Skip to main content

अविचारांची सरशी (उत्तरार्ध)

रूढी व परंपरा
अविचाराच्या उत्कर्षात रूढी - परंपरांच्या मानसिकतेचा फार मोठा वाटा आहे. आपल्या मनाच्या कोपर्‍यात ‘आहे तसे राहू दे, चित्ती असू दे समाधान’ हे कुठे तरी दडलेले असते. यासाठी भांडवलशाही व्यवस्था फार चांगले साधन ठरत आहे. या व्यवस्थेत बाजारालाच सर्व अधिकार दिल्यामुळे आपण वेगळे काही करण्याची गरज नाही, याची आपल्याला खात्री असते. त्यामुळे आपण हात-पाय हलवायचे नाही, विरोधात बोलायचे नाही, कुठल्याही गोष्टीला आक्षेप घ्यायचा नाही, स्वतःचे नुकसान झाले तरी व्यापकहिताचे भान ठेवत राग मानायचे नाही, ही पथ्ये या व्यवस्थेत पाळली जातात. त्यामुळे डाव्या विचारसरणीच्या वा क्रांती-बिंतीच्या भानगडीत पडायचे नाही, असे आपल्याला वाटत असते. कातडी बचाव धोरणाची नेहमीच सरशी होत असते. मुळात विचार करून कृती करण्याच प्रश्न येथे उद्भवत नाही. याचा अर्थ रुढीवादी ‘ढ’ वा ‘मठ्ठ’ आहेत असे नाही. मुळात शहाणपणा व समाजात टिकून राहणे, यांचा संबंध फार गुंतागुंतीचा असू शकतो. आपली विशिष्ट मतं समाजाला आवडत नसल्यास ती काही वेळा बाजूला ठेवण्यातच शहाणपणा असतो. डावीकडे झुकणारे मुळात त्यांच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे कमी बुद्धिवंत असतात, असे ढोबळमानाने म्हटले जात आहे. त्याचप्रमाणे जास्त बुद्ध्यांक असणार्‍यातील सुमारे 20 टक्के डाव्या विचारांचे किंवा उदारमतवादी असतात.
मुळात विचार करण्याची सवय नसलेल्यांचा व विचार करण्यास विरोध करणार्‍यांचा आहे त्याच स्थितीतच राहण्याकडे कल असतो. तद्विरुद्ध राजकीयदृष्ट्या परिपक्व असलेले कुठल्याही गोष्टीचे विश्लेषण करून आपली मतं बनवतात. डाव्या राजकारणात विचार करण्याची सक्ती असते; त्यात अंतःप्रेरणांना वाव नसतो. त्यामुळे अंतःप्रेरणेला वाव असलेल्या रूढीवादी राजकारणाला जास्त पसंती मिळते. म्हणूनच सुमारे 80 टक्के जनता नेहमीच रूढीवादी, परंपरावादी, उजव्या राजकारणाचा ‘उदो-उदो’ करत असते. त्यांच्यावर मतांचा वर्षाव करून निवडून देते. तरीसुद्धा मुंगीच्या पावलाने का होईना अपेक्षित विकास होताना दिसत आहे, हेही नसे थोडके!
ट्रायबॅलिझम
‘मॅनवॉचिंग’ आणि ‘नॅकेड एप’ या 20 व्या शतकाच्या उत्तरार्धात गाजलेल्या पुस्तकाचे लेखक डेस्माँड मॉरिस हे मानववंशशास्त्रज्ञही आहेत. त्यांची इतर पुस्तकेही भरपूर गाजलेली आहेत. असेच एकदा इंग्लंडमधील फुटबॉल मॅचच्या वेळी त्या मैदानातील प्रेक्षकांची उत्कंठा, टोकाचे भावप्रदर्शन, क्षुल्लक कारणासाठी हमरी-तुमरीवर येणे, तुफान हाणामारी इत्यादी गोष्टी बघितल्यावर त्यांनी ‘सॉकर ट्राइब’ नावाचे एक पुस्तक लिहिले. या पुस्तकात त्यांनी युरोपमधील वेगवेगळे फुटबॉल क्लब्स म्हणजे एकेकाळच्या आदिमानवांच्या टोळीसदृश टोळ्या आहेत, असे निष्कर्ष काढले. या सर्व क्लबमधील सॉकरच्या खेळाच्या वेळचे वर्तन हे मानवी उत्क्रांतीशी संबंधित असून ज्या प्रकारे आपले पूर्वज टोळी करून राहत होते; प्रसंगी स्वतःच्या टोळीसाठी प्राण पणाला लावत होते, तीच मानसिकता अजूनही शिल्लक आहे याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला आहे.
एखाद्यामध्ये टोळीची मानसिकता व शत्रुत्वाची भावना यांचे उद्दीपन करण्यास फार कष्ट पडत नाहीत. 20-25 जणांच्या समूहातील 10-12 जणांची दोन गटात विभागणी करून एखादे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची स्पर्धा ठेवल्यास टोळीची मानसिकता ठळकपणे दिसेल, असा तज्ज्ञांचा कयास आहे. आपापल्या गटातील प्रत्येक जण काही कालावधीत एकरूप होऊन काम करू लागतो, त्या गटातील इतरांशी सौजन्याने वागतो, ऋणानुबंध असल्यासारखे मदतीला धावतो. त्याचवेळी विरुद्ध गटाकडे वैरत्वाच्या भावनेने पाहू लागतो. विरुद्ध गटाबद्दल उणे-दुणे बोलणे, शिवीगाळ करणे, मारामारी करणे इथपर्यंत त्यांची मजल जाऊ शकते. हे वैरत्व जोपर्यंत अजून एखादा काल्पनिक वा प्रत्यक्ष वैरी दिसत नाही, तोपर्यंत टिकून राहते. काहीही कारण नसताना ‘ते’ आणि ‘आम्ही’ हा संघर्ष येथे बघावयास मिळतो. खरे पाहता आताच्या जागतिकीकरण झालेल्या आधुनिक जगासाठी अशा प्रकारचे जमातीकरण सोयीस्कर ठरू शकते. कारण स्पर्धात्मक जगात पुढे जाण्यासाठी एखादा गट दुसर्‍या गटावर मात करून काही उपयुक्त सुविधा निर्माण करत असल्यास ते समाजाला उपयोगी ठरेल. परंतु या ‘ट्रायबॅलिझम’मध्ये सर्जनशीलतेपेक्षा वंशविद्वेष, अपरिचित विषयीचे भयगंड व आपापसातील हेवेदावे प्रकर्षाने जाणवतात.
परंतु अशा प्रकारच्या नकारात्मक गोष्टीवर आणि ‘ते’ व ‘आम्ही’ या प्रवृत्तीवर मात करणे अशक्यातली गोष्ट नाही. फुटबॉल क्लब्सच्या फॅन्सचेच उदाहरण घेतल्यास इंग्लंडमध्ये मॅच असताना एकमेकांचा जीव घेण्याचा पवित्रा घेणारे इटली वा अर्जेंटिनाबरोबरच्या राष्ट्रीय पातळीवरील अटीतटीच्या मॅचमध्ये सर्व क्लब्सचे फॅन्स एकत्र येऊन आपल्या टीमला उत्तेजन देत आहेत, हे चित्र दिसेल. हा ‘ट्रायबॅलिझम’ क्रीडा क्षेत्रात यशस्वी होत असल्यास इतर क्षेत्रात यशस्वी का होत नाही, हा प्रश्न आपल्यासमोर आहे. कदाचित भावनेच्या भरात विवेकी विचार व त्याप्रमाणे कृती होत नाहीत म्हणूनच ‘ट्रायबॅलिझम’ची मानसिकता अजूनही डोके वर काढत आहे.
परमेश्वराचा अधिक्षेप
परमेश्वरानेच जर मानवी मेंदूची निर्मिती केलेली असल्यास ही निर्मिती तद्दन तकलादू व सुमार दर्जाची आहे असे म्हणता येईल. मनात उडणारा गोंधळ, पूर्वग्रहदूषित दृष्टी, ढीम्मपणा, आलस्य, निरुत्साह यासारख्या गोष्टींची रेलचेल, शरीराच्या देखभालीसाठी सक्तीची आठ तासाची विश्रांती, ऐषारामी जीवन जगण्यासाठी कराव्या लागणार्‍या करामती, शरीराची काळजी व ती कुठल्याही क्षणी बिघडण्याची शक्यता इत्यादीमुळे परमेश्वराचे हे उत्पादन तकलादू म्हणून परत पाठवण्याच्या लायकीचे आहे. असे कित्येक गुण-दोष असले तरी या मेंदूचे एक वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म म्हणजे देव/देवीवरील अदम्य विश्वास (श्रद्धा) असे म्हणता येईल.
आतापर्यंत जे कोणी या पृथ्वीवर जगले असतील, त्यातील प्रत्येकाने कुठल्या ना कुठल्या तरी देव/देवतावर (काही काळापुरते का होईना) श्रद्धा ठेवली असेल, यात शंका नाही. आजच्या ऐहिक सुखोपभोगाच्या कालखंडातसुद्धा परमेश्वरावर विश्वास न ठेवणार्‍या नास्तिकांची संख्या तुलनेने अगदीच तुरळक आहे. कारण नास्तिकतेसाठी विचार करण्याची पूर्वअट असते; तसे आस्तिकांसाठी बंधन नाही. काही वेळा बुद्धिवंत नास्तिकसुद्धा परमेश्वराला नाकारत असला, तरी जगात अलौकिक शक्ती असू शकते, याविषयी तावातावाने चर्चा करत असतो, तेव्हा अलौकिक शक्तीचे मूर्तिमंत उदाहरण असलेल्या परमेश्वरावर श्रद्धा ठेवणारा आस्तिक किस झाडकी पत्ती!
या विषयावरील अभ्यासक नेहमीच आपल्या मेंदूत परमेश्वरानेच खास स्वतःसाठी एखादी पोकळी (God's hole) तयार करून ठेवलेली असावी, असे चेष्टेच्या स्वरात आपापसांत बोलत असतात. जर आपल्याला अगदी लहानपणापासूनच देव-धर्माविषयीची अगदी बारीक-सारीक गोष्टीसुद्धा या पोकळीत संग्रहित होत असतात. एक अदृश्य शक्ती या पोकळीवर कायम नजर ठेवत असते व आपल्या दैनंदिन व्यवहारात अधिक्षेप करत परमेश्वरावरील श्रद्धा दृढ करत असते आणि नैतिकतेविषयी निर्णय घेत असते, असे काही सांगत असल्यास त्याबद्दल काहीही विचार न करता त्यावर आस्तिकांचा विश्वास बसतो. आपल्या जीवनातील घडामोडींची ही अदृश्य शक्तीच नियंत्रण करत असते, या विधानावर त्यांचा पूर्ण विश्वास असतो.
खरे पाहता हा काही ‘ब्रेन वाशिंग’चा प्रकार नाही. गेली हजारो वर्षांपासून मानवी प्राण्यात जाणिवा उत्क्रांत होऊ लागल्या, तेव्हापासून धर्मश्रद्धा हे जाणिवांचे एक उपउत्पादन म्हणून मानवाची साथ देत आहे. या उपउत्पादनामुळे प्रत्येक घटनांचा एखादा सूत्रधार असतो; रानातील पानं वार्‍यानेच हलतात, असे नसून एखाद्या नरभक्षक प्राण्यापासून माणसाचे रक्षण करण्यासाठीची अदृश्य शक्तीने केलेली तरतूद असे काही तरी त्याच्या डोक्यात भरलेले असते. कदाचित वार्‍यापासून दूर पळून गेलेल्यांचे जीव वाचल्यामुळे तीच जनुकं पुढच्या पिढीत उतरली असतील व परमेश्वरावरील श्रद्धा दृढ होत गेली असेल.
पुढील काळात मानसशास्त्र जसजसे उत्क्रांत होत गेले, तसतसे कोणीही समोर नसतानासुद्धा त्यांची मानसिक अवस्था व त्यांच्या अपेक्षा यांचा अचूक अंदाज करणे शक्य झाले. मानवी मनाचा वेध घेण्याचे कौशल्य प्राप्त झाले. या कुशलतेमुळे एक समूह म्हणून एकत्रपणे राहण्यास फार मोठी मदत मिळाली; परंतु हीच कुशलता काही अदृश्य वा अवास्तव कल्पनांनासुद्धा भावनेच्या आहारी देऊ लागली. धर्माचा प्रभावसुद्धा याच भावनेचाच भाग असून त्यामुळे आपल्या पूर्वजांना भावनिक सुरक्षितता मिळण्यास मदत मिळाली असेल. धर्माच्या शिकवणीतून अनपेक्षित वा मानवी नियंत्रणाबाहेरील घटना, जन्म-मृत्यूबद्दलचे गूढ, नैसर्गिक प्रकोपाच्या प्रसंगी होणारे अकाली मृत्यू इत्यादीमधून होणार्‍या भावनाकल्लोळापासून माणूस मुक्त झाला. सर्व काही देवाची अगाध लीला हे मनावर कोरण्यात धर्म यशस्वी होऊ लागले. आपला सांभाळ करणारा कोणीतरी आकाशात आहे, मृत्यू हा अस्तित्वाचा शेवट नाही, आयुष्यभरातील सर्व गोष्टींचा कार्यकारण भाव मांडता येऊ शकतो इत्यादी गोष्टींवर धर्मांचा भर असल्यामुळे माणसातील जाणिवा विकसित होऊ लागल्या, विचार करणे शक्य होऊ लागले.
हीच धर्मसंकल्पना समाजातील वेगवेगळ्या ठिकाणी वसलेल्या अपरिचित गटांना एकसंध ठेवण्यास कारणीभूत ठरली. मानवी संस्कृतीच्या संवर्धनासाठी धर्मसंकल्पना आधारभूत ठरली. अजूनही याच धर्मसंकल्पनेच्या आकर्षणात तसूभरही कमी झालेली नाही. धर्मासाठी युद्धं खेळली गेली. लाखोंची हत्या झाली. देव-धर्म यांचे स्तोम माजवत अनेकांनी जनसामान्यांना लुटले. विज्ञानानंसुद्धा या धर्मसंकल्पनेसमोर हात टेकले.
परंतु आता ही धर्मसंकल्पना निरुपयोगी ठरत आहे. दहशतवाद, दंगली, विद्वेष, यांचे मूळ या धर्मात आहे, याची जाणीव होत आहे. धर्मसत्ता व राजसत्ता यांची फारकत केल्याविना खर्‍या अर्थाने मानवाची प्रगती होणार नाही, याबद्दल ठिकठिकाणी चर्चा चालू आहे. धर्माचे अवडंबर ही अविचारी कृती आहे, याबद्दल जनजागृती होत आहे. नास्तिकतेचा विचार समाजात रुजल्यास या धर्मसंकल्पनेवर मात करणे शक्य होईल व माणूस विवेकी होत-होत विचार करून कृती करण्यास प्रवृत्त होऊ शकेल; परंतु यास नक्कीच भरपूर वेळ लागेल.
सूडबुद्धी
सूडबुद्धीने वागणे कदाचित जगभरातील सर्व समाजामध्ये आढळणारा गुणविशेष आहे. शिकारी अवस्थेत असताना तर सूड घेणे हेच एक प्रमुख कार्य असल्यासारखा समाज वागत होता. सर्व समाजामध्ये सूड घेण्याची कारणंसुद्धा - खून, मारामारी, चोरी, लैंगिक अत्याचार, व्यभिचार, अपमानाचा बदला इ. इ. - जगभर समान होत्या. आपल्या टोळीतील एखाद्यावर अन्याय होत असल्यास ‘अ‍ॅन आय फॉर अ‍ॅन आय’ या नियमाप्रमाणे हे सूडसत्र पिढ्या न पिढ्या चालू राहत होते. माघार घेणे हे भेकडपणाचे लक्षण मानले जात असे. अपराधाच्या गांभीर्यानुसार सुडाची पातळी बदलत होती.
याविषयीच्या अभ्यासकांना सूडबुद्धी म्हणजे सहनशीलतेच्या विरोधातील शारीरिक जडणघडण असे वाटत होते. परंतु आता मात्र समाजव्यवस्थेच्या संवर्धनासाठी आवश्यक वाटणारा गुणविशेष आहे, याबद्दल अनेक अभ्यासकांचे एकमत झाले आहे की काय, असे वाटत आहे. एखादा तुमच्याशी काही उणे-दुणे ठेवून वागल्यास वा प्रत्यक्ष मारहाण करून तुम्हाला वेदना देत असल्यास त्याला शिक्षा देणे क्रमप्राप्त आहे व तो नैसर्गिक न्याय आहे हा समज दृढ होत आहे. मूळ चूक दुरुस्त करू शकत नाही; परंतु शिक्षा दिल्यास यानंतर ती चूक होणार नाही व इतरही याचा धडा घेतील, हा समज स्वीकारार्ह ठरत आहे. त्यामुळे सूडबुद्धीला अविचार म्हणणे हे अनेकांना आक्षेपार्ह वाटू शकते.
तरीसुद्धा हा सुडाचा प्रवास काही वेळा अंगलट येऊ शकतो. गंमत म्हणजे तुम्ही सौम्यपणे वागत असल्यास तुमचे शोषण होण्याची शक्यता असते; कठोरपणे वा जशास तसे वागत असल्यास सूडसत्राला आमंत्रण देण्याचा धोका पत्करावा लागतो. आपल्या या चुकीच्या निर्णयामुळे आपण इतके सहिष्णू कसे, हेही लक्षात येईल. कारण क्षमाशीलता ही नेहमीच उत्स्फूर्तपणे घडणारी प्रक्रिया आहे. मानसतज्ज्ञांच्या मते, सहिष्णुता सूडसत्रामुळे होणारे नुकसान टाळण्याचे एक प्रभावी साधन आहे. एकदा या प्रक्रियेला सुरुवात झाल्यास परस्परसंबंध जुळण्यास मदत होऊ शकते व तुटलेली नाती (पुढील सूडसत्रापर्यंत!) जोडली जाऊ शकतात. ही एक विवेकी विचारप्रक्रिया असून अविचाराला येथे थारा नाही.
आधुनिक समाजात राज्यव्यवस्थाच सुडाचे काम करत आहे. काहींना शिक्षा म्हणून जन्मभर कोंडून ठेवू शकते किंवा फाशीची शिक्षा देऊन त्याला नष्ट करू शकते. शिक्षेच्या तरतुदीमुळे गुन्हेगारी प्रवृत्ती तसूभरही कमी झाली नाही; फक्त कायद्याच्या कचाट्यात न सापडण्यासाठी नवीन वाटा शोधल्या जात आहेत. अपराध्यांची संख्या वाढतच आहे. मनमानी करत आपल्या हातात कायदा घेत सूडसत्र चालू ठेवले जात आहे. दहशतवाद्यांचे हिंसक कारवाया अशाच सूडनाट्याचे प्रदर्शन असावे. एका अंदाजाप्रमाणे सूडसत्रामुळे दरवर्षी सुमारे 20 टक्के लोक मृत्यूस बळी पडतात. सूडबुद्धी ही एक अविचारी कृती असून समाजस्वास्थ्य बिघडवणार्‍या या प्रवृत्तीचा त्याग करणे अत्यंत गरजेचे ठरू शकेल.
स्वैरविचार
प्रत्येकाकडे इतरांना सांगण्यासाठी काही ना काही अनुभव वा गोष्टी असतात. खरे पाहता या गोष्टीत स्वतः भर घातलेला भाग बराच असतो. मुळात कुठलीही गोष्ट फुगवून सांगण्याची हौस प्रत्येकात थोड्या-फार प्रमाणात असते. ऐकणार्‍यावर प्रभाव पाडण्यासाठी आपण गोष्टी फुगवून सांगत आहोत, याची कल्पनासुद्धा आपल्याला नसते. आपल्या मेंदूची ती फेकाफेकी असते व कळत न कळत आपण त्यात गुरफटून जातो. काल्पनिक असूनसुद्धा ते पूर्ण खरे आहे, अशीच आपली समजूत असते व हा स्वैरपणा नेहमीच आपल्याला फसवणारा असतो.
विचारातील हा स्वैरपणा बुद्धिभ्रमिष्टांच्यात सामान्यपणे आढळतो. स्मृतीमधील पोकळी भरून काढण्यासाठी ते नेहमीच गोष्टी रचून ऐकणार्‍यांना भांबावून सोडतात. त्यांची एखादी आवडती व्यक्ती समोर न दिसल्यास तिला कुणीतरी फूस लावून पळवून नेले आहे, यावर त्यांचा भरवसा असतो. त्यांच्यातील स्वैरविचार संवेदनांतील फरक भरून काढत असतो.
सामान्यपणे दोन वस्तू दाखवून त्यातील एखाद्याबद्दल चार शब्द सांगण्यास सांगितल्यावर तुम्ही मनात त्याबद्दल शब्दांची जुळवणी करता. तुमचे वस्तूकडे लक्ष नसताना त्या वस्तूऐवजी दुसरी एखादी वस्तू ठेवल्यास ते तुमच्या लक्षात येते व वस्तूबद्दलच्या माहितीचे स्वरूप पूर्णपणे बदलते. तुम्ही सतर्क होत ठामपणे वस्तू बदलल्याचा उल्लेखही करता. परंतु हाच प्रयोग चार भिंतीच्या आड एखाद्या लॅबमध्ये करत असताना न बदललेल्या वस्तूचेच वर्णन करता. कारण लॅबमध्ये जे घडले ते कुणालाही कळणार नाही, याची तुम्हाला खात्री असते. यात आपले काही तरी चुकत आहे, हेसुद्धा जाणवत नाही. स्वैराचारात खरे-खोटे यांना स्थान नाही; फक्त वेळ मारून नेणे, असे केले जाते.
आपला मेंदू नेहमीच सर्व संवेदनांमधून काही अर्थपूर्ण गोष्ट निघावी, या प्रयत्नात असतो. मेंदूत एखादा संकेतवाचक असावा व हा संकेतवाचक आपली काळजी घेत असतो, असे वाटण्याची शक्यता असते. आपल्या सर्व निर्णयात तांत्रिकदृष्ट्या योग्य आहेत याची हमी हा संकेतवाचक देत असतो. सुप्त मेंदूतील प्रक्रियांना जागृत मेंदू हाताळत असतो. त्यामुळे माहितीतील त्रुटी भरून काढण्याचे काम व त्यासाठी पर्याय सुचविणे या गोष्टी मेंदूत सातत्याने घडत असतात. यावरून आपण बाहेरच्या जगातील घडामोडींना आपापल्या परीने अर्थ लावण्याच्या प्रयत्नात असतो.
कल्पनेच्या राज्यात
आपले खाणे, पिणे, नैसर्गिक क्रिया, लैंगिक क्रिया इत्यादी जैविक व्यवहारांना अर्थपूर्ण करण्यासाठी माहितीतील उणिवा भरून काढण्याचे काम मेंदू करत असतो. त्यासाठी कल्पनांचा आधार घेऊ शकतो. या गुंतागुंतीच्या जगातील घडामोडींबद्दल स्वतःच्याच स्पष्टीकरणाची निर्मिती करतो (व त्यालाच खरे मानतो); परंतु काही वेळा आपला हा तर्क वा स्पष्टीकरण अत्यंत तकलादू असू शकते. त्याची भिस्त फँटसीवर असते. कल्पनाजगात वावरत असताना वास्तवाचे भान सुटू लागते. कदाचित आपल्या जाणिवातील उणिवांची भरपाई करण्यासाठी धर्मसंकल्पना कामी आली असेल. म्हणूनच अजूनही आपण त्याला कवटाळत आहोत. हा आधार सुटल्यास आपले काय होईल, या भीतीनेच नको त्या गोष्टींचा आधार घेत असतो. ‘फेकन्यूज’ वा ‘कॉन्स्पिरसी थेअरी’सारखे प्रकार या भीतीची अपत्ये आहेत.
गोष्टीवेल्हाळपणा आपल्या नसनसांत असला तरी त्यांच्यातील कल्पनांमध्ये किंचित प्रमाणात तरी वास्तवाचा, सत्याचा अंश असणे गरजेचे आहे. केवळ भास होतात म्हणून त्यांना दुर्लक्षित करण्यापेक्षा त्यांची सूत्रबद्धपणे मांडणी करणे शक्य आहे. वेगवेगळे स्पष्टीकरण देणे शक्य आहे का, एखाद्या ठाम निष्कर्षाप्रत येणे शक्य आहे का, सुरुवातीच्या विचारात व नंतरच्या विचारात काही फरक आहे का, इत्यादींचाही विचार होणे क्रमप्राप्त ठरेल.
थोडक्यात, या नंतरच्या जगात टिकून राहण्यासाठी तर्कशुद्ध विचार प्रक्रियेला पर्याय नाही.
समाप्त
(पूर्वार्धः https://aisiakshare.com/node/9293)