Skip to main content

बेरेनिकेचा बुद्ध आणि प्राचीन भारताचा सामुद्री व्यापार


'जागतिकीकरण' ही संज्ञा आपल्या परिभाषेत सुमारे १९९०च्या आसपास, म्हणजे चीनने मुक्त अर्थव्यवस्थेचा आधार घेऊन एक आर्थिक महासत्ता होण्याच्या दिशेने भरारी घेतल्यानंतर आणि सोव्हिएत रशियाच्या विघटनानंतर शिरली. 'अवघे विश्वची माझे घर' असे आपल्याकडचे संतमहात्मे पूर्वीपासून म्हणत असतच, पण या कालावधीत झालेल्या वैशिष्ट्यपूर्ण घडामोडींनी भांडवलशाही अर्थव्यवस्थेची दारे सर्व जगाला खुली झाली. भांडवल आणि मालाची मुक्त वाहतूक आणि संचार हा या काळाचा आर्थिक विशेष मानला जातो. या संचरणाला जोड होती ती 'संपर्कजाला'ची. किंबहुना, संपर्कजाल आणि उत्पादन-संचार या एकमेकांवर अवलंबून असणाऱ्या बाबी आहेत हा समज या काळात दृढ होत गेला.

 

पण मनोरंजक गोष्ट ही आहे की, असा प्रकार जगात केवळ याच कालखंडात झाला हा समज तितकासा खरा नाही. जग 'जवळ येत चालले आहे' असे आपण म्हणतो खरे, पण ही जवळीक काही केवळ आधुनिक जगाची देण नाही. प्राचीन काळातही, तत्कालीन वाहतुकीची साधने वापरून, जग एकत्र येतच होते. आजच्या हवाई मार्गांसारखा तुलनेने सहज आणि वेगवान मार्ग अर्थातच प्राचीन काली उपलब्ध नव्हता, पण समुद्र हे प्राचीन लोकांना एकत्र आणणारे प्रवासाचे मुख्य माध्यम म्हणून निश्चितच परिचित होते. भारतीय उपखंडासारख्या, हजारो किलोमीटरची किनारपट्टी लाभलेल्या भूभागातल्या रहिवाशांसाठी सामुद्री वाहतूक ही मुळीच अपरिचित चीज नव्हती.

 

इसवी सनाच्या पहिल्या शतकात नैऋत्य मौसमी वाऱ्यांचा 'शोध' लागला असे पाश्चात्य इतिहास-परंपरा मानते. रोमन इतिहासकार प्लिनी या शोधाचे श्रेय ख्रि.पू. पहिल्या शतकात होऊन गेलेल्या हिपालस नावाच्या दर्यावर्द्याला देतो. इ.स.च्या पहिल्या शतकात लिहिले गेलेले 'पेरिप्लस तेस एरिथ्रास थालासेस' उर्फ 'लाल समुद्राचा पेरिप्लस' हे पुस्तकही हिपालसलाच नैऋत्य मौसमी वाऱ्यांचा शोधकर्ता समजते. हिपालस हा पूर्व-भूमध्यसामुद्री (Eastern Mediterranean) भागातला रहिवासी असावा. प्राचीन काळापासून या भू-सामुद्रिक क्षेत्रात ग्रीक, रोमन, तुर्की, फिनिशियन, इजिप्शियन इत्यादी दर्यावर्दी संस्कृतींचा संचार आणि प्रसार होत राहिला आहे. या भूभागातून लाल समुद्र आणि अरबी द्वीपकल्पाचे दक्षिण टोक समुद्रमार्गे ओलांडले की उर्वरित द्वीपकल्पाच्या काठा-काठाने प्रवास करत भारतीय उपखंडाचा पश्चिम किनारा गाठता येतो, हे ज्ञान या दर्यावर्द्यांना प्राचीन काळापासून होते. अतिप्राचीन सिंधु संस्कृतीच्या खाणाखुणा वागवणाऱ्या मण्यांसारख्या वस्तू पार सहारा वाळवंटापर्यंत पुरातत्त्वीय प्रेक्ष्यात सापडल्या आहेत, त्या बहुधा याच मार्गाने तिथपर्यंत पोचल्या असाव्यात. पण असा काठा-काठाने प्रवास न करता समुद्र थेट ओलांडून प्रवास केला तर भारतापर्यंत अधिक लवकर पोचता येते आणि असा प्रवास या मौसमी वाऱ्यांच्या मदतीने करणे शक्य आहे, ही महत्त्वाची जाणीव हिपालसच्या शोधामुळे पाश्चात्य दर्यावर्दींना झाली. इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून पुढच्या काळात भारताचा पश्चिम किनारा आणि अरबी समुद्रापलीकडच्या, लाल आणि भूमध्य समुद्राच्या काठी वसलेल्या भूभागांचा व्यापारी संपर्क वाढत गेला. समुद्र-उल्लंघन करून व्यापार कुठच्या मार्गांनी होई ते दाखवणारे एक मानचित्र इथे जोडले आहे (चित्र १). त्यावरून हा संपर्क कसा घडत होता याची भौगोलिक कल्पना येईल. 

 

समुद्र-उल्लंघन करून होणाऱ्या व्यापाराचे मानचित्र
चित्र १ : समुद्र-उल्लंघन करून होणाऱ्या व्यापाराचे मानचित्र

पण अशा रीतीने सुरू झालेला संपर्क केवळ व्यापारापुरताच मर्यादित राहणे केवळ अशक्य होते. व्यापाराचे स्वतःचे असे 'संपर्कजालीय शास्त्र' असते. व्यापार काही आपसूक घडत नाही – तो माणसे करतात आणि ही माणसेही त्याच्या संपर्कजालाचे महत्त्वाचे घटक असतात. अर्थात, व्यापाराद्वारे माणसां-माणसांतला संपर्कही अस्तित्वात येतो आणि वाढतो. सांस्कृतिक आदानप्रदान, बोली आणि भाषेसारख्या विवक्षित 'मानवी' कृतींची पडणारी छाप, एकमेकांशी जैविक प्रकारचे संबंध हेही व्यापाराच्या पार्श्वभूमीवर होत असतात. या सर्व बाबींचा अंतर्भाव अर्थातच 'संपर्कजाला'च्या विस्तृत प्रेक्ष्यात केला जातो आणि ते योग्यच आहे. मौसमी वाऱ्यांच्या 'शोधा'नंतर इसवी सनाच्या पहिल्या सहस्रकात ही परिस्थिती कशी बदलत गेली, आणि पौर्वात्य आणि पाश्चिमात्य जगाचा एकमेकांशी व्यापारी तसेच सांस्कृतिक संपर्क कसा येत गेला, याबद्दल वेगवेगळ्या विश्लेषक दृष्टिकोनांतून गेल्या शंभरेक वर्षांत पुष्कळ लिखाण झाले आहे. या लिखाणाला भारतविद्या किंवा इंडॉलॉजी, राजकीय/आर्थिक/सामाजिक इतिहास, पुरातत्व, अभिलेखाविद्या, नाणकशास्त्र इत्यादी ज्ञानशाखांतून विशेष वाव मिळत गेलेला आहे. 

 

विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात 'अनाल स्कूल' या इतिहास-लेखनशैलीचा एक प्रमुख सूत्रधार, फ्रेंच इतिहासकार फेरनाँ ब्रोदेल याने भूमध्य सामुद्री जगतावरचे त्याचे विख्यात पुस्तक लिहिले. या पुस्तकात त्याने समुद्राचे विविध मानवसमूहांना एकत्र आणणारे भौगोलिक वैशिष्ट्य म्हणून असलेले महत्त्व अधोरेखित केले. याआधीचे इतिहास 'जमीनकेंद्री' होते – पण ब्रोदेलने त्याच्या लिखाणातून 'सागरकेंद्री' इतिहास प्रथमतःच पुढे आणला आणि 'अनाल' इतिहासलेखन-पद्धतीला अनुसरून तो सर्वंकष आणि दूरगामी प्रकारे, विस्तृत कालपट कवेत घेणाऱ्या म्हणजेच longue durée शैलीत सादर केला. समुद्री जगताने जागतिक इतिहासात दिलेल्या योगदानावर या पुस्तकाने अगदी झगझगीत प्रकाशझोत टाकला असे म्हणायला हरकत नाही. 

 

ब्रोदेलने भूमध्य सामुद्री जगाला केंद्रीभूत धरून जी मांडणी केली तशाच प्रकारची मांडणी जगातले इतर समुद्र केंद्रीभूत ठेवून करायला इतर इतिहासकार पुढे सरसावले. त्यांच्या योगदानातून हिंदी महासागर हा जगातील एक महत्त्वाचा सामुद्री 'पैस' म्हणून पुढे आला. या भौगोलिक भागातल्या दर्यावर्दी संपर्कजालाचे महत्त्वाचे बिंदू म्हणून अरबी द्वीपकल्प, आफ्रिकेचा पूर्व किनारा, दक्षिण आणि पूर्व आशियातली लंका, सुमात्रा, जावासारखी बेटे, मलाक्का आणि बाब अल-मांदबसारख्या सामुद्रधुनी, तसेच खोल समुद्राने वेष्टित असलेली मालदीव, लक्षद्वीप, मॉरिशस, सोकोत्रा यासारखी द्वीपे आणि द्वीपसमूह अशा विविध भौगोलिक स्थानांचा विचार या इतिहासकारांनी निरनिराळ्या दृष्टीकोनांतून मांडला.

 

भारतीय उपखंडाचे या मांडणीतले भौगोलिक स्थान अर्थातच निःसंशय महत्त्वाचे आहे – अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर हे हिंदी महासागराचेच क्षेत्रीय अवकाश, आणि भारतीय उपखंड त्यांना संलग्न आहे. किंबहुना, या समुद्रांनी तीनही बाजूला वेष्टित असणे ही भारतीय उपखंडाची प्राचीन काळापासूनची भौगोलिक ओळख राहिलेली आहे. सातवाहन राजा वासिठीपुत पुळुमावी याने त्याच्या पित्याचे, म्हणजे गोतमीपुत सातकणीचे वर्णन, त्याने नाशिक इथल्या लेण्यात कोरवलेल्या प्रशंसा-लेखात 'ज्याचे घोडे तीन समुद्रांचे पाणी प्यालेले आहेत' असे केले, ते याच तीन समुद्रांवर स्वामित्व घोषित करणारा राजा म्हणून. भारताच्या समुद्रकिनाऱ्याचे व्यापारी महत्त्व विषद करणारे कित्येक महत्त्वाचे उल्लेख तत्कालीन साहित्यामध्ये, तसेच पुराभिलेख आणि इतर पुरातत्त्वीय सामुग्रीत सापडतात. दक्षिण भारतातले 'संघम'-कालीन काव्य, बौद्ध धार्मिक वाङ्मय, 'पेरिप्लस'सारखे पाश्चात्य साहित्य ही या पुराव्याची मूलस्थाने आहेत. या व्यापारी जालामुळे रोमन संपत्तीचा अव्याहत प्रवाह भारताच्या दिशेने वाहू लागला. तामिळ 'संघम' काव्यात मदिरा आणि सोने यांनी लादलेली परदेशी जहाजे 'मुचिरी' बंदरात येतात आणि बदल्यात मिरीसारखे मसाल्याचे पदार्थ घेऊन जातात असे वर्णन येते. दर वर्षी पाच कोटी सेस्टर्सेस (तांब्याचे नाणे) इतक्या किंमतीच्या वस्तू पूर्वेकडून रोमन साम्राज्यात आयात होतात आणि यापैकी एक-पंचमांश वस्तू भारताबरोबरच्या व्यापारातून येतात, असे रोमन इतिहासकार थोरला प्लिनी याने नोंदवले आहे. रोमन लोकांत भारतीय वस्तू फार लोकप्रिय होत्या. त्यात कापडचोपड, मसाल्याचे पदार्थ, हस्तिदंत किंवा कासवाच्या ढालीसारखी प्राणिज उत्पादने; नीलम, पाचू, माणकांसारखी रत्ने आणि खनिजे, माकडां-मोरांसारखे चित्रविचित्र प्राणी इत्यादी गोष्टींचा अंतर्भाव होता. त्यासाठी मोठी किंमत द्यायला आणि अशा गोष्टी मिरवून त्यांचा बडेजाव करायला रोमन लोक तयार असत. अशा चैन आणि उधळपट्टीमुळे रोमची संपत्ती मोठ्या प्रमाणावर वाया जाते आहे याबद्दल प्लिनी खेद व्यक्त करतो. 

 

साहित्यिक साधनांतून या व्यापार-जालाचे वेगवेगळे पैलू आपल्या लक्षात येतात. उदाहरण म्हणून आपण 'पेरिप्लस' हे साधन घेऊ. 'पेरिप्लस'चा लेखक कोण होता हे आपल्याला माहित नाही कारण हे साधन त्रुटित आहे. इसवी सनाच्या पहिल्या शतकात लिहिल्या गेलेल्या या पुस्तकात लाल समुद्राच्या मार्गाने पूर्वेकडे येणाऱ्या व्यापाऱ्यांनी काय करावे आणि काय करू नये याची एक जंत्रीच आपल्याला वाचायला मिळते. ज्या काळात नकाशांसारखी साधने दर्यावर्द्यांना उपलब्ध नव्हती त्या काळात अशा 'लॉगबुक'-सदृश पुस्तकातून प्रवासाबद्दलचे ज्ञान त्यांना पुरवले जाई. त्या काळातले "लोनली प्लॅनेट"च म्हणानात ! अर्थातच, या व्यापारी मार्गावरची बंदरे, तिथे असणाऱ्या पडावाच्या सोयी अथवा गैरसोयी, त्या-त्या ठिकाणी व्यापाराची काय देवाण-घेवाण होऊ शकते त्याचे तपशील, काही ठिकाणची राजकीय परिस्थिती आणि व्यापारावर होणारे तिचे परिणाम, काही ठिकाणच्या राजांची नावे अशी पुष्कळ वैविध्य असलेली माहिती 'पेरिप्लस'मध्ये ग्रथित केलेली आहे. इजिप्तच्या किनाऱ्यावरील 'बेरेनिके', आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यावरचे 'ऱ्हाप्ता', अरबी द्वीपकल्पाच्या दक्षिणेचे 'काने', गुजरातच्या किनाऱ्यावरचे 'बारुगाझा', केरळातले 'मुझिरीस' अशा अनेक बंदरांची नावे 'पेरिप्लस'मध्ये येतात. कोकण किनाऱ्यावरच्या बंदरांची तर एक मोठी यादीच 'पेरिप्लस'मध्ये सापडते. यांपैकी अनेकांची सध्याची नावे आणि स्थाने ओळखता येतात. उदाहरणार्थ 'बारुगाझा' हे 'भरुकच्छ' या प्राकृत नावाचे ग्रीक रूप आहे आणि हे गुजरातच्या किनाऱ्यावर, नर्मदा नदीच्या मुखाकडे वसलेल्या आताच्या भरूचचे प्राचीन नाव होते. किनारपट्टीवरच्या ठिकाणांव्यतिरिक्त 'पेरिप्लस' देशावर वसलेल्या काही शहरांचाही उल्लेख करते. उदाहरणार्थ, 'ओझीन' म्हणजे उज्जैन, 'पेईथन' म्हणजे पैठण, 'तगर' म्हणजे तेर इत्यादी नावे 'पेरिप्लस'मध्ये देशाच्या अंतर्भागात वसलेली बाजारपेठीची शहरे म्हणून येतात. 

 

या ठिकाणच्या व्यापाराबद्दल आणि दर्यावर्दी परिस्थितीबद्दल माहिती देताना 'पेरिप्लस'चा लेखक आनुषंगिकरित्या राजकीय परिस्थितीचाही उल्लेख करतो. उदाहरणार्थ, 'कॅलिएना' (कल्याण) बंदरात प्रवेश करण्यापूर्वी तो दर्यावर्द्यांना सावधानतेचा सल्ला देतो आणि 'संदनेस' नावाच्या इसमाच्या ताब्यात ते बंदर आल्यापासून तिथे येणारी ग्रीक जहाजे बळजबरीने 'बारुगाझा'कडे वळवली जात आहेत असे तो नोंदवतो. निरनिराळ्या ठिकाणची बंदरे, व्यापारी माल आणि जनसमूह / राजकीय परिस्थिती यांची एकत्रित माहिती 'पेरिप्लस'मध्ये कशी येते ते सांगणारे एक मानचित्र उपलब्ध आहे (चित्र २). त्यावरून त्या काळच्या व्यापारी जालाची उत्तम कल्पना येते. 

 

चित्र २ : 'पेरिप्लस'मध्ये एकत्र येणाऱ्या माहितीचं मानचित्र
चित्र २ : 'पेरिप्लस'मध्ये एकत्र येणाऱ्या माहितीचं मानचित्र

 

 

साहित्यिक पुराव्यांप्रमाणेच अभिलेखीय पुराव्यांतूनही या व्यापारी जालाचे काही उल्लेख आढळतात. यात सर्वात महत्त्वाचे आहेत ते एतद्देशीय नसलेल्या जनसमूहांचे आणि त्यातही 'यवन' या शब्दाने दर्शवल्या जाणाऱ्या लोकांचे उल्लेख. या नावाने स्वतःची ओळख सांगणाऱ्या अनेक लोकांचे उल्लेख सह्याद्रीच्या रांगांत वसलेल्या बौद्ध लेण्यातल्या शिलालेखांत आढळतात (चित्र ३). 

 

बौद्ध लेण्यातले शिलालेख
चित्र ३ : बौद्ध लेण्यातले शिलालेख

 

पॉम्पेईतली भारतीय बनावटीची हस्तिदंती स्त्री-प्रतिमा
चित्र ४ : पॉम्पेईतली भारतीय बनावटीची हस्तिदंती स्त्री-प्रतिमा

 

 

योन' किंवा 'यवन' या अभिधानाची व्युत्पत्ती 'आयोनियन' या ग्रीक शब्दापासून झाली आहे यात काही दुमत नाही – परंतु या नावाने ओळखले जाणारे लोक 'आयोनियन' म्हणजे पश्चिम ग्रीसचेच मूलरहिवासी होते, की भूमध्य सामुद्री जगातल्या अन्य लोकांना हे अभिधान सरसकटपणे लावले जाई, याबाबत अजूनही निश्चिती नाही. गोतमीपुत सातकणीच्या ज्या प्रशंसालेखाचा उल्लेख वरती आला आहे, त्या लेखात त्याला 'शक, यवन आणि पल्लव यांचा निःपात करणारा' असेही एक बिरुद लावलेले आढळते. इथे 'यवन' या शब्दाचा वापर निःसंशयपणे 'परकीय' म्हणून गणल्या जाणाऱ्या जनसमूहांबरोबर केलेला दिसतो. पण पुष्कळ अभिलेखांत आढळणारी यवनांची नावे पूर्णतः भारतीय आहेत आणि त्या नावांच्या आधी भारतीय असणाऱ्या भौगोलिक आणि / किंवा समूहनामात्मक संज्ञाही (आडनावाप्रमाणे) लावलेल्या दिसतात. उदाहरणार्थ, नाशिकच्या लेण्यातल्या एका लेखात 'यवन' म्हणून स्वतःची ओळख सांगणाऱ्या माणसाचे नाव 'इंद्राग्नीदत्त' असे आहे आणि तो उत्तरेकडचा, 'दत्तामित्री' नावाच्या शहराचा रहिवासी होता. हे लक्षात घेता पुष्कळसे 'यवन' हे भारतीय समाजात सामावून गेले असण्याची शक्यताही बरीच असावी, असे वाटते. अभिलेखीय उल्लेखांत 'यवन' पदाव्यतिरिक्त काही अन्य प्रकारेही परकीय असणाऱ्या लोकांचे अस्तित्त्व जाणवते. काही लोकांची नावे उघडच परकीय आहेत हे कळते – उदाहरणार्थ, कार्ले लेण्यांत असलेल्या एका लेखात 'हरफरण' आणि 'सेतफरण' या दोन असामींचा उल्लेख आहे. यांच्या नावातले '-फरण' हे उपपद पार्थियन म्हणजे इराणी '-vharna' किंवा '-pharnes' या उपपदाचे प्राकृत रूप आहे आणि त्यावरून हे दोघे दक्षिण इराणचे मूलरहिवासी असावेत असे निश्चित वाटते. यवनांप्रमाणेच हे इराणी लोकही व्यापाराच्या मार्गाने दख्खनमध्ये आले असावेत.

 

साहित्यिक किंवा लेखी पुराव्याव्यतिरिक्त या व्यापारी मार्गांच्या सान्निध्यात सापडलेल्या वस्तू आणि नाणी या व्यापारी जालाचे संपर्कबिंदू म्हणून अत्यंत उपयुक्त ठरतात. इटलीत नेपल्सच्या जवळ वसलेले आणि व्हेसुव्हियस ज्वालामुखीच्या उद्रेकात नष्ट होऊनही पुरातत्त्वीय दृष्ट्या उत्तम 'टिकलेले' असे प्रसिद्ध शहर म्हणजे पॉम्पेई. या शहरामधील एका घराच्या अवशेषात एक भारतीय बनावटीची हस्तिदंती स्त्री-प्रतिमा सापडली (चित्र ४). 

 

हे शहर इसवी सन ७९मध्ये नष्ट झाले, सबब हे प्रतिमा त्या आधी तिथे पोचली असणार हे स्पष्ट आहे. ही बहुधा एका सुफलनाशी संबंधित असलेल्या देवतेची असावी हे तिच्या एकंदरीत वस्त्र आणि रूपसंभारावरून स्पष्ट होते आणि असे असल्याने तिला 'लक्ष्मी' या परिचित अभिधानाने ओळखले जाते. या प्रतिमेशी अगदी जवळचे साम्य दाखवणाऱ्या प्रतिमा महाराष्ट्रात भोकरदन आणि तेर या प्राचीन नगरांत सापडल्या आहेत. इटलीत पोचलेल्या या भारतीय 'लक्ष्मी'प्रमाणेच भूमध्यसामुद्री भूभागातून आयात झालेली, बहुधा अलेक्झांड्रियात बनवलेली एक कांस्य प्रतिमाही कोल्हापूरजवळच्या ब्रह्मपुरी या प्राचीन स्थळी डॉ. हसमुख सांकळिया यांना १९४५-४६ साली केलेल्या उत्खननात सापडली. ही मूर्ती ग्रीक/रोमन समुद्री देव पोसायडन किंवा नेपच्यून याची आहे (चित्र ५) आणि हिचे कालानुमानही पुरातत्त्वीय पुराव्यानुसार इसवी सनाचे सुमारे पहिले शतक आहे. 

 

पोसायडन किंवा नेपच्यून
चित्र ५ : पोसायडन किंवा नेपच्यून
आताच्या ओमानमधली भारतीय बनावटीची कांस्य प्रतिमा
चित्र ६ : आताच्या ओमानमधली भारतीय बनावटीची कांस्य प्रतिमा

जशी 'लक्ष्मी'ची प्रतिमा व्यापाराद्वारे युरोपात पोचली, तशीच ही पोसायडन प्रतिमाही त्याच मार्गे दक्खनमध्ये आली हे निःसंशय. ही उदाहरणे या व्यापारी जालाच्या पूर्व आणि पश्चिम टोकाला सापडलेल्या वस्तूंची झाली – पण या मार्गाच्या साधारण मध्यावर, म्हणजेच अरबी द्वीपकल्पाच्या पूर्व भागातही भारतीय बनावटीची एक कांस्य प्रतिमा सापडली आहे (चित्र ६). ही प्रतिमा आताच्या ओमान सल्तनतीच्या धोफार या दक्षिणेकडील भागात खोर रोरी नावाच्या भूशिरावर असलेल्या एका प्राचीन बंदराच्या अवशेषांचे उत्खनन करताना मिळाली. हिच्या रूपविन्यासावरून ही प्रतिमा 'शालभंजिके'सारख्या एखाद्या यक्षीची असावी असे वाटते. 

 

व्यापारात चलनाचे महत्त्व अर्थातच वादातीत आणि त्यामुळे व्यापाराबरोबरच विनिमयाचे मुख्य साधन म्हणजे नाणी ही सुद्धा एकीकडून दुसरीकडे जात असणार यात काहीच आश्चर्य नाही. या परिस्थितीला अनुसरूनच भूमध्य समुद्री जगातली नाणी भारतात आणि भारतातली नाणी तिथे सापडल्याची अनेक उदाहरणे आहेत. पण वर सांगितल्याप्रमाणे या व्यापाराचा 'तोल' भारताच्या बाजूने ढळलेला होता. त्यामुळेच परदेशी नाणी भारतात सापडल्याची उदाहरणे, भारतीय नाणी परदेशांत सापडण्याच्या उदाहरणांपेक्षा अधिक आहेत. लाल समुद्र आणि अरबी द्वीपकल्पाच्या प्रदेशातली सेबीयन, हिम्यार आणि आक्सुम या प्राचीन राज्यांची नाणी भारतात सापडली आहेत (चित्र ७). 

 

भारतात सापडलेली बाहेरची नाणी
चित्र ७ : इथियोपियातील आक्सुम साम्राज्याचे भारतात सापडलेले नाणे

 

सेबीयन राज्य आजच्या सौदी अरेबियाच्या पश्चिम भागात, हिम्यार राज्य आताच्या येमेन देशात आणि आक्सुमचे राज्य इथिओपिया-एरिट्रिया या देशांत वसलेले होते. पण सर्वात अधिक संख्येने भारतात सापडली आहेत ती रोमन नाणी. ही बहुशः सोन्याची आहेत पण काही ठिकाणी चांदीची रोमन नाणी सापडल्याचेही विदित आहे. या नाण्यांवर एका बाजूला रोमन सम्राटाचे चित्र असते. दुसऱ्या बाजूची चित्रे मात्र बऱ्याच तऱ्हांची असतात - त्यांत देवदेवता, सम्राटाच्या बाबतीत घडलेल्या काही घटना (उदा. त्याने मिळवलेले विजय), इमारती किंवा पुलांसारखी बांधकामे, प्राणी किंवा पक्षी, अशा पुष्कळ वेगवेगळ्या प्रकारच्या चित्रणाचा वापर आपल्याला रोमन नाण्यांवर केलेला दिसतो.

 

खाच असणारे नाणे
चित्र ८ : खाच पाडलेले रोमन सोन्याचे नाणे

 

रोमन नाणी भारतात पोचल्यानंतर भारतीयांनी त्यांचा वापर कसा केला याबद्दल वेगवेगळी मतांतरे आहेत. पुष्कळ रोमन नाण्यांवर सम्राटाच्या चित्रावर एक खाच पाडलेली दिसते (चित्र ८) त्याचा अन्वय पुष्कळ अभ्यासकांनी ते चित्र – सबब, सम्राटाची अधिकृत सत्ता – भारतीयांनी 'खोडून' काढून मग ते नाणे चलनात वापरले असा लावला आहे. पण वास्तविक हे चित्र म्हणजे नाण्याचा सर्वाधिक 'उभार' असलेली जागा असल्याने तिथे खाच मारल्यास नाणे पूर्ण शुद्ध सोन्याचे आहे की केवळ मुलामा दिलेले आहे हे कळण्याचा वाव जास्त असतो. तेव्हा हा शुद्धता तपासण्याचा एक मार्ग असावा. रोमन नाण्यांच्या स्थानिक 'नकला'ही बनवलेल्या आढळतात. या नकलांचे सोने बऱ्यापैकी शुद्ध असते त्यावरून हा बहुतेक "मागणी तसा पुरवठा" करण्याचा एक मार्ग असावा, असे वाटते. रोमन नाण्यांकडे स्थानिक जनता एक अनोखी, विलक्षण किंवा 'फॅशनेबल' वस्तू म्हणून पाही इतके नक्की - कारण त्यांचा वापर दागिन्यांमध्ये किंवा निक्षेप करण्यांत केलेला दिसतो. गरीब लोक सोन्याचे रोमन नाणे परवडत नसले तर त्यांच्या मातीच्या प्रतिकृती करून त्या दागिन्यांत वापरत! अशा प्रतिकृती महाराष्ट्रात तेर आणि पैठण इथे सापडल्या आहेत.  

 

मातीच्या प्रतिकृती
चित्र ९: नाण्यांच्या मातीच्या प्रतिकृती

 

होपोकँपस
चित्र १० : अर्धा घोडा आणि अर्धा मासा असलेला 'हिपोकँपस'

 

रोमन व्यापाराबरोबरच भूमध्य-सामुद्री संस्कृतीतल्या काही कल्पनाही भारतीय दृश्यकला-संस्कृतीत वावरू लागल्या. इसवी सनाच्या पहिल्या-दुसऱ्या शतकात कोरल्या गेलेल्या नाशिक किंवा कार्ले इथल्या लेण्यांतल्या काही शिल्पांमध्ये आपल्याला मानवी चेहरा आणि सिंहाचे शरीर असलेला 'स्फिंक्स' दिसतो. पंख असलेले घोडे दिसतात. कुडा इथल्या लेण्यांमध्ये अर्धा घोडा आणि अर्धा मासा असलेला 'हिपोकँपस' दिसतो (चित्र १०). ही निःसंशय भूमध्यसामुद्री संपर्कातून आयात झालेल्या दृश्यसंस्कृतीची चिन्हे आहेत. पुरातत्वीय अन्वेषणांत सापडणाऱ्या रोमन काचकाम, 'अरेटाईन' पद्धतीची मृद्भांडी, मातीचे रोमन दिवे, रोमन कुंभ किंवा 'ॲम्फोरां'चे तुकडे अशा कित्येक वस्तूंमधून हे व्यापारी संबंध किती दृढ होते त्याचे संकेत आपल्याला मिळतात. वर ब्रह्मपुरीला सापडलेल्या ज्या पोसायडनच्या मूर्तीचा उल्लेख केला आहे, तिच्याबरोबर रोमन ब्राँझ आरसे, उभट भांड्याचे एक हँडल तसेच 'पर्सियस आणि अँड्रोमिडा' यांच्या गोष्टीतला एक प्रसंग दाखवणारी एक तबकडी (चित्र ११) अशा अन्य ब्राँझ वस्तूंचा एक निधीही डॉ. सांकळिया यांना सापडला होता. 

'पर्सियस आणि अँड्रोमिडा' यांच्या गोष्टीतला एक प्रसंग दाखवणारी एक तबकडी 
चित्र ११ : 'पर्सियस आणि अँड्रोमिडा' यांच्या गोष्टीतला एक प्रसंग दाखवणारी एक तबकडी 

भारताबाहेर प्रवास करणाऱ्या प्राचीन भारतीयांची माहिती आपल्याला देणाऱ्या पुरातत्वीय तथ्यांमध्ये अरबी द्वीपकल्पाच्या दक्षिणेकडे, भर समुद्रात वसलेल्या 'सोकोत्रा' नामक बेटावर आढळलेल्या पुराव्यांचा फार मोठा सहभाग आहे. हे बेट भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरून अरबी समुद्रामार्गे पश्चिमेकडे हाकारलेल्या आणि लाल समुद्रातून बाहेर पडून पूर्वेला भारताकडे येऊ घातलेल्या जहाजांसाठी एक महत्त्वाचे 'पडावा'चे ठिकाण होते. (चित्र १२) या बेटावर गोड्या पाण्याचे झरे तर आहेतच – शिवाय 'फ्रँकिन्सेन्स' म्हणजे लोबान या धुपासारख्या सुगंधी राळीचे उत्पादन ज्या झाडांपासून होते ती झाडे इथे वन्य रितीने वाढतात. लोबान ही महत्त्वाची व्यापारी क्रयवस्तू होती तेव्हा गोडे पाणी भरून घेणे, विश्रांती घेणे याबरोबरच हा स्थानिक व्यापारसुद्धा इथे थांबणारे नाविक उरकून घेत.

 

 जहाजांसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या 'पडावा'चा नकाशा
चित्र १२ : सोकोत्रा बेटाचे सामुद्री स्थान

सोकोत्रा बेटाच्या उत्तर-पूर्व किनाऱ्यावर, समुद्रसपाटीपासून सुमारे २०० मीटर उंचीवर ग्रॅनाइटच्या कड्यांमध्ये एक खूप मोठी नैसर्गिक गुहा किंवा विवर आहे. स्थानिक रहिवासी तिला 'होक' (Hoq) म्हणतात. या विवराची खोली सुमारे दोन किलोमीटर आहे आणि उंची सुमारे पंचेचाळीस फूट! विवर मोठमोठ्या लवणस्तंभांनी नटलेले आहे. या विवराच्या अगदी खोलवरच्या भागात एक पुरातत्वीय 'आश्चर्य' नांदत आहे ही बाब सर्वप्रथम बेल्जियन पुरातत्वज्ञांनी २००१ साली केलेल्या सर्वेक्षणात उघडकीस आणली. दीडदोन हजार वर्षांपूर्वी सोकोत्रा बेटावर थांबणारे दर्यावर्दी व्यापारी या विवराला भेट देत असत आणि अगदी आत जाऊन तिथे काही क्रियाकर्मे करत असत. त्या क्रियाकर्मांचा संबंध समुद्री प्रवासाच्या सुरक्षिततेकडे असे. दिवे लावणे, पूजनअर्चन करणे, प्रार्थना इत्यादी कर्मकांडांचे अवशेष तिथे पडलेले होते. पण त्याचबरोबर, आजूबाजूच्या प्रस्तरांवर या प्रवाशांनी लिहिलेले कित्येक लेखही इथे सापडले. हे लेख दगडावर खरडून, रंगवून आणि काजळीचा बोटांनी वापर करून लिहिले आहेत. लिहिणाऱ्यांनी ब्राह्मी, खरोष्ठी, इथियोपियन गे'एझ, ग्रीक, बॅक्ट्रियन, ताडमोरी (Palmyran) अशा कित्येक लिपी आणि संस्कृत, प्राकृत, ग्रीक इत्यादी भाषा वापरल्या आहेत. लेखांबरोबरच काही चित्रेही – रंगवलेली आणि प्रस्तरचित्रे (petroglyphs) अशा दोन्ही प्रकारची – या विवरात सापडली आहेत.

प्रस्तरचित्रे
चित्र १३ : होक गुहेतले जहाजाचे प्रस्तरचित्र

या लेखांचा अभ्यास सध्या स्विझर्लंडमधल्या लोसान विद्यापीठांत कार्यरत असलेले संस्कृत आणि भारतविद्यातज्ज्ञ डॉ. इन्गो ष्ट्राउख यांनी केला (चित्र १४) हे लेख तसे त्रोटक आहेत – पण त्यांत ते लिहिणाऱ्या व्यक्तीचे नाव, वसतिस्थान, व्यावसायिक उपपद इत्यादी गोष्टींचा समावेश असल्याने हे लोक कोण होते, ते कुठून सोकोत्रापर्यंत आले अशा बाबींचा आणि लिपींच्या शैलीवरून हे लेख कधी लिहिले गेले असावेत याचा उलगडा करणे शक्य होते.

प्रस्तरचित्रे
चित्र १४ : होक गुहेतले ब्राह्मी लेख

सोकोत्राच्या लेखांवरून या प्राचीन दर्यावर्दींबद्दल आपल्याला चुटपुटती, ओझरती पण तरीही रोमहर्षक अशी माहिती मिळते. इथे उतरलेले भारतीय बौद्ध, वैष्णव आणि शैव मतांचे अनुयायी होते हे त्यांच्या नावांवरून दिसते. काहींच्या नावामागे 'निर्य्यामक' ही उपाधी लावलेली दिसते – त्यावरून ते नौकानयन-प्रमुख म्हणजेच 'कॅप्टन' होते हे स्पष्ट होते. या भारतीय दर्यावर्दींपैकी काही जण आपल्याला 'हस्तकावप्र' आणि 'भरुकच्छ' शहरांचे रहिवासी म्हणवतात. यांपैकी भरुकच्छ म्हणजे आजचे भरुच आणि 'हस्तकावप्रा'ची ओळख काठेवाडमधल्या भावनगरजवळच्या 'हाथब' या प्राचीन शहराशी पटवता येते. इथे झालेल्या उत्खननात हे शहर खंभातच्या आखाताच्या पश्चिम किनाऱ्यावरचे एक ऐतिहासिक बंदर असल्याचे स्पष्ट झाले आहे. टॉलेमी या रोमन भूगोलविदाच्या ग्रंथात या शहराचा उल्लेख 'अस्टाकाप्रा' असा येतो. अक्षरवटिका आणि विन्यासावरून हे लेख इ.स.च्या दुसऱ्या ते चौथ्या शतकात लिहिले गेले हे तथ्य सामोरे येते. 

 

सोकोत्रापर्यंत भारतीय व्यापारी आणि दर्यावर्दी पोचल्याच्या थेट खुणा आपल्याला मिळतात पण त्याच्या पुढे, आणखी पश्चिमेला आपण जाऊ लागलो की या खुणा अस्पष्ट होऊ लागतात. भारत आणि रोमन साम्राज्यामधला हा सामुद्री व्यापारमार्ग पुष्कळशा अडचणींना तोंड देत इजिप्तच्या पूर्व किनाऱ्याला लागे. तिथल्या बंदरांत भारताकडून येणारी जहाजे पडाव टाकत. त्यांच्यावरचा माल उतरवून खुष्कीच्या मार्गाने नाईल नदीपर्यंत नेला जाई. तिथे पुन्हा एकदा तो जहाजांवर लादत की मग तो या नदीमार्गे अलेक्झांड्रियापर्यंत जाई. अलेक्झांड्रिया हे रोमन साम्राज्याचे फार मोठे बंदर होते. तिथून मालाची वाहतूक थेट रोमपर्यंत किंवा भूमध्यसामुद्री जगातल्या आताच्या ग्रीस, तुर्किये, लेबनॉन, सीरिया अशा देशांतल्या इतर अनेक बंदरांपर्यंत होई. हा सगळा भूभाग रोमन साम्राज्याच्याच अधीन होता त्यामुळे जकात, वाहतूक कर, विमा इत्यादी बाबींपुरते व्यापारात इथे सौकर्य असे.

 

मातीचे खापर
चित्र १५ : बेरेनिके इथे सापडलेले तमिळ ब्राह्मी लेख असलेले मातीचे खापर

इजिप्तच्या पूर्व किनाऱ्यावरच्या दोन महत्त्वपूर्ण बंदरांचा उल्लेख 'पेरिप्लस'चा लेखक करतो – उत्तरेकडचे मायोस हॉर्मोस आणि दक्षिणेकडचे बेरेनिके. यापैकी मायोस हॉर्मोसला आता 'कसैर अल-कदीम' ('जुना महाल') असे नाव मिळाले आहे. बेरेनिके आता 'बरनीस' या अरबी नावाने ओळखले जाते. ह्या दोन्ही ठिकाणी गेल्या पन्नासेक वर्षांत पुष्कळ उत्खनने करण्यात आली आहेत. त्यांतून दृग्गोचर झालेल्या पुरातत्वीय तथ्यांतून या व्यापारी मार्गांवर ये-जा करणाऱ्या जहाजांबद्दल, त्यातून वाहतूक होणाऱ्या मालाबद्दल आणि हा व्यापार चालवणाऱ्या दर्यावर्दींबद्दल अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आपल्या हाती लागते. 

 

पुरातत्वीय अवशेषांपैकी महत्त्वाचे आणि मुबलक अवशेष म्हणजे मातीची खापरे. या खापरांच्या अभ्यासातून आपल्याला मृद्संस्कृतीच्या लकबी (styles / types), मातीच्या भांड्यांची निर्मिती, देवाणघेवाण आणि आयातनिर्यात यांचे अंदाज बांधता येतात. कसैर आणि बेरेनिके या दोन्ही ठिकाणी सापडलेल्या काही खापरांवर तमिळ ब्राह्मी लिपीतले लेख दिसून आले आहेत. (चित्र १५) भारताच्या दक्षिण भागाशी थेट व्यापारी संबंध असल्याखेरीज हे घडणे शक्य नव्हते. खापरांसोबतच कसैर इथे प्राचीन नौकांचे काही अवशेष सापडले आहेत. लाकडाच्या फळ्या काथ्याच्या मजबूत दोरांनी एकत्र सांधून या नौकांच्या काया म्हणजे तळाचा भाग (hull) बांधल्या गेल्या होत्या. ही नौका बांधण्याची पद्धत भारतीय असल्याने हे अवशेष भारतीय नौकांचे असावेत अशी केवळ शंकाच होती – पण लाकडाच्या फळ्यांचे विश्लेषण झाल्यावर त्या केरळी सागवानाच्या आहेत हे सिद्ध झाले आणि या शंकेचे खात्रीत रूपांतर झाले.

मातीचा कुंभ
चित्र १६ : मिरीचा साठा असणारा कुंभ ( दोहोंपैकी पुढचा)

बेरेनिके इथे सापडलेल्या काही अजब पुरातत्वीय अवशेषांपैकी एक आहे तो काळ्या मिरीच्या दाण्यांनी अर्धा भरलेला एक मातीचा कुंभ! (चित्र १६) ही मिरी अर्थातच भारतातून निर्यात झालेली होती. या कुंभात ७.५ किलो मिरी होती आणि या मिरीसोबतच या कुंभाचा विधीपूर्वक निक्षेप बेरेनिके इथल्या एका मोठ्या देवळाच्या आवारात करण्यात आला होता. हे देऊळ सेरापिस या रोमन-इजिप्शियन देवाचे होते. या निक्षेपाशिवाय जळालेले मिरीचे दाणेही उत्खननात सापडले आहेत. त्यावरून या मसाल्याच्या पदार्थाचा वापर केवळ खाणे आणि मुरवण्यासारख्या बाबींसाठी न करता, निक्षेप आणि आहुती देण्यासारख्या सांस्कृतिक विधींमध्येही केला जाई हे स्पष्ट होते. 

 

मुझिरिस पपायरस
चित्र १७ :'मुझिरिस पपायरस'
मातीच्या खापरावरचा लेख
चित्र १८ : 'विष्णुदत्ता'चा उल्लेख असलेला मातीच्या खापरावरचा लेख

मिरीच्या, तसेच भारत- रोम दरम्यान चालणाऱ्या अन्य व्यापाराचा आणखी एक महत्त्वाचा पुरावा म्हणजे 'मुझिरिस पपायरस'. हा पपायरसचा तुकडा १९८०च्या सुमारास बहुधा इजिप्तमध्ये कुठेतरी सापडला आणि एका संग्राहकामार्फत तो व्हिएनाच्या ऑस्ट्रियन राष्ट्रीय ग्रंथागाराने विकत घेतला. तिथेच तो आता सुरक्षित आहे. या तुकड्यावर दोन्ही बाजूला ग्रीकमध्ये लिहिलेला मजकूर आहे – एका बाजूवर एक व्यापारी आणि त्याचा अर्थसहाय्यक यांच्यात झालेल्या कराराचे तपशील आहेत. हा करार 'हर्मापोलॉन' नावाच्या जहाजातून 'मुझिरिस'पासून अलेक्झांड्रियापर्यंत आणायच्या मालासंबंधी आहे. 'मुझिरिस' हे केरळच्या किनाऱ्यावरचे महत्त्वाचे प्राचीन बंदर होते. त्याची ओळख कोचीच्या उत्तरेला ३० कि.मी.वर असलेल्या 'पट्टनम' या पुरातत्वीय ठिकाणाशी पटवण्यात येते. 'हर्मापोलॉन' जहाजावर लादल्या गेलेल्या मालापैकी सर्वाधिक प्रमाण हे मिरी आणि तमालपत्र या दोन मसाल्यांच्या पदार्थाचे आहे. पपायरसच्या दुसऱ्या बाजूला हा माल रोमन साम्राज्यात आयात झाल्यावर त्यावर करआकारणी कशी होईल याचे तपशील नोंदवलेले आहेत. या दस्तावेजावरून हा व्यापार कसा पार पडत असे याची पुष्कळशी कल्पना आपल्याला येते.

 

लाल समुद्र किंवा इजिप्तमध्ये भारतीय लोक ये-जा करत किंवा काही तिथे रहातही असावेत, यांचे आणखी काही ओझरते पुरावे उपलब्ध आहेत. कसैरच्या उत्खननात ब्राह्मी लिपीत शाईने लिहिलेला लेख असलेले एक मातीचे खापर सापडले आहे. मातीच्या खापरांवर अशा प्रकारे लेखन करायची प्रथा इजिप्त आणि ग्रीसमध्ये फार पुरातन काळापासून चालत आली होती पण भारतात मात्र अशा लिखाणाचा प्रसार अजिबात झालेला दिसत नाही. सबब, ब्राह्मी लेख या खापरावर इजिप्तमध्येच लिहिला गेला असावा आणि म्हणूनच तिथे ही लिपी लिहू वाचू शकणारे लोक होते हे सिद्ध होते. लेख त्रोटक आहे पण त्यात 'विष्णुदत्त' नावाच्या इसमाचा उल्लेख आहे आणि उर्वरित लिखाणावरून असे वाटते की, ही एक मालाची किंवा सामानाची यादी असावी. विष्णुदत्त हा कदाचित अशा मालाची खरेदीविक्री करणारा व्यापारी असावा. भारतीय व्यक्तीचा दुसरा उल्लेख इजिप्तच्या पूर्व वाळवंटात वादी मिया नावाच्या जागी सापडलेल्या एका ग्रीक लेखात आढळतो. या माणसाचे नाव 'सोफॉन' असे ग्रीकमध्ये लिहिले आहे आणि त्याच्यापुढे 'इंडिऑस' असे विशेषण आहे त्यावरून त्याचे भारतीयत्व निश्चित सिद्ध होते.

कोरीव प्रस्तरखंड
चित्र १९ : भारतीय दैवते दाखवणारा प्रस्तरखंड (उत्खनित अवस्थेत) 

इजिप्तमध्ये भारतीयांची वस्ती असल्याचे इतकेच नव्हे तर त्यांच्या धार्मिक परिकल्पनांशी, विधींशी आणि मूर्तिशास्त्राच्या तथ्यांशी स्थानिक लोकांचा चांगला परिचय असल्याचे निर्विवादपणे सिद्ध करणारे आश्चर्यजनक पुरावे गेल्या काही वर्षात बेरेनिके इथल्या उत्खननांतून पुढे आले आहेत. २०१८ साली जर्मनीतल्या फ्रायबुर्ग शहरी झालेल्या एका संशोधन-परिषदेला मी हजर होतो. गेली पस्तीस वर्षे बेरेनिकेचा विस्तीर्ण पुरातत्वीय 'टेक' (mound) खणून काढणारे आणि अमेरिकेतल्या डेलावेअर विद्यापीठात कार्यरत असणारे पुरातत्वज्ञ प्रा. स्टीव्हन साईडबॉटम हेही या परिषदेसाठी आले होते. त्यांनी त्यांच्या त्या वर्षीच्या उत्खनन काळात सापडलेल्या काही लक्षवेधी वस्तूंचा सहभाग त्यांच्या व्याख्यानात केला होता. त्यापैकी एक वस्तू होती एक कोरीव प्रस्तरखंड (चित्र १९) ज्याच्यावर दोन खांबांनी तोललेली एक कमान कोरली होती आणि त्या कमानीखाली तीन मानवी आकृती दाखवल्या होत्या. खांब व कमानीचे आकृतीबंध नि:संशय स्थानिक शैलीतले होते आणि तो प्रस्तरही स्थानिक जिप्समचा होता – सबब या शिल्पखंडाची निर्मिती बेरेनिकेला किंवा जवळपास झाली होती हे निश्चित. भारतीय मूर्तिशास्त्राशी परिचित असलेल्या व्यक्तीला त्या तीन मानवाकृती कोण आहेत हे ओळखणे कठीण नव्हते. तीनपैकी उजवी-डावीकडच्या दोन आकृतींनी दोन्ही हात कोपरातून दुमडून वर केले आहेत. डाव्या बाजूच्या आकृतीने एका हातात नांगर धरला आहे तर उजवीकडच्या आकृतीने तशीच एक वर्तुळाकृती वस्तू धरली आहे. (चित्र २०) या लक्षणांवरून डावीकडची आकृती ही संकर्षणाची आणि उजवीकडची ही वासुदेवाची आहे हे सिद्ध होते. या दोघांची निश्चित ओळख पटल्यावर मधली आकृती ही 'एकानंशा' या देवीची आहे हे आनुषंगिकरित्या ठरते. प्रा. साईडबॉटम यांच्या निबंधाअंती झालेल्या चर्चेत हा मुद्दा मी मांडला.

संकर्षण, एकानंशा आणि वासुदेव
चित्र २० : संकर्षण, एकानंशा आणि वासुदेव (डावीकडून उजवीकडे)
संकर्षण आणि वासुदेव नाणी
चित्र २१ : संकर्षण आणि वासुदेवाचे नाणे (पुढची आणि मागची बाजू)

 

 

बुद्धमूर्तीचा भाग?
चित्र २२ : ही बुद्धमूर्ती असेल का?

संकर्षण आणि वासुदेव हे दोन वृष्णी वीर आणि वैष्णव धर्माचे पूर्वरूप भागवत पंथातल्या पांचरात्र संप्रदायाच्या चार 'वीरां'पैकी दोन. पांचरात्र पंथ या वीरांना परमेश्वराचे व्यूह मानतो. परमेश्वर म्हणजे 'नारायण' आणि संकर्षण, वासुदेव, प्रद्युम्न आणि अनिरुद्ध हे त्याचे व्यूह. या दैवतांचे उन्नयन पुढे विष्णूच्या रुपांत झाले आणि व्यूहकल्पनेतून अवतारकल्पना पुढे आली. इ.स.पूर्व तिसऱ्या शतकापासून ते सुमारे इ.स.च्या दुसऱ्या शतकापर्यंत पांचरात्र संप्रदाय पुष्कळच लोकप्रिय होता. मथुरेच्या आसपास एका स्थानिक 'संरक्षक' देवीचे या संप्रदायात सात्मिकरण झाले. तिचेच नाव 'एकानंशा'. वैष्णवीकरणाच्या प्रक्रियेत हिची पुढे 'सुभद्रा' झाली. 

 

संकर्षण-वासुदेव-एकानंशा या त्रिकाचा उपासनापंथ संपूर्ण उत्तर भारतात फैलावला होता. गांधारात राज्य करणारा ग्रीक राजा ॲगाथोक्लिस (इ.स.पूर्व १८५ - १८०) याच्या, ऑक्झस नदीकाठच्या 'अई खानुम' शहराच्या उत्खननात सापडलेल्या चांदीच्या नाण्यांवर संकर्षण आणि वासुदेव यांचे चित्रण दिसते (चित्र २१). अनेक शिल्पे, पुरावशेष आणि काही गुहाचित्रांमधूनही याचे पुरावे दिसतात. पण या दैवतांचे चित्रण दूरवरच्या इजिप्तमध्ये होणे ही निश्चितच आश्चर्याची बाब आहे. चित्रण स्थानिक शैलीत आणि स्थानिक दगडाचा वापर करून झाले आहे हे आणखी विशेष. या अवशेषावरून ह्या दैवतांची उपासना करणारे भारतीय बेरेनिकेमध्ये राहत होते इतकेच सिद्ध होत नाही, तर त्यांच्या दैवतरूपांशी स्थानिक लोक परिचित होते आणि त्यांची शिल्पे ते बनवू शकत होते हेही सिद्ध होते. सांस्कृतिक आदानप्रदानाचा हा थेट पुरावा आहे.

 

प्रा. साईडबॉटम त्यांच्या शोधनिबंधाचे सादरीकरण करत असताना त्यांनी दाखवलेल्या एका खंडित शिल्पाच्या छायाचित्राकडे माझे लक्ष गेले. हे शिल्प पुरुषाच्या धडाचे होते पण त्याचे शीर्ष आणि उजवा हात तुटला होता. पुरुषाने लयबद्ध वळ्या असणारे उत्तरीय परिधान केले होते आणि त्याच्या पदराखाली त्याने घातलेल्या अधोवस्त्राची किनार दिसत होती. त्याचे पाय समतल अवस्थेत, पादत्राणांविरहित दाखवले होते. त्याच्या डाव्या हाताच्या मुठीत त्याने उत्तरीयाचा टोकाचा भाग एकत्र गोळा करून धरला होता (चित्र २२). या मूर्तीवैशिष्ट्यावरून ही मूर्ती बुद्धाची असावी असा कयास मी बांधला. निबंधाअंतीच्या चर्चेत तो उपस्थितांसमोर मांडलाही. काहींना तो थोडाबहुत पटला आणि काहींना नाही. चर्चेतून ठोस असे काही निष्पन्न झाले नाही आणि तो विषय तिथेच संपला.

 

बुद्धशीर्ष
चित्र २३ : बेरेनिकेमध्ये सापडलेले बुद्धाचे शीर्ष

 

पुढे २०२० साली जग कोव्हिडच्या साथीच्या विळख्यात सापडले आणि अर्थातच बेरेनिकेचे उत्खनन बंद पडले. दोन वर्षांनंतर २०२२ च्या डिसेंबरात जेव्हा साईडबॉटम आणि त्यांचा चमू बेरेनिकेला परतला तेव्हा त्यांना आणखी सनसनाटी वस्तू सापडल्या. जिथे हे धड सापडले होते तिथून चारेक फुटांवरच त्यांना एक शीर्षही सापडले – आणि ते निःसंशय बुद्धाचे होते (चित्र २३) विशेष म्हणजे हे शीर्ष त्या धडाच्या खांद्यावर जवळपास निर्विकल्परित्या बसले म्हणजे धड आणि शीर्ष एकाच मूर्तीचा भाग होता याबद्दल अजिबात संशय घ्यायला जागा राहिली नाही! ही मूर्ती बुद्धाचीच होती हा माझा पाच वर्षांपूर्वीचा कयास असा नाट्यमय रितीने खरा ठरला.

बेरेनिकेचा बुद्ध
चित्र २४ : बेरेनिकेमध्ये सापडलेला बुद्ध संपूर्ण

 

२०२२ सालच्या उत्खननांत केवळ हे शीर्षच नव्हे तर आणखी एक अनन्यसाधारण महत्त्वाचा पुरावशेष उजेडात आला. जिथे बुद्धशीर्ष मिळाले त्याला लागूनच एक मोठी जिप्सम दगडाची शिळा उभी होती. या शिळेवर ब्राह्मी लिपीत कोरलेला एक शिलालेख होता. या शिलालेखाची छायाचित्रे प्रा. साईडबॉटम यांनी मला पाठवली (चित्र २५). शिळेची परिस्थिती काही उत्तम नव्हती. तिचा पृष्ठभाग जागोजागी उंचसखल झाला होता आणि अनेक ठिकाणे तिचे लहानमोठे टवकेही उडाले होते. पण वाचता येण्यासारखे जे काही होते ते मी वाचले आणि ते खरोखरच अविश्वसनीय होते! पण नंतर माझे वाचन त्या शिळेची शहानिशा संगणकीय तंत्रज्ञानाच्या आधारे करून प्रा. इन्गो ष्ट्राऊख यांनी पडताळून पाहिले आणि ते अचूक असल्याचा निर्वाळा दिला. याच तंत्रज्ञानाच्या आधारे अस्पष्ट किंवा तुटक्या असलेल्या पृष्ठभागाचा अभ्यास करून त्या जागी असलेल्या अक्षरांचा विन्यासही लावता आला.

बेरेनिके शिलालेख
चित्र २५ : बेरेनिकेमधला शिलालेख
शिलालेखावरची गिरवलेली अक्षरे
चित्र २६ : शिलालेखावरची गिरवलेली अक्षरे

या सर्व अभ्यासाअंती या लेखाबद्दलची पुष्कळ तथ्ये सामोरी आली. लेखाची सुरुवात 'सिद्धं' या मंगलवाचक शब्दाने झाली आहे. त्यानंतरचा मजकुर 'राज्ञो फिलिप्पस्य वर्षे षष्ठे  अश्वा

…. अत्र दिवसे वासुलेन क्षत्रियेण

…(तिमाप्रतिष्ठापिता सर्व्वसत्वहित सुखाय' असा आहे. 'राजा फिलिप याच्या सहाव्या वर्षात अश्वायुज (महिन्याची अमुक तिथी) या दिवशी वासुल क्षत्रियाने…. (प्र)तिमेची प्रतिष्ठापना सर्व जीवित विश्वाच्या हितसुखाकरता केली' असा या लेखाचा अर्थ होतो. ब्राह्मी लेखाच्या वर आणि खाली काही ग्रीक लिपीतल्या ओळी आहेत असेही दिसते. ग्रीक लेखात 'OUAZULAS' ही अक्षरे वाचता येतात. हे वासुल या भारतीय नावाचे ग्रीक रूपांतर आहे हे निश्चित.

 

या लेखात उल्लेख केलेला राजा फिलिप म्हणजे 'अरब फिलिप' या नावाने ओळखला जाणारा रोमन सम्राट – त्याला 'अरब' म्हणत कारण त्याचा जन्म सीरियात झाला होता. 'फिलिप' या नावाचा हा एकच रोमन सम्राट होऊन गेला. याची कारकीर्द रोमन साम्राज्याला काही फारशी पोषक झाली नाही कारण पूर्व सीमेवर इराणी सासानीयन घराण्याने याचा पराभव केला. पण बेरेनिकेमध्ये त्याच्या राजवर्षात कालगणना होण्यापुरता त्याचा प्रभाव निश्चितच राहिला असावा. लेखात त्याच्या राजवटीच्या सहाव्या वर्षाचा उल्लेख आहे आणि भारतीय पद्धतीच्या अश्वायुज म्हणजे आश्विन महिन्याचा उल्लेख आहे. संगणकीय तंत्रज्ञानाचा वापर करून 'गाळलेल्या जागा' भरल्या तर साधारणत: ९ सप्टेंबर इ. स. २४८ हा दिवस या लेखात उल्लेखलेला आहे, असे दिसते.

 

या लेखाची ब्राह्मी अक्षरवटिका इ. स. च्या तिसऱ्या शतकात कोरलेल्या आणि मुख्यतः गुजरातमध्ये सापडलेल्या पश्चिमी क्षत्रप 'कार्द्दमक' राजघराण्याच्या लेखांशी जुळते. लेखाच्या शेवटी जो 'सर्व्वसत्वहितसुखाय' हा भाग आला आहे तो निःसंशय बौद्ध परंपरेकडे निर्देश करतो. गुजरातमधल्या लेखांच्या अंतीही हीच भावना थोड्या वेगळ्या शब्दांत व्यक्त करणारे उल्लेख आले आहेत. लेखात 'प्रतिमा' स्थापन केल्याचा उल्लेख आहे पण ती कोणाची, हा भाग नष्ट झाला आहे. पण जवळपास सापडलेल्या पुरातत्वीय सामग्रीची सुसंदर्भ जुळवणी केली तर ही 'प्रतिमा' म्हणजे आपली सुप्रसिद्ध बुद्धप्रतिमाच, हा अंदाज बळकट होतो कारण बुद्धाचे शीर्ष अगदी या शिळेच्या पायाशीच पडलेले आढळले होते. 

चित्र २६ : बुद्धप्रतिमा आणि शिलालेख सापडले त्या जागा
चित्र २६ : बुद्धप्रतिमा आणि लेख : उत्खनित अवशेष

वासुल नावाच्या भारतीय माणसाला इजिप्तमध्ये बुद्धाची प्रतिमा का उभारावीशी वाटली असावी? वासुल हा व्यापारी असावा ही पहिली शक्यता आणि वैश्यवृत्तीच्या व्यक्तींचा बौद्ध धर्माच्या प्रसारात महत्त्वाचा भाग राहिला आहे हे विख्यात आहे. पण तो 'क्षत्रिय' आहे म्हणजे तो कदाचित स्थानिक सैन्यात सामील झालेला एकांडा शिलेदारही असू शकतो. ते काहीही असले तरी एक मौल्यवान प्रतिमा स्थापन करण्याइतका तो श्रीमंत होता हे नक्की. ही प्रतिमा साधीसुधी नाही – पृथःकरणानंतर तिचा दगड हा तुर्कियेच्या मार्मारा समुद्रात वसलेल्या प्रोकोनॉस नावाच्या बेटावरच्या खाणीत उपलब्ध झालेला संगमरवर आहे असे दिसून आले! मूर्तीकाराचे कौशल्यही वाखाणण्यासारखे आहे तेव्हा मूर्तीची घडण कदाचित अलेक्झांड्रियासारख्या मोठ्या शहरात, जिथे चांगले कलाकार राहत असत, झाली असावी. तिथून ही मूर्ती हजारेक किलोमीटर दूर असलेल्या बेरेनिकेला आणली गेली आणि तिथे वासुल क्षत्रियाने ती खरेदी करून तिची प्रतिष्ठापना केली असे दिसते. 

 

जिथे लेख आणि प्रतिमा दोन्ही सापडले ती जागा म्हणजे बेरेनिकेमधल्या प्राचीन वसाहतीतले रोमन-इजिप्शियन 'आयसिस' नावाच्या मातृदेवतेचे मंदिर होते. या मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याला लागून एक प्रशस्त खोली होती – या खोलीत, प्रवास उत्तम झाल्याबद्दल किंवा होणारा प्रवास उत्तम होऊ दे म्हणून, लोकांनी वेगवेगळ्या देवतांना साकडे घातलेल्या वस्तूंचा निक्षेप केला होता. त्यात मूर्ती आणि त्यांची आसने/पीठे, प्रार्थनापर किंवा धन्यवादपर लेख लिहिलेल्या शिळा, आहुती देण्याची स्थंडिले इत्यादी वस्तू होत्या. एका वेळी, अशा वस्तूंची फारच गर्दी या खोलीमध्ये झाल्यामुळे असावे कदाचित – कोणीतरी सगळ्या वस्तू एकत्र करून खोलीपाठच्या एका लहान कोनाड्यात टाकल्या होत्या आणि खोली पुन्हा वापरासाठी मोकळी केली होती असे दिसते. संकर्षण-वासुदेवाचे चित्रण असलेली शिला याच कोनाड्यात सापडली, सबब तिचाही वापर विधीपूर्वक निक्षेप म्हणून झाला होता आणि तो बुद्धप्रतिमेच्या निक्षेपाच्या पुष्कळ आधी झाला असावा हे निश्चित.

 

या आयसिस मंदिरासारख्या जागा या बेरेनिकेमधल्या तात्पुरत्या आणि कायमच्या रहिवाशांना एकत्र आणायच्या जागा होत्या. सोकोत्राच्या गुहेत सापडलेल्या निक्षेपांप्रमाणेच इथेही रोमन, ताडमोरी, अरबी, इजिप्शियन, न्यूबियन अशा वेगवेगळ्या लोकांचा वावर होता हे इथल्या पुरावशेषांवरून दिसते. बुद्धमूर्ती आणि वासुलाने लिहून घेतलेला संस्कृत लेख यांच्या उपस्थितीवरून या मंदिर-प्रांगणात भारतीय आणि / किंवा बौद्ध धर्ममताच्या अनुयायांचाही समावेश होता हे स्पष्ट होते. भारतीय इथे वावरत असल्याचे अस्पष्ट वाङ्‌मयीन पुरावे उपलब्ध होतेच पण त्यांची धूसरता आता या नव्या शोधांमुळे दूर झाली आहे.

 

या बुद्धमूर्तीचे आणि लेखाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या निर्मितीत आणि उपयोजनात स्थानिक आणि परकीय तथ्यांची झालेली आश्चर्यकारक सरमिसळ. बुद्धमूर्तीची सर्वसाधारण वैशिष्ट्ये अगदी आजच्या भारतीयांनाही सुपरिचित वाटतील अशी आहेत – कुरळे केस, संन्यासी चीवर वस्त्रे, समपाद उभे रहाणे, अभयमुद्रा आणि चीवरांचे टोक गुंडाळून हातात धरणे इत्यादी. पण त्याचबरोबर इतर वैशिष्ट्यांचाही इथे समावेश झाला आहे, ज्यांची मुळे भारतीय कलेत नसून स्थानिक पूर्व भूमध्यसामुद्री परंपरांत आहेत. बुद्धाच्या शीर्षामागे किरणांचे वलय आहे जे ताडमोरी आणि रोमन इजिप्शियन कलेतून आलेले आहे. पायाशी वाहिलेले कमळही भारतीय कलेत सहसा दिसत नाही. परंतु ही वैशिष्ट्ये बुद्धाच्या एकंदरीत 'ओळखी'शी पूरक आहेत – बुद्ध सूर्यवंशी शाक्य कुळात जन्माला आला होता सबब सूर्यकिरणे अस्थायी नाहीत तसेच कमळ आणि बुद्धाचा संबंध तत्त्वज्ञान, कर्मकांड आणि चिन्ह अशा अनेक तऱ्हांनी लावता येतो. ज्या मूर्तिकाराने ही वैशिष्ट्ये कोरली त्याला या बाबी परिचित होत्या आणि त्याने स्वतःची कलात्मक स्फूर्ती वापरून त्यांचे चित्रण केले आहे. मूर्ती जिथे सापडली त्या जागेत इतर अनेक धर्ममते एकत्र आलेली दिसतात. शिलालेखातही ही सरमिसळ अल्लाद झालेली दिसते. त्याचा मसुदा तसेच वापरलेली कालगणना पूर्णतः भारतीय आहे – पण राजोल्लेख रोमन फिलिपचा आहे! भाषा शुद्ध संस्कृत आहे पण ग्रीकचाही समावेश त्यात आहे. 

 

अशी सांस्कृतिक, भाषिक आणि धार्मिक सरमिसळ व्हायला लोकांचा जवळचा संपर्क यावा लागतो इतकेच नव्हे तर त्यांनी एकमेकांना 'समजून' घेणे आवश्यक असते. 'कॉस्मोपोलिटन' हा शब्द आपण आज न्यूयॉर्क, लंडन, मुंबईसारख्या विक्राळ शहरांना (megalopolis) वापरतो – पण प्राचीन काळातही अशाच सांस्कृतिक अभिव्यक्तींची सरमिसळ होणारी केंद्रे होती हे बेरेनिकेच्या शोधांवरून सिद्ध होते. ही सरमिसळ सलमान रश्दींच्या शब्दप्रयोगाप्रमाणे अगदी 'चटनीफिकेशन' होऊन एकमेकांत घोळून गेलेली नसेल पण वैशिष्ट्ये कायम ठेवून त्यांच्या स्थानिक आवृत्त्या निर्माण होण्याइतकी नक्कीच झाली होती. दोन हजार वर्षांपूर्वीच्या मानवी संपर्कांना उल्लेखनीय असे आयाम प्राप्त करून देणारे हे शोध आहेत हे नक्की.

सुधीर Sat, 18/10/2025 - 11:20


पण अशा रीतीने सुरू झालेला संपर्क केवळ व्यापारापुरताच मर्यादित राहणे केवळ अशक्य होते.

हा लेख खूपच आवडला. ड्रेड रूटस आणि ट्रेड गिल्ड्स वर अगोदर जितके वाचले होते त्याहून खूप चांगला उलगडा झाला. बरीच नवीन तत्थ्ये समजली.

या लेखावरून वैष्णवधर्मीय नुसतेच समुद्रप्रवास करत नव्हते तर ते परदेशी (सोकोत्रा, बेरेनिक इ.) वास्तव्य (कदाचित तात्पुरतेही असेल, लांबच्या प्रवासानंतर) करत होते हे समजते.

या लेखावरून एक जुना प्रश्न विचारावासा वाटतो. असे "साधारण ऐकले" आहे की सुरुवातीच्या काळात बौद्ध आणि जैन जीवनपद्धती स्विकारण्यात व्यापार्‍यांचा अधिक पुढाकार होता. वैष्णव व्यापार्‍यांना समुद्र प्रवासासाठी यज्ञ, दानधर्म करावा लागत होता ज्यात (घोडे, बैल इ. लागत) त्यामुळे बौद्ध आणि जैन जीवनपद्धती स्विकारण्याकडे कल होता. यात कितपत तत्थ्य आहे?