Skip to main content

मन माझे...

मन माझे, कधी मकरंद टिपणारे चंचल फुलपाखरू...
तर, कधी एक रम्य-विशाल कल्पतरू...

मन माझे, कधी पाळण्यातले निरागस चिमुकले बाळ...
तर, कधी अनुभवी वयोवृद्ध पिंपळाचे झाड...

मन माझे, कधी दूरवरचा चम-चमता तारा...
तर, कधी हा असीम आसमंतच सारा...

मन माझे, कधी स्वैर उडणारा पक्षी स्वच्छंदी...
तर, कधी दुःखातही राही आनंदी...

मन माझे, कधी रागाचा चढलेला पारा...
तर, कधी पावसाच्या अगणित धारा...

मन माझे, कधी असे थंडी कडाक्याची...
तर, कधी सुगंधी फुलं देव चरणाची...

मन माझे, कधी उन्हाळ्यातले रख-रखते उन...
तर, कधी हृदयाने छेडलेली एक प्रेमळ धून...

मन माझे, कधी कमळाच्या पानांवर जमलेले दवबिंदू...
तर, कधी काजळलेल्या राती पौर्णिमेचा शीतल इंदू...

मन माझे, कधी सागराची एक उसळलेली लाट...
तर, कधी आकस्मिक सापडलेली छोटीशी पाउलवाट...

मन माझे, कधी पहिल्या पावसाने सुवासित झालेली जमीन...
तर, कधी रानात धावणारे वेडेपिसे हरीण...

मन माझे, कधी प्रेमातुर प्रियकराचे प्रेयसीला एक प्रेमपत्र...
तर, कधी आभाळाच्या कॅनवासावर रेखाटलेले मोहक तैलचित्र...

- सुमित