Skip to main content

"गुरुजी"

"गुरुजी"

Kadambari - Raja Ravi Varma

वयाची चाळिशी उलटली तरी भारतीय संगीत काही आपण अजिबात शिकलो नाही याची खंत होती. गाणी अगदीच बेसूर बेताल गात नसलो तरी रागसंगीताशी दूरान्वयानेही नातं नाही हे सतत जाणवायचं. शेवटी मनाचा हिय्या केला आणि ठरवलं की शिकायचा मनापासून प्रयत्न करायचा. काही मित्र मैत्रिणींकडे चौकशा केल्या. माझ्यापासून सुमारे तीनचार तासांच्या अंतरावर राहाणार्‍या, क्वचितच भेटणार्‍या एका मैत्रिणीने सांगितलं की तिच्या गावातल्या एकांकडे तिची मुलगी अनेक वर्षं शिकते आहे. शिकवणार्‍या या गुरुजींबद्दल अर्थातच तिला आदर होता. म्हणता म्हणता ती असंही म्हणाली की हे बर्‍यापैकी कडक आहेत. पण जाणकार. त्या भागात आणि आजूबाजूच्या राज्यांत त्यांचं चांगलं नाव आहे.

मी अर्थातच दूर राहाणारा. म्हणजे आठवड्याच्या आठवड्याला गुरुगृही जायला जमणार नाही हे ठरलेलं. पण तरीही एकदा प्रयत्न करूच असं ठरवलं. आणि गुरुजींचा स्काईप नंबर घेतला. माझ्याबद्दल मैत्रिणीने त्यांना संगितलं आणि शेवटी एक दिवस स्काईपवर व्हिडिओकॉल करण्याचं ठरवलं.

त्या दिवशी स्काईपवर व्हिडिओकॉल लावला. गुरुजींची छबी उमटली. पांढरास्वच्छ घरातला कुर्ता. चष्मा. सणसणीत मिशा. धीरगंभीर वाटावी अशी मुद्रा. व्हिडिओकॉल सुरु झाल्यावर त्यांनी "हम्म" असं म्हण्टलं. आणि विचारलं "गाणं कधी शिकलंय का?". करडा वाटावा असा आवाज. मी "नाही" म्हणालो. "ठीक आहे. नुसतं सा रे ग म प ध नी सा आरोह अवरोह म्हणून दाखव." मी विचारलं "तानपुरा लावू का फोनवरचा?" तर म्हणाले "अच्छा म्हणजे तानपुरा अ‍ॅप घेतली आहेस. ठीक आहे." मी आपलं जमेल तसं म्हण्टलं. कपाळावर किंचित आठी. मग क्षणभर डोळे मिटले. "ठीक आहे. कधी सोयीचं होईल?" याचा अर्थ क्लास घेणार. मी जरा मनातल्या मनात आनंदलो. पण समोरची आठी पाहून आनंद वगैरे सगळं काही "कॉशस ऑप्टिमिझम" प्रकारे. मग दिवस वेळ, फीची देवाणघेवाण ठरलं. त्यापेक्षा अधिकउणा शब्द नाही. स्काईपकॉल ओव्हर.

हे सर्व असं असणार याची सवय करायची हे मग क्रमाक्रमाने कळत गेलं. क्लासचा पहिला स्काईपकॉल आठवतो. बैलाने कितीही पराणी टोचून घेतली, तरी बहुदा पहिली टोचलेली पराणी तो विसरत नसणार. ठरल्या वेळी स्काईप व्हिडिओकॉल लावला. छबी उमटली. यावेळी "हं" असंही म्हण्टलं नाही. नुसती मान किंचित वर केली. म्हणजे मी ठरलेल्या स्वरात सारेगम पधनीसा म्हणायचं. तसं सुरू केलं. सुरू केल्या केल्या थांबवलं. यावेळी चेहर्‍यावरचा कडवटपणा आणि आठ्या यांच्यामधे "किंचित" असं काही नव्हतं. मला थांबवलं. स्वतः खणखणीत आवाजात म्हण्टलं. आणि म्हणून झाल्यावर माझ्याकडे नुसतं पाहिलं. म्हणजे मी ते म्हणायचं. मी त्यांच्याप्रमाणे, त्यांच्याइतके आघात देऊन, तितक्या सावकाश आणि हेतूपूर्वक म्हणायला सुरवात केली. सुरवातीला सूर बरे लागले तेव्हा निर्विकार मुद्रा. पण काही सुरांची नीट ओळखच नसल्याने ते "लावण्याचं" तंत्रही ठाऊक नव्हतं. ते चुकले रे चुकले की करारी, करड्या आवाजात थांबवलं. आणि म्हणाले "तुला नीट ऐकू येतं ना? मी आताच गाऊन दाखवलं. तितकंच गायचं आहे. तेही जमत नाहीये का?" मी म्हणालो "जमतं. जमेल" त्यावर "मी काय म्हणतोय ते कळतंय ना?" असं रागाने. मी मान डोलवली. "हं मग कर". ते परतपरत चुकले. त्यांचा पारा चढलेला स्वच्छ कळत होतं. मग अशा दोनेक आवर्तनांमधल्या भीषण धक्क्यानंतर त्यांना नेमकं काय नि कसं हवं त्याचा अंदाज आला. मग समोरची मुद्रा शांत झाली. पण पूर्णपणे भावविहीन.

पंचेचाळिशीच्या आसपास आलेलं आपलं वय. समोरचा माणूस बहुदा सत्तरीपलिकडचा आहे. आपल्याला दोन मुलं आहेत. ऑफिस संपवून घरी येऊन आपण हे करतो आहोत. गेल्या सुमारे तीस वर्षांमधे आपल्याला कुणी "ओरडलेलं" नाही. कॉलेजमधे अभ्यास केला नाही तर हॉरिबल मार्क पडले. प्रोफेसरनी फारतर खांदे उडवले. बॉसच्या मनाप्रमाणे काम केलं नाही तर इन्क्रिमेंट बोंबललं. प्रमोशन चुकलं. बॉसने फारतर अबोला धरला. पत्नीशी कडाक्याचं भांडण कधी झालं तरी बरोबरीच्या नात्याने. मुलांच्या चुका झाल्या, त्यांनी नको तितका स्क्रीन टाईम घेतला, तर त्यांना दटावलं पण कुठेही कधीही दहशत अशी कुणाची कुणाला नाही. ती सवयच गेलेली आहे आपली. तीस वर्षांनंतर आपण जणू शाळेत गेलो आहे. शाळेतसुद्धा कडक शिक्षक होते पण ते काय वर्गातल्या ६० मुलांमुलींमधे विभागून. शिक्षक-आणि-आपण-एकटे असं नव्हतं. इतका प्रखर आणि एककेंद्री फोकस एकट्याचाच होता आयुष्यात. वडलांचा. पण कॉलेजमधे गेल्यावर त्यांनीही (नाइलाजाने!) नापसंतीचं बोलणं सोडलं होतं.

आणि तीस वर्षांनंतर ते पुन्हा. गुरुजींच्या रूपाने. आठवड्याची पंचेचाळीस मिनिटं. स्काईप कॉल. पंचेचाळीस मिनिटांमधे एकही अधिकउणा शब्द नाही. शिकवलेलं बरोबर गायलो तर हुंकार नाही. गंभीर मुद्रेने ऐकुन घेणं. चूक झाली तर मात्र कपाळमोक्ष अटळ.

क्लास सुरू झाल्यानंतर काही आठवड्यांनी "त्या" मैत्रिणीशी कधीतरी फोनवर बोलणं झालं आणि मी जेव्हा गुरुजींबद्दल विचारलं तेव्हा ती थंडपणे म्हणाली, "तुझं सुरू होऊन किती आठवडे झाले? तू अजून आहेस म्हणजे टिकशील. जे गळायचे असतात ते आतापर्यंत गळलेले असतात. आणि शिकणार्‍यांपेक्षा हेच सांगतात, आपलं जमणं कठीण आहे असं. तेव्हा तू ओके आहेस." मला उगाचच गळ्यात पातळ अ‍ॅल्युमिनियम चकतीचं मेडल घातलंय असं वाटलं. मी विचारलं "च्यायल म्हणजे तू इतक्या भीषण कडक माणासाकडे मला पाठवते आहेस हे तेव्हा नाही बोललीस!" तर ती म्हणाली "हो पण तसं सांगितलं असतंस तर तू गेला असतास का?" मी मनातल्या मनात "धन्य आहेस" असं म्हणालो.

एकंदर गुरुजींची स्वतःची एक अशी पठडी आहे हे लक्षांत आलं. त्या पठडीतून जायचं. तिला पठडी म्हणा, संथा म्हणा काही म्हणा. पुनरावृत्तीवर भर. भरपूर काही अर्धवट शिकतोय न शिकतोय या प्रकाराला थारा नाही. जे शिकायचं ते घासून पुसून परत परत. आपल्याला कसली घाई नाही. पण जे शिकतोय ते काय बिशाद आहे विसरण्याची. आणि हे सर्व एकही अधिकचा शब्द न उच्चारता.

जसजसा क्लास किती "इंटेन्स" आहे हे समजायला लागलं तसं "त्या" पंचेचाळीस मिनिटाकरता रोज ते गिरवणं आवश्यक ठरलं. क्लासच्या आधी किमान एक तास "बसणं" अपरिहार्य ठरू लागलं. क्लासच्या आधी रियाज न करण्याची चूक फक्त एकदाच झाली. पहिल्या वेळी. आवाज पुरेसा तापला नव्हता. गळ्याची जी काय साफसफाई करायची, खाकरायचं/खोकरायचं, ते आधी करून "वॉर्मिंग अप" करून, शेवटी "फिनिश्ड प्रोडक्टचा डेमो" त्या पंचेचाळीस मिनिटात द्यायचा ते तयार नव्हतं. त्यावेळी जितकी हिरोशिमा नागासाकी होऊन गेली तितकी परत कधी झाली नाही. पहिल्याच क्लासमधे काय अपेक्षा आहेत ते कळून गेलं.

काही आठवडे होउन गेल्यानंतर "आता तुला एकदा माझ्याकडे यावं लागेल" असं सांगितलं. मग एका शनिवारी चार तास ड्राईव्ह करून गुरुगृही जाणं. त्या चार तासांमधे टिवल्याबावल्या, रेडियो ऐकणं, मित्रांशी गप्पा मारणं यावर अर्थातच मर्यादा पडली. शेवटचा तासभर तानपुरा लावून. अमेरिकेच्या हमरस्त्यावर भरधाव गाडी. गाडीत एकच एक "देशी" बाप्या. आणि तो आऽऽऽऽ ऊऽऽऽ करतो आहे. भलतंच विनोदी आहे हे, हे कळून हसू येत होतं. पण त्याच बरोबर साक्षात सिंहाच्या गुहेत जायचंय ही धाकधूक.

पोचल्यावर दुसर्‍या कुणाचा क्लास चालू होता. मांजराच्या पावलांनी जाऊन बसलो. खूण करून "बैस" असं सांगितलं. मग मधेच "वर चहा आहे. तो घे" असं सांगितलं. मग आधीचा विद्यार्थी गेला. स्काईपच्या पडद्याचा अडसर नसताना आठवड्याच्या आठवड्याला सहज येऊन जाऊ शकणार्‍या विद्यार्थ्यांचा हेवा वाटला. आणि एक लक्षांत आलं. तो जो विद्यार्थी होता तो एक सुमारे पंधरा-सोळा वर्षांचा मुलगा होता आणि त्याला काही लर्निंग डिसेबिलिटिज् होत्या. त्याचा आवाज चांगला असला तरी स्वर पुरेसे नीट लागत होतेच असं नव्हतं. पण गुरुजी त्याला गाऊ देत होते. क्लासच्या शेवटी त्याच्या आईला "ही इज डुइंग ओके, कन्सीडरिंग द थिंग्ज" असं म्हणाले. तो मुलगा हसत खेळत गेला.

मला हे अनपेक्षित होतं. त्या मुलाचं कौतुक वाटलं. सरांच्या सहृदयतेमुळे खूप बरं वाटलं - आणि कुठेतरी फार वाईटही वाटलं. स्काईपच्या अत्यंत त्रासदायक, डिस्टर्बन्स असलेल्या यंत्रणेतून एकेक स्वर कष्टपूर्वक ऐकून, बर्‍याच अडचणी सोसून मी क्लास करतोय आणि इथे लोक हसत खेळत येऊन जाताएत ! पण हे सांगतो कुणाला.

माझ्याबरोबर गुरुजींनीही चहा घेतला. अतिशय स्वच्छ, टापटीप असलेलं घर. शांतता. स्वयंपाकघरात माझ्याकरता चहा गरम करून देताना झालेल्या सुरवातीच्या गप्पा. त्यांचं वय ७६ असल्याचं कळलं याचा धक्का बसला. कारण त्यांनी तब्येत खरोखरच चांगली राखली होती.

--
चहानंतर क्लास. एका कोपर्‍यामधे त्यांच्या वेगवेगळ्या गुरुजींच्या तसबीरी एकत्र मांडलेल्या होत्या. आणि हो, मधोमध अक्कलकोट स्वामींची. माझ्या पूर्वायुष्यात आध्यात्मिक ऑथॉरिटी आणि एकंदरच ऑथॉरिटीची पूरेपूर ओळख असल्याने "हा क्षण नमस्कार करण्याचा" हे मी लग्गेच ओळखलं आणि सराईताप्रमाणे योग्य ते केलं.

क्लास सुरू झाल्यावर एक गोष्ट लक्षांत आली. नेहमीच्या क्लासमधे जो स्ट्रेस वाटतो त्यापेक्षा जरा टेन्शन जरा कमी आहे. स्काईपस्क्रीनवर उमटणारी गुरुजींची काहीशी धूसर मूर्ती, ते काय म्हणताएत ते नीट ऐकू येण्या न येण्याची अनिश्चितता, स्काईपकॉल्स - तेही व्हिडिओस्काईप कॉल्स - यांमधे बँडविड्थच्या कृपे-अवकृपेनुसार स्पष्ट-धूसर होणारं कनेक्शन, हे मुद्दे समोरासमोर बसलेल्या अवस्थेत लागू नव्हते. गुरुजींचा अचानक वेडावाकडा होणारा चेहरा अलिकडच्या स्काईपसेशनमधे कनेक्शनबाबत व्हायचा. आणि सूर नीट लागताएत की नाही, याबद्दलच्या टेन्शनच्या गंगेचा मनोहारी संगम या कनेक्शनच्या अनिश्चिततेच्या यमुनेशी होऊन जे काय व्हायचं ते रसायन इथे नाही. अरारा. मला वाटलं त्याच्या उलटंच होतं आहे. "गुरुजींघरचे ज्ञात कुणाला विचित्र नेमानेम" या नेहमीच्या गाण्याचं नवंच कडवं इथे अनुभवायला मिळालं. जवळजवळ फेल होणार हे माहिती असलेल्या परीक्षेला जावं आणि जिथे आपली लागणार हे अटळ सत्य माहिती होतं तो भागच परीक्षेत नाहीये हे पेपर समोर आल्यावर लक्षांत यावं तसं.

संध्याकाळचा तो क्लास संपल्यावर गुरुजींकडेच एक रात्र मुक्काम होता. क्लास नेहमीपेक्षा अधिक "रक्तरंजित" झाला असता तर मी "मला ना अमुक मित्राकडे जावं लागणारे" असं कायसंसं सांगून कल्टी मारायचा प्लान करून ठेवलेला होता. पण लढाई हळदीघाटची न होतां प्लासीइतकी अन-इव्हेंटफुल झाली. त्यामुळे ठरल्याप्रमाणे थांबलो. ज्या बेसमेंटच्या एका कोपर्‍यात स्वामीसमर्थयुक्त गुरुपंचायतन ठेवलेलं होतं त्याच्याच दुसर्‍या कोपर्‍यात गुरुजींचा वेट बार. क्लास संपल्यावर "स्कॉच कशी घेतोस?" असा प्रश्न. म्हणजे घेतोस, घेत नाहीस, कुठली घेतोस, इत्यादि काही नाही. इथे मात्र पहिल्याच क्लासमधे मी बरोब्बर षड्ज लावला आणि लाडकी ग्लेनमोरांजी ऑन द रॉक्स. साक्षात गुरुमाऊलींसमवेत. दारू ओतली. वर गेलो. स्वयंपाकघर. मध्यम आकाराचं. अर्थातच स्वच्छ. त्यांनी चिकन आधीच दिवसां करून ठेवलं होतं. ते एकीकडे गरम करायला घेतलं. पोळ्या मागवल्या होत्या. त्या गरम करायच्या होत्या. आणि किचनमधे स्थानापन्न झालो.

मी कोण कुठला वगैरे विचारल्यानंतर मीच जरा त्यांच्याबद्दल विचारलं. मूळ गिरगावचे. १९६५ ते ७० मधे कधीतरी अमेरिकेला आलेले. मूळ शिक्षण आर्किटेक्चरचं. मग काही वर्षं काढल्यानंतर हे लक्षांत आलं की आयटी मधे अधिक "स्कोप" आहे. म्हणून आयटीतलं आपलं आपण शिकले आणि व्यवसाय बदलला. कोपर्‍यात एका बाईंचा फोटो. तो त्यांच्या दिवंगत पत्नीचा. पत्नीचं आठ दहा वर्षांपूर्वी कॅन्सरने निधन झालेलं. अनेक गोष्टी बोलताना मी त्यांना म्हणालो "तुम्ही तुमचं घर खरोखरचं स्वच्छ टापटीप ठेवलं आहे." त्यावर त्यांनी पत्नीच्या शेवटच्या आजाराचं किंचित वर्णन केलं. म्हणाले 'शेवटी तिचं अधिक झालं. हॉस्पिसमधे होती. मुलगा आणि मुलगी आलेले होते. ती गेली तो दिवस आठवतो. योगायोगाने मीच एकटा तिथे होतो. तिला कळलेलं होतं, आपण जायची वेळ आलेली आहे. माझ्याकडे पाहून इतकंच म्हणाली, मी इतकी वर्षं घर नीट ठेवलंय. आता उकीरडा नका करू.' त्यानंतर आम्ही एकमेकांकडे काही वेळ नि:शब्द पहात होतो. मग त्यांतर ती गेली.'

त्याक्षणी अनेक भावना मनात आल्या. त्या बाईंबद्दल आदर. (गुरुजींबद्दलच्या आदराबद्दल काय बोलणार. तो नसता तर मी टिकणं शक्य नव्हतं.) या दोघांमधलं विलक्षण प्रकारचं प्रेम, त्या प्रेमामधेही असलेली शिस्त, करडेपणा. आणि समोर दिसत असलेल्या मृत्यूच्या क्षणीसुद्धा हेच महत्त्वाचं वाटणं. त्यात काहीतरी विनोदीही होतं.

मी ते ऐकून निश्चित कुठेतरी आतून हललो होतो. गुरुजी स्कॉच सिप् करत विशेष नवं काही न सांगितल्यासारखं वागत आहेत.

कशी कुणास ठाऊक पण गाडी स्वामी समर्थ आणि आध्यात्मिक गोष्टींवर आली. एकंदर असं लक्षांत आलं की अक्कलकोटचे स्वामी यांना आवडतात कारण स्वामींचं (आमच्या गुरुजींच्या मते) असलेलं "नो नॉनसेन्स", कडक रूप. मठात गेले तरी नमस्कार न करतां म्हणे रोखून पाहायचे स्वामींकडे. (त्यांचा नि यांचा स्काईपकॉल चालू असणार, १९६५च्या आसपास, असं एक चित्र मनात तरळून गेलं.) त्यांना आलेले "अनुभव" मग सांगितले की कसं एका "अधिकारी" माणसाने गुरुजींना "तू अमुक दिवशी अमेरिकेला जाशील असं २ वर्षांपूर्वी सांगितलं होतं आणि असं बरंच काहीसं.

आध्यात्मिक प्रांत, त्या प्रांतातले "अनुभव", "प्रचिती", "अधिकारी व्यक्ती" हे सगळंसगळंसगळं खरं तर मला ३० वर्षांपूर्वीपर्यंत तोंडपाठ होतं. त्यातले आडाखे, त्यातल्या खाचाखोचा, हे सर्वसर्वसर्व फर्स्ट हँड अनुभवलेलं होतं. "छोड आए हम वो गलियाँ" या गाण्यातल्या शब्दांप्रमाणे मला वाटायचं. की बाबा झालं गेलं ते. नवं पान उलटलं आपण. पण नाही. सायकल लहानपणीं शिकतो ती मोठेपणी विसरत नाही, तसंच हे. एकदम ३० वर्षांपूर्वी नेऊन ठेवलेलं. कधी नव्हे ते गुरुजी खुललेले होते. चेहर्‍यावर चक्क स्मितहास्य.

मी एकाच्या ऐवजी दोन पेग स्कॉच घेतली.

चिकन रुचकर झालेलं होतं. मी त्यांना ते अर्थातच म्हणालो. म्हणाले "अरे चार तास ड्राईव्ह करून आलास. इतकं तर लागू आहेच ."

ती संध्याकाळ स्मरणात राहिली आहे - क्लासमधे शिकवलेल्या गोष्टींपेक्षा काकणभर अधिकच. इतर विद्यार्थ्यांपेक्षा मी खरं तर त्यांना नवखा. माझी ओळख इतरांपेक्षा बरीच कमी. पण कदाचित इतरजण गावातच राहातात म्हणून गुरुजींच्या घरी, एखादी दीर्घ संध्याकाळ, स्कॉचबरोबर आणि तेही आम्ही दोघंच , अशी संधी अन्य लोकांना मिळाली नसावी. ओघाओघाने ते बोलते झाले. एरवी स्काईपवर एकही शब्द न बोलणारे बर्‍यापैकी रंगात आलेले होते. त्यांचे जुने दिवस आठवत होते. मुलाबद्दल आणि मुलीबद्दल संगितलं. दोघांची लग्नं होऊन मुलं आहेत. मुलगा दूर टेक्ससमधे असतो. मुलगी जवळ. दोन्ही मुलांची लग्नं कॉकेशियन व्यक्तींशी. (त्यांच्या शब्दांत "अमेरिकन") मुलाबद्दल विशेष अभिमानाने बोलले. मुलगा स्पेशालिस्ट सर्जन आहे. त्याच्या क्षेत्रात त्याच्या इतकी गुंतागुंतीची ऑपरेशन्स अमेरिकेत दुसरं कुणी क्वचित करत असेल.

मी गाणं शिकण्यामधे अगदीच प्राथमिक असलो तरी गाणं ऐकण्याच्या बाबतीत, गाणार्‍यांबद्दल थोडीबहुत माहिती असलेल्याबद्दल अगदीच "हा" नाही हे लक्षांत त्याना आलं असावं. आणि मग त्यांनी गाण्याच्या क्षेत्राबद्दलच्या दिग्गजांबद्दल सांगितलं. अनेकांना त्यांनी पाहिलं/ऐकलं होतं. काही जणांचा सहवास लाभला होता. त्यांच्याबद्दलची मतंमतांतरं त्यांनी सांगितली. ती सर्व मतं रोचक आहेत. पण मी ती इथे उधृत करणं कदाचित अनुचित होईल. एक गोष्ट मला आवडली. त्यांच्या या काहीशा सैल बोलण्यात सुद्धा कुणाचा खासगी आयुष्याबद्दलचा, गॉसिपवजा उल्लेख नव्हता. कलाकारांच्या गाण्याबद्दलच्या दृष्टीकोनाबद्दलची खमंग मतं होती. ख्यातनाम कलाकारांच्या मोठेपणाचं मर्म होतं, त्यांच्या कीर्तीचा आणि त्यांच्याबद्दल स्वतःच्या असलेल्या काही मतांचा ताळेबंद होता - आणि हा ताळेबंद अगदी नीट सम प्रमाणातलाच होता असं नव्हे हे मी वेगळं सांगायला पाहिजे काय? :-) काही लोकांच्या साधनशुचितेबद्दल ते बोलले. पण असं म्हणताना स्वतःचा आब सोडला नाही. दुसर्‍याच्या dishonorable वर्तनाचा सूचक उल्लेख करताना खुद्द स्वतः dishonorable झाले नाहीत - अगदी आम्ही दोघांनी दोन दोन पेग घेतलेले असतानाही. कुणी आवाज कसा कमवला, कुणी कसा कमवला नाही, कुणी गायकी कशी कमावली याबद्दलचे काही किस्से छान होते. पण ते मांडणं नको. एकंदर गाण्यातल्य चमकोगिरीबद्दल तीव्र, कटु नापसंती. इमान फक्त आणि फक्त स्वरांच्या शुद्धतेशी. त्यापुढे मुलाहिजा कुणाचा नाही.

बाकी हिंदुस्तानी संगीताबद्दलची त्यांची बाकी कुठलीही मतं मी ऐकून घेतली तरी एक मत ऐकून मात्र मी स्तंभित झालो. हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत म्हणजे त्यांच्यामते गायनकला आणि फक्त गायनकलाच. शास्त्रीय वादनाच्या मोठमोठ्या कलाकारांचं त्यांनी धड कधीच काही ऐकलेलं नाही - एकही मैफल नाही, रेकॉर्ड-कॅसेट-सीडी वगैरे तर सोडून द्या. माझ्या हातातला ग्लास तसाच राहिलेला पाहून म्हणाले "अरे घेतोएस ना? काय झालं?" इतकंच.

गुरुजींबद्दल इतकं काही लिहून झाल्यावर त्यांच्याबद्दल "ते अमुक आहेत" "ते तमुक आहेत" मुख्य म्हणजे "त्यांचं हे हे अमुक मत मला पटलेलं आहेच असं नाही" असं कुठलंही विधान या माझ्या अनामिकतेमधेही मला करता येणार नाही. भारतीय गुरुपरंपरा भक्तीच्याच मार्गाची आहे हे मी माझ्यापुरतं मान्य केलेलं आहे. एरवी श्रद्धा, भक्ती, अध्यात्म, धार्मिकता यापासून पहिल्या शक्य क्षणी कायमची फारकत घेतल्यानंतर, आयुष्याच्या मध्यावर तिचं दर्शन पुनरेकवार घडलं. ही भक्ती पाळली नाही तर किमान या व्यक्तीकडून माझ्यापर्यंत काहीही अर्थपूर्ण पोचणार नाही. एक गोष्ट खरी. भक्तीच्या निमित्ताने जो माणूस निवडला तो मात्र शंभर नंबरी सोन्यासारखा आहे. भक्तीचा बहाणा करुन अन्य काही साध्य करण्याचा वाराही न लागलेला आहे. नास्तैक्याची दगडी भिवई हलायचीच असली तर अशा कुणाकरता हलावी.

या आमच्या पहिल्या भेटीला आता वर्ष उलटून गेलेलं आहे. आजही आमचा ठरलेला दिवस येतो. ठरलेली वेळ येते. मी त्या वेळेआधी काय काय करायचं ते सुमारे चार-पाचवेळा त्या आधीचा तासा-दीड तासात घोटलेलं असतं. तरी "आज नक्की काय चुकणार ते ठाऊक नाही" हेच पेटंट फीलींग. ती वेळ येते. स्काईपकॉल लावतो. छबी उमटते. आताशा ते मानही हलवत नाहीत. मी माझा माझा तानपुरा सुरू करायचा. इन्स्ट्रक्शन्सप्रमाणे गेल्या वेळच्या धड्याची चार चार वेळा उजळणी करायची. समोर बुद्धासारखी निर्विकार मुद्रा. आठी पडली तर चुकलं आहे. ते थांबून पुन्हा म्हणायचं. पुन्हा चुकलं तर आठीचं रूपांतर कशात होईल हे ठाऊक असतं. ते येऊ न देण्याची कसोशी. ते झालं तर झाऽऽऽऽलं. मुसळ केरात. एकदा मधमात सांरगांची एक त्यांनी स्वतः बांधलेली चीज शिकवली. तीनतालातली. छानच बांधली होती. कधी नाही ते "हे मला फारच आवडलं आहे" असं काहीतरी अवांतर म्हणालो होतो. मग पुढच्या वेळी गाताना चुकलो. तर म्हणाले "तुला ती जागा इतकी आवडली आहे की तू तिथे रेंगाळतोस आणि यू आर स्क्रुईंग इट अप! मी काय आता तुला चमच्याने पाजू काय? प्रॅक्टिस जमत नसेल तर ||ध्रु||"...

... पुन्हा एकदा, आमचा ठरलेला दिवस येतो. ठरलेली वेळ येते. छबी उमटते. मी तानपुरा सुरू करतो.

Node read time
11 minutes

ललित लेखनाचा प्रकार

11 minutes

१४टॅन Fri, 29/03/2019 - 18:55

माझेही गुरु असेच. हजारवेळा पलटे वाजव म्हणे. पहिले पहिले भोवळ आल्यासारखं व्हायचं. आता कितीही वेळ जमतं. बाकी कोपिष्टपणा, विचित्रपणा अगदी डिट्टो.
आधीचे दोन गुरु मात्र स्याम्पल होते. त्यांच्याबरोबर इतका वेळ घालवला नाही की लेख पाडू शकेन.
पण हा लेख मस्त आहे. अजून वाचावासा वाट्टो. पुलेशु. पुलेप्र.

अस्वल Fri, 29/03/2019 - 20:39

आवडला!

त्यावेळी जितकी हिरोशिमा नागासाकी होऊन गेली तितकी परत कधी झाली नाही.

:)

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 29/03/2019 - 22:38

संगीत ही माझ्या आवाक्याबाहेरची गोष्ट आहे. काही गोष्टींचा आस्वाद लांबूनच घेतलेला बरा. आणि शिकवण्याच्या पद्धतीबद्दलही मी न बोललेलंच बरं.

विद्यापीठीय संस्कारांमधून बाहेर नफ्यासाठी चालवल्या जाणाऱ्या आस्थापनांत नोकरी करायला लागल्यावर मोठाच सांस्कृतिक धक्का बसला. गोष्टी अर्धवट, कशातरी करून दिलेल्या असल्या तरी चालेल, वरवर चांगल्या दिसत आहेत ना! बहुतेकदा माझं काम करायला किती वेळ लागेल, हे मी सुरुवातीला सांगू शकत नाही. मग कोणी सिनीयर, मॅनेजर, बॉस म्हणतात, "तीन दिवस लागतील." तीन दिवसांत अर्धवट काही तरी चालणारं प्रकरण तयार असतं; मला ते मंजूर नसतं, तीन दिवसांत काम होणार नाही हे माहीत मला असतंच. आणखी दहा दिवस वगैरे लागतात, तेव्हा मी अर्धवट समाधानी असते.

"आता हे एकदा घासूनपुसून घेऊ", असं मी दहा दिवसांनी म्हणते, तेव्हा "त्याची काही गरज नाही", असं उत्तर येतं. आता मीही, कुत्ता-जाने-चमडा-जाने शिकायला सुरुवात केली आहे. "हे कसं अर्धवट आहे, याचा विचार करण्याचे पैसे मला मिळत नाहीत", असं मी स्वतःला समजावत बसते.

हौसेसाठी करण्याच्या गोष्टी अर्धवट असल्या तरी तसं स्वच्छ कबूल करता येतं. त्याबद्दल कसलाही अपराधगंड वाटत नाही. आपल्याला अजून चिकार शिकायचं आहे, हे अभ्यास करताना पदोपदी जाणवतं. त्यात स्वातंत्र्य वाटतं. त्या स्वातंत्र्यासाठी तरी छंद, हौशी असाव्यात.

सामो Sat, 30/03/2019 - 01:02

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

प्रतिक्रिया आवडली
____________
३ वर्षे मी भारतात प्रोग्रॅमर होते तिथे मला हेच्च झालं होतं. माझा जॉब कधी मला पूर्ण वाटतच नसे. त्यात मला इतक्या तृटी (बग्स) आढळत. आणि त्यामुळे मॅनेजर माझ्या कामाबाबत मग असमाधानी असे. पण मला अमक्या वेळेत, काम पूर्ण झाले असे वाटतच नसे. ते अपूर्ण-अपूर्ण वाटे. अगदी हेच्च अदिती.
पण स्वत:ला मोल्ड कर आणि लोड घेउ नकोस. निदान ईझी शॉर्टकट घेउच नकोस.

अस्वल Sat, 30/03/2019 - 02:41

गोष्टी अर्धवट, कशातरी करून दिलेल्या असल्या तरी चालेल, वरवर चांगल्या दिसत आहेत ना!

-> हे कदाचित ज्याला https://en.wikipedia.org/wiki/Minimum_viable_product म्हणतात तिथे चालू शकतं.
पण कुठलीही संस्था जर का अशा "चलता है" टाईप प्रकाराला सर्रास चालवून घेत असेल तर .. जागा बदला!

चिमणराव Sat, 30/03/2019 - 06:12

परदेशी /पाश्चिमात्य गायन शिकण्याचे मार्ग कोणते असतात? गुरुशिष्य अवडंबर तिकडे नसणार. ( इकडे पैसेही घ्यायचे वर क्रेडिटही घ्यायचं ही कल्पना गुरुंच्या डोक्यात पक्की असते असं माझं मत काही वाचनातून झालं आहे. प्रत्यक्ष मला अनुभव नाही.)

अबापट Sat, 30/03/2019 - 07:24

In reply to by चिमणराव

शास्त्रीय संगीत वेगवेगळ्या शाळा/कॉलेज/विद्यापीठात /संस्थांमध्ये शिकवतात.
(गांधर्व महाविद्यालयात गेलेल्यांची मुले बहुधा पियानो किंवा चेलो शिकत असावेत तिकडे ;) ;)

कन्ट्री रॉक वगैरे मुक्त फॉर्म आहेत. त्याचे क्लासेस असणे अवघड वाटते ( भारतात त्याचेही क्लासेस आहेत , पण आपली संस्कृतीच मुळात क्लास असल्याने ते ठिके) परदेशी त्याचे क्लासेस आहेत की नाही हे परदेशस्थ भारतीयांकडून कळले तर बरे.

राजन बापट Sat, 30/03/2019 - 08:26

लेख पूर्ण केलेला आहे. जिथे "क्रमशः" होतं तिथे -- अशी खूण केलेली आहे. तिथपासून पुढे आज आता लिहिलेला ऐवज.

लेखाला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभारी आहे.

सामो Sat, 30/03/2019 - 09:39

__/\__
व्यक्तीचित्रण तसेच छंदाचे वर्णन हातात हात घालून आलेले आहे - खूपच आवडले.

नास्तैक्याची दगडी भिवई हलायचीच असली तर अशा कुणाकरता हलावी.

क्या बात है!!!
जी लोकं घरात खाऊ घालतात, त्यांच्याबद्दल मला नितांत आदर व कृतद्न्यता वाटते. अन्नाला पूर्णब्रह्म म्हणतात ते अजिबात खोटे नाही. हा खाण्याचा संदर्भ येउन गेलाय ना मुक्तसुनीत, तो तुमच्या अंतर्मनातून आलेला आहे. म्हणजे मला म्हणायचे आहे हा लेख पार आतून आलेला आहे.
________
अक्कलकोट स्वामी संदर्भातील सूर (चांगला) आणि ते वरील नास्तिक्याची भुवई वाक्य - लेखाने एक उंची गाठली आहे. फार आवडला.

तिरशिंगराव Sat, 30/03/2019 - 12:09

तुमचे अनुभव वाचून, शास्त्रीय संगीत शिकलो नाही वा त्याच्या साथीलाही गेलो नाही, हे बरंच झालं असं वाटतं!
वडील हार्मोनियमवर उत्तम साथ करायचे. त्यांच्याबरोबर अनेक मैफली जवळ बसून ऐकल्या आहेत. त्यांची सहाजिकच अपेक्षा होती की , मी ही शास्त्रीय गायनाची साथ करावी. पण, मला प्रश्न पडायचा की, ज्याचं गाणं आपल्याला आवडत नाही, जे प्रसंगी बेसूर होतात वा रागाची तोडमोड करतात, त्यांची साथ निमूटपणे का करायची ? आपल्या चेहेऱ्यावरची नाराजी दिसली तर? बरं, सगळेच काही गोविंदराव पटवर्धनांसारखे टिपकागद होऊ शकत नाहीत. गायकाने काढलेली जागा, तशीच्यातशी काढता आली नाही तर गवई एकवेळ चालवून घेईल! पण मला जे अपराधी वाटत राहील त्याचे काय?
त्यापेक्षा, सुगम संगीतात गायकाबरोबर आधी सराव करता येतो, स्टेजवर ऐनवेळी, भलत्याच ऑड पट्टीत कुणी गायला लागला, तर जी फजिती होते, तीही टळते. हा सर्व विचार करुन, शास्त्रीय संगीताच्या मैफली फक्त, कानसेन होऊन ऐकायच्या, हे नक्की ठरवले. काहींनी ॲकॉर्डियन शिकून सिनेसृष्टीत जाण्याचा सल्ला दिला. पण तिथेही हाच विचार केला की, सगळीच गाणी आपल्याला थोडीच आवडतात? म्हणजे नावडत्या गाण्याबरोबर वाजवणे म्हणजे पुन्हा मनावर अत्याचार! थोडक्यांत, अहंमन्य म्हणा, मनस्वी म्हणा वा स्वार्थी म्हणा, केवळ कानसेन होणं हेच कसं फायद्याचं आहे ते वेळीच लक्षांत आलं. त्यामुळे संगीतात डुंबूनही आयुष्यभर कोरडाच राहिलो!

शशिकांत ओक Sat, 30/03/2019 - 14:20

आपल्या गुरूची छबी, तुमच्या गायनाची झलक ऐकायला मिळाली तर खूप छान वाटेल.

चिमणराव Sat, 30/03/2019 - 19:22

आता सगळं वाचलं.
तुमचं गाणं शिकणं हे "सफर मंझिल से भी बेहतर" प्रकार आहे.
(( आणखी नास्तैक्याच्या चिंध्या गुंडाळणार नाही.))

उज्ज्वला Sat, 30/03/2019 - 21:32

नावाप्रमाणेच मुक्त आणि सु-नीत लेखन. तुमचं गाणं ऐकवा ना खरंच.

राजन बापट Fri, 05/04/2019 - 10:14

प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद.

बॅटमॅन Fri, 05/04/2019 - 18:21

अतिरोचक, उत्तम बेस्ट लेख. असे लोकही आता दुर्मिळ झाले असावेत. हे सगळं वाचायला भारी वाटतं पण प्रत्यक्षात जमेल की नाही ते सांगता येणार नाही- बहुधा नाहीच.

पिवळा डांबिस Sat, 06/04/2019 - 01:34

गुरुजीचं व्यक्तिचित्र सुरेख उतरलं आहे.
व्यक्तिचित्राचा नायक, लिखाणातले बारकावे आणि सफाई, एकूणच पोर्ट्रेट उत्तम उठून आलं आहे.
लिहिण्याची शैली तर पहिल्यापासूनच लाजवाब आहे त्यात काहीच शंका नाही.
अभिनंदन

मिसळपाव Sat, 06/04/2019 - 17:53

काय सुरेख लिहीलं आहे, व्वा! तुमची ही मेहेफील चालू राहो.....

मी अशा वाचनखुणा साठवण्यासाठी Diigo वापरतो. अशा लेखनासाठी एक वेगळा टॅग वापरतो. त्यात हे ॲड केलंय. रीटायर झाल्यावर तो खजिना उघडून बसणारे !!

(तेव्हढं टायटलमधे लेख पूर्ण केलाय याची कल्पना द्या प्लीज. लेख वाढवलाय माहीतीच नव्हतं. 'क्रमश:' बदललंय का हे कळावं कसं? अजून कोणाचा हा सुरेख उत्तरार्ध चुकू नये.)

अमित.कुलकर्णी Mon, 08/04/2019 - 10:24

गाणे शिकण्यासाठी शुभेच्छा!

घाटावरचे भट Mon, 08/04/2019 - 14:13

आहेत" मुख्य म्हणजे "त्यांचं हे हे अमुक मत मला पटलेलं आहेच असं नाही" असं कुठलंही विधान या माझ्या अनामिकतेमधेही मला करता येणार नाही. भारतीय गुरुपरंपरा भक्तीच्याच मार्गाची आहे हे मी माझ्यापुरतं मान्य केलेलं आहे.

भक्तीच्या मार्गापेक्षाही भारतीय संगीत आणि आध्यात्मिकता वेगळी काढता येत नाही हे त्याचे मुख्य कारण आहे. दुसरं असं की संगीत ही गुरुमुखी विद्या आहे. का तर, मुळात आधी राग निर्माण झाले आणि नंतर त्याचं शास्त्र निर्माण झालं. भारतीय संगीताला १२ स्वरांत किंवा अगदी २२ श्रुतींमध्येही जसंच्या तसं बसवता येत नाही. स्वर म्हणजे विशिष्ट कंपनसंख्येचा ध्वनी ही संकल्पना अत्यंत बेसिक आणि भारतीय संगीताचं वर्णन करण्यासाठी किंवा ज्ञान मिळवण्यासाठी अपूर्ण आहे. त्यात परत राग, लगाव, स्वरोच्चारण, लय, घराणी, व्यक्ती अशा अनेक वेगवेगळ्या घटकांचा प्रभाव पडून ते संगीत बनतं. असे असताना ही विद्या दुसऱ्याला द्यायची तर ती निदान जशीच्या तशी दिली जावी असा पूर्वीच्या लोकांचा कटाक्ष असे. त्यामुळेच आपल्याला पुनरावृत्तीवर भर आणि 'मी सांगतो तसं गा' या गोष्टी दिसतात. आणि म्हणूनच आपल्याकडे संगीत ही गुरुमुखी विद्या मानली गेली आहे. जर अधिकारी गुरुच्या मुखातून ती मिळाली नसेल तर ती कमअस्सल समजली जाते (बहुतेक वेळा असतेच).

दिगोचि Wed, 10/04/2019 - 13:50

I enjoyed reading this story. You created his image well. The last prt wher he talks about his wife brought tears to my eyes. My wife also had cancer but it was severe and she passed away in 5 years since diagnosis. She was also in hospice for abot 21 days but then asked me to take her home because she wantde to die at home surrounded by familiar things and our dog. This was 20 years ago your story brought those memories back. I thank you.

टिवटिव Wed, 10/04/2019 - 19:01

लेख आवडला.