वाहवा वाहवा
काही वर्षांपूर्वीची गोष्ट.
"अहो सिंधुआज्जी, ही सुटाबुटातली माणसं आलीयेत दोन. तुमच्या घरी यायचं म्हणताहेत," सोसायटीच्या वाॅचवुमनचा फोन आला.
"सुटाबुटातल्या माणसांना प्रवेश निषिद्ध!" सिंधुआज्जींनी उत्तर दिलं, आणि स्वतःशीच गगनभेदी स्मितहास्य करून मग पुस्ती जोडली, "पण बूट बाहेर काढले तर सुटातल्या माणसांचं स्वागत आहे."
पाहुण्यांचं स्वागत झालं. चहा झाला. नवलकोल आणि बेळगावी कुंदा झाला. आणि मग चर्चेला सुरूवात झाली.
"मी मिस मेरी भोर. आमची कंपनी बायोटेकमध्ये काम करते. काळाच्या ओघात नामशेष झालेल्या प्राण्यांचं पुनरूज्जीवन करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. डोडो पक्ष्याचं पुनरूच्चाटन करण्याचा आमचा मानस आहे." मेरी भोर यांनी एका दमात सांगितलं.
"बरं. आणि तुमचं नाव काय? तुम्ही काही म्हणालात का?" सिंधुआज्जींनी दुसऱ्या पाहुण्याला विचारलं.
"आय ॲम मिस्टर मॅकॲडम्स, ॲन्ड आय हॅवन्ट सेड अ वर्ड," मॅकॲडम्स म्हणाले. "बट आय वाॅज अबाऊट टू. पुनरूच्चाटन नव्हे, पुनरूज्जीवन."
"हो हो, ती माझी फ्राॅईडियन स्लिप होते म्हणा," मेरी भोर म्हणाल्या. "पण ते असो. कामाचं बोलूया. डोडो पक्ष्याशी जनुकीय साधर्म्य असलेला पक्षी म्हणजे निकोबार कबुतर. रिसर्चसाठी त्या कबुतरांची गरज आहे. आणि निकोबार बेटांचा सखोल अभ्यास असलेली व्यक्ती म्हणजे सिंधुआज्जी अशी तुमची त्रिलोकात कीर्ती आहे. सबब, निकोबार कबुतरं प्राप्त करण्यासाठी आम्हाला मदत करा असं साकडं घालतो."
"ओके. चला," असं म्हणत सिंधुआज्जी उठून उभ्या राहिल्या. मागोमाग मेरी भोर आणि मॅकॲडम्सदेखील उठून उभे राहिले. सिंधुआज्जींनी आपलं बाॅम्बार्डिअर जॅकेट घातलं आणि कमरेला बटवा बांधला; पाहुण्यांनी बूट घातले, आणि तिघे मोहिमेवर निघाले.
काॅर्न टिक्की या बालसा लाकडाच्या तराफ्यावरून प्रवास करताना सागरी वादळामुळे मार्ग भरकटणे, सोमाली चाच्यांची मदत घेऊन पुन्हा सुयोग्य मार्गावर परतणे, निकोबारला पोहोचल्यावर निकोबारीज आणि शाॅम्पेन जमातींसोबत वाटाघाटी करणे, आणि यथावकाश निकोबार कबुतरे हस्तगत करणे या घटना कालानुक्रमे घडल्या. परतीचा प्रवास संपत आला तेव्हा एक लहानसा अपघात घडला, आणि एका पिंजऱ्याचं दार उघडं ठेवलं गेल्याने काही निकोबार कबुतरे पोबारित झाली.
आज सिंधुआज्जींच्या बिऱ्हाडात पुनरुज्जीवित केलेला भलाथोरला डोडो राहतो. आणि शहरात अनेक ठिकाणी निकोबार कबुतरखाने प्रस्थापित झाले आहेत.
हा हा हा!
मूळची कबूतरखान्याबद्दलची माहिती सोशल मिडियावर उडत उडत वाचली होती. पण तुझी प्रेरणा मॅकॅडम्सनं
पुनरुच्चाटनपुनरुज्जीवन ही चूक सुधारणं, ही असावी; असा संशय आहे.शिवाय खूप दिवसांत कॉर्न टिक्कीची उच्चारणा न झाल्यामुळेही सिंधुआज्जींची आठवण झाली असावी!