Skip to main content

करोना कट्टा

फेसबुकवर मी एका ग्रुपची सदस्य आहे. private group आहे, (सदस्य करून घ्यावे अशी विनंती करू नये) दीडशेहून अधिक सदस्य आहेत. वेगवेगळ्या व्यवसायातले आहेत, विविध देशांत राहणारे आहेत. मुख्यतः टवाळक्या, गॉसिप हा उद्देश असला तरी बऱ्याच वेळा अनेक विषयांवर खूप सखोल चर्चा होते. यातले काही सदस्य एकमेकांना प्रत्यक्ष भेटलेले आहेत, परंतु हा फक्त ओळखीच्या व्यक्तींचा ग्रुप नाही. कारण प्रत्यक्ष कधीही न भेटलेल्या अनेक व्यक्ती या ग्रुपच्या माध्यमातून खूप जवळच्या झालेल्या आहेत. यातील आम्हा १०-१५ जणांचा कायप्पावर ग्रुप आहे. तिथे आम्ही रोज संपर्कात असतो. तर, टाळेबंदी लागू झाली त्या आठवड्यात आम्ही शनिवारी २८ मार्चला झूमवर भेटून गप्पा मारायचं ठरवलं. एक ज्येष्ठ मित्र पाश्चिमात्त्य संगीत ऐकणारे आहेत, शास्त्रीय नव्हे blues, jazz, pop, rock वगैरे. त्यांनी आम्हाला अनेक गाणी सुचवली ऐकायला, गृहपाठ दिला होता चक्क. त्यांनी कसं हे संगीत विकसित झालं, कोणते विषय त्यात हाताळले गेले, आणि महत्त्वाचं म्हणजे यात कशाचा आनंद घ्यायचा, what is to be appreciated हे त्यांनी समजावलं. या विषयावर दोनदा झाल्या गप्पा, आणि तरी वेळ कमी पडला.
यानंतर दर शनिवारी आम्ही कट्टा केला, फक्त गणपती होते तेव्हाचे दोन शनिवार नाही भेटलो. परवाच्या शनिवारी आमचा २५वा कट्टा रंगला.
आम्ही बोललो ते विषय काय होते?
एक होता ज्यू आणि इस्राएल, (याचेही दोन झाले कट्टे) इतक्या हिरीरीने लोक बोलले यावर, धमाल आली. किती तरी जणांनी या विषयावर वाचलेलं होतं, सिनेमे पाहिलेले होते.
Contagion या गाजलेल्या सिनेमावर एक सिने अभ्यासक बोलले, तेव्हाही सिनेमा पाहायचा गृहपाठ केलेला होता सगळ्यांनी.
आमच्या ग्रुपमध्ये वेगवेगळे व्यवसाय करणाऱ्या व्यक्ती आहेत. मग त्यांच्याशी गप्पा असे बरेच कट्टे झाले. उदा. मी पत्रकार आणि फ़िक्सिन्ग असं काम केलं आहे, त्याविषयी बोलले. एक मैत्रीण tv पत्रकारितेवर बोलली. एकाच फॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे, एक जण दागिने तयार करते, एक जण एक सामाजिक संस्था चालवते, एक जण व्यावसायिक भाषांतरकार आहे, एक जण लेखक आहे, त्यांच्याशी गप्पा मारल्या. एकाने निव्वळ हौस म्हणून एक छोटा माहितीपट तयार केलाय, तो एका कट्ट्यावर पाहिला सगळ्यांनी. एकदा कवी संमेलन झालं छोटंसं. एक कट्टा पालकत्व या ज्वलंत विषयावर झाला. एक कट्टा पाहण्याजोग्या वेब सिरीजवर झाला, त्यांची यादी तयार केली गेली. ग्रुपमध्ये काही गायक /वादक आहेत. त्यांचे दोन कट्टे झाले. त्यात व्हायोलिन वादकाने सगळ्यांवर असं काही गारुड केलंय की आता प्रत्येक कट्ट्याचा समारोप त्यानेच करावा असा ठराव मंजूर झाला आहे.
हे सुरू केलं तेव्हा सगळेच टाळेबंदीत होते, घराबाहेर येण्याजाण्यावर खूपच मर्यादा होत्या, भीती होती मनात, आणि अनिश्चितता सर्वात जास्त होती. WFH काही जण करत होते, सगळ्यांचं सर्रास नव्हतं सुरू झालं. घरातली २, ३, ४ डोकी सोडता इतर कोणाचं दर्शनही होत नव्हतं, वेगळ्या कोणाला तरी पाहायला, वेगळ्या विषयावर बोलायला सगळे उत्सुक होते. काही काळाने घराबाहेर पडू लागले थोडे लोक, भीती कमी झाली असं नाही म्हणणार मी पण तिची सवय झाली, आणि अनिश्चिततेचीही. झूम, मीट, वेबेक्स, duo, hangouts याचाच आता आधार आहे हे सर्वांना कळून चुकलं होतं. इन मिन तीन चार (जे तुम्हाला लागू होतं ते) माणसांसोबत राहण्याचीही सवय होऊन गेली. तरीही आम्ही शनिवारी भेटत राहिलो कारण यातून रोजच्यापेक्षा वेगळं कानावर पडत होतं आणि खूप वेगवेगळ्या विषयांची माहिती मिळत होती. गप्पा टप्पा, हास्यविनोद, टवाळी हेही होतं चवीला अर्थात. अडीच तासांच्या कमी एकही कट्टा झाला नाही, यावरून कल्पना येईल. ज्या कारणांसाठी वीकांताची आपण वाट पाहत असतो, ती इथेही लागू होती.
पुढच्या २-३ तरी कट्ट्याचे विषय/मुख्य वक्ते ठरलेले असतात, त्यामुळे विषयांची कमी अजून तरी जाणवलेली नाही.
प्रत्येक कट्ट्याला साधारण २० ते २५ लोक हजर असतात. परदेशातील अनेकांना वेळ जुळवता येत नाही. भारतातही अनेकांना इच्छा असून येत येत नाही, पण सगळे यायचा प्रयत्न जरूर करतात.
सगळं काही सुरळीत होईल (केव्हा, माहीत नाही) तोवर तरी कट्टा सुरू राहील, हे नक्की

Node read time
3 minutes

ललित लेखनाचा प्रकार

3 minutes

भाऊ Wed, 23/09/2020 - 16:58

आवडले.
चांगली कल्पना आहे, पण आता अंमळ उशीर झाला आहे अश्या कल्पना राबवायला.
लोकांना आता कामं सुरु करायची आहेत- पूर्वीसारखा आता वेळ नाही.