब्द अरब ख्रिश्चनही वापरत असल्याने कदाचित तो पाकी तसे म्हणाला असेल.

बायदवे: नमाज हा शब्द फारसी असून संस्कृतातील नमन इ. शब्दाशी निगडित आहे. त्यामुळे नमाज ऐवजी अरबी सला हा शब्द वापरावा असा बूट निघाल्याचे वाचलेले, पाहिले पाहिजे काय आहे ते.

चार्वी Thu, 30/11/2017 - 16:17

In reply to by विवेकसिन्धु

बांग्लादेश भाषा आंदोलनाच्या वेळी उर्दू शब्द बंगालीतून हटवण्याचे प्रयत्न झाले. त्या संदर्भात ऐकले आहे, की बांग्लाप्रेमी बांग्लादेशी 'खुदा हाफिज'ऐवजी 'अल्ला हाफीज' म्हणतात (खुदा उर्दू, पण अल्ला उर्दू नाही म्हणे!)

बॅटमॅन Thu, 30/11/2017 - 16:27

In reply to by चार्वी

क्वाईट पॉसिबल. अल्ला हा अरबी शब्द आहे मुळात. पंजाबी प्रभाव म्ह. पर्यायाने फारसी प्रभाव झुगारायला म्हणून तसे केले असेल.

रोचना Tue, 05/12/2017 - 12:08

In reply to by चार्वी

अगदी सुरुवातीला भाषा आंदोलनाच्या अंतर्गत फारसी/उर्दू शब्दांना पूर्व पाकिस्तानात विरोध होता, पण अल्लाह हाफिज ची लोकप्रियता फक्त बांग्लादेश मध्येच नाही, तर अनेक मुसलमान समाजांमध्ये वाढलीय. आणि त्याचं कारण भाषिक विरोध नसून साउदी-प्रणित मूलतत्त्ववादी विचारांचा प्रसार आहे. खुदा हे देवाचे फारसी/उर्दूतले जेनेरिक नाव असून त्यात कोणत्याही धर्माच्या देवाचा उल्लेख असू शकतो, पण अल्लाह हेच अस्सल इस्लामी देवाचे नाव म्हणून खुदा हाफिज न म्हणता अल्लाह हाफिज म्हणावे असा अनेक कट्टर संस्थांनी मलेशिया, इंडोनेशिया, पाकिस्तान, बांग्लादेश वगैरे मध्ये प्रचार केला आहे. आणि गेल्या दोन-तीन दशकात हाच "सभ्य" आणि "शुद्ध" प्रयोग ठरला आहे. याच प्रसारामुळे उपखंडात अलिकडे 'रमजान' ऐवजी रमदान किंवा 'ईद उज्जुहा' च्या ऐवजी ईद अद-दहा जास्त वापरले जाते.
मलेशियात इस्लामेतर जनतेला 'अल्लाह' उच्चारण्यास बंदी आहे असे या लेखात वाचले.

https://www.dawn.com/news/833553
https://www.theguardian.com/commentisfree/belief/2012/apr/17/pakistan-g…

चिमणराव Mon, 11/12/2017 - 04:06

In reply to by रोचना

या गोष्टींत लोक किती वेळ वाया घालवतात!
फोनवर हॅलो म्हणण्याऐवजी किती पर्याय शोधले आहेत लोकांनी!

सामो Mon, 04/12/2017 - 22:32

https://www.amazon.com/Women-Who-Run-Wolves-Archetype/dp/0345409876

जंगियन विश्लेषण आणि दंतकथा/परीकथा यांचा मेळ व विश्लेषण म्हणजे हे पुस्तक. अजुन वाचते आहे. काही भाग आवडत आहेत काही पटत नाहीयेत.

चिमणराव Mon, 11/12/2017 - 04:08

लोकसत्ता
१) Marathi Articles | Sampadakiya | Agralekh | Editorial articles | Loksatta लिंक:http://www.loksatta.com/-category/agralekh/

२) lokrang loksatta Digital Lokrang Suppliment, Weekly Marathi Magazine | Loksatta लिंक:https://www.loksatta.com/lokrang/
३) chaturang। , loksatta Latest Marathi News, Marathi News Paper, Marathi News Paper in Mumbai | मराठी बातम्या मुंबई ...लिंक:https://www.loksatta.com/chaturang/

पुंबा Tue, 19/12/2017 - 11:31

कुंपनीने संजय दत्तला महाराष्ट्र सरकार त्याच्या पिक्चरचे शूटींग करण्यासाठी दयार्द्र होऊन देत असे तसला फर्लो दिला आहे. ही सक्तीची सुटी घालवणेकरीता ३ पुस्तके घेतली.
१. अभयारण्य : कुरुंदकर. आवडले खुप.
२. रारंग ढांग: कित्येकदा संधी मिळूनसुद्धा हे पुस्तक वाचणे झाले नव्हते. आता वाचणार.
३. वाचत सुटलो त्याची गोष्ट: निरंजन घाटे

सध्या 'वाचत सुटलो..' वाचत आहे. मला तरी आवडले. पुस्तके जिकडून मिळेल तिकडून गोळा करून वाचणाऱ्या हावरट लोकांमध्ये पुस्तकाविषयी एक निरर्थक आदरभाव वगैरे असतो. पुस्तकांविषयी म्हणजे पुस्तकाची पाने, वास, बांधणी, हार्डकव्हर/पेपरबॅक असली शिवताशिवत अश्या प्रकारांविषयी. शिवाय मी कसा पट्टीचा वाचक याचा दंभ निराळा. घाटे अश्या फॅनॅटिकपणापासून अलिप्त राहून लिहितात असे मावैम. सध्या तरी पुस्तक आवडले आहे. बरीच वेगळ्या प्रकारची पुस्तके यामूळे कळाली.
नितिन रिंढेंचे 'लिळा पुस्तकांच्या' आणि काळसेकरांचे 'वाचणाऱ्याची रोजनिशी' ही दोन पुस्तके देखिल अवश्य वाचणार आहे.

गब्बर सिंग Tue, 19/12/2017 - 11:44

In reply to by पुंबा

१. अभयारण्य : कुरुंदकर. आवडले खुप.

अभयारण्याची कॉपी हवी आहे मला. कुठे मिळेल ? रसिक वर आऊट ऑफ प्रिंट आहे.

पुंबा Tue, 19/12/2017 - 11:51

In reply to by गब्बर सिंग

'रसिक साहित्य' दुकानातून मी घेतले.

http://www.bookganga.com/eBooks/Books/details/4822521552821316549?BookN…

इथे मिळू शकेलसे वाटते.

बिटकॉइनजी बाळा Tue, 19/12/2017 - 12:59

In reply to by पुंबा

निरर्थक आदरभाव याविषयी सहमत.
काही य वर्षांनी एलन मस्क मेंदूत घालायच्या चिपा मास प्रोड्युस करेल तेव्हासुद्धा हे "घालत सुटलो" वगैरे म्हणत फुशारक्या मारतील.

ॲमी Wed, 10/01/2018 - 17:43

गेल्यावर्षी ४० पुस्तकं वाचायचं ठरवलेलं; ३० च वाचली :-(

दोष प्राईड अँड प्रिजुदाईस च्या डोम्बल्यावर टाकता येईल; कारण ते वाचायच्या प्रयत्नातच एकदीड महिना वाया गेला. चालायचंच... बाकीच्या पुस्तकांची यादी आताच पहात होते. एकुणात बरं गेलं वर्ष.

मला सगळ्यात आवडलेल:

पुस्तक - Finders Keepers

लेखक - Tana French (Dublin Murder Squad मालिकेतली ५ पुस्तकं वाचून झाली)

बाकी नामोल्लेख करावीत अशी:
• A man called Ove - याची जेवढी हवा झाली तेवढं काही मला आवडलं नाही.

• Breakfast at Tiffany's - आवडलं.

• Chronicle of Narnia - ४ वाचली. छान आहेत.

• You - अतिशय क्रिपी!

• The Grownup - भन्नाट! असणारच म्हणा शेवटी आमच्या प्रिय Gillian Flynn ने लिहिलय. हिचे पुढचे पुस्तक कधी येणार?

• The woman in cabin 10, The couple next door, The breakdown, Pretty girls, I see you - सगळेच ठिकठाक. या सगळ्यांची debut पुस्तक जास्त चांगली होती.

• Harry Potter and cursed child - आवडलं मला. J.K. ने पुस्तकच लिहलं असत तर जास्त बरं झालं असतं.

ॲमी Mon, 15/01/2018 - 16:13

In reply to by आदूबाळ

Talkback यासाठी वापरतात होय!
धन्यवाद. रटाळ आवाज चालेल बहुतेक कारण वाचणारा मनुष्यप्राणी रटाळ सेल्फ हेल्प पुस्तकं वाचणार आहे :-P

अबापट Mon, 15/01/2018 - 12:37

पुन्हा एकदा वाचतोय "Bafut Beagles "लेखक जेराल्ड डरेल .
१९५३ किंवा ५४ साली लिहिलेलं , आणि शाळेत असताना पहिल्यांदा वाचलेलं पुस्तक पुन्हा वाचतोय .
इतके फ्रेश . साठ सत्तर वर्षांपूर्वी लिहिलेले असूनही त्यातील विनोद शिळा न झालेले पुस्तक .
अतिशय छान पुस्तक , मिळाल्यास जरूर वाचा .
कारण माहित नाही पण जेराल्ड डरेल मराठी वाचकांमध्ये फारसा परिचित नाही .
बाकी विलायतेत डरेल ची इतर पुस्तके प्रसिद्ध आहेत पण Bafut Beagles त्या सगळ्यांपेक्षा सर्वार्थाने जास्त जास्त एंजॉयेबल आहे असे वैयक्तिक मत .

*हे पुस्तक शाळेत असताना कसे वाचायला मिळाले हि एक स्टुरी आहे आणि नंतर आऊट ऑफ प्रिंट असलेले हे पुस्तक मिळवताना काही मजेशीर स्टुऱ्या आहेत .
( आता दोन कॉप्या आहेत माझ्याकडे )
डरेल ची बहुतेक पुस्तके आऊट ऑफ प्रिंट आहेत . कोणाला मिळाली किंवा कोणाकडे असली तर मी नॉस्टॅलजिया म्हणून नक्की विकत घेईन . ( अमेझॉन वर साले सेकंड/थर्ड हॅन्ड कॉपी दोन किंवा तीन हजाराला सांगतात )

अबापट Mon, 15/01/2018 - 13:13

In reply to by आदूबाळ

घ्या घ्या , . च्यायला माझ्याकडे चांगल्या दोन काप्या होत्या , आज लक्षात आलं कि त्यातील एक परत आलेली नाहीये .
असली तर उरलेली पण घ्या .

आदूबाळ Mon, 15/01/2018 - 16:01

In reply to by अबापट

घेतली. "कंडिशन - यूज्ड, गुड" असं दाखवतंय म्हणजे बरी असावी. पण ही पेंग्विन पेपरबॅक आवृत्ती आहे. त्याची पानं पिवळी पडतात लौकर.

भारतात येताना घेऊन येतो.

अबापट Mon, 15/01/2018 - 16:07

In reply to by आदूबाळ

आणा हो , जशी असेल तशी आणा . दुर्मिळ झालंय .
माझ्याकडची कॉपी तर पहिली आवृत्ती १९५४ ची आहे . जीर्ण . अमेरिकन पब्लिकेशन हाऊस आहे . अगदी जुन्या पद्धतींनी मी कव्हर वगैरे घालून जपलीय .

'न'वी बाजू Fri, 19/01/2018 - 18:53

In reply to by आदूबाळ

Bafut Beagles ची एक जुनी लायब्ररी कॉपी २५०ला मिळते आहे.

भारतात येताना घेऊन येतो.

भारताबाहेरील अॅमेझॉनवर रुपयांत किंमत?

आदूबाळ Thu, 18/01/2018 - 16:28

American Gods | Neil Gaiman | Audible

'जॉनर बेंडर' हा शब्द अलिकडे जांघेतल्या बेंडाइतका कॉमन झाला आहे. या पुस्तकासंदर्भात मात्र वर्णन योग्य आहे. या पुस्तकाला सायफाय/फँटसीसाठीची 'ह्युगो' आणि 'नेब्युला' पारितोषिकं तर मिळालीच, पण खास फँटसीसाठीचं 'लोकस' आणि भयकथेसाठीचं 'ब्रॅम स्टोकर' ही पारितोषिकंदेखील मिळाली. परीक्षकही बहुदा कनफ्यूज झाले असावेत. जर तुम्हाला सायफाय/फँटसी/हॉरर वाचून बनचुकेपणा आला असेल - नथिंग क्यान सर्प्राईज मी असं वाटत असेल -तर हे पुस्तक लगेच वाचा. नुसत्या कथानकाच्या कल्पनेत इतकं धाडस भरलेलं आहे की बनचुकेपणावर थंड पाणी ओतलं गेलं.

शॅडो नावाचा इसम अमेरिकेतल्या एका तुरुंगात सडतो आहे. तो पॅरोलवर बाहेर येतो आणि त्याच्या जगात विचित्र घटना घडायला लागतात. शॅडोला भेटलेली माणसं (?!) आणि त्यांनी अमेरिकाभर केलेला प्रवास हा कादंबरीचा गाभा आहे.

कादंबरीने मला लैच विचारात पाडलं. 'देव' (गॉड्स) या संकल्पनेची व्याप्ती. देव 'जिवंत' असणं म्हणजे 'थॉटफॉर्म' या स्वरूपात जिवंत असणं. देवाची श्रद्धा म्हणजे नेमकं काय. 'जुने देव' विरुद्ध 'नवे देव'. वगैरे.

या कादंबरीचं मराठी भाषांतर होणं गरजेचं आहे.

ही कादंबरी ॲमेझॉनच्या 'ऑडिबल' या ऑडियोबुक सेवेवर ऐकली. खुद्द नील गेमनचं नॅरेशन असलेली. तशीच ऐकावी असं सुचवेन.

______

चांगलं वाचण्याचेही योग यावे लागतात. तसे गेल्या दोनतीन महिन्यांत आले आहेत. बॅट्याने सुचवलेल्या "जीवनसेतू" पासून ते जयंत पवारांच्या कथासंग्रहांपर्यंत ते मकरंद साठ्यांच्या 'काळे रहस्य' पर्यंत. हे असंच चालू राहो.

ॲमी Fri, 19/01/2018 - 10:54

In reply to by आदूबाळ

American Gods अर्धे वाचले आहे. कारण आठवत नाही पण पूर्ण वाचायचे राहून गेले. कन्सेप्ट आवडली होती. वाचेन परत कधितरी सुरुवातीपासून.

===
सध्या Celeste Ng चे Everything I never told you वाचतेय. फारच heart wrecking (मराठी शब्द?)आहे. ब्रेक घेत घेत वाचावे लागतेय.

===
heart wrecking (मराठी शब्द?) >> लॉल हृदयफोडू भारिय :D पण हृद्यविदारक जास्त बरोबर वाटतोय. वापरेन पुढच्या वेळी. आभार दोघांना :)
'काळजाला घरं पडणारं'पण चांगला पर्याय आहे. बोलताना कोणी हृदय वगैरे शब्द फारसं वापरत नाही :)

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 19/01/2018 - 21:59

In reply to by हारुन शेख

सदर संदर्भात फक्त विदारक हा शब्दही पुरेसा आहे; शब्दशः भाषांतराची गरज वाटत नाही. (हृदयविदारक अंमळ दवणीय दुःख वाटतं.)

'न'वी बाजू Fri, 19/01/2018 - 16:09

In reply to by ॲमी

'काळजाला घरं पडणारं'पण चांगला पर्याय आहे. बोलताना कोणी हृदय वगैरे शब्द फारसं वापरत नाही :-)

पण... पण... पण... काळीज म्हणजे यकृत (लिव्हर) ना?

आणि काळजाला घरे पाडली तर काळजाची चाळ बनणार नाही काय?

की घरे 'पाडणे' बोले तो ही काळजातली मास डीमॉलिशन स्कीम आहे (बुलडोझर चालवून)?

ॲमी Fri, 19/01/2018 - 16:28

In reply to by 'न'वी बाजू

की घरे 'पाडणे' बोले तो ही काळजातली मास डीमॉलिशन स्कीम आहे (बुलडोझर चालवून)? >> असंच काहीतरी असेल. काळीज बोलीभाषेत हृदय म्हणूनपण वापरतात म्हणजे हार्ट झालं. wreck म्हणजे पडझड वगैरे....

राही Thu, 18/01/2018 - 22:17

मेकॉले: काल आणि आज-- लेखक विंग कमांडर डॉ.जनार्दन वाटवे आणि डॉ. विजय आजगावकर. दोन्ही मोठी नावे. मेकॉलेविषयी आणि अनुषंगाने एकोणिसाव्या शतकाविषयी बरीच माहिती. भरपूर मूळ पुरावे, अवतरणे यामुळे वाचावेसे वाटते, जरी एक दृष्टिकोण ठेवून लिहिलेले असले तरी. बुकगंगावर आहे. पुस्तकरूपातही मिळते.

अबापट Fri, 19/01/2018 - 08:28

In reply to by चिमणराव

वाचा वाचा , जरूर वाचा . व्यंकटेश माडगूळकरांच्या पेक्षा थोडी वेगळी जातकुळी वाटली मला . हे जास्त रंजक/गमतीशीर आहे , तात्यांचं थोडं सिरियस आहे . अर्थात तात्यांनी पोक्त वयात लिहीलं हे सगळं म्हणूनही असेल , डरेल नी मज्जा करण्याच्या वयात लिहीलय . शिवाय कॅमेरून , तेही स्वातंत्र्या पूर्वीचं ...म्हणजे आपल्याला माहीत नसलेल्या जगाची सफर आहे .

चिमणराव Fri, 19/01/2018 - 10:44

"नवीन तुरा उगवणाय्रा कोंबड्याने आपला गळा आजमावयाच्या अगोदरच गवताचा सिजन लवकर संपरा" अशी काही वाक्यं दिसताहेत.

'न'वी बाजू Fri, 19/01/2018 - 16:24

In reply to by ॲमी

ही पण वाचायची आहेत मिळतील तशी... यादी वाढतच चालली आहे...

नाही वाचली, तर नक्की काय होईल?

नाही म्हणजे, नव्या तांदळाचा भात खाल्ल्यासारखे तर काही होणार नाही ना?

चिमणराव Fri, 19/01/2018 - 16:46

कुणाला हैदराबादला जाऊन हलिम/बिर्राणी ( कितवी विचारू नका) खायची असते तसं. आता नाही खाल्ली तर काय हा प्रश्न बाद. आवड आणि उर्मी इतरांना उबळ वाटते.

'न'वी बाजू Fri, 19/01/2018 - 17:47

In reply to by चिमणराव

कुणाला हैदराबादला जाऊन हलिम/बिर्राणी ( कितवी विचारू नका) खायची असते तसं.

मी हे दोन्ही प्रकार (खाल्लेच तर) अटलांटातच इथल्या एका हैदराबादी रेष्टारंटात खातो. (ऑल्दो, दोन्ही प्रकार माझ्या विशेष आवडीचे नाहीत. बोले तो, वर्ज्य नाहीत, परंतु आवर्जून खाईन, असेही नाही. विशेषतः बिर्याणी. हलीम क्वचित्प्रसंगी वाकडी वाट करून खाईनही.)

हं, मात्र एकदा जुन्या दिल्लीच्या मुसलमान वस्तीत जाऊन हम्माची निहारी खाण्याची इच्छा होती खरी. (म्हैस-हम्माची नव्हे. खऱ्याखुऱ्या हम्माची. बोले तो, जिच्या प्रतिपालनासाठी छत्रपतींनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले म्हणतात, तिची. वस्तुतः, हा प्रकारदेखील अटलांटातल्या त्याच हैदराबादी रेष्टारंटात उत्तम मिळतो. परंतु निहारीचा उद्गम - गंगोत्री म्हणू या का? - जुन्या दिल्लीतला, म्हणून एकदा तेथे जाऊन चाखायची इच्छा होती, इतकेच.) मात्र, आता तुमच्या या 'अच्छ्या दिनां'त आमची ही एवढी साधीसुधी इच्छासुद्धा पुरी होणे अशक्यप्राय - किंवा गेला बाजार जिवास धोकादायक - होऊन बसले आहे खरे.

मात्र, जुन्या दिल्लीत जाऊन हम्मा-निहारी खायची इच्छा पुरी होऊ न शकल्यामुळे आम्ही आमच्या पोटात दुखू देणार नाही - आणि बेशुद्ध तर पडणार नाहीच नाही - असा आम्ही पण केला आहे. उलट, "'अब की बार'च्या, 'अच्छे दिन'वाल्यांच्या, समस्त भक्तगणाच्या तथा संकीर्ण उजव्यांच्या वृषभपित्याला घो" म्हणत अटलांटातच (बहुतकरून त्याच रेष्टारंटात) हवी तेवढी आणि शक्य तेवढी हम्मा-निहारी हादडून घेण्याचा संकल्प सोडला आहे. सो हेल्प मी भगवान गोपाळ!

..........

बेशुद्ध पडण्याकरिता मुळात शुद्धीत असण्याची पूर्वअट असल्याकारणाने या बाबतीत आम्ही आपले समाधान करू शकणार नाही. सबब, क्षमस्व.

'न'वी बाजू Fri, 19/01/2018 - 18:43

In reply to by अनुप ढेरे

असेलही. (आणि, इन विच केस, आमच्या लेखी तोही हुकूमशाही, अन्यायकारक तथा अस्थानी आहेच. अशा (बोले तो बहुसंख्याकलांगूलचालनाच्या/पॉप्युलिस्ट) टेंडन्सीज़ काँग्रेसजनांमध्ये किंवा इतरेजनांत कधी नव्हत्याच, असा आमचा दावा खचितच नाही, आणि आमचा त्यासही तितकाच तीव्र विरोध आहे.)

मात्र, तेव्हा दिल्लीत हम्मा-निहारी खाणे हे अवैध जरी असले (जे असू नये, असा आमचा दावा आहे), तरी प्राणघातक बहुधा नसावे. (चूभूद्याघ्या.) गेला बाजार, बातम्या तरी ऐकू आल्या नाहीत ब्वॉ. (अर्थात, प्रेस्टिट्यूट्सचे काही सांगता येत नाहीच म्हणा, दडपत असतील साले. काय करणार.)

ॲमी Sat, 20/01/2018 - 10:58

In reply to by 'न'वी बाजू

यावरून आठवलं :

आम्ही सोलापुरात बीफ मार्केट शेजारी राहायचो (आधी एकदा मी ऐसीवरच उल्लेख केला होता याचा) तर तेव्हा तिथे कधी म्हशी आणलेल्या पाहिल्याच आठवत तरी नाहीय... गाई आणि बैल भरपूर दिसायचे. त्या रोडने खूप कमी वेळा जायचो म्हणा; दुसरा लांबचा मार्ग नेहमी वापरायचो.

चिमणराव Fri, 19/01/2018 - 19:56

मुद्दा अमुक पुस्तकं वाचण्याचा आला. एखादा लेखक आवडला की त्याचे पुस्तक मिळवायचा ध्यास.
तुमची हम्माची इच्छा कामधेनूसुद्धा पुरी करेल का शंकाच आहे.

पुंबा Sun, 21/01/2018 - 16:03

Amazonvar kindle paperwhite 7300 rs la milate ahe(no cost emi chya optionsakat). Ghyayachi iccha asanaaryaaMni gheun takave.
(Extremely sorry for typing in roman script.)

गब्बर सिंग Mon, 22/01/2018 - 22:18

Jordan Peterson: ‘The pursuit of happiness is a pointless goal’

हा लांबलचक लेख वाचतो आहे.

Peterson’s 12 rules

Rule 1 Stand up straight with your shoulders back

Rule 2 Treat yourself like you would someone you are responsible for helping

Rule 3 Make friends with people who want the best for you

Rule 4 Compare yourself with who you were yesterday, not with who someone else is today

Rule 5 Do not let your children do anything that makes you dislike them

Rule 6 Set your house in perfect order before you criticise the world

Rule 7 Pursue what is meaningful (not what is expedient)

Rule 8 Tell the truth – or, at least, don’t lie

Rule 9 Assume that the person you are listening to might know something you don’t

Rule 10 Be precise in your speech

Rule 11 Do not bother children when they are skate-boarding

Rule 12 Pet a cat when you encounter one on the street

पुंबा Tue, 23/01/2018 - 17:44

हमोंचे बालकाण्ड, पोहरा व निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी ही तीन पुस्तके प्रत्येकी ६० रूला अजबच्या सेल मध्ये मिळाली.
निष्पर्ण वृक्षावर.. अतिशय दाहक, अंगावर येणारे पुस्तक आहे. केवळ ७०-८० पानाचे पुस्तक. डोकं भणाणतं.

आदूबाळ Tue, 23/01/2018 - 20:21

In reply to by पुंबा

निष्पर्ण वृक्षावर.. अतिशय दाहक, अंगावर येणारे पुस्तक आहे. केवळ ७०-८० पानाचे पुस्तक. डोकं भणाणतं.

मीही त्याच अजब सेलातून हीच तीन पुस्तकं घेतली. बाकी दोन आधी वाचली होती, 'निष्पर्ण वृक्षावर..' वाचलं नव्हतं.

मला हे पुस्तक अत्यंत भडक, सुमार आणि उगाचच सनसनाटी वाटलं. [स्पॉयलर] 'बेकारीचे चटके' हा विषय जयंत पवारांच्या 'अधांतर' सारख्या अनेक कलाकृतींमध्ये ताकदीने हाताळला गेलाय. बेकार भणंग तरूण हा त्या काळच्या अनेक कादंबऱ्या / चित्रपटांतला पेट्ट विषय आहे. [/स्पॉयलर] त्यामुळे विषयात आणि विषयाच्या हाताळणीमध्ये नाविन्य वाटलं नाही. [स्पॉयलर] तो नायक आपल्या हाताने बायकोचा गर्भपात करवतो हा भाग सनसनाटी भडक आहे. पोलीस टाईम्ससारखा.[/स्पॉयलर]. एकंदरीत 'स्ट्रीम ऑफ कॉन्शसनेस' प्रकारचं निवेदन असलेली पुस्तकं मला लैच बोर होतात. त्यामुळे त्या नायकाच्या मनोव्यापारांनी वैतागायला झालं.

दुसरं म्हणजे ह मो मराठ्यांचा मानभावीपणा. कादंबरीच्या शेवटी "मी कादंबरी कशी लिहिली!" छाप लेख समाविष्ट करणं म्हणजे स्वत:भोवती दिवे ओवाळून घेण्याची हाईट आहे. त्यातही : काही शब्द एम्फसिस देण्यासाठी ठळक वगैरे केले, त्याचं वर्णन "कादंबरीलेखनात टाईपसेटिंगचा अभिनव प्रयोग" असं काहीसं केलं आहे! (नंतर त्यांनी "बालकांड आणि पोहरा: समीक्षा आणि समांतर समीक्षा" असं काहीसं पुस्तक लिहून दुसरा अंक काढला.)

कदाचित माझं मत फारच कटू असेल, पण उगाचच गाजलेलं पुस्तक आहे असं माझं मत झालं आहे.

पुंबा Wed, 24/01/2018 - 12:02

In reply to by आदूबाळ

मला विषयाची दाहकता पोचवण्यासाठी ही भडकपणाची डूब दिल्यासारखे वाटले. भर दुपारी, सगळे भवताल अंगावर येण्याइतके भगभगीत दिसते तसे यातले वर्णन वाटले. नायक पूर्णत: असहाय आहे, परिस्थितीचा बळी झालेला आहे, पुढे कुठलाही रस्ता दिसत नाही. मानसिकरित्या अस्थिर अवस्थेत त्याने केलेले हे निवेदन आहे. मला तरी ते प्रत्ययकारी वाटले. या विषयावरचे मी वाचलेले हे एकमेव पुस्तक. म्हणून असेल कदाचीत मात्र खूप विषण्णता आलेली वाचून.
हमोंचे शेवटचे निवेदन मानभावीपणाचे आणि अनावश्यक आहे असे माझेही मत आहे. मात्र जेव्हा कादंबरी लिहिली(१९६९ साली) तेव्हा तरी ती जेन्युईनली लिहिली असावी असे मला वाटते. शैलीचे प्रयोग आणि नायकाचे बंड न करणे यासाठी हमोंनी दिलेले स्पष्टीकरण पटले मात्र अक्षरे मोठी करून छापणे म्हणज एकाही तरी मोठी गोष्ट आहे हे पटले नाही. तो पोरकटपणा वाटला. तो भाग आला अन ते निवेदन वाचायचं थांबवलं.
या विषयावर आधारलेली आणखी कोणती पुस्तके सुचवाल?

बिटकॉइनजी बाळा Wed, 24/01/2018 - 12:18

In reply to by पुंबा

निष्पर्ण वृक्षावर.. नक्की कशावर आहे हे एका ओळीत सांगता येईल का? गेली साताठ वर्षे मी ऐकतोय पण हे नक्की कशावर आहे हे अजून कळले नाही.

मिलिन्द् पद्की Wed, 24/01/2018 - 03:00

इंग्रजीतल्या याआधीच्या डिटेक्टिव्ह कादंबर्यांमधले डिटेक्टिव्ह साधारणतः गोरे पुरुष असत आणि ते सोडून इतर सर्वांमधून खलनायक येत असत. सू ग्राफ्टन ने प्रथमच स्त्री-वादी महिला डिटेक्टिव्ह मांडली आणि खलनायक गोऱ्या पुरुषांमधले दाखविले . सू ग्राफ्टन महिन्याभरापूर्वी कॅन्सरने मरण पावली.
https://www.nytimes.com/2017/12/29/obituaries/sue-grafton-dies-best-sel…

हारुन शेख Thu, 25/01/2018 - 15:39

माझं आवडतं चित्र

( गॉगचं माझं आवडतं चित्र: विकिपीडियावरून साभार )

आयर्विंग स्टोनच्या विन्सेंट व्हान गॉगवर लिहिलेल्या Lust for Life या चरित्रात्मक कादंबरीचा माधुरी पुरंदरेंनी केलेला स्वैर अनुवाद वाचला. ठीक वाटला. माधुरी पुरंदरेंकडून जास्त अपेक्षा होत्या त्यामानाने अनुवाद थोडासा बोजडच झाला आहे. इंग्रजी वाक्यांचा अनुवाद जसाच्या तसा केला गेलाय. पल्लेदार आणि तत्त्वज्ञानात्मक वाक्यांची मराठी भाषांतरे करताना लेखिकेची दमछाक झालेली दिसते आणि कादंबरीच्या सगळ्याचं पात्रांच्या तोंडी अशी वाक्ये भरभरून आहेत.

मला जाणवलेली आणखीन एक त्रुटी म्हणजे पुस्तकात गॉगची महत्त्वाची रंगीत चित्रे असायला हवी होती. निदान पुस्तकात ज्या चित्रांचे उल्लेख आहेत किंवा ज्यांची जन्मकथा सांगितली आहे ती तरी हवी होती. मलपृष्ठावर पाच - सहा चित्रे आहेत पण ती तितकीच. मला कादंबरीत उल्लेखलेली चित्रे आंतरजालावर शोधावी लागली. (अशावेळी pintrest खूपच कामी येते). गॉगचं Starry Night Over the Rhône माझं खूप आवडतं चित्र आहे त्याचा पुस्तकात कुठेच उल्लेख नाही किंवा ते मलपृष्ठावरही नाही. एवढं सगळं असूनही वाचनीय पुस्तक आहे हे. एक माणूस म्हणून गॉग त्याच्या सर्व गुणदोषांसकट आपल्या डोळ्यापुढे उभा राहतो. त्याचा खडतर कला प्रवास, प्रत्येक काम झोकून देऊन करण्याची मनस्वी वृत्ती, बोरीनाजच्या खाणकामगारांसोबत सच्च्या सेवाभावाने जगणारा इवॅनजेलीस्ट गॉग ते आर्ल्समधला भंजाळलेला, स्वतःचाच कान कापून घेणारा गॉग , पॅरिसमध्ये पॉल गोगँ , लोत्रेक, रुसो, सरा, सेझान या मित्रमंडळींसोबत चित्रकलेच्या आणि एकूण जीवनविषयक तत्त्वज्ञानावरल्या गप्पांत रमणारा गॉग ते आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत भाऊ तेओवर निःसीम प्रेम करणारा गॉग, आपल्यापुढे या चित्रकाराचं शब्दचित्र उभं करण्यात ही कादंबरी यशस्वी ठरते.

अवांतर : ह्या इम्प्रेशनिस्ट चित्रकारांचा स्त्रियांविषयीचा दृष्टिकोन मोठा विचित्र वाटला. व्हान गॉगला स्त्री एकतर तिच्या सौंदर्यासाठी हवी आहे नाहीतर मोलकरीण / घरकामात आनंद मानून घेणारी बायको म्हणून किंवा नुसतं टीटीलेटिंग प्रेम करणारी मैत्रीण म्हणून किंवा कधीकधी नुसती शारीरिक सुखाची निकड म्हणून. बुद्धिमान बायकांसोबत या बुद्धिमान चित्रकारांना झोपायचंही नाही. गोगँला फक्त लठ्ठ आणि मठ्ठ स्त्रिया हव्या आहेत. स्वतःचं पौरुष सिद्ध करण्याकरता लोत्रेकला मिळतील तितक्या बायकांसोबत झोपायचंय. गोगँ आर्ल्समध्ये आल्या आल्या तिथल्या माडीवरच्या स्त्रिया कश्या आहेत याची गॉगकडे चौकशी करतो. रुसो सुंदर स्त्रियांनी त्याच्यावर भाळावे म्हणून स्वतःची चित्रे त्यांना फुकट देऊन टाकतो.

बॅटमॅन Thu, 25/01/2018 - 15:41

In reply to by हारुन शेख

: ह्या इम्प्रेशनिस्ट चित्रकारांचा स्त्रियांविषयीचा दृष्टिकोन मोठा विचित्र वाटला. व्हान गॉगला स्त्री एकतर तिच्या सौंदर्यासाठी हवी आहे नाहीतर मोलकरीण / घरकामात आनंद मानून घेणारी बायको म्हणून किंवा नुसतं टीटीलेटिंग प्रेम करणारी मैत्रीण म्हणून किंवा कधीकधी नुसती शारीरिक सुखाची निकड म्हणून. बुद्धिमान बायकांसोबत या बुद्धिमान चित्रकारांना झोपायचंही नाही. गोगँला फक्त लठ्ठ आणि मठ्ठ स्त्रिया हव्या आहेत. स्वतःचं पौरुष सिद्ध करण्याकरता लोत्रेकला मिळतील तितक्या बायकांसोबत झोपायचंय. गोगँ आर्ल्समध्ये आल्या आल्या तिथल्या माडीवरच्या स्त्रिया कश्या आहेत याची गॉगकडे चौकशी करतो. रुसो सुंदर स्त्रियांनी त्याच्यावर भाळावे म्हणून स्वतःची चित्रे त्यांना फुकट देऊन टाकतो.

अहो चालायचेच. मेन विल बी मेन.

बाकी प्रतिसाद आवडला.

चिंतातुर जंतू Thu, 25/01/2018 - 16:09

In reply to by हारुन शेख

>>ह्या इम्प्रेशनिस्ट चित्रकारांचा स्त्रियांविषयीचा दृष्टिकोन मोठा विचित्र वाटला.<<

माझ्या निरीक्षणानुसार : ज्यांचं काम / जगण्याचा ध्यास निर्मितिक्षम आणि मेंदूला झिणझिण्या आणणारा असतो, अशा अनेक लोकांची (मग ते पुरुष असोत की स्त्रिया) जोडीदाराची निवड काहीशी अशी असते - म्हणजे सगळा मेंदू कामातच पणाला लावायचा आणि व्यक्तिगत आयुष्यात शक्यतो त्याला फार तोशीस पडणार नाही असा जोडीदार शोधायचा. नैतिकदृष्ट्या हे योग्य की अयोग्य ते सांगणं कठीण होतं, कारण उदा. त्या माणसांचा वेळ/उर्जा/मेंदू घरच्या भानगडींत अडकला असता, तर त्यांच्या निर्मितीवर त्याचा वाईट परिणाम झाला असता, वगैरे.

कदाचित ह्याची जाणीव असल्यामुळे ह्यातल्या काहींनी लग्नंच केली नाहीत - म्हणजे केवळ शरीराची गरज भागेल एवढंच पाहायचं, पण संसार करायचा नाही - केवळ रोखीचा आणि कामापुरता व्यवहार. संसार करून त्याकडे दुर्लक्ष करण्यापेक्षा हे तर मला नैतिकदृष्ट्या अधिक स्वच्छ वाटतं.

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 27/01/2018 - 00:14

In reply to by चिंतातुर जंतू

गेले काही महिने एका तत्त्वज्ञाचं चरित्र+नवनीत-गाईडछाप-सिद्धांत असलेलं पुस्तक वाचत आहे, Ludwig Wittgenstein: The Duty of Genius.

त्याचे अनेक समकालीन तत्त्वज्ञांशी कसे संबंध होते, आपसांत काय चर्चा चालत याबद्दल पुस्तकात उल्लेख आहेत. त्यांतल्या दोघांबद्दल तर विटगेनस्टाईनला प्रेमभावना असाव्यात असाही संशय येतो. पुस्तकाच्या लेखकालाही. मात्र त्यानं लग्नाकरता मागणी घातली ती ओळखीतल्या, एका बऱ्यापैकी मठ्ठ बाईला. तिच्या मठ्ठपणाची जाणीव असल्यामुळेच त्यानं लग्नाचा प्रस्ताव ठेवला, असंही लेखक म्हणतो. तिनं तो प्रस्ताव नाकारला; कारण त्याला शारीरिक जवळीक नसलेला, अपत्यहीन संसार करायचा होता; तिला शारीर सुख आणि अपत्यं हवी होती. तिनं प्रस्ताव नाकारला.

नावं आठवत नाहीत, पण जुन्या काळातल्या अनेक प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञांबद्दलही असंच म्हटलं जात असे. हे लोक श्रीमंत आणि फारशी बुद्धी नसलेल्या स्त्रियांशी लग्नं करत. (लिझ माईट्नरच्या चरित्रात, तिच्या मित्राबद्दलही असाच उल्लेख आहे.) बायकोच्या वाडवडलार्जित पैशांवर संसार चालवायचा आणि बाहेर प्रसिद्धी मिळवायची.

'द सेकंड सेक्स'मध्ये सिमोन दी बोव्हार पुरुषांना सल्ला देते की हुशार स्त्रियांशी लग्न कराल, बुद्धिमान स्त्रियांशी संबंध ठेवाल तर तुम्हीही आनंदी व्हाल. हे असं न केल्यामुळे पुरुष दुःखी होतात, असं ती म्हणते. तिनं हे तपशिलात लिहिलेलं आहे. आल्बेर काम्यूसारखे प्रसिद्ध आणि तिच्या मैत्रीखात्यातले लोकही त्यावरून तिच्यावर चिडले होते.

चिमणराव Fri, 26/01/2018 - 14:50

त्रुटीधरूनही वान गागचं पुस्तक मराठीत आणल्याबद्दल समाधान. चित्रे वाढवू नका किंमत वाढते हे प्रकाशकानेच ठरवलं असेल. मराठीतले वाचकांची खरेदीशक्ती त्यांना माहित असते. पिकासोही आवडलेलं.

कलाकाराने लहरी नसावं, शाणाबाब्यासातच्याआतघरात असा हट्ट का?

चिंतातुर जंतू Tue, 13/02/2018 - 12:31

फेसबुकमध्ये 'फेक न्यूज'वरून काय काय घडलं त्याचा एक रोचक वृत्तांत 'वायर्ड'वर आला आहे -
Inside the Two Years that Shook Facebook—and the World
How a confused, defensive social media giant steered itself into a disaster, and how Mark Zuckerberg is trying to fix it all.

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 02/03/2018 - 06:56

In reply to by चिंतातुर जंतू

माहितीपूर्ण आणि आजच्या काळात महत्त्वाचा लेख. 'काँडे नास्ट'च्या परंपरेला शोभणारा, सोपा आणि लांबलचक.

लेखाचा पहिला भाग वाचताना 'द सोशल नेटवर्क' हा चित्रपट बरेचदा आठवला.

उत्तरार्ध वाचताना, जोनाथन मॉर्गनचं व्याख्यान आठवत होतं. ऑस्टिनमध्येच 'डेटा फॉर डेमॉक्रसी' नावाची संस्था आहे. जोनाथन मॉर्गन तिचा संस्थापक. फेसबुक, सोशल मिडीया आणि त्यातलं विदाविज्ञान (डेटा सायन्स) या विषयावर रंजक भाषेत माहितीपूर्ण व्याख्यानं देतो. त्याचं एक व्याख्यान ऐकलं होतं. अमेरिकी राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुका झाल्यावर फेसबुकनं ३००००+ खाती बंद केली; ती नावं शोधणाऱ्या लोकांतला एक जोनाथन मॉर्गन आणि 'डेटा फॉर डेमॉक्रसी' ही संस्था. ट्वीटरनं त्यांच्या कामाची दखल तेव्हा तरी घेतली नव्हती.

त्याला विचारलं, की कायदे करून फेसबुकवरच्या फेक न्यूज, रोबॉटिक खाती वगैरे गोष्टी बंद केल्या जाव्यात का? त्यावर त्याचं म्हणणं होतं की ते योग्य ठरणार नाही. शिवाय अमेरिकेच्या पहिल्या घटनादुरुस्तीनुसार सगळ्यांना अभिव्यक्तीस्वातंत्र्य आहे; त्यावर तो हल्ला ठरेल. त्याऐवजी लोकांनी या माध्यमांवर बहिष्कार घातला, किंवा झकरबर्गसारख्यांवर दबाव आणला, तर ते योग्य ठरेल.

हारुन शेख Tue, 13/02/2018 - 15:56

'दुर्गदर्शन' हे गो. नी. दाण्डेकरांचं पुस्तक वाचलं. त्यांचं दुर्गभ्रमणगाथा आधी वाचलं आहे. अतिशय लालित्यपूर्ण भाषा हे दाण्डेकरांच्या साहित्याचं पहिलं वैशिष्ट्य. भाबडेपणा आणि निरागसपणा हे दुसरं. त्यामुळेच त्यांनी लिहिलेली गडकिल्ल्यांची वर्णने भावतात, मनोरंजक वाटतात. त्यांनी गडकिल्ले अतिशय भक्तिभावाने पालथे घातले आहेत, अनेक ठिकाणी गडांशी, डोंगरांशी ते प्रत्यक्ष जिवंत माणसाशी बोलावं तसं बोलताना दिसतात. गडांच्या वाटा चालताना इतिहासात झालेल्या घटना दाण्डेकरांना प्रत्यक्ष घडताना दिसत असतात (अगदी पु.लंच्या हरितात्यांना दिसते तसेच) त्यामुळे ते त्या ऐतिहासिक घटनांची वर्णने जेव्हा करतात तेव्हा ती चित्रमय, जिवंत असतात. हे गडकिल्ले पालथे घालताना दाण्डेकर त्रासही किती सोसतात. (त्यांच्याइतका 'आत्मपीडक' लेखक दुसरा झाला नसेल मराठीत). पाचाडला त्यांना जिजाबाईंच्या देवघरातली व्यंकटेशाची मूर्ती सापडते तो प्रसंग रोचक आहे. त्यांनी ती मूर्ती जिजाबाईंच्या पूजेतलीच आहे यासाठी बाबासाहेब पुरंदरे आणि गोव्याचे इतिहास अभ्यासक पिसुर्लेकर यांची साक्ष काढली आहे. ( पिसुर्लेकर आणि पिसुर्लेकरांच्या कामाबद्दल अधिक माहिती कोणाकडे असल्यास द्यावी)

अवांतर : दाण्डेकर एके ठिकाणी म्हणतात की पूर्वी मुसलमानांना 'लिंगाणा' चढण्यास मनाई होती. हे खरोखर तसे होते काय ? काही धार्मिक नियम /रूढी ? कारण कधीतरी 'लिंगाणा' सर करण्याची इच्छा मी मनाशी बाळगून आहे.

बॅटमॅन Tue, 13/02/2018 - 17:06

In reply to by हारुन शेख

https://marathivishwakosh.maharashtra.gov.in/khandas/khand9/index.php/c…

इथे प्रिलिमिनरी माहिती मिळेल. त्यांनी मुख्यत: मराठ्यांच्या इतिहासाशी संबंधित हजारो पोर्तुगीज कागदपत्रे प्रकाशित केली. ते गोव्याचे, सबब पोर्तुगीज भाषा त्यांना उत्तम अवगत होती. शिवाय गोवा आर्काईव्जचे डिरेक्टरही होते. त्यामुळे जाळ अन धूर संगटच. पोर्तुगालासही जाऊन आले. त्यांचे मुख्य पायोनिअरिंग पुस्तक म्हणजे पोर्तुगीज मराठे संबंध हे आहे. ते खालील लिंकेवरून डाउनलोड करता येईल.

https://msblc.maharashtra.gov.in/pdf/pdf/Portuguese%20Mahratta%20Relati…

संपादकांबरोबरच मी प्रेक्षकांनाही जबाबदार धरतो. श्रीदेवीच्या मृत्यूनंतरचा चॅनेल्सचा वाह्यातपणा प्रेक्षकही चवीचवीनं पाहत होते. एका अभिनेत्रीच्या खाजगी आयुष्यात डोकावण्याची विकृत इच्छा या मागे आहे. चॅनेलवाले याच इच्छेला खतपाणी घालत होते. जी चॅनेल्स असा विकृतपणा करतात ती आम्ही पाहणार नाही, असा निग्रह किती प्रेक्षकांनी केला? केवळ श्रीदेवीच्या निमित्तानंच नाही, तर एरवीही राजकीय बातम्या देताना ‘रिपब्लिक’ किंवा ‘टाइम्स नाऊ’सारखी चॅनेल्स पत्रकारितेचा गळा घोटतात. या चॅनेलवर आम्ही जाणार नाही आणि त्यांच्या गुन्ह्यात सहभागी होणार नाही, असा निर्णय किती पाहुणे घेतात? ज्या चॅनेल्सनी श्रीदेवीच्या मृत्यूच्या बातम्या मिटक्या मारत सांगितल्या, तीच आज देशातली सर्वाधिक पाहिली जाणारी चॅनेल्स आहेत. म्हणूनच संपादक म्हणू शकतात की, प्रेक्षकांना जे पाहिजे तेच आम्ही दाखवतो! म्हणजे या गुन्ह्यात चॅनेलवाले आणि प्रेक्षक समसमान भागीदार आहेत. (त्यातल्या त्यात समाधानाची गोष्ट म्हणजे, या वेळी मराठी चॅनेल्सनी, एखादा अपवाद सोडता, एवढा बीभत्सपणा केला नाही).

हा प्यारा झकास.

Matthew Gentzkow यांचे संशोधन तांबड्या रंगातील मजकूराची पुष्टी करते.
.

बिटकॉइनजी बाळा Fri, 02/03/2018 - 13:39

In reply to by गब्बर सिंग

वॉट्सॅपवर फिरणाऱ्या विडियो पेक्षा, प्रसार माध्यमं ४५०% मवाळ म्हणायची!!

लोक मनाला लावायचं तितकंच लावून घेतात. कुणी काही म्हणो.

ए ए वाघमारे Thu, 15/03/2018 - 23:16

मित्रहो,

"सी...सिनेमाचा" अर्थात C for Cinema हे माझे पहिलेच ई-बुक आपल्यापुढे सादर करताना अतिशय आनंद होतो आहे.

ई-बुक च्या विश्वात हा माझा पहिलाच प्रवेश.

समकालीन हिंदी-इंग्रजी-मराठी चित्रपटांची नेहमीची मळलेली वाट टाळून केलेली ही आस्वादक समीक्षा. निव्वळ सरधोपटपणे चित्रपटांच्या कथा जशाच्या तशा सांगणारी ही पाल्हाळिक समीक्षणे नाहीत की प्रत्येक वेळी 'पाहावा की न पाहावा' प्रकारचे सल्ले देणारीही ही परीक्षणे नाहीत. तर ही आहेत आर या पार मते, चित्रपट पाहून जे वाटले ते प्रामाणिकपणे मांडणारी.

माझे चित्रपटविषयक लेख आपण याआधी इतरत्र वाचले असतील. त्यातलेच काही निवडक लेख इथे एकत्र केले आहेत.

प्रस्तुत पुस्तकाचा लेखक, संपादक, मुद्रितशोधक इ. मीच असल्याने काही उणीव भासल्यास नि:संकोच कळवावी ही विनंती

हा नवा प्रयोग आपणास आवडेल या आशेसह आपल्या प्रतिक्रियांच्या प्रतीक्षेत,

आपलाच,

अभिषेक अनिल वाघमारे
**************************

ई- बुक खरेदी करण्याचेे व वाचण्याचे मार्ग:

महत्वाचे: हे पुस्तक वाचण्यासाठी तुमच्याकडे Amazon Kindle Device किंवा ते नसल्यास स्मार्टफोन/ टॅबमध्ये Kindle हे अ‍ॅप असणे आवश्यक आहे. आता खाली वाचा.

१. Amazon.in वरची डायरेक्ट लिंक: https://tinyurl.com/y9hjvgn4

२. तुमच्या कडे आधीच Amazon Kindle Unlimited चे subscription
असल्यास कुठल्याही डिव्हाईस वर मोफत

३. Kindle Device असणार्‍यांसाठी थेट Kindle Store मध्ये Abhishek Anil
Waghmare किंवा C for Cinema या नावाने सर्च करा.

४. Smartphone वर वाचण्यासाठी तुमच्या प्ले स्टोअर/ अ‍ॅप स्टोअर मधून
Kindle हे अ‍ॅप डाउनलोड करा व आपल्या अ‍ॅमॅझॉन आयडीने लॉग इन
करून वरील प्रमाणे सर्च करा.


मुख्य म्हणजे पहिले दोन दिवस दि. १५ व १६ मार्चला पुस्तक मोफत उपलब्ध आहे.