असुर : जपानी स्लाईस ऑफ लाईफ
-
तुम्हाला जपानी फूड आवडतं?
-
तुम्हाला जेन ऑस्टेनच्या नायिका गंमतीशीर वाटतात?
-
किंवा, तुम्हाला बाहेरच्या डिप्रेसिंग वास्तवापासून दूर दोन घटका मन रमवायचंय, पण रक्तपात-हिंसा वगैरे नकोय?
-
कुटुंबातल्या सगळ्यांबरोबर बघता येईल आणि बघायला मजाही येईल असं काही हवंय?
-
किंवा, कान चित्रपट महोत्सवापासून जगभरातले अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार मिळालेल्या विख्यात सिनेदिग्दर्शकाने केलेली मालिका पाहण्यात तुम्हाला रस आहे?
यापैकी कशालाही तुमचा होकार असेल तर नेटफ्लिक्सवरची ‘असुर’ ही जपानी मालिका नक्की बघा. ती कुनिको मुकोडाच्या कादंबरीवर आधारित आहे. हिरोकाझू कोरीडा ह्या विख्यात जपानी दिग्दर्शकानं ही मालिका दिग्दर्शित केली आहे. नावातला ‘असुर’ हा चक्क भारतीय संकल्पनेतला असुर आहे, पण त्याचा मालिकेशी संबंध काय, ते मालिकेच्या शेवटीच कळेल.
स्लाईस ऑफ लाईफ
ही गोष्ट १९७०-८०च्या सुमाराच्या टोक्योमध्ये घडते. त्सुनाको, माकिको, ताकिको आणि साकिको ह्या चार बहिणी आहेत. मोठ्या दोघींचीही लग्नं झालीयेत. एकीला दोन मुलं आहेत. दुसरी विधवा आहे आणि तिला एक मुलगा आहे. धाकट्या दोघींपैकी एकीला बॉयफ्रेंड आहे, तर एकीचं अजून जुळायचंय. पण त्यांच्या आयुष्यात खळबळ माजते ती त्यांच्या वडिलांमुळे. वयस्कर आईवडील आता शांत आणि मजेत जगतायत अशा भ्रमात आपापल्या आयुष्यात गर्क असणाऱ्या ह्या चौघींना अचानक समजतं की वडिलांची एक ‘भानगड’ आहे, तीसुद्धा त्यांच्यापेक्षा वयानं खूप लहान असलेल्या एका बाईबरोबर! त्यांना एक शाळेत जाणारा मुलगा पण आहे. या वयात वडिलांचं हे कर्तृत्व पाहून चौघी अवाक होतात, पण प्रत्येक बहिणीची त्यावरची प्रतिक्रिया त्यांच्या स्वभावानुसार वेगळी आहे.
सात भागांची ही मालिका हलकीफुलकी आहे आणि त्यात अनेक वळणं आहेत. प्रत्येक बहिणीची काही सीक्रेट्स आहेत. ती इतरांपासून तिला लपवायची आहेत. जोवर ती झाकलेली आहेत तोवर सगळं काही गोडगोड असतं, पण ती हमखास उघडी पडतात, आणि मग परत गॉसिप, उणीदुणी, वगैरे चालू होतात. आणि हे सगळं नेहमीच खाता-पिता होतं. जवळपास प्रत्येक प्रसंगात लोक स्वयंपाक करतात, किंवा आयतं जेवण आणतात आणि खातात. एका समीक्षकानं तर म्हटलं आहे की रिकाम्या पोटी ‘असुर’ पाहायला बसू नका!
मालिका दिसायला देखणी आहे. त्यातले कपडे, घरं, आणि अर्थात खाण्याचे पदार्थ पुन्हापुन्हा पाहावे इतके छान आहेत. तुमचा टीव्ही चांगला असेल आणि नेटफ्लिक्सचा प्लान महागातला असेल तर त्यातली सिनेमॅटोग्राफीही नजरेत भरेल. चार बहिणी आणि इतर व्यक्तिरेखांमधल्या अभिनेत्यांची कामं सरस आहेत. आपल्या भावनांना सारखं झाकून ठेवणारी लायब्ररियन आणि बॉक्सरच्या प्रेमात पडलेली ह्या दोन धाकट्या बहिणींची कामं करणाऱ्या दोघी तर सीन-स्टीलर आहेत. मालिकेचं संगीत प्रसंगांच्या स्वरूपाला साजेसं आहे. टायटल थीम तर कर्णपिशाच्च होऊ शकते इतकी चांगली आहे.
चार बहिणी (आणि त्यांची आई, एकीची मुलगी आणि इतर काही स्त्री व्यक्तिरेखा) मिळून त्या काळातल्या जपानी स्त्रियांचं प्रतिनिधीत्व करतात आणि एक समग्र चित्र उभं करतात. प्रत्येकीचा स्वभाव वेगळा आहे. त्या एकमेकींशी प्रसंगी कडाडून भांडतात. मालिकेतले बरेचसे पुरुष त्या काळातले जपानी पुरुष वागावेत तसेच वागतात, पण ह्या चौघी मात्र आपापल्या स्वभावानुसार त्या पुरुषप्रधान वातावरणात प्रश्न उपस्थित करतात. बहिणी-बहिणींमधलं नातं आणि एकंदरीत मानवी नात्यांचा बारकाईनं वेध घेण्यासाठी हलक्याफुलक्या प्रसंगांचा प्रभावी वापर केलेला आहे. अर्थात, काही गंभीर प्रसंगही आहेत.
दिग्दर्शक कोरीडाच्या चित्रपटांच्या शैलीप्रमाणेच इथेही तो सौम्य आहे आणि सर्व व्यक्तिरेखांविषयीची त्याची कळकळ अगदी स्पष्ट आहे. त्यामुळे इथे खलनायक असं कुणीच नाही. कदाचित त्यामुळेच सुरुवातीला मालिकेत रंग भरायला कदाचित थोडा वेळ लागू शकतो आणि ती संथ वाटू शकते, पण हळूहळू गोष्ट वेग घेते तसतशी मालिकाही पकड घेते. कौटुंबिक मालिका कशी असावी ह्याचा एक आदर्शच कोरीडा उभा करतो. भारतीय तर सोडाच, पण अगदी अमेरिकी कौटुंबिक मालिकांपेक्षाही ‘असुर’ सरस वाटते.
?
'न'बा, केळ्याची साल दिसली की घसरण्याची गरज नसते!
हा मी आणि केळ्याची साल यांचा आपापसातील मामला आहे. केळ्याच्या सालीची जर हरकत नसेल, तर आक्षेप घेण्यास आपला locus standi नक्की काय?
बरं, मी इथे डोहाळे हा शब्द वापरला म्हणून जंतू किंवा मी किंवा दोघेही गर्भार आहोत, असा निष्कर्ष काढायचीही गरज नाही.
याला चांगली खरमरीत अशी एक नव्हे परंतु दोन प्रत्युत्तरे सुचली होती, परंतु, (इतरत्र म्हटल्याप्रमाणे) ज्याप्रमाणे मी स्वतःला (मूडप्रमाणे) कधीकधी साक्षात परमेश्वर समजतो, तद्वत, कधीकधी मी स्वतःला सभ्य मनुष्यसुद्धा समजतो. (तूर्तास माझी सभ्य मनुष्य फ़ेज़ चालू आहे.) सबब, माझा पास.
बाकी तुमचे चालू द्या.
चिं.ज., लिष्टेत टाकल्येय…
चिं.ज., लिष्टेत टाकल्येय. यावरनं "Eat Drink Man Woman" मुव्ही आठवला. शेफ बापाकडे त्याच्या तीन मुली जेवायला येणारेत. पहिली पाचेक मिनीटं तो स्वयंपाक रांधताना दाखवलाय. क्या बात है - ख्याल रंगवावा तसा त्याचा हात चालू असतो! भाज्या सुरेख चिरतो, आणि मासे पण!, अख्ख्ं बदक तळतो, मोमोच्या कडा सुरेख दुमडतो वगैरे वगैरे.
सापड्या!! वर उल्लेख केलेला…
सापड्या!! वर उल्लेख केलेला सीन ईकडे बघा - https://www.youtube.com/watch?v=1-2QBYKI8LU
क्लोज-अप्स, उजेड, आवाज, माफक पार्श्वसंगीत, तन्मयतेने काम करताना अभिनेत्याने ओठ मुडपलेत - छोटीशी गोष्ट पण सीनच्या जिवंतपणात भर घालते, मधेच त्याच्या बायकोचा फोटो भिंतीवर टांगलेला दिसतो ......... पुरे, त्यापेक्षा ऐका माझं - पाच मिनीटं खर्चून ही क्लिप बघाच !!!
खाण्याच्या बाबतीत असुर…
खाण्याच्या बाबतीत असुर याच्याइतकी sensual नाही, पण ही आवडली असेल तर 'द टेस्ट ऑफ थिंग्ज' नक्की पाहा. ट्रेलर इथे https://youtu.be/cKKCGtoIOVY?si=r54iZ0Z4CdE1zfjA.
रिव्ह्यू आवडला,परंतु गरीब…
रिव्ह्यू आवडला,परंतु गरीब लोकांना "तुमचा टीव्ही चांगला असेल आणि नेटफ्लिक्सचा प्लान महागातला असेल तर" असले टोमणे मारण्याची काय गरज ?