पडघम
anant_yaatree
अनाम तार्याच्या गर्भीचे
ऊर्जा वादळ लवथवणारे
उधळून देते विस्फोटातून
विकीरणाचे पिसाट वारे
दुबळी दुर्बिण अधांतरातून
अनंतात डोकावून बघते
सर्वव्यापी, निर्लेप, अनादि
स्थळकाळाचे चित्र रेखिते
आतशबाजी अवकाशातील
निरभ्रातुनी मला खुणविते
भव्यत्वाचे क्षुद्रत्वाशी
अबोध नाते अधोरेखिते
अज्ञाताचा अदम्य रेटा
परतविण्याचे प्रयत्न माझे
थिटेच ठरती, रोमरोमी मग
कुतूहलाचा पडघम वाजे