Skip to main content

ख्रिस्ती धर्मांतरे आणि त्यामागील प्रेरणा

दिवाळी अंक २०२५ अललित

भारतात केरळ राज्यात ख्रिस्ती धर्म पहिल्या शतकापासून आहे. तिथले ख्रिश्चन लोक येशू ख्रिस्ताच्या बारा प्रेषितांपैकी एक असलेल्या संत थॉमसचा वारसा सांगतात. सोळाव्या शतकात भारतात पोर्तुगीज साहसी दर्यावर्दी तलवार घेऊन आले, त्यांनी वसई, गोवा, मुंबई तसेच दक्षिणेत सत्ता काबीज केली. या पोर्तुगीज सत्ताधाऱ्यांबरोबर युरोपमधील ख्रिस्ती मिशनरीसुद्धा आले, त्यांनी येथे राज्यकर्त्यांच्या मदतीने ख्रिस्ती धर्माचा प्रसार केला. युरोपियन मिशनरींनी गोव्यात, मुंबईजवळ पालघर जिल्ह्यात वसई येथे आणि दक्षिण भारतात मदुराई वगैरे परिसरांत धर्मप्रसार केला, त्यामुळे या प्रदेशांत मोठ्या प्रमाणात ख्रिस्ती लोकसंख्या आढळते. 

 

सतराव्या शतकात इटालियन धर्मगुरू रॉबर्ट डी नोबिली दक्षिण भारतात मदुराई येथे आले तेव्हा स्थानिक ब्राह्मण लोक युरोपियन लोकांशी संबंध ठेवत नसत असे त्यांना आढळून आले. जेसुईट फादर रॉबर्ट डी नोबिली यांना त्यामुळे स्थानिक लोकांशी मिळूनमिसळून जाणे, धर्मप्रसार करणे अवघड झाले. 'फिरंगी' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या युरोपियन लोकांना स्थानिक लोक तुच्छ समजत; याचा संबंध युरोपियनांची आहारपद्धत आणि जीवनशैलीशी होता. परदेशी लोक मांसभक्षण करतात हे त्यामागचे एक प्रमुख कारण होते. समाजात उच्चवर्णीय आणि सन्मानाचे स्थान असलेल्या ब्राह्मण लोकामंध्ये प्रथम धर्मप्रसार करण्याचा रॉबर्ट डी नोबिली यांचा हेतू होता. त्यासाठी रॉबर्ट डी नोबिली यांनी मांसाहार त्यागून शाकाहार स्वीकारला. 

 

ब्राह्मणांप्रमाणे जानवे घालून, शेंडी राखून, कपाळावर आणि खांद्यांवर भस्म चोपडून आणि भगवी वस्त्रे परिधान करून ते संन्याशी, गुरू बनले. तामिळ आणि संस्कृत शिकले. ख्रिस्ती झाल्यानंतरसुद्धा या ख्रिस्ती ब्राह्मणांनी जानवे घालणे, शेंडी राखणे, कपाळावर भस्म चोपडणे हे ख्रिस्ती धर्मतत्त्वांशी विसंगत नाही असे मत त्यांनी मांडले. ब्राह्मणांनी रॉबर्ट डी नोबिली यांचा गुरू म्हणून स्वीकार केला आणि ते प्रसार करत असलेला ख्रिस्ती धर्मही स्वीकारला. 

 

त्याचप्रमाणे फादर रॉबर्ट डी नोबिली यांनी समाजातील खालच्या जातींमधील आणि अस्पृश्य घटकांमध्येसुद्धा धर्मप्रसार करून या लोकांना ख्रिस्ती धर्माची दीक्षा दिली. धर्मांतर करूनसुद्धा या लोकांना आपापल्या जातिप्रथा आणि जीवनशैली कायम राखण्यास त्यांनी उत्तेजन दिले. स्थानिक संस्कृती आणि प्रथा यांबाबत असे लवचीक धोरण स्वीकारल्यामुळे फादर रॉबर्ट डी नोबिली यांच्या धर्मप्रसारास मोठा प्रतिसाद मिळाला. मात्र त्यामुळे ख्रिस्ती समाजातसुद्धा चोरपावलाने स्थानिक जातिव्यवस्थेचा प्रवेश झाला. अशाच प्रकारे गोव्यात, वसईत आणि भारताच्या इतरत्र भागांत नंतर घडले. ख्रिस्ती समाजात आजही विविध जातीजमाती अस्तित्वात आहे यामागचे हे प्रमुख कारण आहे.

 

रॉबर्ट डी नोबिली यांनी उच्चवर्णीय ब्राह्मणांमध्ये आणि खालच्या, अस्पृश्य जातींमध्ये धर्मप्रसार करण्यासाठी वेगवेगळी पद्धत अवलंबली होती हे स्पष्टच आहे. उच्चवर्णीय समाजघटकांत त्यांच्याप्रमाणे राहून, त्यांच्यात बौद्धिक, वैचारिक संवाद साधून त्यांनी ख्रिस्ती धर्म शिकवला तर समाजात तुच्छ समजल्या लोकांशीही जवळीक साधून, त्यांना मदत करून या समाजघटकांना त्यांनी ख्रिस्ती बनवले. उच्चवर्णीय आणि खालच्या समजल्या जाणाऱ्या लोकांच्या धर्मांतराच्या प्रेरणा अगदी वेगळ्या होत्या हे निश्चित आहे. 

 

मदुराई आणि दक्षिण भारतात असे घडले त्याचप्रकारे भारताच्या इतर प्रदेशांतसुद्धा झाले. 

 

ईस्ट इंडिया कंपनीच्या अंमलात असलेल्या मुंबई बंदरात तीन अमेरीकन मिशनरींनी १२ फेब्रुवारी १८१२ रोजी पाऊल ठेवले. गॉर्डन हॉल, सॅम्युएल नॉट आणि त्यांच्या पत्नी रॉक्साना नॉट या त्या तीन व्यक्ती होत्या. त्यांच्या आगमनाने भारतात एका वेगळ्या, नव्या प्रागतिक, सामाजिक पर्वाची सुरुवात झाली. या पाश्चात्त्य ख्रिस्ती मिशनरींनी भारतात मुलांमुलींसाठी आधुनिक पद्धतीच्या शाळा उघडून एक क्रांती घडवली. धर्मप्रसार हेच या मिशनरींचे प्रमुख मिशन आणि उद्दिष्ट होते. या उद्दिष्टाला ब्रिटिश राज्यकर्त्यांचा — ईस्ट इंडिया कंपनी आणि नंतरचे ब्रिटिश राज्यकर्ते – यांचा मात्र धोरणात्मक सक्त विरोध होता. 

 

वसई, उर्वरित महाराष्ट्रात आणि ब्रिटिश भारतात ख्रिस्ती धर्माचा प्रसार सुरू झाला तो ब्रिटिश संसदेने ख्रिस्ती मिशनरींवर भारतात येण्यावर असलेली बंदी उठवल्यानंतरच. ईस्ट इंडिया कंपनीच्या चार्टरचे (सनद) ब्रिटिश संसद दर दहा वर्षांनी नूतनीकरण करत असे. ईस्ट इंडिया कंपनीच्या अमलात असलेल्या भारतात ख्रिस्ती मिशनरींच्या कार्यावर असलेली बंदी ब्रिटिश संसदेने १८१३मध्ये उठवली. त्यानंतर अमेरिकन आणि स्कॉटिश मिशनऱ्यांनी मुंबईत आणि नजिकच्या परिसरांत आधुनिक पद्धतीच्या शाळा सुरू केल्या आणि भारतात ख्रिस्ती धर्मप्रसाराचे, आधुनिक शिक्षणाचे आणि त्यामुळे विविध क्षेत्रांतील प्रबोधनाचे नवे युग सुरू झाले. 

 

आधुनिक भारतात प्रवेश करणारे आद्य परदेशी मिशनरी असलेल्या गॉर्डन हॉल यांनी आपल्या घरात आश्रय दिलेल्या एका आफ्रिकन मुलाचा, डॅनियलचा, १२ जुलै १८१८ रोजी बाप्तिस्मा केला. आधुनिक काळात ख्रिस्ती मिशनरींनी महाराष्ट्रात केलेला हा पहिला बाप्तिस्मा. मात्र बाप्तिस्मा करणारी आणि स्वीकारणारी व्यक्ती दोघेही परदेशी होते.

 

या काळात ख्रिस्ती धर्मात प्रवेश करणारी पहिली एतद्देशीय व्यक्ती मुसलमान होती, हे या अमेरिकन मराठी मिशनचा इतिहास वाचला की स्पष्ट होते. मोहंमद कादिन किंवा कादेर यार खान या मूळच्या हैदराबादचा असलेल्या वयाने ज्येष्ठ असलेल्या मुस्लीम व्यक्तीचा मुंबईत २५ सप्टेंबर १८१९ रोजी बाप्तिस्मा झाला. 

 

मॅन्युएल अंतोनिओ या कॅथोलिक व्यक्तीचा १८२५ साली पुन्हा एकदा प्रोटेस्टंट पंथात बाप्तिस्मा देण्यात आला आणि हेसुद्धा 'धर्मांतर' असेच गणले गेले. उमाजी गोविंद या चांभार व्यक्तीने १८२७ साली ख्रिस्ती धर्म स्वीकारला. 

 

डोनाल्ड मिचेल हे पहिले स्कॉटिश मिशनरी १८२३च्या जानेवारीत कोकणात बाणकोटला पोहोचले. तेथे ते मराठी शिकले आणि तेथे एक मराठी शाळाही काढली. डोनाल्ड मिचेल, जॉन कूपर, जेम्स मिचेल, अलेक्झांडर क्रॉफर्ड आणि रॉबर्ट नेस्बिट हे स्कॉटिश आद्य मिशनरी होते. स्कॉटिश मिशनरींनी हर्णै आणि बाणकोट येथे मिशनकार्य – म्हणजे शाळा चालवणे आणि धर्मप्रसार करणे – सुरू केले. या भागातल्या शाळांची संख्या ८०पेक्षा जास्त होती आणि त्यात तीनशेपेक्षा जास्त मुली होत्या.

 

स्कॉटिश मिशनरी सोसायटीने मुंबईत आपले कार्य सुरू केले होते तोपर्यंत मुंबईत एकही ख्रिस्ती धर्मांतर झाले नव्हते. लोकांमध्ये ख्रिस्ती धर्माविषयी अत्यंत प्रतिकूल भावना होत्या आणि जातीपातीला खूप महत्त्व होते. इथल्या समाजात जात किती खोलवर रोवलेली आहे याचा अनुभव या आद्य मिशनऱ्यांना खूप लवकर आला. ही घटना १८२७च्या आसपासची आहे. स्कॉटिश मिशनरी जॉन मरे मिचेल यांनी याबाबत लिहिले आहे. 

 

"स्कॉट्समन मिशनरींचे आगमन झाल्यानंतर काही दिवसांनंतर त्यांना एक आनंदाची बातमी मिळाली. लवकरच एक व्यक्ती बाप्तिस्मा घेणार होती. पण त्यावेळी झाले काय? (रेव्हरंड जॉन) कूपर यांनी सांगितलेली ती घटना मला आजही आठवते. एका हिंदू व्यक्तीने बाप्तिस्मा स्वीकारण्याची इच्छा दर्शवली तेव्हा मोठे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. बाप्तिस्मा विधी उरकल्यानंतर प्रभूभोजन होणार होते. रेव्हरंड (गॉर्डन) हॉल यासाठी तयारी करत होते तोच ती व्यक्ती अचानक उठून उभी राहिली. ''नाही, नाही. मी माझी जात अशी सहजासहजी सोडणार नाही'', असे म्हणत त्याने तेथून बाहेर धूम ठोकली.

 

या घटनेमुळे निर्माण झालेली नैराश्यतेची इतक्या दीर्घ काळानंतर आजही विसरता येत नाही. मिशनरींनी सलग आठ वर्षे विश्वासूपणे राबल्यानंतर अशी घटना घडली होती. अर्थातच अवघ्या मुंबईला हे प्रकरण लवकरच कळले.'' 

 

सार्वजनिक ठिकाणी ख्रिस्ती धर्मावर प्रवचने देऊन तसेच इतरांच्या धर्मांतील वैगुण्य आणि दोष दाखवून आपल्या ख्रिस्ती धर्माची उजवी बाजू पटवून देण्यावर सुरुवातीच्या मिशनरींनी अधिक भर दिला. त्यांच्या या प्रयत्नास बऱ्याच प्रमाणात चांगले यश मिळाले. मुंबई-पुण्यात, तसेच इतरत्र ब्राह्मण आणि इतर उच्चवर्णीय, आर्थिक आणि सामाजिकदृष्टया अत्यंत प्रगत असलेल्या मुंबईतील पारशी समाजातील अनेक लोकांनी या काळात ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला; यावरून मिशनऱ्यांना आलेले यश स्पष्ट होते. 

 

स्कॉटिश मिशनरी जॉन विल्सन बाणकोटला १८२९ साली आले तेव्हा बाणकोटचा रामचंद्र पुराणिक हा पुराण सांगणारा ब्राह्मण ख्रिस्ती झाला होता. उच्चवर्णीय ब्राह्मण जातीतल्या मराठी लोकांपैकी ख्रिस्ती झालेला हा पहिला माणूस. जॉन विल्सन यांनी मुंबईत १८३० साली हिंदू धर्म आणि ख्रिस्ती धर्म यांबाबत वादविवाद आयोजित केला तेव्हा ख्रिस्ती धर्माचा गड या रामचंद्र पुराणिकने लढवला होता. 

 

जॉन विल्सन यांनी 'हिंदू धर्म श्रेष्ठ की ख्रिस्ती धर्म' या विषयावर मुंबईत अंब्रोळी येथे १८३१च्या फेब्रुवारीत जाहीर वादविवाद आयोजित केला होता. 'उपदेशचंद्रिका' मासिकाचे संपादक मोरेश्वर दांडेकर यांच्याबरोबर चाललेला हा जाहीर वादविवाद सहा दिवस दररोज संध्याकाळी चालला होता. आपल्या मुद्द्यांच्या समर्थनार्थ मोरभट दांडेकर यांनी 'हिंदुधर्मसमर्थनार्थ' ही आपली पुस्तिका विल्सन यांना दिली होती. 

 

प्रभू समाजातील दाजिबा निळकंठने ५ डिसेंबर १८३० रोजी ख्रिस्ती समाजाची दीक्षा घेतली. कोकणातील राजापूरजवळील देवाचे गोठणे येथील एक ब्राह्मण बाबाजी रघुनाथ मराठे बाणकोट येथे २० नोव्हेंबर १८३१ रोजी ख्रिस्ती झाला. ब्राह्मण बाबाजी रघुनाथ मराठेचा बाप्तिस्मा झाल्यानंतर लगेचच त्याचा एका ब्राह्मण विधवेशी विवाह झाला. लग्नाआधीच ते दोघे एकत्र राहत होते; म्हणजे आताच्या भाषेत 'लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये होते. भारतात उच्चवर्णीय गणल्या जाणाऱ्या ब्राह्मण समाजातील विधवा पुनर्विवाहाची ही पहिलीच घटना. बाबाजी रघुनाथ मराठे या ब्राह्मणाशी एका ब्राह्मण विधवेने १८३१ साली केलेला हा पुनर्विवाह समाजशास्त्रज्ञांकडून आणि इतर अभ्यासकांकडून आजही दुर्लक्षितच राहिला आहे. 

 

ब्राह्मण जातीतील विधवा पुनर्विवाहाच्या या घटनेनंतर अनेक वर्षांनी म्हणजे तब्बल पंचवीस वर्षांनंतर १८५६मध्ये पुनर्विवाहाला ईस्ट इंडिया कंपनीकडून म्हणजेच ब्रिटिश संसदेकडून कायदेशीर मान्यता मिळाली होती. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी पंडिता रमाबाई यांच्या शारदा सदन आश्रमातील गोदू (नंतरच्या आनंदीबाई) या विधवेशी १८९३मध्ये पुनर्विवाह केला होता तो तब्बल सहा दशकांनंतर. बाबाजी रघुनाथ मराठे (१७९१-१८३४) यांचे संक्षिप्त चरित्र, त्यांनी लिहिलेल्या धार्मिक मराठी कविता आणि भजने यांच्यासह अमेरिकन मिशनरी रेव्हरंड हॉलिस रीड यांनी १८३५ साली प्रकाशित केले होते. पुण्यात २०२५ साली अशोक हिवाळे यांनी या चरित्राची दुसरी आवृत्ती प्रकाशित केली आहे.

 

ब्राह्मण विधवेचा हा ऐतिहासिक पुनर्विवाह ज्या दिवशी झाला त्याच दिवशी त्याच चॅपेलमध्ये (प्रार्थनामंदिरात) आणखी एक मोठी किंवा त्याहून अधिक क्रांतिकारक घटना घडली होती. ती म्हणजे ब्राह्मण बाबाजी रघुनाथला बाप्तिस्मा देण्यात आला त्याच दिवशी महार जातीच्या गोपी या महिलेचेसुद्धा ख्रिस्ती धर्मात स्वागत करण्यात आले. हिंदू धर्मातील दोन विरुद्ध असलेली टोके अशाप्रकारे पहिल्यांदाच ख्रिस्ती बंधुभावात एकत्र आली; अशा शब्दांत या घटनेचे वर्णन करण्यात आले आहे.

 

सुशिक्षित ब्राह्मण असलेल्या बाबाजी रघुनाथ मराठे यांच्या आणि महार जातीच्या गोपी या अडाणी महिलेच्या ख्रिस्ती धर्मांतराबद्दलच्या प्रेरणा निश्चितच वेगळ्या असणार. 

 

अमेरिकन मराठी मिशनने अहिल्यानगर (अहमदनगर) शहराच्या वेशीच्या आत बारा जणांचा बाप्तिस्मा केला. मिलिटरी हॉस्पिटलमध्ये आर्मी सर्जन असलेल्या डॉ. ग्रॅहॅम यांनी मिशनकडे सुपूर्द केलेल्या पुअर हाऊसमधील हे दृष्टीहीन, मूकबधीर, अपंग आणि अनाथ लोक होते. या बारा लोकांपैकी चौघांना १८३३च्या फेब्रुवारीत आणि इतरांना सहा मार्चला बाप्तिस्मा देण्यात आला. कुटुंबीयांनी आणि समाजाने टाकून दिलेल्या या अनाथ आणि अपंग व्यक्तींच्या मूळ जातीजमाती काय होत्या हे कळणे अशक्य आहे. मात्र या अनाथ लोकांच्या धर्मांतरामागच्या काय प्रेरणा असाव्यात याबद्दल अनुमान करणे फारसे कठीण नाही. त्यांना प्रेमाने आश्रय देणाऱ्या लोकांचा धर्म आणि देव त्यांनी सहजगत्या स्वीकारला होता. 

 

महाराष्ट्रातील ख्रिस्ती समाजाचे येरुशलेम अशी आता ओळख असणाऱ्या अहिल्यानगर शहरातील हे पहिलेवहिले सामूहिक धर्मांतर. याआधी १८३२च्या अखेरीस मिशनरींनी दोन गरीब लोकांना ख्रिस्ती धर्माची दीक्षा दिली होती. 

 

पेशवाई संपल्यानंतर महाराष्ट्रात ईस्ट इंडिया कंपनीचा अंमल सुरू झाला आणि मुंबई-पुण्यात तसेच इतर शहरांत स्कॉटिश आणि इतर ख्रिस्ती मिशनरींनी अनेक शाळा सुरू केल्या. या शाळांनी विद्यार्थ्यांमध्ये उत्साही वातावरण, नवे युग निर्माण केले. या शाळांत शिकलेले अनेक तरुण मुले ख्रिस्ती मिशनरींच्या प्रभावाखाली आली आणि त्यांना ख्रिस्ती धर्माचे आकर्षण वाटू लागले. या शहरांतील अनेक तरुणांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारलासुद्धा. पुण्यात स्कॉटिश मिशनरी जेम्स मिचेल यांच्या शाळांत शिकलेले आणि नंतर या शाळांत काही वर्षे शिक्षक म्हणून काम केलेले जोतिबा फुलेसुद्धा काही काळ ख्रिस्ती धर्माकडे आकर्षित झाले होते हे सर्वश्रुत आहे. 

 

मुंबई-पुण्यासारख्या शहरांत तरुण मुले ख्रिस्ती धर्माकडे कशाप्रकारे आकर्षित झाली याबद्दल नरेंद्र चपळगावकर यांनी 'सावलीचा शोध' या पुस्तकात पुढील शब्दांत लिहिले आहे – 

 

"मिशनऱ्यांनी उघडलेल्या शाळा हा मराठी मुलांसाठी वेगळाच अनुभव होता. इंग्रजी राजवटीपूर्वी महाराष्ट्रात असलेल्या पाठशाळा, गावठी खासगी शाळा आणि इतर सोयी यांत नसलेला मोकळेपणा अशा शाळांत असावा... या शाळांतून दिल्या जाणाऱ्या शिक्षणाचे नवे स्वरूप हेही मुलांना आकर्षित करून घेई. मिशनरी शाळांतून बायबल शिकवले जाई आणि ख्रिस्ती धर्माच्या स्वरूपाबद्दल व हिंदू समाजातील दोषांबद्दल मिशनरी शिक्षक आणि त्यांचे विद्यार्थी यांच्यात चर्चाही होई. या चर्चेचे स्वरूप फारच उथळ होते हे खरे, परंतु या वयातील तरुण मुले आणि हिंदू धर्मगुरू यांच्यात कोणताच संवाद नसे. ख्रिस्ती धर्माबद्दल आकर्षण वाटण्याला कदाचित हेही एक कारण झाले असावे... वयाच्या सोळासतरा किंवा अठराव्या वर्षी एखाद्या मुलाला धर्म कितपत समजतो व दोन धर्मांच्या तत्त्वांतील फरक किती लक्षात येतो हा प्रश्न बाजूला ठेवला तरी एक खरे की, यापैकी कोणीही आर्थिक लाभासाठी किंवा सामाजिक प्रतिष्ठेसाठी ख्रिस्ती झालेले नव्हते. या सर्वांना नव्या धर्माचे आकर्षण वाटले आणि अनेक अडचणी व कुटुंबियांचा प्रचंड विरोध सहन करून हे तरुण ख्रिस्ती झाले. '' 

 

मुंबईत उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या पारशी समाजातील काही तरुणांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला तेव्हा मोठी खळबळ माजली होती, कोर्टकचेऱ्यासुद्धा झाल्या होत्या. इंग्लंडच्या राणीसाहेबांकडे याविरुद्ध तक्रार करणारे खलिते पाठवण्यात आले होते. स्कॉटिश मिशनरी जॉन विल्सन यांच्या शाळेत शिकणाऱ्या धनजीभाई नौरोजी आणि होरमसजी पेस्तनजी या दोन पारशी तरुणांनी १८३९च्या अनुक्रमे १ मे आणि ५ मे रोजी पोलीसपहाऱ्यात ख्रिस्ती धर्म स्वीकारला. 

 

या दोन पारशी तरुणांपैकी होरमसजी पेस्तनजी पुढे ख्रिस्ती धर्मगुरू झाला; स्कॉटलंडमध्ये धर्मशिक्षण पूर्ण केले आणि भारतात दीर्घकाळ मिशनकार्य केले. त्यांनी आपले आत्मचरित्रसुद्धा लिहिले आहे.

 

मुंबईत परळीचा तरुण देशस्थ ब्राह्मण नारायणशास्त्री शेषाद्री ख्रिस्ती झाला. त्याचा बारा वर्षाचा धाकटा भाऊ श्रीपतशास्त्री यानेसुद्धा स्कॉटिश मिशन हाऊसमध्ये धर्मांतरासाठी आश्रय घेतला होता. याप्रकरणी श्रीपतीला डांबून ठेवल्याचा आरोप करणारा हेबीअस कॉर्पस अर्ज न्यायालयात रेव्हरंड रॉबर्ट नेस्बिट यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आला होता. भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच कायद्याचा अंमल सुरू झाला होता; या कायद्यासमोर न्यायालयात आणले जाणारे सर्व फिर्यादी समान होते. एखाद्या व्यक्तीला बेकायदेशीररीत्या डांबून ठेवण्यात आले आहे असा आरोप करणारे कलम असणारे 'हेबीअस कॉर्पस'चा खटला या निमित्ताने भारतात पहिल्यांदाच चालवला गेला असणार. 

 

न्यायालयात श्रीपतशास्त्रीला उभे करण्यात आले तेव्हा न्यायाधीश अर्स्कीन पेरी यांनी "बारा वर्षाच्या अज्ञान मुलाचे धर्मांतराबाबतचे मत मुळी विचारात घेण्यासारखेच नाही'', असे जाहीर केले. हा निवाडा देऊन त्या लहान मुलाला ताबडतोब त्याच्या वडलांकडे सोपवण्याचा आदेश न्यायाधीशांनी दिला.

 

अर्स्कीन पेरी यांनी बारा वर्षाच्या अज्ञान मुलाचे धर्मांतराबाबतचे मत मुळी विचारात घेण्यासारखेच नाही, असे जाहीर केले तेव्हा ''पण मूर्तिपूजा करण्यास मला का भाग पाडले जात आहे?'' असे विचारणाऱ्या त्या मुलाच्या प्रश्नाकडे अर्थात सरळसरळ दुर्लक्ष करण्यात आले. बारा वर्षांच्या मुलाला आपल्या धर्मांतराबाबत वैचारिक प्रेरणा आणि परिपक्वता असू शकते हे न्यायाधीशांनी या प्रकरणात मान्य केले नव्हते हे उघड आहे.

 

न्यायाधीश अर्स्कीन पेरी यांनी लहानग्या श्रीपत शास्त्रीचे वय आणि हित लक्षात घेऊन तो निवाडा दिला होता हे खरेच आहे. धर्मांतराच्या या प्रकरणामुळे श्रीपतला पुढे खूप हालअपेष्टा, मानहानी सहन करावी लागली. 'ना घर का, ना घाट का' अशी त्यांची स्थिती होऊन त्याच्या आयुष्याची शोकांतिका झाली. मिशनऱ्यांसोबत राहिलेला हा मुलगा आता बाटला असे म्हणत ब्राह्मण समाजाने त्याला आपल्या जातीतून बहिष्कृत केले. श्रीपतचे शुद्धीकरण करून त्याला स्वजातीत आणण्यासाठी 'दर्पण'कार बाळशास्त्री जांभेकर आणि नाना शंकरशेट यांनी खूप प्रयत्न केले, मात्र ते निष्फळ ठरले. 

 

या दोन शेषाद्री भावांपैकी थोरल्या असलेल्या आणि नंतर रेव्हरंड झालेल्या नारायणशास्त्री शेषाद्री यांनी ख्रिस्ती मिशनरी म्हणून फार मोठे योगदान दिले. पुण्यात त्यांनी काम केले आणि नंतर मराठवाड्यात लातूरजवळ बेथेल नावाचे ख्रिस्ती लोकांचे एक नगरच वसवले.

 

सोराबजी खारसेटजी लांगराना हा मुंबईतला पारशी तरुणही त्यानंतर लगेचच ख्रिस्ती झाला. फ्रान्सिना सांत्या या निलगिरी प्रदेशातील तोडा आदिवासी जमातीच्या असलेल्या, मात्र ब्रिटिश रेजिमेंट अधिकारी सर फ्रान्सिस फोर्ड आणि त्यांची पत्नी कॉर्नेलिया यांनी सांभाळलेल्या मुलीशी सोराबजी याचे लग्न झाले. सोराबजी १८७८ला आपली सरकारी नोकरी सोडून पूर्ण वेळ ख्रिस्ती मिशनरी बनले. त्यांच्या पत्नीने फ्रान्सिना सांत्या यांनी पुण्यात बालवाडी (नंतरची व्हिक्टोरिया स्कूल), इंग्रजी, मराठी, गुजराती आणि उर्दू माध्यमांच्या शाळा सुरू केल्या. 

 

सोराबजी हा पारशी ख्रिस्ती तरुण आणि त्यांची तोडा आदिवासी पत्नी फ्रान्सिना सांत्या यांची आणखी एक महत्त्वाची ओळख म्हणजे भारतातली पहिली स्त्री वकील कॉर्नेलिया सोराबजी यांचे हे दोघे पिता आणि माता. 

 

जॉन विल्सन यांचे परमस्नेही असलेल्या व्याकरणकार दादोबा पांडुरंग तर्खडकर यांची मुलगी वेणूबाई हिने वैधव्यानंतर एका ख्रिस्ती कुटुंबाच्या सहवासात राहून शिक्षण घेतले आणि तिने ख्रिस्ती धर्मही स्वीकारला होता. 

 

पंजाबचे राजा रणजितसिंग यांच्या मृत्युनंतर ब्रिटिशांनीं पंजाबचे राज्य खालसा केले. रणजितसिंहांचा पंधरा वर्षांचा मुलगा युवराज दुलिपसिंह ख्रिस्ती झाला आणि काही काळानंतर इंग्लंड येथेच स्थायिक झाला. ख्रिस्ती धर्माची दीक्षा घेणारा युवराज दुलिपसिंह हा पहिला सेलिब्रिटी किंवा वलयांकित शीखधर्मीय. भारताच्या पहिल्या आरोग्यमंत्री राजकुमारी अमृत कौर या दुसऱ्या वलयांकित व्यक्ती.

 

ख्रिस्ती धर्मगुरूंच्या संपर्कात आल्याने आणि त्यांच्या वर्तनाने आणि प्रभावामुळे प्रेरित होऊन राजघराण्यातील या व्यक्तींनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला होता. धर्मपरिवर्तनाच्या त्यांच्या प्रेरणा इतरांपेक्षा पूर्णतः वेगळ्या होत्या. 

पंजाबमध्ये आणि संपूर्ण भारतात ख्रिस्ती धर्मप्रसार करणाऱ्या मिशनरींमध्ये साधू सुंदरसिंग या मूळच्या शीखधर्मीय असलेल्या गूढवादी किंवा मिस्टिक धर्मगुरुचा समावेश होतो.

 

अहमदनगरच्या हरिपंत ख्रिस्ती या देशस्थ ब्राह्मण तरुणाचा १३ एप्रिल १८३९ रोजी बाप्तिस्मा झाला. 

१८५४ साली हरिपंत रामचंद्र खिस्ती आणि रामकृष्ण विनायक मोडक यांचा धर्मोपदेशक म्हणून दीक्षाविधी झाला. महाराष्ट्रात एतद्देशियांपैकी धर्मोपदेशक म्हणून दीक्षा मिळणारे ते पहिलेच दोन तरुण. येथील मराठी समाजात ख्रिस्ती धर्मप्रसार करणारे इथल्या मातीतील हे पहिले दोन मिशनरी. यापैकी रामकृष्णपंत विनायक मोडक हे अनेक चित्रपटांत कृष्णाच्या भूमिका साकारणारे प्रसिद्ध अभिनेते शाहू मोडक यांचे पणजोबा.

 

हरिपंत खिस्ती हे इंग्रजीतील 'सगुणा' ही आत्मचरित्रात्मक कादंबरी लिहिणाऱ्या आणि खालावलेल्या प्रकृतीमुळे वैद्यकीय शिक्षण अर्ध्यावर सोडावे लागलेल्या कृपा सत्यनाथन यांचे वडील. 'सगुणा : अ स्टोरी ऑफ नेटिव्ह ख्रिश्चन लाईफ'' ही कादंबरी १८८७ साली प्रसिद्ध झाली. इंग्रजीत लिखाण करणारी कृपा सत्यनाथन ही पहिली भारतीय स्त्री-कादंबरीकार . 

 

त्या काळात पश्चिमेकडून आलेल्या, नव्या वाऱ्यांनी प्रभावित झालेल्या पारशी समुदायातील अनेक तरुण ख्रिस्ती धर्माचा अंगीकार करतील अशी भीती धर्माच्या बाबतीत तसे कडवे असणाऱ्या पारशी समाजात निर्माण झाली होती. त्यात बरेचसे तथ्य होते. त्यामुळे वेळीच सावध होऊन या समाजातील धुरीण लोकांनी वेळीच योग्य ती पावले उचलली. स्वतःच शाळा उघडून मुले मिशनरींच्या प्रभावाखाली येण्याचे रोखले आणि पारशी समाजातील धर्मांतराची ही लाट वेळीच थोपवली गेली. 

 

असाच कमीजास्त प्रकार महाराष्ट्रातील आधुनिक शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या आणि तशी सामाजिक आणि आर्थिक कुवत असलेल्या ब्राह्मण समाजाबाबत घडला होता. त्या काळात पुण्या-मुंबईत स्कॉटिश आणि अमेरिकन मिशनरींच्या संपर्कात आलेल्या अनेक सुशिक्षित ब्राह्मण व्यक्तींनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला.

 

पंडिता रमाबाई, नारायण वामन टिळक, 'स्मृतिचित्रे' लिहिणाऱ्या लक्ष्मीबाई टिळक, 'यमुनापर्यटन' ही मराठीतली पहिली कादंबरी लिहिणारे बाबा पदमनजी, नीळकंठशास्त्री नेहेम्या गोरे आणि लातूर जिल्ह्यात बेथेल हे ख्रिश्चनांचे गाव वसवणारे नारायणशास्त्री शेषाद्री या सर्व लोकांनी एकोणिसाव्या शतकात ख्रिस्ती धर्म स्वीकारला. कासार जातीचे बाबा पदमनजी वगळता हे सर्व लोक उच्चवर्णीय ब्राह्मण आहेत. महाराष्ट्रात विविध क्षेत्रांत आपल्या कामगिरीने नाव कमावलेल्या या सर्व व्यक्तींनी विशिष्ट सामाजिक आणि वैयक्तिक परिस्थितीत धर्मांतर केले. सारासार विचार करून झालेले हे मतपरिवर्तन, धर्मांतर म्हणता येईल. हिंदू धर्माचा चांगला अभ्यास असणाऱ्या या व्यक्तींनी ख्रिस्ती धर्माची ओळख करून घेऊन नंतर पूर्ण विचारांती धर्मांतर केले होते. अनेक भागांत झालेल्या सामूहिक धर्मांतरांपेक्षा या व्यक्तींच्या धर्मांतरांच्या प्रेरणा आणि भूमिका निश्चितपणे वेगळ्या होत्या.

 

न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी आपल्या 'सावलीचा शोध' (मौज प्रकाशन) या ग्रंथात ब्रिटिश अमदानीत महाराष्ट्रात ख्रिस्ती धर्म स्वीकारणाऱ्या काही प्रमुख व्यक्तींच्या जीवनांविषयी तसेच त्यांच्या धर्मांतरांमागील प्रेरणांचा मागोवा घेतला आहे. या पुस्तकात चपळगावकरांनी मुंबईतले दोन पारशी तरुण धनजीभाई नौरोजी आणि होरमसजी पेस्तनजी, परळीचे नारायणशास्त्री आणि श्रीपतशास्त्री शेषाद्री हे दोन भाऊ, अहिल्यानगरचे हरिपंत खिस्ती, त्यांची मुलगी कृपा सत्यनाथन, रेव्हरंड विष्णुपंत भास्कर करमरकर, वाराणशी येथील नीळकंठशास्त्री नेहेम्या गोरे, भारतातील पहिली स्त्री वकील कॉर्नेलिया सोराबजी आणि रावसाहेब रघूवेल ल्युकस जोशी यांच्याविषयी विस्तृत लिहिले आहे. 

 

चित्पावन ब्राह्मण आणि संस्कृत पंडित असलेल्या पंडिता रमाबाई यांनी इंग्लंडमधील वास्तव्यात ख्रिस्ती धर्म स्वीकारला आणि आपले उर्वरित आयुष्य पतित आणि अनाथ स्त्रियांच्या उद्धारासाठी घालवले. आपण ख्रिस्ती का झालो, यामागच्या त्यांच्या प्रेरणांबाबत पंडिता रमाबाई यांनी स्वतः लिहिले आहे. 

 

रमाबाई १८८३च्या सुरुवातीला इंग्लंडला गेल्या, वॉन्टेज येथील प्रेमळ सिस्टर्सनी त्यांचे स्वागत केले. या सिस्टरांनी (नन्स) रमाबाईंना एकदा पतित स्त्रियांच्या उद्धारासाठी चालवलेले कार्य दाखवले. रमाबाई लिहितात, "तिथल्याच रेस्क्यू होम्समध्ये राहून गेलेल्या काही स्त्रियांची व माझी तिथे गाठ पडली तेव्हा त्यांच्यामध्ये अगदी पूर्ण पालट झालेला पाहून व त्यांनी दुसऱ्यांची दुःखे हलकी करण्याच्या कामी स्वतःला वाहून घेतलेले पाहून माझ्या आयुष्यात येथे अगदी प्रथमच पतित स्त्रियांच्या उद्धारासाठी काही करणे शक्य आहे हे मला पटले.

 

माझ्या स्वतःच्या देशातील हिंदूंनी असल्या स्त्रियांसाठी अशा प्रकारचे काम केलेले मी कधी पाहिले नव्हते की ऐकले नव्हते. कोणीही त्यांच्याशी प्रेमळपणाने बोलल्याचे मला ठाऊक नाही किंवा त्यांना वाममार्गापासून दूर सारण्याचा प्रयत्न केल्याचेही मी कधी पाहिले नाही. अशा स्त्रियांच्या बाबतीत हिंदू शास्त्रे कठोर आहेत. पतित स्त्रियांना वेशीबाहेर घालवून कोल्ह्याकुत्र्यांकडून खाववावे अशी स्मृतिकारांची राजाला स्पष्ट आज्ञा आहे. 

 

फुलहॅम येथील ही वसतिगृहे पाहून व त्यात चाललेली दयेची कामे पाहून मला असे वाटू लागले की हिंदू धर्म आणि ख्रिस्ती धर्म यांत खरेखरे अंतर आहे.''

 

येशू ख्रिस्त आणि शोमरोनी स्त्री यांच्या संभाषणाचा उल्लेख करून रमाबाई म्हणतात, 'ख्रिस्ताने पतित स्त्रियांचा द्वेष केला नाही तर त्यांच्या तारणासाठी पुढे सरसावला. हिंदूंच्या धार्मिक पुस्तकांत मी असे कधी वाचले नाही. माझी अशी खात्री पटली की हिंदुस्थानच्या किंवा जगातल्या दुसऱ्या कोणत्याही पदतली तुडविल्या जाणाऱ्या स्त्रियांचा तोच तारणारा आहे. अशा रीतीने माझे मन ख्रिस्ताच्या धर्माकडे आकर्षले गेले. बौद्धिक दृष्टीने या सत्याबद्दल माझी खात्री पटली व १८८३च्या उत्तरार्धात वॉन्टेज येथे मी बाप्तिस्मा घेतला.'' 

 

धर्मांतराच्या प्रेरणांबाबत पंडिता रमाबाई चालवत असलेल्या मुलींच्या शाळा आणि आश्रमांचे उदाहरण अत्यंत बोलके आहे. पंडिता रमाबाई यांच्या प्रथम मुंबईतल्या आणि नंतर पुण्यात असलेल्या शारदा सदनमध्ये ब्राह्मण मुलींना सोवळ्याचे कडक नियम पाळू द्यावे आणि त्यामुळे रमाबाई किंवा इतर ख्रिस्ती शिक्षिकेला स्वयंपाकघरात प्रवेश नसावा, असा मॅनेजिंग कमिटीचा नियम होता. त्याशिवाय मुलींना (ख्रिस्ती) धार्मिक शिक्षण देऊ नये असाही एक नियम होता. 

 

रमाबाईंच्या प्रभावामुळे सदनातील मुली ख्रिस्ती होऊ नये याबाबत रमाबाई असोसिएशनची मॅनेजिंग कमिटी अगदी डोळ्यात तेल घालून होती. तरीही रमाबाईंची प्रार्थनेची खोली उघडी असे आणि मुली आत येऊन बसत असत. रमाबाई म्हणायच्या प्रार्थनेची खोली मी बंद करणार नाही आणि मुलींना या खोलीच्या आत येण्यासही बंदी घालणार नाही. येथून पुढे मॅनेजिंग कमिटी आणि रमाबाई यांच्यात सतत खटके उडू लागले. रमाबाई म्हणत की धर्मस्वातंत्र्य म्हणजे हवा तो धर्म स्वीकारण्याचे स्वातंत्र्य. त्याशिवाय मुलींना रमाबाईंचा धर्म स्वीकारायचा असेल तर त्याससुद्धा आडकाठी नसणे म्हणजे धर्मस्वातंत्र्य. नंतर पंडिता रमाबाईंनी सरळसरळ भूमिका घेतली की शारदा सदनात पाठविलेली हिंदू मुलगी हिंदूच राहील अशी हमी त्या देणार नाहीत. 

 

याचा परिणाम म्हणून शारदा सदनमधील काही मुली काढून घेण्यात आल्या.

 

पुढील काळात वैतागून पंडिता रमाबाई पुणे सोडून केडगावला गेल्या तेव्हा त्यांच्यावर अशी कुठल्याही प्रकारची बंधने आणि अटी नव्हत्या. दुष्काळात आणि इतरही संकटांत सापडलेल्या मुलींना त्यांनी आश्रय दिला तेव्हा त्यांपैकी अनेक मुलींनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला होता. यापैकी बहुतेकजणी अनाथ, विधवा, अंध आणि अपंग होत्या. रमाबाईंमध्ये त्यांनी देव पाहिला होता आणि या देवाचा आणि त्यांच्या धर्माचा त्यांनी साहजिकच स्वीकार केला.

 

त्याआधीच्या आणि नंतरच्याही धर्मांतरांच्या इतरही अनेक घटनांत एखाद्या व्यक्तीच्या आचरणामुळे आणि शिकवणीमुळे लहान मुले त्या व्यक्तीच्या धर्माकडे आकृष्ट होऊ शकतात हे पंडिता रमाबाईंच्या आश्रमांतल्या मुलींच्या धर्मांतरांमुळे दिसून आले. 

ख्रिस्ती धर्मांतरे

पंडिता रमाबाईंप्रमाणेच नारायण वामन टिळकसुद्धा मूळचे चित्पावन ब्राह्मण. नाशिक येथे त्यांनी संस्कृतचा अभ्यास केला. मनूबाई लग्नानंतर लक्ष्मीबाई टिळक बनल्या. विवाहानंतर अकरा वर्षे टिळकांनी नागपूर, वणी, मुंबई, मुरबाड वगैरे ठिकाणी कीर्तनकार, पुराणिक, शिक्षक, जुळारी असे अनेक व्यवसाय केले. एकदा त्यांना एका ख्रिस्ती गृहस्थाने बायबल वाचावयास दिले. त्यानंतर ते ख्रिस्ती धर्माचा अभ्यास करू लागले. त्यामुळे या धर्माची आवड निर्माण होऊन १८९५ साली टिळकांनी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला. त्यानंतर त्यांनी पुढील संपूर्ण आयुष्यभर ख्रिस्ती धर्माच्या सेवेस स्वत:स वाहून घेतले.

 

नारायण वामन टिळकांसारख्या संस्कृत पंडिताने ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केल्याने त्या काळातील समाजात किती मोठी खळबळ उडाली होती ते लक्ष्मीबाई आणि मुलगा देवदत्त यांचा वियोग त्यांना काही काळ सहन करावा लागला यावरून दिसून येते.

 

लक्ष्मीबाई टिळक यांच्या धर्मांतरामागची प्रेरणा तशी अगदी आगळीवेगळी होती असे म्हणता येईल. लक्ष्मीबाईंनी ते 'स्मृतिचित्रां'त लिहून ठेवले आहे. टिळकांच्या धर्मांतरानंतर अनेक दिवस लक्ष्मीबाई आणि त्यांचा छोटा मुलगा दत्तू (देवदत्त) टिळकांपासून वेगळे राहिले. लक्ष्मीबाई आणि दत्तू टिळकांकडे राहायला आल्यानंतरसुद्धा लक्ष्मीबाई कडक सोवळे पाळत असत; आपला आणि दत्तूचा स्वयंपाक सोवळ्यानिशी वेगळा करत असत. एकदा मात्र लक्ष्मीबाईंना मुसलमानाच्या हातचे पाणी पिण्याची वेळ आली. एक घोट पिताच त्यांना ओकारी आली. या घटनेनंतर लक्ष्मीबाईचे परिवर्तन झाले. त्यांना एक प्रकारे साक्षात्कार झाला. हळूहळू त्या अगदी अस्पृश्यांच्या हातचे खाऊ लागल्या. टिळकांबरोबर राहायला आल्यानंतर एक वर्षांनंतर त्यांनीही आपल्या मुलासह ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला. 

 

मुंबई-पुण्यातील नव्याने शिक्षित झालेले उच्चवर्णीय, ब्राह्मण तसेच पारशी तरुण ख्रिस्ती धर्माकडे आकर्षित होऊ लागले आणि त्यामुळे आणि इथल्या उच्चभ्रू समाजात धोक्याची घंटा वाजली. यथावकाश योग्य ती पावले उचलून आणि विविध सामाजिक, आध्यात्मिक किंवा धार्मिक मंडळे / समाज स्थापन करून ख्रिस्ती धर्माचे हे आक्रमण रोखण्यास बऱ्यापैकी यश आले. विशेषतः मुंबईतील पारशी समाजाने धर्मांतर रोखण्यासाठी समाजांतर्गत कडक तटबंदी उभारली आणि प्रतिबंधात्मक विविध उपाय हाती घेतले 

 

उच्चभ्रू आणि उच्चवर्णीय ब्राह्मण जातींपासून फार मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळेना, तसेच पारशी समाजातून धर्मांतरास प्रखर विरोध झाला तेव्हा ख्रिस्ती मिशनऱ्यांनी आपले लक्ष महाराष्ट्रातील ग्रामीण भागांतील दुर्लक्षित, उपेक्षित, गावच्या वेशीबाहेर हुसकावून लावलेल्या समाजघटकांकडे वळवले. मिशनऱ्यांच्या सुदैवाने त्या वेळी तरी या लोकांना मिशनऱ्यांनी जवळ करण्याबाबत, त्यांच्या शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक गरज पुरवण्याबाबत समाजातील पुढारलेल्या वर्गांचे काही एक आक्षेप नव्हते. नाही तरी या समाजघटकांना कितीतरी शतकांपासून मुख्य समाजाच्या देवधर्मापासून आणि एकूण समाजजीवनापासून दूर ठेवले गेले होतेच. 

 

उच्चवर्णीय किंवा पुढारलेल्या ब्राह्मण आणि पारशी लोकांच्या धर्मांतराबाबत समाजात प्रक्षोभ निर्माण झाला तसे या दुर्लक्षित समाजघटकांबाबत घडले नाही. मिशनरींना आपले कार्य बिनबोभाट करण्यासाठी मोकळे कुरण मिळाले होते. पवित्र शास्त्रात वर्णिल्याप्रमाणे 'पीक भरपूर आहे मात्र कामकरी कमी आहेत' या बायबलमधील वचनाप्रमाणे स्थिती निर्माण झाली होती. 

 

एकोणिसाव्या शतकात अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यांत आणि मराठवाड्यात इतरत्र ठिकाणी अस्पृश्य समाजातील लोकांनी मोठ्या प्रमाणात एकगठ्ठा धर्मांतर केले. महाराष्ट्रातील अनेक खेड्यांपाड्यांतील महार आणि मातंग समाजातील लोकांनी सामुदायिकरीत्या ख्रिस्ती धर्माचा, देवळांचा आणि धर्मग्रंथाचा स्वीकार केला आणि त्यांना पहिल्यांदाच एक नवी, वेगळीच प्रतिष्ठेची ओळख आणि अस्मिता मिळाली. या युरोपियन गोऱ्या लोकांच्या आणि स्थानिक धर्मांतरित उच्चजातींच्या लोकांच्या मांडीला मांड लावून, एकाच प्रार्थनामंदिरात ते प्रभूभोजन करू लागले. महाराष्ट्रातील आणि भारतातील ही मोठी सामाजिक, धार्मिक आणि आध्यात्मिक कृती होती. या कित्येक दशके चालू असलेल्या क्रांतीबाबत मुख्य समाजाला मात्र काहीही देणेघेणे नव्हते.

 

अशा प्रकारे अनेक मातंग आणि महार लोकांनी सामुदायिकरीत्या प्रभूच्या राज्यात प्रवेश केला. शिऊरचा भागोबा काळेखे हा मातंग जातीतला पहिलाच धर्मांतरित होता. अहिल्यानगरच्या चर्चमध्ये भागोबाने पहिल्यांदा पाऊल ठेवले त्या क्षणाला त्या देवळात कमालीचे उत्साहाचे, औत्सुकाचे वातावरण होते. भागोबा पूर्वी तमासगीर होते. या पार्श्वभूमीमुळे त्यांनी मराठीत अनेक ख्रिस्ती गायने लिहिली. ख्रिस्ती धर्मातील अस्सल मराठी गायनांची रचना करण्याचा मान अशाप्रकारे भागोबा यांच्याकडे जातो.

 

ख्रिस्ती धर्मात ब्राह्मण, धनगर, तेली, साळी, मराठा, मातंग, महार, कायस्थ प्रभू, आणि इतर कैक जातीजमातींचे लोक गुण्यागोविंदाने नांदू लागले. अशाप्रकारे उच्चवर्णीय ब्राह्मण, विविध ओबीसी समाजांतील, तसेच दलित आणि आदिवासी अशा विविध जाती आणि जमातींचा देशातील आणि राज्यातील ख्रिस्ती समाजात समावेश होतो.

 

गोव्यात आणि वसईत ख्रिस्ती मिशनऱ्यांनी येथील सर्वच जाती आणि जमातींच्या लोकांमध्ये धर्मांतराची मोहीम राबवली. त्यामुळे अनेक गावे, त्या गावांतील जवळजवळ सर्व कुटुंबे ख्रिस्ती धर्मात आली. या सामूहिक आणि सरसकट धर्मांतरांत वैयक्तिक वैचारिक आणि आध्यात्मिक मतपरिवर्तन फारसे नसावे हे उघड आहे.

 

महाराष्ट्रात मराठी ख्रिस्ती समाज हा मुंबई, वसई, पुणे, नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर कोल्हापूर जिल्ह्यांत, मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, लातूर, जालना, बीड जिल्ह्यांत आणि कोकणात सावंतवाडी, मालवण, वेंगुर्ला येथे मोठ्या प्रमाणात आढळतो. विशेष म्हणजे वेगवेगळ्या प्रदेशांत विखुरलेल्या या मराठी ख्रिस्ती समाजाची सामाजिक, ऐतिहासिक, भाषिक, धार्मिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी आणि चालीरीती एकमेकांपासून पूर्णतः भिन्न आहेत. उदाहरणार्थ, कोल्हापुरातल्या घाटमाथ्यावर आढळणारा मूळचा गोवेकर असणारा बारदेसकर समाज हा मराठवाड्यातल्या किंवा वसईतील ख्रिस्ती समाजापासून खूपखूप वेगळा आहे.

 

धर्मांतरांची कारणे मात्र व्यक्तिगणिक आणि समाजागणिक वेगवेगळी होती. पंडिता रमाबाई आणि नारायण वामन टिळक अशा संस्कृत पंडितांनी ख्रिस्ती धर्म कवटाळला त्यामागची कारणे वेगळी आणि समाजातील बहिष्कृत घटकांनी हा धर्म सामुदायिकरीत्या स्वीकारला यामागची कारणे पूर्णतः वेगळी होती. 

 

"ज्या काळात धर्म हा व्यक्तीजीवनात आणि सामाजिक जीवनात बहुतेक सर्व गोष्टींचे नियंत्रण करीत होता आणि धार्मिक व सामाजिक रूढींच्या विरोधात जाण्याची सामान्य माणसांची प्राज्ञा होत नसे त्या काळात धर्मांतर हे फारच मोठे साहस होते. ज्या जातींना हिंदू समाजाने बहिष्कृत व अवमानित केले होते त्यातील अनेकांनी सामाजिक प्रतिष्ठा आणि आर्थिक विकासाची संधी या दोन्ही उद्दिष्टांनी नव्या धर्माचा स्वीकार केला होता'', असे नरेंद्र चपळगावकर यांनी म्हणले आहे. 

 

"काही ब्राह्मण, मराठा, पारशी वगैरे जमातींतील व्यक्तींनी नव्या धर्माचा स्वीकार केला. बाबा पदमनजी, पंडिता रमाबाई व रेव्हरंड नारायण वामन टिळक यांच्यासारख्या प्रौढ व्यक्तींनी ख्रिस्ती धर्माचे तौलनिक स्वरूप लक्षात घेऊन त्या धर्माचा स्वीकार केला. परंतु इतर अनेक व्यक्ती अतिशय कोवळ्या वयात नव्या धर्मात दाखल झालेल्या आहेत. ज्या शाळेत ते शिकत होते अगर शिकवित होते त्या शाळेतील वातावरण व शाळेत वाचावयास लागलेल्या बायबलचा व शिक्षकांचा परिणाम या सर्वांतून त्यांचे धर्मांतर झालेले दिसते,'' असे चपळगावकर म्हणतात.

 

महाराष्ट्रात सामूहिक ख्रिस्ती धर्मांतर काही विशिष्ट जिल्ह्यांतच झालेले आढळून येते.अहिल्यानगर जिल्ह्यात १८३१ साली प्रोटेस्टंट पंथियांनी मिशनकार्य सुरू केले. कॅथोलिकपंथीय येशूसंघियांचे (जेसुईट) मिशनकार्य या अहिल्यानगर जिल्ह्यात १८७८मध्ये सुरू झाले. सन १८९२पर्यंत नगर जिल्ह्यातील केंदळ, वळण आणि संगमनेर येथील कॅथोलिकांची संख्या १००० झाली होती. 

 

पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य असलेल्या या लोकांना माणुसकीने वागवून, शिक्षण देऊन या मिशनरींनी ख्रिस्ती धर्माची दीक्षा दिली होती. मिशनरींचे सेवाकार्य हेच या लोकांसाठी ख्रिस्ती धर्माकडे वळण्यासाठी प्रेरणा ठरले होते. हे स्पष्ट करण्यासाठी अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्रवरेच्या आणि गोदावरीच्या काठी एकाच वेळी समांतर रीतीने एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीस झालेल्या धर्मांतराचा इतिहास उपयुक्त ठरेल. 

 

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या वैजापूर आणि गंगापूर तालुक्यांत मोठ्या प्रमाणात ख्रिस्ती धर्मांतर झाले, यामागे एक गमतीदार घटना आहे. 

 

वैजापूर तालुक्यातील माळीघोगरगाव येथील नाथू शिनगारे या तरुण महाराचे शेजारच्या नगर जिल्ह्यातील राहुरीजवळील वळण गावच्या मुलीशी लग्न झाले होते. आपल्या सासूरवाडीत नाथू शिनगारे आला तेव्हा तेथील अनेक महारांनी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला आहे हे त्याने पाहिले. बहुदा त्याच्या सासरचे कुटुंबही ख्रिस्ती झालेले असतील. नाथूनेही मग बाप्तिस्मा स्वीकारला आणि जेसुईट फादर वाईसहौप्टकडे कॅटेकिस्ट – धर्मशिक्षक – म्हणून तो काम करू लागला. माळीघोगरगावात परतल्यानंतर त्याने आपल्या नातेवाईकांकडे आणि शेजाऱ्यापाजाऱ्यांकडे वळण मिशनकेंद्राविषयी, तिथल्या शाळांबाबत तसेच तेथे फादरांनी लोकांना केलेल्या मदतीचे, सामाजिक सुधारणांचे आणि प्रगतीचे बरेच कौतुक केले.

त्यानंतर माळीघोगरगावातील काही लोक वळणला जाऊन तेथील मिशनरींना भेटले. आपल्या गावातही मिशनकेंद्र आणि मुलांमुलींसाठी साठी शाळा सुरू करा, अशी त्यांनी तेथील फादरांना विनंती केली. मात्र गोदावरीच्या पलीकडच्या काठावर असलेले माळीघोगरगाव मोगलाईत म्हणजे हैदराबादच्या निजाम संस्थानात आणि नागपूर धर्मप्रांताच्या हद्दीत होते. वळणचे मुख्यफादर क्राईझ यांनी मग माळीघोगरगावला भेट दिली आणि नंतर औरंगाबादचे चॅप्लेन फादर माँटग्नॉक्स यांना तेथील लोकांच्या विनंतीची कल्पना दिली.

 

या घडामोडीनंतर १८९२च्या नोव्हेंबरात फादर मारियन थॉमस यांची माळीघोगरगावला नवे मिशनकेंद्र सुरू करण्यासाठी नेमणूक केली. पहिली दोन वर्षे फादर मारियान हे एका झोपडीत राहात होते. गावातील अत्यंत गरीब असलेले अस्पृश्य लोक त्यांचे शेजारी होते. चार वर्षांनी फ्रेंच धर्मगुरू फादर गुरियन जाकियर तेथे रुजू झाले. या फादर जाकियरबाबांनी विविध गावांत शाळा उभारून आणि सामाजिक काम करून या भागात ख्रिस्ती धर्माचा प्रसार केला. जाकियरबाबांच्या १९४७ सालच्या निधनसमयी माळीघोगरगाव मिशनकेंद्राच्या हद्दीतील गावांतल्या ख्रिस्ती लोकांची संख्या ६,७०० होती तर शेजारच्या बोरसर मिशनकेंद्रातील ख्रिस्ती लोकसंख्या ४,५०० होती.

 

फादर जाकियरबाबा यांनी सुरू केलेल्या कॅटेकिस्ट प्रशिक्षण शाळेत १२ ते १७ या वयोगटाची मुले असत. या तरुणांना मराठी भाषेचे व्याकरण, गणित, भूगोल, इतिहास आणि धर्मशास्त्राचे शिक्षण दिले जाई. मिशनच्या शाळांत शिक्षक आणि त्याचप्रमाणे धर्मशिक्षक म्हणून ते काम करत असत. विसाव्या शतकाच्या सुरुवातीस अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत ख्रिस्ती धर्म रुजविण्याच्या बाबतीत जर्मन फादर ओटो वाईसहौप्ट (१८५५-१९२१) आणि फादर जाकियरबाबा यांचे महत्त्वाचे योगदान आहे. प्रवरेच्या आणि गोदावरीच्या काठांवरील गावोगावांत आज अनेक ख्रिस्ती कुटुंबे आढळतात. त्यांच्या आधीच्या दोन-तीन पिढ्यांना या मिशनरींनीच ख्रिस्ती धर्माची दीक्षा दिली होती.

 

सन १८९७ ते १९०० या काळात दुष्काळामुळे लोकांचे खूप हाल झाले. याच काळात प्लेग आणि कॉलराच्या साथीही चालू होत्या. भुकेने आणि रोगांनी त्रस्त झालेल्या शेकडो लोकांना फादर जाकियरबाबा यांनी मदत केली. फादरांमुळे कितीतरी लोकांचे प्राण वाचले. देवदूतासारखे मदतीसाठी धावून आलेल्या फादरांचा आणि त्यांच्या ख्रिस्ती धर्माचा लोकांवर प्रभाव पडणे साहजिकच होते. त्यामुळे माळीघोगरगाव परिसरातील अनेक गावच्या लोकांनी या काळात ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला. 

 

सन १९०० मध्ये फादर जाकियरबाबांनी १,२०० व्यक्तींना बाप्तिस्मा दिला आणि यांपैकी बहुतेक लोक प्रौढ होते. माझे आजोळ असलेल्या माळीघोगरगावातील माझ्या आईच्या आई-वडिलांचा आणि शेजारच्या वाहेगावातील माझ्या वडिलांच्या आई-वडिलांचाही कदाचित या लोकांमध्ये समावेश असेल. माझ्या वडिलांचा जन्म २५ जून १९१७चा. त्यांच्या जन्मानंतर लगेचच माळीघोगरगाव येथे त्यांचा बाप्तिस्मा करण्यात आला होता. सेंट जॉन बॅप्टिस्ट याचा सण २५ जूनला असतो, त्यामुळे माझ्या वडलांचे जॉन असे नामकरण झाले.

 

सन १९०७च्या वार्षिक अहवालानुसार माळीघोगरगाव मिशनकेंद्रात ३२२५ ख्रिस्ती लोकसंख्या होती, आणि त्यावर्षी ४४४ जणांना बाप्तिस्मा देण्यात आला होता. कॅटेकिस्ट शाळेत २५ प्रशिक्षणार्थी होते. फादरांचे कार्य केवळ आध्यात्मिक स्वरूपाचे नव्हते. स्थानिक लोकांना साक्षर करण्यासाठी त्यांनी आपल्या मिशनकेंद्रात १९०७पर्यंत एकूण २५ शाळा सुरू केल्या होत्या आणि त्या शाळांत ३२५ मुले-मुली शिकत होते. घोगरगाव मिशनकेंद्राच्या कार्यक्षेत्रांत ख्रिस्ती लोक असलेल्या गावांची संख्या ५५ होती.

 

अव्वल ब्रिटिश आमदानीच्या काळात हैदराबादच्या निजामी संस्थानात जनतेला उर्दू या प्रशासकीय भाषेच्या माध्यमातूनच शिक्षण घ्यावे लागत असे. सन १८८०पूर्वी या संस्थानात हिंदू समाजाला शिक्षण देणारी अधिकृत अशी एकही शाळा नव्हती. निजामी सरकारी उर्दू शाळांत अस्पृश्‍यांनाही प्रवेश असे, शाळेतील मुसलमान शिक्षक अस्पृश्‍यांच्या मुलांना स्पृश्‍य मुलांच्या बरोबर बसवत याचाही सवर्ण पालकांना राग येत असे. पण शिक्षण घ्यायचे असल्याने मुस्लिम राज्यकर्त्यांपुढे त्यांचा नाईलाज होता. पुढे ख्रिस्ती मिशनरींनीही आपल्या शाळांत स्पृश्‍यांबरोबर अस्पृश्‍यांनाही प्रवेश दिला, तेव्हाही उच्चवर्णीयांना आपली नाराजी लपवता आली नाही.

 

सोसायटी फॉर दी प्रोपेगेशन ऑफ दी गॉस्पेल (एसपीजी) या मिशनरींच्या संस्थेने जालना येथे कार्य सुरू केले. मिशनरींच्या शाळांत सर्व जातीधर्माच्या मुलांना शिकवले जात असे. कॅथोलिक आणि प्रोटेस्टंट मिशनरींच्या मराठवाड्यातील आगमनामुळे तेथील दलित मुलांना प्रथमत:च शिक्षणाचे दरवाजे खुले झाले. सन १८६२पासून जालन्यात रेव्हरंड नारायणशास्त्री शेषाद्री यांची धर्मगुरू म्हणून नेमणूक झाली आणि या संस्थेच्या कार्याचा व्याप वाढला. सन १८६८मध्ये एकूण १०११ दलितांनी ख्रिस्ती धर्मात प्रवेश केला. या दलितांमध्ये मांग, महार आणि चांभार जातींच्या लोकांचा समावेश होता. मिशन कार्याबरोबरच दलित समाजाच्या उन्नत्तीसाठी रेव्ह. नारायणशास्त्री शेषाद्री यांनी विशेष प्रयत्न केले.

 

प्रोटेस्टंट मिशनरींनी या काळात लोहमार्गावर असणाऱ्या परभणी, नांदेड, उद्‌गीर, सेलू वगैरे ठिकाणी मिशनकार्य सुरू केले. या परिसरात त्यांनी देवळे उभारली, शाळा आणि वसतिगृहे सुरू केली. या शाळांत आणि वसतिगृहांत दलितांनाही प्रवेश असल्याने प्रथमत:च या उपेक्षितांना मिशनरींच्या रूपाने कुणी वाली मिळाला. हे मिशनरी प्रसार करत असलेल्या धर्माकडे ते आकर्षित झाले तर त्यात नवल असे काही नव्हते.

 

अहिल्यानगर जिल्ह्यात संगमनेर येथे जर्मन जेसुईट फादर ओटो वाईसहौप्ट हातात घंटी घेऊन गावातल्या मुलांना आपल्या शाळेत शिकण्यासाठी बोलावत असत. काळ होता १८९२चा. विशेष म्हणजे ही शाळा समाजातल्या सगळ्या घटकांतील मुलांमुलींसाठी खुली होती; महार, मांग, चांभार आणि धनगर यांच्यासाठीसुद्धा! संगमनेरसह अहिल्यानगर जिल्ह्यात आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात त्याकाळात हजारो कुटुंबांनी सामुदायिकरीत्या ख्रिस्ती धर्मात प्रवेश केला याबद्दल मग आश्चर्य कसले?

 

पश्चिम महाराष्ट्रात अहिल्यानगर जिल्ह्यात, मराठवाड्याच्या छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांत आणि विदर्भाच्या काही जिल्ह्यांत एकोणिसाव्या शतकात मोठ्या प्रमाणात सामुदायिक धर्मांतरे झाली. त्यामागे केवळ आध्यात्मिक प्रेरणा होती असे म्हणणे धाडसाचे ठरेल. पंडिता रमाबाई, रेव्हरंड नारायण वामन टिळक, लक्ष्मीबाई टिळक, रेव्हरंड नीळकंठशास्त्री नेहेम्या गोर्‍हे, बाबा पदमनजी वगैरे सुशिक्षित व्यक्तींच्या धर्मांतरात अध्यात्मिक परिवर्तन घडले हे नि:संशय. अस्पृश्य जातीजमातींच्या सामुदायिक धर्मांतराबाबत मात्र असे म्हणता येणार नाही. ज्या लोकांच्या वैयक्तिक वा सामाजिक जीवनात देव-धर्म, देऊळ, धर्मग्रंथ या संकल्पनांना कधीही प्रवेश नव्हता, अशा समाजातून वाळीत टाकलेल्या लोकांनी ख्रिस्ती धर्माचे अध्यात्म आधी समजून घेऊन नंतर विचारपूर्वक हा धर्म स्वीकारला असे म्हणणे वास्तवास धरून होणार नाही.

 

धर्मांतरे का होतात? आपल्या वाडवडिलांपासून आलेला धर्म सोडून दुसरा धर्म कवटाळण्याची पाळी एखाद्या व्यक्तीवर वा समाजावर का येते? व्यक्तिगत धर्मांतर अर्थातच पूर्णत: त्या व्यक्तीशी संबंधीत असलेल्या मानसिक, आध्यात्मिक आणि सामाजिक परिस्थितीवर अवलंबून असते. मात्र जेव्हा एखादा मोठा समूह आपला धर्म सोडून दुसर्‍या धर्मात जातो, त्यावेळी या धर्मांतरामागची कारणे समजून घेणे आवश्यक ठरते.

 

धर्मांतरामागची कारणे आणि प्रेरणा यांचे अविनाश डोळस यांनी पुढील शब्दांत विश्लेषण केले आहे –

 

"धर्मांतर हा आपल्या देशातील एक युगा-युगापासून चालत आलेला प्रयोग आहे. हिंदू धर्माच्या जाचाला कंटाळून आपल्या उद्धारासाठी अनेकांनी धर्मांतर केले आहे. मुस्लिम राजवटीत अस्पृश्यांतील बहुसंख्य लोकांनी मुस्लिम धर्म स्वीकारून समतेकडे धाव घेतली. त्याचप्रमाणे ब्रिटिश राजवटीत अनेकांनी जातीव्यवस्थेने दिलेले नीचपण झुगारून त्यातून मुक्त होण्यासाठी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला आहे. अनेक आदिवासी लोकांनीही शिक्षणासाठी, आपुलकीच्या मिळणार्‍या वागणुकीसाठी ख्रिस्ती धर्म स्वीकारला आहे. मिशनरी लोकांनी उपेक्षित, गरीब लोकांसाठी डोंगरदर्‍यात शाळांची स्थापना करून त्यांच्यापर्यंत शिक्षण नेऊन एक ऐतिहासिक कार्य केले आहे. या सार्‍यांचा परिणाम म्हणून भारतात अधिकाधिक दलित, आदिवासी मंडळी ख्रिस्ती झाली आहेत."

 

दुसर्‍या एका लेखात डोळस यांनी असे म्हटले आहे, "वेगवेगळ्या राजवटीतील धर्मांतराचा संदर्भ बदलला तरी त्यामागील धर्मांतरितांची भावना एकसारखीच राहत आली आहे. जातिव्यवस्था, अस्पृश्यता, शूद्र या जोखंडातून मुक्त होण्यासाठी लोकांनी धर्मांतरे केली. कधी ते मुस्लीम झाले, कधी ते ख्रिश्चन झाले. नंतर डॉ आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. समतेची शिकवण व वागणूक जेथे मिळेल त्या धर्माला आपलेसे करून या लोकांनी प्रस्थापित धर्माविरुद्धचा आपला निषेध नोंदविला आहे."

 

महाराष्ट्रातील वा इतर कुठल्याही ठिकाणी सामुदायिक ख्रिस्ती धर्मांतरे आध्यात्मिक परिवर्तनाने झाली असा दावा खुद्द ख्रिस्ती धर्मगुरू किंवा चर्चही करत नाही. अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रेषितकार्याचा इतिहास लिहिणार्‍या जेसुईट फादर डॉ. ख्रिस्तोफर शेळके यांचे विश्लेषण पुढीलप्रमाणे आहे –

 

"कॅथोलिक श्रद्धेचा निरनिराळ्या भागात कसा प्रारंभ झाला हे पाहणे मोठे मनोरंजक आहे. क्वचित प्रसंगीच अध्यात्माने सुरुवात झालेली दिसते असे खुद्द पवित्र शुभसंदेशातही आपल्याला दिसत नाही. लोक येशूच्या भोवती गर्दी करू लागले. कारण त्याने आजार्‍यांना बरे केले, मेलेल्यांना पुन्हा उठविले, अशुद्धांना त्याने शुद्ध केले आणि भाकरी वाढविल्या. लोकांचा जमाव त्याच्याकडे आल्यानंतरच त्याने त्यांचे लक्ष शाश्वत मूल्यांकडे ओढून घेतले. "तुम्ही माझ्यावर श्रद्धा ठेवता म्हणून तुम्ही माझ्याकडे आला असे नाही, तर मी तुम्हांला भाकर दिली म्हणून तुम्ही आलात." त्यानंतरच मग येशू अध्यात्म्याकडे वळून 'नश्वर अन्नासाठी झटू नका. त्याऐवजी चिरकालीन अन्नासाठी प्रयत्न करा' असे त्या लोकांना सांगतो. ख्रिस्ती मिशनरींनी सर्वप्रथम भुकेल्या लोकांची भूक भागविली, त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक प्रगतीसाठी प्रयत्न केले आणि नंतरच ते अध्यात्म्याकडे वळाले. 'आधी पोटोबा, मग विठोबा' अशी म्हण या भागात प्रचलित आहे. ती म्हण या मिशनरी लोकांनी आपल्या प्रेषितकार्यात प्रत्यक्षात उतरविली."

 

धर्मांतरामागची कारणमीमांसा स्पष्ट करताना एकोणिसाव्या शतकात सामाजिक अन्यायाचे, छळवणुकीचे बळी ठरलेल्या दलित समाजाच्या दृष्टीने ख्रिस्ती मिशनरी देवदूतच ठरले असे नाशिकच्या फिलोमिना बागुल यांनी म्हटले आहे. 

 

त्या म्हणतात, "मिशनऱ्यांनी आम्हाला ख्रिस्ताबरोबर ऐहिक सुखाचा मार्ग दाखविला. दोन हजार वर्षांपूर्वी प्रभू ख्रिस्ताने अनेक चमत्कार केले, मिशनऱ्यांनीही आमच्यासाठी अनेक चमत्कार केले. त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत केलेले कार्य कोणत्याही चमत्कारापेक्षा क़मी नव्हते. प्रभू ख्रिस्ताने लोकांना जेवण देऊन तृप्त केले. त्याचप्रमाणे मिशनऱ्यांनी अनेकांना अन्न देऊन तृप्त केले. प्रभू ख्रिस्ताने अंधांना दृष्टी दिली,त्याचप्रमाणे मिशनऱ्यांनी ज्ञान देऊन आम्हाला नवदृष्टी दिली. प्रभू ख्रिस्ताने मुक्यांना वाचा दिली, त्याचप्रमाणे मिशनऱ्यांनी हजारो वर्षे वाचा बंद असलेल्या आम्हाला वाचा दिली. ख्रिस्ताने दुखणाइतांना बरे केले, तद्वत मिशनऱ्यांनी औषधोपचारांनी रोग्यांना बरे केले. प्रभू ख्रिस्ताने मेलेल्यांना जिवंत केले. मिशनऱ्यांनी मृत्युपंथास टेकलेल्यांना जीवदान दिले. मिशनऱ्यांचे हे कार्य आमच्यासाठी एका मोठ्या चमत्काराप्रमाणेच होते. मिशनऱ्यांनी आम्हाला काय दिले नाही? त्यांनी आम्हाला विश्वास दिला, प्रेम दिले, धर्म दिला, भाकर दिली, आत्मविश्वास दिला, स्वाभिमान दिला, आत्मसन्मान दिला आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे उच्चवर्णीयांच्या गुलामगिरीतून मुक्त करून आमचा कोंडलेला श्वास मुक्त केला."

 

उच्चवर्णीयांनी पायदळी तुडवलेल्या, रोजची भाकरी मिळवण्यासाठी धडपडणार्‍या अस्पृश्य लोकांना परदेशी मिशनऱ्यांनी मायेने जवळ केले. दुष्काळाच्या आणि दोन महायुद्धांच्या काळात आणि इतरही वेळी अन्नपाणी, कपडालत्ता पुरवला. गावाच्या वेशीबाहेर हाकललेल्या या दलित लोकांच्या दृष्टीने तर हे मिशनरी देवदूतच ठरले. या मिशनऱ्यांनी दाखवलेल्या देवाचा, धर्माचा आणि ग्रंथाचा त्यांनी कुठल्याही शंकाकुशंका न काढता स्वीकार केला. अशाप्रकारे अनेक गावांतील सर्वच्या सर्व महार वा मांग कुटुंबे काही वर्षांच्या काळात ख्रिस्ती झाली. 

 

गोव्यात ज्या पद्धतीने धर्मांतर झाले तसे महाराष्ट्रात झाले नाही असे अनुपमा उजगरे यांनी म्हटले आहे. "कोणी बाप्तिस्मा द्या म्हटले तर मिशनरी त्याला आतून पारखून घेत. तसेच बाहेर काही काळंबेरं तर नाही ना हेही तपासून बघत. जातिभेदाच्या छळापायी जीव मेटाकुटीला आलेल्या तळागाळातल्यांना, मिशनरींनी देऊ केलेल्या जीवनस्तराचा मोह झाला. त्यामुळे सामूहिक धर्मांतरंही झाली.'

 

'कॅथोलिक मिशनरींकडे लोक प्रथम वळले ते धर्मभावना मनात ठेवून नव्हे' असे पुण्यातील सेंट विन्सेंट स्कूलचे माजी प्राचार्य फादर केनेथ मिस्किटा आणि फादर थॉमस साळवे यांनीही 'जेसुईट २००५' या वार्षिक अंकात स्पष्ट म्हणले आहे.

 

मिशनरींकडे वळण्याचा त्यांचा हेतू पोटापाण्याचा व सामाजिक मानसन्मान हा होता असे या धर्मगुरूंनी म्हटले आहे. 

 

"अहमदनगर जिल्ह्यातील लोकांचे ऐहिक आणि सामाजिक प्रश्न हाताळण्याचा मिशनरींनी प्रयत्न केला. अहमदनगर हा कायमचा दुष्काळी जिल्हा. त्यामुळे दुष्काळग्रस्त जनतेसाठी मिझरियोर, कारितास, सीआरएस यासारख्या सेवाभावी संस्थांच्या मदतीने मिशनऱ्यांनी विहिरी खोदण्यास, पंप आणि बियाणे खरीदण्यास स्थानिक लोकांना मदत केली. सामाजिक आणि धार्मिक कामांची गल्लत होऊ नये, आध्यात्मिक बाबींकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून सामाजिक कामांसाठी प्रथम श्रीरामपूर येथे आणि नंतर अहमदनगर येथे सोशल सेंटरची स्थापना करण्यात आली. 

 

लोकांच्या गरजा भागवून, त्यांच्याविषयी आस्था दाखवून जर्मन आणि एतद्देशीय येशूसंघीय व्रतस्थांनी येथील लोकांची श्रद्धा जोपासली. 'प्रारंभी शाळेसाठी एकही विद्यार्थी मिळत नसे. पण आज नगर जिल्ह्यातील येशूसंघियांच्या व धर्मप्रांतियांच्या शाळांत हजारो काथोलिक व अख्रिस्ती विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.पहिल्या महायुद्धाच्या सुरुवातीस नगर जिल्ह्यात १०,००० ख्रिस्ती होते व फक्त चार मिशन स्टेशन होती. आज वीस मिशन स्टेशन आहेत व ६०,००० ख्रिस्ती लोकांची व अख्रिस्ती जनतेची आध्यात्मिक व ऐहिक गरज भागविली जाते," असे फादर मिस्किटा आणि साळवे यांनी या लेखात म्हटले आहे.

 

धर्मांतरामागची कारणे आणि प्रेरणा काहीही असोत, ही सामुदायिक ख्रिस्ती धर्मांतरे एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्रातील एक मोठी सामाजिक क्रांती होती. प्रचलित समाजव्यवस्थेविरुद्ध तो एक मोठा विद्रोह होता. त्यावेळच्या अन्याय्य स्थितीतून सुटका करून घेण्याचा धर्मांतर एक मार्ग होता. हे धर्मांतर रोखण्यासाठी त्या अस्पृश्य जातींना त्यांना हवा तो आत्मसन्मान द्यावा किंवा अन्याय्य समाजव्यवस्था बदलावी असेही त्यावेळच्या समाजधुरिणांना वाटले नाही. 

 

विशेष म्हणजे या दलितांना मुक्तीचा हा मार्ग दाखविणारा त्यांच्यामध्ये कुणीही एक मोझेस नव्हता. एका गावात एक धर्मांतर झाले आणि त्या धर्मांतराचे ऐहिक, सामाजिक आणि आर्थिकही फायदे त्याच्या नातेवाईकांना, भाऊबंदांना लक्षात आले आणि त्यांनीही तोच मार्ग पत्करला. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीस सामुदायिक ख्रिस्ती धर्मांतराची ही लाट महाराष्ट्रात वर नमूद केलेल्या जिल्ह्यांत दीर्घकाळ चालू राहिली. 

 

खेड्यापाड्यांत, आडवळणाच्या छोट्याशा वस्तींवर अहिंसेच्या मार्गाने अगदी संथपणे झालेल्या या क्रांतीची त्यावेळच्या उच्चवर्णीयांनी साधी दखलही घेतली नाही. या सामाजिक क्रांतीमागची बहुविविध कारणे, त्याचा समाजाच्या इतर घटकांवर झालेला परिणाम आणि वरच्या जातींच्या अरेरावीस आणि सर्वच क्षेत्रांतील मक्तेदारीस अनेक शतकांनंतर पहिल्यांदाच मिळालेले आव्हान याचे समाजशास्त्रज्ञांनी व इतर संशोधकांनी आतापर्यंत विश्लेषण केलेले नाही.