Skip to main content

बाजार है भय्या आ जाओ - नंदा खरे

नंदा खरे यांचं 'बाजार' नावाचं नवं पुस्तक बाजारात आलं आहे. त्याचं पहिलं प्रकरण ऐसीच्या वाचकांसाठी उपलब्ध करून देण्याबद्दल नंदा खरे आणि मनोविकास प्रकाशनाचे आभार.

बाजार आडवं कव्हर

आ जाओ, आ जाओ
बाजार है भय्या आ जाओ

नागपुरात आजही आठवडी बाजार आहेत. मुंबई-पुणे या महानगरांमध्ये मात्र बाजारांचं आठवडीपण संपलं आहे. आमच्या शिवाजीनगर व‌स्तीजवळचा आठवडी बाजार आज दोनदा भरतो, मंगळवारी आणि शुक्रवारी. म्हणजे आजच बाजाराचा आठवडीपणा दुबळा होत चालला आहे. नागपूर महानगर होऊ घातलं आहे.

काय फरक असतो मंगळवार-शुक्रवार आणि इतर वारांमध्ये?मुख्य म्हणजे भाजी विकणारे, मासळी विकणारे इतर दिवशी मूठभरच असतात, ते मंगळवार-शुक्रवार रोजी चौपट किंवा जास्तच असतात. माल जरासा स्वस्तही असतो बाजाराच्या दिवशी. मंगळ - शुक्रमध्येही बारीक भेद आहे. मंगळवारचा माल ताजा समजतात, तर शुक्रवारचा बाजार 'बासा' उर्फ शिळा समजला जातो. हे मुख्यत: भाज्या आणि मासळीबद्दलच असतं.

किराणा-भुसार मालाची दुकानंही त्याच परिसरात आहेत. त्यांचा खप जरासा वाढतो, किंमती न बदलताच. बरेच फुटकळ माल विकणारेही आठवडी बाजाराच्या दिवशी दिसतात. स्वस्त बूट-चपला, शर्टस, पंचे-गमछे ('गमछे' म्हणजे नागपूर व उत्तरेकडे भेटणारी 'उपरणी'), सेकंड-हँड कपडे वगैरेही बाजारासोबत येतात. काही थोड्या बाया-बाप्ये मसाल्याचे वीसेक ग्रॅमचे 'वाटे' घालून बसतात. त्या वाट्यांमध्ये मिऱ्या-मोहऱ्यांपासून चक्रफूल (बादियां, star anise) असं वाटेल ते भेटतं. माझे आवडते लोक म्हणजे तांब्या-पितळेच्या छान निरुपयोगी वस्तू विकणारे. अंगठ्या, कडी, वळी, बांगड्या, साखळ्या, ताईत आणि सगळंच शोभेचं नको म्हणून दात आणि कान कोरणाऱ्या पिना आणि चमचे!

एक वेगळाही विक्रेत्यांचा प्रकार आठवडी बाजारांतच भेटतो. कमरेपेक्षा उंच आणि व्यास अर्ध्या-पाऊण मीटरचा, अशा जंगी प्लास्टिक पिशव्यांमधून पॉप-कॉर्न विकणारे असतात. सुरुवातीला उंच वाटणारी पिशवी हळूहळू तळाला जाते आणि पूर्ण रिकामी झाल्यास विक्रेता समाधानानं घरी जातो. असेच 'तोश', उर्फ टोस्ट विकणारे, चुरमुऱ्याचे लाडू विकणारे वगैरेही शॉपर्सना चविष्ट स्टॉप पुरवतात.

माझ्या वाचनात आठवडी बाजारांची दोन आठवण्याजोगी वर्णनं आहेत. उद्धव शेळके 'धग' या सुंदर पुस्तकात गरीब व्यक्तींच्या नजरेत बाजार कसा दिसतो, एकीकडे मोहक, दुसरीकडे कठोर, याचं नेमकं वर्णन करतात. अत्यंत तटस्थ, सहृदय आणि सच्चं वर्णन आहे. तशाच सच्चेपणानं माझे परिचित श्री. धनंजय देवधर 'थाळी ते डान्सबार' या आत्मपर पुस्तकात हिवाळ्यात नागपुरच्या भाजीचं सौदर्य समरसून आपल्यापुढे मांडतात. खरं तर माझा मित्र संदेश भंडारे अनेक वर्षं आठवडी बाजारावर फोटो-निबंध करायची इच्छा मांडतो आहे. त्यानं 'तमाशा' आणि 'वारी' या विषयांचं सोनं केलं आहे (सोबत इतरही); त्यामुळे मी मनापासून वाट पाहतो आहे. पण संदेश फोटोग्राफीसोबत इतरही व्यवहारांत गुंततो आहे.... आणि तिकडे आठवडी बाजार ही संस्थाच संपत चालली आहे. घाई कर, संदेश!!!

आपण म्हणलं खरं की महानगरी बाजारांचं आठवडीपण संपतं आहे, पण तिथेही नवनव्या लाटांमधून जुन्या संस्था बहरताहेत. पुण्यामुंबईपासून युरोप-अमेरिकेपर्यंत 'फार्मर्स मार्केट्स' या नावानं शेतमाल, ग्रामोद्योगी व हस्तकलांनी घडलेल्या वस्तू वगैरेंचे बाजार भरताहेत! इथे शेतमालही थोडा ग्रामोद्योग, थोडी हस्तकला असाच मानला जातो. त्यासाठी त्यावर जरा प्रक्रिया करणंही अपेक्षित असतं. ब्रेडचे विविध प्रकार, चीझेस, काही हातघाण्यांवरची तेलं, चटण्या-मुरंबे, गृहोद्योगी दारू व बियर्स, अश्या साऱ्या वस्तू फार्मर्स मार्केट्समध्ये भेटतात.

म्हणजे बाजार, आठवडी बाजार, ही माणसांना आवडणारी संस्था आहे! ॲमेझन-फार्मइझीच्या ऐन बहरातही लोक कोपऱ्यावरच्या दुकानांत जाऊन रिबिनी, सेफ्टी-पिना आणि आवळे-बोरं विकत घेऊ इच्छितात. महत्त्वाची दिसते ही संस्था! इथे तिचा शास्त्रोक्त, कालक्रमानुसार इतिहास सांगायचा प्रयत्न नाही. जमल्यास त्या व्यवस्थेचं आकर्षण, तिच्यावरची श्रद्धा, तिच्याबद्दलची स्वप्नं असं मात्र पाहायचं आहे.

बाजार पुस्तक मुखपृष्ठ नंदा खरे

बाजार नव्हते तेव्हा

ज्यांना आज आपण 'माणूस' म्हणतो तो प्राणी त्या रूपात पन्नास हजार ते एक लाख वर्षांपूर्वी अस्तित्वात आला. त्याआधीही माणसांसारखे दिसणारे वेगवेगळे जीव घडून गेले आहेत. शेपूट नसलेल्या माकडांच्या, म्हणजे कपिंच्या या जाती-उपजाती असायच्या. त्यांपैकी दोन पायांवर वावरणारे प्रकार म्हणजे ढोबळमानानं माणसांचे पूर्वज. त्यांचे अनेक प्रकार हाडांच्या अवशेषांवरून, जीवाश्मांवरून ओळखता आले आहेत. त्यांपैकी अनेक प्रकार नष्ट झालेले आहेत. काही थोडे प्रकार मात्र माणसांचे थेट पूर्वज, किंवा जवळचे नातलग मानले जातात. त्यांना तांत्रिक नावं आहेत. आपण मात्र 'आज आपण ज्या प्राण्यांना माणूस म्हणतो ते' असं इथे एकदा म्हणू...... आणि नंतर फक्त माणूस म्हणणं पुरे आहे असं समजून चालू!

माणसांचे पूर्वज मुख्यत: अन्न सावडत असत. गोळा करत असत. कंदमुळांपासून फळांपर्यंत वनस्पती, लहान-सहान प्राण्यांची शिकार करून कमावलेलं मांस, इतर प्राण्यांनी मारलेल्या प्राण्यांचं मांस असं वाट्टेल ते खाल्लं जायचं. अन्न वगळता दगडाच्या धारदार कपऱ्या, टोकं केलेल्या काठ्या, काही अंथरूण-पांघरुणाची कातडी, येवढ्याच वस्तू वापरात असायच्या. त्यांवरून फारशी भांडणं होत नसत कारण आसपास दगड, काठ्या भरपूर असत. आजही असतात. कातड्यांचा प्रश्न जरा वेगळा होता, पण हिवाळ्यात विषुववृत्ताकडे सरकणं, पूर्ण टोळीनं मिठ्या मारून झोपणं(!) वगैरे पर्याय असायचे. वस्तू, त्यांची मालकी, त्यांवरून वाद वगैरे प्रकार मुळातच नसायचे. कधी वाद उपजलेच तरी टोळ्या नात्यांनी बांधलेल्या असल्यानं वाद शमायचे.

पण सुमारे बाराएक हजार वर्षांपूर्वी माणसं प्राणी आणि वनस्पती पाळायला लागली. धान्यं, फळं, डाळी, पालेभाज्या, कंद, फळभाज्या वगैरे 'पेरले' जायला लागले, जोपासले जायला लागले. शेळ्या-मेंढ्या, गाई-म्हशी यांनाही असंच माणसाळवलं गेलं. निसर्गात स्वैरपणे वाढण्याऐवजी हे सर्व जीव माणसांच्या अखत्यारीत, माणसांना हवे तसे वाढू लागले. या प्रकाराला शेती आणि पशुपालन असं नाव पडलं. माणसं अन्नसंकलक होती ती आता अन्नोत्पादक होऊ लागली. आणि यासोबत फटाक्यांची माळ उडावी तशी नवनवीन यंत्रणांची, त्यांमागच्या संकल्पनांची, शब्द-शब्दार्थांची, वादविवादांची मालिका सुरू झाली!

मालकी वगैरे

एक अगदी सुरुवातीची संकल्पना म्हणजे 'मालकी'. सर्वच समाजांमध्ये मालकी या संकल्पनेबद्दल दुभंग मतं असतात. दोन उदाहरणं पाहा.

(क)

सबै भूमि गोपाल की। उस में अटक कहां
जिस के मन में अटक रही। सो ही अटक गया.

इथे जमिनीवर मालकी-हक्क सांगणाऱ्याच्या मनात खोट आहे असं म्हटलं जातं आहे कारण खरं तर सगळी जमीन गोपाळाची, कृष्णाची, देवाची आहे. त्यात मर्यादा घालणं, 'अटक' उत्पन्न करणं हे अडकलेल्या, मर्यादित, कोत्या मनाच्या व्यक्तीलाच जमू शकतं.

(ख)

जमीं भी तेरी। है हम भी तेरे
ये मिलकियत का सवाल क्या है?

हा आहे साहिर लुधियानवी; पूर्ण गीतच या मुद्द्यावर आहे.

खुदाए बरतर। तेरी जमीं पर
जमीं के खातिर। ये जंग क्यूं है?
हर एक फतहो। जफर के दामन पे
ये खूने इंसा। का रंग क्यूं है?

म्हणजे जमीन देवाची, आपणही देवाचेच; पण जमिनीच्या मालकीवरचे वाद मात्र प्रत्येक विजयी वीराचे कपडे मानवी रक्तानं डागाळतात! यामुळेच काही जण शेती हा माणसानं लावलेला सर्वांत घातक शोध मानतात!

पण याच घातक शोधामुळे माणूस-प्राणी संख्येनं बहरला. त्याच्यापैकी वेगवेगळ्या लोकांना आपली वेगवेगळी कौशल्यं जोपासता यायली लागली, विकसित करता यायला लागली. जरा या साऱ्याचा क्रम पाहू.

मालकीची भावना कुठून आली? मी पीक पेरलं, पाणी घातलं, राखण केली, तोडलं/कापलं. त्यामुळे पीक माझंच आहे! माझी बायकापोरं वाटा मागू शकतात, कारण त्यांनी मला मदतही केली..... आणि ते माझेही आहेत. इतरांना मात्र माझ्या पिकातला भाग पाहिजे असेल तर त्यांना काहीतरी मोबदला द्यावा लागेल. लागेलच. तेच न्याय्य ठरेल! बरं, मी या जमिनीच्या तुकड्यावर गेली तीन, चार, ....... वीस वर्षं/पिढ्या पीक घेतो आहे. म्हणजे जसं पीक माझं आहे तशी जमीनही माझी आहे.

तसंच हा मेंढ्यांचा कळप माझा आहे. मी एक पांढरी मेंढी, एक पांढरा एडका यांना दोघेच होते तेव्हापासनं जपलं, पाळलं, सांभाळलं, राखलं. आता हा कळप झाला आहे, पांढराशुभ्र. माझाच तो! कोणाला मांस हवं असेल, लोकर हवी असेल तर मोबदला द्यावा लागेल. धान्य म्हणा, भाजी म्हणा, आंबे म्हणा, द्यावे लागतील. लागतीलच.

गंमत पाहा. मालकीसोबत अलगद एक वेगळीही संकल्पना आली आहे; 'मोबदला' नावाची.

हा मालकी-मोबदला प्रकार आपल्या (क) आणि (ख) उदाहरणांशी कसा जोडायचा? उदाहरणं क-ख सांगतात की जमिनीवरून भांडू नये. मालकी-मोबदला संकल्पना मात्र माणसांचे श्रम त्यांचेच मानायला हवे असं सांगतात; त्यांत गोपाल-खुदांचा हस्तक्षेप नको!

माणसांची त्यांनी केलेले श्रम, ते जिथे केले त्या जागा याबद्दलच्या भावना अशा दुभंग असतात. एकीकडे माणूस या पृथ्वीवर उपरा आहे; विशिष्ट माणूस तर जेमतेम पाऊणेकशे वर्षांचा 'वापरदार' आहे; याची जाणीव असते. अखेर गोपाल-खुदांचाच मालकी-हक्क आहे, याची जाण असते. पण सोबतच "मी झटलो. मी श्रमलो. इथे श्रमलो" ही जाणीव असते आणि त्यामुळे वाटा मागणाऱ्यांकडून मोबदला मागायला जीभ रेटते. बळ येतं, तसं करणं न्याय्य वाटतं, 'ज्याच्या हाती ससा, तो पारधी', 'जिस की लाठी उस की भैंस', 'कसेल त्याची जमीन', ही विधानं आतपासून, मुळापासून पटायला लागतात.

तर काय; मालकी, मालकी-हक्क या कल्पना रुजल्या. मोल किंवा मूल्य किंवा किंमत ही कल्पना रुजली. मोबदला, एक घेऊन दुसरं देणं; यानं न्यायाची कल्पना एका तागडीशी, तराजूशी, समीकरणाशी जोडली गेली. ही जुळणी; मोबदला म्हणजे न्याय; इतकी घट्ट आहे की 'तूळ' या राशीची खूण (Ω) जराशा फरकानं समीकरणांमध्ये येणाऱ्या 'बरोबर' (=) या खुणेला जन्म देते! इंग्रजी वजनी पाऊंडसाठी 'lbs' हे लघुरूप वापरतात तेही तूळ (तुला, तोलणे) राशीच्या Libra या इंग्रजी नावातून येतं.

बलुतेदारी

पण अडचणी होत्या. असतातच, नेहमी.

फक्त अन्न-उत्पादन करणाऱ्यांमध्येही भाग पडतात. धान्यं-डाळी पिकवणाऱ्यांचं वेळापत्रक पालेभाज्यांच्या, मिरची - कोथिंबिरीच्या उत्पादकांपेक्षा वेगळं असतं. मराठीत शेतकरी आणि माळी असे दोन शब्द घडले तेच या वेळापत्रकांमधल्या फरकामुळे. आमराया, फळबागा यांचं वेळापत्रक तर फारच वेगळं. आणि शेळ्या-मेंढ्या, गाई-म्हशींचं सगळं तंत्रच वेगळं. ही जनावरं दूध देतात, लोकर देतात आणि थेट मांसही देतात. म्हणजे वेळापत्रकात एक सततच्या उत्पादनाचा आणि एक 'अंतिम' उत्पादनाचा, असे दोन भाग असतात.

मग प्रश्न असा की किती माप पालक आणि किती माप ज्वारी हे एकसारखे मानायचे? एक मेंढी किती मापं तूर-डाळीला देणं न्याय्य आहे?

बरं, मी अगदी एक चिमूट ते एक पोतं अशा मापांमध्ये धान्य देऊ-घेऊ शकतो. अर्धी गाय, पाव म्हैस, अशी मापं मात्र वापरता येत नाहीत. मुस्लिम समाजात एका ईदेला प्राणी बळी देऊन अर्धं मांस दान म्हणून देऊन टाकायची प्रथा आहे. गोवंश हत्याबंदी लागू होण्याआधी गरीब मुसलमान खाटकाकडून एखाद्या बैलाचा 'वाटा' विकत घेत. असे दहावीस जण मिळून ईदेच्या दिवशी बळी देत. पण हे सणासुदीचं झालं. इतरवेळी काय करायचं? बरेच मुसलमान आज बकऱ्यातला वाटा, मेंढीतला वाटा शेाधत असतात. वृत्तपत्रं जाहिरात मात्र लाख आणि कोटींच्या 'सुलक्षणी' बोकडांचीच करतात. साध्या बोकडातही चार वाटेकरू शोधणारे मुसलमान वृत्तपत्रांना दिसतही नाहीत.

...पण मापं अर्ध-पाव करण्यातल्या अडचणी ठसवायला हे सांगतो आहे. तो गोवंश हत्याबंदीवर शेरा नाही... उगीच नको ते भांडण उभं करू नये! हा हिंदू-मुस्लिम प्रश्नही नाही!

ही जशी मापांच्या विभाजनातली अडचण आहे तशी वस्तूंच्या साठवणीबाबतही अडचण येते. धान्यं, डाळी एकदा उत्पन्न केल्या की बराच काळ 'टिकवून धरता' येतात. एकदा कणगी भरली की काही खर्चही या साठवणीवर होत नाही. भाजीपाला, विशेषत: पाला साठवण्यात मात्र प्रचंड अडचणी असतात. आमच्या आठवडी बाजारात पालेभाज्यांच्या किंमती दिवेलागणीला वीस-तीस टक्के घसरतात. उरलेली भाजी घरी नेणं, दुसऱ्या दिवशी वेगळ्या बाजारात मांडायला नेणं, मधल्या काळात पानं सडायला लागणं, साऱ्या विचारांतून आज चार आणे कमी का मिळेनात, विकून टाकूया, असा निर्णय घेतला जातो. हे जाणणारी गरीब गिऱ्हाईकंही इतर कामं आटपून फुरसतीनं बाजारात येतात. आठवडी बाजारात ना ओटा, ना गाडी असे पोती अंथरून भाज्या विकणारे असतात, मुख्य बाजाराच्या कडोसरीला, फूटपाथवर. ज्यांच्यापाशी साडेसात-आठला गरीब गिऱ्हाईक आलं की बहुधा भावात जेमतेम विक्रेत्याची खरेदी किंमत ओलांडली जाते. व्यवहार लहान सहानच असतात, पण... असतात!

याची मोठी आवृत्ती म्हणजे पूर्ण वाढ झालेले बोकड, एडके, बैल, रेडे वगैरे. आता या जनावरांना सांभाळत राहणं म्हणजे फक्त वाढता खर्च. अशा वेळी नेहमीपेक्षा कमी मोलानं जनावर विकायला गुराखी तयार होतो. कधीकधी तर ते खर्चिक लोढणं गळ्यातून उतरवून टाकायला स्वत:च मारून कुटुंब-नातलगांत वाटून टाकतो. हे दान नसतं; तर भावी वसुली आणि आजची बचत असा विचार असतो.

इथे आपण गुपचुप एक संकल्पना घुसडली आहे. तिला वस्तुविनिमय, बार्टर (barter) म्हणतात. तिच्याआड इतरही संकल्पना आहेत; उदाहरणार्थ, श्रमविभाजन. सर्वच माणसांना सर्वच जीवनावश्यक कौशल्यं मिळवता येत नाहीत. एखाद्या अंगानं अत्यंत कुशल व्यक्ती दुसऱ्या एखाद्या अंगात पार वाईट असू शकते. कुटुंबांमध्ये, टोळ्यांमध्ये हे खपून जातं. कोणाची तरी न जमणाऱ्या कामाशी चाललेली झटापट पाहून इतर कोणीतरी म्हणतं, "आण ते इकडे! तू जा अंगण सारवायला! पोळ्या लाटतोय म्हणे!" थट्टामस्करीत प्रश्न सुटतो!

खेडेगावाच्या पातळीवर इतक्या सहज प्रश्न सुटत नाहीत. तिथे सुतारकाम, लोहारकाम, कुंभारकाम, बुरूडकाम (म्हणजे वेताच्या, बांबूच्या वस्तू विणणं... नसतं माहीत आजकाल अनेकांना!) वगैरेंत कुशल माणसं संपूर्ण खेड्यासाठी कामं करण्याची जबाबदारी घेतात. हे नातं 'पिढीजात' होऊन सुतार, लोहार, कुंभार, बुरूड या 'जाती' घडतात. इथे 'शूद्र हे कोण होते?'च्या धर्तीवर विचार मांडला जात नाही आहे. फक्त श्रमविभाजनातून बलुतेदारी व्यवस्था घडली हे सांगायचं आहे.

म्हणजे शेतकरी-पशुपालक एकीकडे आणि विविध कौशल्यं असलेले लोक दुसरीकडे असतात. दोघांनाही एकमेकांची गरज असते, आधार असतो. यातून 'मोबदल्या'ची एक खास भारतीय पद्धत घडली. तिचं महाराष्ट्रात नाव आहे 'बलुतेदारी'. कोणत्याही शेतकऱ्याचं पीक निघालं की मळणी होते त्या खळ्यावर सुतार, लोहार, कुंभार ....... अशी रांग लागते. प्रत्येक पेशेवराचा प्रत्येक शेतकऱ्याकडचा वाटा ठरलेला असतो. त्याचा मोबदला म्हणून सुतार, लोहार, कुंभार यांनी वर्षभर शेतकऱ्याच्या गरजा पूर्ण करणं अपेक्षित असतं. कोणती कामं साधी, कोणती 'खास', हे ठरलेलं असतं. खास कामांसाठी वेगळं धान्य बलुतेदार मागू शकतो, हक्कानं.

या यंत्रणेचं सर्वांत तपशीलवार आणि वाचनीय वर्णन त्रिंबक नारायण आत्रे यांच्या 'गांव-गाडा' (१९१५) या पुस्तकात सापडतं. पण त्या वर्णनाची एक मोठी मर्यादा आहे. आत्र्यांच्या मते शेतकरी दानशूर, दिलदार असतात; तर बलुतेदार आंगचोर आणि लबाड असतात. प्रत्यक्षात हे जितक्या प्रमाणात खरं असेल तितक्याच प्रमाणात लबाड शेतकरी-दिलदार बलुतेदार अशाही सत्यकथा असतीलच. हे जास्त ठसतं उल्का महाजनांच्या 'कोसळता गावगाडा' (२०१५) या आत्र्यांच्या पुस्तकाच्या शतकभर नंतरच्या पुस्तकामधून.

इथे कोणत्याही वस्तू आणि सेवा व्यवहारातलं एक अनिवार्य असं अंग नोंदायला हवं. कोणालाही "सौदा मला फायद्यात गेला!" असं जाहीरपणे कबूल करायला मुळीच आवडत नाही. खाजगीत मात्र फारदा "कसं मी त्याला फसवलं!" अशा गमजा मारल्या जातात.

पण वस्तुविनिमय, बलुतेदारी यांपेक्षा एक मोठी भानगड शेती-पशुपालन/मालकी हक्क/साठवण/श्रमविभाजन या साऱ्या प्रकारातून उपजली. पीक 'निघतं' तेव्हा शेतकरी गब्बर असतो. बलुतेदारांची देणी चुकवतो आणि सोबतच गेल्या वर्षभरात सेवा नीट कशी दिली नाही याचा पाढा वाचतो. बलुतेदारही "नाही जी! नाही जी!" करत चिपटं-मापटं जास्त दान पदरी पाडून घेतो. दुतर्फा खुषीचा व्यवहार! हाच प्रकार आपापसात केलेल्या उधार-उसनवारीचा होतो. सारं संपवून धान्य-डाळी कणग्यांत गेल्या की मात्र खुषी कमीकमी व्हायला लागते.

लुटारू येऊन आपली धान्यरूप, डाळरूप मेहेनत चोरून तर नेणार नाहीत? तसं झालं तर विचार करावा लागेल, गेलं वर्ष स्वत:साठी काढलं की त्या दरोडेखोराची गुलामीच पदरी पडली!

धान्य-डाळ पिकवणारा शेतकरी मी वारंवार उदाहरण म्हणून वापरतो आहे. तो बहुश: पुरुष आहे. त्या तुलनेत भाजी पिकवणारा माळी आहे की माळीण-माळण-मालन-मालिनी आहे, हा मोठा प्रश्न आहे. पशुपालनातही मेंढ्या-बकऱ्या-गाई-म्हशी चारणं, फिरवणं पुरुष करतात. सोबतच "आमची भवरी गाय आईच्या हातांवर होती. आई कितीही आजारी असली तरी भवरीला दोहणं हे तिचंच काम. इतर कोणी आंचळाला हात लावला की बसलीच लाथ!" या नमुन्याच्या कहाण्याही भरपूर असतात.

माझ्या कौटुंबिक इतिहासात शेती आईकडून आहे आणि पशुपालन वडलांकडून, दोन्ही मामा आणि दोघांपैकी एक काका आयुष्यभर शेती-पशुपालनात होते. प्रत्यक्ष अनुभव नसला तरी शेती-पशुपालनानं घडणाऱ्या मनोवृत्ती वगैरे मला उत्तम माहीत आहेत, हे आवर्जून नोंदतो, कारण आजकाल फार सहज "तुला काय कळतंय त्यातलं?" असा उर्मट प्रश्न विचारला जातो; जणू माणसाला 'डायरेक्ट पार्टिसिपेशन' शिवाय काही समजूच शकत नाही! भरकटलो! मुद्दा होता शेतकऱ्याला वाटणारी दरोडेखोरीची धास्त.

इथे 'द सेव्हन सामुराई', 'शोले', 'द मॅग्निफिसंट सेव्हन' (दोन आवृत्त्या), 'चायना-गेट' वगैरे चित्रकृतींचा उल्लेख अटळ आहे, आणि तो मी पूर्वीही केला आहे. यांपैकी एखादा तरी चित्रपट, शक्यतो पहिला, पाहाच, असा आग्रह करून मुद्दा सोडतो.

तर शेतकऱ्याला, गुराख्यालाही, चोर-दरोडेखोरांचा मोठाच धोका असतो. काही महिन्यांची, काही वर्षांची मेहेनत क्षणार्धात नाहीशी होऊ शकते. बरं शेती करणं, गुरं पाळणं, वर 'बाहुबली' होऊन पेशेवर दरोडेखोरांशी लढून आपल्या मालकीचं धान्य, डाळी, गुरं टिकवणं; हे अवघड जातं. तेव्हा एखाद्या मैत्रीतल्या, विश्वासातल्या बाहुबलीवर राखणदारी सोपवणं शेतकऱ्यांना आवडतं. हे स्नेही-बाहुबली अनेक अटी घालतात. पिकांचा, कळपांचा वाटा मागतात. अनेक बाबतींमध्ये ते लोक सांगतील तसंच (तस्संच!) वागावं लागतं. पण ते आपल्या 'जान-माल'चं रक्षण करतात. ते अनेक अंगांनी आपले शासक बनतात, सरकार बनतात. सरकार आणि रयत, राजा आणि प्रजा असं एक नवंच नातं घडतं. हा दुतर्फा खुषीचा सौदा नसतो. नसतो... कृपया लक्षात घ्या. नेहेमीच राजा-प्रजा यांच्यात ताण असतात.

सरकार इतरांपासून प्रजेचं रक्षण करायला सैन्यं बाळगतात. तीच त्यांच्या शासकत्वाची खूण होते. पण प्रजेनं राजाचं, सरकारचं एकलं नाही तर सहज सरकारी सैन्य प्रजेवर तुटून पडू शकतं. 'ॲनिमल फार्म' या जॉर्ज ऑर्वेलच्या प्रसिद्ध कादंबरीत याचं सुंदर वर्णन भेटेल. माझा सख्खा मामेभाऊ भारतीय सेनेत लेफ्टनंट जनरल या 'वरून दुसऱ्या-तिसऱ्या' पायरीपर्यंत पोचला. एकदा बोलता बोलता तो म्हणाला "आम्हाला पोस्टिंगच्या आसपासच्या समाजाशी मैत्री करू नका, असं सांगतात.” विचारलं "का, रे?" "तूच पाहा. मैत्र्या झाल्या आणि मग आम्हाला त्या समाजाविरुद्ध कृती करायची आज्ञा आली, तर…” माझे पोलीस खात्यातले नातलगही याला दुजोरा देतात, की राजा-प्रजा संबंध नेहमीच प्रेमादराचे, परस्पर विश्वासाचे नसतात. बहुतेक वेळा ते सावध अंतर राखणारे असतात..

मेरा नाम राजू

राजा-प्रजा, रयत-शासक या संबंधाबाबत आता मी काही मानसशास्त्रीय स्पष्टीकरणं, काही साहित्यिक संदर्भ वगैरे देतो. अर्थ-अनर्थ तुम्हीच लावायचा आहे, हे मात्र लक्षात असू द्या!

सरकार प्रजेच्या मर्जीनंच चालू शकतं, हे तत्त्वत: खरं आहे. पण प्रत्यक्षात सरकारनं घोर अकार्यक्षमतेनं काम केलं तरच सरकार बदललं जातं. 'जात असे' म्हणूया, कारण सध्याच्या तथाकथित लोकशाही पद्धतीत फार पापं न करताही सरकार बदललं जाऊ शकतं. माझ्याच आठवणीत भारताचं एक सरकार म्हणे कांद्याचा चिल्लर बाजारभाव रुपये शंभरला पोचल्यामुळे पडलं!

हे आज आहे. पण पूर्वी सरकारांची मुख्य भूमिका 'आपल्या बाजूचा बाहुबली, जो इतर लुटारूंपासून आपली राखण करतो' अशी असायची. त्यावेळी सरकार म्हणजे सशस्त्र सेना, हीच व्याख्या होती. अशी सरकारं एकदा त्या पदावर आली की त्यांना हलवणं, हटवणं सोपं नसे. त्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास ती सेना प्रजेवर उलटणं शक्य असायचं, सरकारची दहशत असायची, जिच्यातून 'मायबाप सरकार' हा शब्दप्रयोग घडला आहे. 'मायबाप' मुलांची कशी कोंडी करू शकतात याबाबत एक म्हणही मराठीत आहे; 'आई जेवू घालीना आणि बाप भीक मागू देईना.' म्हणजे मायबाप सरकार हा शब्दप्रयोग निव्वळ प्रेम आणि निष्ठा दाखवत नाही, सोबत सावधपणाही असतो.

बरीच चमत्कारिक, विनोदी वाटणारी मतं व्यक्त केली गेली आहेत. समाज घडवून राहणं वाईट; पण तो न घडवता राहणं आणिकच त्रासदायक. सरकार असणं वाईट, पण ते नसणं आणिकच असह्य, इत्यादी, इत्यादी.

सरकारचं दडपण, कधीमधी दहशत वाटत असताना प्रजा ते दमन का सहन करते? एक कहाणी पाहू, खरी घडलेली. काही दहशतवाद्यांनी एका प्रवासी विमानाचं अपहरण करून स्वीडनची राजधानी स्टॉकहोम या विमानतळावर नेलं. दहशतवाद्यांच्या मागण्या किचकट आणि जबर होत्या. वेगवेगळी सरकारं, त्यांच्या पोलीस यंत्रणा, दहशतवाद्यांचे प्रवक्ते, असं चर्चेचं गुऱ्हाळ बराच काळ चाललं, मधल्या काळात प्रवाशांना असं वाटू लागलं की आपलं भलं आपलं अपहरण करणारे दहशतवादीच करू शकतील. त्यांच्याशी चर्चा करणारी सरकारं वगैरे आपलं वाईटच करतील. हा मांजराला उंदीर साक्षी प्रकार मानसशास्त्रात स्टॉकहोम सिंड्रोम (Stockholm Syndrome) म्हणून ओळखला जातो. 'सिंड्रोम' म्हणजे लक्षणांचा समूह.

आणि याचं आरशातलं प्रतिबिंब असावं तसाही एक प्रकार भेटतो. परिस्थिती स्टॉकहोमसारखीच, पण जागा मात्र परू (पेरू नव्हे!) या देशाची राजधानी लीमा (Lima). इथे दहशतवाद्यांना वाटू लागलं की प्रवाशांचे तारणहार केवळ आपणच. ते आपल्याशी वाटाघाटी करणारे प्रवाशांचं वाईटच करतील! ह्या मनोभूमिकेला लीमा सिंड्रोम नाव पडलं.
गंमत म्हणजे हे लक्षणसमूह मानसशास्त्रानं ओळखण्याआधीच १९३९मध्ये एका बऱ्याच हलक्या दर्जाच्या थ्रिलरपॉर्न कादंबरीत स्टॉकहोम सिंड्रोम अवतरला होता. 'नो ऑर्किड्स फॉर मिस ब्लँडिश' या जेम्स हॅडली चेजच्या कादंबरीतली मिस ब्लँडिश आपलं अपहरण करणाऱ्या व्यक्तीच्या 'विश्वासात पडते' अशी गोष्ट आहे. युद्धाच्या काळात प्रकाशित झाल्यानं पुस्तक लोकप्रियही झालं. पण 'किड्नॅपर'वर भक्ती जडणं तेव्हा अनेकांना पटलं नव्हतं. आज स्टॉकहोम-लीमानंतर ते योग्यच वाटतं.

आता या साऱ्यातून राजा-प्रजा, सरकार-रयत हे संबंध समजून घेता येतात. त्यांचं वर्णन करणाऱ्या काही म्हणी आहेत आपल्या भाषेत; 'तुझं नि माझं जमेना, अन् तुझ्यावाचून करमेना', ही एक. जास्त कठोर म्हणजे 'हडळीला नाही नवरा, अन् वेताळाला नाही बायको'. तर असे शासक-शासित संबंध अत्यंत सावधपणाचेच असत आले आहेत. त्यातही प्रजेला सरकार आवडलं नाही तर ते बदलायची सोय तीनेक शतकं उपलब्ध आहे. पण सरकारला प्रजा आवडली नाही तर काय?

कौटिल्याच्या 'अर्थशास्त्रात' राजांना "कारभाराला कंटाळून प्रजा आपल्या क्षेत्राबाहेर जाईल असे वागू नका" असा सल्ला आहे. जेव्हा मोकळी जमीन बरीच असे तेव्हा खेडी रातोरात उठून 'राज्याबाहेर' गेल्याच्या कहाण्याही ऐकिवात आहेत. अशा एका परिस्थितीत स्वीडन या देशात काय झालं ते पाहा.

डेन्मार्कच्या राजानं एक बारकीशी खाडी ओलांडून दक्षिण स्वीडन जिंकून घेतला. वंशानं डेन्स, स्वीड्स, नॉर्वेजियन्स वगैरे एकाच गटातले आहेत, जसे कौटिल्याच्या काळातले भारतीय असायचे. पण दक्षिणी स्वीड्सना नवा राजा फारसा आवडला नाही. हे कळताच डेन राजानं विचारलं "हवंय काय तुम्हाला?" जरा चर्चेनंतर उत्तर आलं "उत्तर स्वीडनमधल्या उप्साला सारखं एक विश्वविद्यालय द्या" आणि अध्याहृत उत्तरार्ध "तर आम्ही 'नांदू'; नाहीतर उत्तर स्वीडनचं राज्य काय वाईट होतं!" तर दक्षिण स्वीडनला लुंड हे विश्वविद्यालय मिळालं... पण काही काळानं पुन्हा दक्षिण स्वीडन उत्तर स्वीडनमधल्या राजाकडे गेला.

सरकारच्या नाकर्तेपणानं किंवा इतर काही कारणानं प्रजा वेगळं सरकार निवडू शकते याचा व्यत्यास जर्मन कवी आणि नाटककार बर्टोल्ड बेख्ट यानं काहीशा मिष्किलपणानं सुचवला आहे. तो विचारतो, "जर सरकारांना लोक पटले नाहीत तर मग सरकारांनी लोकांना विसर्जित करून नवे लोक निवडणं सोपं नाही का जाणार?"

Would it not be easier
In that case, for the Government
To dissolve the people
And elect another?

बरं, हा नुसता तुच्छतावाद, नुसती cynicism नाही. एखादा मुद्दा ठसवायला त्याचा व्यत्यास करणं कसं विक्षिप्त ठरतं ते दाखवण्याचा हा प्रकार आहे.

हे लिहिलं आणि थोड्याच दिवसांत प्रताप भानू मेहतांचा एक लेख वाचण्यात आला (Listening for a Voice, Indian Express, 1 जाने 2021) भारतातल्या ऊर्जावान, आवाजी, गोंधळ घालणाऱ्या लोकशाहीबद्दल मेहता लिहितात, 'Its noise, its energy, its messiness, its deference to constitutional form, is seen to stand in the way of an economic utopia that might be unleashed if only democracy would get out of the way... This is elite contempt of institutional checks and balances, protest and dissent, now locked in the higher purpose of economic growth. If only we could dispense with the people.'

याचं जरासंच स्वैर भाषांतर असं, "भारतीय लोकशाहीतला गडबड-गोंधळ, ऊर्जा, पण संवैधानिक रूपाबाबतचा आदर, हे सारे आर्थिक स्वर्गवत् सुधारणांच्या आड येते, असे अभिजनांना वाटते... ही अभिजनांची संस्थात्मक समतोल राखणाऱ्या व्यवस्था, लोकभावनेतले सरकार-विरोध वगैरेंबाबतची तुच्छता आहे; आर्थिक प्रगतीच्या तथाकथित पुण्यवान हेतूंमध्ये लपेटलेली. काश! या लोकांची विल्हेवाट लावता आली असती!"

ब्रेख्त फार काही cynical तुच्छतावादी नव्हता!

गरजेपेक्षा जास्त

शिकार-सावड करताना माणसं वस्तूंचा संग्रह करत नसत. तसं करणं हे लोढणंच ठरत असे. शेती करायला लागल्यावर, गुरं पाळायला लागल्यावर जरा जरा वस्तू साठवायची गरज वाटायला लागली. पुढच्या पिकापर्यंतची गरज, पुढच्या पिकाचं बियाणं, एखादं वर्ष पीक नीट न आल्याप्रसंगी करायची सोय, अशी एकेक पायरी चढत वस्तुसंग्रह वाढायला लागले.

यातच अन्नोत्पादकांवर बलुतेदारीला पोसायचाही भार आला. सर्व 'खपा'चे हिशोब सुतार, लोहार, चांभारांना मनात ठेवून केले जायला लागले.

आणि सर्वांत जाचक आणि मोठा वाटेकरू झाला 'सरकार' उर्फ राजा उर्फ शासक-प्रशासक. त्याचे वाटा मागायला येणारे ओळखीतले, गावातले नसत. त्यांना "अडचण आहे, या वेळी. पुढच्या पिकातनं करतो ना पूर्ण!" असं समजावता येत नसे. वर ते हत्यारबंद असत! या "नो आर्ग्युमेंट्स!" वृत्तीमुळे प्रजा आपत्तीचं वर्णन करतानाही अस्मानी-सुलतानी असे जोडशब्द वापरू लागली. या दोन प्रकारच्या आपत्तींपुढे शहाणे युक्तिवाद, अजिजी, काकळूत, काहीही चालत नाही. अशीच एक पूरक म्हण म्हणजे सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. किंवा आमच्या ठेकेदारीतली जालीम आवृत्ती - सायबाच्या पुढं अन् गाढवाच्या मागं उभं झालं की लाथा बसणारच!

सरकार-प्रजा संबंधाबाबत अनेकानेक म्हणी, विनोद, चुटके, सिंड्रोम्स असणं दाखवतं की दोन सहस्त्रकांवर काळ जाऊनही ते संबंध तणावाचेच आहेत. अर्थातच हे संबंध बिघडू नयेत म्हणून शेतकरी राजाचा, सरकारचा वाटा काढून ठेवतोच; आणि तोही कमीजास्त दानशूरपणेच. या साऱ्याचा नक्त परिणाम हा की शेतकरी थेट गरजेपेक्षा जास्त उत्पादन करतात. याने साठवण खर्च, थोडा साठा वाया जाण्याचा खर्च वगैरे वाढतातच. शिवाय जादा साठा लोकांच्या नजरेत भरून चोरी दरोडेखोरीची शक्यता आणि करवाढीची शक्यता ह्याही वाढतात.

एक करता आलं तर? इथे माझा गहू निघतो त्यानंतर दीड-दोन महिन्यांनी चार गावं पलीकडे डाळ निघते. जर मी आज तिथे गहू पाठवला, आणि महिन्या-दीड महिन्यांनी तिथून डाळ आणली तर? तर व्यापार ही यंत्रणा सुचू लागली. आधीही व्यापार असायचा, आणि तोही चार गावं पलीकडेपेक्षा बराच दूरचा. पण त्यात विकायला विकत घ्यायला वापरला जाणारा माल आकारानं लहान असायचा. बियाणं, आकर्षक किंवा उपयोगी दगड, धातूच्या वस्तू, काच व चिनी मातीच्या वस्तू, महागाची कापडं.... आणि वजनाला शून्य पण 'अमूल्य' अशी माहिती!

पण आता गरजेपेक्षा जास्त उत्पादनाकडे कल वाढला. तसा अंतरानं लहान पण वजन-आकाराला मोठ्या मालाचा व्यापारही वाढला. अगदी एखाद्या गावात नाही, पण पंचक्रोशीत तरी बाजारासारख्या यंत्रणा घडायला लागल्या. आपण ही कहाणी इथे सुरू केली होती, आठवडी बाजारासोबत!

आला बाजार

आणि शेतकऱ्यांना जर स्वत: किंवा मध्यस्थामार्फत व्यापार करण्याचं सुचलं तर राजेसाहेब कसे मागे राहणार! राजे-सरकारं व्यापाराला मदत करू लागले. दुरून येणाऱ्या लोकांसाठी सराया (होस्टेल्स) बांधणं, प्रवाशांच्या गाडी-घोड्या-उंटांसाठी चारा-पाण्याच्या सोई करणं, अस सारं राजे करू लागले.

आणि या सोईंसाठी व्यापारी मालाचा काही भाग राजे कराच्या रूपात घेऊ लागले. नावं वेगवेगळी असायची; जकात, चुंगी, ऑकट्रॉय, ट्रान्झिट टॅक्स वगैरे. ऑकट्रॉय ह्या शब्दाचा अर्थच 'राजाचा एक - अष्टमांश भाग' असा आहे! इतर काही जवळपासचे शब्दही पाहा.

पेठ; बाजारपेठ, व्यापारासाठी रचलेलं क्षेत्र.
कसबा; कुशल (कसबी) कारागिरासाठीचं क्षेत्र.
जत्रा; धार्मिक मुलामा दिलेली बाजारपेठ!

काही व्यापारी मार्ग, रस्ते दूरपर्यंत जाऊन दूरदूरच्या क्षेत्रांना जोडत. युरोप-चीन यांना जोडणारा 'रेशीम मार्ग' उर्फ सिल्क रूट; युरोप-भारत (आणि सागरी मार्गानं आग्नेय आशिया) यांना जोडणारा 'मसाला मार्ग' उर्फ स्पाईस रूट ही दोन प्रसिद्ध उदाहरणं आहेत. यांच्या मिनी आवृत्त्या तर जगभर पसरलेल्या होत्या. आज यांपैकी काही मार्ग नव्यानं 'टूरिस्ट मार्ग' म्हणून वापरात येताहेत.

आणि अर्थातच असे लहान-थोर मार्ग भेटतात त्या गावांची वाढ झपाट्यानं होऊन नगरं-शहरं घडली. इथेही थोडेफार कोंबडी आधी की अंडं नमुन्याचे वाद आहेत; सध्या आपल्यासाठी बिनमहत्त्वाचे. नगर रचनांचा अभ्यास करणारे मात्र व्यापार आणि नगरं यांपैकी कोणी दुसऱ्याला चालना दिली यावर चर्चा करत असतात. खरंतर अशा वेळी काटेकोरपणावरचा आग्रह सोडून या दोन व्यवस्था 'सह-उत्क्रांत' (co-evolve) झाल्या असं म्हणणं मला तरी पुरेसं वाटतं आणि जगभराच्या नगरांमध्ये संपूर्ण एकसुरीपणा कसा असेल? काही विविधता, काही अपवादात्मक उदाहरणं असणारच.

जसं, पेठ म्हणजे बाजाराचं क्षेत्र, आणि कसबा हे कसबी कारागिरांचं क्षेत्र. पण पुण्यातली 'कसबा पेठ' कुठे धरायची? असल्या सगळ्या गंमतीसोबत कर वसूल करण्यासाठी का होईना, बाजाराची सोय सरकारनं करून द्यायची, हे आज सर्वमान्य झालं आहे. काही माझी आवडती उदाहरणं देतो.

मागे दक्षिण स्वीडन मधल्या लुंड विश्वविद्यालयाचा उल्लेख आला. आज त्या गावाची लोकसंख्या तीस हजार आणि साठ हजारांत हेलकावते; कारण विश्वविद्यालय बंद किंवा सुरू असतं! गावात एक दीडदोनशे मीटर लांबरुंद चौक आहे, वीतभर लांबरुंद दगडांची फरसबंदी असलेला. एका कोपऱ्यात शंभरेक फूट लांबरुंद गोदामासारखी इमारत आहे 'सालु हॉलेन' (Salu Hallen, सेल हॉल किंवा बाजार दालन) नावाची. आत डझनभर दुकानं आहेत, मुख्यत: खाद्यपदार्थांची. पण हे पुरत नसल्यानं दिवसाचा काही वेळ, आठवड्याचे काही दिवस बाहेरच्या चौकात लोक तंबू-राहुट्या उभारून, हातगाड्या घेऊन, उभ्या खांबांवर फळे-खिळे लावून बाजार भरवतात. बुटाच्या वा पायजम्याच्या नाड्यांपासून कमरेचे पट्टे, बकलं, अंगठ्या, बांगड्या... थेट आमच्या मंगळ-शुक्र बाजारासारखी जत्रा भरते. भाज्या, चीझेस, ईमूंची निळी-हिरवी नारळाएवढी अंडी; सारं काही मिळतं. दिवेलागणीला सारं गुंडाळलं जातं. चार-सहा विशेषज्ञ वाहनं येऊन झाडू मारतात, पाणी मारतात, स्क्रबरनं फरशी धुतात..... आणि रात्रीसाठी चौकाचा 'पार्किंग लॉट' होतो. पहाटे वाहनतळ उठतो, आणि बाजार येतो! चौकाच्या चारही बाजूंना दुकानं आहेत. तयार कपडे. कापडं. पुस्तकं. दागिने. बेकरी. स्टेशनरी. हस्तकला. ओव्हन-मायक्रोवेव्हसारखी यंत्रं. मला 'मंगल पांडे' या चित्रपटातलं जावेद अख्तरचं गाणं आठवतं.

आ जाओ. आ जाओ
बाजार है भय्या आ जाओ
यहा सब मिलता है
टके टके.

पण लुंडच्या सालु हॉलेनची भावंडं जगभर आहेत. मुंबईचं क्रॉफर्ड मार्केट, पुण्याची मंडई आणि शेजारची तुळशीबाग. नागपुरचं कॉटन मार्केट आणि शेजारचं तीन कमानींचं फुले मार्केट. गडचिरोलीच्या 'काँप्लेक्स' परिसरातला रविवारचा बाजार, पॅरिसचा जुन्या मराठी किल्ल्यांची रचना आठवायला लावणारा बाजार (Les Halles). आज शहरांच्या वस्त्यावस्त्यांमध्ये बहरणारी 'फार्मर्स मार्केट्स'.

आणि कोरोनाकाळात दर चार इमारतींमागे फुटपाथवर चादरी, सतरंज्या, पोती अंथरून त्यावर दहावीस किलो कांदे, बटाटे, वांगी, पपया मांडून बसलेली भकास चेहेऱ्यांची माणसं.

बाजारव्यवस्था

नाही. बाजार ही नुसती चौक-ओटे-इमारतींची भौतिक रचना नाही, ती माणसांच्या व्यवहारांची, आर्थिक व्यवहारांची नाट्यं खेळली जातात अशी रंगभूमी आहे. एखादा समाज आर्थिकदृष्ट्या सुखी आहे का, बहरतो आहे का, घुसमटतो आहे का, याच्या खुणा दाखवणारं ते 'थर्मामीटर' आहे. विकृती आहेत का? त्या हटवायला कोणी काही करावं का? सरकारनी? की सरकारी हस्तक्षेप त्रासदायकच ठरेल?... असे प्रश्न पाडणारी ती रचना आहे.

तर... या दृष्टिकोनातनं आपण बाजार-व्यवस्था, मार्केट-मेकॅनिझम पाहू. मी वाटाड्याची भूमिका बळकावतो आहे, हे खरंच. पण त्यामुळे मी स्वत:ला 'बिनचूक' समजतो असं नाही. जे लोक अर्थशास्त्र हे भौतिकी-रसायनशास्त्रासारखं 'नैसर्गिक' शास्त्र आहे असं सांगतात, त्यांना मात्र माझा तीव्र विरोध आहे. ते फसवेगिरी करताहेत असं माझं स्पष्ट मत आहे.

सुरुवातीलाच मी माझी भूमिका स्पष्ट करतो. मी मानवतावादी आहे. १७८९च्या फ्रेंच राज्यक्रांतीचा आधार होता स्वातंत्र्य समता-बंधुभाव (लिबर्टी-इगॅलिटी-फ्रॅटर्निटी; Liberty, Egality, Fraternity). मी तो आधार हाच माझ्या विचारांचा आधार मानतो. तसं न करणाऱ्यांकडे मी साशंकपणे पाहतो. त्यांना प्रसंगी बदमाषही मानतो! या मर्यांदामध्ये मी शक्य तितक्या सुसंगतपणे, तर्कशुद्धपणे विचार करतो. मी 'बाल की खाल निकाल' णारी विचार धागा-धागा पिंजायची क्रिया शक्यतो करत नाही. माणसं मुळात सत्प्रवृत्त असतात आणि दुष्ट नसतात, असं मानून मी मतं घडवतो.

आणि राजेहो, बापहो, आयाबहिणींनो, तुम्हीही तसंच करा, अशी मी तुम्हाला विनंती करतो. त्याशिवाय आपल्याला आपण ज्या आर्थिक जगात जगतो ते नीटसं समजणारंच नाही... हेही माझं मत आहे!

पैसा

बाजार, व्यापार वगैरे व्यवस्थांना काही पायाभूत सोई लागतात, इन्फ्रास्ट्रक्चर लागतं. गरजेपेक्षा जास्त उत्पादन लागतं. राजाश्रय लागतो आणि पैसे, चलन, मुद्रा ही संकल्पना लागते.

असं सांगतात की सुमारे ख्रिस्तपूर्व ३००० साली मेसोपोटेमियात (आजचं इराक-सीरिया वगैरे क्षेत्र) शेतकरी आपलं मुख्य धान्य यव (जहू, जव, बार्ली, barley) साठवणीसाठी शेजारच्या देवळातल्या कोठारांमध्ये नेऊन देत. देवस्थान कोणी किती धान्य दिलं याचा हिशोब ठेवायला ओल्या मातीच्या चकत्यांवर खुणा उमटवून त्या चकत्या भाजून त्या शेतकऱ्यांना देत. प्रत्येक चकती ही काही माप यवाचं प्रतीक असे. पैशांचा पूर्वज हाच!

खूण उमटवण्यासाठी धातूच्या दांड्यांवर काही कोरीवकाम केलं जाई. ही झाली 'मोहोर'... आणि दांडकं सांभाळणारा अधिकारी म्हणजे 'मुहर्रिर' किंवा 'मोहरील', जे नागपुरकडचं सन्माननीय आडनाव आहे! खूण उमटवायला अंगठी वापरली तर ती झाली 'मुद्रा' कारण अंगठी म्हणजे 'मुद्रिका'. आजही 'कॅश' म्हणजे 'मुद्रा'!

भारतात सुमारे ख्रिस्तपूर्व ३०० पासूनची धातूंची नाणी सापडतात. साधारण एका धातूचे, एका वजनाचे गोलसर तुकडे आणि त्यांवर उमटवलेली खूण; असं या नाण्यांचं रूप असतं. जसजसा व्यापार वाढत गेला तसतसा या नाण्यांच्या 'नेमकेपणा'वरचा, 'खरेपणा'वरचा आग्रह वाढत गेला. अशी कल्पना करा की (मेसोपोटेमियातला) एक शेतकरी आणि एक कुंभार यांनी संगनमतानं काही मातीच्या चकत्या बनवून, त्यांच्यावर चोरून मोहोर उमटवली आणि त्या भाजल्या. कोणतेही शेतीचे श्रम न करता आपल्या कपटी जोडगोळीला काही मापं जवावर हक्क सांगता येऊ लागला. माणसं आधी गंमत म्हणून, मग चंटपणा म्हणून आणि शेवटी हरामखोरी म्हणून असली 'लेबर सेव्हिंग डिव्हाईसेस' रचतात. मेसोपोटेमियात कोणी खोट्या यव-चकत्या बनवत होतं का ते माहीत नाही; पण धातूंच्या नाण्यांमध्ये खोटेपणा आणायचे अनेक प्रयत्न दिसतात.

मेसो चकत्या 'प्रमाणित' करण्याची, मोहोर उमटवण्याची जबाबदारी बहुधा देवस्थानाच्या मोहरीलांवर असायची. पुढे मात्र चलन, नाणी, मुद्रा ही सरकारची, राजेलोकांची जबाबदारी झाली. काय? यानं बदमाषीला आळा बसेल? भोळे रे भोळे तुम्ही! जे काम शेतकरी-कुंभार ओबडधोबड अडाणीपणे करायचे, ते सरकारस्वाऱ्या शाही थाटात करू लागल्या. नाणी 'हलकी' करण्याच्या अनेक पद्धती आहेत. धातूमध्ये स्वस्त धातूंची भेसळ करायची. वजनात हात मारून नाणी चक्क हलकी करायची. जे तुम्हाला सुचेल ते.

काही काळ मी नाणी गोळा करत असे. एक मळकट पांढरं नाणं एका मित्राकडून मिळवलं, मोबदल्यात इतर काहीतरी देऊन. नाणं नुसतंच मळकट नव्हतं, तर आकार नीट गोल नव्हता. 'चौदहवी का चांद' सारखा एका बाजूला 'छिललेला' होता. एका काकांना विचारलं या नाण्याबद्दल; कारण मी पाचव्या वर्गात होतो, आणि एकूणही अडाणी. ते म्हणाले "हे 'हाली' नाणं आहे, निजामानं पाडलेलं, जस्ताचं, पण खोटं आहे म्हणून कोणीतरी आडकित्त्यानी एक कड कापली आहे!" खोटं असलं तरी नाणं रसाळ होतं. पण पुढे एका मित्रानं करंगळीच्या नखाएवढ्या चांदीच्या चवलीच्या मोबदल्यात ते 'हाली' नाणं माझ्याकडून कमावलं!

हे घडत होतं १९५४-५५मध्ये. तेव्हा भारतातली नाणे-व्यवस्था अशी होती; एका रुपयाचे सोळा आणे, एका आण्यात चार पैसे. त्यातही आठ आणे, चार आणे, दोन आणे या नाण्यांना 'अधेली', 'पावली' आणि 'चवली' अशी नावं होती. दोन पैशांचही नाणं असायचं. वरच्या पिढीचे लोक सांगायचे की त्यांच्या आठवणीत एका पैशाच्या तीन पया (एकवचन 'पै') आणि एका पैच्या पंचवीस कवड्या, अशीही 'नाणी' वापरली जात. म्हणजे एका रुपयाचे चार हजार आठशे भाग करता येत. या आकड्यामुळे रुपयाचे २, ३, ४, ५, ६, ८ वगैरे भाग करता येत; तेही नि:शेष. आठवतो का तो शब्द? बरं, नाणी लिहायची लिपीही जरा वेगळी असायची. दोन ठिपक्यांमध्ये काढलेल्या सुट्या उभ्या रेघा 'आणे' दाखवायच्या. जरा तिरप्या आडव्या रेघा, एकूण नोंदीच्या उजव्या कडेला, ह्या 'पैसे' दाखवायच्या. सुदैवानं हे 'रेघी गणित' माझ्या मागे लागायच्या आतच भारतानं दशमान पद्धती स्वीकारली.

पण त्या चलनातल्या घटकांवर बेतलेल्या म्हणी आणि वाक्प्रचार मात्र आजही मोठ्या प्रमाणात भेटतात. 'दीड दमडीचा माणूस'; मात्र 'दमडी'चा अर्थ मला माहीत नाही. 'चवन्नी छाप' हे नागपुरी विशेषण आज चवन्नी संपून अर्धशतक झाल्यावरही टिकलं आहे. जुन्या काळच्या तमाशांमधला "या चवलीचं काय म्हननं हाय?" हा प्रश्न मात्र आज ऐकू येत नसावा. तिथे मुद्रास्फीतीनं (चलनवाढ) चवली जाऊन पाचशेची नोट आली असावी. हिंदी भागात गरिबी म्हणजे 'फूटी कौडी भी' नसणं, आणि मराठीत 'दातावर मारायला पैसा नसणं' मात्र अधनंमधनं ऐकू येतात.

भोकाचा पैसा

या साऱ्यातनं जाणवतं ते हे की नाण्यांना मुळात 'स्वत:ची किंमत' नको. कोणीतरी, काहीतरी प्रमाणित केलं यातूनच ती किंमत जन्माला यायला हवी.

जुन्या रुपयाचे सोळा आणे, आण्याचे चार पैसे पद्धतीत एक 'भोकाचा पैसा' म्हणून प्रकार असे. सुमारे दोन सेंटिमीटर व्यासाच्या तांब्याच्या चकतीत एक सेंटिमीटर व्यासाचं छिद्र असे. सायकल या वाहनात अनेक जागी लागणाऱ्या वायसरांमध्ये (washersमध्ये) हा पैसा नेमका बसत असे. बहुतेक सायकल रिपेअरीच्या दुकानांत मालकाच्या बैठकीजवळ तारेत ओवलेले भोकाचे पैसे असत. एका उन्हाळ्यात मी अशा एका दुकानात दोनेक आठवडे रोज तासभर 'इंटर्नशिप' केली. कंपनीचे वायसर एका पैशापेक्षा महाग असत आणि त्यातून ही भोकाचा पैसा वायसर म्हणून वापरायची पद्धत उपजली. सरकारनं ती बेकायदेशीरही ठरवली, आणि भोकाचे पैसेही बंद करून सर्व पैसे नि:छिद्र झाले! पुढे नये पैसे (रुपयाचे शंभर) आल्यावरही सुरुवात तांब्याच्या पैशांनी झाली. लवकरच म्हणे तांब्यांच्या किंमती वाढल्या आणि काही लोक 'पैसे' वितळवून तांबं 'घडवायला' लागले. इथेही सरकानं असं करणं बेकायदेशीरही ठरवलं, आणि नवे पैसेही ॲल्यूमिनियमचे केले जाऊ लागले.

पण नाण्यांना स्वत:चं मूल्य नको ही कल्पना उपजाण्याआधी महत्त्वाची नाणी, रुपये, मोहोरा वगैरेंच्या मूळ आवृत्त्या रुप्या-सोन्याच्या असत.... आणि बदमाष लोक त्यांच्यात भेसळ करत. सुरती रुपया, अर्काटी रुपया वगैरे अनेक टाकसाळींची नाणी चलनात असायची. त्यांच्या स्वत:च्या मूल्याला (ज्याला तत्त्वज्ञानात 'स्वतोमूल्य' म्हणतात!) मोजायची पद्धत असे. पोतनीस, पारसनीस ही पदं अशी नाणी प्रमाणित करत, आणि अर्थातच पुढे ती आडनावंही झाली.

एकूणच नाणी आणि त्यांची रूपांतरं हा मजेदार विषय आहे. प्राचीन नाण्यांवरच्या 'मुद्रां'च्या अभ्यासातून दामोदर धर्मानंद कोसंबींनी व्यापारी इतिहास तपासला. दोन महायुद्धांमधल्या काळात अर्थशास्त्रात अडाणी अशा ब्रिटनच्या अर्थमंत्र्यानं (सेक्रेटरी फॉर द ट्रेझरी) देशाची नाणे-व्यवस्था खजिन्यातल्या सोन्यावर बेतली. याचे भीषण अर्थ-राजकीय परिणाम होऊन अर्थमंत्र्याला डच्चू दिला गेला. त्याचं नाव? विंस्टन चर्चिल!

टके टके

तर एकूण पाहता बाजार, सरकार, चलन-व्यवस्था हे सारं सरकारांनी एकछत्री केलं. पण बाजारातल्या मालाची विविधता मात्र एकसुरी होणं शक्य नव्हतं. शाळेतल्या एका सरोजिनी नायडूंच्या कवितेत बाजारातल्या वस्तूंची एक प्रास साधणारी यादी भेटली "टार, टारो, टर्मेरिक, टर्पेंटाईन अँड टिन".

पण याहून मोठी यादी 'मंगल पांडे: द रायझिंग' या चित्रपटातल्या जावेद अख्तरनं लिहिलेल्या, ए. आर. रहमाननं संगीत दिलेल्या गाण्यात आहे. कहाणी बंगालमध्ये घडते, जिथे पूर्वापार रुपयाला टका म्हणायची पद्धत आहे. बांगलादेशनं तर राष्ट्रीय चलनाचं नावच 'टका' ठेवलं आहे. मुळात जावेद अख्तरचं काव्य आणि चित्रपटातलं गाणं यांत फरक आहेत. इथे एक धेडगुजरी, हायब्रिड रूप देतो आहे.

आ जाओ आ जाओ। बाजार है भैय्या आ जाओ.
व्यापार है भैया आ जाओ। ये दुनिया, बाजार है भैया आ जाओ.
हम तो इतना जाने है। तुम जहां देखो दुनिया में
दूकानें ही दूकानें है। टके टके, होये होये
यहां सब मिलता है। यहां सब बिकता है
जो चाहो मांगो। जो चाहो पाओ। टके टके, होये होये
सब खान पान। सब गेंहु-धान
सब फूल हार। सारे सिंगार
सब खानदान। सब आन-बान
सब दोस्त-यार। सब प्रीत-प्यार
टके टके होये। टके टके
मलमल। रेशम। मखमल। खद्दर
मुल्ला। पंडित। वाईज। रेहबर
दाल और चावल। मूंग मटर
टके टके होये। टके टके
ज्योतिष हकीम। कवि और शायर
इज्जत बनाम। अमरुद
आमसब साज-बाज। सब शीशा-कांच
दुनिया के बाद। दुनिया के ठाठ
सब रंग-रूप। सब गीत-नाच
यहा सब मिलता है। टके टके
हाथी-घोडा। घोडा-गाडी
खलियान-खेत। बंगला गाडी
इन्सान ले लो। ईमान ले लो
जो है कुबूल। सोना या दूध
इसका बयान। उसकी जुबान
सारे वसूल। कागज के फूल
टके टके। होये टके टके.

लक्ष देऊन वाचा. टके टके मोलानं काय काय विकायला आहे पाहा, 'वस्तू आणि सेवा करा'च्या कक्षेत येणारं तर सहज समजू शकतं. पण त्या पलिकडे ज्योतिष-हकीम. कवि और शायर, इज्जत, दुनिया के बाद, इन्सान-ईमान, इसका बयान, उसकी जुबान... सारं, सारं बिकाऊ आहे.

आपल्या ओटे, पोत्यांच्या, सालु-हॉलेन चौकाच्या बाजाराचं काय हे अजस्त्र रूप! आणि तेही टके टके, होये, टके टके!

चला 'प्रिय अमुचा आठवडी बाजार एक हा' पासून काय काय घडत गेलं ते पाहू. वृत्ती हीच राखायचा प्रयत्न करू. परिभाषा, जड शब्द नकोत. रोजमर्रा जीवनातली उदाहरणं हवीत. हट्टीपणाही हवा आणि थेट विरोधी मत 'कुबूल' करून 'वसूल'करता यायला हवंही. आहेत टके टके कागज के फूल... पण, पाहू या की! जरा उजळणी करू.

माणसांनी शेतीसोबत मालकी ही संकल्पना घडवली. सोबत साठवण, राखण आले. गरजेपेक्षा जरा जास्त उत्पादन करणं आलं. बाजार आला.

श्रमविभाजन आलं. हत्यारं-अवजारं आली. बलुतेदारी आली.

मध्ये अत्यंत गैरसोईचा वस्तु-विनिमय, बार्टर, barter काही संकल्पना देऊन गेला; योग्य मोबदला, न्याय्य सौदा...
सरकार, शासन, राजे घडले. राजा-प्रजा संबंध घडले.
चलन, करन्सी, नाणी, कॅश, मुद्रा, सचोटी, बदमाषी, लंबीचौडी संकल्पनांची, वस्तूंची, व्यवस्थांची माळ घडली.
साध्या वस्तू-सेवांसोबत कल्पनेपारच्या गोष्टी 'बाजारू' झाल्या.
बाजार! एक रसरशीत मानवी संस्था!

बालमोहन लिमये Sat, 19/02/2022 - 18:51

`बाजार हे पुस्तक बाजारात आले आहे' ही संपादकीय सुरुवात, पुस्तकाच्या पृष्ठावरील `मूल्यहीन बाजारव्यवस्थे विषयीचे मुक्त चिंतन' या उपशीर्षकाला लागूनच `मूल्य रु. २५०' ही दिलेली किंमत, असे सगळे बघून आणि लेखकाचे नाव वाचून पहिले प्रकरण वाचायला घेतले, ते संपवूनच श्वास घेतला. आशय रसरशीत आणि भाषा लुसलशीत! परखडपणाचा तुटवडा नाही. `द सेव्हन सामुराई' पासून `द रायझिंग' पर्यंत, आणि पुण्याच्या तुळशीबागेपासून स्वीडनमधील लुंडपर्यंत सगळे आले आहे यात. जाता जाता ज्यांना बसायला पाहिजेत त्यांना चापट्याही बसत जातात. लेखक मात्र नामानिराळा! पुढची प्रकरणे ऐसी अक्षरे वर देणे अशक्य आहे का?

Rajesh188 Sat, 19/02/2022 - 23:45

विषयी जास्त कथ्या कुट न करता.सरळ मत वंचित लोकांना त्यांचा माल विकण्याची संधी मिळते
झगमगाट नी युक्त बाजार पेठेत प्रामाणिक लोकांना संधी मिळतें

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 21/02/2022 - 00:42

पुस्तक मागवलं आहे; हातात कधी पडतं बघू.

चिमणराव Mon, 21/02/2022 - 07:05

आणि इकडचे युवालनोआहरारी होण्याची खटपट वाटली.
गमतीदार पद्धतीने बाजार बसवायला आणि उठवायला खरं म्हणजे खूप वाव आहे.

(( लेखकाचे नाव जरा गाजू लागले की प्रकाशक लोक त्यांचेकडून पुस्तकं लिहवून घेतात. ))
असो.

बिटकॉइनजी बाळा Tue, 22/02/2022 - 18:52

In reply to by चिमणराव

खऱ्यांनी हरारीच्या जवळपास एका वर्षाआधी "कहाणी मानव प्राण्याची" लिहलं आहे. त्यायोगे युवाल नोवा हरारीला तिकडचे नंदा खरे म्हणायला हवे.

बिटकॉइनजी बाळा Tue, 22/02/2022 - 21:49

In reply to by चिमणराव

शिवाय "कहाणी"च्या पहिल्या आवृत्तीत अनेक मुलभूत लेख होते/आहेत. विशेषत: उल्लेख करावासा वाटतो ते म्हणजे मालशे यांचा लेख. मराठीत काय कोणत्याही भारतीय भाषेत अशा आवाक्याचे पुस्तक त्याआधी नसावे. करायचीच असेल तर खऱ्यांची तुलना जेरेड डायमंडशी करता येईल.

संदर्भमूल्य असलेली माहितीपर पुस्तके/अनुवाद, ऐतिहासिक ललित कादंबऱ्या, ललित लेख, डिस्टोपियन कादंबरी असा सगळा आणि पहिल्या दर्जाचा ऐवज लिहिणारे खरे मराठीत एकमेकाद्वितीय लेखक असावेत. प्रकाशकांनी अजून जोमाने मागे लागायला हवंय त्यांच्या.

अबापट Wed, 23/02/2022 - 14:41

In reply to by बिटकॉइनजी बाळा

यारेड डायमंड कधीकधी फेकतो. खऱयांनी तसे केल्याचं अजून वाचनात नाही.
सापडल्यास कळवा.
अजून मुक्काम जर्मनी की आलात परत ?

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 22/02/2022 - 20:25

In reply to by बिटकॉइनजी बाळा

उच्चवर्णीय, म्हातारे, मराठी पुरुष ही जात मला फार आवडते. फार करमणूक करतात हे लोक.

पुंबा Wed, 23/02/2022 - 15:09

In reply to by बिटकॉइनजी बाळा

'कहानी मानवप्राण्याची'ची शैली तर भन्नाट आहे. इंटिग्रेटेड हिष्टरीच्या विधेत एवढं सुगम पण माहितीप्रचूर कुणी लिहिलेलं आठवत नाही.
प्रभाव म्हणाल तर असेंट ऑफ मॅन चा थोडासा आहे.