Skip to main content

संघाचा प्रचार आणि प्रभाव समजून घेताना…

उजव्यांचं उजवेपण संकल्पना

 

शब्दांचे नेमके अर्थ, संकल्पनांच्या नेमक्या व्याख्या लक्षात न घेता त्यांचा वापर करणे म्हणजे निसरड्या जागेवरून गुळगुळीत पायताण घालून चालणे. तेथे पडझडच संभवते. ते टाळण्याकरिता हे ध्यानी घेणे आवश्यक, की डावे, उजवे म्हणजे नेमके काय? या दोन्ही मुळातल्या 'राजकीय' संकल्पना आहेत. हिंदीत त्यांना म्हणतात वामपंथी आणि दक्षिणपंथी. यातील वाम हा शब्द आपल्याकडे येतो तो प्रामुख्याने धार्मिक अर्थाने. वामपंथ हा प्रामुख्याने कौलमार्गी तांत्रिकांचा पंथ. अनैतिक आणि अनाचारी, विवेकशून्य आणि भ्रष्ट असा. राजकीय क्षेत्रात मात्र वामपंथास, डाव्यास वेगळा अर्थ आहे. डावे ते पुरोगामी, सुधारणावादी, उदारमतवादी आणि उजवे ते रूढीवादी, सनातनी, या अर्थांनी हे शब्द वापरले जातात. त्यांना हा अर्थ प्राप्त झाला त्याचे श्रेय जाते फ्रेंच राज्यक्रांतीकडे. 

 

त्या काळात, सन १७८९मध्ये फ्रान्सचा राजा सोळावा लुई याने संसदेचे अधिवेशन बोलावले होते. त्यात सहभागी होते तीन गट. पहिला पुरोहितांचा, दुसरा सरदारांचा आणि तिसरा – 'थर्ड इस्टेट' म्हणतात त्याला, तो – सामान्यांचा. हे अधिवेशन अत्यंत वादळी होते. राजाला किती अधिकार द्यायचे हा वादाचा मुद्दा होता. या चर्चेत आपोआपच संसदेत दोन तट पडले. जे राजेशाहीच्या विरोधात होते ते क्रांतिकारी लोक सभापतींच्या डावीकडच्या बाजूला जमा झाले. सत्तेच्या, सामंतशाहीच्या, पुरोहितशाहीच्या बाजूचे लोक उजवीकडे बसू लागले. ही बैठकव्यवस्था मग पुढे रूढ झाली. वृत्तपत्रेही सुधारणावाद्यांना डावे आणि प्रतिगाम्यांना उजवे अशा शब्दांनी संबोधू लागली. आज याच अर्थाने हे शब्द जगभरात रूढ आहेत. डावे हे सुधारणावादी, पुरोगामी, बंडखोर विचारांचे असे सामान्यतः मानले जाते. उजवे हे याच्या विरोधातले. ते 'जैसे थे'वादी, रूढीवादी, प्रतिगामी प्रवृत्तीचे. राजेशाही, सामंतशाही, पुरोहितशाहीचे पाठीराखे. पूर्वापार चालत आलेल्या विषमतावादी अर्थव्यवस्थेच्या आणि समाजव्यवस्थेच्या बाजूचे. 

 

हे उजवे आपल्याकडे हिंदूंमध्ये दिसतात ते हिंदुत्ववाद्यांच्या आणि त्यांची 'मदरशिप' असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रूपाने. (हिंदूंचा विषय निघाला, की लगेचच तुम्ही मुस्लिमांबाबत नाही असे बोलत, असा 'युक्तिवाद' करण्याची एक पद्धत आपल्याकडे रुजलेली आहे. त्यातून त्यांना हे सुचवायचे असते, की तुम्ही हिंदूंविषयी बोलता व त्यात मुस्लिमांचा उल्लेख नसतो, याचा अर्थ तुम्ही हिंदूद्रोही आणि मुस्लिमांचा अनुनय करणारे स्यूडो-सेक्युलर आहात. यात एक सुंदर बिनडोकपणा आहे, हे उघडच आहे. तरीही अशा कुतर्कवाद्यांसाठी येथे हे नमूद करून ठेवायला हवे, की –) मुस्लिमांमधील अवघी देवबंदी, वहाबी चळवळ उजवी आहे. जमाते इस्लामीसारख्या संघटना मुस्लिमांतील उजव्यांचे प्रतिनिधित्व करत आहेत. या दोन्हींकडील उजव्या गटांना 'अच्छे दिन' आलेले आहेत. संघाचा विचार तर आज सत्तास्थानी आहे. येथे प्रश्न असा, की हे कशामुळे झाले? संघाचा हा उजवा विचार या देशातील – २०२४ मधील लोकसभा मतदानाची आकडेवारी लक्षात घेतली तर – ३६.५६ टक्के मतदारांनी शिरोधार्ह मानलेला आहे, तो कशामुळे?


 

मोठी सुरस आकडेवारी आहे ती. त्या निवडणुकीत भाजपला ३६.५६ टक्के मते मिळाली आणि भाजपच्या मित्रपक्षांना ७.२४ टक्के मते मिळाली. ही सर्व अन्य पक्षांचीही मते भाजपची आणि पर्यायाने संघाची विचारधारा आणि पंतप्रधान न. दा. मोदी यांचा चेहरा यामुळे मिळाली असे गृहीत धरले, तर हा आकडा जातो ४३.८० टक्क्यांवर. महाराष्ट्रात हाच आकडा आहे ४३.५५. त्यातील भाजपचा वाटा आहे २६.१८. याचा अर्थ असा, की भारताचा आस पूर्णतः उजवीकडे कलला आहे हा एक भला मोठा गैरसमज आहे. अजूनही देशातील ५६.२ टक्के (आणि महाराष्ट्रातील ५६.४५ टक्के) म्हणजे निम्म्याहून अधिक मतदार या विचारांच्या विरोधात आहेत. आणि असे असले, तरी एक बाब मान्य करायलाच हवी, की हे संघ परिवाराचे मोठे यश आहे. देशात पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली १९५१-५२मध्ये. त्यात हिंदुत्ववादी विचारसरणीचे तीन प्रमुख पक्ष उतरले होते. ते होते भारतीय जनसंघ, हिंदू महासभा आणि रामराज्य परिषद. या तिघांना मिळून मते पडली होती – ५.९८ टक्के. (काहींच्या मते ६.४ टक्के.) पुढे १९८०मध्ये भाजपची स्थापना झाली. तोवर ही मतटक्केवारी दहाच्या पुढे गेलेली नव्हती. १९९१च्या निवडणुकीत भाजपच्या 'कमंडलू'त भरभरून २०.०७ टक्के मते पडली. पुढे ही टक्केवारी वाढतच गेली. २०१४च्या निवडणुकीत ती विशीतून तिशीत (३१.३४ टक्के) गेली. २०१९ मध्ये भाजपला आजवरची सर्वाधिक, ३७.७० टक्के मते मिळाली. ते प्रमाण २०२४ मध्ये सुमारे एक टक्क्याने कमी झाले. तरीही १९५२च्या तुलनेत ही वाढ सहा पटीने अधिक आहे. या वाढीमुळे संघविचाराचा पक्ष देशातील सत्तेवर ठाण मांडून बसू शकला, तेव्हा संघ विचारांना लाभलेले हे यश वाखाणावे असेच मानावे लागेल. पण ते खरोखर तसे मानता येईल? 

 

संघाचे आजचे वय १००. सप्टेंबर १९२५मध्ये नागपुरात संघाची स्थापना झाली. तेव्हापासून आजतागायत संघाने जे मिळवले ते एवढेच का? केंद्रात आणि राज्यांत भाजपला किती जागा मिळाल्या, कुठे कुठे कशी कशी सत्ता मिळाली, यावरच संघाचे यश मापायचे का? अनेक अभ्यासक तसे करताना दिसतात. राष्ट्रजीवनाच्या केंद्रस्थानी केवळ राजकीय सत्ता आणि निवडणुकांतील यशापयश हेच असते का? संघ तर स्वतःच सांगतो, की आपण या निवडणुकीच्या राजकारणात नसतो. संघ ही एक सामाजिक आणि सांस्कृतिक संघटना आहे, हे तर संघाच्या घटनेतच नमूद आहे. आणि अशी ही 'हिंदूसंघटन' या हेतूने स्थापन झालेली संघटना समग्र भारतीय समाजात दुधात साखर मिसळावी त्या प्रकारे मिसळून जाईल. इतकी, की समग्र भारतीय समाजात संघाचीच लक्षणे दिसू लागतील. संघाची स्वतंत्र संघटना असण्याची आवश्यकताच तेव्हा नाहीशी झालेली असेल, असे एक स्वप्न संघविचारांचे अनुयायी पाहात असतात. ते तसे घडले वा घडत आहे का? संघाचे यश मापायचे असेल, तर ते या कसोटीवर पाहायला पाहिजे. तेथे हेच दिसते, की गेल्या १०० वर्षांतील संघाचे त्या बाबतीतले यश हे काही फार देदीप्यमान वगैरे म्हणता येणार नाही. 

 

यावर काही जण मस्तक हलवीत नक्कीच म्हणतील, की हे मनुजा, संघ तुज पामरास समजलाच नाही रे. तर काहींना हा संघाच्या कार्यास कमी लेखण्याचा प्रकार वाटेल. काही जल्पक यास 'विशफुल थिकिंग' वा तद्दन मूर्खपणा म्हणतील. पण ते तसे नाही. ते का आणि त्याच वेळी संघविचारांनी सत्तास्थानी जाण्याइतपत यश मिळवले आहे ते का, हे पाहण्यासाठी संघाचा विचार-प्रचार नीट समजून घेतला पाहिजे. आता हे करायचे, तर कोणताही संघवाला हेच म्हणेल, की – बाबा, शाखेवर या!

 

**

 

स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही अशी एक म्हण आहे. संघवाल्यांचेही संघाबाबत हेच म्हणणे असते, की संघाच्या शाखेत आल्याशिवाय तुम्हाला संघ कळणार नाही. जणू शाखेतल्या ध्वजदंडाखाली बसल्यावरच संघाबाबतची ज्ञानप्राप्ती होणार. हे म्हणजे मदरशात गेल्याशिवाय तुम्हाला मदरसा कळणार नाही असे म्हटल्यासारखे झाले. मुळात आज पूर्वीचा, तो गुप्ततेच्या आलवणात गुंडाळलेला संघ उरलेला नाही. पूर्वी असे म्हटले जाई, की संघाला प्रसिद्धीची गरज नाही. संघपरिवारात पूर्वी एक गीत म्हटले जात असे – 'वृत्तपत्र में नाम छपेगा, पहनूंगा स्वागत श्रृंगार। छोड चलो यह क्षुद्र भावना, हिंदू राष्ट्र के तारणहार।'. आता ते तसे राहिलेले नाही. संघी पत्रकार गंगाधर इंदूरकर यांचे एक पुस्तक आहे, 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघ : काल, आज आणि उद्या' (श्रीविद्या, १९८३). त्यात त्यांनी लिहून ठेवले आहे, की (आणीबाणीकालीन) 'बंदीनंतर जवळजवळ लगेच संघ स्वयंसेवकांच्या प्रयत्नाने हिंदुस्तान समाचार या नावाची वृत्तसंस्था कायम झाली. आज संघाची म्हणता येतील अशी अनेक वृत्तपत्रे आहेत. प्रकाशनाच्या क्षेत्रातही संघ पूर्वी जवळजवळ नव्हताच. संघाच्या विचाराचा पाया उत्कृष्ट असूनही त्याविषयी साहित्य असे फारसे उपलब्ध नव्हते. इंग्रजीतील गुरुजींचे पुस्तक 'वुई' आणि डॉक्टरांच्या मृत्यूनंतर त्यांचे मराठीत जीवनचरित्र या पलीकडे कुठलेही छापील साहित्य माझ्या बघण्यात आले नव्हते.' (पा. ५२) त्यांनी हे १९८३मध्ये लिहिलेले आहे. (वस्तुतः बंदीच्या आधीही 'ऑर्गनायझर', 'पांचजन्य', लखनौतून निघणारे 'राष्ट्रधर्म' तसेच 'स्वदेश' आदी कालिके संघप्रचार करीत होतीच.) आज तर परिस्थिती १८० अंशात पालटली आहे. संघवाल्यांचे, सत्तेत भाजप आल्यानंतर निर्माण झालेल्या 'संघी'साधूंचे आणि अर्थातच संघविरोधकांचे मुबलक साहित्य आज उपलब्ध आहे. दिल्लीतील 'केशवकुंज, झंडेवाला' या पत्त्यावरुन चालणाऱ्या प्रकाशन संस्थेतून पुस्तिकांचा पाऊस पाडला जात आहे. विशेष म्हणजे संघाबाबत अपेक्षाभंग झालेल्या, त्या विचारांतील फोलपणा उमजलेल्या माजी स्वयंसेवकांनी लिहिलेली पुस्तकेही आज बाजारात आहेत. सरकारी जाहिरातींच्या पैशांवर चालणारी दैनिके आणि वाहिन्या सातत्याने संघविचारांचा प्रचार करीत आहेत. पूर्वी आपापल्या बिळांत लपलेले अनेक संघवाले आता छाती काढून 'बाबरी पाडली तेव्हा आम्ही गुपचूप पेढे खाल्ले' अशा कहाण्या अभिमानाने सांगत आहेत. एकंदर, संघ समजून घेण्यासाठी, पूर्वीही शाखेत जाण्याची गरज नव्हती. आता तर मुळीच नाही. संघाचा (आणि त्याच बरोबर येथील अन्य संस्था-संघटनांशी निगडित असलेल्या हिंदुत्ववाद्यांचा) चेहरा-मोहरा, त्याचे प्रचार-प्रसारतंत्र आज तसेही जाणून घेता येतो. प्रथम शाखेविषयी.  

 

**

 

संघ प्रचाराच्या सर्व शाखांच्या मुळाशी 'शाखा' आहे. अनेकांनी आजवर या शाखा नामक 'संस्थे'चे गौरवगान गायलेले आहे. गंगाधर इंदूरकर म्हणतात, 'संघात इतके निष्ठावंत कार्यकर्ते कसे निर्माण होतात याचेही अनेकांना आश्चर्य वाटते.' निष्ठावंत या शब्दात प्रश्न न विचारता आदेशपालन करणे हे अध्याहृत असते. तेव्हा असे कार्यकर्ते संघात असतात हे खरे. या अशा कार्यकर्त्यांचे उत्पादन करणारा कारखाना म्हणजे शाखा. प्रभात शाखा. सायंशाखा. बालशाखा. 

 

संघाची पहिली दैनिक शाखा नागपुरातल्या महाल भागात सुरू झाली. त्या शाखेत मुलांची भरती करण्यात आली ती शहरातील व्यायामशाळांतून. डॉ. केशव बळीराम हेडगेवार हे संघाचे संस्थापक-सरसंघचालक. ते या व्यायामशाळांत जायचे. तेथील लहान मुलांना, तरुणांना एकत्र करायचे. यामागे – बहुसंख्य संघटनांचे असते तेच सूत्र होते – 'कॅच देम यंग'. त्याची एक खास पद्धत आहे. शाखेवर निरनिराळे खेळ खेळले जातात. मुलांना त्याचे आकर्षण असते. सामूहिक कवायती, संचलन अशा गोष्टींतून मुलांमध्ये शिस्त बाणवली जाते. पालकांना त्याचे आकर्षण असते. पालक संघविचारांचे असतील तर छानच. नसतील, तरी 'पोरं शाळा सुटल्यावर इकडं तिकडं उंडारणार, त्या पेक्षा शाखेत गेलेली बरी. तिथं शिस्त शिकतात. श्लोक म्हणतात. सांघिक गाणी गातात. थोर पुरुषांच्या, देवादिकांच्या गोष्टी ऐकतात. वावगं तर काही करत नाहीत. उलट चार चांगल्या घरच्या पोरांच्या संगतीत राहतात', या विचाराने पालक मुलांना शाखेवर पिटाळतात. दुसरीकडे शाखा कार्यवाहांचे, प्रचारकांचा 'कॅच देम यंग' हा कार्यक्रम सुरूच असतो. गावातील, गल्लीतील कोणी मुलगा संघात येत नसेल, तर त्यास ये असा आग्रह नसे. त्याच्याशी हळूहळू ओळख वाढवली जाते. जाता येता नमस्कार करणे, चौकशी करणे, बोलणे वाढवणे वगैरे करून त्याला घेरले जाते. विजयादशमी हा संघ स्थापना दिन. त्या निमित्ताने होणाऱ्या सोहळ्यास, कोजागरी, रक्षाबंधन, मकरसंक्रांत अशा सणासुदीच्या कार्यक्रमांस वगैरे त्याला निमंत्रण दिले जाते. अशा 'प्रेमा'ने घेरलेल्या मुलाची, तरुणाची काय बिशाद, की तो शाखेवर येणार नाही. आणि एकदा तो शाखेत रमला की रमलाच. तो गळू नये याची काळजी पुन्हा शाखा घेतच असते. एखादा 'स्वयंसेवक' एखाद्या दिवशी आला नाही, तर शाखेतला स्वयंसेवकांचा गट काळजीने त्याच्या चौकशीस गेलाच म्हणून समजा. शाखा वाढते ती अशी. 

 

ही शाखा म्हणजे केवळ खेळ वा कवायत वा संचलन नाही. त्या खेळांतून मुलांच्या मनांचे सैनिकी पद्धतीचे बराकीकरण केले तर जातेच, पण त्याचबरोबर तेथे त्याचा मेंदूही ठाकूनठोकून 'घडवला' जातो. त्याचे माध्यम असते शाखेवरचे बौद्धिक. त्यात केल्या जाणाऱ्या चर्चेतून, सांगितल्या जाणाऱ्या इतिहास-पुराणांतील गोष्टींतून मुलांना संघविचारांची घुटी पाजली जाते. त्यात अर्थातच प्रश्न विचारण्यास, शंका घेण्यास बंदी. 'बाबा वाक्यम् प्रमाणम्' हीच शिस्त. तेथे जो 'इतिहास' शिकवला जातो त्याचा आशय आणि पद्धत, मुलांना आयुष्यभर पुरते. तेथे तो देशप्रेम आणि त्या नावाखाली द्वेषप्रेम शिकतो. मुस्लिम 'आक्रांतां'चा तिरस्कार करू लागतो. मग त्याला, आपण शाखेबाहेर उठता-बसता ज्यांची निंदानालस्ती करतो, त्या महात्मा गांधी, महात्मा फुले यांची नावे संघात म्हटल्या जाणाऱ्या 'एकात्मता स्तोत्रा'त असतात, संघ त्यांना प्रातःस्मरणीय मानतो, यात काही विसंगती आहे याची जाणीवही होत नाही. अशा प्रकारे घडलेले असंख्य स्वयंसेवक आज समाजात विविध स्तरांवर, विविध क्षेत्रांत, विविध स्थानी कार्यरत आहेत. आणि आपली घडवणूक अशी झालेली आहे, हे त्यांना अजिबात अमान्य आहे. 

 

संघ विचारांचा प्रचार केवळ शाखांच्या माध्यमातून, बौद्धिकांतूनच होतो असे नाही. त्याचे मुख्य साधन असते खासगी बैठका. प्रा. कु. ल. महाले यांनी हे अधिक विस्ताराने नोंदवले आहे. ते सांगतात, की संघाचे प्रचार नियोजन दोन स्तरांवर चालते. पहिला स्तर – या प्रचाराची योजना आखणारा. दुसरा – ज्यांच्यासाठी प्रचार आहे त्या स्वयंसेवकांचा. प्रचार केंद्रात निश्चित केला जाई. मग तो पुढे अलगद सांगितला जाई. तोही अगदी सहजरीत्या भासेल असा. ते जाणीवपूर्वक सांगण्यात येत आहे असा कोणास संशयही यायला नको. मग हा प्रचार शाखाकार्यवाह, गटनायक, तरुण स्वयंसेवकातील निवडक स्वयंसेवकापर्यंत यायचा. हा प्रचार संघशाखा माध्यमाद्वारे नाही, तर खासही बैठकीतून. या बैठकाही अशा प्रकारे भरवल्या जात, की त्या मुद्दाम आयोजित केल्या आहेत असे कोणास वाटू नये. महाले सांगतात – 'सहजरीत्या, अलगद, हेतुपुरस्सर यात काही नाही अशा रितीने हा प्रचार खाली खाली सरकत असे. कोणतीही विशिष्ट बातमी, कोणतेही विशिष्ट प्रचारसाधन न वापरता, केवळ तोंडी, भारताच्या या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापर्यंत ठरावीक काळात, ठरावीक रितीने प्रसारित झालेली असे. म्हणूनच संघाच्या स्वयंसेवकांची मनोप्रवृत्ती साचेबंद तयार व्हायची.' (मनुचा मासा, लोकवाङ्मय गृह, २०२४, पा. ५९) कुजबुज आघाडी म्हणतात ती हीच. 

 

संघाच्या प्रोपगंडा प्रसारणाचे हे पूर्वीपासूनचे एक प्रमुख माध्यम. प्रोपगंडा म्हणजे काय, तर लोकांच्या सवयी आणि मते, वर्तन आणि विचार यांना अत्यंत हुशारीने आणि जाणीवपूर्वक, आपणांस हवे तसे वळण देणे. त्यासाठी माहितीची निवडक आणि भावनिक मांडणी करणे. ही माहिती सत्य असू शकते. पण प्रामुख्याने ती असते असत्य, अर्धसत्य वा अपमाहिती म्हणजे डिसइन्फर्मेशन. प्रोपगंडाची मिसइन्फर्मेशन म्हणजे खोट्या माहितीशी गल्लत करता कामा नये. कारण प्रोपगंडाचा हेतू असतो तो ग्रहण करणाऱ्यांच्या तमाम धारणा बदलण्याचा.  

 

संघाची स्थापनाच या बदलासाठी झालेली आहे. हिंदूंचे संघटन हे तिचे मुख्य उद्दिष्ट. पण तेथे संघटित होणारा हिंदू हा 'सर्वसाधारण' हिंदू राहात नाही. संघ त्याचे राजकीय हिंदूमध्ये रूपांतर करतो. मेंदूचे बराकीकरण झालेले राजकीय हिंदू. त्यांचे नाव हिंदुत्ववादी. या प्रचारामध्ये प्रोपगंडाची काही खास तंत्रे उठून दिसतात. उदाहरणार्थ, 'पॉप्युलिझम'. आपण म्हणजेच समाज, आपण म्हणजेच राष्ट्र असे यात सांगितले जाते. हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व हा यातलाच प्रकार. तुम्ही राष्ट्रीय असाल, राष्ट्रावर तुमचे प्रेम असेल, तर तुम्ही हिंदुत्ववादीच असले पाहिजे. हिंदुत्वातच हिंदू धर्म सामावलेला आहे. असा हा एकूण विचारव्यूह असतो. त्यात लोकांना गुरफटवून टाकले जाते. ते करण्यासाठी कामास येतात 'ग्लिटरिंग जनरॅलिटी' (चमकदार सामान्यता), 'हॅलो बायस' अशी काही तंत्रे. संघाच्या स्वयंसेवकांशी बोलून पाहा. राष्ट्रभक्ती, राष्ट्रनिष्ठा, न्याय, धर्म, संस्कृती, परंपरा, स्वातंत्र्य, अखंड भारत असे अनेक शब्द त्यांच्या मुखात भिजत पडलेले असतात. संघाच्या प्रचारात अशा 'सकारात्मक' शब्दांचा मुबलक वापर असतो. पण हे असे शब्द असतात, की ज्यांची ना व्याख्या केलेली असते, ना नेमका अर्थ दिलेला असतो, ना पुरावा. हेच ते 'ग्लिटरिंग जनरॅलिटी' तंत्र. याच्या सोबतच येतो 'हॅलो बायस'.   

 

आपल्या मनातील सर्व प्रतिमांना काही संस्कृतिजन्य अर्थ असतात. ते कळत-नकळत तयार झालेले असतात. काही आपल्या शिक्षणाने, पर्यावरणाने, सामाजिक वातावरणाने, धार्मिक संस्कारांनी निर्माण झालेले असतात. प्रोपगंडाकार लोकांच्या मनातील या प्रतिमांचा अगदी कळत-नकळत असा वापर करतात, की त्यातून त्यांना जो विचार पसरवायचा असतो, जो संदेश अभिप्रेत असतो, त्याला तो सांस्कृतिक अर्थ चिकटला जावा. 'हॅलो बायस' हा त्याचाच एक भाग. यात एखाद्या व्यक्तीचे वा संघटनेचे अन्य व्यक्तींशी वा संघटनेशी साहचर्य दर्शवून ती व्यक्तीही तशीच असल्याचे दर्शविले जाते. एखाद्याच्या प्रभामंडलाने त्याच्याभोवतीचे सगळेच तेजाळून जावेत, तसेच हे. या शिवाय या प्रोपगंडात प्रामुख्याने दिसतात, ती 'नेम कॉलिंग' (बदनामीकरण), 'फीअर माँगरिंग' (भयनिर्मिती), 'स्केपगोटिंग' (बळीचा बकरा शोधणे), 'डेमनायझेशन' (दानवीकरण) अशी काही नेहमीची यशस्वी तंत्रे. यातील दानवीकरणाचे आणि भयनिर्मितीचे तंत्र तर ही उजवी मंडळी कोळून प्यालेली आहेत. मुस्लीम हे राष्ट्रशत्रू, ते क्रूर, पाशवी, विश्वासघातकी. दानव. त्यांना भारताचे 'दार-उल इस्लाम' (इस्लामची भूमी) बनवायची आहे. त्यासाठी ते 'लव्ह जिहाद'पासून कसले कसले जिहाद करताहेत. आपली लोकसंख्या वाढवताहेत. हा लोकसंख्येचा मुद्दा तर हिंदुत्ववाद्यांचा अति आवडता. 'केशवकुंज, झंडेवाला, नवी दिल्ली' या पत्त्यावरील 'सुरुची प्रकाशन' या संस्थेतर्फे हिंदुत्ववादी विचारांच्या अनेक स्वस्त पुस्तिका प्रकाशित केल्या जातात. त्यातील एका पुस्तिकेचे नाव आहे – 'भारत इस्लामी राज्य की ओर' (२०१४). लेखक डॉ. के. व्ही. पालीवाल. आणखी एका अशा पुस्तिकेचे नाव आहे – 'मुस्लिम तुष्टीकरण' (२०१४). लेखक डॉ. नित्यानंद. या दोन्ही पुस्तिकांचे म्हणणे एकच, की 'ते' माजलेत. लवकरच ते येथे त्यांचे राज्य स्थापन करणार. डॉ. पालीवाल यांच्या पुस्तिकेतला हा उतारा पाहा – 

 

'जेव्हा मुसलमान सर्व शक्य उपायांद्वारा आपली लोकसंख्या २०-२५ टक्क्यांपर्यंत वाढवतील आणि राजकीय दृष्ट्या शक्तिशाली होतील, तेव्हा ते कोणत्याही राजकीय पक्षाशी युती न करता केवळ स्वबळावर केंद्र आणि राज्यात आपले सरकार स्थापन करतील. तेही शांतिप्रिय जिहाद आणि भारतीय संवैधानिक पद्धतीने २०३०पर्यंत असे होण्याची पूर्ण शक्यता आहे.' (पान क्र. २०)

यास आता केवळ चार वर्षे राहिलेली आहेत. सन २०११च्या जनगणनेनुसार देशात आज हिंदू आहेत ९६ कोटी ६३ लाख आणि मुस्लिम आहेत १७ कोटी २२ लाख. सुमारे ८० कोटींचा फरक. (हिंदूंची संख्या मुसलमानांच्या पाच पट.) पण तथ्य आणि तर्काचे काय? हिंदूंना घाबरवून सोडणे, फीअर माँगरिंग हाच हेतू असल्यावर अशी अपमाहिती पसरवली जाणारच. 

 

यात मुस्लिमांतील उजवेही काही धुतल्या तांदळाचे नाहीत, हेही लक्षात घेतले पाहिजे. त्यांच्यातील अनेक जणही हेच मूर्ख स्वप्न पाहात आहेत. फार पूर्वीपासून मुस्लिम जमातवादी येथे पूर्वीसारखे इस्लामी राज्य स्थापन करण्याच्या वल्गना करीत आहेत. त्यांच्या त्या वल्गना येथील हिंदुत्ववाद्यांना आपल्या प्रोपगंडासाठी साह्यभूत ठरत आहेत. सामान्य नागरिकांमध्ये एकमेकांविषयी भय आणि द्वेष निर्माण करण्याचे काम दोन्हीकडून सुरू आहे. उजवे हिंदू आणि उजवे मुस्लिम एकमेकांस पूरक असतात. दोघे एकमेकांचा द्वेष करतात. एकमेकांच्या वाढीस साह्यभूत ठरतात. दानवीकरण आणि भयनिर्मिती या तंत्राचे लक्ष्य केवळ मुस्लीमच असतात असे नव्हे. त्याचा 'प्रसाद' सर्वच विरोधकांना मिळत असतो. साम्यवादी, समाजवादी, सेक्युलर, उदारमतवादी, आधुनिकतावादी ते सारे राष्ट्रद्रोही अशी मांडणी त्यात असते. त्याच बरोबर विरोधकांचे अमानुषीकरणही – डिह्युमनायझेशनही – सातत्याने केले जात असते. विरोधकांची संभावना वाळवी, झुरळ, साप, राक्षस अशा शब्दांनी करून त्यांचे अमानुषीकरण करणे हा केवळ चिडवण्याचा प्रकार नाही. त्यातील द्वेषास हिंसेची किनार आहे. माणसांना मारणे बरे नाही. पण झुरळांना, मच्छरांना, दानवांना चिरडण्यात कसली आली आहे हिंसा? त्यांच्यावर 'हिट' मारणे, त्यांचा वध करणे या गोष्टी मग आपसूकच सामान्य बनून जातात. मग 'देश के गद्दारों को, गोली मारो सालों को' ही घोषणा देशप्रेमाची वाटू लागते. कोणी म्हणेल, देशद्रोह्यांना गोळी मारा असे म्हणण्यात देशाचाच विचार आहे ना? मग ते चुकीचे कसे? वस्तुतः यात प्रश्न विचारायला हवा तो हा, की हे देशद्रोही कोण ठरवणार? हिंदुत्ववादी, त्यांचे समाजमाध्यमांतील जल्पक (ट्रोल), उद्योगपतींच्या हातातील माध्यमे की न्यायालये? आणि गोळ्या मारण्याचे ते आवाहन कोणाला केले जात आहे? पोलिसांना, सैनिकांना की आपल्या अनुयायांना? 

 

संघाच्या प्रोपगंडामधील आणखी एक विखारी अस्त्र म्हणजे 'नेम कॉलिंग'. गांधी आणि नेहरू परिवार हे त्याचे एक प्रमुख लक्ष्य. 'गांधी का मरत नाही' या पुस्तकात सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत वानखडे यांनी त्यांचे बालपणीचे काही प्रातिनिधिक म्हणावेत असे अनुभव नोंदवले आहेत. ते सांगतात, 'बारा-चौदा वर्षे वयापर्यंत महात्मा गांधी हा फक्त आदराचाच विषय आहे, असा संस्कार मनावर ठासून कोरला गेला होता. पण या (संघाच्या मानल्या गेलेल्या) शाळेत आल्यापासून त्या संस्काराला रोज तडे जायला लागले… मराठी शिकविणारे एक शिक्षक तर शिकवताना विषय सोडून गांधींवर हमखास घसरायचेच. गांधींची टकळी, गांधींचा पंचा, बकरी, चरखा हे विषय तर टिंगलटवाळीचे असायचेच; त्यासोबतच गांधींची नेभळट अहिंसा आणि 'रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले' यावर वीरश्रीपूर्ण कथन करीत, सावरकरांचा गौरवपूर्ण उल्लेख तर गांधीबद्दल मौलाना गांधी असाही उल्लेख हमखास करायचे. गांधींना हिंदूंचा कसा राग होता आणि मुस्लिमांबद्दल कसे अवाजवी प्रेम होते, असेही ते मनावर ठसवायचे. आधीच्या वातावरणात 'नायक' म्हणून गांधी मनावर कोरला होता, तर आताच्या शालेय वातावरणात 'खलनायक' म्हणूनच गांधी पदोपदी समोर येत होता. आवर्जून आणला जात होता. गांधींचा (तथाकथित) लंपटपणा हाही एक चघळण्याचा विषय असायचा. गांधींना खांद्यावर हात ठेवायला दोन्ही बाजूंनी मुलीच कशा लागायच्या, या वाक्यावर सारा वर्ग फिदीफिदी हसायचा आणि माझा चेहरा काळवंडून जायचा.' (मनोविकास, पान क्र. ७-८) हे कुजबूज आघाडीचे कार्यकर्तृत्व. हे बदनामीकरण, चारित्र्यहनन. ते किती नीच पातळीवरचे असावे!

 

केशवकुंज, झंडेवाला हा संघाच्या दिल्लीतील आलिशान मुख्यालयाचा पत्ता. याच पत्त्यावरून प्रकाशित झालेल्या पुस्तिकेत डॉ. पालीवाल लिहितात, 'इंदिरा गांधी या मुस्लीम फिरोज खान यांच्या पत्नी होत्या. त्यांनी आपापली नावे बदलली, पण इस्लाम धर्म नाही सोडला. राजीव गांधी यांना सोनिया यांच्याशी विवाह करण्यासाठी मुसलमान धर्म सोडून ख्रिस्ती बनावे लागले.' (पा. १०) आणि हे असे लिहिणारे एकटे पालीवाल नाहीत. फिरोज हे नाव मुसलमानी वाटते, या एका वाटण्यावर पारशी फिरोज यांना मुस्लीम मानले जाऊ लागले आणि त्यावर सारे इमले रचण्यात आले. याची पुढची पायरी म्हणजे खुद्द नेहरू हे मुस्लीम होते असेही पुराण रचण्यात आले आहे. प्रथम अशा गोष्टी कुजबुजत कानोकानी केल्या जात. मग कोणीतरी हळूच त्यांचा समावेश कुठल्याशा चोपड्यात करी. आणि एकदा ते छाप्यात उतरले, की मग छापून आलेय म्हटल्यावर खरेच असेल, असे मानणाऱ्यांची कमतरता आपल्याकडे नाही. गांधींमुळे फाळणी झाली, पटेलांकडे बहुमत असूनही नेहरूंना पंतप्रधान करण्यात आले, नेहरूंनी अटक टाळण्यासाठी माफी मागितली… किती तरी अफवा, असत्ये आणि अपमाहिती. त्यातही खास चलाखी, संदर्भ वगळून उद्धरण देण्याची, तथ्ये विकृत करून साळसूदपणे सांगण्याची. डॉ. आंबेडकरांनी आरक्षणाची मर्यादा केवळ दहा वर्षे ठेवली होती, हे त्याचे एक उदाहरण. आंबेडकरांनी हे राजकीय आरक्षणाबद्दल म्हटले होते, ही महत्त्वाची बाब नेमकी वगळून आरक्षणविरोधासाठी त्यांचे हे म्हणणे वापरले जाते. या चलाखीचा आणखी एक नमुना म्हणजे नेहरूंच्या नावावर खपवले जाणारे ते 'मी अपघाताने हिंदू आहे' हे विधान.

 

'मी शिक्षणाने इंग्रज, विचारांनी आंतरराष्ट्रीयवादी, संस्कृतीने मुस्लिम आणि केवळ अपघाताने हिंदू आहे', हे नेहरूंचे उद्‌गार असल्याचे भाजपच्या आयटी सेलचे (माजी) प्रमुख अमित मालवीय, भाजपचे फार विद्वान मानले गेलेले राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांच्यासारखे संघवाले सांगत असतात. यातून त्यांना हेच दाखवायचे असते, की नेहरू हा मनुष्य कसा हिंदूविरोधी होता आणि मुस्लिमधार्जिणा होता. वस्तुतः नेहरूंनी असे कुठेही म्हटलेले नाही. हे नेहरूंचे उद्गार नाहीत, तर ती त्यांच्यावरील टीका आहे आणि ती केली होती 'तरुण भारत'चे माजी संपादक आणि काँग्रेसमधील उजव्या गटातील नेते डॉ. ना. भा. खरे यांनी. १९५९मध्ये रफिक झकेरिया यांनी संपादित केलेल्या 'ए स्टडी ऑफ नेहरू' या पुस्तकात (पा. २१५) खरे यांनी 'ॲन अँग्री ॲरिस्टोक्रॅट' या मथळ्याचा लेख लिहिला होता. त्यात त्यांनी ते म्हटले होते. पुढे अनेकांनी ते स्वतः नेहरूंनीच म्हटले असल्याची कुजबुज माजवली. 'डेक्कन क्रॉनिकल' नामक दैनिकाने तर हे विधान थोरांचे बोल म्हणून नेहरूंच्या नावावर छापले. अशी असत्ये सतत कानावर पडू लागली, की हळूहळू लोकांचा त्यांवर विश्वास बसू लागतो. त्यातही ही असत्ये जेवढी मोठी, खोटारडेपणा जेवढा मोठा, तेवढी ती लोकांना अधिक विश्वासार्ह वाटतात. वाचण्यास विचित्र वाटेल हे. पण हे हिटलर नावाच्या प्रोपगंडा-पंडिताने तपासून वापरलेले प्रभावी तंत्र आहे. 'बिग लाय' तंत्र म्हणून ते ओळखले जाते.

 

हिटलर या तंत्राविषयी सांगतो, 'महाअसत्यांमध्ये नेहमीच एक जोरकस विश्वासार्हता असते. कारण लोकांचा भावनिक गाभा सहज भ्रष्ट होऊ शकतो. अत्यंत आदिम साधी मने असतात त्यांची. ही मने छोट्या खोट्यापेक्षा मोठ्या असत्याला हसतहसत बळी पडतात. याचे कारण म्हणजे ते स्वतः नेहमीच लहान-लहान खोटेपणा करीत असले, तरी मोठ्या प्रमाणावरील खोटारडेपणा ते करू शकत नाहीत. शरम वाटत असते त्यांना त्याची. एखादी मोठ्या प्रमाणावरील खोटी गोष्ट तयार करावी, हे त्यांच्या डोक्यातच येत नाही. आणि त्यामुळे दुसऱ्या कोणामध्ये अशा प्रकारे सत्य विकृत करण्याचे धारिष्ट्य, इतक्या निंद्य रीतीने सत्याचा विपर्यास करण्याचा निर्लज्जपणा असू शकेल यावर त्यांचा विश्वासही बसत नाही. आणि जरी त्यांच्यासमोर सगळी तथ्ये ठेवली, सत्य नेमके काय आहे हे पुराव्यांनिशी सांगितले, तरी ते त्याबद्दल शंका घेतील.' (माईन काम्फ, अनु. जेम्स मर्फी, जैनको पब्लिशर्स, पा. २०१)

 

आपल्याकडे हे तंत्र किती प्रभावीपणे वापरले गेले आहे त्याचे सर्वांत मोठे उदाहरण म्हणजे गांधींनी, काँग्रेसने फाळणी केली हे महाअसत्य. 'स्वातंत्र्य हेच मूळ उद्दिष्ट असताना स्वातंत्र्य मिळवण्यात वाटा आहे अशी नोंद इतिहासात होण्यासारखे संघाकडून काही घडले नाही, इतकेच नव्हे तर देशाच्या फाळणीसारखी महत्त्वाची घटना घडून गेली, आणि संघाने हे सर्व उघड्या डोळ्यांनी गुपचूप बघितले, हे असे का?' हा अन्य कोणी नव्हे, तर संघप्रेमी पत्रकार गंगाधर इंदूरकर यांनीच विचारलेला प्रश्न आहे. (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ : काल, आज आणि उद्या, पान क्र. ५६) यावर, 'तेव्हा तेवढे बळ नव्हते', वगैरे थातूरमातूर उत्तरे दिली जातात आणि हिंदू-मुस्लीम जमातवादामुळे फाळणी झाली आहे हे लपवून तिचे खापर गांधींवर फोडले जाते. (यात मौज अशी, की आज फाळणीमुळे हिंदूंचे हितच झाले, अशी मांडणी शेषराव मोरे यांच्यासारखे अभ्यासक 'काँग्रेस आणि गांधीजींनी अखंड भारत का नाकारला?' या ग्रंथातून करीत आहेत. दुसरीकडे भारतातून फुटून स्वतंत्र होऊ इच्छिणाऱ्या त्रावणकोर (केरळ) संस्थानला सावरकर आशीर्वाद देत होते, हे अखंड हिंदुस्थानच्या कोणत्या तत्त्वात बसते असा प्रश्नही विचारला जात नाही. असो.) महाअसत्याचे असेच एक छोटे उदाहरण आहे ते स्वातंत्र्यप्राप्तीविषयीच्या षड्‌यंत्र सिद्धांताचे. बऱ्याच वर्षांपासून ते महाअसत्य कुजबुजले जात होते. त्याचा 'स्फोट' झाला २४ ऑक्टोबर २०२१ रोजी. मोठा किस्साच आहे तो. उत्तर प्रदेशातील झांशी येथे विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने 'लल्लनटॉप अड्डा' नामक कार्यक्रम सुरू होता. विविध पक्षांचे प्रवक्ते त्यात सहभागी झाले होते. त्यात भारतीय जनता युवा मोर्चाची तेजतर्रार प्रवक्त्या सु. श्री. रुची पाठक यांनी अत्यंत ठामपणे असे एक विधान केले, की ते ऐकून अनेक इतिहासकारांना चक्कर आली असेल. त्या म्हणाल्या, 'वो भी (म्हणजे भारताची आझादी) आपने काँट्रॅक्ट बेस पर ली है. पुरी लडके नही ली है… (आझादी) ९९ साल की लीज पे ले पाए थे आप. अगर आप में इतनी गुरबत थी तो पुरी आझादी लेते ना.' त्यांचे म्हणणे असे, की भारत स्वतंत्र झालेलाच नाही. ते स्वातंत्र्य तर सन २०४६पर्यंत भाडेपट्ट्याने मिळालेले आहे. एवढे बोलूनच त्या थांबल्या नाहीत, तर याची 'पुरी साक्ष मैं प्रस्तुत करूंगी' असेही त्यांनी ठणकावून सांगितले. लोक त्या मूर्खपणावर हसत होते. ताई ठाम होत्या. हा ठामपणा, इतक्या मोठ्या असत्यावर विश्वास ठेवण्याचा सुंदर बिनडोकपणा येतो त्यास कारणीभूत असते हे हिटलरी तंत्र. 

 

अशी किती तंत्रे सांगावीत. ती वापरणे, ना-ना अफवा, मिथके, षड्‌यंत्र सिद्धांत रचणे, त्याद्वारे विरोधकांची बदनामी, चारित्र्यहनन, लोकांसमोर सतत कसला ना कसला बागुलबुवा ठेवत भय निर्मिती, त्यातून तर्कबुद्धीचे बधिरीकरण साधणे, असे एकीकडे चाललेले असते. दुसरीकडे 'स्ट्रॉ मॅन फॅलसी' (विरोधकांच्या भूमिकेचे विकृतीकरण), 'व्हॉटअबाऊटिझम' किंवा 'टू क्वोक्वी' (टीकेस उत्तर न देता, पूर्वीही असे झाले/केले होते असे म्हणत टीकेस बगल देणे), 'ॲड होमिनेम' (मुद्द्याऐवजी तो मुद्दा मांडणाऱ्या व्यक्तीवर टीका करणे) अशा तर्कदोषांद्वारे विरोधकांचे टीका, आरोप उडवून लावले जात असतात. इतिहासाचे विकृतीकरण करून आपल्याला सोयीचा तेवढा इतिहास मांडला जात असतो. आपल्या इतिहासातील वाईट/प्रतिकूल तथ्ये लपवून चांगल्या/प्रतिकूल गोष्टी तेवढ्या मिरवल्या जात असतात. हे 'कार्ड स्टॅकिंग'. समाजात 'व्हिक्टिमहूड' म्हणजे आपण कसे शतकानुशतकाचे अन्यायग्रस्त अशी भावना निर्माण केली जात असते. आणि त्याच वेळी हिंदुत्ववादी संघटनांचे, संघाचे महिमामंडन केले जात असते. संघातील शिस्त, निष्ठा, संघ स्वयंसेवकांचा निःस्वार्थीपणा, त्यांचे आपत्तींच्या वेळी धावून जाणे अशा प्रकारच्या गोष्टींची – संघ प्रसिद्धीपराङ्मुख आहे असे सांगत – प्रसिद्धी केली जाते. शिस्त, निष्ठा, निःस्वार्थीपणा हे सद्‌गुणच. परंतु त्या सद्‌गुणांमुळे विचारविकृती योग्य ठरत नाही. पण यातून 'हॅलो बायस' तयार केला जातो. असे सद्‌गुण आहेत, म्हणून त्या व्यक्तीचे अन्य विचारही चांगलेच असतील, असा समज निर्माण केला जातो. 

 

येथे एक बाब स्पष्ट केली पाहिजे, की ही अशी तंत्रे एकटा संघ वा उजवेच वापरतात असे नव्हे. डावेही त्यात मागे नाहीत. पण त्यांच्या प्रोपगंडाला नसलेला एक भक्कम आधार संघाकडे आहे. संघाच्या विचारांकडे अनेक लोक आकृष्ट का होतात, याचे उत्तर त्यात दडलेले आहे. ती संकल्पना आहे 'सांस्कृतिक वर्चस्ववादा'ची. 

 

**

 

संघ स्वतःस सांस्कृतिक संघटना मानतो. आपण निवडणुकीच्या राजकारणापासून दूर आहोत असे सांगतो. आणि ते खरे आहे. संघाचा प्रोपगंडा हा केवळ निवडणुकीच्या काळात मतदारांना प्रभावित करण्याचे साधन नसतो. आपली जगाकडे पाहण्याची जी विशिष्ट चौकट आहे, ती लोकांनी स्वीकारावी यासाठी त्यांचा सतत प्रयत्न सुरू असतो. या चौकटीत येतात इतिहास, राष्ट्र, धर्म, बहुसंख्याक-अल्पसंख्याक यांच्यातील संबंध, देशभक्ती, संस्कृती, सामाजिक मूल्ये याविषयीच्या संघाच्या कल्पना. त्या रुजल्या की उजव्यांचे निवडणुकीतील यश दूर नाही. ते आपोआप चालत येणार, हे यामागील धोरण आहे. आयआयटी, चेन्नैतील डॉ. दयाल पालेरी आणि डॉ. आर. संतोष यांच्या एका शोधनिबंधाचे शीर्षक आहे – 'इलेक्शन्स कॅन वेट!' आणि त्याचा जोडमथळा आहे – द पॉलिटिक्स ऑफ कन्स्ट्रक्टिंग ए 'हिंदू ॲटमॉस्फिअर' इन केरला, साऊथ इंडिया (मॉडर्न एशियन स्टडीज, केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस, १९ जुलै २०२३). 

 

संघ परिवाराशी संलग्न असलेल्या हिंदुत्ववादी संघटना केरळमधील सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात बदल घडवून आणण्यासाठी किती पद्धतशीर आणि एकाग्रतेने प्रयत्न करीत असतात, हे या शोधनिबंधातून त्यांनी दाखवून दिले आहे. यात त्यांनी तीन अराजकीय संघटनांची उदाहरणे दिली आहेत. त्यातील 'देशीय सेवा भारती' आरोग्य, शिक्षण आदी सामाजिक कार्यातून समाजात शिरलेली आहे. अशा कामातून समाजात हिंदुत्व विचारांप्रती स्वीकारार्हता निर्माण होत असते. 'केरळ क्षेत्र संरक्षण समिती' या मंदिरांच्या 'संरक्षणा'चे काम करते; वार्षिक धार्मिक उत्सवांत अन्नदान महायज्ञम् करणे; हिंदू संघटनांना एका व्यासपीठावर आणणे अशी तिची कामे सुरू असतात. तिसरी संघटना 'विवेकानंद वैदिक व्हिजन केंद्र'. संघाचे नेते एकनाथ रानडे यांनी स्थापन केलेल्या विवेकानंद केंद्राशी ती जोडलेली आहे. केरळमधील बहुसांस्कृतिक आणि सेक्युलर वातावरणात हिंदू सांस्कृतिक जाणीव कमी झाली आहे. ही तथाकथित 'सांस्कृतिक शून्यतेची' स्थिती बदलणे आणि लोकांमध्ये हिंदू आध्यात्मिक जाणीव निर्माण करणे, हे या केंद्राचे ध्येय. या जाणीव निर्मितीसाठी ही संघटना योगसत्रे घेते. विद्यार्थी, पोलीस, सरकारी कर्मचारी यांच्यासाठी योगवर्ग भरवते. कुटुंबांमध्ये 'सायलेंट रिव्हॉल्युशन' घडवून आणण्याचा प्रयत्न करते. स्त्री हे सीतेचे रूप. तिने कुटुंबात सांस्कृतिक आणि आध्यात्मिक मूल्ये रुजवावीत, हे पाहते. 'सांदिपनी शिशु विहार' नामक निवासी शाळा चालवते. केरळमध्ये या अराजकीय संघटनांच्या कामाचा भाजपला निवडणुकीत फायदा झाल्याचे या शोधनिबंधाचे म्हणणे आहे.

 

केरळमधील या अराजकीय संघटनांचे हिंदुत्वविचारांच्या प्रचार-प्रसारातील योगदान प्रातिनिधिक म्हणून पाहावे लागेल. अशा प्रकारच्या अनेक संस्था, संघटना या पद्धतीचे कार्य करीत असतात. सन २०२५मध्ये 'सेरी-सायन्सेसपो' ही संस्था आणि 'द कॅराव्हान' मासिक यांनी 'सीईंग द संघ : मॅपिंग द आरएसएसेस ट्रान्सनॅशनल नेटवर्क' नामक संशोधन अहवाल प्रसिद्ध केला. त्यातील माहितीनुसार, आज जगभरात संघाशी निगडित असलेल्या सुमारे अडीच हजार संस्था, संघटना कार्यरत आहेत. पंतप्रधान न. दा. मोदी यांनी संघ ही जगातील सर्वात मोठी 'एनजीओ' असे म्हटले आहे, ती अतिशयोक्ती नव्हे. या एवढ्या विशाल परिवाराचे विविध कार्यक्रम, उपक्रम यांद्वारे सदोदित संघाच्या हिंदुत्वाचा प्रचार सुरू असतो. 

 

हे हिंदुत्व आरूढ होऊन येते ते अर्थातच हिंदूंच्या धार्मिक कल्पनांवर, आचार-विचारांवर. हजारो वर्षांपासून या कल्पना, आचार, विचार, रूढी, परंपरा हिंदूंच्या जगण्याचा भाग आहेत. हिंदू धर्म हा विविधतेने नटलेला आहे. अनेक पंथ, संप्रदाय, जाती यांचा तो समुच्चय आहे. द्वैती, अद्वैती, विशिष्टाद्वैती, सांख्यवादी, जडवादी, अज्ञेयवादी, वेद न मानणारे नास्तिक, ईश्वर आणि वेद दोन्हीही न मानणारे नास्तिक तत्त्वज्ञान अशा विविध दर्शनांचा, विचारधारांचा तो गुच्छ आहे. विविधतेत एकता हे केवळ भारतभूचेच नाही, तर ते हिंदू धर्माचेही वैशिष्ट्य आहे. या सगळ्याची मिळून एक संस्कृती निर्माण झालेली आहे. या संस्कृतीला नेमके चिमटीत पकडता येणे कठीण. मा. स. गोळवलकर हे संघाचे दुसरे सरसंघचालक. त्यांचे 'बंच ऑफ थॉट्स' हे पुस्तक म्हणजे संघवाल्यांचे 'नवनीत'. त्यात (पान क्र. ३५) ते सांगतात, की या संस्कृतीची व्याख्या करता येत नाही, पण आपल्या अवघ्या जीवनावर तिच्या खुणा दिसतात. 

 

या खुणा कोणत्या, त्याचे एक उदाहरणही ते देतात, की पं. जवाहरलाल नेहरू यांच्या पत्नी कमला यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या राखेचे विसर्जन प्रयाग येथे त्रिवेणी संगमात करण्यात आले. पं. नेहरू हे भौतिकवादी. देव, धर्म, आत्मा या त्यांच्या दृष्टीने निरर्थक बाबी. त्यांच्यासारख्या मनुष्याच्या लेखी ती राख म्हणजे राख. त्या वेळी त्यांच्या मनात संघर्ष झाला. त्यांच्यातील अज्ञेयवादी म्हणू लागला, की ती राख तिकडेच परदेशात फेकून द्यावी आणि परतावे. आणि त्यांचे प्राचीन हिंदू रक्त सांगू लागले, की नाही. आपल्या प्रिय पत्नीचे ते पवित्र अवशेष आणून ते गंगानदीच्या कुशीत अर्पण करावेत. अखेर प्राचीन संस्कारांचा विजय झाला. त्यांनी ती राख त्रिवेणी संगमात अर्पण केली. हे संस्कार आहेत. हा संस्कृतीचा ठसा आहे. हे गोळवलकर यांचे म्हणणे. ते खरेही आहे. आणि हेही खरे आहे, की नेहरूंचे भौतिकवादी असणे, त्यांच्या मनातील तो संघर्ष या बाबी म्हणजे गोळवलकरांच्या कविकल्पना आहेत. असा संघर्ष नेहरूंच्या मनात कधीही नव्हता. त्यांनी स्वतः पुढे त्यांच्या मृत्युपत्रात त्यांच्या देहाची राखही गंगेत विसर्जित करावी असे म्हटले होते. पण त्यालाच जोडून त्यांनी असेही म्हटले होते, की यात धर्माचा काही एक संबंध नाही. भारताची प्राचीन संस्कृती आणि सभ्यता यांचे प्रतीक असलेल्या गंगा नदीशी माझे लहानपणापासूनचे नाते आहे. (सिलेक्टेड वर्क्स ऑफ जवाहरलाल नेहरू, खंड २६, पान क्र. ६१२-६१३) नेहरूंच्या 'भारताचा शोध'मधील पहिली काही प्रकरणे तर या प्राचीन संस्कृतीच्या शोधास वाहिलेली आहेत. त्यात या संस्कृतीचा गौरव केलेला आहे. ही 'भारतीय', 'हिंदी' संस्कृती आहे असे ते म्हणतात. 

 

येथे मुद्दा असा, की हिंदू धर्मात जन्म घेतलेल्या प्रत्येकावर या संस्कृतीचा ठसा असतोच. रामायण-महाभारतासारखा 'इतिहास', पुराणे, येथील महापुरुष, संत-महात्मे, झालेच तर सण-समारंभ, सोहळे, उत्सव यांतून संस्कारीत झालेले हे मन असते. इतिहास आणि परंपरांतून निर्माण झालेल्या सामाजिक धारणा - ज्याला कॉमन सेन्स म्हणता येईल - त्या बाळगणारे हे मन असते. हे सारे ज्याच्या विचारविश्वाचा भाग आहे अशा मनाची सुपीक भूमी संघाला लाभलेली आहे. संघाचा विचार जेव्हा हिंदू धर्माच्या आधाराने येतो, महापुरुषांच्या, देव-देवतांच्या, ऋषीमुनींच्या कथांतून येतो, सण-समारंभाच्या निमित्ताने होत असलेल्या कार्यक्रमांतून येतो, तेव्हा त्याचा स्वीकार करण्यात या हिंदू मनास काही समस्या असण्याचे कारणच नसते. हिंदू धर्म आणि हिंदुत्वाचा विचार यांत काही फरक आहे हे समजण्याची क्षमता सगळ्यांत असतेच असे नाही. 

 

हिंदू धर्माचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तो 'किताबी' नाही. त्यामुळे तो कडवा नाही. एकारलेला नाही. कट्टर नाही. आणि यामुळेच जातीभेद, काही पंथांचे कट्टर आचार-विचार, त्यातील स्त्रीला दुय्यमत्व वा स्पृश्यास्पृश्यता यांसारख्या अजूनही जिवंत असलेल्या मागास कल्पना असे किती तरी अवगुण असूनही सेमेटिक धर्मांच्या तुलनेत तो किती तरी 'आधुनिक' आहे. तो विचारांनी खुला आहे, सर्वसमावेशक आहे, सहिष्णु आहे. त्यात मतभेदांना जागा आहे. सुधारणांचा स्वीकार आहे. आणि यामुळे त्यात धार्मिक दुरभिमानाला, कट्टरतेला जागा नाही. भारत नावाचे जे हजारो वर्षांचे सातत्य आहे, त्यात हिंदू, बौद्ध, जैन, शीख असे चार मोठे धर्म जन्मास आले. त्यांतही अनेक पंथ, संप्रदाय निर्माण झाले. तशात बाहेरून आलेले ख्रिस्ती आणि इस्लाम धर्म. त्यांतील भेदाभेद. हे पंथ, संप्रदाय, धर्म यांच्यात संघर्ष झाले. सामंजस्य, समन्वय झाले. एकमेकांचे आचार-विचार, तत्त्वज्ञान, संस्कृती, रूढी, परंपरा, साहित्य, कला यांचे आदानप्रदान झाले. त्या घुसळणीतून येथील भारतीय संस्कृती आकाराला आली. हिंदुत्व विचारांत ही भारतीय वा हिंदी संस्कृती बसत नाही. या हिंदुत्वाचा विचार हा हिंदू धर्मातील विविधता दूर करून त्याचे अन्य धर्माप्रमाणे कोरडे सपाटीकरण करू इच्छितो आहे. त्यात सनातन धर्म म्हणून येतो तो ब्राह्मण्यवाद. त्यात वर्णव्यवस्थेचे समर्थन आहे. जातिव्यवस्थेचा, पुरुषसत्ताक पद्धतीचा गौरव आहे. व्यक्तीऐवजी समष्टीला महत्त्व आहे. या हिंदुत्वाला मनुस्मृतीचे आकर्षण आहे. ती त्यांच्या स्वप्नातील हिंदुराष्ट्राची राज्यघटना आहे. असे असूनही सामान्य हिंदू मन हिंदुत्ववाद्यांच्या विचारांकडे, मूल्यांकडे आणि कल्पनांकडे आकृष्ट होते, त्यांना 'कन्सेन्ट', संमती देते याचे कारण हिंदू धर्म हा हिंदुत्वाचाच भाग आहे असे त्यांना पटवून देण्यात आलेले आहे. सांस्कृतिक वर्चस्ववाद म्हणतात तो हाच. आपला विचार, आपल्या धारणा, मते ही समाजाच्या दैनंदिन विचारविश्वाचा भाग बनवणे हा त्याचा महत्त्वाचा भाग असतो. संघाने चालवले आहे ते हे. प्रश्न असा, की गत १०० वर्षांत संघाला त्यात यश मिळाले ते किती?   

 

हिंदुत्ववादी विचार आज सत्तेवर आहे. गेली किमान दोन दशके त्याची मोठी हवा आहे. आज तर हिंदुत्ववाद्यांचा आवाज सर्वात मोठा आहे. विविध शासकीय संस्था, प्रशासन, विद्यापीठे, न्यायसंस्था, माध्यमे यांतील मोक्याच्या ठिकाणी संघविचारांचे लोक बसवण्यात आले आहेत. धनशक्ती अपार आहे. प्रचाराची सर्व साधने हाती आहेत. असे असताना हिंदुत्ववादी विचारसरणीचा समाजजीवनावर प्रभाव पाडण्यात किती यश आले आहे? माध्यमांतून जे चित्र उमटते त्यातून हा प्रभाव प्रचंड असल्याचे कोणी म्हणू शकेल. पण ते चित्र आभासी असू शकते. मग तो प्रभाव मोजायचा कसा? त्याचे एक मापटे म्हणून भाजपला मिळणाऱ्या मतसंख्येकडे पाहता येईल. आणि ती पाहिली, की म्हणता येईल, गेल्या १०० वर्षांतील संघाचे त्या बाबतीतले यश हे काही फार देदीप्यमान नाही. 

 

संघविचार सत्तास्थानी आहे हे खरे. पण हेही खरे, की आजही देशातील ५६ टक्के मतदार या विचारांच्या विरोधात आहेत. आपल्याकडे मतदारांची धार्मिक आधारावर नोंद ठेवली जात नाही. त्यामुळे यातील नेमके हिंदू मतदार किती हा ठोस आकडा देणे कठीण. तरीही २०२४च्या निवडणुकीतील मतदारांचे आकडे, त्या निवडणुकीतील 'सीएसडीएस-लोकनीती'ने केलेल्या मतदानोत्तर चाचणीतून प्राप्त झालेले धार्मिक गटांचे आकडे यातून एक साधारण अंदाज काढता येतो. त्यानुसार त्या निवडणुकीत मतदान झाले होते ६४.६४ कोटी. त्यात हिंदू मते होती ५२.१ कोटी. भाजप आणि मित्रपक्षांना (एनडीए) मिळाली २८.२७ कोटी मते. त्यात हिंदूंची अंदाजे मते होती २६.३१ कोटी. याचा अर्थ होतो त्या निवडणुकीत निम्म्या हिंदू मतदारांनी भाजप व मित्रपक्षांना नाकारले होते. एकंदर हिंदुत्ववाद्यांच्या प्रचारतंत्राला मिळालेले हे यश आणि त्याचा बोलबाला यांचे प्रमाण फारच व्यस्त दिसते. ही आकडेवारी अंदाजे असल्याने हा संघविरोधकांचा 'प्रोपगंडा' असे कोणी म्हणू शकते. मतांच्या आकड्यांतून विचारांचा प्रभाव मोजणे तर्कदुष्ट असेही कोणी म्हणू शकेल. असे असले, तरी 'समग्र भारतीय समाजात संघाचीच लक्षणे दिसू लागतील,' 'समग्र भारतीय समाजात दुधात साखर मिसळावी त्या प्रकारे संघ मिसळून जाईल', हे काही या १०० वर्षांत घडू शकलेले नाही. तेव्हा माध्यमी चर्चांत अनेकदा संघाची ताकद असे म्हणत जे एक भव्यदिव्य आणि डाव्यांसाठी भयावह असे चित्र उभे केले जाते, तो अखेर प्रोपगंडा तर नाही ना, हे तपासून पाहावे लागेल.