निर्मिती
उरात उरायला काहीही नाही.
ही खंत नाही, दिलासाही नाही.
एक निर्वात पोकळी मात्र, कसलं तरी नाव द्यावं म्हणून निर्वात पोकळी.
उर फुटेस्तोवर बघणं नाही, जगणं नाही, आणि मरणही नाही.
एक निर्जन रस्ता, की ज्याला दिशा नाही.
चित्रांचा माग काढत चित्रकार कधी सापडत नाही म्हणतात, चित्रांना तो मुक्त करतो, स्वतंत्र करतो आपल्यापासून, तसं हे आयुष्य, ज्याने कुणी दिलं, तो मोकळा झाला एकदाचं देऊन..
मागे वळून त्याने पाहिलं नाही की आपली निर्मिती कशी झाली, की त्याबद्दल कळवळा नाही.
बरं, नाही संबंध ठेवायचा तर संबंध निर्माण करावे तरी कशाला.
एका उमगण्यातून दुसरं काही उमगणं जसं होऊ शकत नाही, तसं एका संबंधातून दुसरा संबंध हरवून टाकला चित्रकाराने..
चित्रकाराने रंगांची ठेवण मात्र विलक्षण केली, मुक्त उधळण, हरवून जायला होते या निर्जन रस्त्यावर देखील.
उजाड पडलेली पोकळी उरावर बसलेली आहे आणि तिच्या जीर्णतेत शांतता नांदत आहे..