Skip to main content

नवे तंत्रज्ञान आणि जुने वाद

3 minutes

नवे तंत्रज्ञान आणि जुने वाद
===============

-राजीव उपाध्ये

आमच्या घरात भावनिक मूल्य असलेल्या माझ्या आईवडीलांच्या अनेक वस्तू आहेत. आईने *१ल्या नोकरीच्या कमाईतून* आजीआजोबांना लग्नाच्या वाढदिवसाला भेट दिलेले १किलो वजनाचे चांदीचे ताट आहे. काही लोकांना ही जाहिरात वाटेल, पण माझ्यासाठी ते ताट आईवर (आणि नंतर माझ्यावर) झालेल्या कृतज्ञतेच्या संस्कारांचे प्रतिक आहे. तसेच माझ्या वडीलांनी त्यांच्या युरोपातील वास्तव्यात विकत घेतलेला टाईपरायटर आणि १ला एसेलार कॅमेरा पण आहे. हा कॅमेरा वापरून वडीलांनी फोटो थोडेफार काढले, पण हा कॅमेरा फक्त बघायला माझ्या लहानपणी वडीलांच्याकडे अनेक जण येत असत. त्या आठवणीनी मला अजूनही गुदगुल्या होतात.

हा कॅमेरा मला हाताळायची परवानगी नव्हती. त्यात फोटोग्राफी हा तेव्हा तसा खर्चिक छंद मानला जाई. १९८६ साली वडील गेल्यानंतर बराच हट्ट केल्यानंतर मला हा कॅमेरा वापरायची परवानगी मिळाली. मी तो वापरला पण एका दडपणाखालीच! पण तेव्हा आय०आय०टी०मध्ये प्रत्येक हॉस्टेलमध्ये एक डार्करूम असे याचे बरेच कौतूक वाटे. मी एकदोनदा वापरली पण होती. तेव्हा तोपर्यंत रंगीत फोटोग्राफी स्थिरावली होती आणि त्यामुळे कृष्ण्धवल फोटोग्राफीचे आकर्षण कमी होऊ लागले होते. पण नॅशनल जिओग्राफीक सारख्या फोटोग्राफी हा जणु आत्मा असलेल्या मासिकांचे महत्त्व कमी झाले नव्हते. कल्पना आणि तंत्राला (प्रकाशाची समज, डार्करूममध्ये वापरली जाणारी रसायने इ०ची समज) तेव्हा विशेष महत्त्व असायचे. पारंपरिक कृष्णधवल फोटोग्राफी मध्ये रोल धुवायला टाकल्यावर त्याचे प्रिंट मिळेपर्यंत काही दिवस वाट बघावी लागे. मग रंगीत फोटोग्राफीचे तंत्रज्ञान सार्वत्रिक झाल्यावर हा कालावधी काही तासांवर आला.

अंदाजे सन २००० सालानंतर डिजिटल फोटोग्राफीचे तंत्रज्ञान वेगाने वाढत गेले. डार्करूम आणि फिल्म इतिहासजमा होत गेली. पुढे मोबाईलमध्ये कॅमेरा गेल्यावर तर एक उत्कर्ष बिंदू गाठला गेला. माझ्यापुरते बोलायचे झाले तर नंतर पुढे डीडब्लू हा जर्मन टिव्ही चॅनेल नियमित बघताना माझ्यातला सुप्त फोटोग्राफर परत जागा होऊ लागला. हळूहळू एकंदर ६ डीजिटल कॅमेरे, ३ प्रिमियम लेन्सेस आणि अन्य सामग्री असा ऐवज मी घेतला असेन. पण भरपूर मनसोक्त फोटोग्राफी करून हौस भागवली. देशात कुठे तरी एखाद्या होर्डींगवर किंवा पोस्टरवर मी काढलेला फोटो लागल्याचे समजते, तेव्हा सुखावायला होते.

फिल्म फोटोग्राफी आणि डीजीटल फोटोग्राफीमधील सर्वात मोठा फरक म्हणजे डिजिटलमध्ये अनेक मर्यादा जवळजवळ नाहीशा झाल्या. त्यामुळे काहींना असे वाटले की यामुळे फोटोग्राफी “शूट first, think later” झाली आहे. फोटोची विश्वसनीयता फिल्म फोटोग्राफीत खुपच होती, कारण डार्करुममध्ये फोटोत हस्तक्षेप करण्याला खुपच मर्यादा होत्या. नव्या संगणकीय संपादन साधनांमुळे डीजिटल प्रतिमामध्ये ढवळाढवळ करता येऊ लागल्याने प्रतिमांच्या विश्वसनीयतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

डिजिटल फोटोग्राफी जेव्हा सर्वमान्य होऊ लागली तेव्हा अनेक पारंपरिक फोटोग्राफर्सना असे वाटत होते की आता फोटोग्राफीची खरी मजा आणि कारागिरी संपेल. फिल्म, डार्करूम, रसायने आणि प्रतीक्षेची सवय असलेल्या पिढीला हा बदल सहज स्वीकारणे सोपे नव्हते. पण हळूहळू लक्षात आले की डिजिटल तंत्रज्ञानाने फोटोग्राफीचा अंत केला नाही, तर उलट तिचे क्षेत्र अधिक व्यापक केले. अधिक लोकांना फोटोग्राफीची दारे खुली झाली आणि अभिव्यक्तीच्या नवीन शक्यता निर्माण झाल्या. ए०आय० तंत्रज्ञान आल्यानंतर एक नवा टप्पा गाठला गेला.

ए०आय०च्या युगात मात्र प्रतिमाकार आणि छाया/प्रकाश चित्रकार या दोन स्वतंत्र भूमिका निर्माण केल्या. प्रतिमाकाराला मनातली कल्पना शब्दात नेमकेपणाने सांगता येणे महत्त्वाचे ठरले. पण एक नवा वाद निर्माण झाला. ए०आय निर्मित प्रतिमा म्हणजे फोटोग्राफी नाही. पण या वादात एका गोष्टी कडे अक्षम्य दूर्लक्ष झाले. ते म्हणजे नव्या तंत्रज्ञानाने सर्जनशीलतेच्या कक्षा रूंदावत जातात. कौशल्य नाहीसे होत नाही. त्याचे स्वरूप बदलते. मानवाला कल्पना पण करता येणार नाही अशी प्रकाश योजना, रंगपटले यांचा कमालीच्या कौशल्याने वापर करणे अल्गोरिदमचे पॅरामिटर्स पुढेमागे करुन शक्य झाले. डिजिटल फोटोग्राफीने काही तांत्रिक कौशल्ये बाद केली तसेच ए०आय० निर्मित प्रतिमामुळे प्रतिमासंपादनाचे (फोटोशॉप) कौशल्य गौण ठरवले.

फोटोग्राफीची मूळ कल्पना कदाचित प्रकाश पकडण्याची असली, तरी प्रत्यक्षात हळूहळु फोटोग्राफी नेहमीच तत्कालीन उपलब्ध तंत्रज्ञान आणि कल्पनाशक्ती यांच्या संगमावर उभी राहिली आहे. फिल्मपासून डिजिटलपर्यंत आणि आता ए०आय० पर्यंत हा प्रवास त्या संगमाला अधिक विस्तृत करत आहे. टंकलेखन, वर्डप्रोसेसिंग, डीटीपी ते आता ए०आय० निर्मित पुस्तक निर्मितीच्या प्रवासाची कथा पण अशीच सांगता येईल.

माझ्यासाठी मात्र या सगळ्या बदलांच्या पलीकडे एक साधी गोष्ट महत्त्वाची वाटते. वडिलांनी युरोपातून आणलेला तो जुना कॅमेरा आणि टाईपरायटर अजूनही आमच्या घरात चालू स्थितीत आहे. या वस्तूना हात लावण्याची परवानगी मिळाली तो क्षण, तो कॅमेरा वापरून फोटो काढताना आलेले दडपण, आणि नंतर हळूहळू फोटोग्राफीची लागलेली गोडी, थोड्याफार यशाने मिळालेला आनंद या सगळ्या आठवणी ताज्या असल्याने कोणत्याही तंत्रज्ञानापेक्षा मोठ्या आहेत.

तंत्रज्ञान बदलत राहील पण प्रतिमेच्या मागची मानवी उत्सुकता, क्षण टिपून ठेवण्याची इच्छा आणि त्यातून मिळणारा आनंद हे मात्र कायम राहतील. कदाचित म्हणूनच, कॅमेरे बदलतात; पण फोटोग्राफरच्या मनातला तो पहिला आश्चर्याचा क्षण तसाच टिकून राहतो.

Node read time
3 minutes