Skip to main content

कलांच्या भिंतींपल्याड - अरुण खोपकर

7 minutes

कलांच्या भिंतींपल्याड - अरुण खोपकर

 

कलांच्या भिंतींपल्याड

अरुण खोपकर

(महाराष्ट्र फाउंडेशन अमेरिका यांच्या वतीने १९९४पासून साहित्य क्षेत्रातील तर १९९६पासून समाजकार्य क्षेत्रातील व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरविले जाते. या पुरस्कारांचे प्रवर्तक सुनील देशमुख यांचे तीन वर्षांपूर्वी निधन झाले, तेव्हापासून या पुरस्कारांचे नामकरण ‘सुनील देशमुख महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार’ असे केले आहे. २०२५ या वर्षीचे पुरस्कार प्रदान करण्यासाठी १७ जानेवारी २०२६ रोजी पुणे येथील एस. एम. जोशी फाउंडेशनच्या सभागृहात एक कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात अरुण खोपकर यांना गणेश देवी यांच्या हस्ते दिलीप वि. चित्रे साहित्य जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला, तो पुरस्कार स्वीकारताना केलेले हे भाषण आहे.)

 

प्रमुख अतिथी श्री. गणेश देवी, महाराष्ट्र फाऊंडेशन (अमेरिका), ‘मासूम’ संस्था आणि ‘साधना ट्रस्ट’ या सर्वांचे पदाधिकारी, साहित्य व समाजकार्य पुरस्कार निवड समित्यांचे समन्वयक आणि सदस्य, व्यासपीठावरील ज्येष्ठ व्यक्ती, सर्व पुरस्कारविजेते आणि उपस्थित सज्जन. सुनील देशमुख महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार २०२५मधील ‘दिलीप वि. चित्रे साहित्य जीवनगौरव पुरस्कार’ मला दिला याबद्दल सर्व संबंधितांचे मनापासून आभार मानतो. महाराष्ट्र फाऊंडेशनची स्थापना करून अनेक वर्षे त्याचे कार्य चालवलेल्या सुनील देशमुख, दिलीप वि. चित्रे आणि इतर दिवंगत व्यक्तींचे स्मरण करतो.

 

हा पुरस्कार साहित्यातील योगदानाबद्दल दिला गेला असला, तरी मी व्यवसायाने साहित्यिक नाही आणि वृत्तीनेही नाही. मी प्रथम चित्रपट दिग्दर्शक आहे. अपघाताने साहित्यात पडलो आणि मग दोनचार हात मारत पोहत राहिलो. आनंद वाटतो, म्हणूनच अजूनही तरंगतो आहे.

 

वृत्तीने साहित्यिक नाही, याचा अर्थ मला साहित्यात रस नव्हता, असे मात्र मुळीच नाही. मला मराठी शिकवायला शिवाजी पार्कच्या बालमोहन विद्यामंदिर या शाळेत बखरवाड्याचे विद्वान इतिहासकार डॉ. र. वि. हेरवाडकर, प्रा. गंगाधर पाटील अशांसारखे अनेक उत्तम शिक्षक होते. त्यांनी पाठ्यपुस्तकांच्या मर्यादांच्या पलीकडच्या उत्तम मराठी साहित्याचा शाळेतच परिचय करून दिला. शं. वि. सोहोनी या आमच्या इंग्रजीच्या शिक्षकांनी ‘अ न्यू डिक्शनरी ऑफ लिव्हिंग इंग्लिश’ हा अव्वल दर्जाचा इंग्रजी-मराठी कोश लिहिला. इंग्रजी भाषेत बोली भाषेची जान आणली. यांनीच पुढे आम्हाला साहित्याच्या प्रयोगशाळेत नेले.

 

साहित्याच्या प्रयोगशाळेत नेले म्हणजे काय केले? सोहोनी सर एखादा चांगला आणि समकालीन इंग्रजी निबंध, लेख किंवा कथा उत्तम उच्चारासहित वाचून दाखवत. मग त्यावर प्रश्न विचारीत. हे प्रश्न, ‘काय लिहिले आहे,’ यापेक्षा ‘कसे लिहिले आहे’ आणि ‘तसेच का लिहिले आहे’ यावर लक्ष केंद्रित करीत.

 

सोहोनी सर स्वतः साध्या, नेमक्या, पण बोलक्या इंग्रजीचे वेचे निवडत. वाचताना अगदी समोरच्या माणसाशी बोलल्यासारखे वाचत. त्यांनी कधी शब्द किंवा वाक्प्रचार पाठ करायला सांगितले नाही. म्हणींची उजळणी करून घेतली नाही. खरे तर, त्यांनी एकही धडा शिकवला नाही. बोलचालीची आणि सफाईदार इंग्रजी भाषा मात्र शिकवली होती.

 

मी पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये (FTII) दाखल झालो, तेव्हा पहिल्या वर्षी प्राध्यापक सतीश बहादुर आणि भास्कर चंदावरकर हे अध्यापक होते. या दोघांच्या अध्यापनात आणि सोहोनींच्या अध्यापनात अनेक साम्यस्थळे होती.

 

बहादुरांनी सिनेप्रतिमांच्या आत दडलेल्या रचनाघटकांची जाणीव करून दिली. भास्कर लवकरच माझा जवळचा मित्र झाला. त्याने विविध संगीतकार, संगीतपद्धती आणि त्यांच्या वैशिष्ट्यांची ओळख करून दिली. एरवी दुर्लक्षित अशा पार्श्वसंगीताकडे आणि त्याच्या प्रचंड प्रभावाकडे लक्ष वेधले. दोघांचाही भर स्वतःच्या वक्तव्यापेक्षा, विद्यार्थ्याला अनुभव घेण्याचे वातावरण निर्माण करण्यावर होता.

 

ऋत्विक घटक, मनी कौल आणि कुमार शहानी हे उत्तम अध्यापक होते आणि स्वतः महान कलाकार होते. ऋत्विकदा तर जगातल्या अत्यंत श्रेष्ठ दिग्दर्शकांत गणले जातात. ते जितके महान दिग्दर्शक होते, तितकेच प्रतिभाशाली गुरूही होते.

 

ऋत्विकदांचे वर्ग दारूच्या गुत्त्यांत चालत. तिथे ते आपल्या मंत्रशक्तीने वाल्मिकीपासून स्त्राव्हिन्स्कीपर्यंत कुणालाही प्रकट व्हायचे आमंत्रण करत. त्यांच्या आमंत्रणाचा नेहमीच मान राखला जाई. निमंत्रित व्यक्ती ऋत्विकदांना माध्यम करून आमच्याशी संवाद करीत असे. या गुरूंकडून जे शिक्षण मिळाले ते केवळ तंत्रज्ञान नव्हते. ती जीवनपद्धती होती. सर्व कलांच्या पोटात शिरायचे कसब होते.

 

मी साठोत्तरीच्या अनियतकालिकांच्या चळवळीतून सिनेमात गेल्याने, वयाच्या मानाने साहित्याचे वाचन भरपूर झाले होते. परंतु चित्र कसे वाचावे, खयालाची बंदिश कशी उलगडली जाते, सिंफनीचे भाग कसे ओळखावे, प्रकाशयोजनेचा भावनिक परिणाम कसा होतो इ. विषयी कधी स्वतःला प्रश्न विचारले नव्हते. या त्रुटीमुळे सिनेप्रशिक्षणाच्या काळात एकही कथात्मक पुस्तक न वाचण्याचा आणि इतर कलांशी परिचय करून घेण्याचा मी स्वतःशी निर्णय घेतला होता.

 

मी तासन्‌तास लायब्ररीत बसून जगातल्या उत्तमोत्तम चित्रकारांची व चित्रशैलीची पुस्तके निरखून पाहू लागलो. चित्र कसे पाहायचे ते चित्रकार मित्रांच्या स्टुडिओंत शिकू लागलो. नृत्याच्या मूलतत्त्वांचे पाठ मला कथक गुरू लच्छू महाराज यांची सेवा करताना मिळाले. पंडित शरच्चंद्र आरोलकर यांच्याकडून खयाल संगीताकडे पाहायची नजर मिळाली. त्यांनी समजावून देताना गायलेल्या नमुन्यांत ‘बाळा जो जो रे’ या अंगाईपासून टप्प्यापर्यंत सर्व नमुने ऐकायला मिळत.

 

श्री. के. भरत अय्यर हे आनंद कुमारस्वामी या जागतिक कीर्तीच्या कलाविदांचे जवळचे मित्र व त्यांच्या गौरवग्रंथाचे संपादक होते. साधा सुती वेश परिधान करणाऱ्या या ऋषितुल्य व्यक्तीबरोबर कथकली, भरतनाट्यम, कुडियात्तम इ. नृत्यशैलींचे कार्यक्रम पाहताना दाक्षिणात्य नृत्यप्रकारांचा ओनामा मिळाला.

 

चार्ल्स कोरिया या ज्येष्ठ स्थपतीवर चित्रपट करताना चार वर्षे गेली. या काळात स्थापत्यकलेतल्या विविध प्रवाहांतल्या श्रेष्ठ नमुन्यांची ओळख झाली. संस्कृतींच्या संकरातून आणि संगमातून महान कलाकृती कशा निर्माण होतात ते कळू लागले.

 

कलावंतांकडे शिकताना सतत जागृत राहायला लागते. कारण अत्यंत महत्त्वाची तत्त्वे त्यांच्या ठायी रोजची वाक्ये असतात. आरोलकरबुवांनी एकदा मींडेचे महत्त्व समजावून देताना सांगितले की, संपूर्ण भारतीय कलेमध्ये दोन बिंदूंतले कमीतकमी अंतर साधणारी कलात्मक रेषा, ही सरळ रेषा नसून वक्र रेषा असते. खयाल, भारतीय शिल्प, सूक्ष्मचित्रे, स्थापत्य आणि नृत्य या सर्व कलांना लागू होणारे हे प्रभावी सूत्र कोणत्याही तत्त्ववेत्त्याच्या ग्रंथात मिळणार नाही.

 

महान कलाकारांच्या आणि कलाकृतींच्या सान्निध्यात राहून एक गोष्ट चांगलीच जाणवली. ती म्हणजे कलाकलांत भिंती नसतात. एका कलेचा रस दुसऱ्या कलेत सहज जाऊ शकेल असे अंतर्त्वचांचे पापुद्रे त्यांना तात्पुरते वेगळे करीत असतात. प्रत्येक कलेतला श्रेष्ठ अनुभव शेवटी काव्यात्म असतो.

 

त्रिदंडी संन्यासानंतर पुन्हा साहित्यात उतरलो, तेव्हा त्याच्याकडे पाहण्याची दृष्टीच बदलली. कधी त्यात प्रकाशयोजना दिसू लागल्या तर कधी रंगरचना. कधी आकार, तर कधी चलनाचे प्रकार. मग साहित्यातली दृश्ये ग्रहण करणाऱ्या मानसिक लेन्सेस जाणवू लागल्या. विषयवस्तूचे अवाजवी महत्त्व एकदम उतरले. घाटातून आशयापर्यंत पोहोचण्याची प्रक्रिया आत्मसात होऊ लागली. कलाकृतीचा विषय दिलेला असतो; पण आशय दिलेला नसतो. प्रत्येक रसिकाला तो वाटा, आडवाटांनी शोधावा लागतो. तो सर्वांना सारखा हस्तगत होतही नसतो ही जाणीव दृढ झाली.

 

विविध भाषांबद्दल मला लहानपणापासून प्रेम होते. वयाच्या तिसऱ्या-चौथ्या वर्षी मी गादीवर बसलेल्या भास्कर पानवाल्याच्या मांडीवर बसून हौसेने उर्दूची मुळाक्षरे गिरवीत असे. तरुणपणी प्रत्येक नवीन भाषा शिकताना परत लहान मूल होऊन जात असे.

 

नवी भाषा शिकायला सुरुवात केली की, मग तीन ते चार वर्षे आपली सर्व ज्ञानेंद्रिये त्या भाषेत भाषांतरित करून घ्यायला लागतात. मगच जीभ नीट वळू लागते. कानांना नीट कळू लागते. रंग आपले संगती होतात. त्वचा वेगळ्या प्रकारे थरारू लागते. मनाला शब्दांच्या नव्या लयी कळतात. एका भाषेत ‘पायाचे दगड’ म्हणून गृहीत धरलेले क्रियापद, विशेषण, काल, विभक्ती आणि इतर मूलभूत घटक हेदेखील किती भाषासापेक्ष आहेत हे जाणवते. ते सारे भाषेपलीकडल्या चिरंतनाकडे खुणावू लागतात.

 

जितक्या भाषा तुम्ही शिकाल, तितकी तुमची मातृभाषा अधिक समृद्ध होते. ग्योअट हा जर्मन महाकवी एकदा म्हणाला होता की, ज्याला मातृभाषेखेरीज इतर भाषा येत नाहीत, त्याला मातृभाषाही नीट येत नसण्याची दाट शक्यता आहे.

 

जे भाषांच्या बाबतीत होते, तेच संस्कृतींच्या बाबतीत. जितक्या संस्कृतींची तुमची जाण विकसित होते, तितकी आपल्या स्वतःच्या संस्कृतीची जाण गाढ होते. मग तिला तुम्ही आईच्या देहासारखे प्रेमाने जाणता. तिचे सुरूप आणि कुरूप दोन्ही तुम्हाला समजते. अडाणी अभिमान गळून पडतो आणि उरते फक्त प्रेम.

 

साहित्य असो, कला असो, शास्त्र असो किंवा केवळ कोणत्याही क्षेत्रातले सर्जन असो. त्या प्रत्येकाच्या मुळाशी स्वतःची वाढ स्वतः ठरवण्याचे स्वातंत्र्य लागते. तयार नमुन्यातून अभिजात निर्मिती होत नाही. तिला आपली माती शोधावी लागते. आपल्या प्रकृतीला योग्य पौष्टिक द्रव्ये शोधावी लागतात. मुख्य म्हणजे विशाल आकाशात अनिर्बंध विस्तार करायची दुर्दम्य इच्छा लागते.

 

आदेशांतून निर्मिती होत नाही. आदेशांतून स्व-देशही निर्माण होत नाही. कारण स्व-देशाचा पाया हा स्व-त्वाची जाण असणारा आणि इतरांचा स्वीकार करणारा ‘स्व’ असायला लागतो. आदेशांचे पालन करणाऱ्या मानवदेहधारी यंत्रांचे ते काम नोहे.

 

जाता जाता, मला अनेक वर्षे पडलेला प्रश्न मी आज आपल्यासमोर मांडतो. महाराष्ट्रात विद्वानाचे किंवा साहित्यिकाचे वर्णन करताना नेहमी त्याच्या वाचनाचा उल्लेख येतो. विशेषतः इंग्रजीतल्या वाचनाचा. जितकी वाचलेली पुस्तके जास्त तितकी विद्वत्ता जास्त. पण त्याने किती चित्रे पाहिली आहेत, किती नाटके, ऑपेरा इ. पाहिलेले आहेत, त्याला किती भाषा येतात किंवा कला समजतात, त्याला किती संगीतशैलींची व नृत्यशैलींची जाण आहे, त्याला किती संस्कृतींशी जवळीक वाटते, त्याने जग किती पाहिले आहे, त्याने किती पाकसंस्कृती अनुभवल्या आहेत, त्याला शिल्प व स्थापत्याची काय समज आहे आणि यांतल्या कशावरही प्रेम करण्याची त्याची क्षमता किती आहे, हा प्रश्न कधी विचारला जात नाही. जेव्हा तो आपसूक जाणवायला लागेल, तेव्हा कदाचित या संस्कृतीत काही इष्ट बदल होतील.

 

आता मला कलावंताच्या जिवलगाबद्दल बोलावेसे वाटते. उत्तम गायकाला उत्तम श्रोता समोर का लागतो? या श्रोत्याच्या कानांत शेकडो मैफलींच्या आणि गायकांच्या स्मृती असतात. तो जेव्हा एखादी बंदिश ऐकतो, तेव्हा त्याला मुखोद्रत केलेले काय आणि उत्स्फूर्त काय, हे कळते व मगच तो दाद देतो.

 

सहृदय वाचकाला चेहरा नसतो, लिंग नसते, धर्म-जात काही नसतात; पण त्याची साहित्यस्मृती ही दांडगी असते. त्याला शतकांपूर्वीची वचने आठवतात. तुमच्या लेखनात जेव्हा एखाद्याचा सहज प्रतिध्वनी त्याला ऐकू येतो, तेव्हा तो दाद देतो. जेव्हा नक्कल ऐकू येते, तेव्हा तो धिक्कार करतो. जेव्हा खोटा शब्द कागदावर उतरू लागतो, तेव्हा तो पुरा होण्याच्या आतच तो लेखनकक्ष सोडून जातो. जेव्हा तुमचे शब्द सूर्यकमळाप्रमाणे सहजप्रवृत्तीने भविष्यसूर्याच्या दिशेने वळतात, तेव्हा त्याला स्वर्गप्रवेश झाल्याचा आनंद होतो.

 

अशा वाचकाचा जन्म कुठे होतो याची कुंडली कुणालाही मांडता येत नाही. त्याचा एकच धर्म! प्रतिभावान वाचकाचा. तो त्या स्व-धर्मापासून कधी विचलित होत नाही. हा धर्म ध्रुवासारखा अढळ नसतो, साहित्यगंगा प्रवाही असते व तो तिचा अग्रदूत असतो. अशा वाचकालाही हा मला आज मिळालेला जीवनगौरव सन्मान मिळायला हवा; पण त्याला कसे शोधणार आणि कुठे शोधणार? कदाचित, तो आता हजरही असेल आणि मंद स्मित करीत असेल.

 

पूर्वप्रकाशन : साधना साप्ताहिक, २४ जानेवारी २०२६
सौजन्य : विनोद शिरसाठ (संपादक, साधना)

Node read time
7 minutes