'मी पाहीलेला सूरयोदय'
संस्थळाचे दर्शनी पान या चर्चेत असणारे रोचक अवांतर या धाग्यात वेगळे काढले आहे.
(अधिक मोठ्या आकारातील चित्रासाठी दुवा.)
चित्राचं रसग्रहण
या चित्रात पंचमहाभूतांचं चित्रण करण्यात न वी बाजू यशस्वी झालेले आहेत. पाणी, तेज, पृथ्वी, आकाश, वायू - त्याच बरोबर जीवसृष्टीचं प्रतीक म्हणून एक झाड आणि स्त्रीपुरुषाची जोडी. स्वर्गातून शाप मिळून खाली आलेले आदाम आणि इव्हच जणू. त्यांची मोठी डोकी हे बुद्धीचं प्रतीक आहे, तर काड्यांसारखे हातपाय निसर्गावर ताबा मिळवण्याची काटकुळी धडपड सूचित करतात. स्वच्छ आकाशात सूर्य दिलासा देतो तर सात महाप्रचंड पक्षी त्यांच्याकडे उडत येत आहेत, कदाचित त्यांच्यावर झडप घालायला. पण त्याबाबत ते दोघेही अनभिज्ञ दिसतात. मात्र ते सात पक्षी आहेत की ४४४४४४४ असा आकडा आहे याबाबत तज्ञांचं एकमत होईलसं वाटत नाही.
पण चित्राच्या 'फ्रेमच्या बाहेर' आलं की मी पाहीलेला सूरयोदय असं लिहिलेलं दिसतं. चित्रकाराने खुबीने ते चित्राच्या बाहेर असल्याचा आभास निर्माण केला आहे. खरं तर ती अक्षरं हा चित्राचाच भाग आहे हे समजून घेतलं की चित्राची एक नवीनच बाजू दिसते. हेच 'न'वी बाजू असं लिहून सांगितलेलं आहे.
तांत्रिकदृष्ट्या चित्राचा विचार केला तर रंगसंगती ढोबळ वाटते. आणि मुख्य म्हणजे सर्वच गोष्टी डावीकडे असल्यामुळे चित्राचा तोल गेल्यासारखा वाटतो. एखाद्याला आपली डावी विचारसरणी दाखवण्यासाठी चित्रकाराने हे असं केलं असावं का? पण पुन्हा नवी बाजू या चित्रात अधोरेखित केलेल्या शब्दांकडे बघितलं की खुलासा होतो. डावीकडचं घर, संसार, झाड, सूर्य हे ज्ञात संसाराचं, गतानुगतिकतेचं प्रतीक आहे. उजवीकडची मोकळी, अज्ञात बाजू केवळ जमीन आहे. जवळपास रिकाम्या कॅनव्हाससारखी. इथे काय असेल? ही नवी बाजू दाखवण्यासाठीच ती मोकळी ठेवलेली आहे. मग रंगाचा ढोबळपणाही कृतक आहे हे लक्षात येतं. चौकोनी कुटुंबाच्या घरातल्या ट्युबलाइटसारखा लख्ख कृत्रिमपणा त्यात आहे.
आपलं चाकोरीबद्ध, माहीत असलेलं जीवन सोडून त्या नदीपल्याड जाऊन बघा, नवीन विश्वं पादाक्रांत करा हा या चित्राचा संदेश आहे.
'न'वी बाजू या सदस्यांनी त्यांचंच नाव असलेलं चित्र सादर केल्याबद्दल धन्यवाद. मुखपृष्ठावर लावण्याबाबत आम्ही निश्चितच विचार करू.
अशक्य आहे!
पंचमहाभूते, आदाम आणि ईव्ह, निसर्गावर ताबा मिळवण्याची काटकुळी धडपड, डावी विचारसरणी, चौकोनी कुटुंबाच्या घरातल्या ट्यूबलाइटसारखा लख्ख कृत्रिमपणा, नवीन विश्व पादाक्रांत करण्याचा संदेश... बुडत्या जहाजापासून जिवाच्या आकांताने पळून जाणार्या उंदरांप्रमाणे आमच्या चार फराट्यांतून एवढे कायकाय बाहेर पडेल याची कल्पना नव्हती.
आम्ही एकदाच खरडलेल्या या चार ओळींतून* आमच्या पश्चात** इतका अर्थ जर कोणी काढू शकत असेल, तर वारंवार चार ओळी खरडत सुटणार्या विल्यम शेक्सपियरादींच्या कृतींबद्दल*** काळजी वाटू लागते.
थोडक्यात, एका चित्रातून हजार शब्दांतून व्यक्त होण्यासारखे जर काही व्यक्त होत असलेच, तर ते 'ज्यालात्याला वाटेल त्या हजार शब्दांतून व्यक्त होण्यासारखे वाटेल ते' इतक्या मर्यादित अर्थानेच होऊ शकते (कारण, रोरशाश चाचणीतल्या शाईच्या ठिपक्याप्रमाणे, आपल्याला हवा तो अर्थ ज्यालात्याला चित्रात दिसू शकतो, जो अर्थ चित्रकारास अभिप्रेत असेलच, असे नाही. किंबहुना, चित्रकारास त्यातून कोणताही अर्थ अभिप्रेत असेलच, असेही नाही.****, *****), अत एव, 'चित्र हे आपल्याला हवा तो संदेश इष्टग्राहकाकडे पोहोचता करण्याकरिता प्रभावी साधन नाही' या आमच्या मताचा येथे पुनरुच्चार करू इच्छितो.
'न'वी बाजू या सदस्यांनी त्यांचंच नाव असलेलं चित्र सादर केल्याबद्दल धन्यवाद. मुखपृष्ठावर लावण्याबाबत आम्ही निश्चितच विचार करू.
यावर, 'Publish and be damned' असे उत्तर देऊन गप्प बसण्यापलीकडे आम्ही काय बरे करू शकतो?
आपण कायद्याने सज्ञान आहात, एवढेच नव्हे, तर सुविद्यही आहात, या संकेतस्थळाच्या हिताच्या दृष्टीने काही निर्णय घेताना योग्य-अयोग्याचा निवाडा करण्याची पात्रता नि आवश्यक सदसद्विवेकबुद्धी आपणाजवळ आहे, तसेच आपल्या कृतीचे दूरगामी परिणाम जोखता येण्याइतकी दूरदृष्टीही आपण बाळगून आहात, याबाबत आमच्या मनात कोणताही संदेह नाही. पण तरीही:
- आमचे चार फराटेही जर मुखपृष्ठाची शोभा करू लागले, तर मग एरवी त्याच मुखपृष्ठावर प्रकाशित होणार्या इतर चित्रांबद्दल होतकरू****** रसिकांनी कोणत्या निष्कर्षाप्रत यावे बरे?
- तशीही आमचे चार फराटे मुखपृष्ठावर प्रसिद्ध करण्याइतकी वेळ आली आहे काय? आपद्धर्मापोटी का होईना, पण राष्ट्रपित्याशी आमची तुलना आम्हांस लज्जित करून जाते.
- अर्थात, आमचे चित्र मुखपृष्ठावर लावल्याने उत्तेजित होऊन आमची अशाच प्रकारची नव'न'वी चित्रे घाऊक उत्पादन तत्त्वावर निर्माण करून आम्ही ती येथेच प्रकाशित करत सुटण्याची शक्यता आपण लक्षात घेतली असावीच. आणि एकदा का त्या उत्तेजित मनःस्थितीत शिरलो, की प्रतिसाद मिटवणार्या चार ऋण श्रेणीही आमच्यावर शीतलजलवर्षाव करू शकत नाहीत, याचीही आपणांस अंधुकशी का होईना, पण कल्पना असावीच.
सबब, पब्लिश अँड बी ड्याम्ड.
तळटीपा:
* पक्षी: रेघांतून.
** बोले तो, आमच्या पाठीमागे. मराठीत: 'बिहाइंड माय ब्याक'. थोडक्यात, या रसग्रहणामागे आमच्यात आणि श्री. घासकडवी यांत कोणतेही संगनमत नाही, हे ठासून सांगण्याचा आमच्या परीने एक क्षीण प्रयत्न.
*** आमचे ज्येष्ठ गुरुवर्य श्री. पी.जी. वुडहाउस (दिवंगत) यां(च्या कोण्या पात्राच्या तोंड)चे "It's like Shakespeare. Sounds great, but does not mean a thing." हे उद्धृत या संदर्भात अतिशय चिंत्य वाटते.
**** आणि म्हणूनच एम. एफ. हुसेनसारखा एखादा ज्येष्ठ चित्रकार भिंतीवर केवळ एखादा पांढरा कागद डकवून त्यास 'चित्र' म्हणून खपवून देऊ शकतो. पाहणारे काय, कशासही "छान! छान!" म्हणतील. त्याचे रसग्रहणही करतील. 'राजाच्या नव्या कपड्यां'सारखे. 'अंदर की बात' केवळ श्री. एम. एफ. हुसेन (दिवंगत) यांनाच ठाऊक!
***** समांतर उदाहरण द्यायचेच झाले, तर 'गण गण गणात बोते' या उक्तीचे देता यावे.
****** मराठीत: वॉनाबी.
हजार शब्द
आमच्या चार फराट्यांतून एवढे कायकाय बाहेर पडेल याची कल्पना नव्हती.
कलाकाराला आपली कला समजणे आवश्यक नाही. कोणीतरी एक पाश्चात्य संगीतकार म्हणे बहिरा होता. त्याला जर आपले गाणे ऐकू न येताच त्या श्रेष्ठ रचना म्हणून मान्यता पावल्या, तर तुम्हाला तुमच्या चित्रातलं ओ अथवा ठोही न समजता ते चित्र उच्च दर्जाचे ठरू शकते.
थोडक्यात, एका चित्रातून हजार शब्दांतून व्यक्त होण्यासारखे जर काही व्यक्त होत असलेच, तर ते 'ज्यालात्याला वाटेल त्या हजार शब्दांतून व्यक्त होण्यासारखे वाटेल ते' इतक्या मर्यादित अर्थानेच होऊ शकते
पण हे शब्दांनाही लागू होतेच की. प्रत्येक जण आपापल्या सोयीचा अर्थ काढतो. एकाच वेळी 'स्त्री ही देवी' आणि 'स्वातंत्र्य न अर्हणारी दासी' असे परस्परविरोधी अर्थ कुठल्यातरी भारतीय संस्कृतीबद्दलच्या शब्दांच्या भेंडोळ्यातून निघतातच ना.
अत एव, 'चित्र हे आपल्याला हवा तो संदेश इष्टग्राहकाकडे पोहोचता करण्याकरिता प्रभावी साधन नाही' या आमच्या मताचा येथे पुनरुच्चार करू इच्छितो.
आपला येथे काहीतरी गैरसमज होतो आहे. चित्रकाराचा संदेश पोचवण्याची पोष्टमनी जबाबदारी चित्रावर नसतेच. चित्र हे स्वतंत्र अस्तित्व असते, आणि त्याला येनकेनप्रकारेण जन्म देणे एवढेच चित्रकाराच्या हातात असते. फारतर तो ते लोकांपासून कायम लपवून ठेवू शकतो. मात्र एकदा ते प्रसिद्ध केले की ते आपल्या भाषेत सर्व लोकांशी बोलते. ते कोणाशी, कधी, काय बोलेल हे चित्रकाराच्या हाती नसते. तस्मात संदेश पाठवण्याच्या तुमच्या स्वार्थी हेतूपासूनच तुम्ही स्वतःला मुक्ती दिली पाहिजे. दोष असेल तर तुमच्या अपेक्षांमध्ये, चित्रात नव्हे.
पण आपला हे चित्र काढताना काहीतरी संदेश देण्याचा हेतू होता असे दिसते. तो संदेश काय हे स्पष्ट करून सांगावे ही विनंती. चित्रकाराला स्वतःला त्याचे चित्र कळले असेलच असे नाही. तरीही चित्रकाराची भूमिका ही महत्त्वाची असते.
आमचे चित्र मुखपृष्ठावर लावल्याने उत्तेजित होऊन आमची अशाच प्रकारची नव'न'वी चित्रे घाऊक उत्पादन तत्त्वावर निर्माण करून आम्ही ती येथेच प्रकाशित करत सुटण्याची शक्यता आपण लक्षात घेतली असावीच.
आपल्या प्रत्येक चित्रापाठी आपल्या प्रतिसादांमधले हजार शब्द कमी होणार असतील तर आम्हा संपादकांना, ऐसी च्या सर्व्हरला आणि वाचकांना सौदा फायद्यातच पडेल.
हम्म्म्म्...
आपल्या प्रत्येक चित्रापाठी आपल्या प्रतिसादांमधले हजार शब्द कमी होणार असतील तर आम्हा संपादकांना, ऐसी च्या सर्व्हरला आणि वाचकांना सौदा फायद्यातच पडेल.
अच्छा, असे आहे तर...
बरे, ते जाऊ द्या. जरा याचे... रसग्रहण मरू द्या, पण निदान याचा अर्थ लावून दाखवता का?
धन्यवाद. :-)
जरा याचे... रसग्रहण मरू द्या,
जरा याचे... रसग्रहण मरू द्या, पण निदान याचा अर्थ लावून दाखवता का? धन्यवाद.
काय भाऊ! संपादक, सर्व्हर आणि वाचकांच्या भल्यासाठी शब्द कमी करायचे आहेत. दरवेळी अर्थ उलगडून सांगावा लागला, तर त्या शब्दांची बचत खर्च होऊन जाईल की. तुम्ही शांतपणे चित्रं काढा, आम्ही ती बघत राहू. मुकाभिव्यक्ती. मुकास्वाद.***
'न'बो लता.
* येथे मुकास्वाद म्हणजे मुक्याचा आस्वाद असे नसून मुक + आस्वाद अशी फोड आहे.
** वरील स्टार देण्याची पद्धती गोंधळाची वाटली असेल. खरं तर मुकास्वाद शब्दानंतर आधी एक स्टार व नंतर दोन स्टार आहेत. त्यामुळे हा गोंधळ होऊ शकतो हे सांगण्यासाठी हा खुलासा.
फुटके फर्निचर....
फुटक्या फर्निचरच्या आडून एका टकल्याचे टाळके दिसत आहे.त्यावरचे तुरळक केसही दिसत आहे.
टकल्याने जोरात शिंकल्याने नाकातून वाहणारा चिक्कट द्रवपदार्थ चित्रकाराने निळ्या धारेच्या रुपाने दाखवला आहे.
कुणीतरी सदर फुटके फर्निचर पडलेले पाहून त्यावर घर्,झाड, मुलगा मुलगी तत्सम काही काढण्याचा व्रात्यपणा केल्याचे दिसते.
नामकरण
नवी बाजू यांची ही बाजू पाहून त्यांचे नामकरण "सूरयोदय पेरणारा माणूस" असे करावे किंवा कसे असे विचार मनात दाटून येत आहेत.
(संदर्भ http://mr.upakram.org/node/1314)
"मायक्रोसॉफ्ट पेंट घेऊन हा 'सूरयोदय पेरणारा माणूस' आंतरजालावर आपली नाममुद्रा कोरून गेला. प्रत्येक धडपडणाऱ्या बाळाला खडूपेनशिली देण्याचे मोलाचे काम यांच्या आयुष्याने केलेले आहे. बाळसुलभ चित्रं रेखाटताना , चित्रकलेत काठावरच पास होऊ शकलेल्यांसाठी वाहिलेले यांचे अजिंक्य जीवन नियतीलाही पुसता आले नाही. एकरेषीय एकमितीतून "न" पर्यंतच्या मितिपर्यंतचा हा मितीचुंबी प्रवास. प्रत्येक (संस्थळ)चालकासाठी! प्रत्येक प्रेक्षकासासाठी! हसू पाहणार्या प्रत्येक निबर मनासाठी! "
भूतकाळ?
मायक्रोसॉफ्ट पेंट घेऊन हा 'सूरयोदय पेरणारा माणूस' आंतरजालावर आपली नाममुद्रा कोरून गेला.
गेला??????
अहो पण मी अजून गेलो नाही हो! निदान इथूनतरी... :-(
एकरेषीय एकमितीतून "न" पर्यंतच्या मितिपर्यंतचा हा मितीचुंबी प्रवास.
एक मिती राहून गेली का हो? "मित"प्रवासातली?
"आशा नाम मनुष्याणाम्..." ;)
असो.
faux pas
पु ल देशपांड्यांच्या भाषेत एका विशिष्ट ग्रहयोगावर जन्माला आलेले लोक इतके बिच्चारे असतात की त्यांच्या हयातीतच त्यांच्यामागे "कै" लावावे असे वाटावे.
'न'वी बाजू या ग्रहयोगावरचे वाटत नाहीत. ( ते या ग्रहावरचेच वाटत नाहीत. पण तो स्वतंत्र मुद्दा.) तस्मात हा आमचा "फो पा". पण आता काय ? आय पब्लिश्ड इट. आय स्ट्यांड करेक्टेड. ड्याम्ड टू.
>>>एक मिती राहून गेली का हो? "मित"प्रवासातली?
नशीब "मितीचुंबी" शब्दात "स" हे अक्षर राह्यलं असं नाही म्हणाले.
तुमचे होते स्मरणरंजन...
...आम्ही त्याला (आमच्याच) शिळ्या कढीला ऊत म्हणतो.
अर्थात, (जोवर कढी आमची आहे, तोवर) शिळ्या कढीला ऊत आणण्यात आम्हाला वावगे असे काहीच वाटत नाही, म्हणा.
हॅविंग सेड दॅट, अनभिज्ञांकरिता माहिती: प्रस्तुत धाग्यास या धाग्यातील या आणि या प्रतिसादांचा संदर्भ आहे.
(याव्यतिरिक्त, इच्छुकांकरिता या धाग्यातील आमची कामगिरीसुद्धा या निमित्ताने पेश-ए-खिदमत करू इच्छितो. आगाऊ आभार.)
.
नाही. या गोष्टीकरिता ‘आमचा शब्द’ याहून अधिक असा कोठलाही पुरावा आम्हांजवळ नाही.
किंबहुना, हा सूर्यास्त आहे, असे जर आपल्याला वाटत असेल, तर तसे वाटण्याचा आपणांस अधिकार आहे. त्या परिस्थितीत, प्रस्तुत चित्राकडे पाठ फिरवून त्यास ‘सूर्योदय’ (अथवा ‘सूरयोदय’) असे संबोधण्याचा पर्याय आपणांस उपलब्ध आहेच.
शेवटी, आपली मर्जी!
इयत्ता कोणती म्हणालास बाळ
इयत्ता कोणती म्हणालास बाळ 'न'वी बाजू?