तडा गेलेली काच.
त्या दिवशी खूप पाऊस पडत होता. थांबेच ना. सकाळपासून पार दुपारपर्यंत बाहेर पाण्याचा बदबद आवाज चालूच होता.
हवा ढगाळ- म्हणजे लोणावळ्याला वगैरे गेल्यासारखं वाटत होतं. त्यापलीकडे कधी गेलाच नाही तो.
घराबाहेर पोरांचा सतत आवाज चालूच. डोकं उठलं त्यामुळे त्याचं. वैताग देतात ही पोरं, शाळाबिळा नाहीत काय?
एक जोरात आवाज द्यावा म्हणून त्याने दरवाजा उघडला तर समोर ती उभीच होती. कारणाशिवाय खिदळत.
"काय पाहिजे?"
तरीही ती खिदळतच राहिली. चेहेऱ्यावर एकदम खरं हसू ह्या गालापासून त्या गालापर्यंत. चालताबोलता स्मायलीच जणू.
रागवायची कितीही ॲक्टिंग केली तरी त्याला मग अजून रागावता येईना. मोठ्या मुश्किलीने त्याने स्वत:चा पराजय कबूल केला आणि बारीक ओठांतून थोडेसे दात दाखवत तो तिला म्हणाला - "बरं ये, पण थोडाच वेळ. मग मला काम आहे".
गिरक्या घेत ती आत आली. केसांत तिने एक पिन लावली होती, बहुतेक स्वत:च. कारण त्या पिनमुळे केस तर आणखीच विस्कटले होते आणि सारखे डोळ्यावर येत होते. तिने मग टेबलावरचं एक पुस्तक काढून वाचायला सुरुवात केली.
"तुला वाचता येतं?" त्याने खोट्या आश्चर्याने विचारलं.
"आ....ई".
"बा.....बा".
समोरच्या इंग्र्जी मासिकातला लेख दाखवून तिने त्याला वाचून दाखवलं. मग ती लगेच बाजूच्या रेडिओकडे गेली आणि तिने कुठलीशी बटणं दाबायला सुरुवात केली.
"अगं थांब - वाट्टेल त्याला हात नको लावूस, आजोबा ओरडतील तुला."
पण ती ऐकायला कुठे? तेवढ्यात तिने आणखी चार बटणं वर खाली केली.
"एफ.एम.", एक लाल भडक बटण दाबून तिने माहिती दिली.
"बरं, आता काय करणारेस तू? मला तर काम आहे". त्याला खरंच काम होतं. पण ती आणखी थोडा वेळ थांबली असती तरी चाललं असतं खरं तर.
त्याचं बोलणं न ऐकल्यासारखं करून ती बेडरूममधे गेलीसुद्धा.
तो तिच्या मागेमागे गेला तोवर ती दिसेनाशी झाली.
"...." त्याच्या तोंडून आवाज फुटेना. कुठे गेली? आताच तर इथे होती - त्याला तिचं नावही आठवेना. त्याने खूप प्रयत्न केला, पण तोंडातून शब्दच फुटत नव्हता.
उन्हाचे काही कवडसे भिंतीवरून सरकत गेले.
त्याने डोळे मिटून घेतले. तरीही डोळ्यासमोर तिचं हसू होतंच. नेहेमीप्रमाणे खट्याळ आणि खरं. ह्या गालापासून त्या गालापर्यंत.
त्याने मनातल्या मनात तिच्या प्रतिमेवर सहा मोठी कपाटं घातली, त्याला कुलूपं लावली. त्यावर जड शिळा ठेवल्या, एका किल्ल्यात सदतीस तळघरांखाली त्या सगळ्यांना कैद केलं आणि वर मिलिटरीची माणसं पहाऱ्याला बसवली.
तरीही तिचं हसू त्याच्यासमोर आलंच. ह्या गालापासून त्या गालापर्यंत.
त्याने डोळे गच्च मिटून घेतले. "जा तू." तो जोरात ओरडला. "जा आता."
पण ती हसतच राहिली. आता तिच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वहात होत्या.
"जा म्हटलं ना." त्याने आणखी जोरात ओरडून तिला सांगितलं.
तिच्या चेहेऱ्यावरून रक्ताचे ओघळ खाली सरकले. पण चेहेऱ्यावरचं खरं हसू अजूनही तसंच होतं.
"प्लीज. प्लीज तू जा." त्याने विनवणी केली.
काहीच न ऐकल्यासारखं करून तिचा हसरा रक्ताने भिजलेला चेहेरा तरीही तसाच राहिला.
"प्लीज.." त्याचे ओठ पुटपुटले. "मला नाही सहन होत हे सगळं. प्लीज."
तिचा चेहेरा आता समजूतदार झाला. वयाला न शोभणाऱ्या पोक्त ओठांनी तिने त्याच्याकडे पाहिलं आणि आ वासला. त्यातून येणाऱ्या पांढऱ्या पुष्ट अळ्यांनी तिचा चेहेरा भरून गेला आणि दिसेनासा झाला. मेडुसा.
त्या सुंदर पण आता झपाट्याने शिळ्या होत चाललेल्या चेहेऱ्यावरच्या अळ्या जशा त्याच्यापर्यंत येऊ लागल्या तसे त्याने खाड्कन डोळे उघडले.
समोर नेहेमीप्रमाणेच रिकामं घर होतं.
अस्वलराव, स्वागत...
अस्वलराव, स्वागत...