द मेझनीन
लहान मुलाला नाड्या असलेले बूट देणं हा बाल्यावस्थेतून बाहेर पडतानाचा एक महत्त्वाचा संस्कार आहे असं मला वाटायचं. माझा मुलगा साधारण सहा वर्षांचा झाल्यावर माझ्या असं लक्षात आलं की अलीकडे शाळा - सोयीसाठी म्हणून किंवा तंत्रज्ञानाची प्रगती झाली आहे म्हणून - गणवेशात वेल्क्रो असलेले बूट ठेवतात. त्यामुळे ज्या वयात मुलं नाड्या बांधायला शिकायची त्या वयात ती त्या बांधायला शिकत नाहीत. याचा सगळाच दोष बुटांच्या माथी मारता येणार नाही. नाड्या किंवा गाठी बांधून एका जागी राहणाऱ्या अनेक वस्तूंमधल्या नाड्या अलीकडे लुप्त झाल्या आहेत. चड्ड्या, परकर, पायजमे, रिबिनी अशा सगळ्या गोष्टींमधल्या नाड्यांची जागा आता इलॅस्टिकनं घेतली आहे. त्यामुळे अनेक महत्त्वाच्या, बाक्या प्रसंगांत वेळ वाचतो हे खरं असलं तरी, जिथे वेळ वाचवायची आवश्यकता नसावी - उलट तो जितका हळूहळू जाईल तितकं प्रसंगाचं सौंदर्य वाढावं - अशा कॉर्सेटच्या नाड्याही आता लुप्त झाल्या आहेत. गाठी आणि नाड्या बांधता आणि सोडता येणं हे आता खरंच अत्यावश्यक कौशल्य राहिलं आहे का, याचा मीही विचार केला. पण आपल्याला जे येतं ते, आणि आपल्याला जे येत नाही तेही, असं सगळं आपल्या मुलाला आलं तरच उत्क्रांतीला अर्थ आहे असा एक गैरसमज मी बाळगून होते.
नाड्या बांधणे, बांधता येणे, बांधलेल्या नाड्या सोडता येणे (हे जास्त महत्त्वाचं आहे), गरज पडल्यास नाड्या आवळता येणे - या सगळ्याचा आपणच विचार केला आहे असं वाटून स्वतःच्या या (निरुपयोगी) निरीक्षणशक्तीबद्दल अनभिज्ञपणे समाधानी असताना माझ्या हातात ‘द मेझनीन’ हे निकोलसन बेकरचं पुस्तक पडलं. तुम्हाला जर रोजच्या आयुष्यातल्या अतिशय फालतू गोष्टीचा खोलात जाऊन अतिविचार करायची सवय असेल तर हे पुस्तक तुम्हाला नक्की आवडेल. हे पुस्तक आवडणाऱ्या लोकांचा एक विशिष्ट पिंड असावा हे आधीच सांगायला हवं. अतिविचार करणारे, सदैव चिंतातुर, किंवा समोर आलेल्या वस्तूकडे भान हरपून लक्ष देणारे, आजूबाजूच्या जगाचं निरीक्षण करणारे, कदाचित थोडे एकांतप्रिय, तळटीपा आवडणारे, त्या मनापासून लिहिणारे किंवा इतरांच्या तळटीपा मनापासून वाचणारे, काळ या संकल्पनेबद्दल विशेष प्रेम असणारे आणि काळाच्या पटलावरून स्वतःला वगळूनही त्याचा स्वतंत्रपणे विचार करू शकणारे - अशा लोकांना हे पुस्तक अगदी मनापासून आवडेल.
मेझनीन म्हणजे पोटमजला. बरीच ऑफिस असलेल्या एका इमारतीच्या पोटमजल्यावरच्या एका कंपनीत काम करणारा एक कर्मचारी (हॉवी) दुपारच्या जेवणाच्या सुटीत बाहेर पडतो. बाहेर जाण्यासाठी म्हणून बुटाची नाडी बांधत असताना ती तुटते आणि तिथून या माणसाची विचारांची गाडी सुटते. बाहेर जाऊन दूध, बिस्किट१, एक पुस्तक आणि बुटांसाठी नवीन नाड्या घेऊन तो परत येतो. या काळात त्याच्या डोक्यात आलेल्या विचारांची शृंखला त्यानं लिहून काढली आहे. शिवाय जे विचार त्या साखळीत सरळ बसत नाहीत, त्यांच्यासाठी तळटीपांची एक समांतर साखळी तयार केली आहे. साधारणपणे अर्धं पान मुख्य विषयाला आणि उरलेलं अर्धं तळटीपांना अशी विभागणी असल्यानं, कधी दोन पानांचा वरचा भाग आधी वाचला जातो, कधी खालचा भाग आधी वाचला जातो. कधीकधी त्याच्या तळटीपांचा कंटाळा येऊन अर्धंच पान वाचलं जातं आणि नंतर केवळ कुतूहलापोटी मागे फिरून पुन्हा तळटीप वाचली जाते.
फार पूर्वी२ कोकाकोला किंवा तत्सम शीतपेयं पिण्यासाठी कागदी स्ट्रॉ असायचे. त्या स्ट्रॉचं वजन, पेयांची घनता आणि त्यांच्याल्या कर्बवायूचा उतावीळपणा - हे सगळं सोसून कागदी स्ट्रॉ गप्पपणे त्या पेयात उभे राहायचे. नंतर कधीतरी त्यांच्या जागी प्लॅस्टिकचे स्ट्रॉ आले. ते तयार करताना अभियंत्यांचा कोणता तरी एक अंदाज चुकल्यानं किंवा वजनदार प्लॅस्टिक उपलब्ध नसल्यानं, ते प्लॅस्टिकचे स्ट्रॉ शीतपेयातून उसळून बाहेर येऊ लागले. मग त्यांना एका जागी ठेवायला शीतपेयांच्या कागदी झाकणावर जे छिद्र असायचं ते त्यांना घट्ट पकडून ठेवेल असं केलं गेलं. पण तरीही काचेच्या बाटल्यांतून किंवा कॅनमधून ते उसळून बाहेर येतच राहिले. याबद्दल लेखकानं अतिशय गंभीरपणे एक संपूर्ण प्रकरण लिहिलं आहे३.
बुटांच्या नाड्या, कोलाचे स्ट्रॉ, दूध विक्रीसाठी वापरले जाणारे पुठ्ठ्याचे डबे, सार्वजनिक स्वच्छतागृहांतून ठेवले जाणारे कागदी नॅपकिन (आणि त्यांचा अंत!), व्हेंडिंग मशीन, एस्कलेटर, कानात घालायचे ध्वनीरोधक बोळे४ , सीव्हीएस नावाच्या दुकानात मिळणाऱ्या अनेक वस्तू, विशेषतः शाम्पू - अशा अनेक वस्तूंच्या उदयास्ताबद्दल आणि मधल्या सगळ्या अवस्थांतरांबद्दल लेखक सांगत असताना कधीतरी माझ्या लक्षात आलं की हे खास अमेरिकन अस्तित्ववादी लेखन आहे. पहिल्या काही पानांतच लेखक हे स्मरणरंजन नाही हे स्पष्ट करतो. आपल्याला अनेकदा असं वाटतं की एखाद्या गोष्टीबद्दल, प्रसंगाबद्दल, वस्तूबद्दल, तंत्रज्ञानाबद्दल आपल्याला असलेलं ममत्व आपल्या बालपणातल्या स्मरणरंजनातून आलेलं आहे. बालपणीच्या आठवणी तीव्र असतात. कदाचित आपलं मनही ताजं आणि कुरकुरीत असल्यानं लहानपणीच्या आठवणी ते जरा जास्त कोरून लिहीत असावं. किंवा आपल्या भावविश्वाचा परीघच लहान असल्यानं त्या आठवणी तुलनेनं मोठ्या वाटत असतील. ते काहीही असलं, तरी आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल रिकामा आणि निरुद्देश विचार करावासा वाटणं याकडे आपण लहान मुलांचा खेळ म्हणून थोड्या तुछतेनं बघतो. पण बेकरचं लेखन वाचताना त्यात मनावर कोणताही ताण नसलेल्या एखाद्या लहान मुलाचं कुतूहलही आहे, आणि गणित, विज्ञान आणि भाषेचा अभ्यास असलेल्या एखाद्या प्रौढ व्यक्तीचा पद्धतशीरपणा, टापटीपही आहे असं प्रकर्षानं जाणवतं. या दोन्ही गोष्टी प्रौढ वयात टिकवून ठेवणं म्हणजे एक प्रकारे, आपली यंत्रं करू बघणाऱ्या व्यवस्थेच्या डोक्यावर पाय देऊन उभं राहण्यासारखंच आहे.
त्याच्या लहानपणीच्या आठवणी वाचताना सहा वर्षांचा अजून एक अमेरिकन अस्तित्ववादी आठवतो - बिल वॉटर्सनचा कॅल्विन! आपल्या आजूबाजूच्या निर्जीव वस्तूंचं अथक निरीक्षण करून त्यांचा आणि आपला एकत्र प्रवास मांडणारा हा खास अमेरिकन अस्तित्ववाद आहे. ही भाषा सरळ, साधी आहे. आपल्याला जो अर्थ वाचकापर्यंत पोहोचवायचा आहे त्यासाठी उपलब्ध शब्दांतून कमीत कमी आणि सोप्यात सोपे शब्द वापरून लिहिलेली, तांत्रिकदृष्ट्या अचूक वर्णनं आहेत५. ते वाचताना अधूनमधून डिडियन किंवा हेमिंग्वेचीही आठवण येते. या लेखनातला विनोद लेखनाच्या कृतीतूनच येतो. एखादा प्लास्टिकचा स्ट्रॉ कोकाकोलामध्ये ठेवल्यानंतर, त्यातल्या कर्ब वायूमुळे आणि स्ट्रॉच्या अंगभूत हलकेपणामुळे तो तरंगून वर का येतो याबद्दल साडेतीन पानं लिहिता येणं हाच विनोद आहे. पण त्या साडेतीन पानांतली प्रत्येक ओळ वाचकानंही अनुभवलेली असते हा अस्तित्ववाद आहे. यापुढे कुणीही जर युरोपियन किंवा ब्रिटिश साहित्याबद्दल उसासे टाकण्यासाठी म्हणून अमेरिकन साहित्याला लाथा घालायचा प्रयत्न केला तर मी त्यांच्या तोंडावर हे पुस्तक फेकून मारणार.
एका प्रकरणात लेखक अमेरिकेतल्या घरपोच सेवा कशा बंद झाल्या याबद्दल लिहितो. सुरुवातीला (म्हणजे लेखकाची आठवण जिथून स्पष्ट आहे तिथून) घरी काचेच्या बाटल्या येत. आधीच्या दिवशीच्या बाटल्या रात्री दारात ठेवायच्या. पुढे काचेच्या बाटल्या गेल्या आणि पुठ्ठ्याचे डबे आले. हळूहळू ही घरपोच सेवा बंद झाली. त्याच्या कुटुंबानं ती बंद पडेपर्यंत तिचा लाभ घेतला. जेव्हा ती बंद झाली तेव्हा दुधाचा रतीब असणारं त्यांच्या गल्लीतलं ते एकमेव कुटुंब होतं. एखादं तंत्रज्ञान, सेवा, व्यवस्था नावीन्याच्या आणि नावीन्य अधिकाधिक परवडू लागण्याच्या रेट्यानं कालबाह्य होते. अशा अनेक गोष्टी पुढच्या पिढ्यांच्या हयातीतही घडल्या. पण लेखकानं इतक्या गोष्टींबद्दल इतके सूक्ष्म विचार केले असले, अगदी भविष्यात जेवायची एक गोळी येईल असं भाकीत केलं असलं (आणि ती आलीच की! फक्त ती घेतल्यानं जेवण जात नाही इतकंच!) तरी त्याच्या टेबलावरच्या फोनचं रंगरूप त्याच्याच देशात तयार होणाऱ्या तंत्रज्ञानानं इतकं बदलून जाईल हे त्याला जाणवलेलं दिसत नाही६. त्या दुधाच्या रतिबाची गोष्ट वाचून आजूबाजूचे अनेक लोक डोळ्यासमोर तरळून गेले. संगणकांना, स्मार्टफोनना, सोशल मीडियाला ठाम विरोध असणारे आणि मग काळाच्या ओघात कधीतरी त्यांना शरण गेलेले. नाविन्याच्या रेट्याचं विश्वरूप सध्या आपल्या समोर उलगडतं आहे. आता आपण केवळ एखादी गोष्ट नुकतीच बाजारात आली आहे एवढ्या एकाच कारणानं कितीही पैसे देऊन ती घ्यायला तयार होतो. त्यामुळे कधीतरी आपल्याच शरीरातून बाहेर जाऊन स्वतःकडे बघितल्यावर आपण किती वेडे आहोत असं वाटायला लागतं७!
हे पुस्तक वाचत असताना अजून एक जाणीव होत राहते. आपण जन्मालाही आलो नव्हतो त्या काळाबद्दल आपल्याला एक विचित्र हुरहूर वाटू लागते. ज्या काळात ऑफिसांतून संगणक नव्हते, कागदांवर मेमो लिहायची पद्धत होती; प्रत्येक ऑफिसात स्त्री सेक्रेटरींच्या फौजा असायच्या; व्हेंडिंग मशिनांतून सिगरेटची पाकिटं काढता यायची - अशा काळातलं आयुष्य जास्त सुखी समाधानी असावं असा (उगाचच) समज होतो. आणि आपण हे काहीही अनुभवलेलं नसतानाही, आपल्या सद्य परिस्थितीबद्दल कीव वाटायला लागते. आपण अनुभवत असलेला काळ आपल्या स्मृतींना किंवा कल्पनाशक्तीला किती घट्ट बांधलेला असतो याची जाणीव या सगळ्या निर्जीव वस्तू करून देत राहतात. आपण आपल्या सोयीसाठी म्हणून तयार केलेल्या वस्तूंचेही काळ होतात. ते आपल्याला अशा लेखनातून किंवा ‘दागेरेओतीप’ सारख्या एखाद्या सिनेमातून अनुभवता येतात८. आपल्या आजूबाजूला असणाऱ्या आणि सतत बदलणाऱ्या जगाचा, आणि त्यात आपल्या वाहून जाणाऱ्या अस्तित्वाचा अर्थ कसा लावायचा? आपण त्या बदलांचं निरीक्षण करून ते टिपून ठेवू शकतो एवढाच अर्थ पुरेसा असावा. याचा खोलात जाऊन विचार केला तर लक्षात येतं की अशा फार कमी गोष्टी आहेत ज्या पूर्णपणे आपल्या हातात असतात. एकतर आपल्या आयुष्यावर आपलं नियंत्रण आहे असं स्वतःला समजावत राहायचं किंवा मग या गोल गोल फिरणाऱ्या जगातून येणाऱ्या व्याकुळतेला सामोरं जायचं - असे दोनच पर्याय आहेत असं वाटतं. पण एक तिसरा पर्याय आहे (अर्थात, आपल्याकडे पर्याय आहेत हीच मोठी स्वफसवणूक आहे, तरीही!). आपण स्वतःला निरीक्षकाच्या भूमिकेत ठेवून जगाकडे बघू शकतो. या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर दिलेल्या सरकत्या जिन्याचं रूपकच करायचं झालं, तर असं म्हणता येईल की आपला आणि आपल्या काळाचा प्रवास त्या सरकत्या जिन्यासारखा आहे. पण आपल्या या अशा लहान लहान निरीक्षणांमुळे कोणत्याही वयात, कशाही मनःस्थितीत आपल्याला आपला प्रवास अगदी क्षणार्धात पुन्हा बघता येतो, अनुभवता येतो, त्याबद्दल तळटीपसंपृक्त पुस्तक लिहिता येतं आणि सरकत्या जिन्याच्या पहिल्या पायरीवरही न उगवलेल्या एखाद्या वाचकाला आनंद देता येतो, हाच आपल्या आयुष्याचा अर्थ?
१. खरंतर हे खास अमेरिकेतच सापडणारं मऊ चॉकलेट कुकी आहे. मराठीत त्याला काय म्हणावं? मुद्दाम सादळवलेलं बिस्कीट? मी अमेरिकेतल्या ज्या भागात राहायचे, तिथे मैलभर चालून गेल्यावर लागणाऱ्या एका बिग बी नावाच्या कॉफीच्या दुकानात असं मोठं सादळलेलं कुकी मिळायचं. पण माझ्या तिथल्या वास्तव्यात मला एकदाही ते विकत घ्यावंसं वाटलं नाही. पुण्यातल्या अमृततुल्य दुकानांच्या चकचकीत स्टीलच्या गल्ल्यांवर, काचेच्या बाटल्यांमध्ये क्रीमरोल, टोस्ट, नानकटाई असे अनेक खाद्यपदार्थ ठेवलेले असतात. त्या वस्तू खाण्यासाठी नसून शोभेसाठी असतात असा माझा अनेक वर्षं समज होता. तशीच ही चॉकलेट चिप कुकी असतात असं मला वाटायचं. पण भारतात परत आल्यावर एकदा अमृततुल्य चहाबरोबर टपरीतल्या स्टीलच्या टेबलवर बसून मी क्रीमरोल खाऊन बघितला आणि हे पुन्हा पुन्हा खाण्याचं व्यसन लागू नये अशी प्रार्थना स्वतःच्या मनोबलाकडे केली.
२. बेकर १९५७ साली जन्माला आला. पुस्तक १९८८ मध्ये प्रसिद्ध झालं. म्हणजे या दोन सालांच्या मध्ये कुठेतरी. पण मला काय? माझा जन्म हे पुस्तक प्रकाशित होण्याच्या आसपासचा आहे. माझ्यासाठी फार पूर्वी म्हणणं पुरेसं आहे. आणि विशेष म्हणजे मी यापुढे ज्या गोष्टीबद्दल लिहिणार आहे ती आता पुन्हा बाजारात आली आहे.
३. गोल्डस्पॉटच्या बाटलीतून बाहेर येणारा स्ट्रॉ माझ्याही लहानपणीच्या काही महत्त्वाच्या आठवणींपैकी एक आहे. मला खात्री आहे, हे प्रकरण वाचणाऱ्या, ८० - ९० च्या दशकात जिवंत असलेल्या, आणि पोराला कौतुकानं गोल्डस्पॉट प्यायला देऊन, शिवाय आपण शेजारी उभं राहून सिगरेट ओढणारे पालक असलेल्या प्रत्येकाला, तरंगणाऱ्या स्ट्रॉची आठवण मेंदूतून उपसून काढता येईल. असं झालं की जो आनंद होतो त्याला एकच शब्द हवा (मला खात्री आहे जर्मन किंवा जपानी भाषेत असा शब्द असेल).
४.आधी त्याचा इयरप्लग हा शब्द वाचून मला आम्ही कानात घालतो ते गाणी ऐकवणारे बोळे वाटले. पण १९८८ साली वॉकमनबरोबर हेयरबँडसारखे आणि दोन्ही टोकांना गोल स्पंज लावलेले हेडफोन असायचे असं लक्षात होतं. आपला नायक गाणी ऐकायला नव्हे तर आजूबाजूला ऐकू येणारे नेहमीचे आवाजही ऐकायला लागू नयेत म्हणून कानात बोळे घालून फिरतो! किती ते कौल्य!
५. इतक्या सगळ्या वस्तूंबद्दल पुरेसं खोलात जाऊन सांगायला फक्त १३५ पानं! एवढ्या पानांत प्रूस्तचं एक वाक्यंही संपत नाही.
६. हा त्याचा दोष म्हणता येणार नाहीच. आज आपण सगळे जगाचा अंत एआय करणार आहे असं समजून त्याकडे डोळे लावून बसलोय. पण न जाणो, एखाद्या माठ हुकूमशहाच्या हातूनच तो पारंपरिक पद्धतीनंच होणार असेल!
७. चार महिन्यांपूर्वी, मला एक अत्यंत नावीन्यपूर्ण फोन घेण्याची प्रबळ इच्छा झाली होती. अनेक दिवस त्या फोनचा पाठलाग करून झाल्यावर मी तो घेण्याच्या दिशेने पावलं उचलली आणि मला एकदम एका सुज्ञ वैराग्यानं ग्रासून टाकलं. त्या वैराग्याच्या झटक्यात मी फोन घेण्याचा बेत रद्द केला. मागच्या आठवड्यात मला फोन विकणाऱ्या ॲपनं आग्रहानं हळदकुंकवाचं आमंत्रण दिल्यासारखं खरेदीला बोलावलं. पुन्हा तो फोन बघितला तर आता त्याची किंमत पस्तीस हजारानं कमी झाली होती. मग मी विचार केला:
अ. मी तो चार महिन्यांपूर्वी घेऊन आत्ता किंमत बघितली असती तर मला वाईट वाटलं असतं.
ब. मी तो आत्ता घेतला आणि अजून चार महिन्यांनी त्याची किंमत बघितली तरी मला वाईट वाटेल.
क. मी तो चार महिन्यांपूर्वी घेतला असेल आणि आज तोच फोन इतर कुणी स्वस्तात घेतला असेल तर त्यांच्यासमोर, "याची किंमत अमुक अमुक रुपये असताना मी तो घेतला आहे त्यामुळे तुमचा आणि माझा फोन तांत्रिकदृष्ट्या पूर्णपणे सारखाच असला तरी माझा तुमच्यापेक्षा जास्त मौल्यवान आहे" असं बावळट विधान मी करू शकणार नाही.
ड. त्या फोनचा महागडा वंशज घेतला तरी त्याचा अजून महागडा वंशज चारच महिन्यांत तयार होणार आहे.
त्यापेक्षा असे विचार करत बसणं, जगत राहण्यासाठी जास्त उपयोगी (आणि कमी खर्चाचं, दुःखाचं) आहे. आपण संपूर्णपणे स्वेच्छेने कशाचीही निवड करत नसतो हे आयुष्याच्या एका टप्प्यावर लक्षात आल्यावर मग निवड करण्यातला सगळा रोमान्स संपून जातो. तसं काहीतरी झालं असावं. हे पुस्तक वाचताना त्या प्रसंगाची सतत आठवण येत राहिली.
८. दागेरेओतीप या आन्येस वर्दाच्या सिनेमाची आठवण यायचं कारण त्यातही पॅरिसमधल्या एका रस्त्यावरच्या दैनंदिन घडामोडींचं काहीसं निरुद्देश चित्रण आहे. पण जुने सिनेमा बघून आपणही आत्ताच्या काळापेक्षा त्या सिनेमातल्या काळात तरुण असतो तर जास्त बरं झालं असतं असं मला भारतीय सिनेमे बघूनही अनेकवेळा वाटलेलं आहे. उदाहरणार्थ, आपलं आयुष्य 'छोटीसी बात'मधल्या प्रभासारखं असायला हवं होतं असं मला तो सिनेमा बघताना नेहमी वाटतं. कोबीचे गड्डे वाटावेत एवढी मोठाली गुलाबाची फुलं असलेल्या नायलॉनच्या साड्या नेसून, बेस्ट बशीतून फोर्टला कुठल्यातरी महत्त्वाच्या ऑफिसात बिनमहत्त्वाची, कमी ताणाची नोकरी करायची; जाता-येता मिल्स अँड बून्स छापाच्या कादंबऱ्या वाचायच्या; ऑफिसातल्या मैत्रिणींना बसमध्ये आपल्यावर लाईन मारणाऱ्या पुरुषांचे किस्से सांगायचे - किती छान आयुष्य आहे हे! एखाद्या समांतर विश्वात मी प्रभा असावं असं मला नेहमी वाटतं. मात्र त्या समांतर विश्वातही मी अरुणसारख्या क्रिपी माणसाच्या प्रेमात पडणार नाही. उलट मला अलीकडे असं वाटायला लागलं आहे की जर प्रभासारखं आयुष्य मिळालं, आणि त्यात कुणी बाहेरचा स्टुपिड पुरुष आला नाही तर न्यूटनच्या पहिल्या नियमाप्रमाणे तसं आयुष्य त्या जीवाच्या अंतापर्यंत कोणताही व्यत्यय न येता आनंदानं घालवता येईल.
बुटाच्या नाड्या
मला बुटाच्या नाड्या नीट बांधता येत नाहीत. बांधल्या की त्या अर्ध्या तासाच्या आतच सुटतात. मग कधी तरी एका बुटांना किंचित इलॅस्टिक असणाऱ्या नाड्या आल्या आणि मग नाड्यांमुळे धडपडण्याची भीती कमी झाली.
आता मला लक्षात येत आहे की एक-वादी-एक-अंगठा अशा चपला घालणाऱ्या आईवडलांची ही चूक होती. ही माझी चूक नव्हती.
पुस्तक वाचायच्या यादीत टाकलं आहे.
तळटीपा
नबांना तळटीपा लिहायला आवडतात आणि मला त्या वाचायला आवडतात. म्हणजे आम्ही दोघेही एकाच कॅटेगरीतले आहोत का ? लेखन आवडलं. मला साधारण ३० व्या वर्षी बुटाच्या नाड्या बांधता यायला लागल्या. आणि त्या जर एक्स्ट्रॉ लांब असतील तर, त्या चालताना पायात येऊ नयेत म्हणुन कशा आणि कुठे खोचायच्या, हे गेल्या सहा महिन्यांपुर्वीच समजले आणि आर्किमिडीस एवढा आनंद झाला.
छान लिहिता तुम्ही
छान लिहिता तुम्ही . प्रत्येकवेळेस तुमच्या लेखावर प्रतिक्रिया देता येतेच असं नाही पण तुम्ही आवर्जून वाचावं असं लिहिता. ऐसीवर पोचपावत्या कमी येतात पण तरीही लिहित रहा.
मलाही नाड्या बांधायचा फार त्रास होता. पण मी मोठा होईपर्यंत इलॅस्टीकचा तेवढा प्रसार झालेला नव्हता किंबहुना चड्डी व्यतीरिक्त बाकी कोणत्या वस्त्राबरोबर इलॅस्टीकची जोडी पाहिली नव्हती. त्यामुळे मी शाळेच्या वयातून बाहेर पडल्यावर पाय आत सरकविता येतील असेच बुटं विकत घ्यायचो. ती सवय आजपर्यंत आहे. वेलक्रो चे बुट आता शाळेत वापरतात ते फार सोयीस्कर आहेत नाहीतर सकाळी शाळेत जाताना मुलांचे बुट घालून देणे एक दिव्यच आहे. असाच प्रकार शाळेच्या टाय बाबतीत आहे. आताच्या मुलांना ते इलॅस्टिक लावलेले टाय जास्त सोपे वाटतात. टायचा कपडा फिरवून गाठ मारणे वगैरे पुढच्या पिढीला कदाचित माहित पडेल की नाही शंकाच आहे.
आभार!
माझ्या मुलाला नाड्या असलेले बूट घेण्याचा निर्णय मी फारच चुकीच्या वेळी घेतला. आम्ही युरोपला जाणार होतो. त्याआधीच्या खरेदीत त्याला नाड्या बांधायचे बूट घेतले. मग रस्त्यात, ट्रेनमध्ये, पॅरिसच्या मेट्रोस्टेशनवर असा कुठेही तो अचानक गर्दीत गायब व्हायचा आणि नजर थोडी खाली केल्यावर मधेच बसून नाडी बांधताना दिसायचा. मग त्या सोहळ्यात कमीतकमी वेळ जावा या हेतूने बऱ्याचदा त्याच्या नाड्या मीच बांधून द्यायचे. त्याला वेलक्रो असलेले बूट तिथेच घ्यावेत का यावर सहप्रवाशांबरोबर खूप चर्चा झाली..पण आमच्या बरोबर असलेले प्रवासी सगळ्या किमतींना नव्वदने गुणत असल्याने ती किंमत आणि पोराचा वाढता पाय यांच्या तुलनेत मी त्याच्या नाड्या बांधून द्याव्यात हाच योग्य आणि शहाणपणाचा निर्णय आहे असं ठरलं.
(अवांतर)
पण आमच्या बरोबर असलेले प्रवासी सगळ्या किमतींना नव्वदने गुणत असल्याने…
हॅहॅहॅ… चालायचेच.
(याउलट, आम्ही अमेरिकन मराठी मंडळी आमच्या अमेरिकन मराठीत आमच्या डॉलरचा उल्लेखसुद्धा colloquially अनेकदा ‘रुपया’ असा करतो. (झालेच तर तांबडा सेंट = ‘पैसा’ (किंवा, अगदीच लाडात आलो, तर ‘नवा पैसा’), डाइम = ‘दहा पैसे’, क्वार्टर = ‘चार आणे’ किंवा ‘चवन्नी’, वगैरे.) तुमच्या त्या गुणिले नव्वदवाल्या क्राउडच्या पिढीतले कोणी जर इथे नुकतेच fresh off the boat आलेले असले, तर ते हे ऐकून भयंकर इरिटेट होतात. होईनात का! आमची मराठी बोली आम्ही त्यांच्यासाठी काय म्हणून बदलावी? तसेही, वाटेल त्यावर१ इरिटेट होणे हा त्या पिढीचा स्थायीभावच आहे, त्याला कोण काय करणार? असो.)
बाकी, परवाच्या त्या पहलगामच्या हाणामारीनंतर भारतीय टूरिष्टांनी तुर्कियेवर घाऊक भावात बहिष्कार टाकलेला आहे, म्हणून. अन्यथा, युरोपातच जायचे, तर गुणिले नव्वद क्राउडकरिता तो उत्तम देश आहे.२ एक तर पाहायला भरपूर आहे, खायचीप्यायची चंगळ आहे (अगदी शाकाहारी मंडळींचेसुद्धा काहीही अडू नये!), तुलनेने स्वस्त आहे, नि मुख्य म्हणजे गुणिले नव्वद करावे लागत नाही. (मी गेलो होतो, तेव्हा (भारतीय दृष्टिकोनातून) बहुधा गुणिले पाचच करावे लागले असते. (माझ्याकरिता ते भागिले सतरा होते, म्हणा.) आजमितीस बहुधा गुणिले दोन-सव्वादोन असावे.)
नाहीतर मग हंगेरी. तोही एक पाहायला सुंदर देश आहे, म्हणतात. (मी गेलेलो नाही. परंतु, मागे एकदा माझा मुलगा काही कारणाकरिता बूडापेष्टात चांगले दोन महिने बूड टेकवून होता, तो सांगतो.) परंतु, मुख्य म्हणजे, त्यांचे चलन (विनिमयदराच्या हिशेबात) पाकिस्तानी रुपयाहूनही बदतर असल्याकारणाने, गुणिलेची भानगड नाही. सर्व भागिले. (भारतीयांकरिता भागिले साडेतीन-चार, वगैरे.) अर्थात, किमती हजारांच्या भाषेत असतात, ती गोष्ट वेगळी.
(तर प्रतिसादाचा सारांश: युरोप. तुर्किये. हंगेरी. बूडापेष्ट. (यापुढे ‘च्यायलेंज!’ असे लिहिण्याचा मोह आवरता घेतो.))
१ ‘तरुणाई’च्या वाटेल त्यावर, असे लिहिणार होतो, परंतु, आजमितीस आमचे वयोमान साठीच्या दिशेस झुकते असल्याकारणाने तो मोह आवरता घेतला. चालायचेच.
२ नाहीतरी तुर्किये, अझरबैजान२अ, झालेच तर व्हिएतनाम… हे सर्व देश पर्यटनाकरिता एरवी सर्वपरीने उत्तम असतीलही. परंतु, भारतीय टूरिष्टी क्राउड तेथे घाऊक भावाने जातो/जायचा, तो केवळ एकाच कारणाकरिता: (तुलनेने) स्वस्त नि मस्त. (त्यातही, मुख्यत्वेकरून स्वस्त.) तेही चालायचेच.
२अ याही देशावर तूर्तास बहिष्काराची जनरीत आहे, असे ऐकून आहे. (‘चालायचेच’ असे लिहिण्याचा कंटाळा आला.).
(अतिअवांतर)
…ती किंमत आणि पोराचा वाढता पाय यांच्या तुलनेत मी त्याच्या नाड्या बांधून द्याव्यात हाच योग्य आणि शहाणपणाचा निर्णय आहे असं ठरलं.
हा निर्णय जर तुमचा स्वतःचा असला, तर अर्थातच त्याचा (आणि तुमचाही) पूर्ण आदर आहे. (किंबहुना, त्या निर्णयात per se काही चुकीचे आहेच, असेही म्हणवत नाही.) परंतु, वाक्यातील भाषेच्या एकंदर धाटणीवरून, हा निर्णय क्राउडसोर्स करून घेतला गेला, अशी काहीशी धारणा झाली, नि ते थोडे चमत्कारिक वाटले, इतकेच. (अर्थात, तोही माझा प्रश्न नाहीच, म्हणा.)
(वैधानिक इशारा: यापुढील मजकूर हा माझा निव्वळ रँट आहे. झेपण्यासारखा वाटत नसेल, तर यापुढे वाचू नये. किंवा, चुकून वाचल्यास त्याकडे दुर्लक्ष करावे. Rated R, Language, वगैरे.)
परंतु, अर्थात, इंडियन्स विल बी इंडियन्स. त्यामुळे, एखाद्याने आपला एखादा अत्यंत खाजगी स्वरूपाचा निर्णय काय घ्यावा, याबद्दल तो मनुष्य सोडून इतर सर्वांना मते असणे (आणि, त्या मनुष्याने न विचारतासुद्धा, त्याबद्दल त्या मनुष्यास इतर सर्वांनी आपण होऊन अत्यंत मनमोकळेपणाने सल्ले देणे, झालेच तर, प्रसंगी त्यावर सार्वजनिक चर्चा-परिसंवाद घडवून आणणे, क्वचित्प्रसंगी रागेसुद्धा भरणे) हे सर्व अपरिहार्य आहे. (एका विशिष्ट पिढीचा तर तो स्थायीभाव आहे. आणि, त्या पिढीस थोडा ढील जरी दिला, तरी ते लगेच डोक्यावरून मिऱ्या वाटतील. चालायचेच.)१
तसेही, plebiscite घेतल्याशिवाय कोठलाही निर्णय घेणे हे हिंदुधर्मात पाप असावे. (अन्यथा, कश्मीर प्रश्न मुळात उद्भवता ना.)
असो.
१ म्हणजे, अगदी टोकाचीच भाषा जर वापरायची झाली, तर, एखादा भारतीय मनुष्य (विशेषेकरून, भारतीय तरुण मनुष्य) खाजगीमध्ये संभोग जरी करीत असेल — आणि, त्यातसुद्धा, सर्व काही अगदी शास्त्रोक्त पद्धतीने जरी करीत असेल — तरीसुद्धा, कालवशात् त्याच्या अवतीभवती भारतीय बुजुर्गांचा घोळका (अर्थात अनाहूतपणे!) जमा होऊन, ‘अरे ए! अरे तिकडे नको घालू! तिकडे नको घालू!!! अरे त्या दुसऱ्या ठिकाणी घाल! त्या दुसऱ्या ठिकाणी घाल!!!!! अरे, तशीच प्रथा आहे, शास्त्र आहे तसे! अरे, तुला काही रीतभात आहे, की नाही?’ अशा प्रकारचा गुंजारव करू लागेल, आणि, तो चालू दिल्यास, वेळप्रसंगी ‘कायदा हातात घेऊन’, ‘परिस्थिती’त ‘दुरुस्ती’ही करू धजेल. ‘जनरीत’च आहे तशी, त्याला कोण काय करणार! (म्हणूनच आम्ही नेहमी म्हणतो, की, Minding one’s own business is not (and never was) an Indian virtue, म्हणून. (And, perhaps, never will be. दीडशे वर्षांचे ब्रिटिश राज्य ज्यांना civilize करू शकले नाही, ते आता स्वराज्यात कसले civilize होताहेत!१अ चालायचेच.))
१अ म्हणजे, ब्रिटिश राजवट (किंवा एकंदरीतच पाश्चात्त्य जीवनपद्धती) ही आत्यंतिक civilized होती (किंवा आहे), असा माझा दावा अजिबात नाही. (गांधीजीच एकदा विनोदाने म्हणाले होते, त्याप्रमाणे, (Western civilization) would be a good idea!) परंतु, यांच्या तुलनेत… असो.
+१
त्याच ट्रिपमधला दुसरा प्रसंग.
स्वित्झर्लंडमध्ये सार्वजनिक शौचालय वापरायचे असेल तर सगळीकडे २ युरो द्यावे लागतात*. अर्थातच आमच्या सहप्रवाशांनी शूचे रुपये मोजून हळहळलायला सुरुवात केली@. मग एकदा मला बॅगा सांभाळायला लावून उरलेले लोक पायी झुरिक फिरायला जाणार होते. मी अतिशय आनंदाने (हर्षवायूच झाला होता मला) एक पबमध्ये बॅगा ठेवल्या आणि बियर घेऊन आले. पोरगाही माझ्यापासून शंभर एक मीटर लांब बागडत होता. असं सगळं छान चाललेलं असताना पायी जाणारी मंडळी कंटाळा आला म्हणून परत आली. आणि शू करायला गेली. मग माझ्या टेबलावर येऊन (काहीही विकत न घेता) शू करायला पैसे घेणं चूक आहे असे वाद घालू लागली. मग आम्ही भारतातलं स्वस्त मनुष्यबळ, जातीभेद वगैरे विषयांवर आलो. आणि समोरच्या आजी मोदीभक्त होत्या. मग त्या खूपच पेटल्या आणि त्यांच्याशी भांडताना आमची बोट चुकली. मग त्या चमूतली एकमेव (शहाणी आणि तुलनेने) तरुण सज्ञान व्यक्ती या नात्याने मी पुढील स्थानी त्यांना सामानासकट बसने घेऊन गेले (त्याआधी मी माझी बियर संपवली आणि २ रुपये देऊन शूही केली!).
पण माझा स्वभाव शक्यतोवर लोकांना खुश ठेवण्याचा आहे. अर्थात अलीकडे मला मिडलाइफ क्रायसिस झाल्यामुळे मी हे कमी केलं आहे. पण चर्चा करण्यापेक्षा मी लोकांना हवं ते करून गप्प बसते#. लग्नही मी याच कारणासाठी केलं. अर्थात ते केल्यावर मी सुखी आहे किंवा कसं याकडे भोचक काकवानी ढुंकूनही बघितलं नाही. त्यामुळे अजूनच फसल्यासारखं झालं. पण असो. लग्नाचा काही विशेष पश्चाताप होत नाही. पण ती बोट चुकल्याचा होतो अजूनही.
* वास्तविक भारतात कोणतेही फुकट असलेले सार्वजनिक शौचालय स्वच्छ नसतं (अगदी एअरपोर्टवरचेही). दोन युरोना नव्वदने गुणणाऱ्या बायका भारतातल्या सार्वजनिक शौचालयात कधीही जाणार नाहीत. त्या हॉटेलमध्ये किंवा मॉलमध्ये जातील. भारतात प्रवास करताना गूगलमॅपवर मार्गातले ठिकठाक रेस्तराँ बघूनच सुरुवात होते.
याउलट, आम्ही यावर्षी मेघालयाला गेलो होतो तिथेही सगळीकडे १० रुपये द्यावे लागायचे. पण स्वच्छता उत्तम होती.
@स्वित्झर्लंडला जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिक भारतीयांसाठी adult diaper चा पर्याय सुचवून त्याचं मार्केटिंग करायला हवं.
#इतरांनी काय करावं याबद्दल सतत आपली ठाम मतं मांडून त्यांना नकोजीव करणं हा एक दुर्गुण. आणि आपण जे करणं बंधनकारक आहे (उदा. हेल्मेट घालणं, फ्लश करणं, वाहतुकीचे नियम पाळणं) ते न करण्याची सहस्र कारणं देणं हाही एक दुर्गुण. आणि कुणी त्यांना नियम पाळायची सक्ती केली तर इतरांना ते कसं चूक आहे असं सांगून हैराण करणं.
तळटीप.1 वाचून तळतळाट झालेला होता
@नबा
प्रखर प्रतिसादासाठी बोटे वळवळली
तेवढ्यात 1अ तळटीप वाचली आणि मी अजून एका इम्पल्सिव का काय त्या पापा पासून वाचलो.
धैर्य ही trader का गहना है !
By the way
अश्वमेध यज्ञात आणि नियोग या प्रथेत असे काहीसे exact नाहीपण असे काहीसे होत होते असे वाटण्यास वाव आहे.
म्हणजे अश्वमेधाचा अश्लील dialogue राणी आणि घोड्याचे शिश्न वगैरे शास्त्रशुद्ध कर्मकांडे
नियोग मधील नेमलेल्या पुरुषा वरील निर्बंध तर फारच कडक
तेव्हा तुम्ही म्हणता तसे शास्त्रकार मार्गदर्शन with demo देत असावेत.
अखेरीस आपली उज्ज्वल परंपरा आहे ती.
बांधलेल्या नाड्या सोडता येणे…
बांधलेल्या नाड्या सोडता येणे [ योग्य वेळी हे जास्त महत्त्वाचं आहे ] दरवेळी काहीतरी छान आणि अभ्यासपूर्ण लिहीता.