Skip to main content

सिंधुआज्जी आणि नीरव कोलाहल

सिंधुआज्जींनी तरस बल्बाकडे अंमळ रागानेच पाहिले. तो कितीही लाडका असला तरी काय, पाहुण्यांसाठी आणलेला खिमा फस्त करणं ही त्याची चूकच होती. त्यात भर म्हणजे, सेरेंगेतीमध्ये झेब्र्याच्या कवट्या कच्च्याच चघळणाऱ्या तरसांचा पाईक असलेल्या तरस बल्बाने खिमा मात्र सिंधुआज्जींनी साग्रसंगीत बनवल्यावर खाल्ला होता. सबब, सिंधुआज्जींचे श्रमदेखील व्यर्थ गेले होते.

तरस बल्बाला समज द्यावी म्हणून घसा खाकरणार एवढ्यात सिंधुआज्जींना आठवलं - आज त्यांचं मौनव्रत होतं!

एवढ्याशा अडचणीला शरण जातील एवढ्या लेच्यापेच्या नाहीत सिंधुआज्जी! त्यांनी ब्रिटिश साईन लँग्वेजमध्ये तरस बल्बाची खरडपट्टी सुरू केली.

तरस बल्बा एरवी (इतर तरसांप्रमाणे) नुसताच हसला असता, पण आज त्याचंही मौनव्रत होतं. तो फतकल मारून बसला आणि पुढचे पंजे जमतील तसे उचलत तोदेखील ब्रिटिश साईन लँग्वेजमध्ये सिंधुआज्जींच्या आरोपांचं खंडन करू लागला. खिमा आपण खाल्ला नसून आपली बहीण सुहासिनी हिने खाल्ला असं वक्तव्य त्याचा first line of defense होता.

हे सुहासिनीच्या कानावर पडलं, आणि तीही त्वेषाने वादात सामील झाली. सिंधुआज्जींच्या बिऱ्हाडात आज सर्वांचंच मौनव्रत होतं, त्यामुळे सुहासिनीसुद्धा ब्रिटिश साईन लँग्वेजमध्येच प्रतिपादन करत होती.

निद्रादेवीची आराधना करत असलेल्या पाणएलएमएलव्हेस्पाअल्फा पाणघोड्याची या हालचालींमुळे झोपमोड झाली. साईन लँग्वेज वापरण्यासाठी पुढचे पाय उचलणं ही पाणघोड्यांसाठी जिकीरीची गोष्ट असते. बिचारा पाणएलएमएलव्हेस्पाअल्फा आपल्या डोळ्यांतूनच व्यामिश्र व्याकूळता व्यक्त करत होता. "अब हम क्या कहे क्या सुने, जब दिल/ ऑंखे/ पंजे बाते करने लगे" असं त्याला वाटत असलं तरी त्याला काय व्यक्त करायचंय हे इतरांना कळत नव्हतं.

एवढ्यात शिकरण आणि (मधाची) पोळी खाऊन स्लाॅथ्या घरी परतला. धमासान चर्चा पाहून तो (मागच्या) दोन पायांवर उभा राहिला आणि (पुढच्या) दोन पायांनी शांततेचं आवाहन करू लागला. परंतु या गडबडीत तो ब्रिटिश साईन लँग्वेजऐवजी अमेरिकन साईन लँग्वेज वापरू लागला आणि त्यामुळे सुसंवाद प्रस्थापित होऊ शकला नाही.

लॅन्टर्नहेड ड्रायव्हरने मध्यस्थीचा प्रयत्न केला पण आतापावेतो परिस्थिती हाताबाहेर गेली होती.

Opposable thumbs वाल्या सिंधुआज्जी, जरा निराळे opposable thumbs असलेला लॅन्टर्नहेड, plantigrade स्लाॅथ्या, digitigrade तरस बल्बा आणि सुहासिनी, आणि पाणएलएमएलव्हेस्पाअल्फाला नैतिक पाठिंबा द्यायला आलेले पाणचेतक, पाणकब, पाणस्कूटी, पाणस्प्लेंडर, पाणटीव्हीएसचॅम्पओव्हाॅटअवेटूगेटकॅरिडअवे यांच्या एकसमयावच्छेदेकरून चालू असलेल्या करपल्लवी आणि नेत्रपल्लवीमुळे कोणालाही काहीही कळेना.

जैसे भडभुंजे निर्वात पोकळीत लाह्या भाजतात की निर्वात पोकळीत विद्युल्लतापात होतो तैसा येक नीरव कोलाहल जाहला.

काही क्षण असेच गेले. ते क्षण युगांसारखे भासले.

आणि अचानक मतलई वाऱ्याची झुळूक आली. सूर्यास्त झाला होता. मौनव्रताचा समय - आणि सिंधुआज्जींचा संयम - संपला होता. सिंधुआज्जींनी दीर्घ श्वास घेतला, आणि त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना मोठ्ठ्याने आदेश दिला - "खामोष!"

Node read time
2 minutes

ललित लेखनाचा प्रकार

2 minutes

'न'वी बाजू Mon, 20/11/2023 - 21:41

‘नीरव (निरव?) कोलाहल’, झालेच तर ‘निर्वात पोकळीत लाह्या भाजणारे भडभुंजे (तथा विद्युल्लतापात)’ प्रचंड आवडले.

एवढ्यात शिकरण आणि (मधाची) पोळी खाऊन स्लाॅथ्या घरी परतला.

‘कारण शेवटी आम्ही भटेच. त्याला काय करणार?’ – पु.ल.

काही संदर्भ मात्र काही केल्या लागले नाहीत. उदाहरणादाखल, लॅन्टर्नहेड ड्रायव्हर ही काय भानगड आहे?

(तसेच पाहायला गेले, तर तरस बल्बाचा संदर्भसुद्धा पूर्वापार लागला नव्हता, नि आजतागायत सोडून देत आलो होतो. आज कुतूहल अनावर झाल्याकारणाने गूगलले, तेव्हा कळले.

झालेच तर, ‘पाणघोडा’वरून ‘पाणचेतक’ सहज सुचले असावे, परंतु त्यावर मग ‘चेतकच काय म्हणून?’ असा विचार करून त्याला पाणएलएमएलव्हेस्पाअल्फामध्ये बदलण्यात आले असावे, असा एक अंदाज. (नाही म्हटले, तरी चेतक काय, किंवा एलएमएलव्हेस्पाअल्फा काय, दोन्ही शेवटी व्हेस्पाचीच क्लोने.) मात्र, त्या बाकीच्या पाणकब, पाणस्कूटी वगैरेंच्या मांदियाळीत तेवढी जर त्या (दिवंगत) पाणलँब्रेटाची आठवण काढली असतीत, तर अधिक बरे वाटले असते. असो चालायचेच.)

बाकी, तरस बल्बाच्या बहिणीचे ‘सुहासिनी’ हे नाव एकसमयावच्छेदेकरून रोचक तथा समर्पक आहे.

बाकी, संध्याकाळी मतलई वारे वाहतात, हे ठीक, परंतु, कोठेही? सिंधुआज्जी आणि त्यांचे यच्चयावत प्राणिमात्र बीचफ्रंटवर राहातात काय?

——————————

(एकंदरीत मात्र, ष्टोरीतील सिच्युएशन अशक्यकोटीतील आहे. टिपिकल देवदत्त.)

देवदत्त Tue, 21/11/2023 - 08:43

In reply to by 'न'वी बाजू

"मामाची बायको सुगरण, रोजरोज पोळी शिकरण" हा स्लाॅथ्याच्या आहाराचा संदर्भ आहे. त्यालाही कोणी मामी असतीलच ना?

लॅन्टर्नहेडची ओळख इथे: https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid02cmA4v5xyyeXDixvnqe56…

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 20/11/2023 - 22:20

:ड

'न'वी बाजू Wed, 22/11/2023 - 20:30

स्लॉथ्यावरून (बोले तो, स्लॉथ्या केवळ निमित्तमात्र!) एक जुनाच सरदारजी-विनोद आठवला.

एकदा एक सरदारजी अस्वलाची शिकार करण्यासाठी म्हणून नॅशनल पार्कात जायला निघतो. नॅशनल पार्काच्या प्रवेशद्वारातून थोडे आत गेल्यावर रस्त्याच्या कडेला त्याला एक पाटी (street sign) दिसते: BEAR LEFT.

‘हात् साला! आता काय उपयोग? माझे नशीबच *डू!’ म्हणून तो परत जायला निघतो.

'न'वी बाजू Wed, 22/11/2023 - 20:38

लॅन्टर्नहेड ड्रायव्हरने मध्यस्थीचा प्रयत्न केला पण आतापावेतो परिस्थिती हाताबाहेर गेली होती.

_/\_

देवदत्त Wed, 22/11/2023 - 22:57

In reply to by 'न'वी बाजू

हे सुहासिनीच्या *कानावर* पडलं

'न'वी बाजू Wed, 22/11/2023 - 23:11

In reply to by देवदत्त

हो, तेही लक्षात आले होते, खरे तर, परंतु सोडून दिले.

सर्व_संचारी Wed, 22/11/2023 - 21:17

भाडिपा सारख्या कोणीतरी सिंधुआज्जी सीरिज करायला हरकत नाही खरंतर ! सुहास जोशींना चांगला गेटअप केला तर त्या चांगल्या शोभतील सिंधुआज्जी ! किंवा छोट्या इंटिमेट थिएटर फॉर्ममध्ये आधी आणून पहायला हवी !

'न'वी बाजू Wed, 22/11/2023 - 23:10

In reply to by सर्व_संचारी

भाडिपा सारख्या कोणीतरी सिंधुआज्जी सीरिज करायला हरकत नाही खरंतर !

कल्पना वाईट नाही, खरे तर, परंतु व्यावहारिक अडचणी अनेक आहेत.

सुहास जोशींना चांगला गेटअप केला तर त्या चांगल्या शोभतील सिंधुआज्जी !

ठीक. सिंधुआज्जींच्या पात्राची सोय तर झाली. परंतु… स्लॉथ्या, तरस बल्बा तथा सुहासिनी, झालेच तर ती पाणएलएमएलव्हेस्पाअल्फा वगैरे मंडळी… त्यांचे काय? ती पात्रे कशी उभी करणार?

(आणि तसेही… एखाद्या चांगल्या लिखित आयटेमचे नाट्यरूपांतर केले, तर ते तितकेसे सरस निपजत नाही, असा अनुभव अनेकदा येतो. तेव्हा, उगाच रिस्क कशाला घ्या? नकोच ते!)

'न'वी बाजू Fri, 10/01/2025 - 02:03

(धागा वर आणण्याकरिता तथा जुने प्रतिसाद दृश्य करण्याकरिता.)