कोर्टाची पायरी (भाग-२)

भाग १ वरुन पुढे..

जेवण आवरून मी न्यायदेवतेच्या प. प्रां. पुन्हा प्रवेश केला. दहा एक मिनिटांनी कोर्ट चेंबरमधून बाहेर येऊन खुर्चीत स्थानापन्न झाले. चष्मा पुसून त्यांनी समोरच्या कागदावरचा मजकूर वाचला अन नुकत्याच येऊन खुर्चीत शिरत असलेल्या सहायिकेशी पुन्हा मसलत केली.
मग दाराकडे तोंड करून ते बोलले, ‘कुलकर्णी वकील...’
त्यासरशी आतापर्यंत गायब असणारा एक पांढऱ्या कपड्यातला ‘पट्टेवाला’ दाराशी दिसू लागला. त्याने ‘आलेपाक वालेय...’ च्या सुरात आरोळी दिली, ‘कुलकर्णी वकी SS ल...’.
मी पट्टेवाल्याचे निरिक्षण केले. पण त्याच्या पेहेरावात ‘पट्टा’ नामक जिन्नस मला कुठेही आढळला नाही.
मग जजसाहेबांनी भराभरा काही नावे सांगितली. ती मला मुळीच ऐकू आली नाहीत. पण दूर दारापाशी असलेल्या ‘आलेपाक’ वाल्याला बरोबर समजली. त्याने पटापट सर्व नावे खड्या आवाजात पुकारली. त्याबरोबर वातावरणात थोडी गडबड उडाली. बरेचसे काळे डगले एकदम आत आले. आतली बरीचशी मंडळी बाहेर गेली अन बाहेरची आत आली. त्यामध्ये एक पंचविशीची ठेंगणी ठुसकी गोरटेली मुलगी होती. तिने सलवार कमीज पहेनले होते अन ओढणीचा पदर डोक्यावर घेतला होता. बालूशाहीच्या आकाराच्या तिच्या चेहऱ्यावरून बालूशाहीवरून तूप निथळावे तसा मठ्ठपणा निथळत होता. मघाचे ताज्या दमाचे तरुण वकील हातात कायद्याचे पुस्तक घेऊन तिच्या पुढे चालत होते. तिच्या मागून सुमारे तिच्या दीडपट उंचीचा तिशीच्या आसपासचा एक तरुण चालत आला.
ता. द. त. वकील डेस्कापुढे उभे राहिले अन ठे. ठु. तरुणी लाकडी पिंजऱ्याजवळ, ‘लाजते, पुढे सरते, फिरते...’ अशा ष्टाइलमध्ये उभी राहिली. मागून आलेला तरुण तिच्यापासून दोन फुटांवर किंचित मागे उभा राहिला.
मुळ्येसाहेबांनी नाकावरचा चष्मा अन लटकणारा जबडा वर ढकलून ठे. ठु. तरुणीकडे एकवार पाहिले. घसा साफ केला अन ते बोलले,
‘हं, कशासाठी डिवोर्स हवा आहे ?’
ठे. ठु. तरुणी मान खाली घालून गप्पच उभी.
पुन्हा जजसाहेबांनी विचारले, ‘का डिवोर्स घ्यायचा आहे, काही भांडण आहे का ?’
ठे. ठु. ने मान वर करून डोळ्यांच्या पापण्या २ वेळा फडफडवल्या, डोक्यावरचा ओढणीचा पदर मागेपुढे केला अन पुन्हा मान खाली घातली.
जजसाहेबांनी वैतागून ता. द. त. वकीलांकडे नाराजीने पाहिले. ता. द. त. वकील हसऱ्या चेहेऱ्याने पुढे झाले अन तरुणीला उद्देशून म्हणाले, ‘घाबरू नका, ताई ! सांगा स्पष्ट सगळं साहेबांना.’
ठे. ठु. च्या एकंदर आविर्भावावरून ती घाबरत वैग्रे असेल असे मला चुकूनही वाटले नाही.
तिने मान एकदा इकडे अन एकदा तिकडे झटकली. मग डोक्याला ताण देऊन जड जिभेने ती बोलली,
‘विचार...विचार...विचारामुळे, साहेब..’
साहेब हैराण झाले. ‘मग लग्नापूर्वी नव्हता का केला विचार ?’
ता. द. त. वकीलही गोंधळले. त्यांनी जरा डोके झाडल्यासारखे केले. बहुधा आपण पक्षकाराला पढवलेले डायलॉग आठवून पाहात असावेत. इतक्यात मागे उभा असलेला तो तरुण (तोच तिचा विभक्त होऊ घातलेला पती असल्याचे मला नंतर समजले) मदतीला धावला.
‘अं, म्हणजे वैचारिक मतभेद .., वैचारिक मतभेदामुळे, साहेब.’
तो बऱ्यापैकी शिकला सवरलेला अन कोर्टाच्या वातावरणाला सरावलेला वाटला.
‘असं, असं. वैचारिक मतभेद काय ?’ ...जजसाहेब.
आता ठे. ठु. ला गळा फुटला. ‘व्हय, व्हय. वैचारिक मतभेद..’
प्रपंचात वैचारिक मतभेद असला तरी या मुद्द्यावर मात्र दोघा पती-पत्नींची एकवाक्यता दिसली.
‘एखादे उदाहरण सांगू शकाल ?’ जजसाहेब.
ठे. ठु. तरुणीचा चेहरा पुन्हा मठ्ठ दिसू लागला. तिने मदतीच्या अपेक्षेने वि. हो. घा. प. कडे पाहिले. तो पुन्हा मदतीस धावला.
‘म्हणजे तसा खास काही प्रसंग नाही आठवत आता पण वारंवार वैचारिक मतभेद होते.’
‘वैचारिक मतभेद’ या मुद्द्यावर तो ठाम दिसला.
जजसाहेबानी आळीपाळीने दोघांकडे रोखून पाहिले. पण ‘वैचारिक मतभेदा’च्या भिंतीपलीकडचे काहीच दिसेना. ते पुन्हा हैराण झाले. मग त्यांनी रोख बदलला.
‘मुले आहेत का ?’
‘व्हय’ ठे. ठु. तरुणी.
‘किती ?’
‘दोन.’
‘त्यांची कस्टडी, ..आपलं, ताबा कुणाकडे पाहिजे ?’
‘माज्याकडं, साहेब’
‘त्यांच्या पालन-पोषणाची काय सोय ?’
ठे. ठु. तरुणीचा चेहेरा आणखीनच मठ्ठ दिसू लागला.
‘तुमच्या आर्थिक मिळकतीची काही व्यवस्था आहे का ?’ जजसाहेबांनी आपला प्रश्न स्पष्ट करून सांगितला.
आता ता.द.त. वकील मदतीला धावले. ‘साहेब, पोटगी मागितली आहे.’
‘व्हय, पोटगी मागीतल्याली हाय.’ तिने वकिलांची री ओढली.
जजसाहेबांनी वि. हो. घा. प. कडे अपेक्षेने पाहिले. त्याची काहीच हरकत दिसली नाही. मग त्यांनी समोरच्या कागदावर काही नोंद केली अन म्हणाले, ‘ठीक आहे..बसा.’
वि. हो. घा. पती पत्नी मागे जाऊन लाकडी बाकड्याच्या दोन विरुद्ध टोकांवर टेकले. ता.द.त. वकील पुन्हा डेस्कापाशी जाऊन कागदे आवरू लागले. फायली अन पुस्तकांचा ढिगारा सावरत ते मागे आले अन आपल्या पक्षकारांकडे पाहून खूण करून बाहेर पडले.. त्यासरशी ते दोघे उठून त्यांच्यापाठोपाठ बाहेर पडले.
जजसाहेबांनी पुढ्यातला पाण्याचा ग्लास घशात रिकामा केला अन खिशातून पांढराशुभ्र रुमाल काढून खसाखसा चेहरा पुसला. मग पेनाचे टोक जबड्यावर टेकवून समोरच्या कागदावरच्या नोंदी लक्षपुर्वक न्याहाळल्या अन चष्मा काढून ते खुर्चीत जरा मागे रेलून बसले. २-४ मिनिटे अशीच रेंगाळत पसार झाली.
आता आमचे वकील अन आमच्या प्रतिपक्षाचे वकील डेस्कापुढे उभे राहिले.
मी खुर्चीतच अंमळ सावरून बसले.
खर्ज लावून नांदी व्हावी तशा नरम संभाषणाने दोन्ही वकिलांनी सुरुवात केली. सुमारे १० मिनिटे संभाषणाच्या पार्श्वभूमीवर कागदपत्रांची देवाण घेवाण इ. कार्यक्रम चालला. मग दोघांचा आवाज थोडा वरच्या पट्टीत गेल्यावर मला काही वाक्ये ऐकू येऊ लागली.
प्र.प. वकील मुळ्येसाहेबांना म्हणाले , ‘साहेब, एकूण दोन लाख एकोणनव्वद हजार इतक्या रकमेचा सेटॉफ आहे. वादींनी त्याचे काहीच स्पष्टीकरण दिलेले नाही..’
‘साहेब, ती बिले कंपनीच्या इतर गावातील शाखांची आहेत त्याचा या शाखेशी काहीच संबंध नाही.’ पाटील वकील.
‘पण कंपनी एकच ना..’
‘तिथल्या कामाचा अन इथल्या कामाचा काही संबंध नाही...’ पाटीलांनी आपले टुमणे चालूच ठेवले.
थोडा वेळ दोघेही बोके गुरागुरावे तसे एकमेकांवर गुरगुरले. आता जजसाहेबांनी हस्तक्षेप केला.
‘ठीक आहे, ठीक आहे. पण आता प्रतिवादींचे काय म्हणणे आहे ? त्यांना बोलवा.’
प्र. प. वकिलांनी मागे बघून खूण केली. त्याबरोबर मागे बसलेले २-३ गृहस्थ त्यांच्याजवळ जाऊन उभे राहिले. त्यांना कोर्टाने विचारले, ‘तुम्ही तडजोडीला तयार आहात ना ? मग भेटला काय वादीला ?’
त्यांच्यापैकी एक भामट्यासारखा दिसणारा गृहस्थ बोलला. ‘ते साहेब हजर नव्हते हो हापिसात...’
जजसाहेब पाटीलसाहेबांकडे वळले. ‘कुठायेत हो मॅडम ?’
मी खुर्चीतून उठून पुढे गेले अन लाकडी पिंजऱ्यापाशी उभी राहिले.
‘तुम्हीच पाहता ना ही केस ?’ जजसाहेबांनी चष्मा सावरत सवाल टाकला.
‘होय साहेब.’ मी.
‘तुमचे नुकसान झाले आहे ना ?’
‘होय साहेब.’
डिग्रीच्या परिक्षेला जोमाने तयारी करून बसावे अन बिगरीचा प्रश्न पेपरात पडावा तसे मला वाटले.
त्यांनी घड्याळाकडे एक कटाक्ष टाकला. ५ वाजून गेले होते. आता कोर्टात अशिले कुणीच नव्हती अन वकीलही एका हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच राहिले होते.
मग एकदम घाई झाल्यासारखे ते प्रतिपक्षाकडे वळले अन त्यांना म्हणाले, ‘तुम्ही उद्या या मॅडमकडे जा अन त्यांच्या वरिष्ठांच्या सल्ल्याने त्या सांगतील त्याप्रमाणे रक्कम ठरवून घ्या. अन मग परवा मला भेटा.’
अन समोरच्या कागदावर घाईने २ ओळी खरडून त्यांनी दोन्ही वकिलांना नजरेनेच निरोपाचे विडे दिले अन ते लगबगीने चेंबरमध्ये निघून गेले. बहुधा घरच्या कोर्टाने त्यांना वेळेत हजर होण्याची तंबी दिली असावी.
मी अन आमचे वकील तसेच प्रतिपक्ष अन त्यांचे वकील बाहेर आलो. भामटे गृ. त्वरेने माझ्याजवळ आले अन केसबद्दल चर्चा करू लागले. मलाही आता घराचे वेध लागल्याने मी याच्या तावडीतून सुटका कशी करावी हा विचार करू लागले. इतक्यात पाटीलसाहेब माझ्या मदतीला धावले.
‘मॅडम तुम्ही उद्या तुमच्या वरिष्ठांना सांगा कोर्टाचा आदेश आणि मग यांना भेटवा.’
‘बरं.’ मी पडत्या फळाची आज्ञा घेऊन दडादडा कोर्टाची पायरी उतरले अन बाहेरची वाट धरली.

समाप्त.

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (2 votes)

प्रतिक्रिया

हा हा हा!!!
वाटच बघत होतो!
निव्वळ खुसखुशीत.. लय ब्येस!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अप्रतिम! खूपच आवडलं हे लेखन. नुकताच कोर्टात जायचा अनुभव आला आहे त्यामुळे बारकावे खूपच जमले आहेत हे कळतंय. शैली खूपच छान. लिहित जा.

***

नुकतंच कोर्टात गेलो होतो. संध्याकाळी साडेपाचचा सुमार. आम्ही घोळका करून कोर्टाच्या आवारात उभे होते. तेवढ्यात एक पट्टेवाला (तोच तो ... बिनापट्ट्याचा) धावत आला आणि सगळ्यांना हाकलू लागला. आम्ही आपले बावरून बाजूला झालो. ना जाणो एखाद्या जज्जाला राग यायचा... मग आतून एक जज्ज साहेब धीरगंभीर पाऊले टाकत बाहेर आले. आजूबाजूच्या लोकांकडे बघत, त्यांचे नमस्कार नजरेनेच स्वीकारत चालू लागले... मला वाटलं आता पोर्च मधे शोफर ड्रिव्हन गाडी वगैरे येईल... कसलं काय... ते चालत चालत पार्किंग लॉट कडे गेले आणि पटकन एका स्कूटीवर बसून निघून गेले.... कसला अँटिक्लायमॅक्स झाला राव! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बिपिन कार्यकर्ते

लेखन छान.
अवांतर: दिवाणी कोर्टात घटस्फोट! काही गडबड आहे की काय!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बहुधा आमच्या गावासारख्या छोट्या शहरात कोर्टांची संख्या कमी असल्याने दिवाणी व कौटुंबिक दावे एकाच कोर्टात चालत असावेत. जाणकारांनी याबाबत मत दिल्यास बरे होईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कोर्ट वर्गैरे म्हटल्यावर मिरासदारांची 'साक्षीदार' नामक कथा आठवली. तुमची कथा त्यापेक्षा एकदम वेगळीच आहे. वाचायला मजा आली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

कथेतल्या कथानकापेक्षाही वातावरण निर्मिती भारी. अजून असं फर्मास लेखन येऊ द्यात.

काही आवडलेली वाक्यं...

अन ठे. ठु. तरुणी लाकडी पिंजऱ्याजवळ, ‘लाजते, पुढे सरते, फिरते...’ अशा ष्टाइलमध्ये उभी राहिली.

जजसाहेबानी आळीपाळीने दोघांकडे रोखून पाहिले. पण ‘वैचारिक मतभेदा’च्या भिंतीपलीकडचे काहीच दिसेना.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0