आजचा सुधारक – मेंदूविज्ञान विशेषांक (जून-जुलै २०१२)

‘आजचा सुधारक’चा जून-जुलै जोडअंक मेंदूविज्ञान आणि तत्वज्ञान यांना जोडणारे काही विषय आपल्यासमोर आणतो. सुबोध जावडेकर आणि डॉ. आनंद जोशी यांनी अंकाचं अतिथी संपादन केलं आहे. अलीकडच्या काळात मेंदूविषयीच्या मानवाच्या आकलनात पुष्कळ वाढ झाली आहे (तरीही पुष्कळ गोष्टी अजून अज्ञात आहेत).  मानवी जाणीव, भावना किंवा नीतिमूल्यं अशा गोष्टींविषयीच्या आकलनावर अशाच काही ज्ञात गोष्टींचा काय प्रभाव पडतो आहे, आणि परंपरेनं तत्त्वज्ञानाच्या कक्षेत असणाऱ्या काही प्रश्नांकडे पाहण्याची वेगळी दृष्टी त्यामुळे कशी लाभते आहे याचा एक आढावा या अंकात आहे.

‘ब्रेन’ या शब्दाची व्युत्पत्ती आणि त्याचा कालानुक्रमे अर्थविकास कसा झाला त्याचा वेध डॉ. आशुतोष मुळ्ये आणि डॉ. आनंद जोशी यांनी घेतला आहे.
इ.ओ.विल्सन, रेमंड टॅलिस आणि समीर झेकी यांच्या संशोधनाचा आधार घेत मेंदूविज्ञान आणि तत्वज्ञान यांच्यातल्या सामायिक सीमारेषा कोणत्या आहेत ते डॉ. आनंद जोशी यांनी सांगितलं आहे. भारतीय तत्त्वज्ञानात आणि संतविचारांत मेंदूकडे कसं पाहिलं गेलं आहे ते डॉ. आशुतोष मुळ्ये यांनी सांगितलं आहे.

बेंजामिन लिबेट यांनी १९८३मध्ये केलेल्या एका महत्त्वाच्या प्रयोगाचा आधार घेऊन संकल्पस्वातंत्र्य (फ्री विल) याविषयी राजीव साने यांनी आपलं मत मांडलं आहे.  शरीर-मन समस्या (माईंड-बॉडी प्रॉब्लेम) याविषयी भारतीय दर्शनांत काय म्हटलं आहे ते मीनल कातरणीकर यांनी आपल्या लेखात मांडलं आहे. जॉन सर्ल आणि त्यांचा ‘चायनीज रूम’ प्रयोग यांच्या आधारे शर्मिला वीरकर यांनी मानवी आकलन आणि शरीर-मन समस्या यांच्याबद्दल विवेचन केलं आहे; तर एडमंड ह्युसर्ल आणि त्यांचं मानसप्रत्ययशास्त्र यांचा आढावा दीप्ती गंगावणे यांनी घेतला आहे. ब्रिटिश तत्त्वज्ञ गिल्बर्ट राईल यांनी आपल्या ‘कन्सेप्ट ऑफ माईंड’ या गाजलेल्या ग्रंथात मानवी मनाविषयी जे विचार मांडले आहेत त्यांचा परिचय वैजयंती बेलसरे यांनी करून दिला आहे.

तत्त्ववेत्ते जे विचार प्रयोग करतात (Thought experiment) आणि बोधनविज्ञानात (Cognitive Science) वैज्ञानिक जे प्रयोग करतात त्यांच्यात काहीतरी द्वंद्वात्मकता आहे असं अनेक लोक मानतात. याविषयी तामार जेण्डलर यांनी ‘Intuition, Imagination and Philosophical Methodology’ या आपल्या पुस्तकात काय म्हटलं आहे याचा वेध डॉ. आनंद जोशी यांनी घेतला आहे. मेंदूविज्ञान आणि नीतिशास्त्र यांच्या परस्परसंबंधातून निर्माण झालेल्या Neuroethics या शाखेचा परिचय सुबोध जावडेकर यांनी करून दिला आहे. मेंदूविज्ञानातल्या घडामोडींमुळे तत्त्वज्ञानावर काय परिणाम होतो आहे याविषयी पॅट्रिशिया चर्चलँड यांनी लिहिलेल्या एका निबंधाचा अनुवाद अंकात आहे.

याशिवाय खालील पुस्तकांचा परिचय अंकात आहे -

Wisdom: From Philosophy to Neuroscience - Stephen Hall
My Brain Made Me Do It: The Rise of Neuroscience and the Threat to Moral Responsibility
- Eliezer Sternberg
The Brain and the Meaning of Life - Paul Thagard
Braintrust: What Neuroscience Tells Us about Morality - Patricia Churchland

या विषयावरच्या ताज्या घडामोडींविषयी मराठीत लिखाण घडवून आणून 'आजचा सुधारक'नं एक महत्त्वाचं काम केलेलं आहे. या विषयात रुची असलेल्या किंवा त्याविषयी अधिक जाणून घ्यायला उत्सुक असलेल्या मराठी वाचकांसाठी अंक अनेक चांगले संदर्भ एकत्र आणतो. त्यामुळे त्याला संदर्भमूल्य आहे.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

ह्या अंकाची इथे माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. या अंकातल्या वीस लेखांपैकी माझे चौदा वाचून झाले आहेत. प्रत्येक लेख वाचल्यानंतर मनन करावे लागत असल्यामुळे वाचनास वेळ लागतो. एक संग्राह्य अंक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0