उच्चभ्रूंची सद्दी संपली?

गुणवत्ताधारित व्यवस्था (meritocracy) असं म्हटलं की साधारणत: ती चांगली गोष्ट आहे असं मानण्याचा प्रघात आहे. मागासलेल्या लोकसमूहांच्या उन्नयनासाठी विशेष पावलं उचलावी असं म्हणणारे पुरोगामी लोक याला अपवाद असतात, पण कित्येक वर्षं समाजात असणारे जातिभेद किंवा वंशभेद यांसारखे घटक हे शुद्ध गुणवत्ताधारित अशा आदर्श समाजापर्यंत पोहोचण्यातले अडथळे आहेत एवढंच त्यांचं म्हणणं असतं. म्हणजे गुणवत्ता वाईट किंवा हानिकारक आहे असं सहसा त्यांचंही मत नसतं. पण नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका पुस्तकानं असा काहीसा सूर लावल्यामुळे त्याविषयी गरमागरम चर्चा चालू आहेत. Twilight of the Elites हे ते पुस्तक. २०१० साली 'टाईम' मासिकानं ‘येत्या दशकासाठी दहा महत्त्वाचे प्रवाह (ट्रेंड)’ या शीर्षकाखाली ज्या १० कल्पना मांडल्या होत्या त्यातली एक Christopher Hayes यांची ‘Twilight of the Elites’ ही होती. त्यांनीच हे पुस्तक लिहिलं आहे. असं नक्की काय आहे त्या पुस्तकात?

गुणवत्ताधारित व्यवस्था हानी करते आहे हे दाखवण्यासाठी हेज यांनी त्यात इराक युद्ध, सध्याचे आर्थिक घोटाळे किंवा बेसबॉलमधलं स्टेरॉईडसेवन अशी अमेरिकन लोकांच्या जिव्हाळ्याची उदाहरणं घेतली आहेत. उच्चभ्रू लोक हळूहळू सर्वसामान्यांपासून इतके दूर गेले आहेत की सामान्यांच्या आस्थांशी त्यांचा काही संबंधच उरलेला नाही, असं हेज म्हणतात. उदाहरणार्थ, इराकमध्ये युद्ध करण्याचा निर्णय घेणाऱ्यांचे स्वकीय युद्धात लढणार नव्हते, किंवा उत्पन्न नसणारे बेरोजगार इसम हे आर्थिक निर्णय घेणाऱ्यांच्या खिजगणतीतही नव्हते. वास्तवापासून असं दूर गेल्यामुळे उच्चभ्रू लोकांचे निर्णय घातक ठरतात. गेली दहा वर्षं म्हणजे ‘अधिकाराचं गंडांतर’ (crisis of authority) होतं असं हेज म्हणतात. 'Cult of Smartness' असाही शब्दप्रयोग ते करतात. सर्वात हुशार माणूस कोण हे ठरवता येईलच असं नाही, पण ते आलं तरीदेखील असा माणूस त्या कामासाठी सर्वात योग्य असेलच असं नाही, तर त्याची नीतिमानता, इतरांविषयी त्याला असणारी कळवळ हे मुद्देसुद्धा लक्षात घ्यावेत असं ते म्हणतात.

इतरांना कस्पटासमान मानण्याचा आणखी एक परिणाम म्हणजे सतत सगळ्यांना ग्रासणारी असुरक्षितता. समाजाच्या वरच्या १० टक्क्यांमध्ये असणारे लोक वरच्या १ टक्क्यांकडे पाहून असुरक्षित होतात; तर १ टक्क्यामधले लोक .०१ टक्क्यांकडे पाहून असुरक्षित होतात; आणि शेवटी सगळे वॉरन बफेटकडे पाहून असुरक्षित होतात. आपण इतरांहून श्रेष्ठ आहोत ही भावना आणि ही असुरक्षितता यांचा एकत्रित परिणाम फार भयंकर होतो. बँक बुडली तरी चालेल, पण आपल्याला बोनस मिळायलाच हवा; आपण ज्यांचा पुरस्कार करतोय त्या कल्पना हानिकारक असल्या तरी चालतील, पण आपण सारखं लोकांना दिसत राहिलं पाहिजे – अशानं समाजाची हानी होते.

मग याला हेज यांच्या मते उपाय काय? तर करवाढ. ते असं दाखवून देतात की ज्यावेळी सर्वात श्रीमंत लोकांना ७०% कर भरावा लागत असे तेव्हा अमेरिकेची सर्वात अधिक वाढ झाली. त्यांनी सुचवलेले उपाय प्रत्यक्षात परिणामकारक होतील का ते सांगता येत नाही, पण एरवी आपण जी गोष्ट गृहीत धरतो तीत काहीतरी अंतर्विरोध आहेत हे जाणवून देण्यात ते यशस्वी झाले असावेत असं पुस्तकाविषयी अमेरिकेत जे लिहून आलेलं आहे ते वाचून वाटतं. वास्तवापासून दूर गेलेले उच्चभ्रू, त्यांचं इतरांना कस्पटासमान मानणं आणि त्यामागची त्यांची असुरक्षितता यांची रोजच्या आयुष्यात झळ तर अनेकांना बसते आहे. अशानं वैतागलेल्यांना हे पुस्तक नक्कीच वाचावंसं वाटेल. काही उच्चभ्रू लोकांचंही या निमित्तानं या गोष्टीकडे लक्ष जाईल अशी आशा तरी सध्या सर्वसामान्य व्यक्ती करु शकतात का, याविषयी मात्र शंका आहे.

अधिक वाचनासाठी काही दुवे :
http://www.slate.com/articles/arts/books/2012/06/msnbc_host_christopher_...
http://www.forbes.com/sites/stevedenning/2012/06/22/why-our-leaders-are-...
http://www.theatlantic.com/politics/archive/2012/06/the-cult-of-smartnes...

लेखकाची मुलाखत :
http://www.salon.com/2012/06/30/the_age_of_illusion_an_interview_with_ch...

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

उच्चभ्रू आणि गुणवान यात लेखकाची ('माहितगार'ची नव्हे) गल्लत झालेली दिसते. बहुदा लेखक उच्चभ्रू वर्गातच मोडत असावा. तसं असेल तर, त्याची गल्लत झालेली नाही; तो त्याचा विश्वास असावा. असो बापडा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खास मोडक-शैलीतला प्रतिसाद. चार वाक्यात वाभाडे. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

केवळ पुस्तक वाचून खरच बदल शक्य आहेत ऊच्चभ्रूत?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.

रघुराम राजन यांचा एक लेख नुकताच वाचनात आला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

या आधी उच्चभ्रु कोणाला म्हणावे? यावर विचार होणे गरजेचे आहे
केवळ श्रीमंतांबाबत हे विविचन आहे असे वाटत नाही. केवळ पैसे असले कीच उच्चभ्रुपणा येत असावा का? का तो स्वभाव (प्रसंगी दुर्गुण) असावा?
आपल्याकडे(च) काय ती विद्वत्ता किंवा संपत्ती आहे बाकी सारे जग उथळ-सुमार आहे असे समजणार्‍यांना उच्चभ्रु म्हणावे का? आपल्याकडे(च) संपत्ती असली तरी(ही) जग आपल्याकडे कसे दुर्लक्ष करते अशी असुरक्षितता बाळगणार्‍यांना उच्चभ्रु म्हणता येईल? का "खरतर मी कित्ती कित्ती हुश्शार आहे, पण काय आहे ना लोकांची अभिरूचीच उथळ झाली आहे' असं घरातल्या चार भिंतीत म्हणून उसासे टाकणार्‍यांना उच्चभ्रु म्हणावे?

जर अशा सार्‍यांना प्रस्तुत लेखक उच्चभ्रु म्हणत असेल तर त्यांच्यात नैतिकता, आत्मपरिक्षण आदी गोष्टी एखाद्या पुस्तकामुळे येतील असे अज्जिबात वाटत नाही! (किंबहुना अशा पुस्तकांतील विचारांचे खंडन करण्यापेक्षा त्या लेखकावरच मानहानीचा दावा लावून तर्कट लढवत बसण्यात त्यांना अधिक धन्यता वाटेल, तेव्हा क्रीस्टोफर हेज यांनी सावध राहिले पाहिजे)

बाकी उच्चभ्रुंची सद्दी सर्वत्र लोकशाही आल्यापासून संपल्यातच जमा आहे. मात्र स्वतःला कोषात गुरफटून घेतल्याने त्यांना ते जाणवत नाहीये. त्याना कोषातून बाहेर काढायला एकच पुस्तक उपयोगाचे वाटत नाही

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

गुणवत्ताधारित व्यवस्था हानी करते आहे हे दाखवण्यासाठी हेज यांनी त्यात इराक युद्ध, सध्याचे आर्थिक घोटाळे किंवा बेसबॉलमधलं स्टेरॉईडसेवन अशी अमेरिकन लोकांच्या जिव्हाळ्याची उदाहरणं घेतली आहेत. उच्चभ्रू लोक हळूहळू सर्वसामान्यांपासून इतके दूर गेले आहेत की सामान्यांच्या आस्थांशी त्यांचा काही संबंधच उरलेला नाही, असं हेज म्हणतात.

यात काहीतरी गल्लत झाली अाहे असं वाटतं. उदाहरणार्थ, मध्ययुगीन युरोपमध्ये अधिकाराच्या जागा कुणाला मिळाव्या हे 'गुणवत्तेवर' नव्हे तर पारंपारिक वंशाधिकारावर अवलंबून असे. उदाहरणार्थ, इंग्लंडमध्ये राजाचाच मुलगा राजा किंवा प्रतिष्ठित घराण्यातलाच माणूस 'chancellor of the exchequer' होऊ शकतो अशी काहीशी पद्धत होती. (खरंतर तेव्हा जवळजवळ सगळ्या जगातच थोड्याफार फरकाने अशीच परिस्थिती होती.) पण त्यावेळी युद्धे होत नसत किंवा किमान त्यात सामान्यांचे बळी जात नसत, सरकारी पातळीवर अार्थिक व्यवहार फार दृष्ट लागण्यासारखे चालत असत अाणि elites ना सर्वसामान्यांबद्दल अतिशय कळवळा होता अशा काही हेज यांच्या समजुती अाहेत का?

दुसरी बाब अशी की अमेरिका म्हणजे जग नव्हे. इराकशी युद्ध करण्याचा निर्णय, २००८ ची अार्थिक मंदी अशा गोष्टींमागे अमेरिकन समाजाच्या रचनेतून उद्भवणारी कारणं जी काही असायची ती असोत, पण त्यांवरून जागतिक पातळीवरचे निष्कर्ष फारच बाचकतबिचकत काढावे लागतील. वॉशिंग्टनमध्ये एका दुपारी काहीसं झाकोळ अालं तर त्याचा अर्थ सूर्याची उर्जा संपुष्टात अाली असा घेऊन लागलीच 'Twilight of the burning sun' अशा नावाचं पुस्तक खरडून काढणं हे शहाणपणाचं नव्हे.

जर अमेरिकेत 'गुणवत्ताधारित' व्यवस्था असेल तर ती कॅनडात सुद्धा अाहे. (कारण दोन्ही समाजांची ढोबळ रचना सारखीच अाहे.) पण कॅनडाने इराक युद्धात न उतरण्याचा निर्णय घेतला. तर अाता 'गुणवत्ताधारित' पद्धत शहाणपणाची अाहे (अाणि ती नसती तर अापण फुका युद्धात पडलो असतो), असा कॅनेडियन माणसाने त्याचा अर्थ घ्यावा का?

एकूण पाहता हेज यांच्या कल्पनांत काही दम वाटत नाही. उगीच काहीतरी अोढूनताणून वादग्रस्त लिहून, Time अापल्याकडे लक्ष देतो का हे पाहण्याचा हा प्रयत्न वाटतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

मूळ पुस्तक वाचलेलं नाही, पण पुस्तकाविषयीची माहिती वाचली तर पुस्तक काहीसं सनसनाटी किंवा आक्रस्ताळं असण्याची शक्यता दिसते. तरीही -

>>उच्चभ्रू आणि गुणवान यात लेखकाची ('माहितगार'ची नव्हे) गल्लत झालेली दिसते. <<

असं नसावं असा अंदाज आहे. पुस्तकाबद्दल वाचून मला जाणवलेलं लेखकाचं तर्कशास्त्र असं - समाज गुणवत्ताधारित असेल, तर समाजाच्या वरच्या स्तरापर्यंत पोहोचणारे प्रामुख्यानं गुणवत्तेच्या आधारानं वर पोहोचतात. वर पोहोचलेल्यांनाच (किंवा त्यांच्यापैकी काहींनाच) उच्चभ्रू म्हणता येतं. टीप : लेखकाचं तर्कशास्त्र मला पटलं आहे असा निष्कर्ष यातून काढू नये. मी फक्त मोडकांची गल्लत दाखवून द्यायचा नम्र प्रयत्न करतो आहे Wink

>>त्यावेळी युद्धे होत नसत किंवा किमान त्यात सामान्यांचे बळी जात नसत, सरकारी पातळीवर अार्थिक व्यवहार फार दृष्ट लागण्यासारखे चालत असत अाणि elites ना सर्वसामान्यांबद्दल अतिशय कळवळा होता अशा काही हेज यांच्या समजुती अाहेत का? <<

हे कशामुळे वाटलं ते कळलं नाही. लेखक राजेशाही किंवा जमीनदारी व्यवस्थेकडे जा असं म्हणतोय का?

>>दुसरी बाब अशी की अमेरिका म्हणजे जग नव्हे. <<

याच्याशी तंतोतंत सहमत. मात्र आजकाल अमेरिकेकडे आदर्श म्हणून पाहायची भारतात (आणि इतरही देशांत कदाचित) उच्चभ्रू फॅशन असावी असं वाटतं. अपवाद अर्थात डाव्यांचा, पण त्यांचे प्रश्न वेगळे आहेत.

>>जर अमेरिकेत 'गुणवत्ताधारित' व्यवस्था असेल तर ती कॅनडात सुद्धा अाहे. (कारण दोन्ही समाजांची ढोबळ रचना सारखीच अाहे.) पण कॅनडाने इराक युद्धात न उतरण्याचा निर्णय घेतला. तर अाता 'गुणवत्ताधारित' पद्धत शहाणपणाची अाहे (अाणि ती नसती तर अापण फुका युद्धात पडलो असतो), असा कॅनेडियन माणसाने त्याचा अर्थ घ्यावा का?<<

आता इथे मी जे म्हणतोय त्याचा उपरोल्लेखित पुस्तकात काय म्हटलं आहे याच्याशी संबंध असेलच असं नाही : मला वाटतं की या दोन देशांमधला फरक हा कदाचित गुणवत्तेइतकाच समतेला महत्त्व देण्याचा असेल. म्हणजे ज्यातून समाजात विषमता वाढेल अशी धोरणं राबवण्याचा पायंडा जर गुणवत्ताधारित समाजाच्या वरच्या (आणि धोरणं ठरवण्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या मोठा सहभाग असणार्‍या) स्तरानं पाडला नसेल, तर अशी व्यवस्था कदाचित अधिक शहाणपणाची असेल. रेगन (आणि इंग्लंडात थॅचर) काळात अमेरिकेच्या (आणि इंग्लंडच्या) धोरणांत जो दिशाबदल झाला तो समाजात विषमता वाढवणारा ठरला असं म्हटलं जातं. यात नंतर सत्तेवर आलेल्या (अमेरिकेत) डेमोक्रॅट पक्षाची आणि (इंग्लंडमध्ये) 'नव्या' मजूर पक्षाचीही जबाबदारी होती असं ऐकिवात आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

प्रतिसाद संपादित केला आहे. पण तो वाढीव भर देण्यापुरता.

उच्चभ्रू आणि गुणवान यात लेखकाची ('माहितगार'ची नव्हे) गल्लत झालेली दिसते.

असं नसावं असा अंदाज आहे. पुस्तकाबद्दल वाचून मला जाणवलेलं लेखकाचं तर्कशास्त्र असं - समाज गुणवत्ताधारित असेल, तर समाजाच्या वरच्या स्तरापर्यंत पोहोचणारे प्रामुख्यानं गुणवत्तेच्या आधारानं वर पोहोचतात. वर पोहोचलेल्यांनाच (किंवा त्यांच्यापैकी काहींनाच) उच्चभ्रू म्हणता येतं.

इत्यलम्!

टीप : लेखकाचं तर्कशास्त्र मला पटलं आहे असा निष्कर्ष यातून काढू नये. मी फक्त मोडकांची गल्लत दाखवून द्यायचा नम्र प्रयत्न करतो आहे

निष्कर्ष काढलेला नाही. बाकी, मंडळ आभारी आहे. Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मला म्हणायचं (होतं) ते असं की सत्ताधीशांनी अाततायीपणे युद्धात पडणं, अार्थिक गैरव्यवहार करणं, त्यांना सामान्यांबद्दल विशेष फिकीर नसणं हे मानवी इतिहासातले फार जुने रोग अाहेत, तेव्हा अगदी अलिकडेच अालेल्या 'गुणवत्ताधारित' व्यवस्थेवर त्याचं खापर फोडण्यात तथ्य वाटत नाही. उलट यामागे 'गुणवत्ता' असलेल्यांना डिवचून अापल्याकडे लक्ष वेधून घेण्याचा हेतूच जास्त प्रबळ वाटतो.

जर समाजात अार्थिक समता असावी (किंवा निदान विषमता कमी व्हावी) असं हेजना (किंवा इतर कुणाला) म्हणायचं असेल, तर तो वेगळाच मुद्दा अाहे अाणि त्यावर स्वतंत्र चर्चा होऊ शकते. पण 'गुणवत्ताधारित' व्यवस्था बरी की वाईट याच्याशी त्याचा काही थेट संबंध वाटत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

>>मला म्हणायचं (होतं) ते असं की सत्ताधीशांनी अाततायीपणे युद्धात पडणं, अार्थिक गैरव्यवहार करणं, त्यांना सामान्यांबद्दल विशेष फिकीर नसणं हे मानवी इतिहासातले फार जुने रोग अाहेत<<

सहमत. याउलट बहुतेक लोकशाही व्यवस्थांमध्ये सामान्यांच्या परिस्थितीत गुणात्मक वाढ करणं ही सत्ताधार्‍यांची जबाबदारी मानली जाते आणि सत्ताधार्‍यांना आपल्या कृत्यांसाठी उत्तरदायी ठरवण्याचा हक्क जनतेला आणि राज्यव्यवस्थेला दिला जातो. मग ह्या रोगांचं उच्चाटन व्हावं हे अशा व्यवस्थेचं एक ध्येय असावं की नाही? आणि ते असेल तर त्यात येणार्‍या अपयशामागची कारणमीमांसा शोधावी की नाही?

>> तेव्हा अगदी अलिकडेच अालेल्या 'गुणवत्ताधारित' व्यवस्थेवर त्याचं खापर फोडण्यात तथ्य वाटत नाही. <<

'गुणवत्ताधारित व्यवस्था ही सरंजामी व्यवस्थेपेक्षा बरी असते' असं म्हणणार्‍या बर्‍याच जणांना त्यात एक गोष्ट अभिप्रेत असते असं वाटतं. ती गोष्ट म्हणजे 'सरंजामी व्यवस्थेत तुमचा सामाजिक दर्जा हा तुमच्या जन्मानुसार ठरत असे; गुणवत्तेनुसार नाही. यात काहीतरी गैर आहे.' मग आता मुद्दा असा येतो की गुणवत्ताधारित व्यवस्थेनं गुणवत्ताहीन माणसांना निम्न सामाजिक दर्जा द्यावा आणि एक वेगळी उतरंड निर्माण करावी, की सामाजिक समता प्रस्थापित करणं हे एक ध्येय मानावं? जर फक्त वेगळी उतरंडच निर्माण करायची असेल, तर मग सामान्य वकुबाच्या माणसांचं काय करायचं? आणि सामान्य वकुबाच्या माणसांनी (जे बहुसंख्य असतात) अशा व्यवस्थेला पाठिंबा का द्यावा? आपल्या निम्न सामाजिक दर्जाचं खापर त्यांनी या व्यवस्थेवर का फोडू नये?

>>उलट यामागे 'गुणवत्ता' असलेल्यांना डिवचून अापल्याकडे लक्ष वेधून घेण्याचा हेतूच जास्त प्रबळ वाटतो. <<

निव्वळ पुस्तकाविषयी विधान म्हणून पाहता त्यात तथ्य असू शकेल, पण मी इथे उपस्थित केलेल्या मुद्द्यांचा विचार व्हायला हवा असं वाटतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

वेगवेगळ्या संस्थळांवर आजकाल या प्रकारचे धागे बरेच दिसू लागले आहेत.

यात प्रत्येकवेळी उच्चभ्रू म्हणजे पैशाने जड, (तेही बहुधा वारशाने मिळालेले वा "लायकी नसताना" लॉटरीप्रमाणे मिळालेले,) मठ्ठ व परंपरांना चिकटून रहाणारा, त्याच बरोबर स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी इतर("सामान्य") लोकांवर अत्याचार करणारा प्राणी असे अध्यहृत धरलेले दिसते.

जन्माधिष्ठित श्रेष्ठता टिकवून ठेवू पहाणार्‍या वेगवेगळ्या पद्धती जगात सर्वत्र होत्या, (जातिसंस्था आपल्याकडे तशीच सरंजामशाहीत पाश्चिमात्यांतही उतरंड होती, जी जन्माने टिकविली जात असे. अर्थात तिकडे परिस्थिती थोडी बरी असावी.) व त्या पद्धती 'पॉवरफुल' होत्या तोवर अक्कलहुशारीने श्रेष्ठ अश्या व्यक्तीने शक्यतो "श्रीमंत" म्हणजेच 'उच्चभ्रू' वर्गात येऊच नये असा प्रयत्न आढळून येत असे. तरीही अनेक 'अपवर्ड मोबाईल' लोक स्वतःचा प्रवास 'वरच्या' दिशेने करीत व त्यात यशस्वीही होत.

मला पडलेले प्रश्न असे:

१. उच्चभ्रू असण्यात वाईट काय?
२. उच्चभ्रू बनण्याचा प्रयत्न करण्यात चूक काय?
३. आदर्श ठेवण्यासाठी काहीतरी 'वरचे' असावे की नाही?
४. जबरदस्तीने सर्वांना 'सामान्य' किंवा 'समान' करणारा साम्यवाद टिकला का नाही?
५. "The meek shall inherit the earth." हे वचन शापवाणी आहे काय? Mediocre people will rule, असा याचा अर्थ होत नाही काय?
६. काहीही न करता आपोआप उच्चभ्रू बनण्याची सोय (जन्माव्यतिरिक्त) कुठे आहे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

>>१. उच्चभ्रू असण्यात वाईट काय?<<

जोवर त्यातून विषमतामूलक वर्तन होत नाही तोवर काही गैर नाही असं मी म्हणेन. उदाहरणार्थ गणितात उच्च प्रावीण्य मिळवणारा जोवर गणितात ढ असलेल्यांकडे तुच्छतेनं पाहात नाही तोवर त्याचं गणितात उच्चभ्रू असणं काही वाईट म्हणता येणार नाही.

>>२. उच्चभ्रू बनण्याचा प्रयत्न करण्यात चूक काय?<<

मूलतः काही चूक नाही पण साधनशुचिता पाळली जाईल तोवरच, असं म्हणता येईल का? उदाहरणार्थ, बापानं कमावलेल्या पैशाच्या जोरावर रग्गड कॅपिटेशन फी भरून डॉक्टर झालेला आणि त्याच पैशाच्या जोरावर मोठं हॉस्पिटल उभं करून रग्गड पैसा कमावणारा डॉक्टर आपल्या गावात लब्धप्रतिष्ठित आणि म्हणून उच्चभ्रू समजला जाऊ शकेल. उच्चभ्रू बनण्याचा असा प्रयत्न आणि अंगभूत गुणांच्या जोरावर हेच स्थान मिळवण्याचा प्रयत्न यांत गुणात्मक फरक आहे असं मानता येईल का?

>>३. आदर्श ठेवण्यासाठी काहीतरी 'वरचे' असावे की नाही?<<

असावं. फक्त इतरांना लाथा मारून 'वर' चढणं याला आदर्श मानू नये.

>>४. जबरदस्तीने सर्वांना 'सामान्य' किंवा 'समान' करणारा साम्यवाद टिकला का नाही?<<

'वरचे काहीजण' सोडून इतरांना कस्पटासमान बनवणारी वर्गव्यवस्था त्यातही होती. त्यामुळे सर्वजण सामान्य झालेच नाहीत. हे त्याच्या नाशाचं कारण होतं असं मी म्हणत नाही; फक्त त्या व्यवस्थेतदेखील समानता नव्हतीच, एवढंच मी म्हणतो आहे.

>>५. "The meek shall inherit the earth." हे वचन शापवाणी आहे काय? Mediocre people will rule, असा याचा अर्थ होत नाही काय?<<

ही शापवाणी आहे असं मानलं तर मग त्याचा व्यत्यास हा ज्या व्यवस्थेत माणसाला डोक्यावर मैला वाहून न्यावा लागतो, त्या व्यवस्थेचं समर्थन आहे असं मानता येईल का? कारण असा माणूस मीक असतो.

>>६. काहीही न करता आपोआप उच्चभ्रू बनण्याची सोय (जन्माव्यतिरिक्त) कुठे आहे?<<

कल्पना नाही, पण स्वतःला उच्चभ्रू मानणारे लोक रोज दिसत असतात. त्यातले सर्वचजण जन्मतःच उच्चभ्रू नसावेत. म्हणजे त्यांनी किमान इतरांना लाथा तरी मारल्या असाव्यात.

सारांश : गुणवत्ताधारित व्यवस्था आणि समताधारित व्यवस्था यांच्यात काही द्वंद्वात्मकता आहे; कोणत्याही एकीचा अतिरेक हा समाजाला घातक असतो आणि तरीही त्या परस्परविरोधी आहेत असं मानणं हेदेखील एकारलेलं आणि घातकच ठरतं असं एकंदरीत म्हणता येईल का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

@ चिंजं.

>>२. उच्चभ्रू बनण्याचा प्रयत्न करण्यात चूक काय?<<

मूलतः काही चूक नाही पण साधनशुचिता पाळली जाईल तोवरच, असं म्हणता येईल का? उदाहरणार्थ, बापानं कमावलेल्या पैशाच्या जोरावर रग्गड कॅपिटेशन फी भरून डॉक्टर झालेला आणि त्याच पैशाच्या जोरावर मोठं हॉस्पिटल उभं करून रग्गड पैसा कमावणारा डॉक्टर आपल्या गावात लब्धप्रतिष्ठित आणि म्हणून उच्चभ्रू समजला जाऊ शकेल. उच्चभ्रू बनण्याचा असा प्रयत्न आणि अंगभूत गुणांच्या जोरावर हेच स्थान मिळवण्याचा प्रयत्न यांत गुणात्मक फरक आहे असं मानता येईल का?

यात आपण 'बापाने कमविलेले पैसे' म्हणजे बाप उच्चभ्रू आहे, ती उच्चभ्रूता बापाने 'कमविलेली आहे' हे मान्य करीत आहात. मुलगा जन्माने उच्चभ्रू आहे, सो माझ्या युक्तीवादाच्या दृष्टिने 'यूसलेस' आहे. जाती संस्था किंवा तत्सम जन्माने उच्चभ्रू हे कालांतराने 'टिपिकल' उच्चभ्रू होतात जसे मी मूळ प्रतिसादात लिहिले आहेत.

>>३. आदर्श ठेवण्यासाठी काहीतरी 'वरचे' असावे की नाही?<<
असावं. फक्त इतरांना लाथा मारून 'वर' चढणं याला आदर्श मानू नये.

महोदय,
पायरी चढताना तिच्यावर पाय ठेवावाच लागतो. पाय न ठेवता वर कसे चढावे? वर चढण्याची ताकत असताना केवळ तो चढला म्हणजे इतरांना त्याने लाथा मारल्या असा अर्थ होतो काय?

>>५. "The meek shall inherit the earth." हे वचन शापवाणी आहे काय? Mediocre people will rule, असा याचा अर्थ होत नाही काय?<<

ही शापवाणी आहे असं मानलं तर मग त्याचा व्यत्यास हा ज्या व्यवस्थेत माणसाला डोक्यावर मैला वाहून न्यावा लागतो, त्या व्यवस्थेचं समर्थन आहे असं मानता येईल का? कारण असा माणूस मीक असतो.

प्रत्येक गोष्टीचा व्यत्यास सत्यच असतो असे नाही. मला हार्ट अ‍ॅटॅक आला याचा अर्थ तुम्हाला तो आला नाही असा होत नाही. तुम्हालाही आलेला असू शकतो. 'रूल' करणे. इतरांना मार्गदर्शन करणे, काही नवे करून दाखविणे यासाठी सर्वसामान्य चालून जातात काय? प्रत्येक निर्णय १३० कोटी लोकांच्या मतदानातून घेतला तर कसे होईल? कुणीतरी तो निर्णय घेण्याची गरज आहे, अन तो घेणारा 'एलिट' असावा अशी अपेक्षा माझी तरी आहे. याबद्दल आपले काय म्हणणे आहे?

(संपादन २.)
असा माणूस मीक च असतो असे नाही.
जडभरताची कथा आठवली. मैला वाहून नेण्यास त्याला जन्माधारित उच्च-नीचतेच्या कल्पनांनी भाग पाडले आहे. त्याची क्षमता व इच्छा उदा. क्वांटम फिजिक्स मधे क्रांती घडविण्याची असली, तर त्याला ती उच्चभ्रूता गाठण्याची इन्स्पिरेशन मिळायला हवी की नको? त्याने ती लेव्हल गाठली, तर त्याने इतर मैला वाहकांच्या डोक्यावर पाय ठेवून प्रगती केली असे म्हणावे काय?

>>६. काहीही न करता आपोआप उच्चभ्रू बनण्याची सोय (जन्माव्यतिरिक्त) कुठे आहे?<<

कल्पना नाही, पण स्वतःला उच्चभ्रू मानणारे लोक रोज दिसत असतात. त्यातले सर्वचजण जन्मतःच उच्चभ्रू नसावेत. म्हणजे त्यांनी किमान इतरांना लाथा तरी मारल्या असाव्यात.

पुन्हा तेच. For me to be good, it HAS to be at the expense of others??? why? how? my own efforts dont matter at all? what kind of logic is that? मी एकलव्य आहे तो माझ्या प्रयत्नांवर? किंवा अर्जून आहे तोही माझ्याच प्रयत्नांवर. इथे इतरांना लाथा मारण्याचा काय संबंध?

सारांश : गुणवत्ताधारित व्यवस्था आणि समताधारित व्यवस्था यांच्यात काही द्वंद्वात्मकता आहे; कोणत्याही एकीचा अतिरेक हा समाजाला घातक असतो आणि तरीही त्या परस्परविरोधीच आहेत असं मानणं हेदेखील एकारलेलं आणि घातकच ठरतं असं एकंदरीत म्हणता येईल का?

सारांशः गुणवत्ता स्वयंभू असते. अन नसतेही. ती प्रयत्नांनी मिळविता येते. गुणवान नसणार्‍यांना/गुणवत्ता मिळविण्याचा प्रयत्न करण्याची इच्छा नसलेल्या आळश्यांना गुणवत्तेचा हेवा नेहेमीच वाटत आलेला आहे. गुणवत्तेचे ढोंग करणारे अनेक आहेत. त्यांचीच उदाहरणे देऊन गुणवत्तेला कमी लेखण्यात येते. यामुळे कष्टाने गुणवत्ता मिळवावी या इच्छेस छेद जातो असे मला वाटते.
'लुळ्यापांगळ्या श्रीमंतीपेक्षा धट्टीकट्टी गरीबी बरी' असली वाक्ये पुन: कर्मविपाका सारखीच तुम्ही आहात तिथेच रहा, Do NOT aspire to better your lot या प्रकारचे तत्वज्ञान सांगतात. अन त्याहूनही वाईट म्हणजे, जे अधिक सक्षम/उच्चभ्रू आहेत त्यांना केवळ त्यांची संख्या कमी असल्याने कमी लेखण्याचे शिक्षण देतात.
सबब, उच्चभ्रूंना हुच्चभ्रू म्हणून हिणवताना, स्वतः नीचभ्रू आहोत, हे मान्य करावे, इतकेच.

टीपः मुद्दा. क्र. १ व ४ यांबाबत मुद्दाम लिहिले नाही. वेगळा विषय निघेल म्हणून. इतरत्र/इथेच वेगळी चर्चा करू शकतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

>>वर चढण्याची ताकत असताना केवळ तो चढला म्हणजे इतरांना त्याने लाथा मारल्या असा अर्थ होतो काय?<<

असं माझं अजिबातच म्हणणं नाही. साधनशुचिता मानावी का, एवढाच प्रश्न आहे. आणखी स्पष्टीकरण खाली पाहा.

>>प्रत्येक गोष्टीचा व्यत्यास सत्यच असतो असे नाही. <<

सहमतच आहे. फक्त तुम्ही आधी The meek shall inherit the earth पासून "Mediocre people will rule, असा याचा अर्थ होत नाही काय?" असा प्रश्न विचारला होता म्हणून अशी मांडणी करावी लागली. मुद्दा तुम्हाला मान्यच आहे म्हणता तर मग ठीक.

>>जडभरताची कथा आठवली. मैला वाहून नेण्यास त्याला जन्माधारित उच्च-नीचतेच्या कल्पनांनी भाग पाडले आहे. त्याची क्षमता व इच्छा उदा. क्वांटम फिजिक्स मधे क्रांती घडविण्याची असली, तर त्याला ती उच्चभ्रूता गाठण्याची इन्स्पिरेशन मिळायला हवी की नको? त्याने ती लेव्हल गाठली, तर त्याने इतर मैला वाहकांच्या डोक्यावर पाय ठेवून प्रगती केली असे म्हणावे काय?<<

याच्याशीही सहमत आहे. फक्त हेही लक्षात घ्यायला हवं की जगात फार थोडे लोक क्वांटम फिजिक्समध्ये क्रांती घडवू शकतात. जगातले बहुसंख्य लोक सामान्य वकुबाचे असतात ही वस्तुस्थिती आहे. त्यांना सन्मानानं जगता यावं यासाठी (उच्चभ्रू बनता यावं यासाठी नाही) प्रस्थपित उच्चभ्रूंनी व्यापलेल्या व्यवस्थेनं झटावं की नाही, एवढाच प्रश्न आहे.

>>For me to be good, it HAS to be at the expense of others??? why? how? my own efforts dont matter at all? what kind of logic is that? मी एकलव्य आहे तो माझ्या प्रयत्नांवर? किंवा अर्जून आहे तोही माझ्याच प्रयत्नांवर. इथे इतरांना लाथा मारण्याचा काय संबंध? <<

'सर्वचजण जन्मतःच उच्चभ्रू नसावेत. म्हणजे त्यांनी किमान इतरांना लाथा तरी मारल्या असाव्यात.' हे माझं विधान फक्त तुमच्या 'आपोआप उच्चभ्रू बनण्याची सोय (जन्माव्यतिरिक्त) कुठे आहे?' या प्रश्नाला उत्तर होतं. याचा अर्थ 'प्रत्येक उच्चभ्रू इतरांना लाथा मारतो' असा नसून 'काही उच्चभ्रू तसं करतात' असा आहे. त्यामुळे 'कुणाचेच प्रयत्न उपयोगी पडत नाहीत' वगैरे सरसकट आणि ढोबळ अर्थ त्यातून काढू नयेत आणि त्रागा करून घेऊ नये, ही विनंती.

>>गुणवत्तेचे ढोंग करणारे अनेक आहेत. त्यांचीच उदाहरणे देऊन गुणवत्तेला कमी लेखण्यात येते. यामुळे कष्टाने गुणवत्ता मिळवावी या इच्छेस छेद जातो असे मला वाटते.
'लुळ्यापांगळ्या श्रीमंतीपेक्षा धट्टीकट्टी गरीबी बरी' असली वाक्ये पुन: कर्मविपाका सारखीच तुम्ही आहात तिथेच रहा, Do NOT aspire to better your lot या प्रकारचे तत्वज्ञान सांगतात. अन त्याहूनही वाईट म्हणजे, जे अधिक सक्षम/उच्चभ्रू आहेत त्यांना केवळ त्यांची संख्या कमी असल्याने कमी लेखण्याचे शिक्षण देतात.
सबब, उच्चभ्रूंना हुच्चभ्रू म्हणून हिणवताना, स्वतः नीचभ्रू आहोत, हे मान्य करावे, इतकेच.<<

'गुणवत्ताधारित व्यवस्था आणि समताधारित व्यवस्था यांच्यात काही द्वंद्वात्मकता आहे; कोणत्याही एकीचा अतिरेक हा समाजाला घातक असतो. आणि तरीही त्या परस्परविरोधीच आहेत असं मानणं हेदेखील एकारलेलं आणि घातकच ठरतं' या माझ्या आधीच्या विधानाला ही विधानं पोषक आहेत. त्यामुळे अधिक काही न बोलता इथेच थांबतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||