Skip to main content

मेंदूची लवचिकता

9 minutes

मेंदूची लवचिकता
===========

- राजीव उपाध्ये

अनेक वर्षांपूर्वी प्रा० शिवाजीराव भोसले दै० सकाळ मध्ये एक लेखमाला लिहीत असत. एकदा त्यांनी योगावर लेख लिहीला होता. त्या लेखातले एक वाक्य डोक्यात एकदम चपखल बसले होते. त्यांनी लिहीले होते - योग आणि ध्यानाने मूळचा कवी मनुष्य अधिक चांगला कविता करेल, मूळ चित्रकार अधिक चांगला चित्रकार होईल, तसेच एखादा खेळाडू आपला खेळ सुधारेल. थोडक्यात मूळ गुणवत्तेला योगाने पुष्टी मिळू शकते.

हे पटले होते, पण का असावे याचे मात्र कोडे अनेक वर्षे सतावत राहीले. मात्र आता ब्रेन प्लास्टिसिटीच्या अभ्यासाने हे कोडे इतक्या वर्षानी उलगडले. योगामुळे नव्या पेशी आणि नव्या जोडण्य़ांची निर्मिती आणि बाह्य आयुष्यात मूळ कौशल्यांचा सराव यामुळे हे होणे शक्य आहे.

आधुनिक युगात स्पर्धेत टिकायचे असेल तर सतत शिकत राहण्याला, आजुबाजुला घडणार्‍या बदलांशी जुळवून घेण्याला अतिशय महत्त्व आहे. ही सतत शिकण्याची क्षमता मेंदूच्या विशिष्ट गुणधर्मावर अवलंबून असते. वैज्ञानिक परिभाषेत या क्षमतेला मेंदूची लवचिकता (Brain Plasticity) असे संबोधले जाते. अमुकतमुक समाज आपण बदलू शकत नाही, या मागे दडलेले जैविक सत्य म्हणजे त्या समाजात मेंदूच्या लवचिकतेला वेगवेगळ्या कारणांनी पडलेली मर्यादा होय.

समाजाच्या भल्यासाठी हा लेख खरा तर वैद्यकीय व्यावसायिकांनी लिहायला हवा. पण विज्ञानातील नव्या आणि एक्सायटींग कल्पना ज्या वेगाने विकसित होतात, त्या वेगाने समाजातील मोठ्या वर्गापुढे येत नाहीत, हे आपले दूर्दैव.

जीवसृष्टीमध्ये मेंदू ही केवळ जैविक रचना नसून तो सतत बदलणारा, शिकणारा आणि अनुभवांनुसार स्वतःला घड्वणारा एक अत्यंत विलक्षण अवयव आहे. मेंदूची लवचिकता (Brain Plasticity किंवा Neuroplasticity) म्हणजे मेंदूची अशी क्षमता की जिच्यामुळे तो नवीन अनुभव, शिक्षण, जखम, आजार किंवा पर्यावरणीय बदल यांना प्रतिसाद देत आपल्या रचना, कार्यपद्धती आणि चेतापेशींच्या (न्यूरल) जाळ्यात बदल करू शकतो. मेंदू स्थिर नसून तो सतत स्वतःला पुनर्रचित करत राहतो.

पूर्वी चेताविज्ञानात (न्यूरोसायन्समध्ये) असा ठाम समज होता की बालपण आणि किशोरावस्थेनंतर मानवी मेंदूची रचना जवळजवळ कायमस्वरूपी निश्चित होते. असे मानले जात असे की एकदा मेंदू विकसित झाला की त्यामध्ये नवीन चेतापेशी (न्यूरॉन्स) निर्माण होत नाहीत आणि मेंदूच्या कार्यक्षमतेत मूलभूत बदल होणे अशक्य आहे. त्यामुळे मेंदूला झालेली इजा, स्मृतीतील घट किंवा शिकण्यातील अडचणी या कायमस्वरूपी असतात, असा दृष्टिकोन रूढ होता. मात्र गेल्या काही दशकांतील वैज्ञानिक संशोधनाने हा दृष्टिकोन पूर्णतः बदलून टाकला आहे. आधुनिक न्यूरोसायन्सने हे स्पष्ट केले आहे की प्रौढावस्थेतही मेंदू नवीन चेतापेशींच्या जोडण्या तयार करू शकतो, काही कार्ये पुनः शिकू शकतो आणि विशिष्ट परिस्थितींमध्ये स्वतःची पुनर्रचना करू शकतो.

मेंदूच्या लवचिकतेचे महत्त्व केवळ शास्त्रीय पातळीवर पुस्तक आणि प्रयोगशाळांपुरते मर्यादित नाही, तर तिचे परिणाम मानवी जीवनाच्या अनेक घटकांवर दिसून येतात. शिकण्याची प्रक्रिया, उदा० भाषा आत्मसात करणे, कौशल्ये विकसित करणे किंवा सवयी बदलणे, इ० पण मेंदूच्या लवचिकतेवरच आधारलेली असते. तसेच स्ट्रोक, अपघात किंवा मेंदूविकारानंतर रुग्णांचे पुनर्वसन (rehabilitation), गुन्हेगारांचे, व्यसनी लोकांचे पुनर्वसन शक्य होणे, समुपदेशनाचे यश हे मेंदूच्या लवचिकता गुणधर्मामुळेच शक्य होते. याशिवाय, आपली ओळख (identity), व्यक्तिमत्त्व आणि वागणुकीचे नमुने हे देखील मेंदूतील बदलांशी निगडित असतात. म्हणूनच मेंदूची लवचिकता ही मानवाची जुळवून घेण्याची (adaptability) मूलभूत क्षमता मानली जाते.

निरोगी आणि यशस्वी जीवनासाठी मेंदू लवचिक असणे अत्यंत आवश्यक आहे. मानसिक आरोग्य टिकवून ठेवणे, ताणतणावाशी सामना करणे आणि नकारात्मक अनुभवांमधून सावरणे हे मेंदूच्या बदलण्याच्या क्षमतेमुळे शक्य होते. सततचा ताण, भीती किंवा नैराश्य मेंदूतील विशिष्ट चेतापेशींच्या जोडण्या अधिक बळकट करू शकतात; मात्र योग्य सवयी, ध्यान, व्यायाम, सकारात्मक विचार आणि (सकारात्मक) सामाजिक संवाद यांच्या साहाय्याने मेंदू नवीन, अधिक आरोग्यदायी न्यूरल सर्किट्स तयार करू शकतो. त्यामुळे मानसिक आजार हे कायमस्वरूपी शाप नाहीत, तर योग्य हस्तक्षेपाने त्यावर मात करणे शक्य होते.

दुसरे म्हणजे, यशस्वी जीवनासाठी शिकण्याची आणि बदल स्वीकारण्याची क्षमता अनिवार्य आहे, आणि अगोदरच म्हटल्या प्रमाणे ही क्षमता मेंदू लवचिकतेतूनच निर्माण होते. बदलत्या जगात नवीन कौशल्ये आत्मसात करणे, तंत्रज्ञानाशी जुळवून घेणे, चुका सुधारून पुढे जाणे, इ०हे सर्व मेंदू सतत शिकत राहतो म्हणून शक्य होते. जे लोक अपयशाला अंतिम सत्य मानत नाहीत, तर शिकण्याची संधी मानतात, त्यामागे मेंदू लवचिकतेचीच कार्यप्रणाली कार्यरत असते.

तिसरे महत्त्वाचे अंग म्हणजे स्व-ओळख आणि व्यक्तिमत्त्व विकास. आपण कोण आहोत, कसे विचार करतो, कशावर विश्वास ठेवतो, इ० हे सर्व स्थिर नसून अनुभवांनुसार बदलणारे असते. मेंदू लवचिक असल्यामुळेच माणूस जुन्या, मर्यादित विचारसरणीतून बाहेर पडू शकतो, सवयी बदलू शकतो आणि अधिक परिपक्व, संवेदनशील व्यक्तिमत्त्व घडवू शकतो. यामुळे व्यक्ती केवळ बाह्य यश मिळवत नाही, तर अंतर्गत समतोल आणि समाधानही प्राप्त करू शकतात.

याशिवाय, शारीरिक आजार, अपघात किंवा मेंदूला झालेल्या इजेनंतर बाधित कौशल्यांची पुनर्प्राप्ती (recovery) शक्य होणे ही मेंदूच्या लवचिकतेचीच देण्गी आहे. योग्य उपचार, पुनर्वसन आणि प्रशिक्षणाच्या मदतीने मेंदू काही प्रमाणात हरवलेली कार्ये पुन्हा शिकू शकतो. यामुळे आशा निर्माण होते आणि ती निरोगी/यशस्वी जीवनाचा एक महत्त्वाचा घटक आहे.

एकूणच पाहता, मेंदूची लवचिकता माणसाला परिस्थितींचा गुलाम न बनता स्वतःचे आयुष्य घडवण्याची क्षमता देते. ती आपल्याला शिकण्यास, बदलण्यास, सावरण्यास आणि सतत पुढे जाण्यास सक्षम बनवते. म्हणूनच निरोगी आणि यशस्वी जीवन म्हणजे केवळ अनुकूल परिस्थितींचा परिणाम नसून, लवचिक मेंदूची जाणीवपूर्वक जोपासना हा त्याचा खरा पाया आहे.

शोषण आणि मेंदूची लवचिकता

मेंदूचा हाच गुणधर्म जेव्हा जाणीवपूर्वक आणि अनैतिक पद्धतीने वापरली जातो, तेव्हा तो ब्रेनवॉशिंग या धोकादायक प्रक्रियेचे रूप घेतो. त्यामुळे मेंदूची लवचिकता आणि ब्रेनवॉशिंग यांचा संबंध समजून घेणे आजच्या काळात अत्यंत महत्त्वाचे ठरते.

ब्रेनवॉशिंग म्हणजे एखाद्या व्यक्तीचे विचार, श्रद्धा आणि ओळख हळूहळू बदलण्याची प्रक्रिया, इ०तीही व्यक्तीच्या स्वातंत्र्याला मर्यादा घालून. हे एका क्षणात होत नाही. पुनरावृत्ती, भीती, अपराधभाव, बक्षीस, सामाजिक एकटेपण आणि भावनिक दबाव यांच्या साहाय्याने मेंदूतील विशिष्ट न्यूरल सर्किट्स बळकट केली जातात, तर पर्यायी विचारांचे मार्ग कमकुवत केले जातात. वैज्ञानिकदृष्ट्या पाहता, हे सर्व मेंदू लवचिकतेचाच वापर आहे; फरक इतकाच की हा वापर व्यक्तीच्या हितासाठी नसून नियंत्रणासाठी केला जातो.

धर्माच्या क्षेत्रात ब्रेनवॉशिंगची उदाहरणे अनेकदा दिसून येतात. श्रद्धा ही माणसाला मानसिक आधार देणारी शक्ती असू शकते; पण जेव्हा एखादी विचारसरणी “एकमेव सत्य” म्हणून लादली जाते, तसेच प्रश्न विचारणे पाप मानले जाते, आणि भीती किंवा स्वर्गनरकाच्या कल्पनांद्वारे भावनिक दबाव निर्माण केला जातो, तेव्हा मेंदू हळूहळू एका ठरावीक चौकटीत अडकतो. सततच्या धार्मिक उपदेशातून विशिष्ट विचारसरणीची पुनरावृत्ती होते, त्यामुळे त्या विचारांशी संबंधित न्यूरल मार्ग अधिक मजबूत होतात. परिणामी व्यक्ती स्वतःच्या विवेकाऐवजी दिलेल्या आदेशांनाच नैतिक सत्य मानू लागते.

राजकारणात ब्रेनवॉशिंग अधिक सूक्ष्म पण अधिक प्रभावी स्वरूपात आढळते. “आपण” विरुद्ध “ते” अशी विभागणी, सतत निर्माण होणारी भीती, शत्रूची प्रतिमा, आणि भावनिक घोषणांद्वारे जनमत घडवले जाते. एकाच प्रकारचे संदेश, एकाच भाषेत, विविध माध्यमांतून वारंवार दिले जातात. त्यामुळे मेंदूला वेगळा विचार करण्याची संधी कमी मिळते. मेंदू लवचिक असल्यामुळे ही सततची पुनरावृत्ती लोकांच्या विचारसरणीत खोलवर रुजते, आणि कालांतराने तीच विचारसरणी “स्वतःची” वाटू लागते. येथेही बदल घडतो, पण तो स्वेच्छेने नव्हे, इ०तर नियोजित प्रभावामुळे.

आजच्या काळात सोशल मीडिया हे ब्रेनवॉशिंगचे सर्वात प्रभावी साधन बनले आहे. अल्गोरिदम व्यक्तीला तिच्याच मतांशी जुळणारी माहिती वारंवार दाखवतात. परिणामी “echo chamber” तयार होतो. जिथे वेगळे दृष्टिकोन दिसतच नाहीत. लाईक्स, शेअर्स आणि व्हायरल कंटेंट हे मेंदूच्या reward system ला सतत उत्तेजन देतात. हळूहळू मेंदू विशिष्ट प्रकारच्या विचारांना, भावनांना आणि प्रतिक्रियांना सवयीचा प्रतिसाद देऊ लागतो. ही प्रक्रिया दिसायला निरुपद्रवी वाटते, पण दीर्घकाळात ती व्यक्तीची विचारस्वातंत्र्य क्षमता कमी करू शकते.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे, मेंदूची लवचिकता मूलत: चांगली किंवा वाईट नाही. ते एक जैविक सत्य आहे. तीच क्षमता शिक्षण, उपचार आणि पुनर्वसनासाठी वापरली जाऊ शकते; आणि तीच क्षमता ब्रेनवॉशिंगसाठीही वापरली जाऊ शकते. फरक हेतूमध्ये आहे. पुनर्वसन व्यक्तीला स्वायत्त बनवते, तर ब्रेनवॉशिंग तिला अवलंबित करते. एक मुक्त विचारांची दारे उघडते, तर दुसरे ती हळूहळू बंद करते.

म्हणूनच आजच्या काळात मेंदूच्या लवचिकतेची जाणीव असणे म्हणजेच स्वतःचे मानसिक स्वातंत्र्य जपणे होय. प्रश्न विचारण्याची सवय, विविध दृष्टिकोनांचा संपर्क, माध्यम साक्षरता आणि आत्मपरीक्षण इ० सर्व मेंदू लवचिकतेचे संरक्षणात्मक उपयोग आहेत. कारण माणूस बदलू शकतो, हे खरे आहे; पण तो बदल स्वतःच्या जाणीवेतून झाला पाहिजे, बाह्य दबावातून नव्हे. हाच मेंदू लवचिकता आणि ब्रेनवॉशिंग यांच्यातील मूलभूत नैतिक फरक आहे.

पुनर्वसनात मेंदूच्या लवचिकतेचे महत्त्व

मेंदूची लवचिकता (Brain Plasticity / Neuroplasticity) ही संकल्पना गुन्हेगार आणि व्यसनी व्यक्तींच्या पुनर्वसनात (rehabilitation) अत्यंत महत्त्वाची ठरते, कारण ती “माणूस बदलू शकत नाही” या खोलवर रुजलेल्या समजुतीलाच आव्हान देते. मेंदू लवचिक आहे, म्हणजेच वर्तन, सवयी आणि विचारसरणी कायमची ठरलेली नसते, तर ती बदलता येते. हाच पुनर्वसनाचा खरा वैज्ञानिक पाया आहे.

परंपरागत दृष्टिकोनात गुन्हेगारी प्रवृत्ती किंवा व्यसन हे व्यक्तीच्या “स्वभावाचे दोष” मानले जात. त्यामुळे शिक्षा केंद्रस्थानी आणि सुधारणा दुय्यम ठरायची. मात्र मेंदूकडे लवचिकतेच्या दृष्टीने पाहिले असता, गुन्हेगारी वर्तन आणि व्यसन हे विशिष्ट न्यूरल सर्किट्सचे परिणाम असतात आणि ते परत-परत येणार्‍या अनुभवांमुळे, आघातांमुळे, सामाजिक वातावरणामुळे आणि चुकीच्या सवयींमुळे मजबूत झालेले असतात. जमेची बाजू अशी की जी सर्किट्स तयार होऊ शकतात, तीच कमकुवतही होऊ शकतात. पण त्यासाठी नवीन, अधिक आरोग्यदायी सर्किट्स निर्माण हो्णे आवश्यक शकतात. त्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या वर्तनात बदल समाजाला अपेक्षित असेल तर ती समाजाची पण जबाबदारी ठरते.

व्यसनाच्या बाबतीत, मेंदूतील “reward system” (बक्षीस यंत्रणा) विशिष्ट पदार्थ किंवा वर्तनाशी अतिशय घट्ट जोडली जाते. त्यामुळे व्यक्तीला तात्पुरत्या सुखासाठी दीर्घकालीन नुकसान स्वीकारा्वे लागते. परंतु योग्य उपचार, समुपदेशन, नियमित सराव, सामाजिक आधार आणि अर्थपूर्ण पर्याय उपलब्ध झाल्यास मेंदू हळूहळू नवीन आनंददायी आणि सुरक्षित मार्ग शिकतो. व्यसनमुक्ती म्हणजे इच्छाशक्तीची लढाई नसून, मेंदूला नव्याने शिकवण्याची प्रक्रिया आहे आणि हे शिकणे मेंदू लवचिकतेमुळेच शक्य होते.

गुन्हेगारांच्या पुनर्वसनातही हीच बाब लागू होते. अनेक गुन्हेगारी वर्तनामागे आक्रमकता, भीती, असुरक्षितता किंवा बालपणीचे आघात असतात. अशा व्यक्तींना केवळ शिक्षा दिल्यास त्यांच्या मेंदूतील जुने, हानिकारक नमुने अधिकच बळकट होतात. उलटपक्षी, शिक्षण, कौशल्यविकास, भावनिक साक्षरता, समुपदेशन आणि सकारात्मक सामाजिक अनुभव दिल्यास मेंदू नवीन प्रतिक्रिया (संयम, सहानुभूती आणि जबाबदारी) शिकतो.

मेंदूच्या लवचिकतेचा दृष्टिकोन पुनर्वसनाला नैतिक आणि मानवी अधिष्ठान देतो. त्यामुळे “एकदा गुन्हेगार, कायम गुन्हेगार” किंवा “व्यसनी म्हणजे कधीच सुधारत नाही” हे विधान वैज्ञानिकदृष्ट्या चुकीचे आहे. माणूस बदलू शकतो. परंतु त्यासाठी योग्य वातावरण, पोषक आहार, वेळ, आणि सातत्य आवश्यक आहे.

थोडक्यात, मेंदूची लवचिकता ही संकल्पना चुकीच्या मार्गाने गेलेल्या व्यक्तींच्या पुनर्वसनाची आशा निर्माण करते. ती समाजाला सूडाच्या ऐवजी सुधारण्याची, शिक्षा देण्याऐवजी समजून घेण्याची आणि नाकारण्याऐवजी नव्याने संधी देण्याची दृष्टी देते. गुन्हेगार आणि व्यसनी व्यक्ती केवळ “समस्या” नसून, योग्य हस्तक्षेपाने समाजासाठी पुन्हा उपयुक्त, जबाबदार नागरिक बनू शकतात, आणि यामागे मेंदूची लवचिकता हेच खरे वैज्ञानिक सत्य उभे आहे.

प्रभाव पाडणारे घटक

मेंदूची लवचिकता (Neuroplasticity) म्हणजे अनुभव, शिकणे, जखम किंवा वातावरणातील बदलांमुळे मेंदूच्या रचना व कार्यामध्ये होणारे बदल. खालील घटक मेंदूच्या लवचिकतेवर महत्त्वाचा प्रभाव टाकतात:

वय व विकासाचा टप्पा - बालपणात मेंदू अत्यंत लवचिक असतो. नवीन जोडणी (synapses) जलद तयार व काढून टाकली जाते. प्रौढावस्थेत लवचिकता टिकून राहते, पण ती विशिष्ट व अनुभव यावर आधारित असते.

अनुभव व शिकणे - पुन्हापुन्हा, प्रयत्नपूर्वक शिकणे (भाषा, संगीत, ध्यान, कौशल्याधारित हालचाली) संबंधित चेतापेशींची जाळी (न्यूरल सर्किट्स) मजबूत करते आणि अप्रभावी जोडण्या कमी करते.

लक्ष (एकाग्रता) व प्रेरणा - लक्ष केंद्रित असेल तरच बदल घडतात. बक्षीस, अर्थपूर्णता किंवा भावनिक महत्त्व असल्यास डोपामिन व अ‍ॅसिटिलकोलिनसारखी चेतारसायने लवचिकता वाढवतात. ध्यानामुळे मेंदूची लवचिकता वाढून व्यक्तीमध्ये आमुलाग्र बद्ल घडतात, असे आधुनिक संशोधन सांगते.

पर्यावरण - समृद्ध पर्यावरणामध्ये नावीन्य, सामाजिक संवाद, संवेदनात्मक विविधता जोडण्या वाढवते. एकसुरी वातावरण लवचिकतेला आळा घालते.

झोप (विश्रांती) - विशेषतः संथ लहरींनी युक्त व REM झोप शिकताना झालेल्या चेतापेशीय बदलांना स्थिर करते आणि स्मृती दृढ करते.

ताण व भावनिक अवस्था

नियंत्रित, अल्पकालीन ताण शिकण्यास मदत करू शकतो; पण दीर्घकालीन ताणामुळे (कॉर्टिसॉल वाढ) विशेषतः हिप्पोकॅम्पस व उपाग्रखण्ड (प्रीफ्रंटल कॉर्टेक्स) मध्ये लवचिकता कमी होते.

शारीरिक व्यायाम

एरोबिक व्यायामामुळे BDNF सारखे न्यूरोट्रॉपिक घटक वाढतात, ज्यामुळे जोडण्यांची निर्मिती, मर्यादित भागांत नवीन चेतापेशींची निर्मिती आणि मेंदूचा रक्तपुरवठा सुधारतो.

जखम व आजार - स्ट्रोक किंवा इजा झाल्यानंतर काही काळ लवचिकता वाढते, त्यामुळे कार्यांची पुनर्रचना शक्य होते. मात्र न्यूरोडिजेनेरेटिव्ह आजार व दीर्घकालीन दाह लवचिकतेवर मर्यादा आणतात.

आनुवंशिक व अधिजनुकीय घटक - जनुकांमुळे लवचिकतेची मूलभूत चौकट ठरते; तर अनुभवांमुळे कोणते जीन सक्रिय/निष्क्रिय होतील हे अधिजनुकीय (एपिजेनेटिक) प्रक्रियांद्वारे बदलते.

सरावाची रचना - श्रेण्यांमध्ये विभागलेला सराव, बदलता सराव आणि हळूहळू वाढणारे आव्हान इ० हे सगळे केवळ यांत्रिक पुनरावृत्तीपेक्षा अधिक टिकाऊ लवचिक बदल घडवतात.

या घटकांचा सूक्ष्म विचार केला तर व्यक्तीमध्ये किंवा व्यक्तींचा समूह असलेल्या समाजात बदल घडविण्यामध्ये असलेली आह्वाने जीवशास्त्रीय पातळीवर समजाऊन घेणे आणि आवश्यक असलेल्या प्रयत्नांची दिशा ठरवणे सोपे जाते.

संदर्भ -

१. Neuroplasticity
Moheb Costandi, The MIT Press Essential Knowledge series, 2016

२. https://youtu.be/RDVgfFzZVsA?si=iG_3yhHP3rmtn3mG

Node read time
9 minutes

गोगोल Wed, 25/02/2026 - 23:07

मला जरा कुऱ्हाडीला धार लावायचीच होती. हे तुमच्या साठी .. प्लीज पर्सनली घ्याच आणि थोडीशी तुमच्या मेंदूची लवचिकता पण वाढवाच

https://aisiakshare.com/comment/208904#comment-208904