Skip to main content

त्या तिथे पलिकडे..

कधी अनायसे घडते, घडत जाते, ते तसं घडू नये, असेही वाटत नाही आणि ते तसंच का घडते आहे, असंही वाटत राहते..

परवा तह झाला तसं बोलणं बंद पडलं आहे. मनात चरा पडला आहे की नाही हेही अजून नीटसं कळलं नाही, पण बोलणं तर बंद आहे.

तशी वेळ आता त्याची बाहेर पडण्याची, आणि मी त्याला हलके मिठीत घेऊन निरोप देण्याची, पण निरोप आता असा अडखळून गेला आहे.

बंद झालंय बोलणं, पण मनातल्या मनात त्याच्याशी बोलणं तर चालूच आहे, त्यालाही असंच होत असणार का, कधीकाळी त्याने सांगितले होते, कुणावर नजर पडेल, कुणाशी स्पर्श होईल, कुणाला आपण आवडू हे सर्व पूर्वनिश्चितच असते, मग असंही आपलं बोलणं बंद पडलं हेही पूर्वनिश्चितच समजावं का..

ढगांनाही आजच जमायला आणि गडगडायला झालं, तो पावसाळी वातावरणात किती रूसून बसतो आणि माझ्या हस्तक्षेपाशिवाय त्याचा रूसवा निघतही नाही, हे ढगांना ठावूकच नाही.

रात्र सरावाने जात होती, पण आता सरायला नावच घेत नाही, इतकं कसं कुणी कुणाच्या सवयीचं होऊ शकतं‌..

चार वाजता पहाटे, गच्च मला जाग आली, तर त्याचाच एक निरोप येऊन पोहोचला होता,
_सकाळीच ये परत निघून.._ म्हणून!