Skip to main content

मालाडचा म्हातारा

म्हातार्‍याचे भिरभिर डोळे-
आठवणींचा भुगा भुगा
छटाक उरले खोड, पोखरी
कभिन्न काळाचा भुंगा

म्हातार्‍याचे वखवख डोळे-
लवथव गोलाई बघती
दारु संपला जसा फटाका
दावू न शकतो स्फोटभिती

म्हातार्‍याचे टपटप डोळे-
पापणीत पाऊसमेघ
जसा वळीव कोसळतो कधिही
तसा कढांचा आवेग

म्हातार्‍याचे विझुविझू डोळे-
पैलतिरी काऊ बघती
कोकुनी हाकारितो अहर्निश
उडून जा त्याला म्हणती

'न'वी बाजू Mon, 20/12/2021 - 06:54

मालाडचा संदर्भ?

की पौडाचाच काय म्हणून, मुंबईच्याच उपनगरांनी काय घोडे मारलेय, एतदर्थ?

तिरशिंगराव Mon, 20/12/2021 - 06:58

In reply to by 'न'वी बाजू

पूर्वी, कॉलेजांच्या पिकनिक मध्ये, ' मालाडचा म्हातारा शेकोटीला आला' असं गाणं म्हणायचे, त्याचा काहीतरी संदर्भ असेल.

'न'वी बाजू Mon, 20/12/2021 - 07:12

In reply to by तिरशिंगराव

पुण्यात पौडाचा म्हातारा शेकोटीस येत असे. तद्वत, मुंबईस तो मालाडहून येतो, याची कल्पना नव्हती, परंतु त्या स्वरूपाची काहीशी शंका (प्रस्तुत कविता वाचून) आली होती खरी.

माहितीबद्दल/कन्फर्मेशनबद्दल आभार.

'न'वी बाजू Mon, 20/12/2021 - 18:50

In reply to by भाऊ

…ही एक ग्लोकलाइज़्ड संकल्पना होती तर. ज्यानेत्याने स्थानिक गरजांप्रमाणे/स्थानिक फ्लेवरप्रमाणे बदलून घ्यावी.

गेन्सव्हीलचा म्हातारा शेकोटीला आला…