Skip to main content

दोन टक्कलवंत


भरकटलेलं मन, विस्कटलेला दिवस. इसेन्शियल गोष्टी सोडून मधला मोकळा वेळ आहे तो एकेकाळी गाड्या बघणं, लादीवरच्या किंवा भिंतीवरच्या अस्फुट कलाकृतींमध्ये चेहरे शोधणं इत्यादी कामं सोडून एका मोबाईलकडे पाहत राहणं ह्यातच वाहत असतो. रील्स, शॉर्ट्स, टिकटॉक काय असेल ते. पहिल्या फ्रेममध्ये तुम्हाला कह्यात घेऊ पाहणारे आकर्षक चेहरे, किंवा इतर अवयव – किंवा मनाला अगदी भिडतील, खेटतील अशा – भावनांचा बाजार.

ह्यातलंच एक रील.

एक हॉस्टेलटाइप खोली. एक अतिशय हडकुळा इसम आणि दोन गिटारवाले. हडकुळा गातो.

सुंदरतर पिनाकधरहर

गंगाधर गजचर्माम्बरधर

कान टवकारले जातात. तो गातोच आहे. गिटार चालू आहे.

चंद्रचूड शिवशंकरपार्वती

रमणा निनगे नमो नमो

हातावरचे केस उभे राहिलेले असतात. संजय अम्मोथिलचा अत्यंत कोरा, काळ्याशार दगडावरून जाणाऱ्या ओढ्यासारखा आवाज. त्याला म्हणावा तसा आकार नाही, रिव्हर्ब, एको वगैरे अतिसंस्कार नाहीत. माइकसुद्धा कुठेतरी दूर, तोही फार प्रोफेशनल नाही. पण हे संस्कृत-कन्नड गाणं/स्तोत्र/कविता मात्र मनाला भिडतं.

हे काहीतरी ‘रॉ’ आहे. अजूनही ह्याचा बाजार नाही झाला. हे उत्कट आहे, पण ते मला येऊन कोणी विकलेलं नाही. लोकलमध्ये पाय आखडून बसलेले असताना, अंग आंबून गेलेलं असताना एकतारीवर कोणी हे वाजवलं नाही आणि त्याच्या छोटीने माझ्याकडे भीक मागितली नाही. कोणत्यातरी सुमार गंधर्वानं आपल्या परिस्थितीची रडगाणी गाऊन मग हे गाऊन टाकलेलं नाही आणि त्याला कोणत्यातरी देव होऊ न शकलेल्या यक्षकिन्नरानं स्कोअर दिलेला नाही. हे अस्सल आहे. संजयला कदाचित मिलियन्समध्ये व्ह्यू मिळणार नाहीत, कदाचित स्तोत्रं आवडणारे आणि गिटार आवडणारे ह्या दोघांनाही हा प्रयोग आवडणार नाही, ह्यांचं इंटरसेक्शन मात्र माहीत नाही.

बट संजय डजंट केअर. तो गायला बाबा. तीस सेकंदात अंगावर काटा देऊन गेला. अर्थात माझा शोध चालू. मी काय, स्पॉटिफायच्या काळात एमपीथ्री डाउनलोड करून फिरणार. हे चंद्रचूड काय प्रकरण आहे? हे स्तोत्र ऐकलं कसं नाही आजपर्यंत? मिळालं. कर्नाटकी संगीताच्या अध्वर्यूंपैकी पितामह पुरंदर दास ह्यांनी शिवस्तुतीसाठी रचलेलं हे कवन.

ते शोधताना हे दिसतं. ‘गरुडगमन वृषभवाहन.’ कन्नड शिणिमा. आपला काहीही संबंध नाही. आजपर्यंत एकही कन्नड सिनेमा पाहिलेला नाही. मराठी सिनेमा अगदीच कॉफी किंवा अगदीच बैल. दोन टोकंच. हिन्दी हा विषय सध्या टोकं काढलेला आहे म्हणून तो नंतर चघळू. अरे, पिक्चरातलं गाणं दिसलं. बघू बघू...

एन्टर पहिला टक्कलवंत. अजागळ दाढी. सिंगल फसली. डोळ्यात हतबल भाव. तोंड उघडं. मळकट शर्ट आणि लुंगी. हा एका ऑफिसात जातो. एक माणूस हातात पिस्तूल घेऊन दुसऱ्या माणसाशी अरेरावीनं बोलत आहे. टकलू त्याच्या टेबलवरचं पेपरवेट घेतो आणि पिस्तूलवाल्याच्या डोक्यात हाणतो. पिस्तुलधारी जमिनीवर कोसळतो. टकलू त्याच्या बाजूला उकिडवा बसतो. त्याचा उगारलेला हात दिसतो, हातात पेपरवेट. तो ते त्वेषानं पडलेल्या माणसाच्या डोक्यात घालतो. मांस चेचलं जाण्याचे आवाज. टकलूच्या चेहेऱ्यावर चिळकांड्या. बेस गिटार सुरू होते. व्हिडिओ स्लो-मोशन होतो.

चंद्रचूड शिवशंकर पार्वतीरमणा निनगे नमो नमो

(चंद्रमौळी, शिवशंकर पार्वतीप्रियाला माझे नमन)

सुंदरतर पिनाकधरहर गंगाधर गजचर्माम्बरधर

(देखण्या पिनाकधराला, व्याघ्रांबर-गंगाधराला नमन)

आपण सुन्न.

बधीर.

अरे चाललं काय आहे? असल्या सीनला जबरी बेसगिस लावा, ड्रमगिम कुटा, कोणत्यातरी उपाशी दानवाला माइकवर आरोळ्या द्यायला लावा. हे काय? संथ, भारदस्त बेस गिटारवर प्रार्थना काय म्हणताय?

ठरलं. हा पिक्चर बघायचा. काहीही करून.


एक महिना सगळा मोकळा वेळ हा मिळवायच्या मागे. क्लाउडस्ट्रीम, स्ट्रीमिओ सगळ्यांकडे शंख. शेवटी मिळाला. मध्यंतरी राज शेट्टीबद्दल कळलं. हा इसम कन्नडमधला दिग्दर्शक आहे. मोजकेच सिनेमे. ह्याच्या ह्याच चित्रपटाने एकदम ऑल टाइम बेस्टचा दर्जा मिळवला. चित्रपट निओ-न्वार-गँगस्टर शैलीतला आहे. अत्यंत थंडगार, कोल्ड फ्रेम्स. भरपूर, अक्षरश: सेकंदागणिक प्रचंड हिंसा आणि क्रौर्य. त्याचबरोबर प्रत्येक फ्रेममध्ये राज शेट्टीचे हतबल-करारी डोळे. एक आग का दरिया है, बस डूब जाना है असा निकराचा भाव असलेले. त्याच्याबरोबर ऋषभ शेट्टी, कांतारावाला.

हरी (गरुडगमन – ऋषभ शेट्टी) आणि शिव (वृषभवाहन – राज शेट्टी) ह्या दोन कट्टर मित्रांची ही कथा. चित्रपट सुरू होतानाच किती क्रौर्य अख्ख्या चित्रपटात आहे हे स्पष्ट कळतं. ही विहीर हरीच्या घराजवळ असते. ह्याची आई मासे चिरत असताना तिला विहिरीत काहीतरी आहे ह्याची जाणीव होते. इथेसुद्धा क्रौर्य आपल्या आजूबाजूला आहेच हे स्पष्ट दाखवलेलं आहे. विहीरीतून गावकरी एका लहान मुलाला बाहेर काढतात. गळा चिरलेला असतो.

इथे शिव अवतार घेतो.

ह्याला स्त्रियांचा स्पर्श अगदी आवडत नाही. स्पर्श करतील तर पुरुष डॉक्टर आणि नर्सच. कोणतीही स्त्री जवळ आली की तांडव. शिव वाचतो, आणि गावात एक काटक्यांचा त्रिशूळ घेऊन भीक मागत फिरतो. तिथे त्याचं नाव शिव पडतं. इथली मंगळूरातली फोटोग्राफी सुंदर आहे. त्याचं एकटेपण चांगलंच अंगावर येतं. एके दिवशी हरी आणि त्याच्या आईला तो परत दिसतो, आणि ती त्याला झापते. “परत असा रस्त्यावर भिका मागताना दिसलास, तर कैक्काल मुरत्तिनएंदू. (हातपाय मोडून ठेवेन.)”

शिव भयंकर आत्ममग्न आहे. क्रिकेट सोडून त्याला दुसरी काहीही हौस नाही. तेही लहानपणी तो खेळत नाही. लहानपणी त्याच्याकडे फक्त दुर्लक्ष होतं. तसंही त्याला स्वत:कडे कोणाचं लक्ष गेलेलं आवडत नाही. यथावकाश हरी आणि शिव मोठे होतात. हरीचा बिस्किटे, वेफर इत्यादीचा ट्रेडिंग बिझनेस आहे. हरीला खूप मोठं व्हायचं आहे आणि त्यासाठी काहीही करण्याची त्याची तयारी आहे.

एक दारूचा दुकानदार त्याचे २४०० रुपये थकवतो. हरीनं ते सरळ मागूनसुद्धा देत नाही. मालकाला भेटायला सांगतो. हरी ह्या मालकाला भेटतो, आणि मालक पिस्तूल काढतो, आणि दादागिरी करतो. हरी पिस्तूल पाहून गप्प होतो. बाहेर टेम्पोला टेकून उभा असलेला शिव आत येतो. मग तो सीन.

गाणं अफाट आहे. अत्यंत खर्जात ते सुरू होतं. जबरदस्त बेस गिटार वाजवलेली आहे. मृतदेह स्क्रीनवर न दाखवता, शिवाचा फक्त पेपरवेट धरलेला, कुटणारा हात मात्र दिसतो. रक्ताच्या चिळकांड्या. त्याही अति नाहीत. शिवच्या डोळ्यांत हतबलतेच्या गर्तेतून पेटून उठलेले क्रौर्य आहे. त्यात एक निकराची, आता हे केलंच पाहिजे अशी भावना आहे. रुद्रभैरवासमोर बळी देताना जो दरबारी कानडा वाजेल तो मात्र असाच असेल.

हरी शिवला आवरतो. शिव मालकाच्या सफेद चपला घालतो. गर्दी जमलेली असते. सुन्न.

कोरळलीभस्म रुद्राक्षय धरिसिद्ध परमवैष्णवनुने 

(गळ्याभोवती भस्म आणि रुद्राक्षमाळाधारी, विष्णूचा परमभक्त)

गरुडगमननम पुरंदरविठलन प्राणा:प्रियनुने 

(गरुडगमन पुरंदरविठ्ठल हा मला प्राणप्रिय आहे)

हरीचा हात पकडून शिव चालता होतो.

तुरुंगातून बाहेर पडेपर्यंत हरीनं बस्तान बसवलेलं असतं. इथे शिवची दुसरी हौस दिसते; हरीनं त्याच्यासाठी घेतलेली RX-100. कुठेही शिव जाणार तर तिच्यावरूनच. हरी मंगलादेवीचा डॉन होत असतो. इथे शेखर ह्या पात्राची ओळख होते. हा मंगलादेवी देवळासमोरचा फुलेविक्रेता. सिनेमा आपण ह्याच्याच दृष्टीतून पाहत आहोत हे कळतं. शिव स्थानिक क्रिकेट स्पर्धेत नाव कसं नोंदवतो आणि तिथेच ह्या तिघांचे सहा कसे होतात हे खरंच पाहण्यासारखे आहे. बारीकबारीक तपशिलांतून शिव आणि हरी ह्यांच्यातली विशुद्ध मैत्री दाखवलेली आहे. शिवच्या सणकी डोक्यामुळे हरी तिथला अनभिषिक्त डॉन बनतो. इथे येणारं ‘एन्दो बरेदा’ हे गाणं अतीगोड असल्यामुळे फार आवडलं नाही.

मग दसरा येतो. इथे सिनेमाचा दुसरा अफाट सीन आहे, आणि त्याचबरोबर दुसरं अफाट गाणं. प्रत्येक फ्रेममध्ये गावाकडचं संथ आयुष्य, स्वच्छता दिसत राहते, आणि मंगळुरी संस्कृतीचं दर्शनसुद्धा होतं. अर्थात हरी डॉन नुसताच होत नाही, त्याला आव्हान देणारा प्रकाश म्हणून आधीचा डॉन असतोच. दसऱ्याला अंगभर रंग लावून तरुण मुलं फिरतात, आणि मानधन मागतात. ही सगळी मुलं प्रकाशची असतात. हरी त्याच्या मुलांना आपल्याकडे वळवतो. मंगलादेवी देवळाच्या समोरच्या जागेत प्रकाश आणि हरी, त्यांच्या गँग समोरासमोर येतात. हरीनं सकाळी लवकर फेरी मारलेली असल्यामुळे सगळे पैसे हरीकडे असतात. प्रकाशच्या फेरीत त्याला जितके पैसे मिळतात तो ते जमिनीवर टाकून हरीला उचलायला सांगतो. हरी त्याला उत्तर देणार, तेव्हा प्रकाश पिस्तुल काढायला जातो.

ढग गडगडत असतात. मागून शिव येतो. 

“खळ्ळ्...” प्रकाशच्या डोक्यात एक बाटली फुटते.

तिच्याच उरलेल्या काचेने शिव प्रकाशची छाती चिरतो.

स्लो-मोशन.

ताशेवाले, वाघ इत्यादी पांगतात. सिंथ आणि बेस ऐकू येतात. शिव आपला पेटंट चाकू काढून प्रकाशला अजून भोसकतो. 

महादेव महादेव महादेव महादेव...

 प्रकाशचा पुतण्या त्याच्यावर धावतो, पण प्रकाशचं पडलेलं पिस्तुल हरी पुतण्यावर रोखतो. प्रकाशची गँग पुतण्याला आवरते. “वाजवा! जोरात वाजवा. तुम्ही वाजवताय की मी येऊन वाजवू तिथे?” शिव ताशेवाल्यांवर ओरडतो. ताशे वाजताना दिसतात, पण ऐकू येत नाहीत, कारण इथे ‘सोजुगादा सुजू मल्लिगे’ सुरू झालेलं आहे.

महादेव महादेव महादेव महादेव...

शिव रस्त्यावर साष्टांग नमस्कार घालतो. शिव आपली क्रुद्ध नजर वर करतो, आणि एकाएकी मुसळधार पाऊस. एक  उत्स्फूर्त तांडवनृत्य. हे त्या वाघांसारखे आहे, पण त्यात त्या वाघांची भक्ती/परंपरा नाही. हे शुद्ध निचरानृत्य आहे. हरीला धमकी म्हणजे मला धमकी. मग मी करणारच तांडव. लोकहो, तुम्ही ते बघितले पाहिजे.

(तारसप्तक) महादेव महादेव महादेव महादेव…

मी एक खून करून, भरचौकात, पावसात नाचतो आहे. तुम्हाला ते रीडिक्युलस वाटेल. मला पर्वा नाही. आता माझे राज्य आहे. तुम्ही हरीला किंवा शेखरला बोट लावलेत तर तुमचीही हीच अवस्था होईल. मी असाच नाचेन तुमच्या प्रेताजवळ. 

अंदावरे मुंदावरे मत्ते तावरे पुष्पा, (कमलपुष्पे आणि विविध फुले आणली आहेत)   

चंदक्की माले बिलपत्रे, महादेव निमगे (आणि सुंदर अशी बिल्वपत्रांची माळ, महादेवा)

चंदक्की माले बिलपत्रे, तुळसीदलवा (बिल्वपत्रांच्या माळेत तुळशीची दले आहेत)

मदप्ना पूजेगे बंधू, महादेव निमगे (हे घेऊन पूजेला आलोय, महादेवा)

सोजुगादा सुजू मल्लिगे, महादेव निम्मा (सुंदर निमुळता मोगरा आणला आहे, महादेवा)

मंदे म्याले दुंडू मल्लिगे, महादेव निमगे... (तुझ्या शिरासाठी बटमोगरा आणला आहे, महादेवा)

 

हा प्रसंग चांगला ५ मिनिटं तरी चालतो. स्लो मोशन, हे गाणं सुरूच असतं. एका बाजूला पिस्तूल रोखून उभा असलेला हरी. मध्ये तांडव करणारा शिव, आणि गुडघे टेकलेला पुतण्या.

ह्यापुढे काय होतं, हे इथे लिहिणं प्रशस्त नाही. हा सिनेमा बराच काही आहे. त्यात अभिनिवेश नाही. तुझ्याचसाठी रे, तुझ्याचसाठी असा अत्यंत रसिकानुनयी स्वस्त प्रकार नाही. आव आणलेली देशभक्ती, धर्मनिष्ठा नाही. चित्रपट प्रचंड ‘हिंदू’ आहे. सेकंदासेकंदाला कोणतेतरी सांस्कृतिक संदर्भ आहेत, पण तेही ‘आहेत तसे’. अस्सल. दुसऱ्या बाजूला भयंकर अभिनिवेशात बरबटलेला आर्टपणा नाही. हा दुसरा सीन तसा वाटण्याची शक्यता आहे, पण ते होत नाही. प्रेक्षकाला शिवबद्दल एक कणवमिश्रित भीती अशी एक विचित्र भावना वाटत राहते. ती फक्त कणव होऊ नये आणि फक्त भीतीच वाटून त्याचा व्हिलन होऊ नये हा समतोल साधण्यासाठी प्रत्येक प्रसंग लिहिलेला आहे.

कोव्हिडोत्तर काळात, एकूणच कलाकृती प्रचंड खालावल्या, किंबहुना, आपलं आयुष्य किंवा स्थैर्य किती पोकळ आहेत हे स्पष्टपणे जाणवल्यामुळे लोकांनी प्रयोग बंद केले. ह्याजागी जनतेनं त्यातल्या त्यात सेफ, म्हणजे जुनेच पर्याय निवडले आणि त्यांना प्रसिद्धी दिली म्हणायला हरकत नसावी. बऱ्याच चित्रपटांचे रिमेक आले किंवा पुढचे भाग. थेटरांत री-रिलीजचा नवा ट्रेंड सुरू झाला. ह्या कल्लोळात अभिव्यक्ती आणि रसिकानुनय ह्या दोन प्रचंड बाजूंचा मध्य साधणारं काही नवं आलंच नाही, किंवा प्रसिद्ध झालंच नाही म्हणायला हरकत नाही. अर्थात काहीतरी भयंकर दोन्ही बाजूंना झुकलेलं काही आलंच पण ते अर्थात त्यात मध्य शोधणाऱ्या लोकांना तितकंच ताणलेलं वाटलं. ह्यावरून ‘खपतं ते विका’ ह्या न्यायानं बहुतेक कलाकृती ह्या रसिक-बाजूला जास्त झुकणाऱ्या आल्या. ह्यात राजकीय संदर्भ टाकण्याची खुमखुमी आवरती घेऊ. त्याहिशोबाने GGVV बराच कलाकृतीकडे झुकलेला आहे. भडक संगीत, रासवट हिंसा-दृश्यं नाहीत. किळस येईल इतका रक्तपात दाखवलेला नाही. संथ पार्श्वसंगीत वाजवून कणव आणणं नाही, की भडक पार्श्वसंगीत वाजवून भीती दाखवणं नाही. जे आहे ते रौद्रभीषण, तरीही संथ. हे पाहा क्रौर्य. हा पाहा अन्याय. हा तुमच्या आमच्या आजूबाजूला आहे, आणि त्याचं आपण काहीही करू शकत नाही.

तरीही, ‘गरुडगमन वृषभवाहन’ हा तसा स्वच्छ सिनेमा आहे. ह्याची तुलना ‘गँग्ज ऑफ वासेपूर’शी केल्याशिवाय राहवत नाही. स्वच्छता हा मुख्य फरक. ‘गँग्ज’ मुद्दामहून अस्वच्छ ठेवलेला आहे, पण त्यात काही कृत्रिमता वाटत नाही. आहे हे असं आहे. त्यातल्या फ्रेम ऊबदार, गरम रंगांच्या आहेत. धूळ, सुकलेलं रक्त, चिघळलेल्या जखमा वगैरे प्रकार स्वच्छ दिसतात. प्रचंड गाजलेले, टाळ्याखेचू अनेक संवाद आहेत, आणि भरपूर ‘कश्यपाभिव्यक्ती’सुद्धा! त्याउलट मंगळूरासारख्या दमट, किनाऱ्याच्या जागी, लुंगीवर गाव हिंडणाऱ्या लोकांत स्वच्छता ही एक गरज असणारच. शिवकडून प्रत्येक वध करवून घेतल्यावर हरी एका शिवमंदिरात जाऊन अभिषेक करतो, स्नान करतो हे बरेच वेळा दाखवलेलं आहे. चित्रपटात पाऊस बरेचदा पडतो. तो ‘सोजूगादा’चा प्रसंग भर पावसात घडतो. आता ही स्वच्छता राज शेट्टीनं स्वत:साठी ठेवली आहे की प्रेक्षकांसाठी, हे कळायचा मार्ग नाही. एकही संवाद लक्षात राहण्यासारखा नाही. ‘गँग्ज’मध्ये खाटीकखाने आहेत. तिथे उघड्यावर पडलेलं मांस, घोंघावणाऱ्या माशा, इथे तिथे पडलेला कचरा स्पष्ट दिसतो. ‘GGVV’मध्ये मासेबाजार, मासे चिरणं इत्यादी प्रसंग दाखवलेले असले तरीही सगळं कसं धुवून घेतलेलं, स्वच्छ. सगळंच फार अस्सल आणि वास्तव. एकूण हा चित्रपट परत पाहण्याजोगा आहे, हे नक्की. ‘गँग्ज’बद्दल माझं तरी तसं मत पडलं नाही. ह्या स्वच्छतेमुळे कदाचित तो रसिकानुनयी झालेला आहे का? असण्याची शक्यता आहे. अर्थात विष्णू आणि महेशनंतर एक ब्रह्म हवंच, आणि ते ह्या चित्रपटात आहेसुद्धा. इन्स्पेक्टर ब्रह्मय्या (गोपळकृष्ण देशपांडे) ह्याचा अभिनय अप्रतिम आहे. अर्थात पुढे काय होतं, हे पाहण्यातच जास्त आनंद आहे हे नक्की.

हा चित्रपट का आवडण्याजोगा आहे आणि त्या दोन बाजूंचा समतोल जो साधला आहे त्याबद्दल इथे स्वल्पविराम घेऊ. ह्या बरोबरच मी पाहिलेले अजून एक रील, आणि त्याबरोबर शोध लागलेली अजून एक कलाकृती ह्यांबद्दल थोडं.

एक जॅकेट घातलेला, टक्कलवंत, साधारण चाळीशीतला इसम स्वत:च्या लहान मुलीबरोबर चालत आहे. दोघंही आइसक्रीम खात आहेत. लहान मुलगी भलतीच गोड आहे. ती उत्साहानं शाळेत काय काय झाले हे सांगत आहे. एकदम दोन तरुणांबरोबर त्यांची टक्कर होते. मुलीच्या हातातला कोन खाली पडतो. ह्यांची थोडी बाचाबाची होते. त्यात तरुण शिवीगाळ करतात. इसम त्यांना, एक मोठ्ठं स्मितहास्य करत सांभाळून बोलायला सांगतो. ते अजून शिवीगाळ करतात आणि निघून जातात.

पुढे इसम मुलीला दुसरं आइसक्रीम घेऊन देतो, आणि गाडीत नेऊन बसवतो. हे दोन तरुण एका गल्लीत उभे असतात. इसम अगदी आरामात चालत त्यांच्याजवळ जातो. ते दोघेही ‘आली परत कटकट’ टाइप काहीतरी म्हणतात. इसम हातातला कोन फेकून देतो आणि एकाच्या पोटात लाथ घालतो. तो सरळ जमिनीला समांतर, विव्हळणं सुरू. इसम दुसऱ्याच्या लगेच मागे जातो, पण दुसरा उलट्या दिशेनं ताशी बावीस मैल.

हं, इंटरेस्टिंग. बऱ्याच दिवसांनी ‘मेन रिटन फॉर मेन’. मी हे एक रील कुठेतरी मनात नोंदवले होते, पण विसर पडला. नंतर यथावकाश इतर सीनसुद्धा रीलमध्ये  पाहिले, आणि लोकांच्या टिप्पण्या वाचून उत्सुकता अगदीच ताणली गेली. नंतर शोध घेता ह्या ऑस्ट्रेलियन सिरिज ‘Mr. Inbetween’चा शोध लागला. अर्थात ही सिरिज मिळवून अधाशासारखी संपवली. ह्यानंतर टक्कलवंत क्रमांक दोन, स्कॉट रायन ह्या निर्माता-लेखक-अभिनेत्याबद्दल माहिती मिळवली.


रेमंड ‘रे’ शूस्मिथ (स्कॉट रायन) हा एक सिडनीमध्ये राहणारा, स्ट्रिप क्लबचा बाऊन्सर आहे. तो एक भाडोत्री मारेकरीसुद्धा आहे. अर्थात, ही बाजू तो आपल्या कुटुंबापासून लपवतो. ब्रिटनी, त्याची लहान मुलगी आणि ‘मोटर न्यूरॉन डिसीज’ असलेला सख्खा भाऊ – ब्रूस हे त्याचं कुटुंब. ब्रिटनी तिच्या आईबरोबर राहते, पण अधूनमधून रेमंडकडेसुद्धा राहते. आपल्या खऱ्या आयुष्याची सावली रेमंड हा भाऊ आणि मुलीवर जरासुद्धा पडू देत नाही. तो एक परिपूर्ण बाप आणि भाऊ बनायचा अक्षरश: भगीरथ प्रयत्न करत असतो. ह्याशिवाय गॅरी नावाचा अत्यंत वाह्यात मित्राच्या आयुष्यातली लफडी निस्तरणे हाही त्याचा एक उद्योग. वर दिलेला प्रसंग पहिल्याच भागात घडतो.

का कोण जाणे, ह्या मालिकेतला एकही प्रसंग खटकण्यासारखा, अगदीच ओढूनताणून केलेला किंवा सिनेम्याटीक लिबर्टीचा सिनेम्याटीक स्वैराचार केलासा वाटत नाही. सगळं काही नीटनेटकं, जसंच्या तसं. गॅरीला जेव्हा काही लोक धरून हाणतात तेव्हा त्यांना शोधून रे यथेच्छ धुतो.

ह्यानंतरचा एक प्रसंग विशेष उल्लेखनीय आहे. रेला त्या दोन लोकांना हाणल्याबद्दल समूह समुपदेशन गटात सहभागी व्हावं लागतं. इथे बाकी लोकसुद्धा असतात. आपली ओळख करून देताना, आणि इथे असण्याचे उद्दिष्ट स्पष्ट करताना ते आपल्या प्रेयसी/बायको/मुलांवर हात कसे उगारतात हे सांगतात. ते ऐकून रे कुत्सितपणे हसतो. समुपदेशक त्याला कारण विचारतो, तेव्हा रे उद्गारतो, “मी चुकीच्या ठिकाणी आलो. इथे सगळे बायका-पोरं-बडवे आहेत, मी मात्र काही समजकंटकांना वठणीवर आणलं म्हणून इथे आहे.” ह्यावरून बाचाबाची होते आणि ती हातघाईला येते. समुपदेशक रेला अक्षरश: उचलून दुसरीकडे नेतो आणि “नीट वागला नाहीस तर ‘ह्याला तुरुंगात टाका’ असा शेरा मारेन” अशी धमकी देतो.

इथे रेचा नैतिक कल दिसतो. त्याच्याशी असहमती दर्शवणारे (भारतीयतरी) मिळणं कठीण. मध्ये रेला एका माणसाची हत्या करण्याची सुपारी मिळते. माणूस त्याच नावाचा पण चुकीचा निघतो. रेला वाईट वाटतं आणि स्वत:चे पैसे तो त्या इसमाच्या विधवेच्या हातात कोंबून अदृश्य होतो. इथे एक थेट विधान आहे – समाज, वेळ, ट्रेंड ह्याची काहीही चिंता न करता केलेलं. सगळे क्रौर्य समानच, असल्या काहीतरी समजुतींच्या विरुद्ध – काहीसे क्रौर्य, थोडीशी हिंसा ही गरजेची आहेच असं. अर्थात ह्याच्याशी किती प्रेक्षक सहमत होतील हा वादाचा विषय. मात्र, माझं मत मात्र हे आहे असं स्पष्ट म्हणणारी ही कलाकृती आहे – आणि म्हणूनच ती कौतुकास्पद आहे. यथावकाश रेला एक प्रेयसी भेटते, अ‍ॅली. अ‍ॅलीच्या भूतकाळातसुद्धा हिंसा आहे, आणि एका प्रसंगात तिला रेचं ‘ते’ रूप दुरून दिसतं. अर्थात, ह्यामुळे तिच्या मनात खळबळ उत्पन्न होते. इथे, त्या ‘गरजेच्या क्रौर्या’ची दुसरी बाजू दिसते. एकूण मालिका फक्त प्रेक्षणीयच नाही तर संग्राह्य का आहे ह्यामागचं हे एक कारण ठरावं. रेला ठार करण्यासाठी एक भाडोत्री मारेकरी डेव्ह (मॅट नेबल) आणि एक अख्खी टोळी येते. रे त्या टोळीला संपवतो, मात्र मॅटला जाऊ देतो. रेचं ‘मृत्यूस्मित’ चांगलेच ठसठशीत आणि वारंवार दिसतं. रेचा पारा चढतो तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर क्रोध दिसत नाही. तो ह्या कानापासून त्या कानापर्यंत हसतो. ह्यानंतर तो भयंकर हिंसक होतो, आणि लोकांची हाडं मोडतो किंवा त्यांना ठार मारतो हे नक्की.

प्रत्येक भाग पाहण्यासारखा आहे. त्याहून मोठी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो पटण्यासारखा आहे. सगळे लोक कसे सामान्य. रेसुद्धा सामान्य. त्याच्याकडे उगीच अख्ख्या टोळीशी मारामारी करण्यासारखी अलौकिक शक्ती नाही. तोही अडखळतो, चुकतो, जितकी हिंसा कामावर करतो तितकाच तो ब्रूस, ब्रिटनी आणि अ‍ॅलीबरोबर मृदू वागतो.

इथे दुसरा उल्लेखनीय प्रसंग आहे. ब्रिटनीला इतक्यात युनिकॉर्न्सचं वेड लागलेलं असतं. रे तिच्या युनिकॉर्नबद्दलच्या प्रश्नांना वैतागलेला असतो.  गॅरी तिच्यासाठी एक घोडा पांढरा रंगवून युनिकॉर्न म्हणून उभा करतो, आणि ती तो बघून जाम खूश होते. अ‍ॅलीच्या घरी ख्रिसमस असतो. प्रत्येकाला एक क्रमांक दिलेला असतो. इथे आपल्या भेटवस्तू आपल्या वरच्या कोणत्याही क्रमांकाशी अदलाबदल करण्याची मजेदार प्रथा असते.  रे स्वत:ची भेटवस्तू अदलाबदल करून एक युनिकॉर्न मेणबत्ती ब्रिटनीला मिळवून देतो. ब्रिटनी चांगलं तोंडभरून स्मित करते. सगळ्यांच्या चेहऱ्यावर हास्य आहे, ही प्रथा खरं तर लहान मुलांना त्यांच्या आवडीच्या भेटवस्तू मिळाव्यात म्हणून आखलेली आहे. ‘Have yourself a merry little Christmas’ (सिनात्रा नाही, लॉरेन डैगलचं) हे अत्यंत सुश्राव्य, मऊ गाणं पार्श्वभूमीवर वाजत आहे. ह्यात ट्रेंटचा क्रमांक येतो. हा आपल्याला आलेल्या मगांची ब्रिटनीबरोबर अदलाबादल करतो. लोकांत लहान मुलीची वस्तू बदलल्याबद्दल नाराजी आहे. युनिकॉर्नचं तू काय करणार, असं इतरांनी विचारलं असता “माहीत नाही” असं उत्तर ट्रेंट देतो. ब्रिटनीचा इवलासा चेहरा पडलेला आहे. ते पाहून रे अस्वस्थ आहे.

ह्यानंतर रे बाहेर जातो. रात्र झालेली आहे. ट्रेंट सिगरेट ओढत आहे. रे त्याला अत्यंत मार्दवपूर्ण आवाजात विचारतो,

“ती युनिकॉर्न मेणबत्ती मला देशील का?”

“का?”

“अरे, माझ्या मुलीला सध्या युनिकॉर्नचं वेड आहे. जर ती मेणबत्ती मला दिलीस तर मी तुला शंभर डॉलर देईन.”

“तू मला लाच देतो आहेस का?”

“लाच नाही रे. तुझे थोडेसे उपकार हवे आहेत. ते तू केलेस, तर कृतज्ञता म्हणून थोडी रोकड देईन, इतकंच.”

(इथे देईनसाठी ‘throw’ (throw you some money) हे क्रियापद वापरलेले आहे, म्हणून रेची मागणी भारतीय इंग्रजीत अपमानास्पद वाटण्याची शक्यता आहे. त्याच्या आवाजावरून आणि हावभावांवरून तसे अजिबात वाटत नाही, पण ऑस्ट्रेलियन लहेजाची तितकी माहिती नाही – जाणकारांनी प्रकाश टाकावा.)

“मला पैशांची गरज आहे असं वाटतं का माझ्याकडे बघून?”

“मला तसं अजिबात वाटत नाही.”

“तुला माझी वार्षिक कमाई माहीत आहे?”

“तू येडझव्यासारखा का वागतो आहेस?”

“हो, आपल्यातला एकजण येडझव्यासारखं वागतोय खरंच.”

“एका लहान मुलीचं गिफ्ट तू का घ्यावंस? तू मोठा माणूस आहेस. एका लहान मुलीचं गिफ्ट, तीही एक मुलींची मेणबत्ती घेऊन तुला काय मिळणार आहे?”

“एह् – कारण ती झगामगा आहे जरा.” (झगामगा – kitschy हा मूळ शब्द)

“ती झगामगा आहे?” रेच्या चेहेऱ्यावर क्रौर्य दाटलेलं आहे.

“हो, झगामगा.”

“आहा.”

स्वयंपाकघराचं काचेचं दार फुटतं, आणि ट्रेंट घरात फेकला गेलेला दिसतो. त्याच्यामागून रे आत येतो. त्याच्या चेहेऱ्यावर अत्यंत खुनशी भाव आहेत. अ‍ॅली ते बघते आणि हादरते. ट्रेंटला उचलायला लोक येतात. रे निघून जातो. परत येताना गाडीत ब्रिटनीच्या हातात ती मेणबत्ती दिसते. ‘ट्रेंट पिऊन पडला’ असं रे ब्रिटनीला सांगतो. रे अ‍ॅलीकडे जातो. इथे अ‍ॅली तिच्या भूतकाळातल्या जोडीदाराबद्दल सांगते. त्यानं तिला मारहाण केल्यामुळे तिनं ते नाते मोडलेलं असतं. “मी तुझ्यावर कधीच हात उचलणार नाही,” असं रे म्हणतो, तेव्हा “तोही तेच म्हणायचा,” असं अ‍ॅली म्हणते. त्यांचंही नातं इथे मोडतं. रेच्या चेहऱ्यावर खिन्नता. वेलॉन जेनिंग्जचे  ‘Dreaming my dreams’ वाजते.

I hope that I won't be that wrong anymore
And maybe I've learned this time
I hope that I find what I'm reaching for
The way that it is in my mind

Someday I'll get over you
I'll live to see it all through
But I'll always miss
Dreaming my dreams with you

थोडी हिंसा गरजेची आहे. अर्थात, आयुष्यातले काही अडथळे दूर करण्यासाठी हे करावं लागतं, पण त्याची किंमत ही आहे. एकटेपण, त्या हिंसेची सावली आणि काही परिणाम. ह्यानंतरचे समुपदेशनाचे प्रसंग नर्मविनोदी आहेत. रे आपली करामत समुपदेशकाला सांगतो. ते कसं चुकीचं आहे हे समुपदेशक पटवून देत असताना रे काही कल्पक डायलॉग मारतो. “हिंसा उपयोगी असते. फक्त आपल्या प्रेयसीसमोर ती करू नये, इतकंच.” त्याला आता इतर सहभागींची सहानुभूती मिळते. रे चांगली हिंसा आणि वाईट हिंसा अशा दोन व्याख्या करतो. चांगली हिंसा म्हणजे दुसरे महायुद्ध, हा त्याचा तर्क आहे.

We didn’t beat the Nazis just by talking to them. We used violence.”

क्रौर्य हा वरील दोन्ही कलाकृतींचा गाभा आहे. अर्थात GGVVमध्ये त्याबद्दल मुक्तचिंतन किंवा काहीही विचारप्रवर्तन वगैरे नाही. Mr. Inbetweenमध्ये पावलोपावली ते आहे. क्रौर्याची सीमारेषा कुठे आणि कोणी आखावी? हिंसा कितपत बरी, आणि तिच्यामागच्या प्रवृत्तीमुळे प्रत्येक हिंसक गोष्टीत फरक असतो का? ती नीती-अनीतीच्या कोणत्या बाजूला येते? GGVV ही शिवाची गोष्ट आहे. अनाथ, मारून टाकून दिलेल्या मुलाचं आयुष्य, त्याला आयुष्याबद्दल असलेली घृणा, आणि रंध्रारंध्रांत साठवून ठेवलेला राग. त्या आयुष्यात साथीदार असलेल्या माणसांवर असलेली अपार श्रद्धा-आसक्ती. तीही अतिरेकीच. अर्थात, त्याचा शेवट चांगला कसा काय होईल? सगळ्या वाईट गोष्टी वृषभवाहनाकडून नष्ट करवून घेणाऱ्या गरुडगमनाला ब्रह्म क्षमा कशी करेल? अर्थात माणसानं आखलेले न्याय आणि चौकटी Mr. Inbetweenमध्ये जितक्या स्पष्ट दिसतात, तितक्या त्या GGVVमध्ये अस्तित्वातच नाहीत. पोलिस असून नसल्यासारखे. GGVVचा सुरुवातीचाच प्रसंग पोलिसांची आणि न्यायव्यवस्थेची काय किंमत आहे हे दाखवून देतो. त्याउलट Mr. Inbetweenला समुपदेशन सहन करावं लागतं. नंतर थोडे दिवस तुरुंगातही काढावे लागतात. त्यामुळे त्याच्या मुलीला तिच्या मैत्रिणी काहीशा वाळीत टाकतात. हे रेला आवडत नाही. अर्थात, इतक्या संवेदनशीलतेची अपेक्षा आपण GGVV (किंवा कोणत्याच, भारतीय तरी) क्रौर्यप्रधान कलाकृतीत करू शकत नाही. संवेदना म्हणजे सध्याचा एक कोणताही ट्रेंडिंग विस्तव घेऊन त्यावर एक पोळी भाजून (बरेचदा, जाळून) घेणे मात्र आपल्या देशी निर्मात्यांना चांगलं जमतं. दोन्ही कलाकृतींमधल्या इतक्या टोकाच्या व्यक्तिरेखांना न्यायरहित असले तरी नैतिक उपचार मिळतात.

‘Moral compass’ला मराठीत अचूक प्रतिशब्द नाही. सदसद्विवेक हा फार ढोबळ, छापाकाटा शब्द आहे. कंपासमध्ये बरेच अंश असतात, आणि अचूक उत्तर किंवा दक्षिण दिशा नाही तरी ही दिशा कोणती, आणि आत्ता ती बरोबर दिसली तरीही ती नंतर बरोबर असेल का – इत्यादी कंगोरे हे कंपास ह्या संज्ञेमध्ये येतात. रेचा मॉरल कंपास भलताच अचूक आहे. तो इतर मारेकरूंसारखा कोपिष्ट नाही. जेव्हा अ‍ॅली त्याला सोडते तेव्हा तो तमाशे करत नाही. पण तेव्हाच मुलांवर हात उचलणारे किंवा अत्याचारी लोक दिसले की त्याच्यातला सैतान जागा होतो. त्याच्या काटक अंगयष्टीची भीती आणि दरारा दोन्ही वाटतो. ते प्रसंग अंगावर काटा आणतात. अर्थात स्कॉटबुवांनी अभिनयही तितक्याच ताकदीचा केलेला आहे. त्याच्या डोक्यावरची नस आपल्याला तडतडताना दिसते. निर्दोष आणि चांगली माणसं मृत्यू पावतात तेव्हा त्याच्या डोळ्यातले क्रुद्ध अश्रू आणि खाल्लेले दातओठ आपल्याला दिसतात. शिवाय ते पेटंट मृत्यूस्मित. ते पाहिलेले बहुतेक जण जास्त जगत नाहीत.

राजबुवांनीसुद्धा सुंदर अभिनय केलेला आहे, पण त्याचे इतके कंगोरे दिसत नाहीत. हतबलता, क्रोध आणि घृणा इतक्याच भावना शिव दाखवतो. परिणामांची पर्वाच नसल्यामुळे – आणि स्वत:च्या मानसिक स्थितीचा गुलाम असल्यामुळे शिव जे मनात आले ते करून मोकळे होतो. त्याला कोणत्याही भौतिक गोष्टींची पर्वा नसते. ऋषभ शेट्टीनं अर्थात उत्तम अभिनय केलेला आहे. एका डॉनसारखा तो मग्रूर आणि भयंकर आढ्यताखोर वागतो. ह्याला भौतिकता आवडते. गाड्या, दारू, कपडे, दागिने ह्यांचा त्याला शौक आहे. हा चित्रपट तसा वेगवान आहे. पटापट पात्रं येतात, काही जगतात, काही मरतात. सगळ्यांचा निवाडा होतोच. ह्या न्यायाची, चित्रपटातली तरी व्याख्या सुंदर आहे. ब्रह्मय्याचा शेवटचा प्रसंग अतिशय आनंददायी आहे. तशी Mr. Inbetween तीन सीझन चालली. तिच्यात बराच आनंद, मिश्किलपणा, विनोद, क्रौर्य, हिंसा आणि बरंच तत्त्वचिंतनही आहे. स्कॉटबुवांनी आपला तरी चौथा सीझन येणार नाही असं घोषित करून कधीच एक दु:खद पूर्णविराम दिलेला आहे.

स्कॉट रायन आणि राज शेट्टी, ह्या दोन टक्कलवंतांच्या डोक्यांत दोन गोष्टी आल्या. ते दोघेही, त्यातल्या मुख्य पात्रांसारखे ‘करून मोकळे’ झाले. त्यांना आणि त्यांतल्या नायकांना बऱ्याच गोष्टी कळत नसल्या तरी काही गोष्टी फारच स्पष्ट आहेत, आणि त्याबाबत त्यांचं तर्कशास्त्र घडीव आहे. हल्लीच्या काळात तरी हे ठसठशीत विचार बरेच उठून दिसण्यासारखे, आकर्षक आहेत. ह्या दोन टोकाच्या, पण तरीही बरीच साम्यस्थळं असलेल्या कलाकृती मला फार भावल्या. ह्यात चवीपुरता रसिकानुनय आहे, पण तरीही ह्या बऱ्याच ‘मुक्त’ आहेत. ह्यांची प्रवचनं होत नाहीत. हे पाहणाऱ्या व्यक्ती ह्यांच्यातून प्रेरणा घेऊन असल्या गोष्टी करतील ह्याची काहीही शक्यता नाही. पाणचट विनोद, स्वस्त सवंग गाणी, टाळ्याखेचू डायलॉग, showmanship या गोष्टी दोन्हीमध्ये नाहीत. गाणी अफाट आहेत, त्यांच्या निवडी जबरदस्त आहेत. सगळ्यांचे अभिनय अत्यंत नैसर्गिक आणि सहज वाटतात. ह्या दोन कलाकृती प्रेक्षणीय, श्रवणीय आणि म्हणूनच संग्राह्य नक्कीच ठरतात.