साफल्य
कविता : ती शिकवता येईलही कदाचित, पण खरे सांगायचे तर ती जगावी ! जोखावी, अनुभवावी , गुंतून जावे तिच्यात. पाझरु द्यावे आतवर तिला आणि देउन टाकावी मुभा, आयुष्य बदलायची!
त्या नवीनच आलेल्या प्राध्यापक तरुणाचे हे बोलणे ऐकून अनुजाने चमकून वर पाहीले.
जेमतेम तिशीच्या आतबाहेर असेल तो. मानेपर्यंत वाढलेले, कपाळावर रुळणारे अस्ताव्यस्त केस, मोठ्या, बोलक्या डोळ्यांतून ओसंडणारा उत्साह आणि चेहेर्यावरचे मुक्त हास्य!
ललित प्रभाकरची आठवण यावी असे व्यक्तिमत्व!
"तर! माझ्या मित्र मैत्रीणींनो, हा माझा पहिलाच वर्ग असल्याने, मी तुम्हाला एक लाच देऊ करत आहे". असे म्हणत त्याने टेबलावर ठेवलेला बॉक्स उघडला. मोठ्या प्लम केक ने सगळ्यांचे डोळे विस्फारले!
केक चे वाटप झाले, मुलं मुली हसत खिदळत वर्गाच्या बाहेर पडली. अनुजा तशीच बसून होती. “तुला नकोय केक?” पुन्हा तोच आश्वासक, हसू मिसळलेला आवाज!
तिने प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहीले. केक कशाबद्दल? असा प्रश्न त्याला स्पष्टपणे वाचता आला.
पुणे विद्यापिठाने दोन वर्षांआधी मराठी कविता असा एक विशेष अभ्यासक्रम राबविला होता. त्यात एक वर्षाचा मराठी कवितांवर आधारित अभ्यासक्रम पूर्ण करुन प्रमाणपत्र मिळविता येत असे.
अनुजा व्यवसायाने संगणक अभियंता होती, तिने ए आय चा विशेष कोर्स केला होता आणि एका प्रथितयश कंपनीत ती सल्लागार होती.
पण केवळ मराठी कवितेच्या ओढीने तिने एक वर्ष कंपनीतून खास सबाटीकल घेऊन इथे प्रवेश घेतला होता. आयुष्यात काही काही गोष्टी फक्त मनाच्या तृप्तीसाठी, मन:पूत जगून साध्याव्यात असे तिचे मत होते. प्रवाहासोबत जगणे तिला मान्य नव्हते. डेलीबरेट लिव्हींग वर तिचा ती संकल्पना प्रत्य्क्षात आणण्याइतका विश्वास होता.
तिच्या आवडत्या बाई, अरुणा ढेरे शिकवतील म्हणून ती खास वाट बघत होती. आज त्यांचा वर्ग होता खरे तर! पण त्यांच्या ऐवजी हा दुसराच अनोळखी तरुण आलेला पाहून ती जरा नाराज झाली होती.
“अरुणा ढेरे मॅडम नाही येणार आता. त्यांनी मला नियुक्त केले आहे. त्या इतर काही महत्वाच्या समित्यांवर आहेत ना....” त्याने सूतोवाच केले. “मी सुजित. सुजित प्रधान! मला नुसते जीत म्हणू शकता तुम्ही....” त्याच्या सुरात थोडा खट्याळपणा होता.
“हं...!” ती फणकारली. तिला खरे तर नकोच होता हा..उपटसुंभ...बाईंच्या जागी! पण आता काय करणार!
ती स्वत:शीच विचार करत होती....”केक ! उगीच नसती आमीषं.....! स्वत:ची कमतरता भरुन काढण्यासाठी .....!” ती तिथून तडक उठून निघालीच मग. मागे वळून बघायचे कष्टही न घेता.
आषाढातला पावसाळी दिवस. धो धो पाऊस पडत होता. युनिव्हर्सिटीच्या बस स्टॉप वर ती उभी होती. तितक्यात एक कार भरारा पाणी उडवत तिथून वेगाने पसार झाली. तिच्या कपड्य़ांवर पाण्याचे तुषार उडाले. “अरे, अरे...ओ..थांबा. पाहून चालवत जा की जरा गाडी...” अनुजा रागारागाने उदगारली. उत्तरादाखल तिला फक्त सुजित चे हसू आणि मागे न पाहता सॉरी असा हलवलेला हात येव्हढेच दिसले.
“ कसले उद्धट लोक आहेत! आणि फ़क्त सॉरी म्हटले की झाले का?” ती मनातल्या मनात चरफडत म्हणाली. सुजित बद्दल अजून एक सूक्ष्म अढी मनात निर्माण झाली!
एकतर हे असे वशील्याने लागलेले लोक येतात शिकवायला. त्यात इतका माज!!
का ? का? याने शिकवायला यावं बाईंच्या जागी? ती मनाशीच चडफडत म्हणत होती.
दुसर्या दिवशी ती वर्गात गेली तेव्हा तिचे मन साशंकच होते किंचीत! ऑगस्ट मधील धो धो पडणारा पाऊस. विद्यापीठातील घनदाट झाडांवर बरसणार्या धारा. सुजीतचा वर्ग आधीच सुरु झाला होता.
“बाहेर पाऊस पडतो आहे. सतत पडतोय. आकाश कुंद झालंय. झाडं, पाखरं भिजून थकली आहेत. सकाळ आहे , की दुपार की संध्याकाळ...काहीच फरक पडत नाहीये. आतमध्ये सुद्धा सगळं भिजून, थिजून गेलंय. पावसाचं अव्याहत वाजणं थांबतच नाहीये. .अशा वेळी ’ग्रेस’ आठवतात.”
“ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता...
मेघात अडकली किरणे तो चंद्र सोडवीत होता”
“धारांचे विटके शेले
त्यांनाही नसते कोणी
आभाळ उचलल्यावरही
मेघातून झरते पाणी”
सुजित त्याच्या ओघवत्या वाणीत कवितेच्या अंतरंगात शिरत होता आणि सारा वर्ग मंत्रमुग्ध होऊन ऐकत होता. ग्रेसच्या कवितेला त्याच्या शब्दांनी जणू मुलामा चढविला होता.
..हे मैफिल गाजवणारे कवी नव्हेत. मनाच्या कोपऱ्यामध्ये दरवळत राहणारे कवी. फक्त एकटे असताना बाकी कोणालाही न दाखवण्याच्या पेट्या उघडायला लावतील, असे कवी. दुःखाला जराही न बदलता त्याला सांगोपांग न्याहाळण्याची ताकद असलेले कवी. वेदना नावाची एक चेटकीण आहे. ती सहसा जशीच्या तशी कधीच शब्दांच्या चिमटीत सापडत नसते. तिला चकवून, चुचकारून तर कधी सरळ बखोटीला धरून समोर आणण्याची किमया साधणारे कवी....
विचारात गढलेल्या अनूने चमकून वर पाहीले! कोण बोलतेय हे? सुजित? इतके प्रवाही, ठाशीव शब्दांत कवितेबद्दल कुणाला बोलताना ती प्रथमच ऐकत होती.
कविता आवडणारे तर अनेक असतील, कविता करणारे पण खूपच सापडतील..पण दुसर्याच्या कवितेवर कविता करणारा ती प्रथमच पहात होती! इतकी असोशी, इतका उन्माद...कवितेबद्दल इतकं अप्रूप... ? ती विचारात गढून गेली
“हा माणूस माझ्यासाठी कायमच ग्रेस आहे. मला वाटते ते कविता लिहितात, तेव्हा त्यांचे माणिक गोडघाटे हे नावही फेडून टाकत असावेत. संन्याशाच्या आधीच्या नावाप्रमाणे.
त्यांच्या कवितांमध्ये येणारे पौराणिक, सांस्कृतिक संदर्भ तर केवढे भरजरी आहेत! ..”
सुजित समरसून ग्रेस यांना शब्दांत ओवत होता....आणि ते करतांना त्याच्या चेहेर्यावर असीम आनंद झळकत होता. आपल्या आवडत्या विषयावर बोलायची- शिकवायची संधी मिळाल्याचा, कवितेचे आपल्याला आकळलेले अंतरंग दुसर्यांना समजावून सांगण्याचा अनिवर्चनीय आनंद! त्याचा चेहेरा फुलून आला होता आणि न हासताही त्याच्या गालावर खळ्या उमटल्या होत्या. ते हासू त्याच्या चेहेर्यावरुन उतरवता आले तर खचितच एखाद्या मोगर्याच्या गजर्याप्रमाणे दिसेल, तिला वाटले! आणि आपल्या मनात आलेल्या या विचाराने तीच जरा चपापली. या मुलात काहीतरी विलक्षण खेचून घेणारे आकर्षण आहे असे तिला जाणवले.
होस्टेल वर पुस्तके सांभाळत ती आली तेव्हा सांज कलली होती आणि मुलींचा कल्ला चालू होता.
युनिव्हर्सिटी कॅंपस वर काहीतरी गाण्याचा कार्यक्रम होता. लोकल ट्रेन नावाच्या प्रसिद्ध बॅंड्चा अगदी तारखा उपलब्ध नसताना मुष्किलीने मिळवलेला गाण्यांचा कार्यक्रम! झगमग दिव्यांच्या उघडझाप होणार्या प्रकाशात गायलेली अर्थहीन, स्वस्त गाणी! गर्दी, जल्लोश आणि तरुणाईचा कैफ़ !
संयोजक चमूत मात्र आनंदाचे वातावरण होते!
अनूला त्यात काडीचाही रस नव्हता. सतत नाचत-उसळत झिंगणार्या त्या अनेकरंगी गोंधळाला खूष करण्यासाठी कुणी काहीतरी गावे ही कल्पनाच तिला कशीतरी वाटे!
संगीत ही उभे राहून ऐकायची गोष्टच नव्हे असे तिला वाटे.
संगीत कसे मधाच्या धारेसारखे संथ, अविचल असावे. तालेवार पण प्रेमळ, घरंदाज स्त्री सारखे शांतवणारे, दिलासा देणारे! त्यातील सूर ऐकून कान निवले पाहीजेत, आणि अर्थगर्भ शब्द ऐकून मन सुखाच्या लाटेवर तरंगत रहायला हवे!
अशी तिची संगीताविषयीची कल्पना होती.
पण तरीही, मुलींच्या आग्रहाखातर ती जायला तयार झाली.
जांभळ्या फुलांच्या सलवार कमीझ मधे ती सुरेख दिसत होती. पिंगट खांद्यापर्यंतचे केस, गोरा नितळ वर्ण आणि गहिरे, बुद्धिमान डोळे. एखादी गोष्ट न आवडूनही ती एंजॉय करीत असल्याचे दाखवायचे व्यावसायिक कौशल्य तिच्यात होतेच! म्हणून ती त्या गर्दीचा हिस्सा होण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत होती.
अंदाधुंद लोक, नशेतील बेभान तरुणाई, झिंग आणि बेफाम उत्साहाने थिरकणारी गर्दी! प्रयत्न करुनही तिला तिथे राहणे अशक्य होऊन बसले. सारे असह्य वाटू लागले.
त्यात मुलांच्या एका टोळक्याने ह्यांच्या ग्रुपला लक्ष्य करुन चिडवायला सुरुवात केली. “ए, ती ती, बघ..जांभळ्या ड्रेस मधली......ऐ हसीना झुल्फोंवाली जाने ज sss हा.........!! “..
बीभत्स हातवारे, हपापलेल्या नजरा....उघडमीट करणारे दिवे, कर्कश्श, कानठळ्या बसविणारे संगीत...... कोलाहल, गर्दी आणि अचानक एकटे पडल्याची जाणीव.
अनूला एकदम भितीच वाटली. मन दाटून आलं. ती तिथून धावत सुटली. मागे न पाहता. कुणालाही न सांगता ,सोबत न घेता. तिथून दूर जाणे एव्हढेच फक्त मनाशी ठरवून.
युनिव्हर्सिटीचा कीर्र अंधार, झाडी आणि रस्त्यावरील जेमतेम प्रकाश. ती झपझप चालत जात होती.
एक कार अगदी जवळ येऊन थांबली तेव्हा तिला किंचीत भान आले.
“ओ मिस..इतक्या अंधाराच्या कुठे निघालात? आणि तेही एकट्याच? आणि इतक्या घाबरलेल्या का दिसताय?” सुजीत च्या आश्वासक आवाजाने तिला एकदम रडायलाच आले.
“सर...तुम्ही.....आय मीन ...इकडे...मी त्या कार्यक्रमाला गेले होते....तर तिथे ....” तिला पुढचे बोलवेना
“असू दे. चल. मी सोडतो तुला. कुठे जायचेय?” त्याने समजूतदार पणे अधिकचे काहीही न विचारता कारचा दरवाजा उघडून तिच्यापुढे धरला. त्याला न सांगताच तिच्या मनातले कळले होते.
ती थरथरत कार मधे बसली. अजूनही त्या टोळक्याची जीवघेणी थट्टा तिच्या मनातून गेली नव्हती. त्याने न बोलता कार डेक्कन कडे घेतली. ”चल, आधी काहीतरी खाऊन घे, मग होस्टेल वर सोडतो तुला” तो म्हणाला.
कुठलेही प्रश्न न विचारता, आणि मुख्य म्हणजे कुठलाही पूर्वग्रह न बाळगता तो सहजतेने तिला घेऊन एका रेस्टॉरंट मधे शिरला. त्याच्या सोबत तिला निर्धास्त, आश्वासक वाटत होते. कुणाच्या केवळ सहवासाने निश्चिंत वाटते असा अनुभव ती प्रथमच घेत होती.
मी ही तुझ्यासारखाच, केवळ मराठी कवितेच्या प्रेमाखातर इथे आलो आहे. विद्यापीठात शिकवायला. शिकवण्यापेक्षा, मीच शिकतो आहे असे म्हण. माझे आईवडिल जुन्नर ला असतात. शेती आहे आमची. मळा आहे. विहीर आहे. फार आनंद वाटतो तिथे मला. शहरी जीवनाचे मला काडीचेही आकर्षण नाही. निसर्ग आणि पुस्तके.......पुरेसे आहेत मला ! तो अकृत्रिम पणे स्वत: बद्दल सांगत होता. त्याच्या उबदार, संयत सोबतीने ती सुखावत राहीली.
तुझे आवडते कवी कोण आहेत? आणि इंग्रजी काही वाचतेस की नाही तू? किमान एमिली डिकिंसन? काही म्हण, इंग्लिश कविता वाचल्याखेरीज, मराठी कविता समजत नाहीत असे मला वाटते. आता माझे हे मत कदाचित वेडगळपणाचे वाटेल तुला, पण खरेच असे आहे! इंग्लीश कविता वाचून आपल्या विचारांना, आकलनाला एक खोली मिळते, आयुष्याकडे पाहण्याचा एक नवीन आयाम मिळतो...आणि त्या चष्म्यातून, मग आपल्या मातृभाषेतील साहित्य वाचले ना...तर निश्चित पणे अधिक भावते.
तो गालावर खळ्या पाडत, हासत होता. भरभरुन पुस्तकांविषयी बोलत होता..आणि अनू त्याच्या बोलक्या डोळ्यांत हरवत चालली होती.
पुढचे दिवस जणू मंतरल्यासारखे होते. त्याचा कवितांचा तास तिच्या साठी अनमोल असे. त्याचे मनापासून शिकवणे, खूप संदर्भ देऊन कविता आतून उलगडून सांगणे, इंग्लिश कवितांचा असलेला त्याचा व्यासंग, इंग्रजी वाङ्मयाचा मराठी साहित्याशी जोडलेला संबंध......... सारेच खूप खूप आवडे तिला. आवडत्या माणसाचे सारेच काही आवडते व्हावे तसे तिचे झाले होते.
कुसुमाग्रज म्हणजे मराठी काव्य विश्वातला एक तळपता तारा आहे. त्यांची कविता तेजाने ओतप्रोत भरलेली आहे. प्रेम करतानाही ती दीन - परिस्थिती शरण होत नाही, तर आक्रमक पण बजावते
प्रेम कर भिल्लासारखं
बाणावरती खोचलेलं
मातीमध्ये उगवून सुद्धा
मेघापर्यंत पोहोचलेलं
वार्याच्या झुळुके सारखं नाही, समुद्राच्या लाटे सारखंही नाही तर भिल्ला सारखं !
परिणामांना सामोरं जाणारं! उघडपणे प्रेयसीला सोबत घेऊन पळून जाण्याची हिंमत बाळगणारं, आपल्या घरातील खिडकीच्या चौकोनातून दिसणारा चतकोर तुकडा नाही तर भर रात्री लांबवर जात खुल्या शिवारातून पूर्णचंद्र पाहणारं.... निर्भीड, थेट, आक्रमक !
त्याच्या अशा समरसून शिकवण्याने वर्ग मंत्रमुग्ध होत असे.
कोजागिरी पौर्णिमेची रात्र होती. विद्यापीठाच्या हिरवळीवर गाणी- गप्पा -कवितांचा कार्यक्रम आयोजित केला होता. पांढर्या शुभ्र, चंदेरी वर्क केलेल्या हाफ सारीत अनुजा फार सुरेख दिसत होती. आणि सुजित तर सफेद कुर्त्यात अगदी राजबिंडा दिसत होता. सुंदर , तरल वातावरण होतं, अल्हाददायक हवा होती आणि त्याच्या ओघवत्या मिट्ठास वाणीतून पाडगावकरांची कविता झरत होती.
प्रेम ही एक अतिशय सुंदर गोष्ट आहे, आणि ती जरूर जरूर करावी, असे आयुष्याला “हो” म्हणणारे काहीतरी पाडगावकरांच्या कवितेत सापडते.
“जरी तुझिया सामर्थ्याने
झुकतील दिशाही दाही
मी फूल तृणातील इवले
फुलणार तरीही नाही
तव सामर्थ्याने झुकुनी
तुज करतील सगळे मुजरे
पण सांग कसे उमलावे
ओठातील गाणे हसरे
शोधीत धुक्यातून मजला
दवबिंदू होऊन ये तू
कधी भिजलेल्या मातीचा
मृदू सजल सुगंधित हेतू”
अनु तर कधीच स्वत:ला हरवून बसली होती. रात्र चढत होती. चंद्राचा शीतल प्रकाश सर्वदूर झरत होता. कविता – गाण्यांच्या त्या आनंदी माहोल मधे, अचानक, तो घेरी येऊन खाली कोसळला, तशी ती भानावर आली. सर्वजण धावले, आणि सुजीतला दवाखान्यात नेण्यात आले.
जेव्हा तो शुद्धीवर आला, तेव्हा त्याचा हात धरुन, म्लानपणे बसून राहिलेल्या अनूकडे पाहून तो प्रसन्नपणे हसला आणि म्हणाला, “अगं, इतके काही नाही. मला ना, आनंद मधे राजेश खन्नाला जो आजार झाला होता ना....तो झालाय बघ!
जिंदगी लंबी नही, बडी होनी चाहिये, बाबू मोशाय!
याच तत्वावर जगायचा प्रयत्न चाललाय ना.., माझा! म्हणून तर जितके म्हणून आनंदाचे क्षण मिळतील ते गोळा करायचे आणि गाणी गात रहायचे.....
तू काळजी नको करुस, अनू, फार गुंतूनही राहू नकोस माझ्यात. तुला हे कधीतरी सांगायचेच होते पण तू हे कसे स्वीकारशील याबद्दल विश्वास नव्हता वाटत! हे बघ, जितके आयुष्य मिळालेय तेच देवाची देणगी म्हणून का नाही बघायचे? जे आहे तेही किती सुंदर आहे!
हे बोलताना मात्र त्याचे डोळे त्यालाही न जुमानता भरुन आले होते.
ऐक अनू, वैभव जोशीने त्याच्या नवीन ओळी पाठवल्या आहेत. सोबतीचा करार मधल्या...
नको त्याच त्या तेवत्या लख्ख वाटा, नको नेहमीची पुन्हा वेस ही
असे पश्चिमेला उजाडून जावे जसे शक्य नाही पूर्वेसही......
अनूला मात्र डोळ्यांमधील अश्रूंच्या पडद्यामुळे त्या ओळी धूसर दिसत होत्या.
दिवाळीच्या सुट्टीत, त्याच्या वाढदिवसाचे निमित्त साधून ती आणि आणखी चारपाच मित्र मैत्रीणी मिळून त्याच्या गावी जाऊन आले. त्याचे आई वडील, भाऊ भावजय, मोठ्ठा वाडा, शेत शिवार, विहीर, गायी हे सगळे विश्व अनूसाठी नवीन पण अप्रूपाचे होते!
तिथल्या मुक्कामात एका संध्याकाळी, त्याचे वडिल अनूला म्हणाले, “पोरी, मी पुष्कळ पावसाळे पाहीले आहेत तुझ्यापेक्षा. सगळं जाणून - उमजून सांगतो आहे तुला. ह्याचा आजार हा असा! आम्ही सगळे उपाय करुन थकलो. अजूनही चालूच आहेत. पण यश दिसत नाही. पण हा असा नियतीचा फ़ेरा अवघड पडला आहे गं! तू निष्कारण गुंतून पडू नकोस पोरी याच्यात. तुझ्या डोळ्यांतली त्याच्याबद्दलची माया मला काय दिसली नाही होय? त्याच्या सोबतच आता तुझीही काळजी लावू नकोस आम्हाला!
दूर हो त्याच्यापासून पोरी आत्ताच. तुझ्याच भल्यासाठी सांगतो आहे मी. एका बापाचं काळीज बोलतंय बेटा.”
ते कळवळून, मनापासून तिची समजूत घालत होते. पण अनूचे त्यांच्याकडे लक्षच कुठे होते!
प्रीतीच्या अलौकिक अनुभवाने उजळलेले तिचे मन त्यापासून दूर जा असे सुचविणार्या कुठल्याही सल्ल्याकडे आपसूकच डोळेझाक करु लागले होते.
सुजीत बद्दलचे हे सत्य कळल्या पासून अनूचे विश्वच बदलून गेले. सुख दु:खाची इतकी आंदोलने इतक्या कमी अवधीत तिने कधी अनुभवली नव्हती.
सुजीत ची झपाट्याने खालावणारी तब्येत, त्याची काळजी घेतांना तिची होणारी घालमेल आणि अभ्यास, असाईनमेंट्स, सत्रं , अस्वस्थ मनाच्या अनेक उदास आर्त संध्याकाळी!
“हॅलो, अनू. अगं तुझा काही फोन नाही, तू आलीही नाहीस गेला महिनाभर..” आई काळजीने फोन वर विचारत होती. “पपा परत तीन महिन्यांसाठी अमेरिकेला जाणार आहेत. या वेळेस मीही जावं म्हणते. नाहीतरी तूही आता रमलीस विद्यापीठात आणि त्यांनाही जरा काही खायला प्यायला करुन देईन तिकडे. आणि हो, त्या देव यांच्या स्थळाबद्दल विचार केलास का गं? अगं चांगला मुलगा आहे. अमेरिकन कंपनी असली तरी कायम घरुन काम करु शकणार आहे. बघ बाई, तुझं आपलं निराळंच चालवू नकोस या बाबतीत तरी....”
“हो. आई. अगं किती प्रश्न विचारशील एकदम?” तिने काहीसे वैतागून म्हटले.
पण तिलाही हे जाणवले, की काहीतरी करण्या-ठरविण्याची वेळ आली आहेच.
सुजीत सुट्टी हून परत आला आणि जेव्हा कामावर परत रुजू झाला तेव्हा , त्याची तब्येत बरीच खालावलेली होती. थकलेला चेहेरा, कमी झालेले वजन पण तरीही एका अदम्य उत्साहाने चमकणारे डोळे.
"इंदिरा संत घेऊया का आपण या आठवड्यात?
अजून नाही जागी राधा, अजून नाही जागे गोकुळ....ही एक अप्रतिम कविता घेऊया त्यांची...."
कुब्जा ही कवयित्री इंदिरा संत यांनी लिहलेली एक सुंदर कविता... गीताच्या अंगाने ती लिहिली असल्याने तिला एक असीम गेयता ही प्राप्त झाली आहे.
कुब्जा ही कंसाची दासी. परंतु दुष्ट कंसाच्या चाकरीत असतानाही ती कृष्णाची मनस्वी भक्ति करणारी . जन्मतःच ती अष्टवक्रा म्हणजे आठ जागी शरीराला कुबड असलेली होती, पण या कुरुप शरीरात असं मन होतं की ते पूर्णपणे कृष्णमय होते. तिच्या तनामनाच्या तारा कृष्णाच्या नामजपाने सदैव झंकारत होत्या. पुढं कृष्ण जेव्हा कंसवधासाठी नगरात आला, तेव्हा त्याच्या जादुई स्पर्शाने तिचे शरीर सरळ झाले आणि तिचा उध्दार झाला. पण ही पुढची गोष्ट. या कवितेत ती अष्टवक्रा कुब्जाच आहे.
कृष्णाचा उल्लेख आला की राधा आणि त्या अनुषंगाने गोकुळ, कदंबवनातील शरद पुनवेच्या नक्षत्रखचित रात्रीतील गोपिकांबरोबरची रासक्रिडा, गोकुळातील कृष्णाचे सखे सोबती या गोष्टी आपोआप मनात येतात. या सर्वांची एक घट्ट वीण आपल्या मनात बसलेली असते. पण या कवितेच्या पहिल्या दोन ओळीत कृष्णाशी निगडीत या सगळ्याचं नातं तोडून टाकलं आहे.
अजुनी नाही जागी राधा
अजुनी नाही जागे गोकुळ
गोकुळ आणि राधा दोन्ही अजूनही गाढ निद्रेत आहे. वेळ पण अवेळ आहे. रात्रीच्या आकाशातील तारका मंद झाल्यात पण विझलेल्या नाहीत, गोठलेला काळोख क्षितिजावर हळूहळू निवळतोय, पण सकाळ झाली नाहीय. सर्व आसमंत शांत आहे. अशा या अवेळी ही पैलतीरावरून त्या हृषिकेशाच्या मुरलीचा मंद नादरव कानी येतोय. कुणासाठी ही मुरलीची धून आहे?
अशा अवेळीं पैलतीरावर
आज घुमे का पावा मंजुळ
स्वरूपसुंदर राधा ज्याच्या प्रेमात पडलीय, गोकुळातील गोपिकाही ज्याच्यावर प्राण ओवाळून टाकतात असा तो शाम आपल्या सारखीला अप्राप्य आहे हे कुब्जेला मनोमन उमगलंय, तरीही तो मन धुंदावणारा मुरलीरव ऐकून तिचे देहभान हरपले आहे. भल्या पहाटेचा भणाण वारा, कडकडीत थंडी यांना न जुमानता ती यमुनेच्या अर्ध्या पाण्यामध्ये उभी राहून ते मोहिनी घालणाऱ्या पाव्याचे बेभान करणारे सूर ऐकताना तिची जणू प्रितसमाधी लागली आहे!
मावळतीवर चंद्र केशरी
पहाटवारा भवती भणभण
अर्ध्या पाण्यामध्ये उभी ती
तिथेच टाकुन अपुलें तनमन
आपल्या शारिरीक व्यंगाचं आणि कुरूपतेचं भान विसरून ती कुब्जा कृष्णाच्या पाव्याचे सूर ऐकताना तनमनाने हरखून गेली आहे. तिचं सर्वस्वच जणू काही त्या सूरांवर तरंगत त्या निळ्या सावळ्या कृष्णामध्ये विलीन होऊ पाहतेय.
विश्र्वच अवघे ओठी लावून
कुब्जा प्याली तो मुरलीरव
डोळ्यांमधले थेंब सुखाचे
"हे माझ्यास्तव, हे माझ्यास्तव "
अशा अवेळीं पैलतीरावरून येणारे हे मुरलीचे स्वर गोकुळासाठी नाहीत, राधेसाठी नाहीत आणि गोपिकांसाठी तर नाहीच नाहीत, ते फक्त आपणासाठी आहेत या कृतकृत्य करणाऱ्या भावनेने मंत्रमुग्ध होवून कुब्जा ते सूर कानात प्राण आणून ऐकतेय. कुरुपतेला दुर्लभ असलेला सौंदर्यप्राप्तीचा क्षण येथे अचूक शब्दांत टिपला आहे. आसमंत व्यापून टाकणाऱ्या या मुरलीरवाचा एकही ध्वनीवलय गमावला जाऊ नये म्हणून कुब्जा अवघं विश्र्वच ओठाला लावून ते सूर पित आहे आणि हे करताना कुरुपतेची भावना लयाला जाऊन त्या ठिकाणी सौंदर्याचे आत्मभान तिला आले आहे. राधा जागी नाही, गोकुळही जागे नाही, गोपिकाही निजल्यात अशा वेळी पैलतीरावरून येणारे पाव्याचे सूर फक्त आपल्यासाठी आहेत ही अनुभूतीच तिला आनंदी आणि तृप्त करते आहे.
तो नेहमी प्रमाणे भान विसरुन कविता शिकवत होता.
अनू पेन्सिल ओठांशी धरुन ऐकत होती. भान विसरुन. त्यातील शब्दाशब्दाचा अन्वय लावत.
आणि ती कविता अशी ऐकता ऐकताच तिला लख्ख जाणवले, की आपल्याला खरा आनंद यातच होतो आहे. कविता हेच आपले आनंदनिधान आहे.
कंपनी, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, तिथला संघर्ष, तिथले राजकारण...या सर्वापेक्षा विद्यापीठातले शांत वातावरण, कविता, वाग्देवीची आराधना यांत अधिक आत्मिक समाधान आहे, तृप्ती आहे.
आणि, सुजीतचा वारसाही पुढे न्यायचा आहे! न्यायलाच हवा.
अभावितपणे मनात आलेल्या या वारशाच्या विचाराने ती दचकली, दु:खी झाली. स्वत:शीच झगडत, भांडत... आतल्या आत रडत राहिली.
पण एका निर्णायक क्षणी तिने कंपनीला राजीनामा पाठवून दिला.
.
.
.
.
काही महिन्यांतच झालेल्या सुजित च्या मृत्यूनंतर तिला कवितेनेच सावरले.
आयुष्य तर सगळेच जगतात. कुणी दु:खाने, कुणी नाईलाजास्तव , कुणी जसे सामोरे येईल तसे..!
पण एकदाच मिळणारे हे मौल्यवान जीवन असेतसे उधळून नको टाकायला. आपले आयुष्य सफ़ल, सार्थक असायला हवे. जी कृती अथवा काम करुन आपणाला मन:पूर्वक आनंद मिळतो असा आपला मार्ग काळजीपूर्वक, विचार करुन निवडायला हवा. जे जगताना कधी पश्चात्ताप वाटणार नाही असे समाधानी, उद्दिष्ट्पूर्ण आयुष्य!
अंतरीचा दिवा लावून शांतपणे बसावे. शोधावी आपापली वाट त्या उजेडात! विचारावे प्रश्न आणि द्यावीत त्यांची उत्तरे! आखून घ्यावी एक रेखा.... आणि करावी वाटचाल त्या पथावरुन!
सुजीत चे शब्द तिच्या मनात रुंजी घालत होते.
विद्यापीठाकडून जेव्हा तिला कविता शिकविण्याबद्दल विचारणा करण्यात आली तेव्हा तिने सहजतेने ती ऑफर स्वीकारली !
कविता : ती शिकवता येईलही कदाचित, पण खरे सांगायचे तर ती जगावी ! जोखावी, अनुभवावी , गुंतून जावे तिच्यात. पाझरु द्यावे आतवर तिला आणि देउन टाकावी मुभा, आयुष्य बदलायची!
.
.
.
"माझ्या मित्र मैत्रीणींनो, हा माझा पहिलाच वर्ग असल्याने, मी तुम्हाला एक लाच देऊ करत आहे."
अनूने पुस्तके टेबल वर ठेवली आणि विद्यार्थ्यांना संबोधायला सुरुवात केली.
वा. >>केवळ मराठी कवितेच्या…
वा.
>>केवळ मराठी कवितेच्या ओढीने तिने एक वर्ष कंपनीतून खास सबाटीकल घेऊन इथे प्रवेश घेतला होता. >>