उदरभरण नोहे : हल्ली कुठे आणि काय खाल्ले? - १९
आपण रोजचे जेवण जेवतोच, पण त्याच बरोबर वेगवेगळ्या हॉटेलांमध्ये नवनवीन पदार्थ चाखत असतो. हॉटेलांतच नाही तर सणासुदीच्या निमित्ताने किंवा कधी सहज लहर आली म्हणून किंवा कधी एखादा जिन्नस स्वस्तात मिळाला म्हणून घरीच काहीतरी नवा, सुग्रास पदार्थ बनतो. हा धागा अशाच तुम्हाला आवडलेल्या/नावडलेल्या पदार्थांवर चर्चा करण्यासाठी आहे. इथे हल्ली तुम्ही कुठे आणि काय खाल्ले? ते तुम्हाला आवडले का? असल्यास का? नसल्यास का? जर हा पदार्थ घरी स्वतः बनवला असेल / त्याची पाकृ माहित असेल तर तो कसा बनवला? जर हा हॉटेलात खाल्ला असेल तर ते हॉटेल कुठे आहे? पदार्थाची किंमत काय होती? हॉटेलचा अॅम्बियन्स कसा होता वगैरे हवं ते लिहू शकता. पदार्थाचा फोटो असेल तर उत्तमच. अर्थातच हे फक्त खाण्याबद्दल नाही, तर पिण्याबद्दलही आहे
____________________________________________________________________________________________
आज काल सुक्या भेळेवर प्रेम जडल्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणची भेळ खाणं सुरु आहे.
वेस्टर्न लाइन वरच्या सगळ्या स्टेशन्सवर सुकी भेळ मिळते, पुरचुंडी घेऊन, ट्रेनीत बसून खाणे हा माझा आवडता उद्योग आहे.
कान्दिवली स्टेशन वरची भेळ सगळ्यात बेष्ट वाटली आजपर्यंतची. भैय्या कुर्मुरे, फुलवलेले मके, कान्दा कैरी टोमॅटो दोन प्रकारच्या चटण्या सढळ हस्ते घालतो, वर बारीक शेव, दाणे, तिखट डाळ, लिम्बू कोथिंबीर सजवून हातात पुडा देतो. ग्लोव्हज असल्याने घामाची चव लागत नाही.. :)
सोलापूर स्टेशनवर मटकी भेळ खाल्लेली , सुकीच, पण अप्रतिम चव.
फोटो मिळाले की डकवते.
'दर्शन' बोले तो...
...तेच ना, की जेथे (फारा वर्षांपूर्वी, आमच्या लहानपणी वगैरे१) 'आमचे वेटर कॉलेजातले विद्यार्थी असतात; कृपया त्यांना टिप देऊन त्यांचा अपमान करू नका.' अशी सूचना लावलेली असे?२
ते आहे अजून??????
लहानपणी (बहुधा माध्यमिक शाळेत असताना) एकदा तेथे गेलो होतो. त्यानंतर कॉलेजात असताना सुट्टीचा घरी आलेलो असताना एकदा. बस्स तेवढे दोनदाच. त्यानंतर पुन्हा तेथे फिरकलेलो नाही. (बोले तो, शेवटची भेट बहुधा चाळीसएक वर्षांपूर्वीची?) असो चालायचेच.
(अर्थात, केवळ दोन भेटींवरून, आणि त्यातलीसुद्धा शेवटची भेट चाळीसएक वर्षांपूर्वीची असताना (आणि त्यापूर्वीची एकमेव भेट ही कौमार्यावस्थेतील असताना), त्या आठवणींवरून काही अभिप्राय देणे हे उचित ठरणार नाही, परंतु तरीही... त्या वेळेससुद्धा तेथील खाण्याने विशेष इंप्रेस झाल्याचे आठवत नाही; केवळ ठीकठीक वाटले होते, इतकेच. अर्थात, जेवणापेक्षासुद्धा 'आमच्या वेटरांची (तथाकथित) dignity आम्ही राखतो', एवढाच यूएसपी म्हटल्यावर... (अर्थात, वेटरांची dignity राखू नये, किंवा वेटरांना dignity असू नये, असे आमचे म्हणणे अजिबात नाही, याचा आम्ही पुनरुच्चार करतो. परंतु तरीही...))
बादवे,
म्हणजे इतकं जुनं की तिथं म्हणे आठवड्याला सत्तर तास आणि त्यांच्या साध्या सरळ पण कधीकाळी जाऊन बसत असत
वाक्यरचना अंमळ गंडलेली आहे काय? फारसा अर्थबोध झाला नाही. असो.
तळटीपा:
१ पुढच्या वर्षी (२०२६मध्ये) मी आयुष्याची साठी गाठेन. (केवळ संदर्भासाठी.)
२ The intent, I guess, was to bring dignity to an occupation in a society where dignity (of labor) is (or was) an alien concept. Although, why tips and dignity cannot coexist is beyond me. अर्थात, भारतीय समाजात (निदान आमच्या वेळच्या भारतीय समाजात तरी) 'टिप' या संकल्पनेचा (मग ती देणे असो किंवा घेणे असो.) dignityशी संबंध चुकून जर असलाच, तर तो अत्यंत व्यस्त प्रमाणात असे, ही बाब नाकारता येणार नाही. परंतु तरीही, विद्यार्थी आहे, त्याला काही dignity आहे, केवळ शिक्षणखर्चाचा भार कमी करण्यासाठी फावल्या वेळात वेटरची नोकरी करीत आहे (असे मानून चालू.२अ), म्हणून त्याला या संभाव्य अधिकच्या उत्पन्नापासून वंचित का करावे?२ब किंबहुना, dignityचा अन्योन्यसंबंध सर्वसंगपरित्यागाशी का असावा?२क त्यापेक्षा, 'आमचे वेटर कॉलेजातले विद्यार्थी असतात; त्यांच्याकडून चांगली सेवा मिळाल्यास त्यांना उत्तेजन म्हणून टिप अवश्य द्या, परंतु ती देताना आदरपूर्वक द्या; त्यांच्या भावनांची कदर करा', असे काहीसे म्हणता आले नसते काय?
२अ म्हणजे, विद्यार्थी नसलेल्या, केवळ शिक्षणखर्चाचा भार कमी करण्यासाठी म्हणून वेटरची नोकरी करीत नसलेल्या इतर वेटरांना dignity असू नये की काय?
२ब किंबहुना, विद्यार्थिदशेतल्या, केवळ शिक्षणखर्चाचा भार कमी करण्यासाठी म्हणून वेटरची नोकरी करीत असलेल्या मनुष्यास शक्य तितके अधिकचे उत्पन्न केवळ उपयुक्तच नव्हे, तर कदाचित आवश्यक ठरावे, हे तर्कास धरून नव्हे काय?
२क Don't tell me, let me guess... मालक मराठी ब्राह्मण असावेत काय? एक तर, 'विद्यार्थी' या संकल्पनेचे अतिउदात्तीकरण (बोले तो, विद्यार्थी असण्यात काही कमीपणाचे आहे, असे मला म्हणायचे नाही, परंतु तरीही...), आणि त्याचबरोबर, त्या विद्यार्थ्यांच्या तथाकथित dignityला (जी असू नये, असे माझे मुळीच म्हणणे नाही.) ठेच पोहोचू नये, याकरिता त्यांना अधिकचे (पक्षी: 'आम्ही देतो, त्याहून अधिक') अर्थार्जन करू देऊ नये२क१, अशी गिर्हाइकांस परस्पर 'नम्र सूचना'... Am I wrong?२क२
२क१ उलटपक्षी, व्यवहारात अर्थार्जनाचे (पक्षी: पैशाचे) महत्त्व त्यांना महाविद्यालयीन वयातच जर कळले, तर सुदृढ आर्थिक मानसिकता त्यांच्या ठायी योग्य वयात रुजून त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी ते पोषकच ठरणार नाही काय? पण लक्षात कोण घेतो?
२क२ मराठी माणूस हा कधीही चांगला उद्योजक होऊ शकत नाही, असे अगोदरच म्हटले जाते. या असल्या वृत्ती जोपासल्यामुळे महाराष्ट्र एक चांगला उद्योजक तर सोडाच, परंतु एखादा चांगला वेटरसुद्धा घडवू शकणार नाही, असे खेदाने म्हणावेसे वाटते. असो चालायचेच.
ते अजून आहे ? तेच ते .अहो …
ते अजून आहे ? तेच ते .अहो न बा ,नुसते आहेच नाही , तर त्याची शाखासुद्धा आहे , कुठेतरी बाणेर रस्त्यावर.
( तुमच्या लहानपणी हा बाणेर रस्ता नव्हता.तेव्हा फक्त उच्चभ्रू सोसायट्या पार झाल्या कि उजवीकडे वळून आयटीआय वरून औंधला जायचा हा रस्ता. पण आता तो खरोखर बाणेर नावाच्या तत्कालीन खेड्यातून पुढे जाऊन मुंबई पुणे हायवेला मिळतो) तुमच्या लहानपणी जिथे शेत्या होत्या तिथे आता ( ट्राफिक जॅम वाले ) रस्ते आहेत.
असो,चालायचेच.
तुमच्यावेळचे पुणे राहिले नाही .
( खरं तर आमच्याहीवेळचे )
वांग्याचं ष्टेक
इथला विषय वाचून 'न'बा आणि इतर मांसप्रेमी माझ्यावर वैतागणार ही अपेक्षा आहे. शाकाहारी पर्याय म्हणून वांग्याचं ष्टेक दाखवला तेव्हा मीही वैतागले होते. हे कमी म्हणून का काय, 'कॉफी रोस्टेड' असंही त्याचं वर्णन होतं. समोर जेव्हा जेवणाचं ताट आलं तेव्हा कुसकुसच्या समुद्रात तरंगणारा काळा ओंडका बघून माझी तक्रार करण्याची इच्छासुद्धा मेली होती!
आयुष्यात माझा इतका सुंदर अपेक्षाभंग आत्तापर्यंत कधी झाला नव्हता, आणि यापुढेही होईल असं वाटत नाही.
ऑफिसनं टाहो तळ्याकाठच्या हयातमध्ये पार्टी ठेवली होती. ठरावीक लोकांसमोर मी त्या संध्याकाळचं वर्णन an evening of debauchery असं केलं. दारू आणि जुगार दोन्हींची सोय तिथे होती. या पलीकडे काही घडलं असल्यास मला कल्पना नाही; मी मध्यरात्र उलटण्याच्या वेळेस झोपायला गेले. सकाळी जाग आली तरीही एकटीच होते.
तर ते वांगं एवढं आवडलं की हयातच्या लोकांपैकी एकीनं मला विचारलं तर मी तोंड भरभरून प्रशंसा केली. ती म्हणाली, "आमचा बल्लवाचार्य व्हिगन आहे." आता मला खरं रहस्य समजलं. मांसाहारी लोकांना भाजी एवढी सुंदर बनवता येईल यावर माझा विश्वास बसणं कठीण आहे. पुढे ती म्हणाली, "वांगं भाजायला चार तास लागतात, असं तो म्हणाला."
आता रहस्य समजलं. वांग्याचं भरीत करण्यासाठी भाजताना सगळा गर आत राहतो, आणि पाणीसुद्धा. हळूहळू, पण चार तास भाजताना वांग्यातलं पाणी खूप कमी झालं होतं. वांग्याला जेमतेम काही मसाला, मीठ लावलं होतं. वांग्याची मूळ चवच छान होती. कितीही मसाला आणि काही लावलं तरीही भाज्यांची मूळची चव चांगली असावीच लागते.
हे असं प्रकरण आणखी कुठे मिळेल हे माहीत नाही. पण कुठे मिळालं तर खाऊन बघा.
?
इथला विषय वाचून 'न'बा आणि इतर मांसप्रेमी माझ्यावर वैतागणार ही अपेक्षा आहे.
शाकाहारी/व्हेगन पदार्थ चांगले लागू शकण्याबद्दल कोणास काही प्रत्यवाय असण्याचे काही कारण निदान मला तरी दिसत नाही.
(आमचा आक्षेप शाकाहारी/व्हेगन पदार्थांवर नाही. आमचा आक्षेप आहे, तो केवळ शाकाहारी/व्हेगन पदार्थांपुरते स्वतःस सीमित करण्यावर. नि तोही आमच्यापुरता. असो.)
——————————
बादवे, स्लटी व्हेगन नावाच्या चेनबद्दल ऐकले आहेत काय? तुमच्या टेक्सासात बहुधा नसावी, अशी शंका आहे, परंतु, आमच्या अटलांटा परिसरात आहे. झालेच तर, न्यूयॉर्कात एखादी, अलाबामात एखादी, अशा इतरत्रही शाखा आहेत, असे समजते. मूलतः, नेहमीच्याच बर्गरादि पदार्थांच्या शुद्ध व्हेगन आवृत्ती. मात्र, आत बसून खायची सोय नाही. कायमस्वरूपी शाखा तशाही कमी आहेत (कोविडनंतर कदाचित आणखीही कमी झाल्या असतील); त्याव्यतिरिक्त, त्यांचा फूडट्रक वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी जातो. टपरीबाहेर किंवा फूडट्रकसमोर लाइन लावून टेकआउट घ्यावे लागते. मात्र, प्रचंऽऽऽऽऽऽड रांग असते, इतके लोकप्रिय आहे. (किंवा, निदान एके काळी तरी होते. कोविडपूर्व काळात एकदोनदाच तेथे गेलो होतो, तेव्हाचा अनुभव. कोविडोत्तर काळात बहुधा आमच्या भागातली शाखा बंद पडली असावी, असे दिसते. मात्र, चेन अजूनही बहुधा जिवंत आहे. इतक्यात तेथे फिरकलेलो नाही.)
थीम: येथील पदार्थ बोले तो नेहमीच्याच बर्गरादि अमेरिकन फेअरच्या व्हेगन आवृत्ती असल्या, तरी, पदार्थांची नावे ही (उगाच!) संभोगाशी किंवा वेश्याव्यवसायाशी प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष संबंध असलेल्या स्लँग आहेत. (उदा., वन नाइट स्टँड, हॉलीवूड हूकर, हूकर फ्राइज़, वगैरे.) (म्हणून ‘स्लटी’.)
पदार्थांच्या चवी चांगल्या वाटल्या. किमती अर्थात थोड्या चढ्या वाटल्या, असे आठवते, परंतु ते चालायचेच.
मूलतः, हे एका कृष्णवर्णीय उद्योजिकेचे उद्योग. पदार्थांची नावे सेक्सशी संबंधित ठेवण्याचे कारण बोले तो, नाहीतर एरवी सामान्यतः मांसाहारी असलेली गिऱ्हाइके तेथे कशाला झक मारायला टपकतील, म्हणून म्हणे त्यांना आकर्षित करण्यासाठी. (म्हणजे, मांसाहारी लोकांच्या मानसिकतेबद्दल इतरेजनांत विनाकारण कायकाय समज पसरलेले असतात, ते पाहा! परंतु, आम्ही नेहमी म्हणतो त्याप्रमाणे, चालायचेच. असो.)
(विकीमाहितीचा दुवा)
?
वांग्याचं ष्टेक काय! काही रीतभात म्हणून आहे की नाही!
तुम्ही वरणभातात खिमा कालवून खा (वाटले तर)! (किंवा, खिम्यात फोडणीचे वरण!) तुम्हाला नक्की कोणी अडवलेय?
अतिअवांतर: फारा वर्षांपूर्वी एकदा (एकदाच!), (त्या 'रुची'च्या धाग्यावरून प्रेरणा घेऊन) घरगुती वाइन बनवून पाहिली होती. (चांगली झाली होती; परंतु, येथे तो मुद्दा नाही.) तर ती वाइन बाटलीबंद करण्यापूर्वी, एकदा थोडा नमुना म्हणून मी आणि बायकोने ती चाखून पाहायचे ठरवले. (चांगली प्रत्येकी ग्लास भरून चाखून पाहिली. परंतु, येथे तोही मुद्दा नव्हे.)
आता, वाइन चाखायची (/प्यायची), म्हटल्यावर, नुसतीच पिता तर येत नाही! (विशेषतः, ग्लासभर प्यायची, म्हटल्यावर) त्याबरोबर काही तोंडात टाकायला तर पाहिजे! (आणि, वाइन म्हटल्यावर चखण्याबरोबर शक्यतो जात नाही; त्याला प्रॉपर जेवण असलेले बरे.)
झाले. दुसरे काही विशेष करीत बसण्याइतका उत्साह त्या क्षणी तरी नव्हता, म्हणा, किंवा आळस होता, म्हणा, परंतु, त्या रात्रीच्या जेवणाकरिता बनविलेल्या वरणभाताबरोबर आम्ही आमच्या वाइनच्या ग्लासांचा आस्वाद घेतला. चालायचेच.
("कारण शेवटी आम्ही भटेंच; त्याला काय करणार?" – पु.ल.)
(तर सांगण्याचा मतलब, आमच्यात यालाच रीतभात म्हणतात. असो.)
(पुरवणी: 'पेय'रिंगवर आमचा फारसा विश्वास तसाही नाही. शिवाय, 'कशाबरोबरही काहीही (किंवा, कशातही काहीही घालून) खाणारे' अशी देशस्थांची व्याख्या कोणीतरी करून ठेवलेलीच आहे, त्यामुळे...)
???
१. नाहीतरी पुणे आणि अमेरिका वगळल्यास या अखिल विश्वात तिसरे आहे तरी काय?
१अ. (अरे हो, पाकिस्तान आहे की! परंतु, पाकिस्तानचा आम्हाला अनुभव नसल्याकारणाने पाकिस्तानबद्दल आम्ही लिहू शकत नाही. तुम्हाला तो अनुभव असल्यास तुम्ही अवश्य लिहा.)
२. पुण्यातले आणि/किंवा अमेरिकेतले लोक पुण्याबद्दल किंवा अमेरिकेबद्दलच लिहिणार. इतर ठिकाणांबद्दल (म्हणजे, विश्वात असलीच, तर) लिहायला इतरांना (म्हणजे, विश्वात असलेच, तर) नक्की कोणी अडवलेय?
त्या SETI प्रकल्पाप्रमाणेच, विश्वातील इतर ठिकाणच्या signs of (intelligent) lifeकरिता आम्हीदेखील आतुर असतो. परंतु, झक मारायला इतर ठिकाणांहून कोणी येथे कडमडत नाही, की लिहीत नाही, त्याला काय करणार? Is there really any intelligent life beyond Pune and America, असा प्रश्न कधीकधी पडू लागतो. असो चालायचेच.
चट्टा मट्टा
कोथरूडमध्ये (नाही तर आणखी कुठे जाणार!) चट्टा मट्टा नावाचं रेस्टॉरंट सुरू झालं आहे (https://www.instagram.com/chattamattapune/) बाकी ठीकठाक आहे, पण तिथे 'घावन चटणी रस' नावाचा एक पदार्थ मिळाला. वाफवून केलेले घावन, सोबत दोन चटण्या आणि नारळाच्या दुधात गूळ-वेलची-बदाम घालून केलेला रस होता. घावन आणि चटण्या चवीला चांगल्या होत्याच, पण तो रस फारच चांगला होता.
काल फॉर ओल्ड टाइम्स सेक …
काल फॉर ओल्ड टाइम्स सेक 'दर्शन ' मध्ये गेलो,सहकुटुंब सहपरिवार. दर्शन तसं जुन्या पुण्यातलं नवीन , पण तरी जुनंच. ( म्हणजे इतकं जुनं की तिथं म्हणे आठवड्याला सत्तर तास आणि त्यांच्या साध्या सरळ पण कधीकाळी जाऊन बसत असत( असं तेच म्हणतात))
परंपरेला स्मरून छोले भटुरे,इतर तिथली इतर तशीच इतर( पूर्वीचीच) व्यंजने खाल्ली. चवीत बिलकुल फरक नाही.चांगली अशी श्रेणी.
पोट आणि बिल फार भरले. खरं तर काही लिहिण्याजोगं नव्हतं, पण नवीन धागा सुरु राहावा या उद्देशाने रिव्यू टाकला.