बुंदीचे रंगीत लाडू, की रंगीत बुंदीचे लाडू? : एक 'खेडवळ' पाककृती
आमची ताईआजी तिच्या मेकपच्या डब्यावर तिचा एक दुमडणारा आरसा ठेवून, उन्हाकडे तोंड करून, सकाळी सकाळीच तिच्या खोलीत बसायची, तेव्हा तिला एखाद्या लग्नाचं आमंत्रण आलेलं आहे हे आम्ही सगळे ओळखायचो. कारण एरवी ती दहा अकरापर्यंत परसातल्या झाडांची मशागत करत असायची. किंवा पोरांच्या अंघोळीची लाईन लावून चुलीवरच्या पातेल्यात पाणी तापवून सगळ्यांना न्याय्य पद्धतीनं ते वाटत असायची. या कामांकडे दुर्लक्ष करून जर ती आपणच अंघोळ करून आरशासमोर बसली असेल, तर तिच्या नातवंडांपैकी सगळ्यात चाणाक्ष दोघं-तिघं पुढच्या तयारीला लागायचे (त्यात अर्थातच मी असायचे. कधीकधी मी एकटीच असायचे).
ताईआजीला काही 'स्किनकेअर' रूटीन नव्हतं. मी पावडरही कशी लावत नाही हे ती तिच्या फेअर अँड लव्हली चोपडणाऱ्या नातींना पुन्हा पुन्हा सांगायची. तिचा मेकप म्हणजे तिचं कुंकू. एक छोटीशी पितळेची डबी होती, हल्ली लिप बाम भरून विकतात तशी, पण त्याहीपेक्षा लहान. त्या डबीत केवळ तर्जनी जाऊ शकेल इतकी जागा असायची. ती मेणाची डबी. हे मेण 'ऑरगॅनिक', 'सिंगल ओरिजिन' असायचं कारण गावातल्या कोणत्या तरी झाडावरचं पोळं काढल्याची गॉसिप सगळ्यात आधी माझ्या आजीलाच मिळायची. ती तातडीने जाऊन तिथून मेण घेऊन यायची. दोन भुवयांच्या मधोमध पण जरासं वरच्या बाजूला एक मेणाचं वर्तुळ काढलं जायचं. हे वर्तुळ साधारण रफ असायचं. पण कुंकवाच्या अपेक्षित व्यासापेक्षा थोड्या अधिक व्यासाचं. त्या वर्तुळावर मग एका कोयरीतून चिमटीनं कुंकू लावलं जायचं. ते आधी नाकावर सांडायचं. मेणाच्या वर्तुळावर एखादा डोसा पसरत जावं तशी ती कुंकू पसरत जायची. आणि मग, ते वर्तुळ कागदावर काढलं तर त्याला जिथे जिथे स्पर्शिका भिडतील तिथे तिथे ती सरळ रेषेत पुसत जायची आणि एक सुबक गोल तयार करायची. तो सोहळा बघताना मला माझंही लग्न व्हावं म्हणजे मलाही असं कुंकू लावता येईल असं अनेकदा वाटलं होतं (पण कुंकवासाठी लग्न हा किती भयाण सौदा आहे याची योग्य वयात जाणीव झाली हे एक नशीब).
हे करत असताना लग्नाच्या साडीवरचं पोलकं घातलेलं असायचं पण साडी मात्र घरातली. त्यावरूनच लग्नाला जायचं आहे हे आम्ही ओळखायचो.पोलक्याची साडी आणि त्यावर कोल्हापुरी साज घालून, पाकिटात पैसे भरून आजी निघायची. तिच्या रस्त्यात जे नातवंडं उपलब्ध असेल त्याला बखोटीला मारून ती वाटेला लागायची. मी आणि माझी मामेबहीण आधीच जरा बरे कपडे घालून तिच्या वाटेत घुटमळायचो.
खेडेगावातली लग्नं आणि शहरातली लग्न यावर एक प्रबंध लिहिता येईल. पण खेडेगावातल्या लग्नाची ऐट वेगळीच. ज्यांच्याकडे लग्न आहे त्यांच्या शेतात मोठमोठाल्या पातेल्यांतून लग्नाचं जेवण केलं जायचं. 'किती रुपये ताट?' हा स्टेटस कॉन्शस प्रश्न कधी कुणी खेडेगावात विचारल्याचं आठवत नाही. एकदा पुण्यात आम्ही एका अतिअतिश्रीमंत लग्नाला गेलो होतो. तिथल्या अनेक गोड पदार्थांमध्ये 'अक्रोड हलवा' होता. या पदार्थाचा जन्म कसा झाला असेल असा खूप विचार केल्यावर माझ्या डोळ्यासमोर यजमानीणीनं गुलटेकडीतल्या एखाद्या सुक्या मेव्याच्या दुकानात जाऊन, 'इथे सगळ्यात महाग काय आहे?' हा प्रश्न विचारला असावा असं चित्र उभं राहिलं. अक्रोड हलवा ठीक होता पण तिथे मूगडाळ हलवा (सो काटेगॉरिकली मिडल क्लास!), किंवा अननसाचा शिरा (का? का करतात हा पदार्थ? माझ्याही लग्नातल्या एका कार्यक्रमांत अनवधानानं त्यावर खूण केली गेली होती म्हणून खावा लागला) किंवा जिलबी (हाऊ कनिष्ठ मध्यमवर्गीय!) किंवा उकडीचा मोदक (श्रीमंत, पण व्यवस्थापन नाईटमेअर) असं काहीही चाललं असतं. मला अशा लग्नांमध्ये नेहमी खेड्यातली मोकळी बुंदी आठवते. आम्ही पोरं खरंतर ती मोकळी, रंगीबेरंगी बुंदी खायला म्हणूनच लग्नांना जायचो.
लग्न शेतात असेल तर मांडव घातलेला असायचा. मांडवाखाली समोरासमोर सतरंज्यांच्या पट्ट्या टाकलेल्या असायच्या. आजीच्या दोन्ही बाजूला एक-एक अशा आम्ही गंगा-गौरी बसायचो. आणि मग वाढपी त्यांचं मॅरेथॉन वाटप सुरु करायचे. वाढपी म्हणजे तरी कोण? मुलीच्या भावाचे मित्र किंवा मुलाचे मित्र. आधी कुणीतरी पत्रावळी आणि द्रोण ठेवून जायचं. मग पाठोपाठ यायची ‘शाक भाजी’. वांगं, बटाटा आणि काळे वाटाणे घातलेली ही झणझणीत भाजी खाऊन कानातून धूर निघेल की काय अशी भीती वाटायची. त्यानंतर तशीच तर्रीबाज तिखट लसणाची आमटी वाढली जायची. आणि मग, हवामान बदल झाल्यामुळे जसे हिमनगांचे तुकडे कुठे कुठे तरंगताना दिसतात तशी बारीक तांदळाच्या भाताची ढेकळं यायची. शेवटी पत्रावळीच्या मधोमध आम्ही ज्यासाठी म्हणून लग्नाला जायचो ती रंगीत बुंदी वाढली जायची. इतर पदार्थांचा तिखटपणा बघता, ती चैन नसून आमची गरज होती हे लवकरच लक्षात यायचं. पण लहान मुलांना तिखट लागेल वगैरे विचार बहुतेक त्या काळी अस्तित्वातच नव्हते. (आमचा पोरगा चांगला तीन वर्षांचा होईपर्यंत लग्नाला जाताना त्याचा वरण-भात-पोळी-भाजी असा डबा घरून न्यावा लागल्यानं आपण जेंटल पेरेंट आहोत असा समज मी करून घेतला आहे). आता कितीही प्रयत्न केले तरी त्या चवीची भाजी आणि आमटी करता येत नाही. ती त्या महाकाय अल्युमिनमच्या भांड्यांची जादू.
जेवण झाल्यावर ताईआजीबरोबर नवरा-नवरींना बंद पाकीट किंवा टॉवेल-टोपी (किंवा दोन्ही) असं देण्यासाठी म्हणून तिष्ठत उभं राहायला लागायचं. मग खूप ताटकळल्यावर नाकावर ओघळणारी कागदी बाशिंगं, त्या खाली फुलांच्या मुंडावळ्या, त्या खाली किलोभर हळद-कुंकू अशा सगळ्या रूढी परंपरांमुळे आंधळी कोशिंबीर खेळायला तयार असावेत असे वधुवर दिसायचे. लग्नातली सर्वात दुःखी-कष्टी माणसं वधुवर असतात याबद्दल माझी तेव्हापासूनच खात्री झाली होती. पण आमचा नंबर आल्यावर वरमाई किंवा वधूमाई आमच्याप्रती वाटलेल्या वात्सल्यामुळे आम्हाला पत्रावळीच्या पुडीत अजून थोडी बुंदी बांधून द्यायची.

तर आता पुरेसं भूतकाळातलं स्मरणरंजन करून झालं असल्यानं आपण वर्तमानकाळात येऊ. आमच्याकडे पोळ्या करायला येणाऱ्या मंगलमावशी दरवर्षी मला गौरी जेवायला बोलावतात. आमंत्रण अनेक सूचना देत देत दिलं जातं (घरी स्वयंपाकच करायचा नाही. तिघंबी या. डाएट करायचं नाही). त्यामुळे शक्य असेल तेव्हा किमान मी आणि माझा मुलगा तरी त्यांच्याकडे जेवायला जातो. पण यावर्षी ते जमलं नाही म्हणून त्यांनी विक्रमसाठी एक मोठा फराळाचा डबा आणला. त्यात अनारसे, करंज्या वगैरे गोष्टींबरोबर बुंदीचे रंगीत लाडू होते. तो लाडू हातावर घेऊन, निरखून बघत मला पोरानं विचारलं, "आई, तुला नाही का जमत असा लाडू करायला?" (हा प्रश्न तो वडिलांनाही विचारू शकत होता. त्याच्या वडिलांना असे बुंदीचे लाडू कर अशी विनंती केली असती तर त्यांनी आधी एक एक्सेल शीट मांडून तीनेक महिन्यांत नक्की मी केले त्यापेक्षा अधिक चांगले लाडू करून दाखवले असते. पण दुनिया पुरुषसत्तेची मारी असल्यानं असा लाडू तुला का जमत नाही हा प्रश्न पोरानं मलाच विचारला).
आता मुलाच्या आहाराच्या बाबतीत मी जरा कमी, कुमठेकरांची पतुकाकूच आहे. त्याला एखादी गोष्ट खावीशी वाटली की माझ्या शरीरात मातृत्वाची सगळी संप्रेरकं तयार होऊ लागतात. त्याच्या ताटात, थेट तव्यावरून आलेल्या, स्वहस्ते लाटलेल्या आणि भाजलेल्या खुसखुशीत तूप लावलेल्या पोळ्या वाढायचं महापातकही मी अनेकदा केलं आहे. एकदा त्याला मार्शमॅलो म्हणजे काय हे माहिती नसल्याचं दुःख होऊन मी त्याला दोराबजीतून मार्शमॅलोही आणून दिले होते. थंडीतल्या लाल गाजरांचा हलवा, रव्या-खोबऱ्याचे पाकातले लाडू, उकडीचे मोदक वगैरे वगैरे सगळे पदार्थ आंधळ्या मायेने मी त्याला खाऊ घातले आहेत. त्यामुळे, आता लोकांचा रोष पत्करून आपल्या मुलाला हा रंगीत लाडू करून द्यावा लागणार हे माझ्या लक्षात आलं.
लाडू करायची गरज अजिबात नव्हती हे मला माहिती आहे. पण शहरांत राहणारे आणि श्रीमंत लोक या रंगीत लाडवांना काहीसं तुच्छ लेखतात हे लहानपणीच माझ्या लक्षात आलं होतं. मोकळी, रंगीबेरंगी बुंदी मोठ्या माणसांसाठी 'नॉट कूल' हे कळल्यावर मला त्यावेळीही थोडं वाईट वाटलं होतं. म्हणून आम्ही मंगलमावशींकडे नेतेपद देऊन ते लाडू करायचं ठरवलं.
तर लागणारं साहित्य :
१ मोठी कढई (बरीच मोठी. म्हणजे तुमची जी काही अपेक्षा असेल त्याला दोन ने गुणा)
१ किलो रिफाईंड तेल (सूर्यफूल तेल उत्तम. त्याला वास नसतो) मी मावशींना माझ्या पुस्तकी ज्ञानावर तूप वापरूया का असं विचारून बघितलं. पण त्या लगेच नाक मुरडून म्हणाल्या, "तेलच वापरायचं". (त्या आमच्या नेत्या असल्याने आम्ही मान डोलावली.)
१ किलो बेसन
लाल, हिरवा आणि पिवळा असे मान्यताप्राप्त खाद्यरंग.
पाणी
३ लहान भांडी.
कड असलेला मोठा झारा (हा आम्ही शेजाऱ्यांकडून उसना मागून आणला)
तळलेली बुंदी साठवायला एक मोठं पातेलं (हेही मागून आणलं.)
जितकं बेसन तितकी साखर (तेवढंच पाणी) : पाकासाठी
मावशी दुपारी घरी येण्याआधी मी माझा इलेक्ट्रिक बीटर घेऊन तयार होते. बेसन एकसारखं मिसळता यावं म्हणून. पण त्यांनी आल्या आल्या माझं विद्युत उपकरण नाकारून हात धुतले. आम्हालाही धुवायला लावले. आणि मग तीन भांड्यांत बेसनाचे तीन भाग केले. त्यात तीन वेगवेगळे रंग घातले, आणि "तुमच्या पावन्यांना भडक नाय आवडणार", असं म्हणून शेड अड्जस्ट केली. त्यात आम्ही तिघे म्हणजे मी, विक्रम आणि मावशी यांनी पाणी घालून एक एक भांडं वाटून घेतलं आणि हाताने फेटायला सुरुवात केली. आम्ही आमच्या नेत्यांकडे बघूनच सगळं करत असल्यानं सगळं एकदम एकसारखं झालं.
तोपर्यंत तेल चांगलं तापलं होतं. त्यात आधी एक थेंब टाकून तो त्वेषाने वर येतो का हे बघून घ्यायचं असतं. तेही केलं.
मग मावशींनी झारा धरला आणि आमच्या पोराने रंगीत बेसन ओतायला सुरुवात केली. लाल, पिवळ्या आणि हिरव्या बुंदी तयार झाल्या. एकीकडे पाक उकळत होता. तो एकतारी असायला हवा. तरच लाडू मऊ होतात. दोन किंवा तीन तारी झाला तर अडकित्ता किंवा खलबत्ता वापरावा लागतो. पण कडक बुंदीचे लागू हा एक वेगळा विषय आहे.
तर आम्ही पाक एकतारी होण्याची वाट बघत होतो. तेव्हा मावशी म्हणाल्या, यात आता लिंबू पिळायचं. मी चालूपणाने त्यांना "का" असं विचारलं. तर त्या म्हणाल्या की नाहीतर कधीकधी लाडवांवर पुन्हा साखर तयार होते. यालाच अनुभवातून आलेलं ज्ञान म्हणतात. लिंबू पिळून आपण पाकाला इन्व्हर्टेड (म्हणजे सुक्रोज चे फ्रकटोज आणि ग्लुकोज होते अशा स्थितीत) ठेवतो. लिंबामधलं आम्ल ते काम करतं. नाहीतर त्याचं थंड झाल्यावर पुन्हा सुक्रोज होऊ शकतं. पण मावशी आमच्या नेत्या होत्या म्हणून मी ही अक्कल त्यांना न शिकवता पाकात लिंबू पिळलं. हवी असल्यास पाकात वेलची पूड घालावी. (आम्ही घातली.)
पाक एक तारी झाल्यावर आम्ही तो बुंदी ठेवलेल्या पातेल्यात ओतला आणि छान मिसळून घेतला. बुंदी गार झाल्यावर विक्रम आणि त्याच्या बाबांनी लाडू वळले (ज्यांतले काही मोडून मी पुन्हा माझ्या पद्धतीनं वळले कारण माझ्या हाताचा आकारच स्टॅंडर्ड आहे). चांगले डबाभरून लाडू झाले. आणि आम्ही ते सगळ्यांना यथेछ वाटले. आमच्याकडून गेलेल्या फराळाच्या पाकिटात एकच लाडू होता त्यामुळे दोन भावांत भांडणं होत आहेत असं कळल्यावर आम्ही त्यांना ताबडतोब चार लाडू पाठवून दिले.
पुन्हा मी घरी बुंदीचे लाडू करीन का? असा प्रश्न जर कुणी मला विचारला (तो कुणीही विचारणार नाही याची मला खात्री आहे) तर मी हो असं उत्तर देईन. कारण ही बुंदी पाडली नसती तर मला हा लेख पाडता आला नसता (शेवटी सृजनशीलतेला अनुभवाची जोड हवीच!). पुढच्या वेळी मी लाडू न करताही लेख पाडू शकते. पण दोनवेळा एकच पाककृती कोण वाचेल? तरीही त्या लाडवांच्या रंगीतपणासाठी, आणि लहान मुलांच्या डोळ्यांत असे रंगीत लाडू बघून जी काही चमक येते ती पुन्हा बघण्यासाठी नक्कीच करणार. आणि रंगीत मोकळी बुंदी पंचतारांकित हॉटेलांमध्ये का असू नये? समजा, सयाजीच्या (खरंतर या हॉटेलचे नावच मोकळ्या बुंदीला साजेसं आहे) एखाद्या लग्नात गोडाच्या टेबलावर एका सुंदर चांदीच्या भांड्यात अशी रंगीत मोकळी, गरम बुंदी आणि शेजारी व्हॅनिला आईस्क्रीम ठेवलं (लोक हल्ली शेणाबरोबरही व्हॅनिला आईस्क्रीम खातात म्हणून), तर लोक का खाणार नाहीत? असा प्रयोग कुणीतरी करून बघायला हवा. पदार्थ अतिशय स्वस्तात होतो आणि उत्तम लागतो. शिवाय लहान मुलांसाठी आकर्षण ठरतो हे मी प्रयोगानं आणि अनुभवानं सिद्ध करून दाखवलं आहे. शेवटी आपला अनुभवच खरा!
वर्गीकरण करण्याची ज्याची…
वर्गीकरण करण्याची ज्याची त्याची वेगळी पद्धत असते.
आमच्याकडे पाककृती यादी एक्सेल शीटमध्ये आहे. कुठे काही पाककृती आवडीची सापडली की वहीत लिहून ठेवली जाते. वही क्रमांक पान क्रमांक दिला जातो. आता यांचे वर्गीकरण एका एक्सेल शिटात केले आहे.
कणकेचे प्रकार (पोळ्या, पुऱ्या ,नान वगैरे)
भाताचे प्रकार (गोड भात, फोडणीचा भात, पुलाव वगैरे)
नाश्त्याचे खारे तिखट प्रकार( शंकरपाळे, समोसे, भजी वगैरे)
मिठाई ( दुधाचे प्रकार)
केक बिस्किटे( अवनमधले प्रकार)
भाज्या ( पंजाबी, गुजराथी, वगैरे)
पेये ( सरबते वगैरे)
लोणची पापड वगैरे
शेफच्या नावाप्रमाणे
यादीतले कॉलम
प्रकार lनाव lशेफ lवही lपानlमेमरी कार्ड नंबर
शोधायला सोपे पडते. कोणताही कॉलम sort करून पाककृती शोधता येते.
नोटपॅड/वर्ड डॉक/गूगल डॉक किंवा वहीत लेखी कसेही लिहिलेले असो शेवटी यादी एक्सेल मध्ये करायची.
.
जेव्हा पाक उकळू लागतो तेव्हा तो तर्जनीच्या आणि अंगठ्याच्या मध्ये एक थेंब ठेवून ती दोन्ही बोटं जुळवून पुन्हा उघडून बघतात. तसं केल्यावर जेव्हा एकच तार येते तेव्हा तो एक तारी. दोन येतात तेव्हा दोन. तीनपेक्षा जास्त येत नाहीत.
दोन तारी पाक थोड्याशा खडक गोष्टी करायला वापरतात. आणि तीन तारी साखरेच्या गोळ्या वगैरे करायला. (Candies).
ही घरगुती पद्धत आहे. पण तापमान मोजूनही हे करता येतं. ती तापमानं मी आता विसरले.
भेंडीची तार
भेंडीची भाजी करताना जर मुबलक तेल वापरलं आणि विस्तव जास्त ठेवला तर लिंबू किंवा चिंच घालावी लागत नाही. भेंडीची तार खरंतर अंगच्या पाण्यात बुळबुळीतपणा मिसळल्याने येते. त्यामुळे भाजी कदापि झाकायची नाही. मग तेल आणि विस्तव ती तार कमी करायला सक्षम असतात.
पण तुम्ही पडला पेठेतले. त्यामुळे तुमच्याकडे तेल चहाच्या चमच्याने मोजून घालत असतील. आणि गॅस दिवसातून किती वेळ वापरायचा याचं वेळापत्रक ओट्यासमोर लावून ठेवत असतील. म्हणून अशी चिंच फिंच लागते.
माझा एक ग्रीक मित्र होता. त्यांच्याकडे भेंडीच्या तारेसकट एक स्टू करत असत.म्हणजे आधीच भेंडी आणि त्यात वरून पाणी! आणि थोडा जास्त चॅलेंज म्हणून फ्रेंच किंवा कुणी त्याच एरियातले लोक भेंडीत गोगलगाय घालतात. लुईजियानामध्ये गंबो नावाचं एक सूप/स्टू असतं त्यातही भेंडी असते. आणि त्याआधी पीठ भरपूर भाजून रु तयार करतात. त्यामुळे ती भेंडी सुसह्य होते.
चालायचेच. कुणाला शम्मी कपूर कुणाला गोगलगाय भेंडी.
!!!
पण तुम्ही पडला पेठेतले. त्यामुळे तुमच्याकडे तेल चहाच्या चमच्याने मोजून घालत असतील. आणि गॅस दिवसातून किती वेळ वापरायचा याचं वेळापत्रक ओट्यासमोर लावून ठेवत असतील.
अहो, अहो, अहो! पेठेतला जरी पडलो, तरी देशस्थाचे रक्त आहे हो! काय वाटेल ते आरोप सहन करणार नाही.
चिकूपणा, नि आमच्यात? (नि तोसुद्धा, ऑफऑलदथिंग्ज़, तेलात???) आमच्यात बोले तो, सढळ हस्त! (तवंग दिसल्याशिवाय डोळ्यांना समाधान व्हायचे नाही. मग हार्टचे काय वाटेल ते भजे होवो, वा तेल लावीत जावो!)
मुळात तेल नि तिखट (फॉर्दॅट्मॅटर, कोठलीही गोष्ट. परंतु, या दोन गोष्टी विशेषेकरून.) या काय हातचे राखून वापरण्याच्या गोष्टी आहेत? उगाच काहीतरी आपले! बोलायचे म्हणून बोलायचे!
आणि, आमच्यातल्या कोणीही आयुष्यात कशाचेही वेळापत्रक ज्या दिवशी (१) बनविले, आणि/किंवा (२) पाळले, त्या दिवशी तो एकटा मनुष्यच नव्हे, तर आमची आख्खी जात मेली, म्हणून खुशाल समजा!
उगाच काय पण सकाळीसकाळी बोलून राहिल्यात! चालायचेच.
आणि थोडा जास्त चॅलेंज म्हणून फ्रेंच किंवा कुणी त्याच एरियातले लोक भेंडीत गोगलगाय घालतात.
हम्म्म्म्… गोगलगाय खाल्लेली आहे. चांगली लागते. (फॉर्दॅट्मॅटर, भेंडीसुद्धा खाल्लेली आहे. तीसुद्धा वाईट लागत नाही.) मात्र, या दोघांचे काँबिनेशन कसे लागेल, याची कल्पना करण्यास असमर्थ आहे. (देशस्थ म्हणून व्याख्येनेच ‘कशातही काहीही घालून खाणारा’ जरी असलो, तरीही.)
लुईजियानामध्ये गंबो नावाचं एक सूप/स्टू असतं त्यातही भेंडी असते.
खाल्लेले आहे. एकदा न्यू ऑर्लीन्सात एका बऱ्यापैकी (पक्षी: महागड्या) रेष्टॉरंटात खाल्ले होते, तेव्हा चांगले लागले होते. इतरत्रही (अटलांटात वगैरे) खाल्लेले आहे; मात्र, लुईज़ियानाबाहेरील व्यक्तीने हे बनविण्याच्या वाटेस जाऊ नये. अन्यथा, अत्यंत कॅरेक्टरलेस असे मिश्रण बनते, नि मग ‘भेंडी जाते जिवानिशी’ म्हणण्याची वेळ येते.
कुणाला शम्मी कपूर कुणाला गोगलगाय भेंडी.
तुम्हाला शम्मी कपूरच लखलाभ होवो.
भेंडीची भाजी करताना जर मुबलक तेल वापरलं आणि विस्तव जास्त ठेवला तर लिंबू किंवा चिंच घालावी लागत नाही.
म्हणून अशी चिंच फिंच लागते.
बादवे, एफवायआय. तुम्हाला आवडत नसेलही कदाचित. परंतु, भेंडीची चिंचगुळाची भाजी इज़ ऑल्सो अ थिंग, यू नो. तीसुद्धा (माहीत नसेल, तर) चांगली लागू शकते.
परंतु, कसे आहे, की, काहींना चिंचेची चव नसते, तर काहींना गुळाची. It takes all sorts to make a world, त्याला काय करणार? चालायचेच.
एकतारी पाक, वगैरे…
(१) एक तारी पाक म्हणजे काय?
एकतारी बोले तो टाँय् टाँय् वाजणारे एक वाद्य असते. पाक बोले तो पाकिस्तानी.
बंगालात बाऊल नावाची एक जमात असते. ती एकतारीवर टाँय् टाँय् वाजवीत गाणी, भजने वगैरे म्हणत हिंडते. यांच्यात हिंदू असतात, तसेच सूफ़ी (मुसलमान) असतात. पश्चिम तथा पूर्व बंगाल (आजचा बांग्लादेश) दोन्हींकडे हे आढळतात.
पूर्व बंगाल बोले तो पूर्वीचा पूर्व पाकिस्तान. म्हणजे, पूर्व बंगालातील बाऊल हे पूर्वाश्रमीचे पाकिस्तानी. एकतारीवर टाँय् टाँय् वाजवीत हिंडणारे पाकिस्तानी, म्हणून ‘एकतारी पाक’ असे नाव त्यांना (१९४७च्या फाळणीनंतर) पडले. मात्र, पुढे १९७१ला दुसरी फाळणी होऊन तो भाग पाकिस्तानात जरी राहिला नाही (आणि, त्यामुळे, तत्त्वतः हे लोक ‘पाक’ जरी राहिले नाहीत), तरीसुद्धा, त्यांना एकदा जे नाव पडून गेले, ते पडून गेले.
(२) पाक जास्तीत जास्त किती तारी करता येतो?
पाकिस्तानात तारखाते अद्याप कार्यरत आहे, किंवा कसे, याबद्दल कल्पना नाही. (भारतातले माझ्या कल्पनेप्रमाणे काही वर्षांपूर्वी कायमचे बंद झाले. (चूभूद्याघ्या.))
मात्र, पाकिस्तानातले तारखाते अद्याप जर कार्यरत असलेच, तर तेथील नागरिकांना जास्तीत जास्त कितीदा तार करता यावी, यावर काही मर्यादा असण्याचे कारण निदान वरकरणी तरी दिसत नाही. ते बहुधा प्रत्येक पाकिस्तानी नागरिकाच्या वैयक्तिक ऐपतीवर अवलंबून असावे. (अर्थात, हे झाले खुल्या बाजारात. मात्र, पाकिस्तानात सदैव आणीबाणीचीच परिस्थिती असल्याकारणाने, तेथे तार-राशनिंग होत असल्यास कल्पना नाही. कदाचित, लष्करी अधिकाऱ्यांस असे काही बंधन नसू शकेल, परंतु, सामान्य नागरिकांच्या तारक्षमतेवर मर्यादा असू शकतील. (पुन्हा, चूभूद्याघ्या.))
(अर्थात, पाकिस्तानातलेही तारखाते जर भारतातल्याप्रमाणेच कायमस्वरूपी बंद झालेले असेल, तर मात्र पाक एकही तारी करता येणार नाही, हे तर्कास धरून असावे.)
असो चालायचेच.
(अतिअवांतर: ‘तार ताणणे’ या वाक्प्रचाराच्या अर्थाची प्रचीती आली, किंवा कसे? कृपया अभिप्राय अवश्य कळवावा. ग्राहकांचा संतोष (किंवा, क्वचित संतापसुद्धा) हेच आमचे समाधान.)
.
छान पाककृती.
पुढच्या वेळेस, बुंदीच्या ब्लॅक-अँड-व्हाइट लाडवांची (की ब्लॅक-अँड-व्हाइट बुंदीच्या लाडवांची?) नागरी पाककृती अवश्य टाकावी.
प्रश्न:
१. बुंदी घरात पाडीत बसण्याऐवजी, ‘हल्दीराम’ची (अथवा, तेवढाच मराठी बाणा असल्यास, ‘चितळ्यां’ची) खारी (अथवा मसाला) बुंदी कच्चा माल म्हणून वापरता येईल काय?
१अ. (धुवून घेतली तर?)
२. बुंदीचा बुंदेलखंडाशी काही संबंध असावा काय? (कदाचित, भौगोलिक उद्गम, वगैरे?)
३. ‘लालबुंद होणे’ या वाक्प्रचारातील ‘बुंद’चा (खाऱ्या अथवा मसाला) बुंदीच्या लाल रंगाशी काही संबंध असावा काय?
(तूर्तास इतकेच.)
मोतीचूर
नागरी बुंदी म्हणजे मोतीचूर. बेसनच भिजवून बारक्या चाळणीतून गाळायचं आणि त्याला मोतीचूर म्हणायचं. आणि sieve size थोडा जास्त वापरला आणि रंग घातले म्हणून नाकं मुरडायची!
"आमच्याकडे कसं सगळं सोबर कलरमध्ये असतं" असं सांगणाऱ्या बायका बघितल्या की माझा संताप होतो. मुळात सोबर हा शब्द मराठीत कुठून आला आहे? आणि हे सोबर्य म्हणजे नक्की काय?
३० हज्जार रुपये टिकवून म्हशीने नुकत्यात टाकलेल्या शेणाच्या रंगाची पैठणी विकत घेणे म्हणजे सोबर्य काय? जर मी तीस हजार खर्च करणार असेन तर मी गुलबक्षी पैठणी घेणार. आणि सोबर काकूंसमोर ती नेसून सिंगल मॉल्ट पिणार.
.
म्हणजे संपूर्ण शेवाळी नाही. पैठणी फिरत्या रंगाची असते. त्यामुळे शेवाळी आणि त्याची काळपट शेड साडीवर आलटून पालटून दिसते. तशीच ती शेणात दिसते. एखाद्या ठिकाणी शेवाळी आणि एखाद्या ठिकाणी गडद शेवाळी.
पण ताजं शेणच असं दोन रंगी असतं. एकदा ते वाळलं की ते फिकट शेवाळी होतं.
माझा शेणाचा अभ्यास आहे कारण दिवाळीत आम्हाला आमची मामी रांगोळीखाली म्हणून सारवायला शेण आणायला लावायची. आणि आम्ही सारवून दिलेल्या शेणावर ऐन वेळी येऊन रांगोळी काढून एखाद्या कार्पोरेट कंपनीतल्या मॅनेजरसारखी क्रेडिट घेऊन जायची.
शेणावरून आठवले (अवांतर)
नाही म्हणजे, तुमचा जर शेणाचा इतका अभ्यास असेल, तर तुम्हाला कदाचित ठाऊक असेल, म्हणून विचारतो.
Cowdung आणि bullshit यांत (लिंगभेद वगळता) क्वालिटेटिव फरक तो काय? नाही म्हणजे, पैकी पहिल्या गोष्टीस पावित्र्य, तर दुसऱ्या गोष्टीस हेटाळणी, हा भेदभाव नक्की कशाच्या आधारावर केला जात असावा?
(एखादा पो पाहिला असता, हे नक्की cowdung आहे, की bullshit, याचे निदान (कदाचित अनुभवाने) करता येऊ शकावे काय? कदाचित निरीक्षणाने? किंवा कदाचित, एखाद्या लॅबमध्ये पाठवून पृथक्करणाने?)
…
३० हज्जार रुपये टिकवून म्हशीने नुकत्यात टाकलेल्या शेणाच्या रंगाची पैठणी विकत घेणे म्हणजे सोबर्य काय?
सर्वप्रथम, उपमेकरिता दाद.
खरे तर, सोबर हा शब्द मराठीत कोठून आला, या तुमच्या प्रश्नाचे उत्तर या प्रतिमेत (कुमठेकरांची पतुकाकू नव्हे!) दडलेले आहे.
बोले तो, गोबर आणि सोबर यांचे यमक हा निव्वळ योगायोग खासा नसावा. परंतु, इंग्रजीत sow बोले तो डुकरीण. तिच्या (शेणाच्यासुद्धा) उल्लेखाने कोणाच्या (उदा., यहुद्यांच्या. आजकाल यांच्या धर्मभावना फारच तरल झालेल्या आहेत. संबंध असो वा नसो, कशावरूनही antisemitism म्हणून बोंबलत अंगावर येतात. असो.) धर्मभावना दुखावू नयेत, म्हणून त्याऐवजी म्हशीचे शेण वापरायचे, इतकेच.
(परंतु, शेण टाकण्याकरितासुद्धा म्हशीसमोर आजकाल तीस हजार रुपये का बरे टिकवावे लागत असावेत? इन्फ्लेशन इतके वाढले आहे काय हल्ली?)
जर मी तीस हजार खर्च करणार असेन तर मी गुलबक्षी पैठणी घेणार. आणि सोबर काकूंसमोर ती नेसून सिंगल मॉल्ट पिणार.
मुळात सिंगल माल्ट (सोबर काकूंसमोर, सोबर काकूंशिवाय, वा अन्यत्र) पिण्याकरिता गुलबक्षी पैठणी (किंवा, फॉर्दॅट्मॅटर, काहीही) का बरे नेसावी लागते?
ऐसी च्या नुसत्या प्रतिसाद वाचनमात्रे
ऐसी च्या नुसत्या प्रतिसाद वाचनमात्रे किती ती माहितीप्राप्ती होते. मी किती समृद्ध झालो कालपेक्षा आज
मी हे नवीन शिकलो.
1 पैठणी शेण रंगी पण असते तसेच गुलबक्षी असे सुंदर नाव असलेली सुद्धा असते.
2 गोगलगाय ही एक खाण्याचा त्याहून मोठे स्वादिष्ट प्रकार ही असतो.
3 काही लोकांचे गळे इतके शक्तिशाली असतात की अशा निळकंठाच्या गळ्याखाली भेंडी गोगलगाय मिक्स सरकू शकते.
आज धन्य झालो मी ऐसी चा प्रतिसाद वाचून उन्नत झालो प्रगत झालो मी असाच ऐसी वाचत राहणार
Thank you Aisi
गोगलगाय
2 गोगलगाय ही एक खाण्याचा त्याहून मोठे स्वादिष्ट प्रकार ही असतो.
फ्रान्समध्ये (एका विशिष्ट जातीची) गोगलगाय (त्यांच्यात या प्रकारास एस्कार्गो escargot म्हणतात.) ही delicacy वगैरे मानली जाते, याची तुम्हाला (किमान ऐकूनसुद्धा) कल्पना नव्हती? आश्चर्य आहे.
म्हणजे, समजा जर कधी तुम्ही पॅरिसला टूरिष्ट म्हणून गेलात, आणि आयफेल टॉवर बघितला नाहीत, तर एक वेळ तुम्हाला क्षमा होऊ शकेल. (मी स्वतः तेथपर्यंत जाऊन, तेथे वर चढण्याकरिता लागलेली प्रचंड रांग पाहून, त्या रांगेचे तिकीट वगैरे काढण्याच्या फंदात न पडता खालूनच दर्शन घेऊन खालच्याखाली काढता पाय घेतलेला आहे. म्हणजे, तितक्या उंचावरून पॅरिसचे विहंगमदृश्य पाहणे हाच जर उद्देश असेल, तर जवळपासच्या भागांत त्याकरिता अनेक चांगले पर्याय आहेत, आणि त्यासाठी त्या इतर ठिकाणी इतकी भलीमोठी रांगसुद्धा लावावी लागत नाही. त्यामुळे, ‘आयफेल टॉवर पाहिला’ एवढा ठप्पा लावण्यापुरते आयफेल टॉवरला जावे, पुरावा म्हणून आयफेल टॉवरचा (फुकटात) एकदा समोरून फोटो काढावा, झालेच तर एखाद्या सुंदर तरुणीच्या स्कर्टाखाली उभे राहिल्यासारखे आयफेल टॉवरच्या खाली उभे राहून वर पाहावे, दर्शन घ्यावे, नमस्कार करावा, हवे तर फोटोही घ्यावा (ऑल्दो, त्या अँगलमधून फोटो घेण्यासारखे काहीही नाही; उगाच आपला चावटपणा.), मग शेजारच्या सूव्हेनीरशॉपमधून आयफेल टॉवरच्या आकाराच्या, ब्रँडीची एक आणि ऑलिव्ह ऑइलची एक अशा, काचेच्या दोन बाटल्या विकत घ्याव्यात. (या विकत घेतल्यात, की सेक्युरिटीवाले तसेही तुम्हाला आयफेल टॉवर चढण्याच्या रांगेत शिरू देत नाहीत. त्या रांगेत म्हणे काचेच्या वस्तू बाळगण्यास मनाई आहे. आणि, एकदा विकत घेतलेल्या बाटल्या दुकानदार (तात्पुरत्यासुद्धा) परत घेत नाहीत, नि त्या तात्पुरत्या साठवून ठेवण्याकरिता तेथे कोठे क्लोकरूमसदृश काही सुविधासुद्धा नाहीत. आयता सुंठीवाचून खोकला जातो! पुढे कधीतरी पुण्याला वगैरे गेल्यावर त्यातली ती ऑलिव्ह ऑइलची बाटली खुशाल कोणा काकू-मामी-सदृश नातलगास भेट म्हणून द्यावी. ब्रँडीची बाटली मात्र स्वतःकरिता ठेवावी. त्या सूव्हेनीरछाप बाटलीतल्यापेक्षा बऱ्या दर्जाचे ऑलिव्ह ऑइल अटलांटात सर्रास मिळते. ब्रँडीसुद्धा मिळते, परंतु मग स्वतःकरिता काही सूव्हेनीर ठेवून घ्यायला नको काय?) मग तिथून काढता पाय घ्यावा, नि इतरत्र जाऊन उंचावरून विहंगमदर्शन घ्यावे. तासादीडतासात काम आटोपते, नि उरलेले पॅरिस उंडारायला त्यानंतर मग आपण दिवसभर मोकळे. त्याकरिता आयफेल टॉवर चढण्याच्या त्या रांगेत (तिकिटाचे पैसे मोजून) चारपाच तास वाया घालविण्याची काहीही गरज नसते. तर ते एक असो.)
हं, तर सांगत काय होतो… पॅरिसला जाऊन तुम्ही जर आयफेल टॉवर पाहिला नाहीत, तर एक वेळ तुम्हाला क्षमा होऊ शकेल. मात्र, पॅरिसला गेलात, नि (आपण शाकाहारी आणि/किंवा व्हेगन आहोत, अशी काही एक्स्क्यूज़ तुमच्याजवळ असल्याखेरीज) एकदासुद्धा एस्कार्गो खाल्ले नाहीत, तर (१) मग तुम्ही जगलात ते काय, आणि (२) चित्रगुप्त/सेंट पीटर/तुमचा जो कोणी अकाउंटंट असेल तो, त्याला भेटल्यावर तुम्ही काय उत्तर देणार आहात, त्याची आतापासूनच तयारी करून ठेवावीत, इतकी या प्रकाराची महती आहे. (तसा स्वतंत्रपणे खायला बऱ्यापैकी महाग प्रकार असावा बहुधा, परंतु, पॅरिसच्या एखाद्या टूरिष्टी भागात संध्याकाळच्या वेळेस गेलात, तर एस्कार्गोसहित-जेवण-इतकेइतके-यूरो-छाप ‘डील’ देणारी वाटेल तेवढी रेष्टॉरंटे भेटावीत. अशा ठिकाणी जेवणासोबत सहसा पाच ते सहा गोगलगायी मिळाव्यात. गरजूंनी अधिक माहितीकरिता ही प्रतिसादमालिका अवश्य पाहावी.)
बाकी,
3 काही लोकांचे गळे इतके शक्तिशाली असतात की अशा निळकंठाच्या गळ्याखाली भेंडी गोगलगाय मिक्स सरकू शकते.
भेंडी आणि गोगलगाय हे काँबिनेशन कधी खाऊन पाहिलेले नाही. मात्र, लोक जर खात असतील, म्हटल्यावर, कोणास ठाऊक, कदाचित चांगलेही लागू शकत असेल. असो.
(अतिअवांतर: वर म्हटल्याप्रमाणे, पॅरिसला जाऊन आयफेल टॉवर जर पाहिला नाहीत, तर ते एक वेळ क्षम्य आहे. मात्र, अॅस्टेरिक्स-प्रेमी असाल, तर पॅरिसजवळ आणखीही एक जागा आहे, जी पाहिल्याशिवाय मृत्युपश्चात तुम्हाला स्वर्गप्रवेश नाही: Parc Astérix. थीमपार्क आहे. वारंवार जाण्यासारखा प्रकार नाही, परंतु, पॅरिसला गेलाच असाल, तर एकदा तरी ती तीर्थयात्रा घडली पाहिजे. आणि, जिवंत ॲस्टेरिक्स-ओबेलिक्सबरोबर फोटो काढून घेतले पाहिजेत. व्हायटलस्टॅटिक्स, इंपेडिमेंटा, कॅकोफॉनिक्स, पॅनेकिया वगैरे मंडळींशी हातमिळवणी केली पाहिजे. पैसे वसूल होतात. तरी हल्ली डिस्नीने पॅरिसमध्येच आपलाही थीमपार्क उघडून या मंडळींचे अर्धे मार्केट खाल्ले आहे, म्हणतात. (दुष्ट लेकाचे!) चालायचेच.)
माफ करा ...
माफ करा, कां की मी फोटो चढवायला उशीर केला.
आजच मी आजाराची बतावणी करून दांडी मारली, आणि जुन्या शेजाऱ्यांशी तासभर फोनवर बोलत होते. तेव्हा स्वयंपाकाचा विषय निघाला. मग शेजारचा मोहीत मला विचारत होता, "तू लाडू करतेस का?" असले प्रश्न तो मला लहानपणापासूनच विचारायचा. त्यावर मी जुनंच उत्तर दिलं, "तू कर, खा आणि मलाही खायला घाल." आता वर भर घातली, "मी तुला पैसेही देते सगळ्याचे!" आता मी पूर्ण भांडवलशाही-भक्त आहे ना!
काकूनं दटावलं. "मोहीतला काही गरज नाहीये लाडूंची", अशीही पुस्ती जोडली वर.
तर स्वयंपाकाचा विषय निघायचा कारण असं की मी हल्लीच एक व्हिगन प्रोटिन पावडर आणली आहे. त्यात मटारचं प्रोटिन आणि काही तरी दोन जिन्नसांचं प्रोटिन आहे. त्याची चव बहुतेक बेसनासारखीच लागते. घावन घालून बघितले, पण पीठ खूप बारीक दळलेलं आहे त्यामुळे घावन कुरकुरीत नाही झाले. आता या पावडरची उकड करून बघणार आहे, एक दिवस. फक्त स्फूर्ती येण्याची वाट बघत आहे.
तोवर कुणाला 'हेल्दी' आणि पावडरची किंमत पाहता श्रीमंत बुंदी करायची असेल तर ती पावडर वापरून करून पाहा.
आद्य पाककृती
स्वतः पाकसिद्धी न करता लिहिलेली
लेख आवडला
बुंदी, बुंदीचा लाडु, मग तो मोतीचुर असो वा साधा. कुठलाही गोड पदार्थ आवडत असल्याने आणि सुदैवाने म्हातारपणापर्यंत, मधुमेहाने न ग्रासल्याने, मी आजन्म भरपुर गोड खाल्ले आहे. डायबिटिस झालेल्या नातेवाईकांच्या समोर, मुद्दाम, साखरेच्या डब्यातुन एक चमचा साखर उगाच खाल्ली आहे. आता मात्र, डायबिटिस झाला तर आपले कसे होईल या चिंतेला, स्टेविया की स्टिविया नांवाचा पर्याय माहीत झाला आहे. त्यामुळे मरेपर्यंत गोड खाण्याची इच्छा पूर्ण होईल याची खात्री पटली आहे.
नको
सचिनजी आमच्यासारख्या फडतुसांना सल्ले देत नाहीत. ते मोठ्या सेलेब्रिटीजचे गुरु आहेत. फिल्मिंडस्ट्रीतल्या सर्वांनाच, अभिनय, दिग्दर्शन, उर्दु आणि बरेच काही, त्यांनीच तर शिकवले आहे. ' हा माझा मार्ग एकला' मध्ये सुद्धा राजाभाऊंना दिग्दर्शनात त्यांनीच मोलाचे सल्ले दिलेत!
(अवांतर शंका)
एक्सेल शीटवर लाडू कसे बनवितात?