कतरिना कैफ : सौंदर्य, मेहनत आणि अभिनयाची चमक
सिनेसृष्टीतील सौंदर्य, आकर्षण आणि कष्टाच्या गाथेत कतरिना कैफ हे नाव अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. आज तिचा ४१ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिला समस्त हत्ती परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा. जीवेत शरदः शतम. १६ जुलै १९८४ रोजी हाँगकाँगमध्ये जन्मलेल्या कतरिनाचा प्रवास भारतीय सिनेसृष्टीत तितकाच रोमहर्षक आहे, जितका तिच्या अभिनयातील बदल व नवतेने भरलेला आहे. तिची आई इंग्लंडमधील असून वडील काश्मिरी मुस्लिम आहेत. बालपणीच कतरिनाच्या पालकांचा घटस्फोट झाला आणि ती आईसोबत जगभर विविध ठिकाणी राहिली. लंडनमध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर मॉडेलिंगच्या माध्यमातून तिने आपल्या करिअरची सुरुवात केली.
कतरिनाला भारतात येण्याचे, हिंदी सिनेमात नशीब आजमावण्याचे स्वप्न होते. भारतात येताना तीला हिंदी भाषा अजिबात येत नव्हती. मात्र, तिच्या मेहनतीचा व जिद्दीचा परिणाम म्हणून तिने हिंदी शिकण्यावर विशेष भर दिला. तिच्या सुरुवातीच्या काही चित्रपटांत संवाद डबिंगद्वारे दिले गेले, पण हळूहळू तिने भाषेवर प्रभुत्व मिळवले आणि आज ती हिंदीसह अनेक भारतीय भाषांमध्ये संवाद साधू शकते.
सिनेमातील पदार्पण
कतरिनाने २००३ साली 'बूम' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला, पण तिच्या सौंदर्यामुळे व मॉडेलिंगमधून आलेल्या लोकप्रियतेमुळे ती अनेक दिग्दर्शकांची पसंती ठरली. 'साया', 'मैंने प्यार क्यूँ किया', 'हमको दीवाना कर गये' अशा काही चित्रपटांनी तिला ओळख मिळवून दिली.
खऱ्या अर्थाने तिला यश लाभले ते 'नमस्ते लंडन', 'वेलकम', 'सिंग इज किंग', 'अजब प्रेम की गजब कहानी', 'राजनीती', 'एक था टायगर', 'जब तक है जान', 'धूम ३', 'टायगर जिंदा है', 'भारत' यांसारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांमुळे. या सर्व चित्रपटांत तिच्या विविध भूमिका, सौंदर्य, आणि अभिनयाची समज यांचा उत्तम संगम पाहायला मिळाला.
व्यक्तिमत्त्व आणि लोकप्रियता
कतरिना केवळ रूपानेच नव्हे, तर स्वभावानेही अत्यंत साधी आणि मनमिळावू आहे. तिच्या प्रत्येक भूमिकेत ती आपली मेहनत, समर्पण, आणि नवीन शिकण्याची तयारी दाखवते. अनेक वेळा तिने कबूल केले आहे की अभिनयातील तिच्या चुका ती स्वतः उघडपणे स्वीकारते व त्यावर काम करते. तिच्या डान्सिंग स्किल्सबद्दल तर वेगळे काही सांगायची गरजच नाही. 'शीला की जवानी', 'चिकनी चमेली', 'कमली', 'स्वॅग से स्वागत' यांसारख्या गाण्यांनी तीने प्रेक्षकांच्या हृदयात खास स्थान मिळवले आहे.
खाजगी आयुष्य आणि समाजकार्य
चित्रपटसृष्टीतील इतर कलाकारांप्रमाणे कतरिनाचं खासगी आयुष्य देखील नेहमीच चर्चेत राहिलं आहे. सलमान खान, रणबीर कपूर यांच्याशी तिचे संबंध चर्चेचा विषय राहिले, मात्र २०२१ मध्ये विक्की कौशलसह विवाह करून तिने नवा टप्पा गाठला. वैयक्तिक आयुष्यातील संघर्ष व व्यावसायिक स्पर्धेमुळे ती अधिक प्रगल्भ झाली आहे.
समाजासाठी योगदान देताना तिने 'रिलिफ प्रोजेक्ट इंडिया' या संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत. महिला शिक्षण, बालकांचे आरोग्य, आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी तीने वेळोवेळी आर्थिक व सामाजिक मदत केली आहे.
चित्रपटविश्वातील स्थान
कतरिनाने बॉलिवूडमध्ये आंतरराष्ट्रीय ओळख मिळवून दिली आहे. तिच्या कामगिरीमुळे, बऱ्याच परदेशी मॉडेल्सना व अभिनेत्रीना भारतीय चित्रपटसृष्टीत संधी मिळाली आहे. तीने बॉक्स ऑफिसच्या यशाच्या बरोबरीने समीक्षकांकडूनही दाद मिळवली आहे. 'राजनीती', 'झरहा', 'फितूर' यांसारख्या सिनेमांमध्ये तिच्या अभिनयाची वेगळी छटा पहायला मिळते.
नवे बदल आणि आव्हाने
आजही, ४१ व्या वर्षी, कतरिना नवनवीन भूमिकांसाठी, प्रेक्षकांची अपेक्षा वाढवत आहे. 'टायगर ३', 'मेरी क्रिसमस' यांसारख्या आगामी चित्रपटांमध्ये तिचा नव्या भूमिकांमध्ये वेगळा अंदाज पाहायला मिळणार आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती सतत चाहत्यांशी संवाद साधते, फिटनेस टिप्स शेअर करते आणि स्वतःच्या प्रवासाबद्दल प्रामाणिकपणे बोलते.
एक वेगळी छटा
कतरिनाच्या व्यक्तिमत्त्वात आणि प्रवासात एक गोष्ट नेहमीच ठळकपणे जाणवते ती म्हणजे तिची शांत, संयमी आणि ठाम उपस्थिती. हत्ती जसा आपल्या भव्यतेसह शांतपणे, आत्मविश्वासाने आणि कोणत्याही अडथळ्याला न घाबरता मार्गक्रमण करतो, तसेच कतरिना देखील आपल्यातील दुर्बलता, भाषा, आणि सांस्कृतिक अडचणींना न डगमगता, संयम आणि मेहनतीने आपल्या ठाम पावलांनी बॉलिवूडमध्ये प्रस्थापित झाली आहे. हत्तीच्या पावलांमध्ये जी ताकद, सौम्यता आणि स्थैर्य असते, तीच वैशिष्ट्ये कतरिनाच्या करिअरमध्येही दिसून येतात. तिची उपस्थिती सौंदर्याच्या पलीकडे जाऊन, एक नव्या विचारांची आणि मूल्यांची जाणीव करून देते.
समारोप
४१ वर्षांचा प्रवास म्हणजे केवळ वयाचं परिपूर्णत्व नव्हे, तर अनुभवांनी, संघर्षांनी आणि यशाने भरलेली एक अद्वितीय कहाणी आहे. कतरिना कैफने आपल्या कार्यातून, स्वभावातून आणि सामाजिक बांधिलकीतून आजच्या तरुण पिढीला प्रेरणा दिली आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त तिच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा—नवे वय, नवी स्वप्नं, आणि नवे यश यांच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या कतरिनाला पुढील जीवनासाठी समस्त हत्ती परिवाराकडून मनःपूर्वक शुभेच्छा!
न बा जनसामान्याशी तुमची नाळ तुटलेली आहे .
त्यामुळे कतरिना कैफ या सुंदरीविषयी तुम्ही अशी बेताल विधाने आपल्या हस्तिदंती मनोऱ्यात बसून करीत आहात.
न बा
मनाने तरुण व्हा
तरुणाईशी नाते जोडा
बॉलिवूडची चार चांगली गाणी बघा
आयुष्य जगा
ही घ्या कतरिनाची एक अदाकारी
https://youtu.be/MQM7CNoAsBI?feature=shared
जमल्यास (उपहास आटोक्यात आल्यास)
1 आपल्या मराठी संगीतकारांचे कौतुक करा
2 अजून जमल्यास इतकं sexy गाणं देऊनही म्हणजे त्यात नृत्य करूनही,.......
कतरिनाच्या डोळ्यातील याच गाण्यातील डोळ्यातील
निरागसता बघा
न बा न बा
आयुष्य खूप सुंदर आहे
एकदा उपहास
सोडून तर बघा न बा
सोडून तर बघा
…
आज तिचा ४१ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिला समस्त हत्ती परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा. जीवेत शरदः शतम.
नाही, म्हणजे, ‘जीवेत शरदः शतम्’ वगैरे जाहीर आशीर्वाद देण्याची प्रथा वगैरे असते, याची कल्पना आहे, नि तसेही, कतरीना कैफ हिने शंभर वर्षे जगण्यास आमचा कोठल्याही प्रकारे प्रत्यवाय वा आक्षेप नाही. मात्र, शंभर वर्षांच्या थेरड्या कतरीना कैफबद्दल कल्पना करण्यात येथे नक्की कोणाला स्वारस्य असू शकेल, असा एक प्रश्न आमच्या मनात डोकावून गेला, इतकेच.
(तिने शंभर वर्षे अवश्य जगावे. आमचे काहीही म्हणणे नाही. (शंभर का, पाचशे वर्षे जगावे; आमच्या (दिवंगत) तीर्थरूपांचे काय जाते?) मात्र, त्याचा सार्वजनिक ज़िक्र कशासाठी, इतकाच आमचा प्रश्न आहे. असो चालायचेच.)
अभिनयाची चमक
कुठलीही नटी/मॉडेल "आवडवून घेण्यासाठी" नुसतं मनाने तरूण होऊन चालणारं नाही. अनुभवातून आलेलं शहाणपण, परिपक्वता याचाही त्याग करावा लागेल, थोडं नादान, अल्लड व्हावे लागेल. सगळ्या चकाकीला भूलवून घ्यावे लागेल. आणि येवढी सगळी तरूणाईची वैशिष्ठ्य सामावून घेतली तरीही नबांना ही नटी आवडेल याची खात्री नाही. निदान मला काही ही नटी माझ्या तरुणाईच्या काळात आवडली नव्हती. कारण, हिच्या "अभिनयाची चमक"!. माझ्या आणि हिच्या तरूणाईच्या काळात मी हिचे केवळ दोनच चित्रपट पाहिले. दोनही वेळेला अक्षय कुमार होता. आणि दोनही वेळेला केवळ मित्रांबरोबर "हँगआउट" करण्यासाठी हे चित्रपट पाहिले. खिशात खुर्दा खुळखुळू लागला. पॉकेट मनीसाठी आई बाबांकडे हातपाय पसरण्याची गरज उरली नाही की आपण खूप श्रीमंत झाल्याची भावना येते. आहाहा काय ते दिवस!. अशा दिवसात, विकेंडची सुरवातच मूळात फर्स्ट डे फ्रायडे नाईट शोने होते. तसाही मला चित्रपट पहाण्यापेक्षा मित्रांबरोबर हिंडण्या फिरण्यात जास्त रस असायचा. अशाच एखादं शुक्रवारी, हिच्या सौंदर्यावर भाळलेल्या मित्रांसाठी मी हिचा एक चित्रपट प्रथमच पाहिला. आणि हिच्या "अभिनयाची चमक" आणि चित्रपटाचा एकंदर दर्जा पाहून मी चित्रपट गृहात अक्षरशः झोपलो. त्यामुळे त्या चित्रपटाचे नावही आठवत नाही. कोड लिहून थकून जो आलेलो. काश, आमच्या काळात गिटहब कोपायलट असते तर इतका थकलो नसतो आणि चित्रपटाचा आणि हिच्या अभिनयाचा रसस्वाद घेतला असता. दुसरा चित्रपट माझी इच्छा नव्हती पण रुममेटचा मान ठेवण्यासाठी पाहिला. नमस्ते लंडन. यावेळेला झोपलो नाही पण चित्रपट संपण्याची आतूरतेने वाट पाहत होतो. नशीब काही गाणी चांगली होती. त्यानंतर स्वतःहून कधी हिच्या वाट्याला गेल्याचे स्मरत नाही.
नबांचा प्रश्न नाही
आणि येवढी सगळी तरूणाईची वैशिष्ठ्य सामावून घेतली तरीही नबांना ही नटी आवडेल याची खात्री नाही.
मुळात नबांनी ही नटी (१) आवडली, किंवा, (२) आवडली नाही, यांपैकी कोठलेच विधान केलेले नाही.
जी काळी की गोरी ते कधी पाहिलेले नाही, झालेच तर, जिला पाहण्याचा प्रयत्नदेखील केलेला नाही (आणि भविष्यात जिला पाहण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता (बहुधा) शून्यवत् आहे (चूभूद्याघ्या)), ती आवडण्या-न आवडण्याचा प्रश्न उद्भवतोच कोठे?
(अर्थात, (नुकतेच विकीवरून समजल्याप्रमाणे) ही जर कीजवानींची शीला असेल (फालतू विनोद ३_१४ विक्षिप्त अदितीकडून साभार.), तर तिला पाहण्याचा प्रयत्न नबांकडून इतःपर आवर्जून होण्याची शक्यता नगण्य आहे. (आवडण्या-न आवडण्याचा प्रश्न त्यापुढचा.))
(आणि, नबांना काय आवडू शकेल, याबद्दल ब्रह्मदेवदेखील भाकीत करू शकणार नाही. त्यामुळे, मर्त्य मानवांनी त्या दिशेने प्रयत्नदेखील करू नये. अलीकडच्या काळात नबांना ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’, झालेच तर ‘तेरी बातों में ऐसा उलझा जिया’ असले चित्रपट बेहद्द आवडल्याची इतिहासात नोंद आहे. (नबांच्या शारीरिक अथवा मानसिक वयाशी याचा यत्किंचितही संबंध नाही.))
तर सांगण्याचा मतलब, प्रस्तुत नटी नबांना आवडली वा आवडली नाही, याबद्दल नबांनी (one way or the other) कोठलेही विधान केलेले नाही. प्रस्तुत नटीशी नबांचे वाकडे नाही; किंबहुना, तिच्याशी घेणेदेणेदेखील नाही. किंबहुना, नबांची विधाने प्रस्तुत नटीसंदर्भात नाहीतच; त्यांचा रोख प्रस्तुत लेखाच्या शैलीकडे आहे. (उदाहरणादाखल, प्रस्तुत नटी बरी किंवा वाईट कशीही असो, परंतु, ती चांगली जिवंत असताना, तिच्याबद्दल ‘प्रेमळ, मनमिळाऊ’ असली विशेषणे वापरून ती आत्ताच दिवंगत झाल्यासारखे का बोलायचे, इतकाच नबांच्या म्हणण्याचा उद्देश आहे. (शिवाय, (प्रस्तुत लेखाच्या लेखकासहित) येथील कोणाचाही प्रस्तुत नटीशी वैयक्तिक संबंध येण्याची शक्यता सुतराम् नसताना, खाजगी आयुष्यात ती प्रेमळ अथवा मनमिळाऊ आहे, किंवा कसे, या ज्ञानाने नेमके काय मूल्यवर्धन होते, हादेखील सवाल आहे. थोडक्यात, लेखातील ‘फ्लफ’कडे नबांचा रोख आहे, इतकेच.))
असो चालायचेच.
कसचे हो!
नबांचाच काय तो आधार!
कसचे हो! येऊन येथे दुगाण्या झाडीत असतो, झाले.
(बाकी, आमचा आधार या जगात कोणाला जर वाटू लागला, तर या जगाच्या भवितव्याबद्दल काळजी वाटू लागते!)
परंतु, तुमची व्यथा समजते. किंबहुना, आमचीही तीच व्यथा आहे. (म्हणून तर दुगाण्यांचे प्रयोजन!)
(दिवाळी अंकदेखील आता पूर्वीचा/पूर्वीसारखा राहिला नाही. अर्थात, हे व्हायचेच. कालाय तस्मै नमः।)
एक अवांतर निरीक्षण:
ऐसीवर ज्या कारणांसाठी यावसं वाटायचं तसे लेख , लेखक आणि वातावरण उरले नाही.
जुनेजाणते दिग्गज लेखक सोडा. खुद्द प्रस्तुत संस्थळ ज्यांनी सुरू केले, त्या लोकांपैकी (भले ते बरेवाईट कसेही असोत), एक ३_१४ विक्षिप्त अदिती (नि अगदी क्वचित दुसरा तो चिंतातुर जंतू) वगळल्यास बाकी कोणी येथे फिरकत नाहीत, येथे ढुंकूनदेखील पाहात नाहीत. राजेश घासकडवी, राजन बापट, झालेच तर (संस्थापकांपैकी नसतीलही, कदाचित (चूभूद्याघ्या.), परंतु आधारस्तंभांपैकी निश्चित, असे) आदूबाळ… या मंडळींनासुद्धा जर या संस्थळात रस उरलेला नसेल, तर तुम्हांआम्हां सामान्य सदस्यांस तो आणखी किती काळ उरेल? घाला बोटे, मोजा पाहू! (मग संस्थळाचा जर हत्तीखाना झाला, तर तो दोष कोणाचा?)
(ही उपरोल्लेखित मंडळी जेथे कोठे असतील, तेथे सुखी असोत, इतकीच ईश्वरचरणी प्रार्थना! असो चालायचेच.)
>>>>या मंडळींनासुद्धा जर या…
>>>>या मंडळींनासुद्धा जर या संस्थळात रस उरलेला नसेल,
मुळात या मंडळींना सुद्धा लेखन, वाचन यात रस होता म्हणून संस्थळावर येत होत्या की भलत्या कामासाठी येत होती हा प्रश्नच आहे. ते ही असो.. पण निदान ती मंडळी नाहीत म्हणून हिंदूंवरच्या ओका-या ब-याच कमी झाल्या आहेत.
जाहीर निवेदन
कधीमधी पोट बिघडल्यावर मला ओकाऱ्या आल्या आहेत. उलटी आली तर बरं, असं वाटण्याइतकी विषबाधा अन्नातून मला काही वेळा झाली होती; पण उलटी काढणं मला तेव्हाही जमलं नाही. हे एक.
दुसऱ्या बाजूनं मी हिंदू आहे. हिंदूंवर ओकाऱ्या म्हणजे स्वतःवरच ओकाऱ्या. तर जेव्हा कधी उलटी झाली तेव्हा एकदाही ती स्वतःच्या किंवा इतरही कुठल्या व्यक्तीच्या अंगावर केली नाही. अगदी लहानपणचं जेव्हा काही आठवत नाही तेव्हाचं मला काही माहीत नाही.
तर अहिरावण यांना नक्की काय म्हणायचं आहे ते मला समजलं नाही. नाही समजलं तेच बरं आहे, हेही खरं!
>>>>>माझ्यासारख्या फडतूसांचं…
>>>>>माझ्यासारख्या फडतूसांचं काय घेऊन बसताय!
तेच तर ! तुमचं कसं आहे... लोका सांगे... :)
माझ्यासारख्या फडतुसाकडे तुम्ही लक्ष दिले म्हणून तुमच्या सारख्या विश्वविख्यात, आदरणीय, प्रकांडविद्वान व्यक्तिमत्वाचा आम्हाला सत्कार करावा लागला ! असो.
तुम्हाला काय सत्कार काय आणि चपला काय सारखेच !! नाही का? !
उरलेला सत्कार असाच कधीतरी वेळ मिळेल आणि तुम्ही स्वतःहून संधी द्याल तेव्हा नक्कीच केला जाईल. :)
ऐसीचे विचारसौष्ठत्व
ऐसीचे विचारसौष्ठत्व वृध्दींगत व्हावे असे आम्हा सगळ्यांना प्रामाणिकपणे वाटते. मात्र आम्ही सगळे हत्ती एक नंबरचे आळशी आणि खुशालचेंडू आहोत. मस्त मज्जा करावी, पुख्खे झोडावेत, वेगवेगळ्या कारणांमुळे एकत्र यावे, सहलींना जावे इतकेच आम्हाला समजते. त्यामुळे इतर सन्माननीय सदस्यांप्रमाणे विचारप्रवर्तक लेख आम्हाला लिहिता येणार नाहीत. तरीही आमच्या परीने आम्हाला ज्या विषयातील थोडेफार समजते त्यावर लिहून एक खारीचा हत्तीचा वाटा उचलत असतो. त्यातून ऐसीचे विचारसौष्ठत्व कितपत वृध्दींगत होईल याची कल्पना नाही पण आपल्याला झेपेल तितके प्रयत्न करायला काय हरकत आहे?
?
कतरीना अद्याप जिवंत आहे ना?
मग ही असली गृह्यसंस्कारी वाक्ये कशासाठी?
(तरी बरे, 'कोणाच्या अध्यात ना मध्यात' नाही म्हणालात! असो.)