मराठी यु ट्यूब वर बदलते वारे
कोरी पाटी प्रोडक्शनच्या "गावाकडच्या गोष्टी" च्या अभूतपूर्व यशानंतर मराठी यू ट्यूब वर ग्रामीण भागातल्या वेब सिरीजचा ऊत आला आहे. कोरी पाटी चे वेगळेपण असे की अतिशय अल्पावधीत त्यांनी "भाडीपा" सारख्या स्टार कास्ट असलेल्या मराठी चॅनेल पेक्षा दुप्पट सबस्क्रायबर्स मिळवले आहेत. तुम्हाला हे चॅनेल माहीत नसेल तर त्यांचा हा इंटरव्ह्यू पहा.
https://youtu.be/DuKodeZd_ms
मराठी टीव्हीवरील मालिकांच्या पात्रांचं आर्थिक/सामाजिक बॅकग्राऊंड हे सामान्य लोकांपेक्षा बऱ्याचदा फार वेगळं असतं. मोठ्या-मोठ्या बंगल्यात राहणारी लोकं आणि त्यांच्या सतत दिवाणखान्यात/भारी हॉटेलमध्ये होणाऱ्या अति-नाटकी गप्पा यामुळे मला तरी या मालिका पहायला कंटाळा येतो.
याउलट नवीन मराठी वेबसिरीज या ग्रामीण भागात/ छोट्या शहरात शूट केलेल्या असतात. त्यातली पात्र आपापल्या भागातल्या बोलीत बोलतात आणि अभिनयाचा पहिलाच अनुभव असल्याने कदाचित - ही पात्रं अतिशय नॅचरल वाटतात.
एखाद्या कथानकात गरीब पात्रं असली म्हणजे त्या कथानकात फक्त त्यांच्या हालअपेष्टा वगैरे दाखवाव्यात (जे की बऱ्याच समांतर सिनेमामध्ये होतं) असं नाही. हालअपेष्टा दाखवण्याऱ्या - टिपिकल ट्रॅजिक गोष्टी पहायला लोकांना फार कंटाळवाणं होतं - कारण आपल्या रोजच्या आयुष्यात एवढे प्रश्न असतात तर स्क्रीनवर दुसऱ्यांचे प्रश्न पहायला कोणाला आवडेल?
"गावाकडच्या गोष्टी" या वेबसिरीजमध्ये या गोष्टींचा अतिरेक टाळला आहे आणि विनोदाचा चांगला वापर केला आहे. यातली पात्र आर्थिकदृष्टया गरीब आहेत - पण दीनवाणी नाहीत, आपल्याच मजेत जगतात.
या आणि अशा कारणांमुळे या नवीन वेबसिरीज सध्या लोकप्रिय होत असाव्यात.
दुसरी गोष्ट म्हणजे जरी अशा बऱ्याच वेबसिरीज येत असल्या - तरी त्या सर्वांचा दर्जा एकसारखा आहे असं नाही. त्यांच्या दर्जात बरीच तफावत आहे, पण या प्रयत्नातूनच अनेक नवीन कलाकार आणि लेखक उदयास येतील असं वाटतं.
एकूणच या मराठी युट्युबवरच्या बदलत्या घडामोडींवर तुमचे काय मत आहे?
ललित लेखनाचा प्रकार
इनोदी
यासोबतच इनोदी वेबसिरीजचा उत आला आहे. त्यांच्यातला एक स्टार म्हणजे गडहिंग्लजचा अभि रोकडे.
भाडिपा म्हणजे ताकातली भेंडी आहे. मंदार का कुणी स्टँडप वाला आहे त्याचा कोंडकीय स्टँड अप भाडिपाने प्रकाशित केला आणि नंतर घाबरून काढूनही घेतला.
अभि रोकडेची भाषा, उपमा मनोरंजक आहेत. अजून तासून तासून उत्तम पटकथा केल्या तर मजा येइल. सध्या सगळंच हौशी, बहुदा बालिश आणि कच्चं आहे.
खास रे
अजून एक - डोनाल्ड ट्रम्प च मराठी डबिंग करणारं एक चॅनेल आहे. काही काही व्हिडीओ मस्त आहेत त्यांचे.
खास रे हे चॅनेल. बार्शीची पोरं आहेत.
ह्या सर्वांना मुख्य आव्हाने म्हणजे सातत्य आणि वैविध्य हीच आहेत. तेच तेच पाहून वैताग येतो.
अर्ली बर्ड्स मात्र मोका मारतील. परंतु त्यांनी व्यावसायिक + दर्जा गणित सांभाळून केलं तर. आता जे ह्यात उतरतील त्यांना मात्र व्यावसायिकता व्यवस्थित सांभाळावी लागेल.
मायक्रो जाहिराती : अभि रोकडेच्या व्हिडिओत एक गोष्ट ध्यानात आली की हे लोक लोकल रेडिओ एफ एम सारखं मॉडेल वापरत आहेत. दोन तीन तालुके कव्हर करतील अशी जाहिरात क्षेत्रे त्याना सापडत आहेत. कपड्यांची दुकाने(बस्ता टाईप), सूट देणारी इलेक्ट्रॉनिक्स दुकाने इत्यादी जाहिराती ते करताना दिसतात.
खास रे
खास रे ची पोरं बार्शी आहेत पण सेटल पुण्यात झालेली आहेत. बार्शीचे काही खास शब्द लहेजा आणि करंट गोष्टी पक्क्या माहीत असलेले आहेत. त्यांना व्हिडीओ शूटींग आणि डबिंग मिक्सिंगचा पक्का अनुभव असल्याने आणि काही इपितर कट्टा स्टैल बोलणारे नग असल्याने मजा येते पाहताना. नार्कोस आणि डेडपूलचे डबिंग बरेच फिरले आहे व्हटसपवर.
आता त्यांना मराठी चित्रपटवाल्यांनी प्रमोशनसाठी पकडल्याने नवीन काही येतेय असे वाटत नाही.
चांगल्या वेब सिरिज ला जर प्रमोशनच्या सुपाऱ्यात पैसा मिळत असेल तर ह्यात पडायला हरकत नाहीये राव.
गावाकडच्या गोष्टी बिंज
हा लेख वाचून "गावाकडच्या गोष्टी"चे सगळे म्हणजे 25 एपिसोड्स (मधून मधून फास्ट फॉरवर्ड करत) पाहिले. मराठी मालिकांतील पात्रांची काय सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमी असते कल्पना नाही, पण हिंग्लिश वेब सीरिजची अतिशहरी उच्चवर्गीय तरुण पात्रं, विषय, भाषा, चित्रीकरण स्थळं याहून संपूर्ण वेगळी अशी ही सीरिज पाहायला मजा आली. अभिनय वाईट नाही. संवाद साधे सोपे. पात्रं खरीखुरी वाटतात. मालगुडी डेजची आठवण आली, थोडा सैराटचाही प्रभाव असावा. मुंबई विरुद्ध गाव, नोकरी विरुद्ध शेती हे फार ताणलं आहे, ते पटलं नाही. लग्नाचे भाग बघायला कंटाळा आला. पण एकंदर आवडली.