एक फसलेली टूलकिट
फेसबुकसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एखाद्या व्यक्तीच्या प्रचारासाठी किंवा एखाद्या प्रकल्पाच्या विरोधात 'टूलकिट'चा वापर केला जातो, हे सर्वश्रुत आहे. अनेक बनावट आयडींद्वारे त्या व्यक्तीचा प्रचार केला जातो आणि त्या पोस्ट कोट्यवधी लोकांपर्यंत पोहोचवल्या जातात. निश्चितच या पोस्ट प्रायोजित असतात, अन्यथा आमच्यासारख्या सामान्य माणसांच्या पोस्ट आपल्या अनुयायांपर्यंतही नीट पोहोचत नाहीत, मग कोट्यवधींपर्यंत पोहोचणे तर दूरच.
अशाच एका टूलकिटद्वारे राघव चड्ढाचा प्रचार जोरात सुरू होता. मी राघवला फॉलो करत नाही, त्याच्या एकाही पोस्टला लाइक केलेले नाही, तरीही गेल्या काही महिन्यांपासून दररोज फेसबूकवर राघवची स्तुती करणाऱ्या किमान सहा-सात वेगवेगळ्या आयडींच्या पोस्ट दिसत होत्या. दोन महिन्यांत असे किमान पन्नास-साठ वेगळे आयडी मी पाहिले असतील. सर्व पोस्टचा एकच सूर होता, राघव संसदेत जनतेचे प्रश्न मांडतो आहे; राघवमुळेच विमानतळांवर चहा-समोसे स्वस्त झाले, कर कमी झाले, मोबाइल लूट थांबली, वगैरे वगैरे.
आणि मग एक दिवस अचानक सगळे थांबले. जणू "अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले!” पोस्ट येणे एकदम बंद झाले. राघवचे फॉलोअर्स वीस लाखांनी कमी झाले. नक्की काय घडले होते?
माझ्या अंदाजाप्रमाणे अश्याच एका टूलकिटने केजरीवालांना एक लोकप्रिय नेता म्हणून उभे केले होते, तश्याच प्रकारच्या टूलकिटने राघवचाही प्रचार हाती घेतला असावा. परंतु केजरीवाल हे राजकारणात मुरलेले आहेत. आपल्या विरोधात शिजत असलेले कारस्थान त्यांनी वेळीच ओळखले आणि राघवचे पंख तातडीने कापले. राज्यसभेच्या उपनेतापदावरून त्याची हकालपट्टी केली.
दुसरीकडे, आपमधील बंडखोर खासदारांचा कार्यकाळ २०२८मध्ये संपणार आहे. त्यांना हे उमगले की यापुढे आपकडून तिकीट मिळणे कठीण आहे. मग पुढे राजकीय कारकीर्द कशी सावरायची, हा प्रश्न त्यांना भेडसावत होता. राघवने भाजपविरोधात खूप आक्रमक भाषणे केली होती, हे खरे; परंतु एकदा पराभवाची चाहूल लागली की टूलकिटही पाठ फिरवते, हे राघवला कळून चुकले असावे.
आपली राजकीय कारकीर्द वाचवायची असेल, तर राघवपाशी एकच पर्याय उरला होता तो म्हणजे “भाजप- म्हणजे निरमापेक्षा जास्त सफेदी देणारी वॉशिंग मशीन, ज्यात गेले की सगळेच चमकदार, उजळ, आणि एकसारखे दिसू लागतात. भाजप मध्ये जाण्याचे अनेक फायदे राघवला दिसले. भाजपमध्ये गेल्यावर पुन्हा राज्यसभेचे तिकीट मिळू शकते; पंजाबात भाजपच्या जागा वाढल्या तर मंत्रिपदही दृष्टिपथात येऊ शकते. आपले राजनीतिक अस्तित्व वाचविण्यासाठी राघव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. भाजपलाही पंजाबात एक चेहरा हवाच होता. त्यांनी लगेच सर्वांना पक्षप्रवेश देऊन राज्यसभेतील आपली संख्या बळकट करून घेतली. येत्या निवडणुकीत भाजपला फायदा झाला तर उत्तमच; नाही झाला तरी काही फरक नाही. कारण जे आले आहेत त्यांचे राजकीय अस्तित्व तर आधीच वॉशिंग मशीनमध्ये धुतल्यासारखे नाहीसे होईल.
राघवने पक्ष बदलला आणि टूलकिटला मोठा धक्का बसला. त्यांनी राघवसाठी केलेली सारी गुंतवणूक एका झटक्यात वाया गेली. गेल्या एका आठवड्यात राघवची स्तुती करणारी एकही पोस्ट माझ्या फेसबूकवर दिसली नाही. उलट, त्याच्या विरोधातील काही पोस्ट मात्र दिसल्या.
या टूलकिटचे मालक नक्की कोण असतील? स्वत: राघव की आणिक कोणी ... या प्रश्नाचे उत्तर मात्र अद्याप मला सापडलेले नाही.
.टूल किटला दोन मजबूत पक्ष…
.टूल किटला दोन मजबूत पक्ष देशात नको. भाजप पराजित झाली पाहिजे पण काँग्रेस ही जिंकली नाही पाहिजे. त्यासाठी नवीन नवीन पक्षांचा निर्माण टूलकिट द्वारा होतो. २०१४ मध्ये ही टूल किटला काँग्रेसच्या पराजय पाहिजे होता पण भारताचा विजय नको होता म्हणून आप पार्टीने विभिन्न शहरात मोठ्या प्रमाणात उमेदवार उभे केले होते. त्यांच्या प्रचारावर मीडिया ते नुक्कड नाटक कोट्यावधी खर्च झाले. पण सर्व आपटले. आता टूलकिटला वाटले, केजरीवालची व्हॅल्यू संपली चड्डाला आप पार्टीच्या अध्यक्षपदी बसवायचे त्यांचा मनसुबा होता. पण केजरीवाल च्या सावधगिरीने तो असफल झाला.
टूलकिट?
हे कितपत खरं आहे याबद्दल मी साशंक आहे. म्हणजे बनावट आयडी वापरून प्रचार होत असेल वगैरे बरोबर आहे. पण फेसबुकनं केंब्रिज अनालिटिका प्रकरणापासून अत्यंत टार्गेटेड जाहिराती कमी केल्या असाव्यात असा माझा अंदाज आहे.
उदाहरणार्थ, कोणे एके काळी ॲपलचा आयपॉड हे प्रकरण चर्चेत होतं तेव्हा त्यात गाण्यांचा क्रम यादृच्छिक किंवा रँडम ठेवला तर सुरुवातीला जितपत यादृच्छिक किंवा रँडम गाणी यायची तितपत ते देत असत. यात अडचण अशी आहे की शुद्ध, तुपातले, १००% रँडम आकडे मिळवणं सोपं नाही. त्यामुळे जितकं रँडम शक्य आहे तितकं. तर लोकांना ते आवडलं नाही; लोकांना ते रँडम वाटलं नाही. मग त्यांनी रँडमपणा काहीबाही करून कमी केला, तर लोकांना ते भोचक, आगाऊ, अगोचर वाटणं बंद झालं.
आता एक विदाविज्ञानी उदाहरण. टार्गेट नावाचं एक वाणसामानाचं दुकान अमेरिकेत आहे. त्यांनी एका घरात नवमाता किंवा होऊ घातलेल्या मातांसाठी काही कुपनं पाठवली. तर त्या घरातले वडीलधारे गृहस्थ चिडले. 'आमच्या घरात कुणी गर्भार नसताना ही कुपनं का पाठवताय आम्हांला' म्हणत! नंतर समजलं की या गृहस्थांची मुलगी गर्भार होती; वडलांना ते सांगितलेलं नव्हतं. पण तिच्या खरेदीचा पॅटर्न बदलल्यावर दुकानाच्या विदावैज्ञानिकांना ती गर्भार असल्याचं लक्षात आलं. म्हणून कुपनं.
हा बवाल झाल्यावर टार्गेटनं त्यांची चाल बदलली. मग ते थोड्या चुकीच्या गोष्टी कुपनांमध्ये मिसळायला लागले. उदाहरणार्थ, गर्भवती स्त्रियांना झिंक-मॅग्नेसियम वगैरे देतात, त्याची कुपनं पाठवली तर बरोबर रजोनिवृत्तीच्या जवळ आलेल्या स्त्रियांना कॅल्सियम वगैरे देतात; त्याचीही कुपनं पाठवायची. एकच बाई दोन्ही गोष्टी एकत्र घेण्याची शक्यता कमीच. मग लोकांना टार्गेट (दुर्दैवी विनोद) केलंय असं वाटणार नाही.
फेसबुकही तसं करत असण्याची शक्यता आहे. थोड्या रँडमपणे पोस्ट दाखवायच्या, थोड्या अपेक्षित लोकांच्या. मी राहते टेक्सास राज्यात; अमेरिकेच्या दक्षिणेला. इशान्येकडच्या राज्यांमध्ये असणारी हवा आणि आमच्याकडे असणारी यांत जमीन-अस्मानाचा फरक आहे. तिथे वाढणारी स्थानिक झाडं आणि इथली झाडं यांतही जमीन-अस्मानाचा फरक आहे. पण हल्ली मला तिथल्या स्थानिक झाडांच्या जाहिराती दिसायला लागल्या आहेत.
झाडांमध्ये राजकारण नाही; किमान टूलकिट बनवण्यासाठी जितका राजकीय जोर असावा लागतो, तितका जोर स्थानिक-झाडं-वाढवा किंवा भाज्या-फळं या राजकीय भूमिकेत नाही. त्यामुळे मेन किंवा मॅसाच्युसेट्स राज्यांमधल्या जाहिराती मला दिसण्याला कुणी टूलकिट म्हणत नाही.
दुसऱ्या बाजूनं, अमेरिकेत फेसबुक कायदा पाळत असेल... बहुतेकदा. भारतात कायदा कोणी पाळलेला आहे, हे उघड रहस्य आहे.
.
(शीर्षकावरून) अगोदर वाटले, की पटाईतकाकांच्या आगामी आत्मचरित्रातील एखादे प्रकरण (वानगीदाखल) आगाऊ छापले असावे, म्हणून. परंतु, हे काहीतरी वेगळेच निघाले.
असो चालायचेच.