Skip to main content

धबधबा

7 minutes

धबधबा
====

राजीव उपाध्ये


आज कॅम्पमध्ये विश्रांतीचा दिवस होता. ग्रुपलीडरशी वाद घालून मायाने आणि गौतमने धबधबा बघण्यासाठी परवानगी मिळवली. हिमालयातले हवामान वेगाने बदलते, त्यामुळे ग्रुपलिडरने त्यांना वेळेवर परत येण्याविषयी बजावले.

मायाचे एम०डी० नुकतेच पूर्ण झाले होते. ती कोणाचीही तमा न बाळगणारी ... तिचे अस्तित्व सभोवतालच्या वातावरणावर पूर्णपणे वरचढ ठरणारे होते. डॉक्टर म्हणून यशस्वी व्हायचे असेल तर हे गुण आवश्यक असतातच. गौतम अमेरीकेत मास्टर्स करून नुकताच परतला होता. तो तल्लख बुद्धीचा, हुशार आणि देखणा होता. त्याच्या हालचालींमध्ये एक प्रकारची घाई आणि अस्वस्थता सतत दिसायची, पण तरीही तिच्यासमोर तो फिका पडत असे. कौटुंबिक संस्कारांचे वलय आणि मनात असलेली बंडखोरी यांच्यातील संघर्षात तो सतत घुमसत असायचा. आयुष्याचा पुढचा प्रवास आखण्यासाठी हिमालयाने दोघांना साद घातली होती.

ट्रेकची सुरुवात शांततेत सुरू झाली. पाइनच्या झाडांमधून डोकावणारे ऊन आणि थंड वार्‍याची झुळूक यांमुळे वातावरणात एक प्रसन्नता होती. पण जसजशी पायवाट अधिक अरुंद आणि खडतर होत गेली, तसतसा त्यांच्या गप्पांचा सूर बदलू लागला. कॅम्पमधील एका जोडप्याच्या भांडणाचा विषय निघाला आणि तिथून सुरू झालेली साधी चर्चा हळूहळू दोघांच्या वैयक्तिक तत्त्वांपर्यंत येऊन पोहोचली. गौतमने सहज मांडलेल्या एका मतावर मायाने लगेच आक्षेप घेतला, आणि एका साध्या ट्रेकचे रूपांतर दोघांमधील वैचारिक युद्धात झाले.

"तुला खरंच वाटतं की भावना व्यक्त न करणं म्हणजे मर्दपणा?" मायाने चालता चालता मागे न वळताच विचारले. तिच्या आवाजात वैद्यकीय निष्कर्षासारखा एक थंड नेमकेपणा होता. "स्त्रीने हसून सहन करणं म्हणजे 'स्त्रीत्व' आणि पुरुषाने स्वतःचा स्वाभिमान जपण्यासाठी सतत अहंपणा दाखवणं म्हणजे 'पुरुषत्व'... ही दोन्ही विषारी रूपं आहेत गौतम. तुझा हा हट्ट पुरुषी अहंकार आहे. दुसरं काहीही नाही."

गौतमने थांबून एक खोल श्वास घेतला. त्याच्या कपाळावर घामाचे थेंब साचले होते. "...आणि तु हे सतत मला जज करत असते, त्याला काय म्हणायचं? स्वतःला पुरोगामी समजून पुरुषांच्या प्रत्येक वागण्यावर 'टॉक्सिक'चा शिक्का मारणं? हा स्त्रीत्वाचा कोणता प्रकार आहे माया?" तो पुढे सरकला, त्याच्या डोळ्यांत राग आणि हताशपणा एकत्र दिसत होता. "सहानुभूतीचा आव आणून दुसर्‍याच्या आत्मसन्मानाची लक्तरे वेशीवर टांगणं, हीसुद्धा एक विषारी मानसिकता आहे."

वाद शमण्याची चिन्ह दिसेनात. ते तसेच चालत राहीले. पुढे पायवाटेच्या एका वळणावर  पाण्याचा एक डोह होता. पलिकडे समोरच काळ्या कातळावरून कोसळणार्‍या धबधब्याचे तुषार हवेत उडत होते. निसर्गाचे ते अथांग सौंदर्य त्यांच्या अगदी नजिकच होते, पण त्या सुंदर निसर्गाच्या साक्षीने दोन टोकांचे विचार आणि त्यातून निर्माण झालेले दोन अहंकार एकमेकांवर धबधब्या प्रमाणे आदळत होते.

गौतमने मायाकडे पाहिले. ती अजूनही काहीतरी बोलत होती, पण तिचे शब्द आता त्याच्या कानांपर्यंत पोहोचत नव्हते. अखंड वाद, ट्रेकचा थकवा आणि मनात साचलेली चिडचिड यामुळे त्याचा श्वास जड झाला होता.

"बस. पुरे झालं, माया आय नीड अ डीप टु कुल डाऊन"

मायाला काही कळायच्या आत तो डोहाच्या दिशेने धावत सुटला. किनार्‍यावर पोहोचताच त्याने घाईघाईने आपला सर्व कपडे काढून एका खडकावर फेकले आणि क्षणाचाही विचार न करता धबधब्याच्या पाण्यात उडी मारली.

बर्फाळ पाण्याचा धक्का क्षणात अंगभर पसरला. पण काहीच वेळ...

त्याने मायाला हाक मारली. तिने त्या आवाजाच्या दिशेने जात त्याला शोधले आणि एका झाडाखाली आडोसा शोधून पाठीवरची सॅक उतरवली आणि एका झाडाखाली बसकण मारली...

थोड्या वेळाने पर्वताच्या शिखरांवर ढगांची गर्दी सुरू झाली. हळुहळु वारा जोर धरू लागला.

"माया, डु मि अ फ़ेव्हर, प्लीज"

"बोला साहेब, काय सेवा करू?"

"माझे कपडे प्लीज माझ्या सॅकमध्ये ठेवतेस? वारा जोरात आहे."

"ओके" असं म्हणून माया उठून सॅकच्या दिशेने जाउ लागली. तेव्हढयात वार्‍याचा जोर आणखी वाढला आणि धबधब्याच्या पात्राजवळ आंघोळीसाठी उतरलेल्या गौतमचे कपडे त्या सोसाट्याच्या वाऱ्यात उडून थेट दरीत नाहीसे झाले.

"गौतम, यु हॅव लॉस्ट एव्हरीथिंग" माया विकटपणे हसत सुटली.

"हसू नको माया, माझ्या जागी तू असतीस तर कळलं असतं"

"त्यात मला काय कळायला हवं? तुझ्या जागी मी असते तरी संयमाची परीक्षा तुलाच द्यावी लागली असती" मायाचे हसु आता ते आजुबाजुचे डोंगर परावर्तित करू लागले.

गौतमने रिकाम्या खडकाकडे पाहिले. काही मिनिटांपूर्वी तो स्वाभिमान, अहंकार आणि परिपक्वतेवर तावातावाने बोलत होता. आता मात्र एका क्षणाच्या उतावळेपणाने त्याला पूर्णपणे हतबल करून ठेवले होते.

मायाची भेदक आणि धीट नजर त्याच्यावर स्थिरावली. त्या क्षणी गौतमला जाणवले, वार्‍याने फक्त त्याचे कपडेच वाहून नेले नव्हते. जणू त्याचे सारे पौरुष त्याबरोबर वाहून गेले होते.

"माया, प्लीज क्लोज युवर आईज" त्याचा चेहरा लाजेने लालबुंद झाला. दगडांकडे तोंड फिरवत तो अडखळत म्हणाला, "कपडे उडून गेले आहेत."

बर्फाळ पाण्याचे तुषार हवेत उडवत धबधब्यातून जन्माला आलेली नदी काळ्या कातळांवरून वेगाने उसळत होती. हवेत धुक्याने किनार्‍यावरील पाईनच्या सुया धूसर दिसत होत्या. एका कपड्याचा तुकडा पाण्यावर तरंगताना दिसताच, तो पकडण्यासाठी तो पुढे झुकला.  पण पाण्याच्या अचानक आलेल्या जोरदार प्रवाहाने त्याला जवळजवळ खालीच खेचले. तो पण प्रयत्न अपयशी ठरला.

"फक यु" त्याने दाताखाली ओठ दाबून शिवी हासडली. पाण्याच्या प्रचंड वेगाने ते वस्त्र पण त्याच्या हातातून हिसकावून खाली प्रवाहात वाहून नेले, आणि तो त्या उघड्याबोडक्या किनार्‍यावर रिकाम्या हाताने, थरथरत हताश वस्त्रहीन उभा राहिला.

नदीच्या वळणावर असलेल्या एका मोठ्या करड्या खडकाला वळसा घालून माया थेट त्याच्याच दिशेने येत होती.

काळ्या कातळाच्या पार्श्वभूमीवर गौतमचे सुदृढ, गोरे शरीर उठून दिसत होते. त्याच्या मनात भीतीची तीव्र लाट उसळली. त्याने घाईघाईने बाजूला होऊन जमिनीवर पडलेली शेवाळलेली फांदी उचलली आणि ती शरमेने आपल्या कमरेसमोर धरली.

माया जागीच थांबली. तिने मान दुसरीकडे वळवली नाही, की त्याला नजरेची सूट देण्यासाठी पाऊल मागे घेतले नाही. तिची नजर त्याच्यावरून अगदी सावकाश फिरली. त्याच्या ओल्या केसांपासून ते कमरेपर्यंत. आणि मग तिच्या ओठांवर एक शांत, जाणीवपूर्वक उपरोधाचे हास्य उमटले.

"तुझे कपडे आतापर्यंत दरीच्या अर्ध्या रस्त्याला पोहोचले असतील," नदीच्या खळाळत्या आवाजाला छेदत तिचा शांत, धीरगंभीर आवाज आला. "तुझी हरकत नसेल, तर मी खाली जाऊन ते शोधायला मदत करू का?"

"ए बाई, नको, माझ्यावर दया कर. फक्त... दुसरीकडे बघ, प्लीज. वादळ येतंय."

मागे हटायला तर आता कोणतीही जागा उरली नव्हती. शरमेने अर्धमेला झाल्यामुळे तिथल्याच एका कपारीत त्याला आसरा घ्यायचा होता, पण स्वतःवरचा ताबा सुटून त्याची नजर पुन्हा पुन्हा तिच्याच डोळ्यांकडे जात होती. स्वतःला झाकण्यासाठी काहीतरी शोधत असताना मायाने एक पाऊल पुढे टाकून त्याचा रस्ता अडवला. तिने हसून गोष्ट उडवून लावली नाही किंवा बाजूला सरकली नाही. तिची ती उघडी, कसलाही संकोच नसलेली नजर त्याच्यावर खिळली होती. त्यांच्यातील शांतता इतकी ताणली गेली की अपघाताचे निमित्त करून तिथून पळून जाण्याचा त्याचा उरलासुरला मार्गही बंद झाला. पावसाचे मोठे, थंड थेंब शरीरावर काट्यासारखे टोचू लागले होते.

"दुसरीकडे काय बघू?" तिने विचारले.

"तू अशी... अशी उभी राहायला नकोस," त्याचा श्वास उथळ झाला होता. "आपल्याला मागे फिरायला हवे."

"मागे जायला आता काही उरलेले नाही," ती म्हणाली. "हे वादळ शांत होईपर्यंत तर अजिबात नाही."

आणि अचानक आकाश पूर्णपणे फाटले. बर्फाळ पावसाची एक प्रचंड भिंतच दरीत कोसळली. पाईनची झाडे वार्‍याने जोरात डोलू  लागली. पावसाच्या तावडीतून वाचण्यासाठी दोघांनाही खडकाच्या एका ओवरहँगखाली  आसरा घ्यायचे ठरवले. ती जागा जेमतेम तीन-चार फूट रुंद होती.

एका प्रदीर्घ क्षणानंतर त्याने तिचे मनगट घट्ट धरले आणि मागच्या बाजूला पाऊल टाकले.

"पाऊस लवकरच कमी होईल," समोरच्या डोंगराच्या रांगेकडे एकटक पाहत तो म्हणाला. "हा फक्त एक पांढरा ढग आहे, निघून जाईल."

"नाही जाणार," माया म्हणाली. ती अगदी घळीच्या तोंडाशी, त्याच्यापासून इंचभर अंतरावर उभी होती. तिची नजर त्याच्या हनुवटीच्या रेषेवर स्थिर होती. "त्या कातळामागे लपण्यात काही अर्थ नाही. पाऊस थांबेपर्यंत आपण इथेच अडकलोय."

थरथरत्या आवाजात तो म्हणाला, "हा... हा वाद जिंकण्याचा मार्ग नाही."

"तू स्वतःला असं सावरून धरलंयस, जणू काही तुझ्यावर वीज पडणार आहे."

ती थेट त्याच्या अगदी जवळ पोचली. कुडकुडणार्‍या गौतमला तोल सांभाळायला तिने तिचा हात पुढे केला. तिचा तळहात त्याच्या ओल्या, थंड त्वचेवर उबदार आणि आश्वासक वाटत होता. त्या उबदार स्पर्शाने त्याच्या मनाचा सगळा संयम ढासळला. त्याने प्रतिकार करणे थांबवले. त्याचा श्वास अडकला आणि त्याने तिला स्वतःकडे खेचले. काही क्षणांसाठी तिची उब त्याच्या अंगात भिनली आणि पर्वतातल्या थंड हवेचा विसर पडला. पण पुढच्याच क्षणी, त्याच्या शरीरात अनेक गूढ कल्लोळ निर्माण झाले.  तीव्र ओढ आणि स्वतःबद्दलची प्रचंड चीड त्याच्या मनात थैमान घालू लागली.

"हे... हे चुकीचे आहे," तो खाली कातळाकडे पाहत अडखळत म्हणाला. "कॅम्पमधून कोणीही आपल्याला शोधत इकडे येऊ शकतं."

माया हलकेच, खोल आवाजात हसली. तिला कसलाही संकोच वाटत नव्हता. "या वादळात बाहेर कोणीही पड्णार नाहीये."

"तुला कसं माहीत?" त्याचा आवाज चढला, रागाने तीक्ष्ण झाला. "जर त्यांनी हे पाहिलं तर?"

"पाहू दे," ती शांतपणे म्हणाली. त्याचा हात पकडून स्वतःकडे ओढत ती म्हणाली, "त्याने काय फरक पडतो?"

"फरक पडतो!" तो फणफणला, त्याच्या मुठी आवळल्या गेल्या. "काही गोष्टी कशा आणि केव्हा करायच्या असतात, याला काही मर्यादा असतात." कुटुंबाचे संस्कार आणि त्याची स्वतःची प्रतिष्ठा धोक्यात आली होती.

"त्या मर्यादा फक्त तुझ्या मनात आहेत."

वार्‍याच्या एका प्रचंड झोताने पावसाचा तीव्र फवारा थेट त्या कपारीच्या आत आला. ते उभे असलेली जागा पूर्ण भिजली. त्या थंडीपासून वाचण्यासाठी दोघांनाही त्या चिंचोळ्या जागेत अजून आत सरकावे लागले. आता त्यांच्यातील शेवटचे अंतरही पुर्ण मिटले. तिचे उघडे पडलेले खांदे त्याच्या छातीवर रेलले गेले. स्वतःचे वजन सावरण्यासाठी त्याचा  एका हाताने डोक्यावरच्या खडका्ला घट्ट पकडायचा प्रयत्न चालू होता आणि धडधडीमुळे छाती वेगाने वर-खाली होत होती.

"धिस फकिंग विंड..." तो पुटपुटलाच. मायाने त्याच्या चिडचिडीकडे पूर्ण दूर्लक्ष केले. खडकाचा आधार घेण्यासाठी टेकलेला त्याचा हात धरला आणि हळूच खाली खेचला. तिने त्याला त्या कपारीच्या अंधारात स्वतःकडे पूर्णपणे ओढून घेतले. त्याचा उरल्यासुरल्या शारीरिक प्रतिकाराची अखेर झाली. त्याची नजर तिच्या उघड्या खांद्यांवरून घसरत मागे त्या पायवाटेवर पडणार्‍या पावसाच्या धूसर पडद्यावर गेली. कोणाच्या पावलांचा आवाज येतोय का, हे तो अजूनही ऐकण्याचा प्रयत्न करत होता. मग त्याने मस्तक त्या थंड कातळावर टेकवले.

तिने त्याला अजून जवळ ओढले, पण तिने एकदाही वळून त्या पायवाटेकडे पाहिले नाही. एका असहाय पुरुषाच्या थंडगार मिठीत ती पहिल्यांदाच विसावली होती...

 

Node read time
7 minutes