Skip to main content

ऐसे ऐकिले आकाशी

||१|| ग्रहकक्षांच्या कातीव रेषा
वितान अवकाशाचे व्यापून-
अचूकतेची लय सांभाळीत-
परस्परांशी अंतर राखून-
कुजबुजल्या,"हे अष्टग्रहांनो,
फिराल तुम्ही अथकपणाने
विश्वांताचा क्षण आला तरी
अमुच्या आभासी पण तरिही
अभेद्य ऐशा बेड्या घालून?"

||२|| पिठूर केशरी चंद्रधगीने
स्फटिकतळ्यातील मासोळीला
म्हटले बिलगून जललहरीतून,
"झगमगणारे लोलक दाहक
त्वचेवरून देशील का काढून?
मावळतीवर जेव्हा तारे-
भल्या पहाटे फिक्कट होतील-
तेव्हा त्यांना तेज त्यातले
थोडे थोडे देईन वाटून"

माचीवरला बुधा Wed, 15/12/2021 - 23:45

भव्य विषय, छान कथन, मात्रांचा हिशेब पक्का, यमकाची जुळणी चांगली साधली आहेत. अशी कविता लिहिणे कारागिरीचे काम आहे.

माचीवरला बुधा Sat, 18/12/2021 - 01:15

केशवसुतांच्या “तुतारी” कवितेचे वृत्त हेच आहे असे वाटते. ते कोणते? आणि ते अक्षरगणवृत्त (नसावे) की मात्रावृत्त आहे?

'न'वी बाजू Sat, 18/12/2021 - 03:36

In reply to by माचीवरला बुधा

‘तुतारी’च्या वृत्तासारखे वाटते खरे. (पंक्तीस १६ मात्रा. हो, हे (आणि तेसुद्धा) मात्रावृत्तच आहे.) फक्त, १८ (= ९ + ९) पंक्तीवाला हा कोठला काव्यप्रकार म्हणायचा? (आणि, ‘तुतारी’त मात्र (प्रत्येकी १६ मात्रांच्याच) २१ पंक्ती मोजल्या.)