सॉर्टेड लोक
मला सॉर्टेड लोकांचा फार हेवा वाटतो. सॉर्टेड लोकांना साधारणतः सातवीत असतानाच त्यांचा पुढचा करियर ग्राफ माहिती असतो. सॉर्टेड लोक दहावीला बोर्डात येतात. कुठल्या स्ट्रीमला पुढे डिमांड आहे हे त्यांना नीट माहिती असतं. ते त्याच स्ट्रीमला जातात. त्यानुसार त्यांचं करियर ऊर्ध्वगामी सरळ रेषेत जात राहतं.
सॉर्टेड लोक भसकन प्रेमात पडत नाहीत. प्रेमात पडायचं असेलच तर धर्म, जात, आर्थिक-सामाजिक स्थिती, शिक्षण असं बरंच काही बघून अलगद प्रेमात पडतात. काहीही झालं तरी प्रेम कधीतरी संपतं पण करियर आणि सामाजिक पत हे चिरंतन असतं हे त्यांना कळलेलं असतं. त्यामुळे ते प्रेमात पडले तरी मूर्खासारखे निर्णय घेत नाहीत. प्रेमभंगामुळे करियरवर परिणाम वगैरे त्यांच्या बाबतीत अशक्य असतं.
सॉर्टेड लोक शाळा-कॉलेजात असताना, शिक्षक शिकवत असताना डबा खाणं, मित्रांसोबत फुल्लीगोळा खेळणं, कविता लिहिणं, कादंबरी वाचणं, कुठल्यातरी प्रेक्षणीय स्थळाकडे बघणं वगैरे प्रकार करत नाहीत. त्यांचं वर्गात पूर्ण लक्ष असतं. ते आजच्या विषयाचा कालच अभ्यास करून येतात आणि वर्गात हात वर करून प्रश्नांची उत्तरं देतात. त्यांना वर्गात शिकवलेल्या विषयाबद्दल शंका असतात आणि तास संपल्यावर ते शिक्षकांना वेगळं भेटून त्याचं निरसन करून घेतात.
मोठं झाल्यावर सॉर्टेड लोकांकडे योग्य तेवढाच आत्मविश्वास असतो. ते कधीच ओव्हर किंवा अंडर कॉन्फिडन्ट नसतात. ते सोशल मिडिया बेतानंच वापरतात. ते उगाच राजकीय मतप्रदर्शन करत नाहीत. ते कारणाशिवाय मैत्री आणि दुश्मनी असं दोन्ही टाळतात. ते एखादं पुस्तक कितीही आवडलं तरी एका बैठकीत रात्रभर जागून वेफर्सचा पुडा संपवून, अवेळी मॅगी खात, चहा/कॉफी/दारू पीत पुस्तक संपवत नाहीत. ते पुस्तकात बुकमार्क ठेवून वेळेत झोपी जातात. उरलेलं पुस्तक ठरलेल्या वेळेत पुरवून पुरवून वाचतात. ते मुळात मॅगी किंवा वेफर्स आणतच नाहीत. ते एका दिवसात दोन सिनेमे बघत नाहीत, आवडलेल्या टीव्ही शोचं तासनतास बिंज वॉचिंग करत नाहीत.
सॉर्टेड लोक उघड्यावरचं खात नाहीत. ते कधी अरबटचरबट खात नाहीत. शक्यतो फाईन डायनिंग रेस्टॉरंट्समधे जेवतात. चहा-कॉफी-दारू-सिगरेट हे सगळं प्रमाणात पितात. ते चालणं, धावणं, टेनिस असे व्यायाम करतात. उगाच वजनं वगैरे उचलत नाहीत, पण अजिबात व्यायाम करत नाहीत असंही नाही.
सॉर्टेड लोकांची मुलं एकच कला शिकतात. त्या कलेची आवड किंवा त्यात गती नसेल तरी चालेल पण सुसंस्कृत दिसण्यासाठी एक कला शिकावीच लागते. पण एकच कला शिकायची असते, दोन शिकल्या तर अभ्यास मागे पडतो. दहावीला कलाशिक्षण बंद करणं कम्पल्सरी असतं. ही मुलं कधीच शाळा बुडवत नाहीत.
खरं तर सॉर्टेड लोकांबद्दल हेवा करण्यासारखं इतकं काही आहे की एक शंभर पानी पुस्तक लिहिता येईल. मी सुद्धा आता त्यांच्यासारखं वागायचं ठरवून हे अनावश्यक लिखाण थांबवतो.
जय हिंद जय महाराष्ट्र
- सुयश पटवर्धन
आळसोत्तेजक सॉर्टेतर समाज
आळसोत्तेजक सॉर्टेतर समाज
लोळ! (शंका : सॉर्टोत्तर पाहिजे का?)
आसॉ समाजाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचं चित्र डोळ्यांसमोर आलं. आळशी स्त्रिया सभेला आल्याच नाहीत. सॉर्टेड पुरुष इस्त्रीचा कुर्ता घालून आले. सॉर्टेड स्त्रियाही सभेला आल्या नाहीत कारण हा फालतूपणा आहे हे त्यांना आगोदरपासूनच ठाऊक होतं.
अ सॉर्टेड काईंड
माझा एक मित्र आहे; गप्पांमध्ये एकदा मला संशय आला म्हणून त्याला विचारलं. तर त्यानं चेहऱ्यावर अत्यंत अपराधी भाव आणून "हो, मी बोर्डात आलो होतो", असं कबूल केलं.
नंतर त्याच्या बहिणीची ओळख झाली. तिनं सांगितलेली गोष्ट. ती डॉक्टर होणार, असं तिच्या ओळखीच्या बऱ्याच लोकांना वाटत असे. कारण आई-वडील डॉक्टर. तर बारावीचा निकाल लागल्यावर लोकांचा ससेमिरा चुकवण्यासाठी तिनं मेडिकलचा फॉर्म भरला. ती, तिची एक मैत्रीण आणि दोघींच्या आया अशा त्या कॉलेजाची यादी बघायला गेल्या. ही नाचतनाचत बाहेर आली, "मला अॅडमिशन मिळाली नाही."
तर ही बहीण आणि माझी चांगली मैत्री झाल्यावर आम्ही तिच्या भावाबद्दल बोलत होतो. "तो फार काका आहे", ती सांगायला लागली. "कुठेही बाहेर जायचं असेल तर आधी पुस्तकं आणून, त्या जागेचा आणि तिथल्या रस्त्यांचा वगैरे अभ्यास करून ठेवतो. बाहेर जाताना पाण्याची बाटली भरून घेतो." त्या रात्री मी तिच्या घरीच राहिले तेव्हा तिनं भांडी घासण्याची तिची पद्धत दाखवली. आधी हात आणि पाण्यानं भांडी खंगाळायची. मग साबणाशिवाय बोळा वापरून भांडी साफ करायची. मग साबणानं भांडी घासायची आणि पुन्हा खंगाळून घ्यायची.
ते सगळं बघून मी पुन्हा म्हटलं, "हो, हो, तुझा भाऊ फारच काका आहे. त्याचा व्यवस्थितपणा बघूनच मला दमायला होतं." मग ती पण हसली.
क्या ब्बात है !!!
सॉर्टेड लोक भसकन प्रेमात पडत नाहीत. प्रेमात पडायचं असेलच तर धर्म, जात, आर्थिक-सामाजिक स्थिती, शिक्षण असं बरंच काही बघून अलगद प्रेमात पडतात. काहीही झालं तरी प्रेम कधीतरी संपतं पण करियर आणि सामाजिक पत हे चिरंतन असतं हे त्यांना कळलेलं असतं. त्यामुळे ते प्रेमात पडले तरी मूर्खासारखे निर्णय घेत नाहीत. प्रेमभंगामुळे करियरवर परिणाम वगैरे त्यांच्या बाबतीत अशक्य असतं.
.
सुयशराव, आज तुमच्या नावानं टेकिलाचे दोनचार शॉट एक्स्ट्रा मारणार आहे. काय शॉल्लेट लिहिलंयत ओ !!!
.
झक्कास. मजा आ गया.
.
धागाकर्त्याची वैयक्तिक माहिती
धागाकर्त्याची वैयक्तिक माहिती, त्यांनीच दिलेली, अशी आहे:
वैयक्तिक पातळीवर सांगायचं तर मी एका बहुराष्ट्रीय कंपनीचा Multinational Financial Controller म्हणून काम करतो. ज्या सर्व देशांची फायनान्स प्रोसेस मी सांभाळतो ते सर्व देश - अमेरिका, क्यानडा, स्वित्झर्लंड, आयर्लंड, सिंगापोर आणि यूके....
हे महाशय स्वत:च 'सॉर्टेड'चे उत्तम उदाहरण आहेत असे वाटते. तर मग 'सॉर्टेड'वाल्यांचा इतका उपहास कशाला? लेख पाडण्यासाठी?
आम्ही असल्या सॉर्टेडांना
आम्ही असल्या सॉर्टेडांना अच्युत, हृषिकेष, चिन्मय म्हणायचो. लेटेस्ट ट्रेंड काही माहीत नाहीये.
(हे नाव पाळणाऱ्यांची माफी बरं का, पण म्हणायचो हे निश्चित)