Skip to main content

समाजहिताच्या आंदोलनात भाग घेतलेल्या कामत जोडप्यांचे कार्यचरित्र

या कॉफी टेबल टाइप कन्नड भाषेतील पुस्तकाच्या प्रस्तावनेत डॉ. ए आर वासवी यानी विचारल्याप्रमाणे २१व्या शतकातील समाजहितासाठीच्या चळवळी व आंदोलनं यशस्वी होण्यासाठी परंपरागत क्रांतीकारी सिद्धात व त्यासाठी चोखाळलेल्या नेहमीच्या मळलेल्या वाटा पुरेसे ठरतील का? नवीन तंत्रज्ञान व त्यास अनुसरून बदलत असलेली समाजाची मानसिकता व दैनंदिन व्यवहार यांच्यासाठी नेमके काय करता येईल? भांडवली जगात वावरत असताना कार्यकर्त्यांचे वैयक्तिक जीवन कसे असावे? वंचित, दलित, कष्टकरी, इत्यादी आर्थिकरित्या मागासलेल्यांच्यासाठी कार्य करणाऱ्या चळवळीत परिणामकारक लवचिकता कशी आणता येईल? इत्यादी अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला दिलीप कामत व नीलिमा कामत या दंपतीने व्यक्त केलेल्या या त्यांच्या आत्मचरित्रात्मक वा कार्यचरित्रात्मक लेखनात मिळू शकेल. पुस्तक वाचत असताना लेखकानी अजून जास्त तपशील द्यायला हवे होते, जास्त विश्लेषण करायला हवे होते असे वाटू लागते.

या कन्नड पुस्तकाचे शीर्षक ‘स्व-अर्थ’ व उपशीर्षक ‘सामूहिक हितासाठी केलेला प्रवास’ यातूनच पुस्तकातील आशयाची कल्पना येईल. यांच्या या पुस्तकातील आशयाच्या मागे प्रत्यक्ष फील्डमध्ये जाऊन घेतलेल्या कटु व (काही वेळा!) गोड अनुभवाची शिदोरी आहे. त्यामुळे लेखक काय सागंतात हे निव्वळ हवेतील गप्पा नसून स्वतः ताऊन सुलाखून घेतलेल्या अनुभवातून सुचलेल्या शहाणपणाचे हे लेखन आहे.

लेखकानी म्हटल्याप्रमाणे त्यांचे संपूर्ण जीवनच विविध क्षेत्रातील कार्य व तत्वप्रणाली यांचा वापर करत विणलेले आयुष्य आहे. या आयुष्यात भरपूर काही घडले. ते उघडून दाखवताना त्यांच्या सरलेल्या आयुष्यपटातून आपण त्यांच्या संतृप्त जीवनाचा अर्थ शोधू लागतो. व असेही आयुष्य असू शकते यावर आपला विश्वास बसत नाही.

लेखकानी आपले आयुष्यपट उघडून दाखविताना आपल्या बालपणीच्या आठवणी व त्यांचे आई-वडिल, प्रमिलाताई व श्रीरंग कामत, यांनी केलेले त्यांच्यावरील संस्कार यांचा ते आवर्जून उल्लेख करतात. हे दोघेही गाधीवादी, सर्वोदयवादी व स्वातंत्र्य चळवळीत तुरुंगवास पत्करलेले होते. त्यांनी त्यांच्या जीवनातील सर्व कडवटपणा बाजूला सारून तत्वनिष्ठ राहून समाधानी आयुष्य जगले. वडिलांच्या प्रोत्साहनामुळेच समाजहितासाठी नंतरचे आयुष्य जगण्याची प्रेरणा लेखकाला मिळाली. व आईच्या कलासक्तपणामुळे कला, साहित्य यांच्यात त्यांना गोडी वाटू लागली.

त्यांचे शालेय शिक्षण सवदत्ती, धारवाड व कॉलेज शिक्षण बेळगावी येथे झाले. बीएससीची परीक्षा जवळ येत असतानाच दिलीप यांनी बाबा आमटे यांच्या श्रमसंस्कार शिबिराला जाण्याचा निर्णय घेतला. व परीक्षेला न बसता ते चंद्रपुर जिल्ह्यातील सोमनाथ येथे गेले. बाबा आमटे यांचे ते (त्या काळी) कार्यकर्ता घडविणारे विद्यापीठच होते.

बाबा आमटेंच्या शिबिरात असतानाच शहादा तालुक्यातील भिल्ल, पावरा, गावित या आदिवासींच्यासाठी काम करणाऱ्या ग्राम स्वराज्य समितीशी संबंध आल्यामुळे पुढील काही महिने कामत यांनी तेथे काम केले. नंदुरबार जिल्ह्याचा भाग असलेल्या शहादा तालुक्यात या जमाती मोठ्या संख्येने आढळतात. अंबरसिंग महाराज, गोविंदराव शिंदे, माणूसचे संपादक श्री. ग. माजगावकरांच्या नेतृत्वाखालील या समितीच्या संघर्षाने कामत यांना भरपूर काही शिकविले. पुण्यातील सुधीर बेडेकर व त्यांच्या मित्रांच्या मागोवा ग्रुपशी संबंध आला. शहादा, तळोदा, नंदूरबार येथील आदीवासींचे काम करत असताना आदिवासी तरुणांचीच श्रमिक संघटना बांधून तेथील कार्यकर्त्यांना कार्यरत केले. शिस्तीत संघटना चालवत सुमारे १० हजार एकर जमीन आदिवासींना परत मिळवून दिले. जमीन मिळाली, परंतु शेती करणे त्यांना जमत नव्हते. इतर जातीतील धनदांडगे आदिवासींना त्रासही देत होते. आदिवासींचे आरोग्य, मुला-मुलींचे शिक्षण, स्त्रियांवर होत असलेले अत्याचार, सरकारच्या कल्याणकारी योजनांचा गैरवापर इत्यादी गोष्टी तेथेही होत्याच. नंतरच्या काळात एकेक करून या संघटनेने त्या समस्या सोडविलेही. परंतु लेखक मात्र श्रमिक संघटनेचे अनुभव घेऊन बेळगावला परत आले.

बेळगावला परतल्यानंतर दोघा मित्रांबरोबर त्यानी स्टडी सर्कलची सुरुवात केली. यात कन्नड-मराठी असे कुठल्याही भाषेचा अडसर आला नाही. विवेकानंद, टागोर, भगतसिंग, गांधी, विनोबा, फुले, डॉ. आंबेडकर इत्यादी विचारवंतांची पुस्तकं वाचून चर्चा होऊ लागली. गांधीवाद, मार्क्सवाद, समाजवाद, साम्यवाद, सर्वोदय, आरएसएस इत्यादी तत्वप्रणालींचे गंभीरपणे अभ्यास केल्यामुळे पुढील आयुष्यातील आंदोलनासाठी लागणारा पाया भक्कम होत गेला. सत्यशोधक मंडळ, मागोवा, हमाल पंचायत, सोशॅलिस्ट फोरम, शांती सेना, वाईचे प्राज्ञ पाठशाळा येथील क्रियाशील कार्यकर्त्यांना बोलवून चर्चा करण्यात लेखकानी पुढाकार घेतला. व्यक्तिप्रामाण्य, ग्रंथप्रामाण्य बाजूला सारून परिस्थितीनुसार विवेकी मार्गाने जाण्याचा पाठ पुढील आयुष्यात कामी आला. स्टडी सर्कलचे सभासद स्थानिक ट्रेड युनियनच्या संपर्कात राहिले. एक मात्र खरे की ट्रेड युनियन्स कामगारांच्या हितासाठी जिवाचे रान करतील. परंतु युनियन्सकडे भांडवली व्यवस्था उलथून टाकण्याइतकी शक्ती नाही हे लेखकांना कळाले.

भारताच्या पुनर्निमाणाच्या स्वप्नातून बाहेर पडत समाज परिवर्तनाची वाट लेखकांनी पकडली. बेळगाव येथे संघटित व असंघटित क्षेत्रातील कामगार होते. शहापूर, वडगाव, खासबाग, भारत नगर येथे पॉवरलूम कामगार होते. त्यांचे युनियन –बिनियन असे काही नव्हते. मालक जितके सांगतील तेवढा वेळ काम करायचे व मालक देतील तेवढे पैसे घेऊन घरी जायचे. स्टडी सर्कलचे सभासद त्यांच्या संपर्कात होते. त्यामुळे त्यांच्यातील काहींना स्टडी सर्कलवाले काय बोलतात हे थोडे फार कळू लागले.

याच सुमारास बेळगाव येथील इंडाल फॅक्टरीतील कामगारांच्या पगारवाढीच्या मागण्याला अक्षता दाखवल्या. त्यांच्या युनियनने संप पुकारला. काही कारणामुळे कामगार व युनियनच्या नेत्यामध्ये वितुष्ट निर्माण झाले. युनियनच्या पुढाऱ्यांनी तुमचे तुम्ही बघा म्हणून कामगारांना वाऱ्यावर सोडले. हा लढा कसा लढला गेला हे पुस्तक वाचून समजून घ्यायला हवे. कम्युनिस्ट पक्षाचे रमेश स्थळेकर यांना या लेखकाच्या कठिण काळात भरपूर मदत केली, असे लेखक आवर्जून उल्लेख करतात. त्याचप्रमाणे अ‍ॅड्व्होकेट राम आपटे यांचीसुद्धा या काळात भरपूर मदत झाली. कायदेविषयक सल्लागार म्हणून या आंदोलनाला फार उपयोग झाला. नंतरच्या काळात पॉवरलूम वर्कर्ससाठीसुद्धा लेखकाने लढा दिला. त्याची साद्यंत माहिती पुस्तकात वाचावयास मिळतील.

या पुस्तकातील एका प्रसंगाचा उल्लेख करावे असे वाटते. ५० दिवसाचा हा संप अत्यंत शांतपणे चालला होता. परंतु मालकाच्या खोडसाळपणामुळे काही कामगार हमरी तुमरीवर आले. मालक सर्व तयारिनिशी आले होते. पोलीसांनी धरपकड केली. जे कामगार मारामारी करत होते त्यांना सोडून संप मोडण्यासाठी पुढाऱ्यांनाच अटक करण्याचा त्यांचा डाव होता. लेखकावर स्थानिक पीएसआयचा खून करण्याचा आरोप होता तर शांत स्वभावाचे त्याचे मित्र, शिवाजी कागणीकर यांच्यावर रॉकेल ओतून पोलीस स्टेशन जाळण्याचा आरोप होता.

तुरुंगात गेलेल्या कार्यकर्त्यांनी जामीन घेण्यास नकार दिला. स्वातंत्र्यपूर्व काळातील स्वातंत्र्य सैनिकाप्रमाणे कामत यांनी तेथेही विधायक कार्यक्रम करून सर्व कैद्यांचे मनोधैर्य उंचावत होते. या सर्व उपक्रमामध्ये त्यांना एक प्रश्न सतावत होता. ट्रेड युनियनच्या लढ्यांना यश मिळाले तरी या उर्जेचा वापर राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक परिवर्तनात कसे करता येईल याचे उत्तर काही सापडत नव्हते. परिवर्तनाचा एक भाग म्हणून कामगारांच्या पत्नींना मोठ्या प्रमाणात महिला दिवस पाळण्यासाठी उत्तेजन दिले. कारण तोपर्यंत (व आजही!) महिला दिवस फक्त मध्यम वर्गीय महिलांसाठीच आहे अशी समजूत होती. व्यापक समाज परिवर्तनाची आस असलेल्या या दंपतीला कामगारांची ही स्वार्थी वागणूक आवडली नाही. बेळगावच्या पॉवरलूम वर्कर्स युनियनच्या आंदोलनाबद्दल अजून भरपूर काही लेखकानी सविस्तर माहिती दिली आहे.

५-६ वर्षे बेळगाव येथील कामगाराबरोबर काम केल्यानंतरही लेखकांना पूर्ण समाधान नव्हते. या कामगारांना भांडवली व्यवस्थेतील धोके व मार्क्सच्या विचाराबद्दल अजिबात आपुलकी नाही, हे लेखकाच्या लक्षात येऊ लागले. लेखकाला मात्र राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक नैतिक परिवर्तनाची अपेक्षा होती. समाजात नवीन मूल्ये रुजविण्याचे प्रयत्न करायला हवे असे वाटत होते. त्यामुळे त्यांच्या आशा-आकांक्षांना पूर्ण करू शकणाऱ्याच्या शोधात ते होते.

नेमके त्याच वेळी धारवाड येथील ‘आयडीएस’ या संस्थेचे सर्वे सर्वा डॉ .एस आर. हिरेमठ या अमेरिकेतील गले लठ्ठ पगाराची नोकरी सोडून कायमचे भारतात राहण्यासाठी आलेल्या इंजिनियरच्या संपर्कात ते आले. ग्रामीण भागात आरोग्य, शिक्षण, रोजगार याबद्दलची काम करणाऱ्या या संस्थेला पर्यावरण रक्षणाच्या क्षेत्रात काम करायचे होते. कारण तुंगभद्रा नदीच्या परिसरातील खेड्यात दूषित पाण्यामुळे जलजन्य आजाराचे बळी झालेल्यांची संख्या वाढत होती. त्याचे मूळ शोधताना हरिहर येथे बिर्ला या उद्योजकाची रेयान या सिंथेटिक धाग्यांचे उत्पादन करणारी फॅक्टरी होती. कर्नाटक सरकारच्या जंगल जमिनीवरील झाडे तोडून ही फॅक्टरी पोसली जात होती. याच अरण्य क्षेत्रात कुणालाही उपयोगी नसलेले नीलगिरी, अकेशीची झाडांची लागवड करून कमी भावात विकली जात होती. व फॅक्टरीतील दूषित पाणी नदीत सोडले जाते. तेच पाणी पिल्यामुळे अनेक जणांचे आरोग्य बिघडले. फॅक्टरीच्या लक्षात आले तरी प्रदूषण करणे थांबविणार नव्हते. कारण राजकीय नेत्यांचा त्यांना आशिर्वाद होता. राजकारणी व भांडवलदारांची मिलिजुली संबंध लक्षात आल्यावर ही संस्था तुंगभद्रा परिसरातील पर्यावरणाच्या रक्षणेसाठी ‘समाज परिवर्तन समुदाय’ (एसपीएस) या नावाची संघटना उभी केली. लेखकाला आपल्या अनुभवांचा व शिक्षणाचा येथे छानपैकी उपयोगात आणणे शक्य झाले. लेखकाने या संघटनेच्या आंदोलनाचे फार सुंदरपणे वर्णन केले आहे.

रामकृष्ण हेगडे, बंगारप्पा यांच्यासारख्या मुरब्बी राजकारण्यांचा डाव या संघटनेनी उधळला. कर्नाटक पॉलीफायबर कंपनी लिमिटेड (केपीसीएल) या नावाने ओळखल्या जाणाऱ्या बिर्लाच्या फॅक्टरीवर खटला भरला. न्यायालयाची ही लढाईसुद्धा जिंकली. शेवटी जनांदोलनाच्या रेट्यामुळे केपीसीएलला गाशा गुंडाळावे लागले. जी एन सिंहा या तरुण कार्यकर्त्यानी त्या परिसरातील खेड्यातील युवकांची संघटना बांधली. १०० युवकांची सायकल रॅली काढली. ३०० किमी लांब असलेल्या बंगळूरू येथील पोलीस बंदोबस्तातील विधान सौधला घेरावो घातला. ही रोमांचक हकीकत प्रत्यक्ष वाचल्याशिवाय अनुभवता येत नाही व त्याचे महत्वही कळणार नाही.

हा सर्व इतिहास वाचत असताना एखादी छोटी संघटना व संघटनेचे नेतृत्व करणारे लेखक, डॉ हिरेमठ, रंजन रावसारखे निष्ठावंत कार्यकर्ते व तुंगभद्रा परिसरातील ग्रामस्थ काय काय करू शकले याची आपण कल्पनाही करू शकणार नाही. चिप्को आंदोलनाने प्रेरित होऊन या भागातील सामूहिक जंगल जमीन वाचविण्यासाठी ‘कित्तिको-हच्चिको’ हा सत्याग्रह करताना कुलुवळ्ळीच्या जंगलातील निरुपयोगी नीलगिरीची झाडं उपटून त्या जागी इतर प्रकारची झाडं लावण्याचा उपक्रम हाती घेऊन यशस्वीपणे राबून दाखविले. एसपीएस संघटनेने न्यायालयीन व रस्त्यावरील लढा लढण्यासाठी हजारो युवकांची शेतकऱ्यांची मानसिकता बदलल्यामुळे हे सर्व शक्य झाले असे लेखक नम्रपणे सांगतात. सामूहिक जमीनीची सरकारच्या तावडीतून सुटका करून ग्रामस्थांच्याकडे वर्ग झाल्यानंतरच हा लढा संपला.

याच सुमारास कारवार जवळील कैगा येथे अणुभट्टी केंद्र स्थापण्याच्या हालचाली वेग घेत होत्या. कर्नाटकातील पर्यावरण विषयक आंदोलनात लेखकांचा फार मोठा वाटा होता. या अणुभट्टीच्या विरोधातील जन आंदोलनाची धुरा होन्नावर येथील डॉ. कुसुमक्का यांच्याकडे होती. बेंगळूरू येथील अनेक वैज्ञानिकांनी पत्रकं छापून या प्रकल्पाला विरोध दर्शविला. यांच्या विरोधाला न जुमानता हा प्रकल्प कार्यान्वित झालासुद्धा. या संबंधात डॉ राजा रामण्णा व सुरेश प्रभू यांचे भाषण बेळगाव येथे ठेवले होते. तेव्हा लेखकानी भाषणाच्या वेळी प्रकल्पविरोधी पत्रके वाटून आपला निषेध नोंदविला.

खरे पाहता या प्रकल्पाला विरोध हा ‘पश्चिम घाट वाचवा’ या आंदोलनाचाच भाग होता. एसपीएसचासुद्धा यात सहभाग होता. ‘पश्चिम घाट वाचवा’ म्हणून गुजरातपासून केरळपर्यंत निघालेल्या पदयात्रेत या संघटनेने सक्रीय सहभाग घेतला. त्यावेळी वेळोवेळी काढलेल्या बुलेटिनचे संपादन लेखकांनी केले होते.

पर्यावरणातील लेखकांचा सहभाग वाढतच होता. लोक लेखकाला पर्यावरणवादी म्हणून ओळखू लागले. प्रदूषण विरोध व सामूहिक भूमीचे संरक्षण यातील त्यांच्या वाढता सहभागामुळे काहींनी तुम्ही सगळ्या गोष्टींचा विरोध करता, ‘कैगाचा अणु प्रकल्प नको, मोठी धरणं नकोत, नीलगिरीची झाडं नकोत, हे सर्व नको असल्यास तुम्हाला नेमके काय हवे?’ असे प्रश्न विचारत होते. त्यामुळे लेखकाला पर्यावरण व विकास यांच्याबद्दल गंभीरपणे विचार करावेसे वाटले. आपल्या येथील ब्रिटिश काळातील अरण्यविषयक ध्येय धोरणं स्वातंत्र्यानंतरसुद्धा काही जुजबी दुरुस्त्यासह तसेच ठेवल्यामुळे जंगल तोड मोठ्या प्रमाणात झाली, हे मान्य करायला हवे. लोकांचा सहभाग असल्यास हा विनाश थांबविणे शक्य आहे, असे लेखकाला वाटत होते. लेखकानीच उल्लेख केल्याप्रमाणे १८८०मध्ये महात्मा फुले यांनी याविषयीच्या धोक्याची सूचना दिली होती. परंतु नंतरच्या काळात आपण हे विसरलो होतो, याची कबूली लेखक देतात. बेळगावच्या गोरामट्टी व बळ्ळारीच्या हरपनहळ्ळी येथे ग्राम अरण्य समितीची स्थापना करून हा विनाश थांबविणे शक्य होईल हे सिद्ध करता आले. यासंबंधी शिवाजी कागणीकर व जी एन सिंहा यांचा सिंहाचा वाटा आहे, हे लेखक नमूद करतात.

नंतरच्या काळात लेखक ग्रामीण भागातील कृषी कामगारांसाठी संपूर्ण कर्नाटकातील विविध संघटनांना एकत्र करून फेवर्ड कर्नाटकद्वारे काम करू लागले. प्रत्येक जिल्ह्यात वर्कशॉप घेऊन कार्यकर्त्यांना प्रशिक्षित करण्याचे काम ते करू लागले. याचेच फलित म्हणजे ‘ग्राकुसं’- ग्रामीण कूलिकारर संघटने- ग्रामीण मजूरांची संघटना. कर्नाटकातील सर्व जिल्ह्यामध्ये पसरलेली ही संघटना सरकारमान्य संघटना असून त्याचे लाखोनी सभासद आहेत. या संघटनेचे अध्यक्ष एक महिला मजूर आहे याचे लेखक अभिमानाने उल्लेख करतात.

ग्राकुस केवळ आर्थिक अजेंड्याला प्राधान्य देत ट्रेड युनियनसारखे काम न करता सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयसुद्धा त्यांच्या अजेंड्यावर असतात. दर वेळी नवीन समस्या हाताळतात. एकदा दारूबंदीबद्दल त्यांनी आंदोलन केले. त्या वर्षी तर सरकारी ऑफिससमोर जाऊन ‘ऑफिसमध्ये लटकवलेले महात्मा गांधीजीचे फोटो परत द्या’ म्हणून आंदोलन केले. कारण हेच सरकार एका बाजूला गांधीजींना प्रिय असलेल्या दारूबंदीविषयी बोलते व दुसऱ्या बाजूला सढळ हाताने दारूच्या गुत्त्यासाठी लायसेन्स देत राष्ट्रपित्याचे अपमान करते. असे अनेक गंमतीशीर प्रसंगाची लेखक नोंद करतात. मुळात व्यवस्था बदलायला हवी हा समज कार्यकर्त्यांना आला हेही नसे थोडके!

१९९०मध्ये आर्थिक उदारीकरण पर्व सुरु झाले. जागतिक भांडवलशाही समोर शरणागती पत्करत नेहरू युगातील ग्रामोद्योग, सहकार, लहान उद्योजक, कार्मिकपर कायदे इत्यादींना तिलांजली देत सरकारी ध्येय-धोरणे मोठ्या उद्योगासाठी व कार्पोरेट्ससाठी राबवले गेले. कामगारांच्या न्याय हक्कावर कुऱ्हाड कोसळली. संसाधनांची लयलूट होऊ लागली. समर्थ वा विकसित राष्ट्राच्या पोकळ घोषणा जनतेला संमोहित करू लागले. विवेकाचा आवाज ऐकू येईनासा झाला. लेखक नवआर्थिक धोरणाच्या विरोधात ठिकठिकाणच्या शिबिरामध्ये बोलत होते. परंतु त्यांचा आवाज क्षीण होऊ लागला. त्यांना अभिमानास्पद वाटणाऱ्या संघटनांचे एनजीओकरण होऊ लागले. अशा स्थितीतसुद्धा अजूनही जीव तगून राहिलेल्या संघटनांना ते मदत करू लागले.

याच वेळी पुण्यातील नॅशनल सेंटर फॉर अड्व्होकसी या संस्थेच्या संपर्कात ते आले व त्यांनी कम्युनिटी लर्निंग मूव्हमेंट - समुदाय शिक्षण आंदोलन – या प्रक्रियेची सुरुवात केली. विविध भागातील कार्यकर्त्यांना शोधून समाज, देश, वर्ग, जाती, लिंग, व्यवस्था, शासन, प्रजाप्रभुत्व, नागरिकत्व, कायदे, संविधानाने दिलेले अधिकार, पर्यावरण, प्रदूषण इत्यादीत ते कार्यकर्त्यांना प्रशिक्षित करू लागले.

हरपनहळ्ळी येथील ‘रीच’ या संघटनेच्या प्रायोगिक प्रारंभा नंतर ही मूव्हमेंट राज्यभर पसरली. व लेखकांनी आपली ऊर्जा यासाठी केंद्रित केली. बेळगाव येथील परिवर्तन, राणेबेन्नूर येथील वनसिरी, दावणगेरे येथील स्फूर्ती इत्यादी संघटनासाठी नंतरची काही वर्षे खर्ची घातले. युवा कार्यकर्त्यांच्या चैतन्याला वाट करून देणाऱ्या या मूव्हमेंटने लेखकांना समाधान दिले.

बेळगाव येथील परिवर्तन चळवळीविषयी लिहितांना ‘मुलगी झाली हो’ या नाटकाच्या मराठी व ‘हेण्णु हुट्टितव्वा’ या कन्नड प्रयोगापासून सुरु झालेली ही चळवळ बालिका जन्मोत्सव, गर्भजल परीक्षेला विरोध, अशा विविध विधायक कार्यातून मोठी झाली. या गोष्टीसाठी त्या त्या क्षेत्रातील विचारवंताना बोलवून व्याख्यान ठेवण्यात ही संघटना पुढाकार घेत होती. या संघटनेबरोबर लेखकाची नाळ चांगली जोडली गेली.

समता समाजाचे स्वप्न प्रत्यक्षात उतरण्यास अजून फार वेळ लगाणार आहे याची कल्पना असूनसुद्धा प्रयत्नात कसूर करण्यास लेखक कधीच तयार होणार नाहीत, हेही तितकेच खरे.

या पुस्तकातील शेवटच्या काही पानात नीलिमा कामत यांनी त्यांच्या आयुष्याच्या इथपर्यंतच्या अनुभवावर आधारित विचार व्यक्त केलेले आहेत. मध्यम वर्गाच्या कुटुंबातून आलेले नीलिमा ग्रॅज्युएशन शिक्षणानंतर त्या स्टडी सर्कलच्या संपर्कात आल्या. तेथील चर्चा व तळमळ पाहून त्या स्टडी सर्कलच्या कामात सक्रियपणे भाग घेऊ लागल्या. कुठल्याही प्रकारचा मोह नसलेला, निगर्वी, क्रोध-मत्सर-द्वेष यापासून दूर असलेला साधा पण समृद्ध जीवन जगण्याची इच्छा असलेल्या लेखकाबरोबर आयुष्य जगण्याची संधी त्यांना मिळाली.

आई-वडिलांच्या सहवासातून मिळालेले अनुभव व सासू-सासऱ्यांचा सोशियल कॅपिटल याबद्दल ते मनभरून सांगतात. पॉवरलूमच्या संपाच्या वेळी दिलीपच्या जिवाला धोका असण्याच्या शक्यतेवर सासऱ्यानी दाखविलेले धैर्य व उपदेश व लायब्ररियनच्या पुढील शिक्षणासाठी सासूने दिलेला पाठिंबा ते कधीच विसरू शकत नाहीत.

दोघापैकी एकाने आर्थिक भार वाहण्याची गरज भासल्यानंतर लेखिका लायब्ररीमध्ये काम करू लागतात. लायब्ररीयनचे पद मिळवण्यासाटी पुढील शिक्षण पूर्ण करतात. ग्रंथपाल म्हणून निवृत्त होतात. नवऱ्याबरोबरच्या प्रत्येक लढ्यात त्यांचा वाटा होता. पावरलूम कार्मिकांच्या संपकाळात ते तुरुंगात असताना कार्मिकांच्या घरच्यांचे मनोधैर्य उंचावण्याचे व त्यांच्या आर्थिक अडचणींच्या निवारणासाठी मार्ग शोधण्याचे कामं ते करतात.

लायब्ररीतसुद्धा ते विद्यार्थ्यांचे कन्सल्टंट म्हणूनच ते करतात. परंतु यांच्या कन्सलट्न्सीमध्ये केवळ सल्ला नसून त्याचे लॉजिकल एंडपर्यंत पाठपुरावा करण्याची त्यांची तयारी असायची. आजच्या वाट्सअपच्या शब्दात सांगायचे असल्यास त्यांना चांगल्या अर्थाने इन्फ्ल्युएन्सर असे म्हणता येईल.

आपल्या आयुष्यात कुणालाही त्याग करण्याची जरूरी भासली नाही असे ते नमूद करतात. परंतु ‘स्व’चा अर्थ समजून घेत आनंदाने जगण्याची मजा और असते हे त्यांच्या लक्षात आले आहे. एक संतृप्त व समाधानी आयुष्य हे जोडपे जगत आहे हे पुस्तक वाचून संपविताना वाचकाला वाटू लागते. हेच या पुस्तकाचे यश आहे.

गेल्या ४०-५० वर्षाच्या या कालखंडात या दंपतीच्या समर्पित जीवनातील घडामोडींना शब्दरूप देवून आपल्यापर्यंत पोचविणे कठिण असले तरी ए आऱ वासवी यांनी या दंपतीला बोलते करून त्यांच्या अनुभवांचे सारांश कन्नड भाषिकांना उपलब्ध करून दिल्याबद्दल कर्नाटकातील विविध समस्यावर कार्यरत असलेले कार्यकर्ते व या पुरोगामी विचारांना प्रोत्साहन देणारे वाचक डॉ. वासवींचे नक्कीच ऋणी राहतील.

ಸ್ವ-ಅರ್ಥಃ ಸಾಮೂಹಿಕ ಒಳಿತಿನೆಡೆಗೊಂದು ಪಯಣ
स्व-अर्थः सामूहिक हितासाठी केलेला प्रवास
दिलीप कामत व नीलिमा कामत
अभिरुची प्रकाशन, मैसूरू
पृ.सः १००, किः २२०रु

अहिरावण Wed, 30/07/2025 - 12:34

>>.त्यांच्या अनुभवांचे सारांश कन्नड भाषिकांना उपलब्ध करून दिल्याबद्दल

कन्नडीगांचे काय गुण गाताय? मराठी वाचत नाही का तुम्ही? एकंदर तुमच्या भुक्कड मराठी लेखनावरुन तो अंदाज येतोच