Skip to main content

गो गो गोग्गोड गोळी: एक गचाळ गच्चागोळ

ललित

प्रवेश १

(स्थळ: हॉल. संध्याकाळची वेळ. लाइट न लावताच ४५+ वर्षं वयाचा विवेक सोफ्यावर लॅपटॉप घेऊन बसला आहे. काहीतरी टाइप करतो आहे. ४०+ वयाची बायको माया लॅच उघडून घरात येते. विवेकला कॉम्पवर बसलेला पाहून चिडचिडत तणतणाट करते.)

माया : मला वाटलंच होतं, की तू आजही कॉम्प्युटर उघडून फेसबुकवर अकलेचे तारे तोडत बसलेला असणार! काही काळ नाही, वेळ नाही... साधं दिवे लावायचं लक्षात नाही. (तरातरा जाऊन लाइट लावते.)

विवेक : (मांडीवरचा कॉम्प्युटर शेजारी ठेवत, पुटपुटत) आजही?

माया : तेच ते. तुला कधी लक्षात राहिले आहेत का आमचे बर्थडेज?

विवेक : (कॉम्प्युटर सोडून उठतो, तिच्या मागेमागे जातो) अगं अगं, पण जरा ऐकून तर घेशील? तू सांगितलेली सर्व कामं मी नीट पार पाडली आहेत.

माया : आपलं काय ठरलं होतं विवेक? की प्रांजळ जरी घरी नसला, तरी आपण त्याचा बर्थडे तो इथे असल्यासारखाच साजरा करायचा.

विवेक : हो, मग करूया की. पण आपली वेळ एवढ्या लवकरची कुठे असते कधी? नऊ, साडेनऊ तर वाजतातच ना! आणि प्रांजळ लांब असल्याने केक खाणार नसला, तरी मी तो त्याचा आवडता, तुझा जेमतेम आवडता आणि माझा नावडता डच ट्रफल चॉकलेट केकदेखील आणलाय. आणि आताही मी प्रांजळशीच चॅट करता येतं का, ते पाहत होतो. पण तो ऑनलाइन नाहीये बहुधा. आत्ताच पेपरहून आला असेल कदाचित!

माया : अरे पण तू हे विसरलास ना? काल तुला मी काय म्हणाले होते, की आपण डेकोरेशनपण तस्संच करायचं, जसं दरवर्षी करत होतो आपण.

विवेक : सॉरी, हे मी नव्हतं ऐकलं.

माया : माझ्या बोलण्याकडे तुझं लक्ष असेल, तर ऐकशील ना? तुझं लक्ष सदान्‌कदा त्या फेसबुकवर...

विवेक : अगं, करतो की आता. अजून वेळ आहे बराच. आणि आपण दोघंच तर आहोत, तेव्हा थोडा उशीर झाला तर काहीच बिघडत नाही. आणि जेवायला बाहेरच जाऊ, दरवर्षीसारखे.

माया : सॉरी हं, आपण बाहेरून मागवू फार तर; पण बाहेर जायचा माझा मूड नाहीये अजिबात. मला प्रांजळ नसल्यानं खूप अस्वस्थ वाटतंय.

विवेक : (जवळ जाऊन तिच्या खांद्यावर हात ठेवत, लाडीगोडी-अजीजीच्या सुरात) मायु, आता आठवून बघ. मी तुला मुळातच सांगत होतो, की आपण त्याला बोर्डिंग स्कूलमध्ये नको ठेवूया. तो आपल्या जवळ असायला हवा. पण तेव्हा तुझाच हट्ट होता, की तो स्वावलंबी बनायला हवा, त्याला शिस्त लागायला हवी, मला तो इतर पुरुषांसारखा... खरं तर तुझ्यासारखा... (स्वतःच्या छातीवर हात आपटत) म्हणजे माझ्यासारखा आयतोबा व्हायला नको. ब्ला... ब्ला... ब्ला...

माया : मला तेव्हा थोडीच स्वप्न पडलं होतं, की प्रांजळच्या पहिल्या 'टीन' बर्थडेच्या दिवशी त्याची सेमिस्टर असेल! एनी वे. तू आता बऱ्या बोलानं तो लॅपटॉप बाजूला ठेव आणि ते डेकोरेशनचं सामान शोध. नाही तर तू चहा कर, मी ते सामान शोधते. तुला नाहीतरी ते सापडणं तसं कठीणच. घरात लक्ष असेल तर ना? सकाळी उठल्यावर ते पेपर आणि घरी आल्यावर ते नवं खूळ फेसबुक! जा, चहा कर. तेवढ्यात मी जरा फ्रेश होते आणि मग ते डेकोरेशनचे सामान शोधते. (असं म्हणत बाथरूमकडे जाऊ लागते, पुन्हा पाठी वळते.) नको, नाहीतर आधी सामान शोधते. म्हणजे तुझं काम सुरू होईल, नाही का? (कपाट, टेबलच्या ड्रॉवरमधून कुठूनतरी एक खोका काढते, त्याच्या हातात देते. तो खोका उघडतो. आत डेकोरेशनचं सामान असतं. विवेक ते बाहेर काढतो.)

माया : चल, जाऊ आता मी बाथ घ्यायला?

विवेक : हो, जा की!

(माया बाथरूममध्ये पळते. विवेक चटकन फेसबुक बघून घेतो आणि स्टुलावर चढून डेकोरेशन करायला सुरुवात करतो. एवढ्यात बेल वाजते. विवेकला स्टुलावरून उतरायला थोडा वेळ लागतो, त्यामुळे पुन्हा बेल वाजते. विवेक लगबगीने दाराकडे पोहोचतो. दार उघडतो. दारात हातात बुके घेऊन मानसी, ही मायाची मैत्रीण, उभी असते.)

विवेक : अरे, वेलकम, वेलकम! किती दिवसांनी भेटते आहेस. म्हणजे फेसबुकवर रोज दिसतेस म्हणा. मात्र प्रत्यक्षात लुकिंग क्यूट हं! माया आत्ताच गेली आहे फ्रेश व्हायला, येईलच एवढ्यात. (तिच्याजवळ जाऊन) तिला मात्र बोलू नका हं, फेसबुकवर माझं, म्हणजे आपलं काय चालतं ते. ती खूप उचकते फेसबुकवर; तिला सवतच वाटते फेसबुक म्हणजे. ते जाऊ दे, ज्याचं त्याला. बरं, तू चहा घेणार ना? मी ठेवतच होतो.

मानसी : हं, चालेल चहा. तशी मी घरी पिऊन आले आहे, पण सासूबाईंबरोबर बिनसाखरेचा. कुठे वेगळा वेगळा करत बसणार ना! (डोळा मारते.) तर आता पिते एका पुरुषाच्या, तेही स्त्रीमुक्तीवाल्या मैत्रिणीच्या नवऱ्याच्या हातचा!

(मानसी टाळीसाठी हात पुढे करते. विवेक तिला टाळी द्यायला हात उचलतो. एवढ्यात बाथरूम उघडल्याचा आवाज येतो. विवेक प्रतिक्षिप्त क्रियेने हात मागे घेतो. माया बाहेर येते.)

माया : काय गं, अचानक?

मानसी : म्हटलं, सरप्राइज देऊया मैत्रिणीला... अगं, माझ्या लक्षात होतं, प्रांजळचा वाढदिवस आहे आज ते! त्याची परीक्षा असल्यामुळे तो आता सेकंड सेमिस्टर संपवूनच येणार असल्याचं तू म्हणाली होतीस ते! म्हणून म्हणाले, तू नक्की आज जरा लो असणार. मला आठवतंय ना, उदयचा पन्नासावा वाढदिवस झाला होता ना मागच्या वर्षी, तेव्हा नेमकं त्याच्या ऑफिसात प्रचंड काम होतं, की त्याला येणंच शक्य नव्हतं. मग काय, मी, सासूबाई आणि नंदन तिघांनीच घरच्या घरी साजरा केला उदयचा पन्नासावा बर्थडे, त्याच्या अनुपस्थितीत! तर सांगायचं काय, की मला माहिती आहे ते, मन कसं खट्टू होतं ते. त्यात प्रांजळचा तर पहिला 'टीन' बर्थडे... माझ्या नंदनपेक्षा वर्षाने लहान तो.

(आतून विवेक चहा घेऊन बाहेर येतो. पहिले दोन कप त्या दोघींना देतो. पुन्हा तिसरा कप आणण्यासाठी तो आत जात असताना:)

मानसी : अरे, मी आणते ना!

माया : अगं, तू बस. आणेल तो. त्याला सवय आहे. पाहुणे आले की तोच चहा करतो. पुरुषांनी घरकामात आपला वाटा उचललाच पाहिजे ना! भले खारीचा का...

(एवढ्यात बेल वाजते. मानसी आणि माया दोघी उठून दाराकडे झेपावतात. दारात एक तिशीतला तरुण उभा असतो. तो नमस्कार करतो. माया बुचकळ्यात पडते. मानसी त्याला ओळख देते आणि म्हणते:)

मानसी : ये रे गुरुनाथ, आत ये. माया, हा गुरुनाथ... माझ्या एका कलीगचा भाचा आहे हा.

(आतून विवेक चहाचा कप घेऊन आलेला असतो. तो गुरुनाथला विचारतो.)

विवेक : तुम्ही थोडा चहा घेणार का? आय डोंट माइंड शेअरिंग.

मानसी : मीसुद्धा प्यायला सुरुवात नव्हती केली.

(विवेक लगबगीने आत जातो आणि कप घेऊनच येतो. गुरुनाथसाठी चहाचा कप तयार होतो.)

मानसी : तर आता तुमची ओळख करून देते. हा गुरुनाथ. एका मल्टिनॅशनल फार्मास्युटिकलमध्ये नोकरीला आहे. ते मेड रेप असतात ना? तर आज मीच त्याला इथे बोलावला मुद्दाम. प्रांजळच्या वाढदिवसाला सरप्राइज प्रेझेंट द्यायला. आता तोच तुम्हाला पुढची माहिती सांगेल.

गुरुनाथ : सर, तुमचा जास्त वेळ नाही घेणार. थोडक्यात सांगतो, मॅडम, की आमची फार्मा कंपनी ही फ्युचरिस्टिक आणि सेक्ससंबंधी नवनवीन प्रॉडक्ट्स बनवण्यासाठी खूप नावाजलेली आहे.

गोळ्या गच्चागोळ

विवेक : हां, मग?

गुरुनाथ : सांगतो. तर मध्ये काय झालं, की ह्या मानसी मॅडम आहेत ना, त्या माझ्या मावशीकडे माया मॅडमबद्दल नेहमी बोलायच्या, की त्या कशा मॉडर्न विचारांच्या आहेत, स्त्रीमुक्ती वगैरे.

माया : पण त्याचा औषधांशी काय संबंध?

मानसी : आहे आहे, तेच तर ऐक आता. तू एवढी खूश होशील ना! की बघ, मी प्रांजळच्या बर्थडेसाठी सरप्राइज गिफ्ट देण्यासाठी गुरुनाथना मुद्दाम आजच्या मुहूर्तावरच बोलावला इथे.

विवेक : अरेच्चा, मला तर काही कळेनासंच झालं आहे... This is interesting. हे तुम्हा बायकांचं 'सरप्राइज' वगैरे काय असतं ना, ते माझ्या डोक्यावरून जातं.

गुरुनाथ : सांगतो. तसं काही ते फारसं अवघड वगैरे नाही, की त्यात काही गुपित वगैरे नाहीये.

मानसी : अगं, तू नेहमी म्हणतेस ना, पुरुषांनी बाईकडे उपभोग्य वस्तू म्हणून पाहू नये म्हणून?

माया : हो, म्हणतेच की! त्यात काय चुकलं? बरोबरच आहे ते. शेवटी बाईदेखील पुरुषासारखीच हाडामासाची माणूस आहे; तिलादेखील मन आहे, भावना आहेत, आत्मसन्मान आहे. सेल्फ रिस्पेक्ट!

विवेक : आणि आपल्याकडे तर असंच पाहिलं जातं. हल्ली रेपच्या केसेस बघ ना, केवढ्या ऐकू येतात! तो आसाराम बापू काय आणि तरुण तेजपाल कुणाशी अतिप्रसंग करतो, कहर आहे! राजकारण्यांची बिंगं छुप्या कॅमेऱ्याने फोडणाऱ्या ह्या महाभागाला, आपण देखील कॅमेऱ्यात टिपले जातोय ह्याचं भान राहू नये? बाकी निर्भया, ते शक्ती मिलचं प्रकरण...

गुरुनाथ : तो एक वेगळा विषय आहे. म्हणजे असं, की बाईवर बळजबरी तशी पूर्वापार होतेच आहे. बायका जोपर्यंत उंबरठ्याच्या चार भिंतींमध्ये होत्या, तोपर्यंत त्यांच्यावर होणाऱ्या बळजबरीला वाचा फुटायची नाही. आता बायका जरा धीट होत चालल्या आहेत. बरं, ते असू दे; तो वेगळाच विषय आहे.

तर आमच्या फार्मा कंपनीनं अशा गोळ्या शोधून काढल्या आहेत, की त्या जर वयात येणाऱ्या मुलाला दिल्या, तर तो कधीही कुठच्याही स्त्रीकडे उपभोग्य वस्तू म्हणून पाहणार नाही.

माया : काय सांगताय काय? ब्रेकिंग न्यूज आहे ही! फँटॅस्टिक! अरे वा, हे फारच छान आहे. कारण संस्कारांनी अशा सुधारणा घडवता येतात, पण ती प्रबोधनाची क्रिया फार किचकट असते... आणि हुकमीपण नसते. शिवाय मुलांवर आपल्यापेक्षा जास्त प्रभाव हा संगतीचा, सराउंडिंगचा आणि सध्याच्या काळात तर मीडियाचा असतो.

विवेक : आणि शेवटी नाही म्हटलं तरी ती नैसर्गिक प्रेरणा आहे.

मानसी : होय, खरंच आहे ते. पण स्त्रीमुक्तीवाल्या म्हणतात, की संस्कृती पुरुषप्रधान आहे, त्यामुळे स्त्रियांवर अन्याय होतात, पुरुष बायांकडे उपभोग्य वस्तू म्हणून पाहतात. पण मी म्हणते, निसर्गानं त्यांना तसं बनवलंय, तर ते बघणारच ना? त्यांचंदेखील काहीतरी बिंग असेलच ना... नाहीतर सगळेच असे कसे वागतील ना?

माया : तू बघतेस का असं पुरुषाकडे... उपभोग्य वस्तू म्हणून?

मानसी : छे गं, काहीतरीच काय! खालमानेनं चालायचे संस्कार लहानपणापासूनच केले जातात आपल्यावर; त्यामुळे उपभोग्य वस्तू म्हणून बघणं तर लांबच राहिलं, आपण निरखून बघतच नाही पुरुषांकडे. आणि केवढी घाई असते! पण हां, माझ्याकडे कुणी बघितलं तर मला त्यात काही आक्षेपार्ह वाटत नाही. म्हणूनच तर मी नाही बाई नंदनला अशा गोळ्याबिळ्या देणार... पुरुष बाईकडे बघणारच, असं मला बाई वाटतं, पटतं. उदय सांगतो ना, तिकडे सौदीमध्ये बुरखेधारी बायका जास्त असल्याने काही वेळा अख्खा दिवस स्त्रीदर्शन घडत नाही. मग घरी जाऊन कधी टीव्ही बघतो असं होतं त्यांना.

माया : तुझं तुला. मी मात्र सीरियसली विचार करणार आहे ह्या गोळ्या प्रांजळला द्यायचा.

विवेक : पण एकच सांगतो हं, की हा निर्णय तुला वाटतो तेवढा सोपा नाहीये.

गुरुनाथ : खरंय तुमचं म्हणणं; निर्णय सोपा नाहीये हे नक्कीच. म्हणून तुम्हाला विचारविनिमय करण्यासाठी एका महिन्याचा कालावधी दिला आहे आमच्या कंपनीनं. आणि अर्ली बर्डसाठी सहा महिने फ्री दिल्या जातील ह्या गोळ्या. सांगण्यासारखी आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ह्या गोळ्यांच्या आधी चाचण्या घेण्यात आल्या आहेत आणि त्यांचे कोणतेही साइड इफेक्ट्स नसल्याचे सिद्ध झालेले आहे. उलट एकाग्रता वाढते त्यामुळे.

माया : म्हणजे करिअरसाठीदेखील चांगलंच की!

मानसी : हे बाकी छान आहे. ह्याचा मुलांना, म्हणजे मुलग्यांना खूप फायदा होईल. मुलांकडे उपभोग्य वस्तू म्हणून पाहावं न लागल्यानेच मुली बघा हल्ली मुलांपेक्षा अभ्यासात पुढे असतात.

विवेक : पण गुरुनाथ, थोडं अर्वाच्य, ग्राम्य बोलतो, माफ करा; म्हणजे हे त्या गावाकडच्या दाबलेल्या, म्हणजे आंड ठेचलेल्या बैलासारखं जगणं झालं ना?

गुरुनाथ : अं... पण महत्त्वाचा फरक असा आहे, की त्या बैलांची कामप्रेरणा संपते; तसं ह्या गोळ्यांनी होत नाही.

विवेक : (हात हवेत उडवत) बघा बुवा... ठरवा काय ते.

गुरुनाथ : ठीक आहे. मी निघतो आता. तुमचा अमूल्य वेळ मला दिल्याबद्दल धन्यवाद. तुमचा मोबाइल नंबर सांगता का? मी मिस्ड कॉल देतो, तो सेव्ह करा.

विवेक : माया, तुझाच दे ना! तुलाच काय काय विचारावंसं वाटणार; मग ते व्हाया व्हाया नको.

माया : हं, ९८२१२६२५५५.

गुरुनाथ : दिला मिस्ड कॉल. मॅडम, तुम्हाला काहीही विचारायचं असल्यास तुम्ही मला विनासंकोच विचारू शकता, आणि तुम्ही ह्या गोळीविषयी कुणाशीही बोलू शकता. कारण आम्हांला ह्याची माउथ पब्लिसिटी हवीच आहे. जमल्यास तुमच्या काही विमेन लिबवाल्या मैत्रिणींची यादी पण द्या मला कधी तरी. आमच्या प्रॉडक्टच्या प्रमोशनसाठी त्याच व्हेहिकल असणार आहेत. चला, मी निघतो आता. Convey my birthday wishes to your son!

(सगळे उठून त्याला नमस्कार करतात.)

मानसी : चल, मलाही निघायलाच हवं आता हळूहळू. नंदन क्लासहून आला असेल आणि सासूबाईंच्या गोळ्यांची वेळ होईल आता.

माया : मला मात्र तू प्रांजळच्या बर्थडेला खरोखरच वर्थ गिफ्ट दिलंस. तू जर जेवायला थांबली असतीस, तर आणखी मजा आली असती. मी मगाचपासून फोन लावते आहे प्रांजळला, की मानसी मावशीबरोबर बोल म्हणून सांगायला; तर लागतच नाहीये. जाऊ दे, म्हणून मी सकाळीच बोलून घेतले. त्यांच्या हॉस्टेलला तो जरा प्रॉब्लेमच आहे; अगं, नेटवर्कच मिळत नाही. तासन्‌तास! एनी वे...

विवेक : मानसी, तुला सोडायला येऊ का?

माया : अरेच्चा, विसरलेच मी! ह्या गोळीच्या प्रकरणात केक कापायचाच राहून गेला. तेवढा तर कापूया.

(विवेक लगबगीने जातो, सुरी आणतो. तिघेही टेबलाभोवती उभे राहतात. केक कुणी कापायचा हा प्रश्न पडतो. दोघंही मानसीला आग्रह करतात. तिच्या हस्ते केक कापला जातो. 'हॅपी बर्थडे टू यू' म्हणतात. केक खातात. माया एका डब्यात भरून नंदनसाठी केक पाठवते.)

माया : हा नंदनला बरं. तू निघ आता.

(मानसी जाते.)

मानसी : (जाताना विवेकला) फेसबुकवर भेटूच अधेमधे.

(विवेक थोडा चपापतो.)

मानसी : मी तुझं रोज वाचत असते.

माया : तू पण आहेस वाटतं त्या मायाजालात?

विवेक : (चेष्टेच्या सुरात) मी तर घरीदारी मायाजालात.

मानसी : तिकडच्या तुझ्या मैत्रिणी म्हणजे एकीहून एक महामाया आहेत. (असं म्हणून निघते.)

(मानसी गेल्यावर विवेक दोन ग्लासांमध्ये वाइन भरतो. दोघे एकमेकांचे ग्लास टकरावतात.)

विवेक : चीअर्स! फॉर दि हेल्थ ऑफ प्रांजळ.

माया : अँड विमेन्स लिब! तुला सांगते विवेक, आज प्रांजळ नसल्यामुळे सकाळपासून माझा मूड जरा खराबच होता; म्हणूनच तुझ्यावर डाफरले मी मगाशी.

विवेक : Forget it, yaar! असं होतं कधीकधी. बायकांचे ते हार्मोनल चेंजेस वगैरे असतात ना!

माया : पण गुरुनाथमुळे थोडा रिलीफ मिळाला हे नक्की. थँक्स टू मानसी.

विवेक : एनी वे, आपल्याकडे निर्णय घेण्यासाठी चांगला एक महिना आहे अख्खा. लेट अस डिस्कस दि मॅटर इन डेप्थ अँड देन डिसाइड. हा इतका सोपा विषय नाहीये. जाऊ दे, आता ते विसर. आता आपण छान सेलिब्रेट करूया. चीअर्स!

प्रवेश २

(संध्याकाळची वेळ. मोबाइलची रिंग वाजते आहे. विवेक लॅपटॉपवर आणि माया हातात एक जाडजूड पुस्तक घेऊन बसली आहे. फोन विवेकचा आहे. तो बघतो, तर फोन मानसीचा असल्याचं त्याच्या लक्षात येतं. तो फोन घेत नाही. मिस्ड कॉल होतो.)

विवेक : अगं, तुला मी सांगायला विसरलो. गेले तीन-चार दिवस ही मानसी ना, माझ्या फेसबुक इनबॉक्समध्ये येऊन "तुमचा काय निर्णय झाला त्या गोळ्यांचा? आता पंधरवडा होत आला" अशी सारखी चौकशी करते आहे. मी वेळ मारून नेत होतो. बरं, तुला सांगायची चोरी. कारण तू मला स्टँडिंग इन्स्ट्रक्शन, खरं तर तंबीच दिलेली आहेस, की तुला फेसबुकचं काहीही सांगायचं नाही.

माया : ठीक आहे, पुढे बोल... तुला मानसीला उत्तर मी द्यायला हवं आहे ना? देते की, त्यात काय आहे मोठ्ठं? ती मला स्त्रीमुक्तीवरून लहानपणापासूनच छेडते आहे. आता तर तिच्या हातात हे आयतं कोलीत मिळालं आहे एवढंच.

(पुन्हा फोन वाजतो. मानसीचाच असतो. विवेक खूण करतो. माया अटेंड करते.)

मानसी : (फोनवर विवेक आहे समजून) काय रे...

माया : अगं बोल, मी बोलते आहे, माया.

मानसी : (फोनवरून) अगं, नाही, त्यासाठीच फोन केला, की तुमचा काही निर्णय होतोय की नाही? ते विचारायला.

माया : अजून वेळ आहे तसा, पण तरीही आपापसांत बोलायला हवं. विवेकचं तर म्हणणं असं आहे, की आमच्या फॅमिली डॉक्टरांनादेखील कन्सल्ट करावं. पण डॉक्टर समजा पुरुषप्रधान वातावरणावर पोसलेल्या पिंडाचे असतील, तर त्यांना हे पटणं तसं अवघडच. आणि तसे ते असायची शक्यताच जास्त. And you know that the system makes a man, I mean a human, insensitive. त्यामुळे स्त्रीमुक्ती चळवळीशी संबंधित काही कमिटेड डॉक्टर आहेत, तर त्यांना मी विचारणार आहे. कळवते तुला.

मानसी : (फोनवरून) माया, आताच तुझा कस लागणार आहे. की तू एक तर प्रांजळला ह्या गोळ्या तरी दे, किंवा 'पुरुष स्त्रियांकडे उपभोग्य वस्तू म्हणून पाहतात' हा आयुष्यभर केलेला कांगावा चुकीचा होता हे मान्य करा आणि बंद करा. बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर, असा पेच आहे हा.

माया : हे बघ, मुळात हा प्रश्न तसा माझ्या एकटीचा नाही... प्रांजळचं मतदेखील विचारात घ्यावं लागेल, किमान त्याला पटवून तरी द्यावं लागेलच. आणि तुला आधीच सांगते आहे, की कोणत्याही कारणामुळे ह्या गोळ्या भले न द्यायचं ठरलं, तरी 'पुरुषांनी आमच्याकडे उपभोग्य वस्तू म्हणून पाहता कामा नये' ह्या मागणीत काहीही चुकीचं ठरत नाही. भले तू असशील पारंपरिक, जुन्या वळणाची आणि मी तुझ्या भाषेत स्त्रीमुक्तीवाली; पण आपली मैत्री किती जुनी आहे ना, शाळेपासूनची! तेव्हा मला तर ह्या निर्णयाच्या प्रक्रियेत तूदेखील सामील व्हावंसं वाटतं. कम ऑन! आपण येत्या रविवारी भेटूया आणि बोलू या ह्यावर.

मानसी : (फोनवरून) हो, भेटू की... बोलू की!

माया : बाय. गुडनाइट. (फोन ठेवते.)

विवेक : काय म्हणत होती मानसी?

माया : काही नाही, डिवचत होती. तिला तर आता ऊतच येणार ना? पण हा निर्णय खरंच सोपा नाहीये रे विवेक.

विवेक : (साळसूदपणे) आपण एक आयडिया करूया का? आपण गुरुनाथला सांगूया, की तुमचं प्रॉडक्ट मार्केटमध्ये लाँच होऊ दे, मग आम्ही ठरवू. आजचं मरण उद्यावर म्हणतात ना, तसं. तोपर्यंत प्रांजळदेखील येईल. बस्, टेन्शनच नाही... म्हणजे कळलं ना, जरा वेळ जास्त मिळेल.

माया : ते ठीक आहे रे, पण ती पळवाट झाली. शेवटी मी चळवळीतली आहे, त्यामुळे मला ह्या प्रश्नामध्ये चालढकल करावी, बगल द्यावी, हे नाही पटत. तो पराभवच झाला विचारांचा. त्यामुळे दिलेल्या मुदतीतच थेट भिडावंसं वाटतं.

विवेक : (चिडचिड्या सुरात) मग भीड बाबा. आय मीन, भीड बाई. पण मग माझं मत विचारशील तर, एक वडील ह्या नात्याने, एक पुरुष म्हणून स्पष्टच सांगतो, की अशी गोळी घेणं हे निसर्गाच्या व्यवस्थेत ढवळाढवळ करणं आहे; आणि तुमची चळवळीची तत्त्वं काही निसर्गापेक्षा मोठी नाहीत.

माया : मला हा निसर्ग वगैरे बाऊ फारसा मान्य नाही. आपण प्रतिबंधक लशी मुलांना लहानपणापासून देतो की नाही? ती नसते ढवळाढवळ?

विवेक : ते वेगळं आणि हे वेगळं. अगं, लैंगिक प्रेरणा ही काही फक्त माणसांच्यात नाहीये. आपण ते नॅशनल जिऑग्राफिक, डिस्कव्हरी वगैरे नाही का बघत? तेही जाऊ दे; रस्त्यात कुत्री-मांजरी काय करत असतात?

माया : नैसर्गिक नर-मादी आकर्षण ह्या विषयावर आपण अनेकदा बोललो आहोत, तेव्हा परत तीच-तीच टेप लावण्यात काय अर्थ आहे?

विवेक : ते चर्चेच्या पातळीवर ठीक होतं गं... संस्कार, प्रबोधन वगैरे! पण आता तू थेट मुलाच्या शरीरातच बदल करायचा विचार करते आहेस, तेव्हा आता खरं बोलायलाच हवं. मी तुला ठामपणे सांगतो, की जगातले यच्चयावत पुरुष हे स्त्रीकडे लालसेनेच बघतात. तुझे-माझे बाबा, काका, मामा, भाऊ... कुणीही सुटलेला नाही ह्यातून. काहींना असं बघताना आपल्या भावना डोळ्यांत न आणणं जमतं; ते बायकांना सरळ पुरुष वाटतात. तर काहींना भावना लपवणं जमत नाही; ते बायकांना वाकड्या नजरेचे पुरुष वाटतात. पण माझ्या मते सगळे एकाच माळेचे मणी असतात!

माया : म्हणजे? तुझं म्हणणं काय आहे नेमकं? की पुरुष बाईकडे बुभुक्षितासारखा वखवखून पाहणारच! बरं, मला एक सांग, की तू पाहतोस का?

विवेक : (धीर एकवटत, आवंढा गिळत) हो, पाहतो. (येरझारा घालू लागत) खोटं कशाला बोलू? पण माझं पाहणं थोडं वेगळं आहे. आणि असंही नाहीये हं, की ते सगळं तुझ्यामुळेच बदललं आहे. मी मुळात अशा एका डिपार्टमेंटला होतो, की जिकडे ९० टक्के पुरुषच होते. पण कामानिमित्त बायका यायच्याच तिथे. तर बाई आली, की सगळे पुरुष, म्हणजे त्यात मी सुद्धा आलो, अशा काही नजरेनं बघायचो ना, की मला ओशाळल्यासारखं व्हायचं. त्या मुलीच्या जागी आपण असतो तर? असं वाटून माझ्या अंगावर शहारा यायचा. खरं सांगतो. लग्नाआधी मी बोललो होतो हे.

माया : हो, आठवताहेत मला तुझी तेव्हाची मतं.

विवेक : पण हे जरी वाटलं ना, तरीदेखील मला बाईकडे बघायची इच्छा तेवढीच व्हायची. ती कधीच संपली नाही. मग मी माझ्या ह्या इच्छेवर लक्ष ठेवायला सुरुवात केली. तिच्यावर खूप प्रयोग केले. सगळे सांगितले ना, तर तू सोडूनच जाशील मला.

माया : सांग ना, सांग ना. हा निर्णय घेताना मला अशी मिळेल तेवढी माहिती कामाचीच आहे मला.

विवेक : बरोबर आहे तुझं. सांगतो, पण एका अटीवर, की माझ्यावर आकस नाही धरायचा. मला तू खूप आवडतेस. पण बायको आवडणं आणि बायकांकडे बघावंसं वाटणं ह्या पार वेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे बायकांकडे बघायचा मला देखील गिल्ट यायचाच ना. तर एकदा मी काय ठरवलं माहिती आहे का? (आवंढा गिळत) माहिती आहे का?

माया : (त्याच्या ह्या अवस्थेला हसत) मला कसं माहिती असणार?

विवेक : खरंय, तुला कसं माहीत असणार! तुला फक्त ते 'उपभोग्य वस्तू म्हणून पाहू नका' एवढंच माहीत आहे. पण मी उलटंच ठरवलं, की आणखी निरखून बघायचं. आणि बाईकडे पाहताना मनात काय काय होतं, ह्यावर लक्ष ठेवून एकदाचा सोक्षमोक्ष लावून टाकायचा! होऊनच जाऊ दे. मग माझ्या लक्षात आलं, की टंच, म्हणजे घटमुट बाईकडे पाहून माझ्या मनात काहीतरी आदराची भावना तयार होते आहे. आणि तिथे मला माझ्यातली गडबड सापडली. ती अशी, की सेक्सी बाईबद्दल आकर्षण वाटणं ठीक आहे, नैसर्गिक आहे; पण हा आदर कशासाठी वाटतोय? ह्यात काहीतरी गफलत आहे. गिल्ट वाटतो तो त्या आदराचा आहे. आदर काढला की गिल्ट खलास! आणि झालं तसंच. तर ते कसं झालं, काय झालं, ते आता सगळंच सांगत बसत नाही तुला. पण नंतर मला असंदेखील सुचू लागलं, की बायकादेखील नटतात, मुरडतात, लाजतात, मुरकतात; तेव्हा त्यांनादेखील पुरुषी नजरेने त्यांच्याकडे पाहणे आवडतेच. हा विचार डोक्यात आला आणि मला जाणवलं, की 'पुरुष आपल्याकडे उपभोग्य वस्तू म्हणून पाहतात' ही चार-दोन बायकांचीच तक्रार आहे. बाकी, स्त्रीपुरुषांच्यात हा नजरेचा खेळ संगनमताने, खेळीमेळीने, अय्या-इश्श करत, नाक मुरडत सुरू आहे.

माया : बाप रे! तुझं हे लंबंचवडं बोलणं ऐकून मी तर भांबावूनच गेले आहे. आता मला कळतंय, की मुसलमानांनी म्हणूनच बायकांना बुरख्यात लपवायची आयडिया काढली असणार; तिच्याकडे कुणी उपभोग्य वस्तू म्हणून बघू नये ह्यासाठी. पण त्यामुळे त्या बिचाऱ्या व्हिटॅमिन डीला मुकतात. त्यामुळे तो उपायदेखील कामाचा नाही. त्यापेक्षा अशा गोळ्याच बऱ्या.

विवेक : माझं तर म्हणणं असं आहे, की असे काही टोकाचे उपाय कामाचे नाहीत; तर काहीतरी मध्यममार्ग काढायला हवेत. म्हणजे असं, की पुरुषाला बघितल्याचं सुख तर मिळेल आणि बाईला आपल्याकडे लालसेनं बघितलं जातंय ह्याचा त्रास तर होणार नाही. म्हणजे असं, की रस्त्यानं जाताना बायका दिसतात. त्यांच्याकडे बघावंसं वाटतंच. तर ह्यासाठी पुरुषांनी रस्त्यात गॉगल लावून चालायची पद्धतच पाडली पाहिजे. चश्मिष्ट पुरुषांनी फोटोक्रोमॅटिक लेन्सेस वापरायला हवेत. माझंच बघ ना, मला खरं उन्हाचा काही त्रास होत नाही. पण मी तुझ्याबरोबर असताना बघ, नेहमी गॉगल घालतो; म्हणजे "रस्त्यातील बायकांकडे आपला नवरा असा बघतो आहे" ह्याचा तुला त्रास होऊ नये म्हणून. शिवाय ज्यांच्याकडे बघतो त्या बायकांनाही त्रास नाही.

खरं तर मुसलमानांच्यात जशा बायका बुरखा घेतात ना, तशी पुरुषांनी बुरखा घ्यायची पद्धत काढायला हवी. म्हणजे मुसलमान बायकांसारखा पायघोळ नको; नाहीतर कळणारच नाही, मुसलमान बाई कोण आणि पुरुष कोण? ह्यात धर्माचा काहीही संबंध नाही. हवं तर मुसलमान पुरुषांनी हिरवा आणि हिंदू पुरुषांनी भगवा घालावा. मुखवटा घातला तरी चालेल. कुठूनही काय, समोरच्या बाईला जाणवता कामा नये, की आपल्याकडे कुणीतरी डोळे भरून पाहतो आहे. मग माझ्यासारख्या पुरुषालाही बरं पडेल. बाईला त्रास न देता बघितल्याचं सुख मिळेल.

माया : अरेच्चा! तुझ्याबाबतीत मला हे सगळं नवीनच आहे. मला वाटत होतं, की तू सुसंस्कृत पुरुष आहेस. पण नाही, तू पण...

विवेक : (नमतं घेत, पलटी मारून) पण तुझं ते उपभोग्य वस्तूचं टुमणं ऐकून ऐकून मी शिकलो, बाईकडे गुपचूप तसं बघायला. मी शक्यतो बाईला दिसणार नाही अशा खुबीनं तिच्याकडे पाहतो. म्हणजे कळलं ना? चालत्या कारमधून, किंवा बसमध्ये असेन तर वरच्या डेकवरून, रस्त्यावरच्या बाईकडे. शिवाय आपल्या घराच्या खिडक्यांच्या काचादेखील आतून बाहेरचं दिसणाऱ्या पण बाहेरून आतलं न दिसणाऱ्या आहेत ना; त्यामुळे बायकांकडे निवांत बघता येतं. पण बघणं बंद करता येत नाही. आणि खोटं कशाला बोलू... उपभोग्य म्हणूनच बघितलं जातं.

मला सगळ्यात मजा येते ती मॉल किंवा मार्केटमध्ये. तिथे बायका मस्त रमलेल्या असतात. तू पण रमलेली असतेस! त्यामुळे टवक्यांकडे टक लावून बघता येतं!

माया : टवके?

विवेक : म्हणजे बायका गं! बायकांना पुरुष काय काय म्हणतात: पाखरू, काच, डाव, छावी... अगं, माझा एक मित्र तर ना, 'हरी ओम' म्हणायचा चक्क! तर ते जाऊ दे. मी सांगत काय होतो, की तिकडे ना आमच्या बघण्याचा बायकोला त्रास, की बायकांना त्रास! म्हणून बघ, तू कधीही शॉपिंगला जायचं काढलंस की मी एका पायावर तयार असतो.

माया : असं आहे होय? मला वाटायचं, तू प्रेमाने येतोस... कारण बहुतेक नवरे टाळतात.

विवेक : अगं, सगळ्यांच्या बायका थोडीच स्त्रीमुक्तीवाल्या असतात! त्यामुळे त्यांना बायकांकडे, त्यांना त्रास होणार नाही असं कसं बघायचं, तेच कळत नाही. मी तुझ्यामुळे शिकलो ते... आणि मला तुझी कंपनी आवडते म्हणूनच येतो हं... तिथे बायका दिसतात ना, ते व्हॅल्यू ॲडिशन म्हणतात ना, तसं.

माया : म्हणजे तूदेखील जिच्याशी काही ओळख नाही, पाळख नाही, देणं नाही, घेणं नाही, अशा स्त्रीकडे लालसेने बघतोस?

विवेक : तुझ्याबरोबर एवढी वर्षं राहून मी ह्या विषयावर खूप विचार केला आहे. त्यामुळे आता विषय निघालाच आहे, तर नीट सांगून घेतो. प्रथम लक्षात घे, की मुळात पुरुष बाईकडे जाणूनबुजून, ठरवूनबिरवून बघतच नाही; तर त्याच्याकडून ते बघितलं जातं! आणि तेदेखील बाईकडे नाही, तर स्त्रीदेहाकडे.

माया : मला बऱ्याचदा एक प्रश्न असा पडतो, की बरोबर लावण्यवती असणारे पुरुषही आसपासच्या बायकांकडे का बघत असतात? एवढी कसली हाव असते! आणि 'बघितलं जातं' म्हणजे? मला नाही वाटत, की पुरुष जसे दिसेल ती स्त्री न्याहाळत असतात, तशा बायका पुरुषांना न्याहाळतात. हां, त्यांनादेखील एखादा पुरुष आवडतो पाहायला; तरी त्या पुरुषाकडे आशाळभूतपणे पाहत नाहीत.

विवेक : आता मला जरा जास्त खोलात जाऊन बोलावं लागेल, तर ते ऐकायची तयारी ठेवा. तरी मी त्यातल्या त्यात नीट बोलायचा प्रयत्न करतो. त्याचं काय आहे, तो निसर्गाने केलेला फरक आहे. संभोगामध्ये पुरुषाला ती क्रिया पार पाडायची जबाबदारी असते. आणि त्यासाठी निसर्गाने अशी योजना केली आहे, की त्याची कामप्रेरणा सतत तेवती ठेवण्यासाठी त्याला आसपास दिसणाऱ्या स्त्रीदेहांकडे पाहून प्रत्येक देहात शरीरसुखाच्या शक्यता जाणवाव्यात. त्यामुळेच पुरुष जेव्हा नजरेसमोर येणाऱ्याजाणाऱ्या अनेक बायका पाहतो, तेव्हा कुठे तो एका बाईला समाधान देऊ शकतो. ही निसर्गाची योजना आहे. हां, आता काही पुरुषांना आपल्या मनातील भावना नजरेत न आणण्याचं जमतं, तर काहींना नाही जमत. मगाशी म्हटलं ना, की ज्यांना हे जमत नाही, त्यांना बायका वाकड्या नजरेचा पुरुष म्हणतात! खरं तर काही असतात चोरट्या नजरेचे पुरुष आणि काही असतात खुल्या नजरेचे पुरुष!

माया : बाप रे! मगाचपासून मी तुझं बोलणं फारसं मध्ये न बोलता ऐकत होते, आणि तुला खरं सांगते, मी जरा हबकूनच गेले आहे. म्हणजे एक तर आपण दोघं गेली जवळजवळ १५ वर्षं एकत्र राहत असतानादेखील मला तू आत्ता जे काही बोललास, तुझं खरं रूप दाखवलंस, ते माहितीच नव्हतं. म्हणजे त्याविषयी तक्रार काही नाही, पण धक्का मात्र जरूर बसला आहे. आणि त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे, प्रांजळला त्या गोळ्या देणं कितपत योग्य आहे ह्याविषयीचा मनातला गोंधळ हे ऐकून खूपच वाढला आहे. ठीक आहे, अजून माझ्याकडे वेळ आहे, तेवढ्यात ठरवू या. चळवळीतल्या माझ्या काही मैत्रिणींबरोबरदेखील बोलून पाहिलं, पण त्या काही फारशा बाजूनं बोलल्या नाहीत. एक-दोघी तर असंही म्हणाल्या, की त्यापेक्षा लग्नानंतर अशा गोळ्या द्यायला पाहिजेत!

विवेक : छे छे, मी तर शिवणारदेखील नाही अशा गोळ्यांना. आपण एक काम करू या. पुढच्या शुक्रवारी ईद आहे म्हटल्यावर रविवारी शीरखुर्मा घेऊन अमन येईल, तेव्हा त्याच्याबरोबर बोलूया ह्या प्रश्नावर. तो आपला घरचाच सायकिॲट्रिस्ट आहे की! दरम्यान, मध्ये वेळदेखील मिळेल शांतपणे विचार करायला. आणि त्याला काय विचारायचे ते देखील ठरवता येईल. बरं चल, आता मस्त चहा पिऊ आपण. (म्हणून किचनकडे जायला निघतो.)

माया : आज मी करते. For a change. केवढं बोललास ना! मन खरवडून दमला असशील. तू एक काम कर, मानसीला फोन कर आणि रविवारी अमन येईल तेव्हा तिलादेखील यायचा आग्रह कर. त्यामुळे निर्णय घ्यायला जरा सोपं पडेल.

(माया आत जाते. विवेक मानसीला फोन लावतो.)

विवेक : हॅलो, मानसी. कशी आहेस? काल काही स्टेटस, पोस्ट्स दिसल्या नाहीत तुझ्या. म्हणून वाटलं, काही तब्येत वगैरे बिघडली नाही ना?

मानसी : तुझ्या बाकीच्या गोपी होत्या ना तुझ्या भिंतीवर नाचायला? एक नाही दिसली दोन-चार दिवस, तर काय बिघडतं? जरा चैन नाही! अरे, काय झालं... सासूबाईंची शुगर शूट झाली होती म्हणून. आणि मला देखील किंचित... बरं, ते जाऊ दे. काय म्हणतेय तुझी घरातील रणरागिणी, आमच्या मायाबाई! गोळ्या द्यायच्या म्हणतेय का अजून?

विवेक : तेच सांगायला फोन केला, की काल तिला मी स्पष्टच सांगून टाकलं, की पुरुष हा बाईकडे त्याच्या निसर्गदत्त प्रेरणेप्रमाणे बघणारच. मग तिनं विचारलं, की तूदेखील बघतोस का? तर मी माझ्या बघण्याचा पाढाच वाचला. तो ऐकून ती हादरलीच. तर आता समजा तिनं चुकून तुला फोन केलाच, म्हणजे करणार नाही म्हणा तशी ती, पण समजा तिरीमिरीत केलाच, तर माझ्या फेसबुकवरच्या ॲक्टिव्हिटीजबद्दल तिला चकार शब्दानं काही सांगू नकोस प्लीज. आणि दुसरं हेदेखील लक्षात ठेव, की आपल्याला तिचा गोळ्या द्यायचा निर्णय हाणून पाडायचा आहे; ज्यासाठी मला तुझी मदत लागेल. तर प्लीज... रविवारी सकाळी माझा एक सायकिॲट्रिस्ट मित्र यायचा आहे. तेव्हा तू पण ये. We will discuss the matter and come to a conclusion, की अशा गोळ्या घेणं हे हार्मफुल आहे.

मानसी : ते तर उघडच आहे. आणि घाबरू नको. तशी वेळच आली, तर मी गुरुनाथलाच सांगेन. मला खरं तर रस आहे, 'स्त्रीकडे उपभोग्य वस्तू म्हणून पाहू नका' ह्या वाक्यावर तिला पुन्हा विचार करायला लावायचा. खरं तर ते मागेच घ्यायला लावायचा. आपण एक काम करूया? तू ह्या गोळ्यांसंबंधी एक स्टेटसची होडी सोडून दे आपल्या फेसबुकीय ज्ञानगंगेमध्ये! बघूया तरी काय चर्चा करतात लोक.

विवेक : माझ्यापेक्षा तूच टाक. एका बाईनं टाकल्यावर परिणाम जास्त होईल.

मानसी : नको, तूच टाक. आणि मला हवं तर टॅग कर.

विवेक : ओके. आज येणार आहेस ना फेसबुकला? मग भेटूच.

मानसी : ती चमेली नागवेकर बरी मागावर असते हल्ली तुझ्या! लक्ष आहे माझं. बाय द वे, ते आडनावपण काय आहे ना, नागवेकर! चळणारच ना तुझ्यासारखे पुरुष. त्यात नाव चमेली!

(माया चहा आणते आणि त्याला देते आणि विचारते.)

माया : विवेक, तुला बाम कुठे आहे माहीत आहे का?

विवेक : काय गं, बरं वाटत नाहीये का? डोकं दुखतंय का?

माया : (त्याला जवळ ओढत) नाही, तसं जास्त नाही. डोकं जरा भणाणलंय. खरं तर हतबल वाटतंय, निर्णय घेता येत नाही ह्याचं. मला कळतंय, की माझं बरोबर आहे; पण मी कोंडीत सापडले आहे रे. कारण ज्या शरीरावर हा प्रयोग करायचा आहे, तो माझा मुलगा असला तरी त्याचं शरीर हे माझं नाही. तेव्हा मला काय अधिकार आहे त्याच्या शरीरावर प्रयोग करण्याचा? ह्या प्रश्नाने मी अंतर्मुख झाले आहे. अंतर्मूर्ख म्हण हवं तर!

विवेक : रिलॅक्स! तुला आठवत असेल माया, माझंदेखील हेच झालं होतं, प्रांजळचं माध्यम निवडताना. तसा मी खरं तर मराठीचा खंदा पुरस्कर्ता. तेव्हा मलादेखील माझ्या मित्रांनी असाच पेचात टाकला होता. आपण तेव्हा खूप चर्चा केल्या होत्या. आठवतंय तुला? तुझादेखील फारसा विरोध नव्हता मराठी माध्यमाला. पण शेवटी मी काय निर्णय घेतला? इंग्रजी माध्यम स्वीकारायचा. त्याच्या मागचं लॉजिक काही जणांना थोतांड, फसवं, फुसकं देखील वाटलं असेल. नेव्हर माइंड. माझा कॉन्शन्स क्लीअर होता. तेवढंच पुरेसं असतं कुणालाही. आठवतंय ना?

माया : हो, चांगलं आठवतंय. मला तेव्हा तुझं कौतुकही वाटलं होतं. तुझं म्हणणं साधारण असं होतं, की आपली उठबस समाजाच्या ज्या वर्गात आहे, त्यांच्यामध्ये इंग्रजी माध्यमाला घालणे हा समकालीन, प्रचलित प्रवाह आहे. तर आपलं मत तसं नाही म्हणून मुलाला प्रवाहाच्या विरुद्ध पोहायला लावायचा आपल्याला काय अधिकार आहे? प्रवाहाच्या विरुद्ध पोहणे हा ज्याचा त्याचा निर्णय असायला हवा; ते नकळत लादता कामा नये कुणी! आणि मला ते योग्यच वाटलं होतं.

विवेक : तर तेच तर्कशास्त्र इथेही लागू पडतं. आपल्याकडे सज्ञान व्हायचं वय १८ मानलेलं आहे सध्या. परंपरेमध्ये 'प्राप्ते तु षोडशे वर्षे' असा उल्लेख आहे. तेव्हा त्याला ती भावना कळायच्या आतच ती खुडायचा आपल्याला काय अधिकार आहे? ही एक प्रकारची भ्रूणहत्याच झाली.

माया : खरं आहे रे ते. नंतर मला तेच आठवलं. मागच्या सुटीत तो आला होता, तेव्हा आम्ही दोघंच एक सिनेमा पाहत होतो; तू बहुधा होतास तुझ्या त्या फेसबुक मायानगरीत. तर सिनेमा पाहताना त्याने दोन-चार वेळा "काय आयटम आहे ना, फुल-टू-फटॅक", "रापचिक" असे टिपिकल पुरुषी शब्द वापरले होते. ते मला खटकले होते तेव्हा. त्यावरून त्याला मी माझ्या स्टाइलीत लेक्चरदेखील दिलं. पण तो माझ्या खांद्यावर हात टाकून मला एवढंच म्हणाला, "Come on Mom, it’s natural." आणि तुला खरं सांगते, की मला कुठेतरी त्याचा हा पुरुषीपणा आवडला होता तेव्हा! त्याच्या वयाची इतर मुलं नाही बोलणार असं... निदान आपल्या आईवडिलांसमोर. पण आपणच मोकळीक दिली आहे ना त्याला!

विवेक : रिलॅक्स. तुझी ही द्विधा मनःस्थिती कळते मला. कूल! तर तू एक काम कर. म्हणजे तू काहीच करू नकोस, करतो मी. पण तुझा फेसबुकवरचा आकस तात्पुरता बाजूला ठेव आणि मी तिथे हे वाक्य टाकतो, त्याच्यावर लोकांच्या प्रतिक्रिया वाचून पाहा; ज्याची तुला मदत होईल निर्णय घ्यायला. बरं, नाही पटलं तर सोडून दे! पण जनमताचा कौल झटपट आजमावण्यासाठी एवढा प्रभावी मार्ग नाही.

माया : ठीक आहे. घे तुझा काय कौल घ्यायचा तो. बघूया तर खरं.

(विवेक हे ऐकताक्षणीच कॉम्पसमोर बसून मोठ्याने बोलत टाइप करतो.)

विवेक : (मोठ्याने बोलत) हां, लिहितो हां, ऐक. "उद्या समजा बाजारात अशा काही गोळ्या आल्या, की वयात येताना त्या घेतल्याने तुमचा मुलगा स्त्रीकडे उपभोग्य वस्तू म्हणून पाहणार नाही; साइड इफेक्ट्स काहीही नाहीत, उलट अभ्यासात एकाग्रता वाढेल, तर तुमच्यातील किती आईवडील त्या आपल्या मुलाला देतील?" ठीक आहे? की काही बदल हवाय, तर सांग! तशी सोय असते इथे.

माया : नाही, ठीकच आहे. छान आहे. नेमकं आहे!

विवेक : आणि हां, पुढे कंसात असं लिहितो, की स्त्रीमुक्तीवाल्या बायकांची मते जाणून घेण्यास अधिक उत्सुक. करू पोस्ट?

माया : हां, कर. तुला वाटेल ते. पण आता तुला खरं सांगते. अरे, मी आमच्या चळवळीतील ८-१० मैत्रिणींबरोबर बोलले ह्या गोळ्यांबद्दल. मला वाटलं होतं, सगळ्या तत्काळ होकार कळवतील. पण नाही रे, एकजात सगळ्या गुळमुळीत बोलल्या. तिकडे मी खरी हबकले. एक तर असंही म्हणाली, की गेल्या काही वर्षांमध्ये वातावरण इतक्या झपाट्यानं बदलतंय ना, की आपलं सगळं म्हणणं आता आउटडेटेड वाटतंय. कुठच्याही स्क्रीनवर इतक्या जेमतेम कपड्यांतील बायका नाचताना दिसतात, की वाटतं ह्या आपले देह मिरवत आहेत. आणि घराघरात लोक, काय तो शब्द आहे ना, हां, 'दर्शक', निवांतपणे पाहत असतात एकत्र बसून. तर आता कुठच्या तोंडाने ते 'उपभोग्य वस्तू' वगैरे बोलायचं? लोक तोंडात शेण घालतील आपल्या. आणि आता खरं सांगायचं तर मलादेखील पटतं हे. "आमच्याकडे वस्तू म्हणून पाहू नका" असं काही तरी म्हणायला हवं होतं आम्ही. पण आता तुमच्याशी बोलून कळतंय, की 'उपभोग्य' म्हणून बघितलं जातंच.

विवेक : माझ्या मते तुम्ही खरं तर "आमच्यासाठी प्रेमाचं समीकरण आधी मन, मग धन आणि मग तन" अशा लाइनच्या घोषणा द्यायला हव्या होत्या. पण कूल! आता आपण जेवूनखाऊन शांत झोपू या. आता सवडीने पाहूया, फेसबुकवर कोण काय म्हणतं आहे ह्यावर.

माया : खरंच खूप थकलेय मी आता. पण तुझ्याशी बोलल्याने खूप बरं वाटलं मला. त्यात अध्येमध्ये त्या गुरुनाथ की गुरुदत्त, त्याचादेखील फोन येत असतो. काय ठरलं? कधी येऊ? आणखी कुठल्या मैत्रिणींची नावं द्या, म्हणून! आता काय सांगायचं त्याला? कुठच्या तोंडाने उत्तर देऊ त्याला? मीच डळमळीत झाले आहे म्हणून!

विवेक : माया, तू उगाच टेन्शन घेऊ नको भलतंसलतं! तो शेवटी सेल्समन आहे. त्याला त्याचं टार्गेट पूर्ण करायचं असतं. Why should we bother! चल, शांत झोप आता. उद्या रविवारच आहे; उठायची देखील घाई नाही काही.

प्रवेश ३

(दुसऱ्या दिवशी सकाळी विवेक संडे मूडमध्ये पेपर वाचत बसला आहे. पाठोपाठ माया येते.)

विवेक : मी तुला उठवणारच नव्हतो आणखी तासभर तरी. खूप शिणली आहेस तू हल्ली.

माया : थँक्स. आता फ्रेश आहे. झोप छान झाली आहे काल. काही तरी छान पोझिशन मिळाली होती कुशीत.

विवेक : (तिचं नाक ओढतो) बरं, चहा आणू का लाडूला?

माया : कॉम्प नाही ऑन केलास? बघू या, कोण कोण काय काय म्हणालं आहे तुझ्या त्या फेसबुकवर?

विवेक : ओ, मी विसरलोच होतो. तशी रविवारी एकूणच वर्दळ कमी असते फेसबुकवर. सुट्टी असते ना? बहुतेकजण ऑफिसच्या कॉम्प्युटरवरूनच खेळत असतात फेसबुक.

माया : खेळत? पण ते राँग आहे ना? अनएथिकल!

विवेक : मरू दे ना! ज्याचं त्याला. कुणाकुणाला सुधारत बसणार ह्या जगात? हे त्या फेसबुकच्या आभासी जगात चांगलं कळतं. एरवी प्रत्यक्ष जगात वावरताना कसं, मुळात एक तर लोक कमीच भेटतात. शिवाय भेटले तरी मोजकंच बोलतात. त्यात आपण न पटणाऱ्यांपासून शक्यतो चार हात लांबच राहतो. त्यामुळे आपली समज वरवरचीच राहते. फेसबुकवर तसं नाही. तिथे माणसं खरी-खोटी का होईना, पण व्यक्त होतात; त्यामुळे मनं जास्त उघडकीला येतात.

माया : बघू या ना आता!

विवेक : हा. ऐक हं, वाचतो एकेकाची मुक्ताफळं. बाप रे, रातोरात ८२ कॉमेंट्स आल्या! म्हणजे आपला प्रश्न पब्लिकने सीरियसली घेतलाय. छान.

माया : पण ते म्हणताहेत काय?

विवेक : "यासाठी लहान वयात दिलेलं संस्काररूपी औषध अधिक गुणकारी ठरेल, कारण वासनेचं उगमस्थान मेंदू असतं."
"घर्षणाकर्षण हे नैसर्गिक आहे. शिस्त आणि मर्यादा समजावणे ह्यात कसोटी आहे."
"ना रहेगा बांबू, ना बजेगी बाँसुरी!"
"वासनेच्या चक्रव्यूहात अडकूनदेखील वासनेवर विजय मिळवतो, तोच खरा पुरुष."
"असं गोळ्या घेणं हे अनैसर्गिक वाटतं. मुलांबरोबरच मुलींमध्येही 'आपण उपभोग्य वस्तू नाही' ही जाणीव यायला हवी."

माया : हेदेखील खरं आहे. दिवसेंदिवस मुली आपल्यातील आकर्षणसामग्रीचा सहेतुक वापर करायला लागल्यात. दे इंटेंड टू कॅश इट!

विवेक : हां, हिचं नाव काय आहे माहीत आहे का? लाडाची मैना!

माया : पण असं काय नाव हिचं? तिच्याच भाषेत सांगायचं तर, लैच वाह्यात आहे ही.

विवेक : अगं, इथे खूप जण असे टोपणनावांनी वावरत असतात. त्यामुळे त्यांना आपलं मत मांडताना कोणताही संकोच राहत नाही. सुटतात नुसते! काही वेळा अतिरेक करतात, मग त्यांच्या नावाने फेक आयडी, बुरखेधारी अशी हाकाटी सुरू होते... जाऊ दे, तो मोठा विषय आहे. हां, आता हा बघ, अक्काबाईचा कोंबडा हा काय म्हणतोय? हा म्हणतोय –
"वयात येणारा मुलगा गोळ्या घेण्याआधी पालकांना विचारेल, कसल्या गोळ्या? तेव्हा पालकांनी काय सांगायचं? समजा मुलानं विचारलं, की तुमच्या वयात तुम्हाला अशा गोळ्या तुमच्या पालकांनी दिल्या असत्या, तर तुम्ही त्या खाल्ल्या असत्या का? त्या वेळी तुमच्या पालकांबद्दल तुम्हांला काय वाटलं असतं? वगैरे वगैरे."
"विषयवासना म्हणजे काहीतरी घृणास्पदच समजणाऱ्या (किंवा किमान चारचौघांत तसं म्हणणाऱ्या) लोकांच्या उपचारासाठी गोळ्या काढा बुवा."

(विवेक मायाला टाळीसाठी हात पुढे करतो; ती टाळी देते.)

"प्रश्न नाही पटला. नैसर्गिक ऊर्मी मारून टाकण्याचा अधिकार कोणत्याही व्यक्तीच्या आईला/पालकांना अजिबात नाही."
"बहुतेक घरांतील स्त्रियांना आपल्या घरातील पुरुष तेवढे पावित्र्याचे पुतळे वाटतात; पण तसं नसतं."
"मुळात कुणी 'उपभोग्य' असं ठरवून बघतो असं नसावं. वासना, संधी, पोषकता एकत्रित आल्यानं विकृती डोकं वर काढू पाहत असाव्यात. ह्यात नेमक्या ह्या गोळ्या कशावर असाव्यात? वासनेवर की विकृतीवर? अर्थात साइड इफेक्ट नसतील, तर अशा गोळ्या द्यायला किंवा घ्यायला काही हरकत नसावी."

हं, आता ही चिचुंदरी काय म्हणते ऐक हं. ही म्हणते आहे, की माझ्याकडे एखाद्या उंदीरमामानं बघितलेलं आवडतंच मला; पण बोक्यानं पाहिलं की मात्र घाबरते मी! ही चिचुंदरी एक भलतीच वाह्यात बाई आहे. काही वेळा तर शंका येते, की ही पुरुषच असावी एखादा.

माया : पुरुष?

विवेक : हो, असू शकतं की! कसं काय तपासणार कुणी? बरं, हा आता ऐक –

"मी माझ्या मुलाला गोळ्या देण्यापेक्षा हा सल्ला देईन, की त्याला वाटले की स्त्री ही जर उपभोग्य वस्तू आहे, तर त्यानं तिचा खुशाल उपभोग घ्यावा; आणि त्याला जर वाटले की पुरुष उपभोग्य वस्तू आहे, तर त्यानं स्वतःचादेखील त्या पद्धतीने वापर होऊ द्यावा. स्त्री ही जशी उपभोग्य वस्तू आहे, तसाच पुरुषही उपभोग्य वस्तू होऊ शकतो भावी काळात. थोडं मागे गेलं तर स्त्रीराज्यात पुरुष ही उपभोग्य वस्तू मानली जात असे. त्या वेळी स्त्रिया काय करत असत, तर आर्थिक सूत्रे आपल्या ताब्यात ठेवीत. धर्मसत्ता जशजशा प्रभावी होत गेल्या, तसतसे लिंगदमन होत स्त्रीला न्यूनत्व देण्यात आले. सत्तेसाठी दमन हा निसर्गनियम आहे; माणूस त्याला अपवाद नाही. म्हणून स्त्री आणि पुरुषांतला हा तणाव कायम आहे. उद्याच्या काळात आर्थिक संस्कृती जशी आकार घेईल, त्यावर समानता मान्य होईल की स्त्रीश्रेष्ठभाव वा पुरुषश्रेष्ठभाव ठरेल. गोळ्या वा समाजवाद्यांच्या भाषणांनी असले नैसर्गिक प्रश्न सुटत नसतात. आणि समजा त्यानं स्त्रीला केवळ उपभोग्य समजून समाजस्वास्थ्य बिघडवण्याचा प्रयत्न केला, तर मी त्याला नक्की या गोळ्या खायला सांगेन."

माया : हुश्श! बाप रे. मला आज कळलं, की हे फेसबुक हा एक सीरियस विचारी लोकांचा अड्डा आहे. ह्यातलं बरंचसं माझ्या डोक्यावरूनच गेलं. पण मला एक कळलं, की ह्यातलं कुणीही गोळ्या द्यायच्या फारसं बाजूनं नाही.

विवेक : आणि हा शेवटचादेखील जरी म्हणत असला की मी त्याला गोळ्या खायला सांगेन, तरी पुढे त्यानं अशी पुस्ती जोडली आहे, की अर्थात तो केवळ सल्ला असेल. म्हणजे कळलं ना? अजून वाचू?

माया : नको. खूप झालं. अंदाज आला मला. आणि ह्यात स्त्रीमुक्तीवाले कुणी नाही आले? आवाहन करूनदेखील?

विवेक : थांब, शोधतो हं. हां, आहे, एक आहे. ती म्हणते आहे, की माझा माझ्या संस्कारांवर पूर्ण विश्वास आहे, त्यामुळे अशा गोळ्या द्यायची वेळच येणार नाही.

माया : ह्याला काही फारसा अर्थ नाही. तसं मीदेखील म्हणू शकते.

विवेक : तिला उत्तर दिलं आहे एकाने, की आपल्या अपत्यावर फक्त आपल्याच संस्कारांचा अंमल चालतो, हा एक रोमँटिक भ्रम आहे.

माया : चला. आता पुढच्या रविवारी अमन येईपर्यंत मी ह्या विषयावर फारशी माथाफोड न करायचंच ठरवलंय. मी ट्रेनमध्ये लेडीज डब्यातदेखील हा विषय काढून बघितला. पण बायकांना काही तरी वेड्यात काढल्यासारखं वाटलं. त्यांचा काही संबंधच नाही जणू! पण आपण अमन येईल तेव्हा मानसीला नक्की बोलावू या. म्हणजे तिच्यासमोर झालं, की नंतर मला ती टोकत तरी बसणार नाही आयुष्यभर.

विवेक : मी तुला सांगितलं नाही मुद्दाम, पण मगाचच्या त्या कॉमेंट्समध्ये एक कॉमेंट मानसीचीदेखील होती.

माया : म्हणजे ती पण रोज असते तिथे?

विवेक : ती माझ्यासारखी रोजची मेंबर आहे. आणि खूप पॉप्युलर आहे ती. शेवटी बाई आहे ना? मग काय, साळकाया-माळकाया असतातच; शिवाय बाबुराव, छबुराव तर टपलेलेच असतात.

माया : म्हणजे तुझ्या ती रेग्युलर काँटॅक्टमध्ये असते तर! ठीक आहे. मग तिला आठवण कर हं आज यायची.

विवेक : हो, केली आहे की मगाशीच! येईलच इतक्यात.

विवेक : चला, आता आज चक्क आपण एका डॉक्टरांबरोबर बोलणार आहोत आपला सध्याचा कळीचा विषय.

माया : मी आता सुरुवातीएवढी गोंधळलेली, त्रासलेली नाही. त्या तुझ्या फेसबुकवरच्या कॉमेंट्स वाचून मोठाच फायदा झाला. म्हणजे असं, की चार लोकांची मतं कळली.

(बेल वाजते. विवेक दार उघडतो.)

मानसी : चला, पोहोचले वेळेवर! हल्ली रविवारी कुठे जायचं म्हटलं की टेन्शनच असतं जरा. ते मेगा ब्लॉक असतं ना, त्यामुळे सगळ्या वाहतुकीवरच परिणाम होतो. पण मी म्हटलं, डॉक्टर येणार म्हणजे आपण वेळेवर गेलेलं बरं. आणि मला देखील त्यांना थोडं विचारायचं आहे, सहज जमलं तर. नाहीतर मुद्दाम उठून सायकिॲट्रिस्टकडे जायचं म्हणजे जरा नकोच वाटतं. म्हणजे मध्ये मी एकदा गेलेदेखील होते. पण तिथे गेल्यावर काहीतरी अवघडल्यासारखं वाटायला लागलं, की सगळे आपल्याकडे कसं तरी पाहत आहेत म्हणून. म्हणजे कळलं ना, आपल्याला वेड लागल्यासारखे! मग मी सरळ निघूनच आले. तसा काही माझा सीरियस प्रॉब्लेम नाहीये म्हणा. पण आहे... फक्त तुम्ही मला नंतर हसायचं नाही हं!

माया : छे गं, आम्ही कशाला हसतोय? मला तर सर्वांनीच सायकिॲट्रिस्टकडे जावं असं वाटतं.

विवेक : सलूनमध्ये जातो ना, तसं जायला हवं सायकिॲट्रिस्टकडे. डोकं हे खरं तर आतून स्वच्छ करायची गोष्ट आहे; पण आपण ती फक्त बाहेरून स्वच्छ करत बसतो. जेवढी सलून आहेत ना, तेवढीच सायकिॲट्रिस्ट क्लिनिक निघतील ना, तेव्हाच सुधारेल आपला समाज आणि देश.

(बेल वाजते. विवेक दार उघडतो.)

विवेक : अगदी वेळेवर आलास. मी आत्ताच म्हणत होतो ह्या आमच्या मैत्रिणीला... बाय द वे, ही मानसी, मायाची कॉलेजातील मैत्रीण; आणि हा डॉ. अमन, माझा शाळेपासूनचा जिगरी दोस्त. सायकिॲट्रिस्ट आहे. हां, तर अमन, मी हिला आत्ताच म्हणत होतो, की आपल्या देशात जोपर्यंत सलूनच्या एवढी सायकॉलॉजी क्लिनिक निघत नाहीत, तोपर्यंत बापू, बाबा, बुवा, माँ ह्यांचं पीक वाढतच राहणार.

अमन : मानसी मॅडम, हा शाळेपासून उस्ताद आहे हं अशी डायलॉगबाजी करण्यात.

मानसी : ठाऊक आहे मला. मी रोज बघत असते ते फेसबुकवर. काय रसवंती पाझरत असते दिवसभर!

(विवेक अस्वस्थ होतो. माया त्याच्याकडे काहीशी शंकेखोरपणे बघते.)

विवेक : टाइमपास रे!

अमन : हो, ते एक नवीन ॲडिक्शन आलंय गेल्या काही वर्षांमध्ये.

विवेक : पण त्याचा उपयोगदेखील आहे. आता साधं बघ, सध्या आम्ही जरा एका क्रायसिसमधून जात आहोत. म्हणजे तसे विशेष काही नाही, पण माया थोडी अपसेट आहे... माया, तू सांगतेस की मी सांगू?

मानसी : तू नको आणि माया नको, मीच सांगते... कारण त्याचं मूळ कारण मी आहे. म्हणजे डॉक्टर, काय झालं, तर माया आणि मी तशा खूप जुन्या मैत्रिणी... ए, सांगू ना गं माया?

माया : सांग की. फक्त त्याला घाई किती आहे बघ. तो दरवेळी असाच घाईघाईत येतो.

अमन : नाही, सांगू दे त्यांना.

मानसी : तर मी पारंपरिक आणि माया सुधारक, म्हणजे स्त्रीमुक्तीवाली वगैरे; त्यामुळे आमची नेहमीच छेडछाड सुरू असायचीच. त्यात दोघींनाही साधारण वर्षभराच्या अंतराने मुलगेच झाले. मग त्यांना वाढवण्यावरून पुन्हा मतभेद. तर मध्ये काय झालं, की माझ्याकडे माझ्या आणखी एका मैत्रिणीचा भाचा आला; तो कुठच्यातरी मल्टिनॅशनल फार्मा कंपनीमध्ये आहे. तर त्याने मला सांगितलं, की त्यांची कंपनी असं काहीतरी प्रॉडक्ट काढते आहे, की जे घेतल्याने तुमचा वयात येणारा मुलगा बायकांकडे उपभोग्य वस्तू म्हणून पाहणार नाही. बरं, त्याचे साइड इफेक्ट्स काहीही नाहीत; उलट अभ्यासात जास्त लक्ष लागतं, कारण चित्त विचलित होत नाही.

डॉ. अमन : (मस्त हसत) सुभानअल्ला! मस्त इंटरेस्टिंग गोष्ट आहे.

विवेक : इंटरेस्टिंग तुला! तिकडे माया बिचारी गांजून गेली आहे.

अमन : ओ माया, टेक इट लाइटली.

माया : नाही, शक्य नाहीये ना. तर तो गुरुनाथ आहे ना, तो आधी मानसीला ॲप्रोच झाला. नॅचरली, तिच्या मुलाला काही देणं शक्यच नव्हतं. तर तो म्हणाला, आम्हाला खरं तर हे प्रॉडक्ट विमेन लिबवाल्यांकडूनच लाँच करायचं आहे; तर त्यासाठी तुमच्या त्या मैत्रिणीकडे न्या मला, तिच्या मुलाच्या बर्थडेला. तर ह्या मानसीबाई आल्या घेऊन त्याला. तर त्याने मला मुदत दिली आहे एका महिन्याची. आणि मी पुरती गोंधळून गेले आहे. कारण खरंच सांगते, की हा निर्णय वाटतो तेवढा सोपा नाहीये, हे मला हळूहळू कळू लागलंय. मुळात ते शरीर माझं नाहीये. माझ्या मुलाचं असलं तरी परकं आहे; दुसऱ्या कुणाचं तरी आहे, आय मीन. आणि तो काही आजार किंवा रोग नाहीये.

अमन : नक्कीच. तुम्ही असा विचार करायचं काहीच कारण नाहीये. आणि मी काही फार्माकोलॉजीतला नाही, पण मी चौकशी करतो.

विवेक : तुला आठवतंय का? कॉलेजमध्ये असताना मी अगदी पाप्याचं पितर होतो. तेव्हा आपल्या वर्गात तो माधव चौधरी होता बघ, तो नंतर कुठल्याशा कंपनीत मेड रेप झाला होता. तर त्याने मला काहीतरी सहा इंजेक्शन्स आणून दिली. "ही घे, म्हणजे तुला जरा बाळसं येईल" म्हणाला. तर मी ती घेऊन आमच्या फॅमिली डॉक्टरांकडे गेलो. तर ते म्हणाले, छे छे, ही इंजेक्शन्स घेणे हार्मफुल आहे; ह्यात काहीतरी इस्ट्रोजेन की काय तरी म्हणाले, ते आहे. तर तसंच आहे.

अमन : मी औषधांसंबंधी बोलत नाही, कारण हल्ली सेक्स ड्रग्जचा सुळसुळाट आहे. इव्हन मी डॉक्टर म्हणूनसुद्धा बोलणार नाही; कारण अशा गप्पांमध्ये त्या मेडिकल टर्म्स वापरून बोललो, की सहजता निघून जाते. पण तुम्हाला काही अनुभवाच्या गोष्टी सांगू शकेन. त्यादेखील फार नाही.

पहिली गोष्ट माझी स्वतःचीच सांगतो. माझं वय तेव्हा २२-२३ असेल. काहीतरी कामानिमित्त मला एका सहकारी साखर कारखान्यामध्ये जावं लागलं. मी आणि माझे एक सीनियर होते. तिथे आमची बडदास्त उत्तम होती. पण तो कारखाना काहीतरी गावाबाहेर होता. तिथे कुणी स्त्रीच नव्हती. जेवणखाण, गाडीघोडा, सगळं छान होतं. दोन दिवस गेल्यावर मला कळलं, की मला इथे अजिबात चैन पडत नाहीये; आणि त्याचं कारण मला हे कळलं, की मला दोन दिवसांमध्ये एकही स्त्री दिसलेली नाही. मग मी गावची शाळा बघायचं निमित्त काढून त्या वनवासातून बाहेर पडलो; तर त्या शाळेतील घट्ट वेण्या घातलेल्या गावठी पोरी पाहूनदेखील मला फारशी मजा आली नाहीच. पण दुधाची तहान ताकावर भागवल्यासारखं समाधान मानून घेतलं. मग दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्या कारखान्याच्या चेअरमनच्या घरी आम्हाला बोलावलं गेलं; त्याची माझ्याच वयाची नागर वळणाची पोरगी बघितली, तेव्हा माझ्या जिवात जीव आला. सांगायचा मुद्दा काय, तर पुरुषाला बाई दिसली नाही तर तो अस्वस्थ होतो.

आता अलीकडचीच माझ्या एका पेशंटची गोष्ट सांगतो. त्याचा कल जरासा, ते काय तुमचं अध्यात्म असतं ना, त्यातला होता. पन्नाशीचा गृहस्थ होता, बँकेत नोकरीला. तर त्याची बदली ग्रामीण भागात झाली. बायकोमुलांना सोडून एकटा गेला बिचारा. तिकडे सगळ्या डोक्यावरून पदर वगैरे घेतलेल्या बायका. त्यातही एखादी दिसायची आकर्षक. पण ह्यानं ठरवून टाकलं, की बाईकडे बघायचंच नाही त्या नजरेनं. आणि चार महिन्यांनी हा घरी आला, तर इंपोटन्सी आल्यासारखं वाटलं त्याला. मग सगळ्या तपासण्या केल्या, तर कुठे काही बिघाड सापडेना. मग बोलताना तो सहज बोलून गेला, "माझ्या बायकोला वाटतंय तिथे माझं मन गुंतलंय कुणात तरी. पण परिस्थिती नेमकी उलटी होती. मी तिथे बायकांकडे बाई म्हणून बघणंच बंद केलं होतं, त्यामुळे षंढत्व आल्यासारखं झालंय." पौरुष कायम तेवतं ठेवण्यासाठी त्यात स्त्रीदर्शनाचं तेल सतत घालावं लागतं, अशी रचनाच आहे निसर्गाची! त्याला कोण काय करणार?

विवेक : अगदी शक्य आहे. मलादेखील नेहमी असं वाटतं, की पुरुष इतर बायकांकडे बघतो ना, म्हणूनच त्याचा पुरुषीपणा शाबूत राहतो. तर तेच मी मायाला सांगत होतो. तर तिचं आपलं ते नेहमीचं टुमणं सुरू: संस्कृती पुरुषप्रधान आहे म्हणून तसं वाटतं तुम्हाला!

मानसी : आता माझंच सांगते. माझा नवरा गेली सात-आठ वर्षं सौदीला असतो.

विवेक : तिथे तर बुरख्यामुळे नेत्रसुख दुर्लभच. तरी हल्ली टीव्ही, नेटवर बघता येतं.

मानसी : अरे, त्याचं नाही, माझं सांगते आहे.

विवेक : तुझं?

मानसी : हो. मला ना, गेल्या काही दिवसांमध्ये अश्लील स्वप्नं पडतात अधनंमधनं. खरं तर चावटच! म्हणजे मी आंघोळ करते आहे आणि कुणीतरी पाठच्या जाळीतून पाहतं आहे वगैरे. आणि पाठी चक्क जिंगल... "ओके, नहाने का बडा साबुन... सचमुच बडा है!" हल्ली तर कहर झालाय. स्वप्नात सारखे सापच येतात. त्यात डॉक्टर, मी ते फ्रॉइडचं पुस्तक वाचलं, एका मैत्रिणीनं दिलेलं. तर मला जरा चिंताच वाटायला लागली... ते स्वप्नांचं ॲनालिसिस वाचून, त्या फॅलिक सिंबॉल्सचं वाचून तर झोपच उडली माझी.

अमन : (ह्यावर जोराने हसत) ते तेवढं मनावर घेऊ नका. हो, म्हणूनच मी मेडिकल टर्ममध्ये बोलणं टाळतो. लोक थातूरमातूर अर्धवट माहितीवर भलतेसलते निष्कर्ष काढतात काहीतरी आणि उगीचच चिंतातुर होतात. तुम्ही कुठे नोकरीला वगैरे असाल ना?

मानसी : होय तर. चर्चगेटला आहे ऑफिस माझं.

अमन : रोज वेळेवर पोचता का ऑफिसात?

मानसी : नाही हो, आटपतच नाही. मुलाचा डबा, सासूबाईंचं औषधपाणी... सकाळच्या घाईत सगळं एकटीने करायचं म्हटल्यावर, नाही म्हटलं तरी थोडा लेट होतोच. त्यात चर्चगेटला त्या पोलिसांच्या दोऱ्या...

अमन : कळलं. माझ्याकडे एक सेम केस आली होती मागच्या वर्षी. तुम्ही एक काम करा. जरा पंधरा मिनिटं लवकर निघत चला. आठ दिवसांमध्ये स्वप्नात साप यायचे आपोआप बंद होतील. त्या दोरीमुळे तुमच्या स्वप्नात साप येत आहेत.

मानसी : डॉक्टर, नाही हो; त्या दिवशी मी आंघोळ करण्यासाठी स्वप्नात पाणी सोडलं, तर चक्क नळातून साप...

अमन : मॅडम, दोन आठवडे वेळेच्या आधी दहा मिनिटे ऑफिसला पोहोचायचा प्रयत्न तर करा. नाहीच कमी झालं, तर मग या क्लिनिकमध्ये.

पण एकूणच ह्या काळात शेअरिंग आणि काउन्सेलिंगची गरज अतोनात वाढली आहे, हे खरं. मनुष्यजात आजच्याएवढी भांबावलेली नसेल पूर्वी कोणत्याही काळात.

बरं, मी निघू आता. आणि माझा मित्र म्हणून सल्ला ऐका, की असल्या गोळ्या वगैरे द्यायच्या फंदात पडू नका. माझा एक कवी मित्र आहे, थोडासा 'केस' आहे. तर तो नेहमी मला म्हणतो, "तुझा प्रोफेशन आहे ते ठीक आहे; पण मनासारख्या कुणीही न पाहिलेल्या पदार्थावर गोळी देणं हे वेडगळ वाटत नाही तुला?" आता त्याला कुठे सांगत बसू मेंदूची रचना वगैरे! मग मी ते हसण्यावारी नेतो. पण गोळ्या देणं तसं खटकू शकतंच.

मानसी : तुम्हाला असं गप्पांमध्ये विचारणे बरोबर नव्हे, हे कळतं मला. पण एरवी मी चटकन उठून सायकिॲट्रिस्टकडे जाणं जरा अवघडच होतं. पण आता आपली ओळख झाल्यामुळे मी एकदा येतेच तुमच्या क्लिनिकमध्ये. आणखीही काही प्रॉब्लेम्स आहेत.

अमन : हां, जरूर या. विवेक देईल तुम्हाला पत्ता, नंबर वगैरे!

(अमन जातो.)

मानसी : चला, बरं झालं, माझी एक चिंता मिटली. मला हल्ली रात्री झोपेत मध्येच दचकून जाग येते, स्वप्नात साप येणार ह्या भीतीनं. बरं, सांगणार कुणाला? नंदन तर लहान आहे. सासूबाईंना एकदा बोलले, तर म्हणाल्या, दहाचा आकडा होता का? कुठेतरी गुप्तधन मिळणार असेल! आणि तुम्ही सांगू नका मला, मी कुठे यात्रेला जायला पैसे मागेन म्हणून. पण उदय तिकडून आणणार असेल ना डबोलं? ह्यांना तब्येतीकडून झेपणार नाही म्हणून नाही म्हणाले मी चारधाम यात्रा करायला, तर हे असं ऐकवतात बघ. आणि उदयला एकदा हे सापांचं फोनवर बोलले, तर तो तर काय सतत चावटपणाच करत असतो. म्हणे, नागीण गाणं लावून नाच करत जा रोज सकाळी! ऑफिसातील मैत्रीण म्हणाली, नागबळी कर नारायणगावला जाऊन. तर आता हे ऐकून जरा हुश्श वाटलं. आणि माया, तुलादेखील आता जास्त विचार करायला नको. मी गुरुनाथला कळवते तसं.

माया : तू काही कळवू नको. माझा निर्णय अजून पक्का व्हायचा आहे. माझ्याकडे नंबर आहे त्याचा.

मानसी : बरं बाई, तुझी मर्जी. त्यापेक्षा सरळ कबूल करून टाकायचं, की "उपभोग्य वस्तू म्हणून पाहू नका" हे आमचं म्हणणं चुकीचं होतं म्हणून. मी तुला आता माझाच अनुभव सांगते. वय वाढल्यामुळे असेल किंवा उदय इथे नसल्यामुळे असेल; पण मला माझ्याकडे कुणी लस्टफुली पाहिलं ना, की मला सुख मिळतं. आता मला कळायला लागलं आहे, की आपण बायका म्हणूनच नटतोथटतो, की आपल्याकडे पुरुषांनी पाहावं म्हणूनच. ते हल्लीचे ब्लाउज बघ ना काय आलेत! जाऊ दे, मी निघते आता. बोलण्यासारखं खूप आहे तसं. नंतर कधी तरी.

विवेक : येत जा गं अशी अधेमधे.

मानसी : भेटू.

प्रवेश ४

(मानसी आणि विवेक दोघंही एकाच हॉटेलात / बागेत दुपारच्या वेळी अचानक भेटतात.)

मानसी : (काहीशी गांगरलेली) अरेच्चा विवेक! तू इथे कसा, आणि तेदेखील दुपारच्या वेळी कामधाम सोडून?

विवेक : (कावराबावरा) अगं, नाही, एक अपॉइंटमेंट होती, म्हणून हाफ डेच निघालो ऑफिसातून.

मानसी : पण काल मला बोलला नाहीस तसं... तसा आपला, आता त्या गोळ्यांचा विषय सुरू झाल्यापासून, रोजचाच काँटॅक्ट असतो. इनबॉक्स, व्हॉट्सॲप, कुठे ना कुठे.

विवेक : ते खरंच आहे म्हणा; पण तरीदेखील सगळं थोडीच सांगता येतं सध्याच्या काळात? आपले एकूणच व्यवहार एवढे वाढले आहेत ना? जुन्या काळात कसं असायचं... ते ठीक आहे. पण अगं, तू कशी इथे?

मानसी : तू तशी मी. माझी पण अपॉइंटमेंट आहे.

विवेक : वा गं लब्बाडे! आणि वर मला विचारते आहेस, की मी कसा इथे म्हणून! आणि मी आपला साधेभोळेपणानं तुला स्पष्टीकरण देऊ लागलो होतो.

मानसी : मला एका आपल्या फेसबुक फ्रेंडलाच भेटायचं होतं. तो म्हणाला होता, की मी त्याच एरियात असतो, कधी आलीस तर ये. तर मी ना, त्याला मी मुंबईत राहते सांगितलंच नव्हतं. मी म्हटलं, मी पिंपरीला राहते; उद्या काही कामानिमित्त मुंबईला येणार आहे. तर तो म्हणाला, आलीस तर थोडा वेळ भोज्जा करून जा.

विवेक : भोज्जा? (तिचे खांदे पकडून हलवून) तू चिचुंदरी! वॉव!

मानसी : (त्याला गच्च आवळून) तू भोज्जा!

विवेक : वॉट ए स्वीट शॉक ना? मी कधी इमॅजिनपण नव्हतं केलं, की चिचुंदरी तू असशील म्हणून.

मानसी : मला खरं तर आता कधी नाही ती खूप लाज वाटते आहे. म्हणजे तसं बघितलं तर तुझी-माझी गाठभेट फेसबुकवर आल्यापासून वाढलेलीच होती. त्यात गेला महिनाभर त्या गोळ्यांमुळे तुझ्या घरी येणंदेखील झालं जरा जास्तच. हो, म्हणजे खोटं कशाला बोला? त्या तुझ्या डॉक्टर मित्राकडे गेल्यापासून तर तुला माझ्या मनातलं सगळं बोललेच होते मी. आणि मग तूसुद्धा जवळपास रोजचाच, अलीकडे तर सकाळ-संध्याकाळ फोन करायला लागला होतास. पण आपण चिचुंदरी आणि भोज्जा ह्या बुरख्याआतून काय काय बोलायचो ना एकमेकांशी? तशी मी उदयशीही बोलले नसेन कधी, नवरा असून; आणि तोही तुझ्यासारखाच चावट आहे तरी!

विवेक : छे, मला तर ह्याच्या ५-७ टक्केदेखील बोलायची हिंमत नाही. तुला माया म्हणजे काय प्रकार आहे, हे ठाऊक आहेच. पण आता आपण घरीच जाऊ या ना. आता एवीतेवी आपलं भांडं फुटलंच आहे. मग घरी जाऊन निवांत बोलत तरी बसूया. नाही तरी ऑफिसला दांड्या मारल्याच आहेत आपण; मग वेळ सार्थकी तरी लावूया.

मानसी : चावट कुठला! भोज्जा!

विवेक : चल, गाडी समोरच पार्क केली आहे. डोंट वेस्ट टाइम. आपल्याला दोन-तीन तास तरी मिळेल प्रायव्हसी.

(दोघंही चालायला लागतात.)

(दोघंही घरी पोचतात. आत गेल्या गेल्या विवेक तिच्या कमरेत हात घालून नाचायला लागतो.)

(चाल: तू माझी माऊली, मी गं तुझा कान्हा)

तू माझी चिचुंदरी, मी गं तुझा भोज्जा आनंदे (जोडीनं) करूया मौजमज्जा! तू माझी चिचुंदरी, मी गं तुझा भोज्जा

मानसी : एवढे दिवस चॅटिंग करताना आपण फेक आयडीच्या बुरख्याआडून काय वाट्टेल तो चावटपणा करायचो ना! मी तर असं आयुष्यात पहिल्यांदाच केलं असेल.

विवेक : (लांब होत) तुला माझ्या चॅटिंगवरून खोटं वाटेल कदाचित, पण मीसुद्धा असा कुठच्या बाईच्या कमरेत हात घालून आयुष्यात पहिल्यांदाच नाचलो असेन बहुधा. मी तर माझ्या मित्रांच्यात चेष्टेचा विषय आहे, फद्या म्हणून! कुणीकुणी तर फटुकली असंही म्हणतात.

मानसी : तुझ्या लिहिण्यावरून अजिबात तसं वाटलं नाही कधी.

विवेक : अगं, त्या तोंडाच्या वाफा! त्यात मी पटाईत झालोय गेल्या काही वर्षांमध्ये.

मानसी : म्हणजे?

विवेक : सांगतो. ते माझं गुपित आहे. ट्रेड सिक्रेट. जे अजून मी कुण्णाला बोललेलो नाही. फक्त तुला सांगणार आहे. तू मात्र ते तुझ्या-माझ्यातच ठेव. प्रॉमिस?

मानसी : प्रॉमिस, भोज्जा!

विवेक : तू ते तुझं स्वप्नात साप येण्याचं प्रकरण मला मोकळेपणाने सांगितलंस ना, त्यामुळे मला धीर आला तुला हे सांगायचा.

मानसी : अरे, सांग ना पटकन! आपल्याकडे वेळ थोडा आहे, लक्षात आहे ना तुझ्या?

विवेक : होय गं चिचू... पण कसं सांगू? हां, मी ना, एक वेगळीच आयडिया काढली आहे. म्हणजे ते 'थेंबे थेंबे तळे साचे' असतं ना, त्यावरून सुचली ही आयडिया. म्हणजे काय आहे, माझ्यासारख्या भित्र्या पुरुषांनादेखील आणखी बाई, बाईच काय, मिळतील तेवढ्या बायका हव्याच असतात प्रेम करायला. पण हिंमत होत नाही. लोक काय म्हणतील? नाव खराब होईल...

मानसी : हो ना, केवढी भीती असते! मला पण ते अमनचं पटलेलं नाही त्या दिवशी. पण तू तुझं सांग आधी.

विवेक : त्यात बायकोला कळलं तर? त्यात माझ्या घरात तर माया... म्हणजे तुला काही वेगळं सांगायला नको. तर मी एक आयडिया काढली, की बायकांबरोबर आपला जो व्यवहार होतो ना, त्याला मार्क द्यायचे. पॉइंट्स! म्हणजे असं, की नवीन बाईबरोबर ओळख झाली की २ पॉइंट्स; चावट जोकला बाई हसली की ४ पॉइंट्स; टाळी देऊन हसली तर एक बोनस पॉइंट, म्हणजे ५ पॉइंट्स; एखाद्या मैत्रिणीला स्कूटरवरून लिफ्ट दिली की ८ पॉइंट्स. आता कळलं ना, त्या दिवशी तुला सोडायला का येत होतो ते! कुणी डब्यातलं हळूच खायला दिलं की १ पॉइंट... आणि असे १०० पॉइंट्स झाले ना, की आपण एका बाईबरोबर गंमत केल्याचं सुख मिळालं असं समजायचं.

मानसी : मस्त आहे तुझी आयडिया! मला पण आता असंच काहीतरी करायला हवं. माझं पण तेच झालंय आता. ते स्वप्नात साप काही उगीच नाही येत आहेत. त्या अमनना काय माहिती आहे, माझ्या जिवाची केवढी मेली घालमेल होते ती! म्हणून तर मी फेसबुकवर हा चिचुंदरी असा फेक अकाउंट काढला. मी हेच करते. पुरुषांबरोबर इनबॉक्समध्ये जाऊन फ्लर्टिंग करत बसते. बोलाचीच कढी, बोलाचाच भात! आज भेटायला अशी तुला पहिल्यांदाच आले, माझ्या भोज्जाला. पण तू किती रोमँटिक बोलतोस रे! खूप आवडतोस तू मला, भोज्जा.

(असं म्हणून त्याच्या गळ्यात हात टाकते. तो अनपेक्षित धक्का बसल्याने सोफ्यावर कोसळतो. ती त्याच्या अंगावर पडते. विवेक गांगरतो, धडपडतो. मानसी जरा आक्रमक होऊन त्याच्या तोंडाजवळ तोंड नेते. विवेक घाबरतो.)

विवेक : मानसी, नंतर कधीतरी! आणि मला ह्याचे पॉइंट्स नाहीत माहिती. मला बाईच्या कमरेत हात घालून नाचायचे किती पॉइंट्स, तेदेखील ठाऊक नाहीत. आता तू गेल्यावर सावकाश ठरवतो ते.

(मानसी हसते. त्याच्या अंगावरून उठताना तिच्या पर्समधली पर्फ्यूमची बॉटल चेपली जाऊन लीक होते.)

विवेक : (घाबरतो) आता वास येणार मायाला, आल्यावर; आणि तिचं नाक तर भलतंच तिखट आहे. ठीक आहे, ते मी निस्तरतो. मानसी, तू आता लवकर निघ इथून.

(मानसी देखील घाबरते.)

मानसी : म्हणून ते फेक आयडी काढणे वाईट आणि फ्लर्टिंग वाईट. नाहीतर आपण कशाला कसे असे वागलो असतो? त्या चिचुंदरी आणि भोज्जाने केला चावटपणा एकमेकांशी, आणि त्याची फळं भोगायला लागताहेत आपल्याला!

(विवेक बोलता बोलता हिट मारतो आहे.)

मानसी : ही मस्त आयडिया काढलीस. तू भोज्जा!

विवेक : हो, पण तू निघ आता, चिचू.

मानसी : बाय.

विवेक : (जाऊन तिला पाठून आवळतो) हे पाठून आवळायचे २० पॉइंट्स ठेवले होते, पण कधी चान्सच नव्हता आला. (मग नाक ओढतो) नाक ओढायचे १२! जा, माझा आजचा कोटा पुरा झाला. आता एक गोड पप्पी दे. ती पाणीपुरी खाल्ल्यानंतर सुकी पुरी खाता ना मागून, तशी.

(मानसी निघते.)

(विवेक धावपळ करतो. खूप हिट मारतो पुन्हा. आणि काही घडलंच नाही अशा आविर्भावात कॉम्प्युटर उघडून बसतो. बेल वाजते. माया येते.)

माया : (आल्या आल्या) शी! केवढं ते हिट मारून ठेवलंय! एरवी झुरळाला मी जेव्हा हिट मारते, तेव्हा ओरडत असतोस ना नेहमी, की झाडूनं मारायला काय होतं? उगीच विषारी फवारे सोडायचे घरभर. आणि आता हे काय?

विवेक : अगं, आज घरी जरा लवकरच आलो. दार उघडून पाहतो, तर ह्या सोफ्यावर एका पालीनं तोंडात झुरळाला पकडलंय! आणि पाल कसली गं, पालोबाच होता तो. आणि त्या झुरळाची नुसती तडफड, धडपड, फडफड चालू होती. आणि झाडू काही दिसेना. मग चटकन सापडलं हे हिट. मग असा मारा केला ना, की झुरळदेखील मेलं आणि ती पालदेखील!

माया : शी! काय वास आहे! बघत काय बसला आहेस त्या सोफ्याकडे? पंखा लाव आधी.

(विवेक काहीसा घाबरतच पंखा लावतो.)

माया : फुल, पाचवर ठेव! वास लवकर जायला हवा, नाही तर मला उलटी होईल. आधीच डोकं भणाणून गेलंय.

विवेक : (प्रेमळ आवाजात) ऑफिसात खूप काम होतं का राणीला?

माया : (रडायला लागते.)

विवेक : कुणी काही बोललं का?

माया : प्रांजळच्या शाळेतून फोन आला होता.

विवेक : काय म्हणून?

माया : प्रिन्सी म्हणाल्या, की मॅडम, जरा शांतपणे ऐका. तुमच्या मुलाला काल पॉर्न साइटवर सर्फिंग करताना पकडलं आहे. तूर्तास आम्ही काही ॲक्शन घेत नाही आहोत; पण पुढच्या वर्षी मात्र त्याच्यासाठी दुसरीकडे ॲडमिशनचं बघा.

विवेक : टेक इट ईझी माया. सच थिंग्ज हॅपन इन लाइफ.

माया : प्रिन्सीपण हेच म्हणाल्या. पण ते प्रकरण शाळेच्या ट्रस्टींपर्यंत गेलंय. आणि फादर ह्या बाबतीत फार स्ट्रिक्ट आहेत.

विवेक : आम्हीसुद्धा शाळेत असताना ती पिवळी पुस्तकं चोरून वाचायचो!

माया : बाप रे! हे सगळं भयंकर आहे.

विवेक : ह्यात भयंकर वगैरे काही नाहीये. तुम्हा बायकांना पुरुषांचं जग माहितीच नाहीये. फेसबुकला बघतो ना, जेमतेम १०-१५ टक्के बायकांनाच ठाऊक असतं पुरुषांचं खरं अंतरंग, खरं रूप!

(एवढ्यात तो हिटचा वास उडतो आणि मायाला पर्फ्यूमचा वास यायला लागतो.)

माया : अरेच्चा! हे काय आता, पर्फ्यूमचा वास येतोय!

(सोफ्याच्या दिशेने सरकते. सोफा चाचपडते. तर तिथे लेडीज गॉगल सापडतो.)

माया : (रडत) इथे नक्की कुणीतरी बाई येऊन गेली आहे.

विवेक : (प्रसंगावधान राखत) आता खरं सांगतो. आत्ता इथे मानसी येऊन गेली. त्या गोळ्यांसंबंधातच बोलायला आली होती. आता जेमतेम चारच दिवस उरले आहेत, आणि तुला हे कसं पटवायचं, ह्यासाठी काय आयडिया करावी, हे आम्ही ठरवत होतो. बाकी तुला वाटत असेल तसं आम्ही काहीही केलेलं नाही.

माया : (हुंदके देऊ लागते) तू काही सांगितलं तरी मला ते पटणारच नाही. तिकडे मुलाचे हे उद्योग आणि इकडे नवऱ्याचे हे! माझं नशीबच फुटकं.

विवेक : अगं, विश्वास ठेव. सगळं नीट होईल.

माया : पण ते पर्फ्यूम सांडलंच कसं?

विवेक : अगं, ती बोलताना चुकून तिच्या बॅगवर बसली. त्यामुळेच तो गॉगलदेखील बाहेर पडला.

माया : तू त्या दिवशी बोलला होतास, सगळ्यांनी गॉगल लावायला पाहिजे म्हणून! त्याचं रहस्य आत्ता कळलं मला.

विवेक : तुझ्या डोक्यावर परिणाम झाला आहे माया. त्या गॉगलचा काय संबंध आहे? तू जरा शांत हो.

माया : ती मानसीदेखील त्या दिवशी तेच सांगत होती, की तिच्या स्वप्नात साप येतात वगैरे. मी काय वेडी आहे, की कुक्कुलं बाळ? जाऊ दे. आता मात्र माझा निर्णय पक्काच झाला. प्रांजळला मी त्या गोळ्या नक्की देणार आहे.

(तिरीमिरीत फोन लावते.)

हॅलो, गुरुनाथ! मला तुम्हाला भेटायचं आहे, त्या गोळ्यांच्या संदर्भात. शक्यतो लवकरात लवकर.

गुरुनाथ : हां, चालेल. ठरवूया आपण उद्या!

प्रवेश ५

माया : या, नमस्कार.

गुरुनाथ : नमस्कार मॅडम.

माया : बसा गुरुनाथ. मी तुम्हाला हे सांगण्यासाठी बोलावलंय, की माझा निर्णय पक्का झाला आहे. प्रांजळला मी त्या गोळ्या द्यायचं ठरवलं आहे. हा निर्णय तसा महत्त्वाचा आहे आणि तो आम्ही सर्वांनी मिळून घ्यायला हवा होता, हे खरंच. पण तशी काही नीट चर्चा, म्हणजे माझ्या अपेक्षेप्रमाणे, नाही झाली. पण अशा काही गोष्टी घडल्या, की मला एकटीलाच निर्णय घेणं भाग आहे. आणि माझा निर्णय 'होय' असा आहे.

गुरुनाथ : मॅडम, तुम्ही असा घाईघाईत, मनाविरुद्ध निर्णय घेत आहात, ते मलाच बरं वाटत नाहीये. तसे एक महिना पूर्ण व्हायला अजून दोन दिवस बाकी आहेतच, आणि एखादा महिना वाढवताही येईल. कारण काही फॉर्‌मॅलिटीज बाकी असल्याने आमचं लाँचिंगदेखील लांबतंयच थोडंफार.

माया : नाही, मला नकोय मुदतवाढ! खरं तर, हा निर्णय घ्यायला एवढे दिवस लागावेत, हाच मला माझा पराभव वाटतो आहे. पण ते नाही जमलं. त्यामुळे तो निर्णय एकदाचा फायनल करणे ही माझीच गरज आहे. कारण त्यामुळे माझ्या डोक्याच्या कटकटी फुकट वाढत चालल्या आहेत.

गुरुनाथ : म्हणजे? मला नाही कळलं. तुमची काही भांडणं वगैरे झाली की काय आपापसांत? कारण पुरुषांना हे सहसा मान्य होत नाही, असा आमचा अनुभव आहे.

माया : तुम्हाला ते सगळं सांगणं जरा अवघडच आहे; पण ह्यावरून बराच मनस्ताप सोसावा लागला मला.

गुरुनाथ : क्षमस्व मॅडम, मी दिलगीर आहे, असं काही झालं असेल तर. पण तो माझ्या कामाचा एक भाग आहे. आमच्या कंपनीची ती लाँचिंग स्ट्रॅटेजी आहे. अँड आय थिंक दॅट इज क्वाइट रीझनेबल.

माया : नाही नाही, त्यात तुमची काहीच चूक नाहीये; उलट त्यामुळे माझे डोळे उघडले. खरं तर मी तुमचे आभार मानायला हवेत त्यासाठी. पण तुमच्याकडे सेक्ससंबंधी, आय मीन 'लैंगिकते'संबंधी आणखी काही गोळ्या आहेत का?

गुरुनाथ : म्हणजे?

माया : म्हणजे... आता कसं सांगू तुम्हाला? म्हणजे असं, की वैवाहिक जोडीदारानं समजा काही आगळीक केली, म्हणजे फसवणूक, तर त्याचा मनस्ताप होणार नाही अशा काही गोळ्या आहेत का?

गुरुनाथ : आं... म्हणजे अगदी तशा नाहीत; पण मन आनंदी होईल, स्वच्छंदी वाटेल अशा काही गोळ्या आहेत. त्या कॉफीतून घ्यायला लागतात, मात्र.

माया : थांबा, आणतेच मी कॉफी. तुम्ही तोपर्यंत टीव्ही पाहा.

(गुरुनाथ टीव्ही पाहत चुळबुळ करतो आहे. माया कॉफीचे दोन कप घेऊन बाहेर येते. टीपॉयवर ठेवते.)

गुरुनाथ : थोडं पाणी द्याल मॅडम? घसा कोरडा पडलाय.

माया : अरे हो, तुम्हाला पाणी विचारायला विसरलेच.

गुरुनाथ : इट्स ऑल राइट मॅडम.

(माया पाणी आणायला आत जाते. गुरुनाथ कॉफीचा एक कप उचलतो. कॉफीच्या दुसऱ्या कपात ती गोळी टाकतो. माया येते. गुरुनाथ पाणी पितो. गुरुनाथ स्वतःदेखील दोन घोट घेतो. माया कॉफीचा कप घेऊन दोन-तीन घोट घेते आणि अचानक त्याच्याजवळ येते आणि त्याला खेटून बसते; ज्यामुळे क्षणभर तो दचकतो, थोडा सरकतो.)

माया : असं काय रे करतोस गुरू?

गुरुनाथ : मी कुठे काय केलंय? मीसुद्धा ही गोळी प्रथमच एका बाईला दिली आहे.

माया : ते जाऊ दे रे, नाथ.

गुरुनाथ : मॅडम, तुम्ही बऱ्या आहात ना?

माया : शी, मॅडम काय म्हणतोस, गुरुजी?

(त्याच्या खांद्यावर डोकं टेकते आणि त्याचं नाक ओढते.)

गुरुनाथ : तुला चक्करबिक्कर तर येत नाहीये ना?

माया : चक्कर? काय वेडा की खुळा? (ताडकन उठते, आणखी एक सिप मारून कॉफी संपवते.) चल, आपण आता मस्त आयटम डान्स करूया; मग तुझी खात्री पटेल.

(असं म्हणून 'चिकनी चमेली' गाणं लावून नाचायला लागते. त्यालाही सोबत घेते. तो प्रथमच तिला हात लावतो. ती त्याच्या बाहुपाशात जाते.)

माया : आता तुला कळलं असेल ना, मला काही, म्हणजे काहीसुद्धा झालेलं नाही! मात्र आता एक पक्कं समज, की प्रांजळला त्या गोळ्या द्यायच्या की नाही, ते मला ठाऊक नाही; पण मला मात्र ह्या गोळ्या पाहिजेत. किती छान वाटतंय! तुला कळणारच नाही. ए, नाव काय आहे ह्या गोळीचं? सांग ना गुरू, तू माझा लाडका ना, शोना...

गुरुनाथ : आता तुला खरं सांगतो माया. ती गोळी होती ना, वयात येणाऱ्या मुलाला दिली की तो बायकांकडे उपभोग्य वस्तू म्हणून पाहत नाही, तशी काही गोळी नव्हतीच माझ्याकडे. माझ्याकडे फक्त ह्याच गोळ्या होत्या. माझ्या एका मित्रानं मला दिल्या होत्या. स्पॅनिश फ्लाय की काहीतरी म्हणतात हिला. ही एकदा का अंगात शिरली, की बायका रंगात येतात, असं तो मला म्हणाला होता.

माया : (लाडात येऊन त्याच्या खांद्यावर मान वेळावत) पण तुला ही मलाच का द्यावी वाटली? सांग ना राजा!

गुरुनाथ : तुला आठवत नसेल माया. मागच्याच वर्षी मानसीकडे तिच्या मुलाच्या वाढदिवसाला तू आली होतीस; तेव्हा मानसीच्या ऑफिसात जी माझी मावशी आहे ना, तिला सोडायला बाइकवरून मी आलो होतो. आणि तेव्हा तुला मी पहिल्यांदा बघितलं. आणि मला तुझं खूप आकर्षण वाटलं. मला राहवेचना. मग मी मानसी मावशीशी जरा ओळख वाढवली आणि तुझी माहिती काढली. त्यातून तुझ्या तोरेबाज सौंदर्याचं रहस्य मला सापडलं: स्त्रीमुक्ती! मग मी माझी आखणी केली, तुझ्यापर्यंत पोहोचायची.

माया : (त्याच्या कुशीत शिरत) इतकी आवडले मी तुला?

गुरुनाथ : होय माया. खूप गोड दिसतेस तू. खूप आवडतेस तू मला.

माया : मग मला राणी म्हण ना, डालू! आणि ह्या गोळीचं नाव सांग ना... किती गोग्गोड गोळी आहे ही!

गुरुनाथ : गो गो गोग्गोड गोळी गोडीगुलाबी लाडीगोडी गो गो गोग्गोड गोळी जी घडवते खेळीमेळी वाढवते खेळीमेळी तापवूया तवा अन् भाजूया पोळी!

(माया आणि तो नाचत असतानाच पडदा पडतो.)

चो च्वीट!