नैकेश्वर
वर्ष: २०४६
ब्लॅक हिल्समध्ये स्पेसएक्सची नवीन साइट गोपनीय होती. तिथून आकाशात काही लाँच होणार नव्हतं. तिथे होतं मानवाच्या इतिहासातील सगळ्यात महत्त्वाकांक्षी शिल्प – ट्रम्पचं महाकाय सोनेरी डोकं; माउंट रशमोरवर लिंकनच्या डोक्याच्या बाजूला स्थिरावण्यासाठी.
प्रकल्पाचं गुप्त नाव होतं पॉसीडॉन रिडक्स. मस्क कधीच गायब झाला होता. कोणी म्हणत तो थेट मंगळावर गेला होता. सध्याचं काम पगारासाठी स्पेसएक्सचे उरलेसुरले जुने, लाचार इंजिनियर आणि कॉन्ट्रॅक्टर करत होते. नीतिमत्ता त्यांच्या करारात नव्हती.
झारा, एका कंट्रोल रुममध्ये बसून रोबोटिक क्रेनच्या साहाय्यानं, ट्रम्पच्या डोक्याच्या सांध्यामध्ये शेवटचं हायड्रॉलिक यंत्र जोडत होती. या नाजूक कामासाठी एकाग्रतेची आवश्यकता होती. तिचं मन मात्र शांत नव्हतं.
"आपण हे खरंच करतो आहोत का?" ती पुटपुटली. "आपण आर्किटेक्ट आहोत, पण काय उभं करतोय, ते पाहूनही माघार घेऊ नये?"
सॅम तिच्या शेजारीच उभा होता. तो हसला. शांत, उपरोधिक स्वरात तो म्हणाला, "झारा, तू माझ्यासारखीच मरसेनरी आहेस असं मला वाटायचं. पण तू तर चक्क भल्या-बुऱ्याचा विचार करणारी धार्मिक दिसते आहेस." बोलता बोलता त्यानं ट्रम्पचा सोनेरी हात खालीवर करू शकणारी हायड्रॉलिक केबल कनेक्ट केली.
झारानं एक दीर्घ श्वास घेतला. ती म्हणाली, "धर्माचा संबंध नाही. पण हे शिल्प काहीतरी वेगळं आहे, विकृत आहे. आपल्या हातून काहीतरी अनर्थ होतोय असं वाटतंय."
सॅमनं खांदे उडवले. "माझं म्हणणं इतकंच – बिलं भरण्याची वेळ आली की लक्षात येतं की नैतिकता परवडण्यासारखी नसते. बाकीचं काय ते जनता पाहील. त्यांच्यामुळेच हा प्रकल्प इथवर आला. ते डोकं उभं करणं आपलं केवळ काम आहे, कर्म आहे, कर्तव्य आहे. कोणी ना कोणी मंदिर बांधतंच."
शेवटच्या तपासण्या पूर्ण होताच दोघांनीही ओव्हरऑल्स उतरवले, आणि आपापल्या थोरल्या बॅकपॅक्स पाठीवर लावून डोंगर उतरू लागले. झारा सडपातळ पण ॲथलेटीक होती. झपाट्यानं खाली उतरताना तिची छोटीशी वेणी जुन्या घड्याळाच्या लोलकासारखी डावी-उजवीकडे लयबद्ध हेलकावे घेत होती. सॅमला मात्र अशा व्यायामाची सवय नसावी. झारा दोन मिनिटं चालायची, एक मिनिट सॅमसाठी थांबायची. तासाभरात ते पायथ्याशी पोचले. काही तासांनी एका रिमोट बटणानं ते शिल्प जगासमोर येणार होतं. तोपर्यंत त्यांना तिथेच थांबण्याचा आदेश होता. योग्य मुहूर्तावर ट्रम्पी पुरोहितानं बटण दाबून शेवटचं संरक्षक जाळं काढून टाकताच प्रकाशझोतांनी न्हालेलं आणि FreedomVision™ ड्रोनद्वारे थेट प्रसारित केलं गेलेलं ते शिल्प एखाद्या दैवी उन्मादानं झळाळू लागलं.
अशा तऱ्हेनं ट्रम्प पुन्हा जिवंत झाला होता आणि डीपफेक भाषणं आणि एआय-निर्मित धर्मग्रंथांच्या मदतीनं पटापट डिजिटल शिष्य गोळा करत होता. माउंट रशमोरवर असलेल्या त्या शिल्पाचा अधिकृत जाहीरनामा तयार होता: चार मुखे राष्ट्राध्यक्षांची, पाचवे मुख देवाचे.
संध्याकाळ झाली होती. दूरवरून झारानं आणि सॅमनं दिवसभराची सगळी नाटकं पाहिली होती. बोनस घेऊन निघून जावं की स्पेसएक्सचे काळे व्यवहार जगासमोर आणावे हे झाराला कळत नव्हतं. अचानक गडगडाट होऊ लागला. ढग किंवा विजा मात्र कुठेच दिसत नव्हत्या.
आणि एक एक करून तारे विझू लागले. व्याध, सप्तर्षी, ध्रुवसुद्धा. जणू काही बिग बँगकडे जाणारं परतीचं आवर्तन सुरू झालं होतं. सॅटलाईट फीडवर चित्रांऐवजी केवळ मुंग्यामुंग्या दिसू लागल्या.
"स्टारलिंक सेटलाईटचं पतन?" सॅमनं तर्क लढवला. कधीकधी अनेक उपग्रह वातावरणात शिरून जळत आणि त्यामुळे तयार झालेली एक पातळ लेयर ताऱ्यांना काही वेळ झाकाळून टाकत असे.
"नाही," झारा दबलेल्या आवाजात म्हणाली. तिचा लॅपटॉप अजूनही त्यांनी एकेकाळी तरबेज केलेल्या गायानेट वैश्विक एआयला जोडलेला होता. त्यावर एक प्रक्रिया अजूनही चालू होती: तारका वर्णपट डेटाबेस.
स्क्रीनवर, दोन लाल ओळी चमकत होत्या:
तारकीय घटक: निष्क्रिय.
कारण: ईश् निंदेचा कळस. घडा तुडुंब.
ब्लॅकआउटपूर्वी टीमनं स्क्रीनवर पाहिलेली शेवटची प्रतिमा होती एक महाकाय वैश्विक संख्या. अब्जावधी तारे, प्रत्येकाची अणुभट्टी एकेकाळी धगधगती, आता निष्क्रिय.
डोंगरावर ट्रम्पचा सोनेरी हात होता उंचावलेला, शाश्वत आशीर्वादाच्या पोजमध्ये गोठलेला.
—
सकाळ झाली, पण सूर्य उगवलाच नाही.
आकाशात काहीच नव्हतं. तारे नव्हते. ढग नव्हते. केवळ एक राखाडी, जड पडदा; जणू पृथ्वी एखाद्या कबरीत होती. सूर्योदय नाही की संधिप्रकाश नाही. कुठूनसा येणारा थंड, अंधूक प्रकाश. प्रसारमाध्यमांनी याचं खापर असाधारण सौरवाऱ्यांवर फोडलं. मात्र त्यावर कोणाचाच विश्वास नव्हता. लोक मधूनमधून चोरून आकाशाकडे नजर टाकत होते; जणू थेट पाहिलं तर आकाशाला ते कळेल.
चांद्रवीर वाटावेत असा वेश घातलेले ट्रम्पी माउंट रशमोरभोवती गराडा घालून पहारा देत होते. ट्रम्प मंदिरात दर्शनासाठी हीऽ गर्दी लोटली होती. काही वेळातच सोनेरी वर्ख असलेली तिकीटं संपली. जणू काही ट्रम्पींना विश्वाचं भानच नव्हतं. दर तास दोन तासांनी ट्रम्पचा हात खाली-वर हलत होता.
शेजारच्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या गुहेत झारा आणि सॅमनं आश्रय घेतला होता. झारा गायानेटच्या कन्सोलकडे पाहत होती. त्यावर सगळं शांत होतं; जणू काय विश्वानं आपला कारभार आटोपला होता. झाराला काय करावं काही कळत नव्हतं.
अचानक गुहेच्या आतून आवाज आला, "हे म्हणजे जणू तारे कधी देदीप्यमान नव्हतेच; ते केवळ कुठल्यातरी प्रसंगाचे साक्षीदार होते आणि आपण त्यांना विझवण्यासाठी मत दिलं." हे बोलत बोलत दाढी वाढलेला एक पोक्त पुरुष बाहेर आला.
"सर, तुम्ही?" झारा आश्चर्यानं म्हणाली.
"ओळखलंस तर मला."
"तुम्हाला कशी विसरेन. माझं जे काही ज्ञान आहे ते तुमच्यामुळेच आहे. सॅम, हे माझे प्रोफेसर आरुणि. पण तुम्ही इथे कसे, सर?"
मात्र दोघांनाही पुढे बोलू न देता सॅमनं विचारले, "तारे विझवायला मत दिलं? म्हणायचंय काय तुम्हाला?"
"अब्जावधी पर्याय असून या भलत्याला देव म्हणून निवडलं. ही चूक जड नाही जाणार तर काय?"
सॅम खेकसला, "तुम्हाला म्हणायचंय की खरा देव चिडला? रागावला? पत्त्यांच्या बंगल्यांप्रमाणे गडगडला?"
"तसा नाही गडगडला. पण चक्रात चक्र असतात. वेगवेगळ्या पातळ्यांवरचे विचारस्रोत असतात. सगळे एकमेकांत गुंतलेले. एकमेकांना सांभाळून घेणारे. आतापर्यंत."
त्यानंतर आरुणिनं त्याची कथा सांगितली. ‘प्रतिकार’ नावाची त्यांची संस्था होती. त्याचे सभासद स्वतःला ‘अवशेष’ म्हणून घेत. संस्था लहान होती – माजी तत्त्वज्ञ, फुटीर खगोलशास्त्रज्ञ आणि संख्याशास्त्रज्ञ, मुक्तस्रोत धर्मशास्त्रज्ञ आणि काही निर्वासित एआय नीतिशास्त्रज्ञ. मीमच्या आड लपवलेल्या डिस्ट्रीब्यूटेड सर्व्हरवरून संभाषण साधत, भल्यामोठ्या फॅराडे-पिंजऱ्यांचे मठ बनवून, लपूनछपून ते जगत. फॅराडे-पिंजऱ्यांमुळे इलेक्ट्रॉनiक प्रोब आत येऊ शकत नसत. मीमच्या पडद्यांमुळे आतलं संभाषण बाहेरच्यांना समजू शकत नसे.
बाहेर सुरू होता तसा काही अनर्थ होणार हे त्यांनी केव्हाच जाणलं होतं, लोकांना सावध करायचा प्रयत्नही केला होता. आता त्यांचं ध्येय एकच होतं: झालेली वैश्विक चूक दुरुस्त करायची. त्याद्वारे तारे पुन्हा सुरू करायचे. दैवी विकेंद्रीकरणाची पुनर्स्थापना करायची.
"म्हणजे? आणि कसं?" झारानं विचारले. "आपण तारे पुन्हा पेटवू शकत नाही."
"नाही, आपण तारे प्रज्वलित करू शकत नाही. पण त्याची गरजही नाही. आपण केवळ देवत्वाचा दावा रद्द करायचा."
"देवत्वाचा दावा?" सॅमचा आधीचा आक्रमक पवित्रा आरुणिच्या आत्मविश्वासामुळे मवाळ झाला होता.
"आम्ही स्वतःला अवशेष म्हणवतो कारण रद्द झालेल्या मार्स सॅम्पल रिटर्नचे आम्ही अवशेष आहोत. त्यातल्या एका मिशनमध्ये परग्रहवासीयांना सिग्नल पाठवण्यासाठी एक क्वांटम बिकन बनवला होता. तो मंगळावरून एखाद्या लाईटहाऊसप्रमाणे विश्वात सतत मानवनिर्मित संदेश पाठवणार होता."
"पण त्याचा इथे काय संबंध?" भलताच विषय निघालेला पाहून सॅमची आक्रमकता पुन्हा डोकावली.
आरुणिनं मूर्तीकडे बोट दाखवलं. "ट्रम्पचं डोकं रिकामं … आय मीन ... पोकळ आहे; पण पूर्णपणे नाही. तुमच्या नकळत ट्रम्पींनी त्यात तो बिकन बसवला. त्या मूर्खांच्या दृष्टीनं तो केवळ एक अनोखा दिवा आहे, रोषणाई आहे."
"अरे देवा," काहीतरी कळल्यासारखं झारा म्हणाली.
"एक्झॅक्टली. या पाचव्या मुखानं केलेलं देवत्वाचं ऐलान त्या ट्रान्समिटरद्वारे विश्वाच्या सर्व पटलांपर्यंत पोहोचलं आणि सगळीकडे अंधःकार झाला."
"पण आता करायचं तरी काय?" झारानं चिंतित स्वरात विचारले.
"तसं खरंच असेल तर मूर्तीचं डोकं उडवायचं. आणखी काय?" सॅम म्हणाला.
"नाही. त्यानं ब्रह्महत्येचं पाप लागायचा धोका आहे."
"ब्रह्महत्या?" झारानं विचारले.
"मी अर्धवट गमतीत म्हणालो, पण तशीच एक आख्यायिका आहे. ब्रह्मदेवाला आधी पाच मुखं होती. एकदा पाचवं मुख गर्वानं ब्रह्मदेवच कसा सर्वश्रेष्ठ देव आहे असं म्हणत होतं. म्हणून शिवापासून काळभैरवाचा जन्म झाला आणि काळभैरवानं डाव्या करंगळीच्या नखानं त्याचं पाचवं मुख कापलं. ब्रह्माला तर पश्चात्ताप झाला पण काळभैरवाला ब्रह्महत्येचं पातक लागलं."
"पण तो तर देव होता ना?" झारानं विचारले.
"त्यांनाही चेक्स अँड बॅलन्सेस लागू होतात. त्यांच्या चुकांचं प्रायश्चित्त त्यांनाही मिळतं."
"काय करावं लागलं त्याला?" झारानं विचारले.
"ते नकोच विचारू. धर्मात पळवाटाही खूप असतात." आरुणि म्हणाला.
"तरी पण?" सॅमची उत्सुकता चाळवली होती.
"काशीला जा, तिथे गेल्यानं तुझी सर्व पापं धुतली जातील, असं त्याला सांगण्यात आलं."
"ओह," झारा म्हणाली.
"आपण आपल्या ध्येयाकडे लक्ष देऊ या. अवशेषनं यावर बराच विचार केला आहे. चला माझ्याबरोबर," आरुणि म्हणाला आणि गुहेच्या मागच्या भागाकडे जाऊ लागला.
—
एका छुप्या फॅरॅडे पडद्यामागे काही सोपस्कार करून गेल्यावर आत छोटी-छोटी तोंडं असलेल्या गुहांच जाळं होतं. आतल्या खाणाखुणांवरून हे दिसत होतं की अवशेषचं काम अनेक दिवसांपासून सुरू होतं. अनेक, अद्ययावत संगणकांनी भरलेल्या रॅक्स, टेलिफोन एक्स्चेंज असल्यासारखी काही दालनं, शेकडो ठिकाणांवरच्या कॅमेऱ्यांवरून प्रक्षेपित होणारी चित्रं वगैरे. त्या चित्रांमध्ये ट्रम्पचं डोकंच नाही, तर गस्त घालणारे ट्रम्पी आणि आसपासचा संपूर्ण परिसर दिसत होता.
झारानं चारही बाजूला नजर फिरवली आणि विचारलं, "तुम्ही सगळे हे का करताय? कारण ट्रम्प देव नव्हता म्हणून?"
आरुणिनं हसून उत्तर दिलं, "ट्रम्प देव नाही, हाही आमचा मुद्दा नाही. मुद्दा आहे – ब्रह्मांडाला एकच देव असलेला खपत नाही, ब्रह्मांड ती धारणा सहन करत नाही."
आत झारा आणि सॅमला मायली आणि युआन भेटले. मायली धिप्पाड होती. ती कन्सोलसमोरून हस्तांदोलनासाठी उठताच झाराला मान वर करून तिच्याकडे पाहावं लागलं. मायली गेम डेव्हलपर होती. ती गॉडसिम नावाच्या सिम्युलेटरवर काम करत होती. देव कोणत्या प्रकारचे असू शकतात, त्यांचं लोकांशी कसं नातं असू शकतं याचं अवलोकन करायला लावणारा, देवाला आणि पर्यायानं स्वत:ला प्रश्न विचारायला लावणारा तो खेळ होता. ती एकच खेळ एआयच्या मदतीनं वेगवेगळ्या प्रकारांनी पॅकेज करून अनेक समूहांपर्यंत पोहोचवण्यात तरबेज होती. युआन सिग्नल ट्रान्समिशन आणि ॲनॅलिसिसच्या नव्या नियमांवर काम करत होता. फाटकी जीन्स, दाढीचे खुंट यांवरून तो काय काम करतो हे कोणीही ओळखू शकले नसते. त्याच्या हातात एक स्कॅनर आणि ट्रम्पच्या सोनेरी डोक्याचा ब्लूप्रिंट होता.
सॅमनं ब्लूप्रिंटकडे पाहत विचारलं, "तुम्हाला हा कसा मिळाला?"
युआन म्हणाला, "महत्त्व त्याला नाही. ते वापरून आपल्याला काय करायचं आहे त्याला आहे."
"आपल्याला?" सॅमनं विचारलं. "आम्हीच काही तासांपूर्वी ते डोकं बसवलं. तुम्ही आमच्यावर विश्वास कसा ठेवता?"
"काय झालं ते तुम्ही पाहिलंच. तशीही आमची तुमच्यावर नजर होतीच. आम्ही तुम्हां दोघांच्या प्रोफाईलचा अभ्यास केला आहे." युआन म्हणाला.
आरुणि पुढे येत म्हणाला, "आपण दोन गोष्टी करायच्या: (१) ट्रान्समिटर हायजॅक करून त्याद्वारे एक नवीन घोषणा विश्वात प्रसृत करायची – देवत्वाबद्दलची अनिश्चितता मान्य करणारी. एक पवित्र निर्दैवी विधान. "आम्हांला माहीत नाही दैवी कोण आहे किंवा काय आहे, परंतु आम्ही कोणा एकाची सत्यावर मक्तेदारी असू शकते, हे नाकारतो." आणि (२) गायानेटचे निष्क्रिय प्रोटोकॉल पुनरुज्जीवित करायचे. AIनं ईशनिंदेपूर्वीच्या वैश्विक परिस्थितीचं सिम्युलेशन डिस्ट्रिब्युटेड डिस्कवर साठवल होतं. जर गायानेट वितरित होणाऱ्या घोषणेत चौफेर पसरलेल्या विनयशीलतेचं, लीनतेचं बीज पेरू शकला, तर त्या मूर्तीत एकवटलेला अहंकार दूर होऊन कदाचित तारे... प्रतिसाद देतील."
बोलता बोलता हातातली डिस्क झाराला देत त्यानं तिला तिचा अद्ययावत गायानेट कन्सोल काढायला सांगितला आणि त्याला ती डिस्क जोडून गायानेटच्या इतर नोडबरोबर संधान साधणं सुरू केले.
—
दरम्यान, स्मारकाच्या पायथ्याशी लाल प्रकाशात न्हाऊन निघालेल्या चॅपलमधून एक धार्मिक वादविवाद थेट प्रक्षेपित केला जात होता.
दरम्यान, स्मारकाच्या पायथ्याशी लाल प्रकाशात न्हाऊन निघालेल्या चॅपलमधून एक धार्मिक वादविवाद थेट प्रक्षेपित केला जात होता.
एक ट्रम्पी : "ट्विट करून स्वतःला अस्तित्वात आणणारा हा एकमेव देव आहे. संक्षिप्त त्याचं वचन। शक्ती त्याची अलगाम। परतोनी तो येणार। विश्वाला भीती बेफाम॥"
एक अवशेषी: "भीती काही पूजनीय नसते. दैवत्व कमवावं लागतं, ते नियुक्त केलं जाऊ शकत नाही. जर देव तुम्हाला फक्त मूर्तीत दिसत असेल, तर ते श्रद्धेचं रूप नाही – तो फक्त तुमच्या भीतीचा किंवा मृत्यूनंतरच्या सुरक्षिततेचा हिशेब आहे. ब्रह्मांडात चूक करण्याची मुभा आहे. पण ते माफ करतं, कारण ते संवाद साधतं. पण जर आपण घोषणा केली की संवाद संपला... तर तारे गप्प बसतात."
दुसरा ट्रम्पी: "तो अल्फा आहे आणि तोच अल्गोरिदम आहे. तारे खाक झाले कारण त्यांना त्याची ओळख पटली, भीती वाटली."
धर्मशास्त्रज्ञ: "किंवा कदाचित त्यांनी तोंडं काळी केली कारण आपण त्यांना विसरलो. आपण आपली उपासना आत वळवली – शक्तीकडे. कुतूहलाकडे पाठ फिरवून."
पहिला ट्रम्पी: "माणसाला मार्ग हवा असतो. अंधारात एक हात. ट्रम्प तो हात ठरला. त्याच्या आवाजात निर्धार आहे. लोकांना गोंधळ नको, उत्तर हवं आहे."
अवशेषी: "उत्तर असायला हवं, पण फक्त एकच उत्तर? आपण इतकं काही अनुभवलंय… आकाश, गाणं, विज्ञान... ते सर्व कशाचा भाग आहेत?"
काही क्षण शांततेत गेले मग ट्रम्पी पुरोहित मान हलवत म्हणाला, "देव असो वा नसो, तो आमचा आहे. अज्ञात, अनंत, गूढ ईश्वरापेक्षा चिरपरिचित जुलमी केव्हाही चांगला."
पण त्या गूढतेत राम होता. तेवढ्यात, चॅपलच्या बाहेर, आकाशात प्रकाशाचा एक बिंदू चमकला.
—
आकाशात चमकणाऱ्या त्या बिंदूचा आकार वाढला. तो तारा नव्हता, तर प्रकाशाच्या नसण्याला पडलेलं एक छिद्र. सर्वप्रथम गायानेटनं त्याची दखल घेतली.
वस्तुरूप : अज्ञात
वेग : पृथ्वीच्या सापेक्ष शून्य
स्वाक्षरी : पॅटर्न-मॅचिंग सुमेरियन, वैदिक, बायनरी आणि कुरकुर अल्गोरिदम
ते जे काही होतं, पृथ्वीसापेक्ष अगदी स्थिर होतं. ते नेहमीच तिथे होतं. पण नजरेआड.
डोळ्याच्या बाहुलीप्रमाणे ती वस्तू प्रसरण पावली. आत अर्धपारदर्शक धाग्यांचं जाळं होतं, क्षणाक्षणाला बदलणारं, मानवी गणिताला अज्ञात भूमिती वापरणारं.
त्यातून एक आवाज आला. हवेतून नाही, थेट मनातही नाही. पण डेटासारखा तो आसमंतात भरून राहिला.
"आम्ही ऑडिटर आहोत."
कोणी कानात कुर्र केल्यासारखे झाराचे कान बधीर झाले. आवाजामुळे नाही, तर पृथ्वीवरचा प्रत्येक इनपुट प्रवाह डेटानं ओसंडून वाहू लागल्यामुळे – डिजिटल डेटा, जैविक डेटा, क्वांटम डेटा. त्यांचे ट्रान्समिटरही सुरू झाले.
"विश्वातल्या संस्कृतींमध्ये, एकेश्वराच्या घोषणा अनेकदा उदयास आल्या. पुरेसा काळ गेल्यानंतर तसे होणे साहजिक असते. बहुतेक दावे कोसळतात. काही थोड्या काळासाठी का होईना, डोलतात. तुम्ही उंबरठ्यावर पोहोचला आहात."
"कसला उंबरठा?" सॅम नकळत बोलला.
"ऑडिटचा."
आतापर्यंत नजर ठरत नसलेल्या अर्धपारदर्शक धाग्यांच्या त्या जाळ्याचा एक डोनट बनला. त्यामध्ये मानवांनी केलेल्या शेकडो घोषणा एकामागून एक प्रदर्शित झाल्या: नासदीय सूक्त ते क्यूनिफॉर्म टॅब्लेट ते व्हॅटिकन एनसायक्लिकल्सपर्यंत, युट्यूब प्रवचनांपासून ते एआय-चॅनलनं केलेले खरे-खोटे खुलासे.
शेवटी दिसलं ट्रम्पचे सोनेरी डोकं, हळूहळू फिरणारं.
"एकेश्वरवादाचा दावा नोंदवला गेला आहे. बलप्रक्षेपण आणि सिग्नल-पुनरावृत्तीद्वारे."
आरुणि पुढे सरसावला. "ते दैवी कृत्य नव्हतं. रेडिओ डिश आणि बीकन वापरून केलेला तो एक निरर्थक प्रकल्प होता."
"हेतूला महत्त्व नाही. महत्त्व आहे ते वक्तव्याच्या गुरुत्वाला. पुरेशा संख्येनं लोकांनी त्यावर विश्वास ठेवला. विश्व झुकलं."
डोनटमध्ये एक नवीन ओळ दिसली :
"एकेश्वराची घोषणा: २०४६. अस्तित्व: ट्रम्प. प्रतिसाद: ताऱ्यांचा मूक निषेध."
सॅमनं तिरक्या मानेनं आरुणिकडे पाहत विचारलं, "म्हणजे आपल्या मूर्ख मूर्तीनं ब्रह्मांडाला खरंच त्रास दिला?"
"ब्रह्मांडाला नाही," आरुणि शांतपणे म्हणाला. "पण त्याच्या धारणेला."
झारा कुजबुजली, "एक मिनिट! श्रद्धा जर ओसंडून वाहिल्यामुळे तारे मंदावले, तर लोकांनीच दर्शवलेला अविश्वास ताऱ्यांना परत चेतवू शकेल?"
डोनटचं जाळं होऊन ते छोटं होऊ लागलं होतं. आता परत त्याचा डोनट झाला.
"कदाचित. पण अशा पुनर्बांधणीसाठी काही महत्त्वाच्या गोष्टी दिसाव्या लागतील: सर्वव्यापी वयंकार, विरोधाभासी मतांप्रती बहुजनांची सहिष्णुता, आणि काळाप्रमाणे व्याख्यांच्या बदलांची, उत्क्रांतीची स्वीकृती."
सॅम स्वतःवरच खूश झाल्याप्रमाणे हसला. "म्हणजे धर्मसंकटांची एक शिडीच म्हणायची."
क्षणभरानं ऑडिटरच्या अर्धपारदर्शक जाळ्याचा जणू तोंड उघडण्यासाठी डोनट बनला. पण काही न बोलताच त्याचं पुन्हा जाळं झालं आणि हवेत विरून गेलं.
—
आरुणिनं द अवशेषची नवीन घोषणा तयार केली. ती थोडक्यात अशी होती : "दैवी शक्ती आपल्यांत नसून ज्ञाताच्या पलीकडे, सर्वव्यापी आणि उत्क्रांत होणारी आहे. कोणीही त्याचं पूर्ण प्रतिनिधित्व करू शकत नाही. कोणत्याही एका नावात ती सामावू शकत नाही. कोणत्याही एका पुतळ्यात तिचं मूर्तरूप असू शकत नाही."
पुनर्स्थापित झालेल्या गायानेटद्वारे युआननं सर्व ज्ञात भाषांमधून ती थेट क्वांटम बिकनवर अपलोड करायचा प्रयत्न केला; पण तो फसला. युआनचा चेहरा काळवंडला.
तो प्रयत्न फसणार हे जणू माहीतच असल्यासारखा सॅम म्हणाला, "इथल्या इतकी जरी नाही तरी इलेक्ट्रॉनिक सुरक्षितता तिथेही काटेकोर आहे. इथून संदेश ट्रान्समिट होणं शक्य नाही."
"मग आता?" मायलीनं विचारलं.
"यावर एकच उपाय," झारा म्हणाली. "मला तिथली सगळी माहिती आहे. वर एकही व्यक्ती नाही. मी हे प्रत्यक्ष जाऊन करणार."
"झारा, जिवंत व्यक्ती जरी नसल्या तरी लेझर बीमचं जाळं विसरलीस का?" सॅमनं विचारले.
"विसरले नाही, पण तो धोका पत्करावाच लागणार."
"थांब. तू जाणार असशील तर मीही येणार. मला त्या लेझरची माहिती आहे. याचसाठी कदाचित अवशेषनं आपल्याला इथे आणलं आहे. माउंट रशमोरचा कळस आता ट्रम्पींसाठी काशी आहे. आपण तिथे ब्रह्महत्येच्या पापक्षालनासाठी नाही तर आपल्याला ज्ञात ब्रह्मांडाच्या पुनर्जीवनासाठी जाऊ या. चल."
थोड्याच वेळात गायानेट मोबाइल डॉन्गल घेऊन झारा आणि सॅम आधी आले होते त्या वाटेनंच डोंगर चढायला लागले. युआन आणि आरुणिनं गस्त घालणाऱ्या ट्रम्पींचं लक्ष काही काळ दुसऱ्या बाजूला वेधलं होतं. बाहेर अजूनही तोच राखाडी, जड पडदा होता.
"ही फक्त घोषणा नाही," वर चढताना झारा पुटपुटली. "हा चक्क माफीनामा आहे."
"तुला खरंच वाटतं की तारे हे ऐकतात?" सॅम थोडी उसंत घेत म्हणाला. "सांग ना."
ती काही क्षण थांबली. मग म्हणाली, "नाही. पण निदान आपल्या सशक्त शंकेची, दुभंग मताची जाणीव तरी त्यांना होईल."
"तेवढं पुरेल?" सॅमनं विचारलं.
"नाही." झाराचं उत्तर त्रोटक होतं.
डोंगर चढणं उतरण्यापेक्षा कठीण होतं. मजल दरमजल करत ते चढले. सॅममुळे लेझर्सचे पॅटर्न चुकवणं शक्य झालं. शेवटी एकदाचा युआनचा संदेश त्यांनी क्वांटम बिकनवर गायानेट मोबाईल डॉन्गलनं अपलोड केला, आणि युआनला तसं कळवलं.
लगोलग नव्या घोषणेला बळकटी देण्यासाठी, मायलीनं एक मुक्त-स्रोत धर्मशास्त्रीय खेळ – गॉडस्प्लिट – वितरित केला. यात पुढच्या फेऱ्या गाठण्यासाठी प्रत्येक खेळाडूला खेळातल्या गृहीतकांवरच शंका घ्याव्या लागत, नैतिक विरोधाभासांशी सामना करावा लागे. नचिकेत, थिसियस, युधिष्ठिर, मॉण्टी हॉल या सर्वांशी दोन हात करावे लागत. श्रेयस बरं, की प्रेयस; या दाराआडचं लगेच मिळणारं छोटं बक्षीस बरं की उशिरानं मिळणारं दुसऱ्या दारामागचं मोठं? किंवा पाच लोकांना वाचवण्यासाठी दुसऱ्याच एखाद्याला मारलेलं चालेल का? तो तुमचा सख्खा कोणी असेल तर? यांसारखे अनेक ट्रॉली प्रॉब्लेमदेखील. खेळाडूंच्या अहंभावाचा बीमोड करण्यासाठी मधूनमधून त्यांना त्यांच्या अवताराची ओळख उघड करावी लागे. खेळातल्या गेम फिचरमुळे आणि त्यातील बक्षिसांमुळे काही दिवसांतच, तो इतिहासातला सर्वांत व्हायरल गेम ठरला.
मुलं तो खेळत. एआयही खेळत. काही धर्माभिमानी ट्रम्पीही खेळत, निदान त्याला हरवण्यासाठी. पण गॉडस्प्लिट जुळवून घेत सफाईनं उत्क्रांत होत असे; आणि लोकांना नव्यानव्या नैतिक विरोधाभासांच्या तावडीत देत असे. लोक हवालदिल होत, पण पुन्हापुन्हा गॉडस्प्लिट खेळत. लोक एकमेकांशी बोलून खेळत, पण त्यांचं एकमत होत नसे.
लवकरच, सगळं काही नेहमीच काळे-पांढरं नसतं याची जाणीव जास्त प्रगल्भ झाली. पुरेशा नोडनी अनिश्चितता कवटाळली.
आणि एका रात्री, एक तारा पुन्हा उजळला.
पृथ्वीच्या आकाशात नाही – पण कोणाच्या तरी सिम्युलेशनमध्ये. मग दुसरा. मग तिसरा.
डोनटमार्गे ऑडिटरचा संदेश आला, "देवत्वाचा दावा कमकुवत आहे. एन्ट्रोपी पुन्हा संतुलित होते आहे. ऑडिट पूर्ण झालं. ब्रह्मांड संवाद करत राहील."
आणि तो डोनट नाहीसा झाला.
त्याचवेळी सोनेरी डोकंही गायब झालं. ते कोसळलं नाही. एका क्षणी ते होतं, आणि दुसऱ्या क्षणी नव्हतं.
लोक किंचाळले. काहींनी आनंद व्यक्त केला, तर काही रडले.
आरुणि, झारा आणि इतर खूप दिवसांनी पहिल्यांदाच गुहेबाहेर आले.
झारानं रंग बदलणाऱ्या आकाशाकडे पाहिलं. पुन्हा एकवार निळं आकाश. ती गोंधळली होती. "हे... हे आपण केलं?" तिनं अडखळत विचारलं.
आरुणिनं तिच्या खांद्यावर हात ठेवला. "आपण फक्त संदेश बदलला. पण विश्वास, किंवा अविश्वास म्हणूया? त्यात सहभाग अनेकांचा होता – सोशल मीडिया, व्हायरल खेळ…"
"आपण देवाला मरू दिलं नाही तर," ती कुजबुजली.
आरुणि हसला. "नाही. आम्ही शेवटी कबूल केलं की, आपण देव न बनू शकतो न बनवू शकतो."
मजा आली वाचताना The universe…
मजा आली वाचताना
The universe is not required to be in perfect harmony with human ambition. - Carl Sagan