जीव देऊन वतन मिळवलं! - प्रा. सुमीत गुहा
जीव देऊन वतन मिळवलं!
प्रा. सुमीत गुहा
लेखामागची पार्श्वभूमी – मराठी जगतानं ब्रिटिशपूर्वकालीन भारतातल्या दैनंदिन जीवनाची माहिती देणारी कागदपत्रं मोठ्या प्रमाणावर मागे ठेवली आहेत. यामागच्या कारणांचा ऊहापोह मी माझ्या पुस्तकात – History and Collective Memory in South Asia, c.1200-2000, पर्मनन्ट ब्लॅक, रानीखेत, २०१९ – केला आहे. अशा कागदपत्रांमधून सामान्य लोकांचं आयुष्य दाखवणारी एक कथा ऐसी अक्षरे २०२५ दिवाळी अंकात प्रकाशित झाली होती (कथेचा दुवा). याच मालिकेतली ही दुसरी कथा. - प्रा. सुमीत गुहा.
वर्ष १६५३. श्रावण महिना सुरू झाला. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर मान्सूनचे वारे पावसाळी ढग घेऊन येऊ लागले. पावसाचा आरंभ सुरळीतपणे झाला. कोरड्या पडत चाललेल्या ओहोळांच्या नद्या झाल्या, झाडांना नवीन पालवी फुटली आणि काळ्या, शुष्क डोंगरउतारांवर हिरवळ पसरू लागली.
या दरम्यान गावकऱ्यांचं एक प्रतिनिधीमंडळ कष्टपूर्वक रोहिडा किल्ल्याचा उंच कडा चढून तिथल्या अधिकाऱ्यांसमोर उभं राहिलं. किल्ल्याच्या पहिल्या प्रवेशद्वारापर्यंत पोचण्यासाठी अगदी डोंगरभागात राहणाऱ्या गावकऱ्यांनाही पठारावरून तासभर तरी सलग चढावरून चालावं लागत असे. त्यानंतर काही दगडी पायऱ्या चढून गेल्यावर दुसरं प्रवेशद्वार होतं. या प्रवेशद्वारासमोर एक लहानसं भूमिगत जलकुंड होतं. गावकरी पायऱ्या चढून प्रवेशद्वार पार करून गेले.
शेतकरी रोहिडा किल्ल्यावरील हवालदार नरसो धोंड-देऊजी यांच्या दालनात गेले. राज्यसंस्थेच्या वतीने कर गोळा करून सरकारदरबारी जमा करण्याचा ठेका हवालदारांकडे दिला जात असे. सर्वसाधारणपणे हे हवालदार ठेका मिळवण्यासाठी राजांना मोठ्या रकमा आगाऊ स्वरूपात देत असत. हवालदार या हुद्द्यासोबत त्यांना संबंधित किल्ल्याच्या हद्दीत येणाऱ्या सर्व गावांवरील वित्तीय व प्रशासकीय नियंत्रण प्राप्त होत असे.
पश्चिम भारतात हा मोठ्या उलथापालथीचा काळ होता. उत्तर भारतावर सत्ता प्रस्थापित केलेल्या मुघल साम्राज्याने दक्षिणेच्या दिशेने हातपाय पसरवायला सुरुवात केली होती. महत्त्वाकांक्षी मुघल सम्राट औरंगजेबाच्या सैन्याने दक्षिणेतील बिजापूर व गोवळकोंडा ही राज्यं हळूहळू जिंकून घेतली. या वेळी, भविष्यात छत्रपती होणारे शिवाजी भोसले केवळ २२ वर्षांचे होते, पण त्यांनी एकामागून एक गड काबीज करायला सुरुवात केली होती आणि ते स्वराज्याच्या स्थापनेसाठीची योजनाही आखू लागले होते. तर, धोंड-देऊजींच्या दालनात बसलेल्या अधिकाऱ्यांनी अशा अनेक संघर्षांच्या आणि रणनीतीच्या कहाण्या ऐकल्या असणारच. पण त्यांना भेटायला आलेल्या शेतकऱ्यांनी सांगितलेली कहाणी नेहमीपेक्षा निराळी होती. अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि त्यांच्या कारकुनांनी ते मोडीमध्ये लिहून घेतलं.
त्या वर्षी काही महिने आधी कारंजिया गावातले दोन पाटील त्यांच्या गावावरचा सारा भरण्यासाठी गडावर आले होते. बाळोजी कुढले आणि नाईकजी कुढले या गावपाटलांसोबत गोंदनाक हा त्यांचा एक महार सेवकही आला होता. महुडा गावचा गोंदनाक कर विभागामध्ये नोकरीला होता. गावावरील कराचा वाटा भरण्यासाठी पाटलांना बोलावण्याचं काम त्याच्याकडे दिलं असण्याचीही शक्यता आहे. गडावर असताना गोंदनाकाचं एका अधिकाऱ्याशी भांडण झालं आणि त्याने त्या अधिकाऱ्याला मारलं, असं उपलब्ध कागदपत्रांमध्ये नमूद केलं आहे. या भांडणानंतर गोंदनाक आणि दोन्ही पाटील लगेचच त्यांच्या गावी पळून गेले. पण राजसत्तेच्या अधिकाराचा अनादर करणाऱ्यांना मोकळं सोडलं जाण्याची शक्यता नव्हतीच. त्या तिघांचा माग काढत सैनिक गावात आले, त्यांनी कुढले पाटलांना, प्रमुख गावकऱ्यांना आणि त्यांच्या इतर काही कुटुंबसदस्यांना आणि नोकरचाकरांना ताब्यात घेतलं.
मग या सैनिकांनी जेवणाची मागणी केली. गावकऱ्यांनीही त्यांची मनधरणी करण्यासाठी एक बकरी कापून मटण शिजवलं, शिवाय इतरही मिष्टान्न भोजन खाऊ घातलं. त्यात गांज्याच्या गोळ्याही होत्या. थोड्या वेळाने काही सैनिक झोपी गेले आणि उरलेले राखण करायला लागले. पण त्यांच्यावरही जेवणाचा परिणाम दिसू लागल्यावर त्यांना डोळे उघडे ठेवणं अवघड झालं. त्यांनी गावातल्या महार सेवकाला बोलावलं आणि कठोरपणे बजावलं :
“आम्ही दोन पाटील, त्यांचे मुलगे आणि भाऊ, नोकरचाकर, त्यांचं सर्व सामान तुमच्या ताब्यात ठेवतो आहोत. यात काही फसवेगिरी झाली आणि कोणी बंदीवान पळून गेला किंवा तुमच्या ताब्यातला इसम वा सामान गायब झाल्याचं निदर्शनास आलं तर, या गावातल्या प्रत्येक महाराचं मुंडकं छाटलं जाईल, एवढं याद राखा!”
मग बाकीचे राखणदार सैनिकही झोपी गेले. त्यांना पूर्ण झिंग चढली होती. गावकऱ्यांनी त्यांची कहाणी पुढे सुरू ठेवली :
“गुंगी येऊन सैनिक झोपल्यावर घाबरलेल्या सगळ्या गावकऱ्यांनी गडबडीत परस्परांशी सल्लामसलत केली. आमच्यातल्या एका वडील व्यक्तीने सरकारी अधिकाऱ्याला मारहाण केल्यामुळे आमचा शिरच्छेद निश्चित आहे, अशी आमची खात्री पटली. त्यामुळे यातून सुटका करून घेण्यासाठी आमच्याच गावातल्या महारांना विनंती करण्याचं आम्ही ठरवलं. ते आधीच आमच्यावर राखण देत बसले होते. आम्ही त्यांच्याशी याबाबत बोललो. पण गावचे सर्व महार म्हणाले, “आम्ही या कृत्याची कबुली देऊन तुमचा जीव वाचवावा असं तुम्ही म्हणताय का? आम्ही आमचा नि आमच्या मुलांचा शिरच्छेद करून घ्यायचा आणि आमची वंशावळ संपवून टाकायची, असं तुम्ही म्हणताय! हे काही आम्ही करू शकत नाही.”
गावकऱ्यांची अधिकाऱ्यांसमोरची जबानी पुढे सुरू राहिली -
“मग आम्ही गडावर चाकरी करणाऱ्या महुडा गावच्या गोंदनाक महाराशी बोललो. तो आमच्या गावातील बाळोजी आणि नाईकजी पाटलांसोबत गडावर गेला होता. तो आमच्या गावाजवळच येऊन लपला होता. आमचा जीव वाचवावा अशी आम्ही त्याला विनवणी केली. तो सदर मारहाणीची जबाबदारी स्वतःवर घेऊन आमचा जीव वाचवेल, पण त्यासाठी त्याला स्वतःच्या जीवाची किंमत मोजावी लागेल, हे आम्हाला ठाऊक होतं. सरकारी अधिकाऱ्याच्या अपमानाचा सूड उगवण्यासाठी संबंधित अपराध्याला देहदंड देण्याबाबत सत्ताधारी आग्रही असणारच, मग तो अधिकारी कितीही दुय्यम पदावरचा असो. गोंदनाकाकडे स्वतःचं वतन नव्हतं; तो केवळ गडावर चाकरी करत होता. (त्याला कोणत्याही वेळी कामावरून कमी करता आलं असतं).”
गोंदनाकाने बराच विचार केला. त्याने स्वतःच्या जीवाचं आणि आपल्या कुटुंबाच्या भवितव्याचं मोजमाप केलं. मग तो म्हणाला, “म्हणजे तुमच्या खातर मी माझी मान छाटून घेऊ! माझ्या जीवाची खंडणी भरून तुम्हाला सोडवू! पण याच्या बदल्यात तुम्ही माझ्या मुलाला तुमच्या वारशातलं काय देणार, ते मला आधी सांगा; आणि दिलेलं वचन पूर्ण कराल, अशी तुमच्या बापजाद्यांची शपथ घ्या.”
ही कहाणी अधिकाऱ्यांना सांगताना गावकरी पुढे म्हणाले :
“मग आम्ही गोंदनाकाला वचन दिलं की, त्याचा मुलगा अरजनाक याला तीन रुका सुपीक जमीन इनाम म्हणून दिली जाईल, तर कांबळे या नावाची शेतजमीन आणि त्यासोबत वरच्या बाजूला असणारं रान, तसंच कातळ जमीनही दिली जाईल. याशिवाय, गावातल्या महारांना मिळणाऱ्या इनाम जमिनीपैकी एक अष्टमांश जमीन अरजनाकला मिळेल, रोख रकमेतला वाटा मिळेल आणि सर्व महारांकडच्या हाडकी-हाडवळा जमिनीमधला एक अष्टमांश वाटा त्याच्याकडे जाईल, एका घरासह निवासी जमिनीमधला एक अष्टमांश वाटाही त्याला मिळेल आणि घरासाठी द्याव्या लागणाऱ्या करामधून त्याला सूट मिळेल, असंही आश्वासन देण्यात आलं. गावाच्या राखणदारीतून — म्हणजेच तराळकीमधून — मिळणारं सगळं मानधन अरजनाकला मिळेल. हे सर्व अरजनाकला, त्याच्या भावंडांना आणि त्यांच्या वंशजांना लागू होत राहील. या अधिकारांच्या मुक्त अंमलबजावणीमध्ये आमच्या कुळातल्या कोणी अडथळा आणला तर तो त्या व्यक्तीच्या पूर्वजांनी दिलेल्या वचनाचा भंग मानला जाईल आणि त्यांच्यावर महाकाळ देवाचा कोप ओढवेल. तर, अशा रीतीने आम्ही संकटातून बाहेर पडण्याकरता अरजनाकला काही लाभ देण्याचं आश्वासन दिलं.”
त्यानंतर गोंदनाकने गावाबाहेर पडत स्वतःच्या सर्व अपराधांची कबुली दिली आणि त्याला देहदंडाची शिक्षा देण्यात आली. पण ही कहाणी इथे संपली नाही. या संदर्भातल्या व्यवहाराची नोंद होणं आवश्यक होतं, जेणेकरून या इनामांबाबत पुढे कधी कोणी प्रश्नचिन्ह उभं केलं, तर त्यावर उत्तरादाखल काही नोंदी हाताशी असाव्यात.
“मग आम्ही सगळे गावकरी गडावर गेलो आणि देशपांड्यांनी आमच्या या व्यवहाराची नोंद करून घ्यावी अशी विनंती केली. गोंदनाक आम्हाला वाचवण्यासाठी मरण पावला आणि आम्ही त्याच्या वारसदारांना वतनाचं आश्वासन दिलं होतं. त्याच्या मुलाला देण्यात येणाऱ्या वतनाला सरकारची मान्यता असणं आवश्यक होतं.”
नोंदणी अधिकाऱ्याने — म्हणजे देशपांड्याने — गावकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. या संदर्भात अधिकारी म्हणाला :
“आम्ही सरकारी अधिकारी म्हणून गावकऱ्यांच्या विनंतीचा विचार केला. गावच्या पाटलाने व इतर गावकऱ्यांनी केलेले गुन्हे आम्ही माफ करू, असं आम्ही सांगितलं. मग आम्ही धाकनाकचा मुलगा जाननाक [‘धाकनाक वलद जाननाक’ — ही त्या काळची संबोधनाची रीत होती] महार याला बोलावलं. तो गावातल्या महार समुदायाचा प्रमुख होता. या नवीन तडजोडीमुळे गावातल्या ज्या इतर मंडळींचा वाटा कमी होणार होता त्यांना या हस्तांतरणाबद्दल कळवून त्यांची सहमती मिळवणं आवश्यक होतं. आम्ही त्यांना विचारलं, ‘गावच्या पाटलांनी जे काही केलं ते तुम्हाला मान्य आहे का? प्रामाणिकपणे सांगा.’ यावर धाकनाक म्हणाला, ‘पाटलांनी दिलेल्या आश्वासनाच्या अंमलबजावणीला माझ्या वंशातलं कोणी कधीही आव्हान देणार नाही वा त्यात अडथळा आणणार नाही, असं मी शपथेवर सांगतो. माझ्या वंशजांपैकी कोणी अरजनाकच्या अधिकारांना आव्हान दिलं, तर ते पूर्वजांनी आमच्या जातीच्या देवासमोर घेतलेल्या शपथेचं उल्लंघन करणारं मानावं.’
“मग आम्ही अधिकाऱ्यांनी आधीच तयार करण्यात आलेल्या यादीमधले घटक नोंदवून घेतले. त्या गावातला महार वतनाचा भाग असणारा औपचारिक सन्मानही अरजनाकला दिला जावा, असं यादीत नमूद केलं होतं. त्यामुळे आम्ही गोंदनाकचा मुलगा अरजनाक याला ठरलेल्या गोष्टी देऊ केल्या.”
भविष्यातल्या कोणत्याही अधिकाऱ्याने या संदर्भातल्या मालकी दस्ताची प्रत तयार केल्यावर मूळ दस्त अरजनाकला परत करावा, असं सांगून हा दस्तावेज संपतो.

(रोहिडा गडाचं छायाचित्र — गिरीभ्रमण या संकेतस्थळावरून)
इथवर मी लिहिलं ते संबंधित दस्तावेजामधल्या कथनाला धरून होतं. पण मूळ भांडणात सरकारी अधिकाऱ्याला मारहाण झाली तेव्हा गोंदनाक महाराला चिथावणी देण्यात किंवा कदाचित त्या मारहाणीतही गावच्या पाटलांचा सहभाग असावा, अशी शंका माझ्या मनात येते. गरीब दलित समुदायातील गोंदनाकाला या प्रकरणात बळी चढवण्यात आलं असावं. अन्यथा, मुळातच पाटलांना आणि त्यांच्या नातेवाईकांना अटक होण्याचं काही कारण नव्हतं. कारवाईसाठी अपराध्यांचा पाठलाग करत आलेल्या घोडेस्वार सरकारी सैनिकांनी गोंदनाकच्या नातेवाईकांचा वा मुलांचा शोध घेतला नसेल का? तर, ते काहीही असलं तरी, पूर्वीच्या काळी महाराष्ट्रात गावाकडून आपला — कनिष्ठ स्तरावरील राखणदार किंवा चाकर म्हणून का होईना — कायमस्वरूपी स्वीकार होणं किती महत्त्वाचं मानलं जात होतं, याचा लक्षणीय दाखला या घटनेतून मिळतो.

आता रोहिडा गडाची अवस्था दयनीय झाली आहे, पण एका प्रवेशद्वाराचा भाग मात्र बराचसा शाबूत आहे. कदाचित वरील प्रसंगातले गावकरी याच प्रवेशद्वाराने गडावर गेले असतील. हे छायाचित्र पावसादरम्यान घेतलेलं आहे. (स्त्रोत)
प्रा. सुमीत गुहा.
इंग्रजीतून भाषांतर : अवधूत डोंगरे