Skip to main content

उठ भक्ता जागा हो

उठ भक्ता जागा हो
बॉयकॉट चा धागा हो
संस्कृतीच्या रक्षणासाठी
भावी पिढीच्या कल्याणासाठी

उठ गुलामा पेटून उठ
लढण्यासाठी रणशिंग फुंक
भक्तमुजोरीला मोडण्यासाठी
पुरोगामित्व टिकवण्यासाठी

पळ सैनिका जिवानिशी धाव
उचल सतरंज्या खाऊन वडापाव
आदेशाचे पालन करण्यासाठी
अस्मितेचा अंगार पेटवण्यासाठी

खडबडून जागा हो नवसैनिका
कर खळखट्याक घे आणाभाका
परप्रांतियांना ठोकण्यासाठी
नवनिर्माण जोपासण्यासाठी

लाल कॉमरेडा ठोक सलाम
रक्तरंजित संघर्ष कर बेफाम
मॅनिफेस्टोच्या संवर्धनासाठी
शोषितांच्या मतदानासाठी

गर्जून मूलनिवासी घुमू दे नारा
वंचितांचा तूच एकमेव सहारा
सवर्णांना धडा शिकविण्यासाठी
निळ्या क्रांतीच्या उत्थानासाठी

आवळून घट्ट मनगट, हे बिग्रेड्या
तोडफोड कर बनून घरगड्या
सनातन्यांना संपवण्यासाठी
साहेबांना सत्ता गाजवण्यासाठी

हे तरुणा, सार्वभौम देशाच्या
कष्टाने मिळवा संधी रोजगाराच्या
टीचभर पोटाच्या उपजिविकेसाठी
रक्ताच्या नात्यांच्या भरभराटीसाठी

- भूषण वर्धेकर
१९ जूलै २०२३
पुणे