हिंस्र आणि सुंदर पाकिस्तान - दानियाल मुईनुद्दीन

दानियाल मुईनुद्दीन या पाकिस्तानी-अमेरिकन लेखकाची जीवनकहाणीच एखाद्या कादंबरीसारखी वळणावळणांची आणि सुरस आहे. त्याचे वडील पंजाब प्रांतातल्या एका धनाढ्य जमीनदार घराण्यातले होते. फाळणीपूर्वी ते भारतीय प्रशासकीय सेवेत होते. फाळणीनंतर पाकिस्तानी प्रशासनातर्फे सिंधू पाणीवाटपाच्या वाटाघाटींसाठी ते अमेरिकेला गेले. तिथे त्यांना आपली भावी पत्नी बार्बरा भेटली. लग्नानंतर दोघे पाकिस्तानात आले. दानियालचं सुरुवातीचं शिक्षण लाहोरच्या अमेरिकन शाळेत झालं. तिथे उर्दू शिकवत नसत, त्यामुळे दानियालला उर्दू किंवा वडिलांची मातृभाषा पंजाबी बोलता जरी येते, तरीही त्या भाषांतलं साहित्य वाचता येत नाही.
दानियालच्या तेराव्या वर्षी त्याच्या आईवडिलांचा घटस्फोट झाला आणि तो आईसह अमेरिकेत आला. तिथे पदवीधर झाल्यावर अमेरिकेतच राहाणं स्वाभाविक होतं, पण पंजाबात जाऊन पुश्तैनी शेती पाहायचा वेगळाच पर्याय वडिलांनी त्याच्यासमोर ठेवला. ढासळत्या प्रकृतीमुळे वडील शेतीकडे लक्ष देऊ शकत नव्हते. दानियालला तेव्हा कवी व्हायचं होतं. शेतावर राहून कविता करू शकू अशा स्वप्नाळू विचारातून तो पाकिस्तानला गेला. १९९०ला त्याच्या वडिलांचं निधन झालं. शेतीची व्यवस्था लावून १९९३मध्ये दानियाल अमेरिकेला परतला; प्रतिष्ठित येल लॉ स्कूलमधून त्यानं पदवी मिळवली; न्यू यॉर्कच्या एका बड्या कंपनीसाठी काम केलं. आपल्यापाशी कवीची प्रतिभा नाही ही जाणीव त्याला कधी तरी झाली. मात्र, पाकिस्तानात भेटलेल्या माणसांची आणि आलेल्या अनुभवांची शिदोरी कथनात्म साहित्य लिहायला उपयोगी पडेल असाही साक्षात्कार त्याला झाला. मग त्यानं सृजनात्मक लिखाणाचं रीतसर शिक्षण घेतलं. २००६ला त्याची पहिली कथा प्रकाशित झाली. पुढे ‘ग्रँटा’ आणि ‘न्यू यॉर्कर’सारख्या प्रतिष्ठित नियतकालिकांत त्याच्या कथा प्रकाशित झाल्या. मग त्याचा पहिला कथासंग्रह आला (‘इन अदर रूम्स, अदर वंडर्स,’ २००९). त्याला पुलित्झर पुरस्कारासाठी नामांकन मिळालं; कॉमनवेल्थ आणि इतर अनेक पुरस्कार मिळाले. या सर्व कथा पाकिस्तानात वेगवेगळ्या काळात घडतात. त्यातलं ग्रामीण पाकिस्तानाचं चित्रण, तसंच अतिधनाढ्य ते सर्वसामान्य माणसांचं आणि त्यांच्या परस्परसंबंधांचं चित्रण ह्यातून जगाला पाकिस्तानाचं एक वेगळं दर्शन घडलं.
पदार्पणातल्या यशामुळे दानियालकडून वाचकांच्या अपेक्षा साहजिकच वाढल्या, पण अनेक गोष्टी आड आल्या. २००९ सालीच त्याच्या आईनं आत्महत्या केली. हा आघात सोसायला मदत होईल अशा अपेक्षेनं त्यानं आईवर बेतलेली कादंबरी लिहायला घेतली. २०१८ साली ती प्रकाशित होईल अशी घोषणाही झाली; पण कादंबरी मनासारखी कागदावर उतरली नाही म्हणून दानियालनं ती बाजूला ठेवली. पुन्हा एकदा, पाकिस्तानात घडणाऱ्या काही कथा लिहायला त्यानं सुरुवात केली. एका कथेतल्या व्यक्तिरेखा इतर कथांत डोकावत राहिल्या. चार-पाच वर्षं त्यावर काम केल्यावर त्यातून घडलेली ‘धिस इज व्हेअर द सर्पंट लिव्ह्ज’ ही कादंबरी नुकतीच प्रकाशित झाली. पहिल्या पुस्तकानंतर तब्बल सतरा वर्षांनी आलेल्या कादंबरीवर सध्या वाचकांच्या उड्या पडत आहेत.
पुस्तकाचे चार विभाग आहेत. प्रत्येक भाग स्वतंत्र दीर्घकथा म्हणून वाचता येतो. रस्त्यावर सापडलेला याझिद हा अनाथ मुलगा पहिल्या भागाच्या (‘द गोल्डन बॉय’) केंद्रस्थानी आहे. एका चहावाल्याकडे याझिदला आश्रय मिळतो. आपल्या भविष्याला दिशा देण्याची धडपड त्याला कुठे नेते हे पुढे दाखवलं आहे. झुल्फिकार अली भुत्तोंवर केंद्रित झालेल्या जनतेच्या आशा आणि झालेला भ्रमनिरास ही कथेची पार्श्वभूमी आहे. देशात अभूतपूर्व बदल होईल, आणि सर्वसामान्य माणसालाही प्रगतीची संधी मिळेल ही आशा जसजशी धूसर होत जाते तसतसं अनाथ नायकाची महत्त्वाकांक्षा त्याला सरळ मार्गानं जगू देणार नाही हे अधोरेखित होत जातं.
दुसऱ्या भागात (‘मसल’) दानियालसारख्याच एका जमीनदार घराण्यातल्या विशी-बाविशीच्या रुस्तमला वडिलांच्या मृत्यूपश्चात पंजाबातली वंशपरंपरागत शेती सांभाळताना आलेले अनुभव आहेत. शेजारच्या शेतजमिनीचे मालक त्याला त्रास देऊ लागतात तेव्हा तो वाडवडिलांनी पोसलेल्या पुंडांना शेतावर बोलावतो. पाश्चात्त्य संस्कारांत वाढलेल्या समतावादी, भाबड्या रुस्तमला त्यातून पाकिस्तानी वास्तवाची जाणीव होते आणि भ्रष्ट होण्याकडे त्याचा प्रवास सुरू होतो.
तिसऱ्या भागात (‘अ क्लीन रिलीज’) प्रेमाचा त्रिकोण आहे. अमेरिकेत राहणारे दोन भाऊ आणि धाकट्या भावाची प्रेयसी काही काळासाठी पाकिस्तानात परत येतात. तिथल्या रूढीबद्ध वातावरणाशी जुळवून घेताघेता त्यांच्यातल्या स्नेहाची कसोटी लागते. यथावकाश, धाकट्या भावाच्या प्रेयसीशी (शहनाझ) विवाहबद्ध होऊन काही वर्षं लोटल्यावर मोठा भाऊ हिशाम दुसऱ्या कथेतल्या रुस्तमला हे सांगतो अशी रचना आहे. रुस्तमच्या मोठं होण्याच्या प्रवासातला एक टप्पा म्हणून कथेकडे पाहता येतं.
कादंबरीचंच शीर्षक असलेला चौथा भाग सर्वात दीर्घ आणि पुस्तकाला कादंबरीचं स्वरूप आणण्यासाठी कळीचा आहे. शहनाझ आणि हिशाम इथेही आहेत. त्यांच्या माळीबुवांचा मुलगा साकिब कथेच्या केंद्रस्थानी आहे. पहिल्या भागातला याझिद एव्हाना हिशाम-शहनाझचा विश्वासू शोफर झाला आहे. साकिब त्याच्या हाताखाली ड्रायव्हर म्हणून लागतो, पण त्याची आकांक्षा हिशामसारखं बनण्याची आहे. त्याला यश मिळो न मिळो, ह्याचा शेवट चित्तथरारक होणार हे स्पष्ट आहे.
सत्तेची आणि सामाजिक उतरंडीत वर चढण्याची आकांक्षा आणि तिची परिणती हे कादंबरीचं सूत्र आहे. इथली सरंजामी व्यवस्था ब्रिटिशांच्या आधीपासून अस्तित्वात आहे. भारतातल्या कूळकायद्यासारख्या जमीनसुधारणा करण्याची झुल्फिकार अली भुत्तोंची आकांक्षा होती, पण ती सफळ झाली नाही. त्यामुळे जमीनदार बलाढ्यच राहिले. त्यांच्या शेतजमिनी इतक्या मोठ्या आहेत की एक घराणं अख्ख्या गावाला पिढ्यानपिढ्या आपल्या चाकरीत ठेवून पोसतंही आणि त्याचं शोषणही करतं. साकिबला शेतीत काही प्रयोग करायचे असतात तेव्हा हिशाम सहज पंधरा एकर वेगळे काढून त्यावर तुला काय करायचं ते कर असं त्याला सांगतो. यात तोटा जरी झाला तरी हिशामचं त्यामुळे काहीच बिघडणार नसतं. वर्षाअखेरीला शेताचे हिशेब तपासायला सुटाबुटातले शहरी अकाउंटंट येतात तेव्हा ह्या पंधरा एकरांचा समावेशही तो त्यात करत नाही.
शोषक आणि शोषित असलेल्या रंगीबेरंगी व्यक्तिरेखांचा पट दानियाल उभा करतो. त्यांपैकी बहुतांश लोक भ्रष्ट व्यवहारांत लडबडलेले आहेत : पैशांची अफरातफर, विवाहबाह्य संबंध, अगदी खूनही. हिशामच्या वडिलांसाठी अनेक वर्षांपासून काम करणारा मुन्शी शेतीच्या व्यवहारात पैसा खाऊन मालदार झाला आहे, पण हे कुणाच्या डोळ्यावर येऊ नये म्हणून तो अतिशय साधा राहतो. पोलिसांकडून आपल्याला धार्जिणं काम करून घेण्यासाठी रुस्तमला हिशामच्या ओळखी काढून दडपण आणावं लागतं. त्यात तो यशस्वी झाला तरीही पोलिसांचा डोळा त्याच्या जमिनीवर राहणार आहेच. तुम्ही हिंसा टाळायला गेलात तर व्यवस्था आपल्या टाचेखाली तुम्हाला तुडवणार. त्यात टिकून राहायचं तर मग हिंसा अटळ आहे. आजूबाजूच्या चिखलात याझिदनं टिकवलेला निरागसपणा हा एक अपवाद, पण तो भ्रष्ट नसला तरी हिंसेत सहभागी आहेच.
सरंजामी व्यवस्थेचे असे अनेक पैलू दानियाल तपशिलांसह दाखवतो. आलेल्या माणसाला चहा मिळेल की दारू, हे सामाजिक उतरंडीतल्या त्याच्या स्थानानुसार ठरतं. ते स्थान पिढ्यानपिढ्या आहे तिथेच राहतं. वर जायचा प्रयत्न केलात तर व्यवस्था तुम्हाला चेचणार. आणि तुम्हाला यश मिळालं तरीही ते तुमच्या कल्पनेपलीकडे घातक असेल. प्रत्येक कथेत कुणी तरी कुणाचा तरी विश्वासघात करतं. शीर्षकातला साप इथे सापडतो.
देशाला आधुनिकतेचा स्पर्श झाला असला तरी तो केवळ वरवरचा आहे. साकिबच्या शेतीतल्या प्रयोगांसाठी लागणारी सामग्री चीनमधून येते. त्याच्या गावातल्या इतर तरुणांना त्यात रस नाही. त्यांना आकर्षित करतात ते चिनी स्मार्टफोन, कारण त्यावरून पाश्चात्त्य पॉर्न बघायला मिळतं. ज्या मध्यस्थाकडून साकिब ती सामग्री घेतो तो नवख्या शेतकऱ्यांना हॉलंडहून आयात केलेल्या ट्यूलिपच्या बियाही पुरवतो, पण साकिब नवं तंत्र शिकायला उत्सुक आहे हे पाहून ‘ट्यूलिप केवळ श्रीमंती छंद आहे; त्यात पैसा नाही; तू आपला काकड्या पिकव आणि मुबलक पैसा कमव’ हा मोलाचा सल्लाही त्याला देतो. वर, मिळालेल्या नफ्याचा काही अंश हिशामपासून लपवून आपल्या खिशात घालता येईल, हेदेखील सुचवतो.
या सगळ्यात थोडी गंमतही आहे. रुस्तमनं शेतावर बोलावलेले गुंड आपलं काम नीटच करतात, पण एके-४७ बाळगणाऱ्या गुंडांचा आदर कसा कमवावा हा कोवळ्या रुस्तमपुढचा गुंता मजेशीर आहे. साकिब वरच्या जातीतल्या मुलीच्या प्रेमात पडतो. तिला पटवण्याचा त्याचा प्रयत्न आणि तिनं त्याला दिलेला प्रतिसादही गंमतीशीर आहे. मोटार चालवणाऱ्या अवाढव्य याझिदच्या शेजारी बसलेला किरकोळ प्रकृतीचा साकिब, पोलीस चौकीत आलेल्या तक्रारदारांना ऐकू जाईल अशा प्रकारे शेजारच्या खोलीत लघुशंका करणारा पोलीस, आणि तक्रारदारानं त्याच्याशी साधलेला ‘प्रेमळ’ संवाद, अशी कादंबरीतली अनेक वर्णनं मजेशीर आहेत.
ह्या भूभागावरचं लेखकाचं निरतिशय प्रेम सातत्यानं जाणवतं. दक्षिण पंजाबातल्या त्याच्या गावापासूनचं भौगोलिकदृष्ट्या सर्वात जवळचं मोठं शहर जैसलमेर आहे. म्हणजे गाव वाळवंटी प्रदेशाच्या अतिशय जवळ आहे. मात्र ते सिंधू नदीच्या काठावर असल्यामुळे तिथे हिरव्यागार आमराया आहेत; वडाची झाडं आहेत; तिथे नदीत मासे पकडता येतात. कादंबरीतले अनेक तलम प्रसंग निसर्गाच्या सान्निध्यात घडतात. लवकरच सगळं काही नासून जाणार हे अपरिहार्य असलं, तरी अनेक व्यक्तिरेखांच्या हिंस्र वास्तवात त्या निसर्गाचं लोभस सान्निध्य ही एकमेव सुखद गोष्ट असते.
कादंबरीतून उभं राहणारं आजच्या पाकिस्तानचं चित्र निराशादायी आहे. तिथे कायद्याचं राज्य नाही, तर तुम्ही कोणाला ओळखता यावरच सर्व काही अवलंबून आहे. सामान्य माणसाला सन्मानानं जगता येत नाही आणि स्वच्छ मार्गानं प्रगतीची आसही धरता येत नाही. मात्र, बहुतांश व्यक्तिरेखा भ्रष्ट असूनही त्यांच्यातल्या जगण्याच्या चिवट वृत्तीमुळे त्यांचे खलनायक होत नाहीत. वाचकांना त्यांच्याविषयी आत्मीयता वाटते आणि कथानकात गुंतून राहायला होतं. हे जग हिंस्र असलं तरी सुंदरही आहे. दानियालला साधलेली ही महत्त्वाची गोष्ट आहे. त्याची तुलना अनेकदा चेखॉव्हशी केली जाते त्यात काही प्रमाणात तरी तथ्य आहे ह्याची जाणीव ही कादंबरी करून देते.
पूर्वप्रकाशन : लोकसत्ता बुकमार्क, १४ मार्च २०२६.
मूळ लेखाचा दुवा

आभार
आभार