त्यजली एक भावना..
त्यजली एक भावना..
सुट्टीचा दिवस नुकताच सुरू होत होता. साहजिकच आराम होता. कामं आटोपती घेण्याची घाई नव्हती. कानांवर एकाएकी जर दुर्मिळ पक्ष्याचं गुंजन पडलं, तर त्याचा निसर्गाच्या सान्निध्यात वेध घ्यावा इतका वेळ हातात होता. सुंदर दिवस जाण्याची संभावना होती. अशाच वेळी नेमकी अघटीत काही घडण्याची धाकधूक मनात जागृत होत असते. दचकण्याची इतकी सवय जडलेली असते की, वरवर कुणाला तसे दिसूनही येणार नाही.
आरसा आज काही सांगत होता. आणि त्याकडे नेहमीप्रमाणे दुर्लक्ष ठरलेलंच होतं. अशा भ्रामक गोष्टींत वेळ घालवू नये, असं वाटत होतं. तसंही लोकांना त्यांच्या भ्रमातून बाहेर काढण्याचा आटापिटा करण्यापेक्षा त्यांच्या त्यांच्या भ्रमातच राहू देणं, ही भ्रांती कधीही आपल्या तब्येतीसाठी चांगलीच.
प्रेमाची व्यक्ती आपल्या दिशेला आरसा धरूनच चालत असणार, नाही का, क्षणभर असं काहीसं मनात चमकून गेले.
वातावरणात ओलेती स्निग्धता कापरासारखी उडत होती. मन जमलेल्या विचारांना जणू कापसावर ठेवल्याप्रमाणे हलकेसे झाले होते. सितार झंकारावी तशी, गाढ झालेल्या जीवलगाच्या भेटींना मनामध्ये नवपल्लवी लगडू लागली होती.
तो दिसे, तो लपे, त्याचं रूप साठवू,त्याचं रूप पाहू, तेवढ्यात तो दिसेनासा होई, मनातले हे भ्रम फार बनेल असतात, त्याच्यासारखे.. त्याची त्याला न तमा न लज्जा, एकाकार होत त्याचा ध्यास घ्यावा, तितका तो आपल्या हातून निसटे, असे वाटे की याला आपल्या गच्च कवेत घेऊन एकदाचे आपले प्राण गमवावे, त्याच्यातच विरून घ्यावेत, म्हणजे तो निसटेल तेव्हा आपल्याला त्याचा विरह बाधणार नाही.
ऊन कलू लागले होते, थवा परतणीसाठी तयार होत होता. मन तेवढं त्याच्याने भरून गेले होते, डोळे पेंगुळले होते, अंधुकसा तो उभा होता,
हात हाताशी घेतला होता..
म्हणाला..
“आलास, मी किती वाट पाहीली, येणार होतास की नाही रे.. आलास तर बोल माझ्याशी, किती किती बोलायचं आहे, किती किती ऐकायचं आहे.. बघ वेळ पुरणार नाही..”
कानांवर शब्द येत होते, आणि शहारल्यासारखे बाजूला होत होते. शेवटी, शुद्ध हरपली.
रात्र पडली. मनात फार काही जड ठेवल्यागत वाटत होते. एक मोठा काळासा ठोकळा. डोळे उजेडासाठी चाचपडत होते, सभोवर अगदी गर्द झाले होते, वारा सुन्नसा पडला होता, काहीतरी मनातून निसटून गेले होते, पण ते काय होते तेच कळेनासे झाले होते. कुठली भावना दिवसभर घर करून बसली होती, त्याचा थांग लागत नव्हता.
एक भावनेत गुंफलेला तो आज त्याज्य झाला होता.