Skip to main content

होय नाही

टळटळीत दुपार निघून जाते
अन् सायंकाळही येत नाही
या सीमारेषेवर तुझी आठवण
कधी येते कधी येतही नाही.

रात्र निरोप घेते पहाटेचा
अन् पहाटही येत नाही
अशा वेळी कधी बिलगतेस
कधी बिलगतही नाहीस.

वास्तवाच्या जरा पलिकडे
भासाच्या जरा अलिकडे
कधी वाटते काही घडते
कधी वाटते घडतही नाही.

काळाच्या अशा तुकड्यांमध्ये
वावरतो चुकल्यासारखा असा
कधी वाटते जगतही नाही
कधी वाटते मरतही नाही.

३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 23/06/2019 - 23:16

In reply to by 'न'वी बाजू

विशेषतः श्रोडिंजरच्या मांजरीवर भारी प्रेम. तिच्याशिवाय मिरवणं कठीण जातं. ती नसेल तर मग 'ही भौतिकशास्त्र शिकल्ये का नाही शिकल्ये', असे प्रश्न लोकांना पडतात ना!!

'न'वी बाजू Sun, 23/06/2019 - 20:26

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

जंगलात मोर नाचला. कोणीही पाहिले नाही. मग तो मोर नाचला की नाही?१, २, ३

(किंबहुना, तो मोर होता की नाही?४)

----------

१ मात्र, आम्ही थोडीशी पिऊन जराश्या झोकांड्या त्या काय दिल्या, तर - हाय, रे दैवा! - सगळ्यासगळ्यांनी पाहिले!!! (याचा अर्थ आम्ही निश्चित चढवली असली पाहिजे.)

२ या प्रतिसादातल्या लॉजिकसारखेच (उफराटे) लॉजिक आहे हे.

३ 'कवीने कविता पाडली. तिला कोणीही प्रतिसाद दिला नाही. मग कवीने कविता पाडली की नाही?' अशा छापाचे आर्ग्युमेंट (निदान प्रस्तुत कवितेच्या संदर्भात तरी) कोणास करता येऊ नये, एवढेच या प्रतिसादामागील प्रयोजन.३अ

३अ उलटपक्षी, 'मी कविता पाडतो, म्हणजे मी आहे' या (देकार्तनीतिसम) तत्त्वास अनुसरून, स्वतःच्या अस्तित्वाची ग्वाही (बहुधा स्वतःसच) देणे, ही कवीची कविता पाडण्यामागील प्रेरणा असू शकेल काय?

४ बोले तो, 'तो मोर अस्तित्वात होता, किंवा कसे?' अथवा 'तो मोर होता, की आणखी काही होते?' यांपैकी कोठल्याही अर्थाने.

'न'वी बाजू Sun, 23/06/2019 - 21:59

कधी वाटते जगतही नाही
कधी वाटते मरतही नाही.

लिक्विड ऑक्सिजनवर आहात काय? ('लिक्विड उसे जीने नहीं देगा, और ऑक्सिजन उसे मरने नहीं देगा|')

कासव Mon, 24/06/2019 - 10:09

In reply to by 'न'वी बाजू

जेवता जेवता हा प्रतिसाद वाचला अन् पोटात समुद्रमंथन झाले! बोले तो खऱ्या अर्थाने भावना समजल्या!

जेवताना तरी ऐसी-वाचन बंद ठेवलेच पाहिजे.

अस्मादिक Thu, 27/06/2019 - 03:23

संदीपान .. अप्रतिम कविता आहे .
खरेतर त्याची उपरती होण्यास, त्यातले संदर्भ आपापलया जीवनात येऊन गेले असले पाहिजेत अन्यथा खवचट प्रतिक्रिया अपेक्षितच असणार.. वरील प्रतिक्रिया बहुअंशी तश्याच स्वरूपाच्या आहेत.
तुम्ही आपले लिहिते व्हा..