माझ्या कॉलेजची अडीच महिन्यांची सुट्टी नुकतीच सुरू झाली होती. (माझा आतेभाऊ साडेदोन म्हणतो.) सकाळी असाच टाईमपास म्हणून पेपर वाचत बसलो होतो. क्लासिफाईड सेक्शन चाळताना अचानक एक जाहिरात दिसली:
"वरिष्ठ नागरिक महिलेला एका महिन्याच्या परदेश प्रवासासाठी सोबती हवा आहे. सर्व खर्च केला जाईल व योग्यतेनुसार मानधन दिले जाईल. साहसाची आवड असलेल्या तरुण-तरुणींना प्राधान्य दिले जाईल. पासपोर्ट आवश्यक. अर्ज करण्यासाठी आमच्या वकीलांशी संपर्क साधा: महापात्रा, महापात्रा, आणि महापात्रा. पोस्ट बॉक्स क्रमांक ..."
सुट्टीत नुसतंच घरी बसण्याऐवजी काहीतरी करायला मिळेल, आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे परदेशी जायची संधी मिळेल, म्हणून मी एक्साईट झालो होतो. अनघावहिनीची मदत घेऊन बायोडेटा बनवला आणि दुसऱ्याच दिवशी महापात्रा, महापात्रा, आणि महापात्रा यांना पत्र पाठवून दिलं.
आठवड्याभरात तिघांपैकी एका महापात्राचं पत्र आलं. टेलिफोनिक इंटरव्ह्यू झाला. मग झूम कॉलवर इंटरव्ह्यू झाला. झूम इंटरव्ह्यूला तिन्ही महापात्रा होते. त्यांचे अशील इंटरव्ह्यू घेणार नाहीत असं म्हणाले. (आधी मला वाटलं ते अश्लील म्हणताहेत. नंतर गूगल केल्यावर कळलं, अशील म्हणजे क्लायंट.) मग वैद्यकीय चाचणी झाली, आणि अखेरीस माझी निवड झाल्याचं पत्र आलं. त्यानंतर लवकरच व्हिसा, तिकीट वगैरे मिळालं, आणि एका प्रसन्न पहाटे मुंबईवरून विमान पकडून मी आदिस अबाबाला पोहोचलो.
आमच्या कुटुंबातच नव्हे तर अख्ख्या गावात आदिस अबाबाला पोहोचलेला मी पहिलाच होतो. माझी मामेबहीण न्यू यॉर्कमध्ये राहते, एक आतेभाऊ (साडेदोन म्हणणारा नाही - तो धाकट्या आत्याचा धाकटा मुलगा, हा मोठ्या आत्याचा मोठा मुलगा) इंग्लंडमधल्या - म्हणजे नुसत्याच - यॉर्कमध्ये राहतो. गावातले काहीजण बाकू, पॅराग्वे, ब्रुनेई अशा विविध ठिकाणी राहतात. पण आदिस अबाबाला पोहोचलेला मी पहिलाच.
आदिस अबाबा! अबब! काय तो एअरपोर्ट आणि काय ते शहर! माझ्या एम्प्लॉयरला भेटायला अजून एका दिवसाचा अवधी होता. मी शहर मनसोक्त भटकलो. उगाच खर्च होऊ नये म्हणून पायी किंवा बसनेच फिरलो. तिथले खाद्यपदार्थ चाखले. भरपूर भटकून आणि भरपेट खाऊन बसने हॉटेलला परतताना माझ्या डोक्यात अचानक विचार आला - या शहराचं इंग्रजीतलं नाव उलटं लिहिलं तर Ababa Sidda असं होईल. कदाचित सिद्दी हा शब्द यावरूनच तर आलं नसेल?
दुसऱ्या दिवशी, हॉटेलच्या तळमजल्यावरच्या रेस्तराँमध्ये ब्रेकफास्ट आटपून कॉफी पीत बसलो होतो. अचानक कॉन्सीअर्ज काऊंटरजवळच्या बॅगांमागून एक बाई अवतीर्ण झाल्या. त्या सिनियर सिटीझन आहेत हे कळत होतं, पण नेमकं वय सांगता आला नसतं. पेस्टल कलरचं पातळ, वर ब्राऊन बॉम्बार्डिअर जॅकेट, आणि कमरेला खोचलेला जुन्या पद्धतीचा आजीबाईचा बटवा अशा वेषातल्या त्या बाई माझ्या टेबलकडे आल्या आणि म्हणाल्या, "तुम्हांला भेटून आनंद झाला. मी तुमची एम्प्लॉयर. स्ट्रीट नेम आणि इन्स्टा हॅन्डल दलास्टब्राऊनहंटर. पाळण्यातलं नाव सिंधु बसराकर. यू मे कॉल मी सिंधुआज्जी!"
मी अचंबित झालो. म्हणजे पेपरमधल्या जाहिरातीत "वरिष्ठ नागरिक महिला" असा उल्लेख होता, पण माझ्या डोक्यात असलेल्या इमेजपेक्षा या आज्जी अगदीच निराळ्या होत्या. पण मला अधिक विचार करायची संधी न देता त्या म्हणाल्या,
"चला. आपल्या मोहिमेबद्दल माहिती सांगते."
"अलबत! तुम्हाला काय हा उन्हाळी सुट्टीतला छंदवर्ग वाटला की काय?" सिंधुआज्जी म्हणाल्या, आणि थोडं पाणी पिऊन त्यांनी पुस्ती जोडली, "म्हणजे तुम्ही साहसी नसाल तर ठीक आहे. सोबती म्हणून नका येऊ. मी एकटीच मोहिमेवर जाईन बापडी."
"तसं नाही. मी साहसी आहे. येईन तुमच्यासोबत," मी पटकन म्हणालो. सिंधुआज्जी तोंड भरून हसल्या आणि खुर्चीवर ठिय्या देऊन बसल्या.
"तुमचं निसर्गाबद्दल काय मत आहे?"
"विसर्ग? म्हणजे स्वतः या शब्दात त नंतर लिहितात तो?" मी विचारलं.
"विसर्ग नाही हो! निसर्ग."
"हो हो. निसर्ग. म्हणजे निसर्गाचं संवर्धन, संरक्षण, संगोपन वगैरे केलं पाहिजे."
"संगोपन नाही, पण ते जाऊद्या. भावना पोहोचल्या. बरं, तुम्हाला अफार ठाऊक आहे का?"
"रफार? म्हणजे पर्याय या शब्दात पहिल्या य वर काढतात तो?" न उमजून मी विचारलं.
"नाही. रफार नाही. अफार. हा इथिओपियाचा एक भाग आहे. इथल्या विशिष्ट भौगोलिक आणि भूगर्भीय घटकांमुळे इथे बरेच महत्त्वाचे जीवाष्म सापडतात."
"जीवाष्म म्हणजे?" परत एकदा, न उमजून मी विचारलं. न उमजणे हा अनुभव या आज्जींबरोबर बोलताना बऱ्याचदा येणार आहे असं मला वाटू लागलं होतं.
"आदिम काळातल्या वनस्पतींचे, पशुपक्ष्यांच्या हाडांचे, अगदी आदिमानवाच्या निरनिराळ्या प्रजातींच्या हाडांचे ठसे विशिष्ट प्रकारच्या दगडांमध्ये आढळतात. त्यांना जीवाष्म म्हणतात." सिंधुआज्जींनी व्याख्या सांगितली.
"हो. मी ट्विटरवर वाचलं होतं - The fossil is not the animal. The fossil is not the bones of the animal. The fossil is the stone’s memory of the bones of the animal. And that’s a poetry older than words. अर्थात, जीवाष्म म्हणजे प्राणी नव्हे, जीवाष्म म्हणजे प्राण्याच्या अस्थी नव्हेत, जीवाष्म म्हणजे प्राण्याच्या अस्थीबद्दल खडकांच्या आठवणी आहेत, आणि हे शब्दांपेक्षा आदिम काव्य आहे." या कणखर आज्जीबाई इतकं काव्यात्मक बोलतील असं मला तर वाटलं नव्हतंच, पण सिंधुआज्जीसुद्धा स्वत:च्याच बोलण्याने भारावून गेल्या होत्या.
"तर अफारचं काय?" मी विचारलं.
सिंधुआज्जी तंद्रीतून बाहेर येत म्हणाल्या,
“अफारची महती मोठी आहे. आदिमानवाच्या एका प्रजातीतील, ३२ लाख वर्षांपूर्वी राहणाऱ्या ल्यूसी नावाच्या स्त्रीचे जीवाष्म अफारमध्ये सापडले. माणसाच्या उत्क्रांतीचे महत्त्वाचे निष्कर्ष या जीवाष्मामुळे काढता आले. त्या प्रजातीचं नावदेखील "ऑस्ट्रेलॉपिथेकस अफारेन्सिस" असं ठेवण्यात आलं - अफारमध्ये सापडलेली प्रजाती म्हणून.”
"एक मिनिट! जीवाष्म सापडले हे ठीक आहे. पण त्या स्त्रीचं नाव ल्यूसी होतं हे कसं कळलं?"
"डोंबल! बत्तीस लाख वर्षांपूर्वी आदिमानव बोलतही नव्हते, नाव कसं ठेवणार? ल्यूसी हे नाव ते जीवाष्म शोधणाऱ्या शास्त्रज्ञांनी दिलं. त्या संध्याकाळी ते "ल्यूसी इन द स्काय विथ डायमंड्स" हे गाणं ऐकत होते म्हणून."
"म्हणजे ते शास्त्रज्ञ "नूरी आजा रे" हे गाणं ऐकत असते तर त्या जीवाष्माचं नाव नूरी ठेवलं असतं! असो. पण मोहीम कसली?"
"मला एक चिंतादायक खबर मिळाली आहे. इथिओपियाच्या शेजारच्या एका देशात एकजण नवीन धरण बांधत आहे. त्याच्या डिझाईनप्रमाणे धरण बांधलं तर नदीचा बदललेला प्रवाह आणि भूजलाची वाढलेली पातळी यांमुळे अफारमध्ये दलदल निर्माण होईल. लाखो वर्षं सुस्थितीत राहिलेले जीवाष्म नष्ट होतील. धरण बांधण्याची धारणा आणि धोरण चुकीचे नाहीत, पण पाण्याचा निचरा नीट होईल याची काळजी घेतली पाहिजे. तर मोहीम अशी, की धरण बांधण्याचा प्लॅन करणाऱ्याला भेटून त्याला सध्याच्या प्लॅनपासून परावृत्त करायचं!"
"चला तर! साम-दाम-दंड-भेद यांतील गरज लागेल ते वापरून आपण त्याला थांबवूया," मी उत्साहाने बोललो.
"उद्या जाऊ. तिथे जाण्यापूर्वी मला थोडी तयारी करावी लागेल. आता मी जाते, उद्या सकाळी इथेच भेटू आणि प्रयाण करू."
मी माझ्या हॉटेल रूमवर गेलो, ऑनलाईन डिक्शनरीत "प्रयाण" या शब्दाचा अर्थ बघितला आणि सुटकेचा सुस्कारा सोडला. पाच मिनिटं उगाच स्ट्रेसमध्ये आलो होतो.
थोड्या वेळाने मी पुन्हा शहर फिरायला बाहेर पडलो. घरी फोन करून खुशाली कळवली, काही जुजबी गोष्टी विकत घेतल्या, आणि संध्याकाळी परत हॉटेलवर परतलो. आपल्या एम्प्लॉयरची थोडी माहिती हवी म्हणून गूगल करायला सुरुवात केली, आणि थोडा चकितच झालो.
इंटरनेटवर सिंधुआज्जींबद्दल फारशी माहिती नव्हती. जी माहिती मिळाली ती खरी का काल्पनिक हे कळायचा काही मार्ग नव्हता, पण पेस्टल कलरचं पातळ, वर ब्राऊन बॉम्बार्डिअर जॅकेट, बटवा वगैरे वर्णन तर बरोबर होतं. इंटरनेटवर मिळालेल्या माहितीनुसार सिंधुआज्जी स्वतःच्या तराफ्यावरून समुद्रात प्रवास करत, आणि त्यांनी पाणघोडे आणि तरस पाळले होते. एवढंच नव्हे तर स्लॉथ्या नावाचं एक झिपरं अस्वल त्यांचा नेहमीच सहकारी होता. त्यांनी म्हणे ऑस्ट्रेलियातील कांगारूंचा अख्खा कळप औरंगाबादजवळच्या म्हैसमाळ पठारावर आणून ठेवला होता.
अशा वल्लीसोबत मोहिमेवर जायचं म्हणजे साहसी असणं आवश्यक होतंच.
दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून मी हेवरसॅक पॅक केली, आणि ब्रेकफास्टला गेलो. ब्रेकफास्ट आटपून मी कॉफी घेऊ लागलो तेवढ्यात सिंधुआज्जी अवतीर्ण झाल्या.
"सुप्रभात! मोहिमेसाठी तयार आहात का?"
"आय आय कॅप्टन!" मी खलाशांच्या भाषेत उत्तर दिलं आणि सिंधुआज्जी तोंड भरून हसल्या.
"एक महत्त्वाची गोष्ट. धरण बांधणाऱ्या व्यक्तीशी माझं बोलणं झालं. आपण त्याला भेटायला जातोय. पण कुठे ते आपल्याला कळू नये म्हणून तो त्याचा हस्तक पाठवून आपल्याला डोळ्यांवर पट्टी बांधून नेणार आहे," त्या म्हणाल्या.
"पण यात धोका नाही का?" मी विचारलं.
"धोका वगैरे सोड! गांधारीच्या आयुष्याचा, किंवा किमान अलिबाबाच्या गोष्टीतल्या शिंप्याला मर्जिनानं डोळ्यांवर पट्टी बांधून नेलं होतं त्याचा अनुभव मिळेल. मज्जा येईल!"
एवढ्यात काळा कोट आणि काळा गॉगल घातलेला एक उंचापुरा इसम आमच्या टेबलकडे आला. "सिंधुआज्जी, आय प्रिझ्युम?" असे विचारत त्याने सिंधुआज्जींना अभिवादन केले. काही मिनिटांतच आम्ही त्याच्या गाडीत डोळ्यांवर पट्ट्या लावून बसलो होतो. त्या पट्ट्या दिसू नयेत म्हणून वर गॉगल घातले होते. सिंधुआज्जी आलटूनपालटून "पिते दूध डोळे मिटूनी जात मांजराची" आणि "तैनू काला चष्मा जचता है" या गाण्यांच्या लकेरी घेत होत्या.
मजल दरमजल करून आम्ही कुठेतरी पोहोचलो. माझ्या डोळ्यांवरील पट्टी काढली तेव्हा काही क्षण माझे डोळे दिपून गेले. मी गाडीतून उतरलो आणि इकडेतिकडे पाहू लागलो. उंचापुऱ्या इसमाने आम्हाला पुढे दिसणाऱ्या तंबूत जाण्याची विनंती केली.
सिंधुआज्जी व मी तंबूत गेलो. एका टेबलापलीकडे एक मध्यम उंचीचा मध्यमवयीन मध्यमवर्गीय माणूस बसला होता. चेहऱ्यामोहऱ्याने मध्यपूर्वेचा - नाही, खरंतर युरोपियन वाटत होता. टेबलाअलीकडे दोन खुर्च्या होत्या, तिथे आम्ही बसलो. सिंधुआज्जी मला म्हणाल्या, "बोलायचं ते मी बोलीन. तुम्ही फक्त शांतपणे मनात टिप्पणं काढत बसा."
टेबलापलीकडचा माणूस हसून म्हणाला, "आपण मऱ्हाटी आहात वाटतं?"
मी अवाक झालो, आणि सिंधुआज्जींची सूचना विसरून बोललो, "तुम्हाला मराठी बोलता येतं?"
"अलबत! पुलंच्या "अपूर्वाई" मधला डायलॉग तंतोतंत म्हणून दाखवला तरी तुम्ही हा प्रश्न विचारता?"
मी काही बोलायच्या आधी सिंधुआज्जींनी संभाषणाचा कब्जा घेतला.
"धरण बांधून पाण्याचा प्रवाह बदलणार काय बच्चमजी? मी असं बिलकुल होऊ देणार नाही."
"तुमच्या धमक्यांना घाबरतोय काय? बारा गावचं पाणी प्यायलोय मी!"
"असेलही. पण माझं पाणी जोखलं नाहीये तुम्ही!"
"तुम्ही कोणीही असा हो. लाथ मारीन तिथे पाणी काढायचा आत्मविश्वास आहे माझा!"
"तुम्हाला पाणी पाजीन तरच नावाची सिंधुआज्जी!"
टेनिस मॅचच्या व्हॉलीसारखा हा सामना मी अवाक होऊन ऐकत होतो.
दोघेही क्षणभर गप्प बसले तेव्हा मी विचारलं, "पण तुम्ही मराठी कसं बोलता?"
"उत्तम बोलतो. आत्ता पाहिलंत की तुम्ही!"
"तसं नव्हे. मराठी शिकायची संधी तुम्हाला कशी मिळाली?"
युरोपियन चेहऱ्यामोहऱ्याच्या माणसाने एक दीर्घ श्वास घेतला. टेबलावरच्या थर्मासमधून त्याने तीन कपांत चहा ओतला, आणि आम्हांला चहा देऊन तो बोलू लागला.
"तुम्हाला रुडयार्ड किपलिंग माहीत आहे ना? "जंगल बुक"चा लेखक. त्याचा जन्म मुंबईत झाला होता. मी लहानपणापासून किपलिंगच्या कथांची पारायणं केली होती. त्याच्या कथावस्तूंनी मी भारावून गेलो होतो. त्याच्या आयुष्यातल्या घटना घडल्या त्या जागा स्वत: बघायच्या असा मी निश्चय केला. मुंबईत आलो आणि काही वर्षं तिथलाच रहिवासी झालो. तिथल्या खाद्यसंस्कृतीशी, भाषेशी तादात्म्य पावलो."
"तादात्म्य म्हणजे?" न उमजून मी विचारलं. हा माणूस सिंधुआज्जींचा जत्रेत हरवलेला भाऊ आहे का असा विचार माझ्या डोक्यात घोळू लागला.
युरोपियन चेहऱ्यामोहऱ्याच्या माणसाने टेबलचा ड्रॉवर उघडला आणि तिथले सहा वडापाव टेबलवर ठेवले. "आता कळलं तादात्म्य म्हणजे काय?" तो हसून म्हणाला.
पुढची काही मिनिटं आम्ही तिघांनीही शांतपणे वडापाव आणि चहाचा आस्वाद घेतला.
"तुम्ही सज्जन आणि सहृदय दिसता. मग धरणं बांधून पाणी का चोरता?" चहाचा शेवटचा घोट घेऊन मी विचारलं.
"कंडिशनिंगचा भाग. लहानपणापासून हेच कानावर पडत गेलं, आणि मी असा झालो."
"म्हणजे?" न उमजून सिंधुआज्जींनी विचारलं.
"बालमंदिरातच मी शाळूसोबत्यांच्या वॉटरबॅगांमधलं पाणी चोरायचो. थोडा मोठा झालो तेव्हा बिस्लरीच्या बाटल्यांमधलं पाणी चोरू लागलो. मग हळूहळू क्षितिजं विस्तारात गेली. पाण्याचे ड्रम, टँकर, विहिरी, अशी माझी प्रगती झाली. खरंतर प्रगती का अधोगती ते ठाऊक नाही," तो खिन्नपणे म्हणाला.
"पण यात कंडिशनिंगचा काय संबंध? लहानपणापासून कानावर काय पडत गेलं?"
"माझं नाव! तसं माझं पाळण्यातलं नाव रॉबर्ट आहे, पण त्याचा शॉर्टफॉर्म रॉब असा झाला. आईबाबा मला लहानपणापासूनच रॉब अशी हाक मारत. त्याऐवजी बॉब अशी हाक मारली असती तर कदाचित माझ्या आयुष्याला वेगळं वळण लागलं असतं. पण दोष त्यांचा नाही. बालमंदिरातच जाऊ लागलो तेव्हा शिक्षिका मला आडनावासह हाक मारत - रॉब वॉटर्स! माझ्या मुग्ध मनाला ती आज्ञा वाटली, आणि मी शाळूसोबत्यांच्या वॉटरबॅगांमधलं पाणी चोरू लागलो. पुढचा इतिहास तुम्हाला ठाऊकच आहे."
"म्हणजे, रॉब वॉटर्स हे तुमचं नाव आहे त्यामुळे तुम्ही पाणीचोर झालात?"
"हो. पण पाण्याखेरीज मी काहीही चोरलं नाही. पाण्याचे ड्रम, टँकर, विहिरी वगैरे चोरायचो तेव्हाही रिकामे ड्रम, टँकर, विहिरी स्वखर्चाने परत पाठवायचो. आता तुम्ही आस्वाद घेतला ते चहा आणि वडापावही कष्टाच्या कमाईचे होते, निढळाच्या घामाचे होते," रॉब म्हणाला.
"पण आतातरी हा धरणाचा आततायी विचार सोडा. तुम्ही धरण बांधलंत तर नदीचा प्रवाह बदलेल. तुम्हाला गरज आहे त्यापेक्षा अधिकचं पाणी अफार प्रदेशात जाईल. तिथल्या माणसांचे तर हाल होतीलच, आणि तिथे लाखो वर्षं जतन झालेले जीवाष्मही नष्ट होतील." सिंधुआज्जी कळकळीनं म्हणाल्या.
"तुम्ही म्हणताय त्यात तथ्य आहे. पण माझा नाईलाज आहे. पाण्याच्या चोरीचं एकवेळ सोडा, पण धरण बांधण्यासाठी मी पैसे घेतले आहेत, शब्द दिला आहे. चोरों के भी उसूल होते हैं!"
साम म्हणजे सामोपचाराचा मार्ग खुंटला होता. दाम म्हणजे पैसे देण्यासाठी सिंधुआज्जी बहुधा एवढ्या श्रीमंत नसाव्यात. भेद म्हणजे प्रतिस्पर्धी टीममध्ये फूट पाडण्यासाठी रॉबचे कोणी महत्त्वाचे सहकारी असल्याचं दिसत नव्हतं. राहिला दंड म्हणजे धाकदपटशा. पण रॉबच्या टेबलवर एक पिस्तूल होतं आणि आम्ही निःशस्त्र होतो. साम-दाम-दंड-भेद काहीच पर्याय दिसत नव्हते. सिंधुआज्जींनी सुस्कारा सोडला आणि आम्ही दोघं तंबूबाहेर पडलो.
उंचापुऱ्या इसमाने आम्हांला पुन्हा आदिस अबाबामध्ये सोडण्याची तयारी दर्शविली, आणि सिंधुआज्जींनी त्याला रुकार दिला. डोळ्यांना पट्ट्या बांधून आम्ही परतलो.
"आता रॉब वॉटर्सला कसं शोधायचं?" मी विचारलं.
'सोपं आहे!" सिंधुआज्जी म्हणाल्या. "तू हॅन्सेल आणि ग्रेटेलची गोष्ट वाचली होतीस ना?"
"म्हणजे? तुम्ही परतीच्या प्रवासात चपटे दगड किंवा ब्रेडचे तुकडे रस्त्यात फेकत होतात?" मी अवाक झालो होतो.
"नाही. उंचापुऱ्या इसमाच्या गाडीत मी दिशादर्शक उपकरण ठेवलं आहे. माझ्या सॅटेलाईट फोनने मला त्या उपकरणाचे अक्षांश-रेखांश कळू शकतात."
"पण यात हॅन्सेल आणि ग्रेटेलचा काय संबंध?"
"काहीच नाही. ते मी सहज गप्पा मारायला म्हणून विचारलं," सिंधुआज्जी हसत म्हणाल्या.
पुढचे काही दिवस सिंधुआज्जी एकट्याच कुठेतरी गायब व्हायच्या. काही विचारलं तर, मोहिमेची तयारी करताहेत एवढंच मोघम सांगायच्या. शेवटी न राहवून मी त्यांना विचारलं, "नेमकं काय करणार आहात तुम्ही?"
सिंधुआज्जींनी आपला लस्सीचा ग्लास एका घोटात संपवला, लस्सीची पांढरी मिशी पुसली, आणि त्या बोलू लागल्या.
"प्रतिस्पर्ध्याचा काटा काढायचा असेल तर त्याच्यासारखा विचार करायला शिकलं पाहिजे. रॉब वॉटर्सच्या बाबतीत सांगायचं झालं तर, त्याच्या आयुष्यावर कोणाचा प्रभाव पडला आहे?"
"रुडयार्ड किपलिंगचा," मी उत्तर दिलं.
"बरोब्बर! म्हणून गेले काही दिवस मी आदिस अबाबा सार्वजनिक ग्रंथसंग्रहालयात जाऊन किपलिंगच्या सगळ्या पुस्तकांची पारायणं केली. त्यातूनच एक क्लृप्ती सुचली. मग तिची अंमलबजावणी करण्याची तयारीही झालीय. उद्या सकाळी आपण कूच करूया!"
दुसऱ्या दिवशी हॉटेलच्या पोर्चमध्ये एक उघडी जीप उभी होती, आणि ड्रायव्हरच्या जागेवर दस्तुरखुद्द सिंधुआज्जी बसल्या होत्या. काही तास प्रवास करून आणि बॉर्डर गार्ड्सना गुंगारा देऊन आम्ही शेजारच्या देशाच्या हद्दीत शिरलो, आणि अजून तासाभरात धरणाजवळ पोहोचलो. रॉब वॉटर्सने धरणाचे बांधकाम अगदी युद्धपातळीवर केले होते.
सिंधुआज्जींनी गाडी थांबवली, बॉम्बार्डिअर जॅकेटच्या खिशातून किंडल पेपरव्हाईट काढला, आणि त्या रुडयार्ड किपलिंगच्या पुस्तकातला उतारा वाचू लागल्या:
“And the Lord of the Jungle was Tha, the First of the Elephants. He drew the Jungle out of deep waters with his trunk; and where he made furrows in the ground with his tusks, there the rivers ran; and where he struck with his foot, there rose ponds of good water; and when he blew through his trunk, —thus, —the trees fell. That was the manner in which the Jungle was made by Tha; and so the tale was told to me.”
माझ्याकडे पाहून विजयी मुद्रेने त्यांनी विचारलं, "कळलं ना?"
मी मान हलवली. "नाही, काहीच कळलं नाही."
"धरणाच्या जलाशयात मावणार नाही ते पाणी इथल्या चढउतारांमुळे अफारला जाईल. पण त्याऐवजी आपण इथे चर, कालवे, नद्या खणल्या तर ते पाणी इतर ठिकाणी जाईल. तिथली जमीन सुजला सुफला होईल, आणि अफारमधले जीवाष्मसुद्धा शाबूत राहतील."
"उत्तम कल्पना आहे! पण ते चर, कालवे, नद्या खणायला यंत्रसामुग्री आणावी लागेल ना?" मी विचारलं.
"हात तुझी! किपलिंगचा उतारा एवढ्यात विसरलास?" सिंधुआज्जी हसल्या आणि बॅकपॅकमधून वुवुझेला वाद्य काढून कर्णकर्कश शिट्या फुंकू लागल्या. जणू त्यांच्या शिट्ट्यांना उत्तर म्हणून दक्षिणेकडून तुतारीसारखे आवाज येऊ लागले. सिंधुआज्जींनी वुवुझेला वाद्य बॅकपॅकमध्ये ठेवून दिले आणि त्या गाऊ लागल्या "एक तुतारी द्या मज आणुनी, फुंकीन मी जी स्वप्राणांनी"
दक्षिणेकडील झाडांतून काही काळेकरडे आकार दिसू लागले. तो आफ्रिकन आणि आशियाई हत्तीचा संयुक्त कळप होता. ते हत्ती आमच्याच दिशेने कूच करत होते.

हत्तींचा संयुक्त कळप (चॅट जीपीटीच्या संयुक्त विद्यमाने)
सिंधुआज्जी सांगू लागल्या,
"जमिनीत चर खणण्यासाठी तीक्ष्ण सुळे असलेले हत्तीच हवे होते. सुळ्यांना टस्क म्हणतात, म्हणून अशा हत्तींना टस्कर म्हणतात. निरनिराळ्या देशांतून असे हत्ती इथे आणायचे, म्हणजे आधी हत्तींचं स्मगलिंग करणारे टस्करतस्कर शोधावे लागले. म्हणून मोहिमेला अंमळ उशीर झाला. पण आता सर्व ठीक होईल."
हत्ती जवळ आले. सिंधुआज्जींनी त्यांना काहीतरी सूचना दिल्या, आणि सर्वजण (म्हणजे फक्त हत्ती - सिंधुआज्जी आणि मी नव्हे) सुळ्यांनी जमिनीत चर खोदू लागले. चर खोदून झाला इतक्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. लवकरच धरणाचा जलाशय भरला, आणि अधिकचं पाणी सिंधुआज्जींच्या प्लॅननुसार चरातून अफारच्या विरुद्ध दिशेने वाहू लागलं.
पाऊस थांबेपर्यंत सिंधुआज्जी मला आफ्रिकन आणि आशियाई हत्तींमधला फरक समजावून सांगत होत्या. यथावकाश पाऊस थांबला, आणि हत्तीचा कळप निघून गेला.
"आता परतूया," मी म्हणालो. पण एक अडचण होती. आम्ही ज्या दिशेने आलो तिथे आता हत्तींनी खोदलेली नदी होती, आणि दुसऱ्या दिशेला जाणाऱ्या रस्त्यालगतच्या झाडावर मधमाशांचं प्रचंड पोळं होतं. तिथून जाणं म्हणजे जीवावर बेतणारं संकट होतं.
"आयडीया!" मी म्हणालो. "किपलिंगच्या पुस्तकात, "रेड डॉग" या गोष्टीत लिहिलंय - शरीराला लसूण फासला तर मधमाश्या चावत नाहीत."
"खरंय," सिंधुआज्जी म्हणाल्या "पण इथे आडरानात लसूण कुठे मिळणार? आणि आफ्रिकेतल्या मधमाश्यांना लसूण आवडत असेल तर?"
मी किंकर्तव्यविमूढ झालो होतो. पण सिंधुआज्जी मात्र शांत होत्या. त्यांनी सॅटेलाईट फोनवरून एक फोन केला, आणि दुसऱ्या महायुद्धात जीप हे किती महत्त्वाचं वाहन होतं याबद्दलची माहिती मला ऐकवू लागल्या.
अर्धा तास गेला. आकाशात कसलासा आवाज आला. एक छोटं विमान घिरट्या घालत होतं. आणि मग विमानातून एक पॅराशूट खाली येऊ लागलं. कोण येतंय ते आधी नीटसं दिसत नव्हतं. ती आकृती थोडी खाली आल्यावर मी दचकून ओरडलो, "अस्वल!"
"अस्वल नाही म्हणायचं त्याला! माझा स्लॉथ्या आहे तो!" सिंधुआज्जी सात्त्विक संतापाने म्हणाल्या.
एकदोन मिनिटांतच स्लॉथ्या जमिनीवर पोहोचला. मी पॅराशूटच्या दोऱ्या सोडवल्या, आणि सिंधुआज्जींना अभिवादन करून स्लॉथ्या मधमाशांच्या पोळ्याच्या दिशेनं पळाला. पुढची काही मिनिटं स्लॉथ्या आणि मधमाश्या यांच्यात तुंबळ युद्ध झालं, आणि अखेरीस स्लॉथ्या विजयी मुद्रेनं परतला.
आमचा मार्ग आता सुकर झाला होता. मजल दरमजल करत आम्ही आदिस अबाबाला पोहोचलो, आणि मग - इथिओपियन एअरलाईनने अस्वलाला तिकीट देण्यास नकार दिल्याने - चार्टर प्लेनने मुंबईला परतलो.
एक महिना पूर्ण झाला होता. सिंधुआज्जींचा निरोप घ्यायची वेळ झाली होती. त्यांनी मला पन्नास हजार रुपये मानधन देऊ केलं, पण माझ्या विनंतीनुसार, पैसे देण्याऐवजी या मोहिमेची कथा लिहायची परवानगी आणि कथेचे सर्वाधिकार मला द्यावेत असा सौदा ठरला.
प्रिय वाचकांनो, हा सौदा फायदेशीर ठरणार का आतबट्ट्याचा याचा निर्णय आता सर्वस्वी तुमच्या हाती आहे.
साष्टांग लोटांगण!
ही आख्खी कथा एकटाकी – आणि त्यातही, कोठल्याही मादक वा उत्तेजक द्रव्याचे सेवन न करता – लिहिलेली असल्यास, आपल्या प्रतिभेस नमन! त्रिवार वंदन!
——————————
सर्वप्रथम (फर्स्ट थिंग्ज़ फर्स्ट):
या सर्व ठिकाणी फुटलो!
अच्छा! म्हणजे, जलाशय भरला, तो मुसळधार पावसामुळे तर. (अगोदर, ‘धरणाचा जलाशय भरण्या’वरून काही वेगळीच शंका आली होती. (विशेषेकरून, अगोदर ‘सुळ्यां’चा उल्लेख आला, म्हटल्यावर.) परंतु, नंतर उलगडा झाला.)
परंतु, आहे हे असेच चांगले आहे. स्वच्छ, निर्मळ विनोद आहे, तोच बरा आहे – उगाच राजकारणातली घाण नको! काय?
एकंदरीत, (अपेक्षेप्रमाणेच) भारी कथा आहे. मजा आली!