Skip to main content

व्हॅलेंटाईन डे हवा कशाला

व्हॅलेंटाईन डे हवा कशाला

---------------------------------------------------------------

ती होती नाजूक चाहूल
जेव्हा आयुष्यात माझ्या
पडले तुझे गं पाऊल

तो बहरला निशिगंध
की दरवळली रातराणी
कोणास ठाऊक काय ते
पण झाली सुरु कहाणी

लागले पिसे मनाला
जिवाला नवीनच भूल
ती होती…

दिवस जाहले सोनेरी
अन् निशा निशा चंदेरी
तलम जाहले वस्त्र मनाचे
ल्यायले नक्षी गं जरतारी

जळी स्थळी चेहरा तुझा
जिवाला नवीनच खूळ
ती होती…

ही वाटचाल मोठी
संगतीने चालावयाची
साथ असता तुझी
काय तमा भयाची

व्हॅलेंटाईन डे हवा कशाला ?
जेव्हा अर्पिले तू प्रेमाचे
जिवाला नवीनच फूल
----------------------------------
बिपीन सांगळे