शिंपी समाजाचा इतिहास

शिंपी. जगाची अब्रू झाकणारा समाज. या समाजानं घडवला एक संत. ज्यानं कपड्यांचे तुकडे जोडता जोडता तुकड्या तुकड्यांमध्ये विखुरलेला समाज जोडला. प्रेमाच्या धाग्यांनी घट्ट शिवला. देशभर फिरून त्यानं ज्ञानाचा दिवा लावला. म्हणून संत नामदेव हेच नाव या समाजानं अभिमानानं आणि भक्तिभावानं धारण केलं. कोणत्या सामाजिक पार्श्वभूमीतून नामदेवांनी एवढं मोठं काम केलं, ते समजण्यास मदत होईल असा हा शिंपी समाजाचा इतिहास. सांगताहेत ज्येष्ठ सामाजिक इतिहासकार संजय सोनवणी.

वस्त्रांशिवाय माणसाची आपण कल्पनाच करु शकत नाही. आदिम काळात, म्हणजे सरासरी एक लाख वर्षांपूर्वीच माणूस चामडं आणि वल्कलांचा उपयोग वस्त्र म्हणून करु लागला. मनुष्याला अन्य प्राण्यांसारखी हवामानाला तोंड देता येतील अशी नैसर्गिक देणगी नसल्याने त्याला
अंगरक्षणासाठी वस्त्रांची गरज भासणे स्वाभाविक आहे. चामड्याचा उपयोग करुन तो कृत्रिम निवारेही बनवायला शिकला. निवारे बनवण्यासाठी चामड्याचे अनेक तुकडे जोडणे आवश्यक होतं. त्या गरजेपोटीच त्याने अत्यंत तीक्ष्ण आणि पातळ अशा सुया चक्क दगडांपासून, हाडांपासून बनवल्या. त्यामुळे शिवणकाम सुलभ झाले.
कठीण पाषाणांपासून मनुष्य हत्यारे बनवायला लाखो वर्षांपूर्वीच शिकला होता. आता अशा दर्जेदार सुया बनवेपर्यंत त्याने जी प्रगती केली ती नक्कीच विस्मयकारक आहे. अशा अनेक दगडी (गारगोटी) सुया फ्रान्समधील सोलुटर या प्रागैतिहासिककालीन (इसपू२२०००) स्थानावर सापडल्या आहेत. या सुयांच्या अग्रभागी आजच्या सुयांना असतात तशी भोकेही होती हेही विशेष. यातूनच मनुष्य स्वत:साठी वस्त्रेही शिवायलाही शिकला. हे शिवणकाम करण्यासाठी दोरा म्हणून अर्थातच चामड्याच्या पातळ वाद्या वापरल्या जात. हे प्राथमिक दर्जाचे कातडी कपडे होते. त्यामुळे त्याच्या हालचालीही सोप्या झाल्या. थोडक्यात माणसाने शिवणकलेचा शोध चाळीस-पन्नास हजार वर्षांपूर्वीच लावला होता, असे अनुमान काढता येऊ शकते.
मनुष्याने वनस्पती धाग्यांचे म्हणजे ताग, प्यपिरस इत्यादींचे वीणकाम करत त्यांचा उपयोग वस्त्रांसाठी सुरु केला तोही याच समांतर कालात. जॉर्जिया आणि झेकोस्लाव्हाकिया येथे विणलेल्या वस्त्रांचे २० ते २८ हजार वर्ष एवढे जुने पुरावे मिळाले आहेत. लोकरीचाही उपयोग वस्त्रांसाठी याच काळात सुरु झाल्याचे उपलब्ध पुरातत्वीय पुराव्यांवरुन दिसते.
भारतातील शिवणकलेचा इतिहासही जागतिक इतिहासाच्या जवळपास समांतर जातो. भारतात अग्रभागी टोक असलेल्या सुया सापडल्या नसल्या. तरी धारदार आणि पातळ टोचण्या मात्र सापडल्या आहेत. अगदी महाराष्ट्रातील सावळदा, इनामगांव आदि ठिकाणीही त्या सापडल्या आहेत. पण भारतीयांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी कापसापासून सुती वस्त्रे बनवण्याची साध्य केलेली कला. परदेशी प्रवाशांनी भारतात झाडांना लोकर येते असे नमूद करुन ठेवले आहे. कारण त्यांना कापूस माहीत नव्हता. हिरोडोटसने भारतीय तलम कपड्यांची मुक्त कंठाने प्रशंसा केली आहे.
सिंधु संस्कृतीत पुरातन विणलेल्या वस्त्रांचे अवशेष सापडले आहेत. वैदिकजन मात्र लोकरीपासूनच बनवलेली वस्त्रे वापरत असत, असेही ऋग्वेदावरुन दिसते. भारतातून सिंधू काळापासूनच सूत कातणे, विणणे या कला विकसित होवून त्यांची मोठ्या प्रमाणावर निर्यातही होत असे. या काळात शिवणकला माहीत होती, असे ऋग्वेदातील २.३२.४ या ऋचेवरुन दिसते. तो उपयोग फक्त स्त्रियांसाठी कंचुकीसदृश चोळी शिवण्यासाठी केला गेला असावा, असे अनुमान आहे. पण त्याबाबत ठोस असे काही सांगता येत नाही. पण जातक कथांतून इसपू ६००मध्ये स्त्रिया या शिवलेल्या कंचुक्या वापरत असत. त्यांना बाह्या असत पण गुंड्या नसत. कंचुकीच्या पुढील काळात वेगवेगळ्या फॅशन आल्या तरी त्या मर्यादित वर्गापुरत्याच होत्या असे दिसते.
भारतातील समशितोष्ण हवामानामुळे शिवलेली वस्त्रे वापरण्याची प्रथा जवळपास नव्हती. कमरेभोवती वा संपूर्ण शरीरभर विशिष्ट पद्धतीने गुंडाळलेले वस्त्रे हीच भारतीयांची जवळपास काही हजार वर्षे वेशभूषा राहिली. शिवलेल्या वस्त्रांशी भारतीयांचा परिचय झाला तो आधी ग्रीक आणि पुढे कुशाणांमुळे. परंतु त्यांचे विशेष अनुकरण देशात झाले नाही. जी वस्त्रे शिवली जात ती घरगुती पातळीवर. या काळात भारतीय स्त्रियाही शिवलेल्या कंचुकी (चोळी) तर पुरुष कंचुक (पायघोळ चोगा) परिधान करु लागले. अर्थात ते फक्त उच्चभ्रू समाजापुरतेच मर्यादित राहिले. विदेशी लोकांमुळे भारतात नव्या वेशभूषांची फॅशन आली एवढे मात्र खरे. शिवणकला ही आधी स्त्रियांचीच मक्तेदारी होती असेही इतिहासावरुन दिसते. आपल्या कंचुक्या स्त्रिया स्वत:च शिवत.
महाराष्ट्रात गाथा सप्तशतीवरुनही स्त्रिया शिवलेल्या चोळ्या सर्रास वापरत, असे पुरावे मिळतात. पुरुषांचा वेष मात्र बराच काळ परंपरागत,न शिवलेला असाच राहिला. बौद्ध भिक्षू मात्र संघाटी नामक शिवलेला अंगरखा वापरु लागले होते. त्याचेच रुपांतर पुढे कंचुक या पायघोळ सद-यात झाले जे अनेक पुरुष वापरू लागले. असे असले तरी सामान्य प्रजेच्या परंपरागत वेषभूषेत फारसा फरक पडला नाही. पण सातव्या-आठव्या शतकाच्या दरम्यान भारतीय हवामानाला साजेशा बंड्या, बाराबंद्या आणि कोप-या या नवीन फॅशन पुढे आल्या. नवजात मुलांसाठी अंगडी-टोपडीही आली. या नव्या फॅशन्स लोकप्रिय होऊ लागल्या. हे कपडे शिवण्यासाठी विशेष कौशल्याची गरज भासू लागली. त्यामुळे या शिवणकलेत विविध जातींतील तरबेज लोकांनी प्रवेश केला.
दहाव्या शतकाच्या आसपास शिवणकाम करणा-यांची स्वतंत्र जातच बनू लागली. भारतात शिंपी ही तशी अर्वाचीनकाळात उदयाला आलेली तुलनेने अत्यंत नवीन जात आहे. पंढरपूर येथील चौ-यांशीच्या लेखात (सन ११९५-९७) शिंप्यांचा स्पष्ट उल्लेख मिळतो. यावरुन महाराष्ट्रात तोवर शिंपी जात स्थिरस्थावर झाली होती असे दिसते. नामदेव महाराजांचा जन्म सन १२७० चा आहे. म्हणजेच तोवर शिंपी जात महाराष्ट्राच्या समाजजीवनात चांगलीच रुळलेली असणार आहे.
या जातीत अहीर, भावसार (बाहुसार), चतुर, मराठा अशा अनेक पोटजाती पडल्या. या पोटजाती त्यांचे मूळ जाती किंवा कूळस्वरुप (म्हणजे मुळात ते ज्या जातीचे वा कुळाचे होते) स्पष्ट करतात. संत नामदेव महाराजांमुळे नामदेव शिंपी ही एक स्वतंत्र पोटजात बनली. शिंपी समाजात जैन, लिंगायत आणि मुस्लिमही आढळतात. शिंपी हे त्या काळात तीन प्रकारची कामे करत. कपडे विकणे, रंगवणे आणि शिवणे. पुढे त्यातूनच रंगारी ही स्वतंत्र जात बनली. मुस्लिम पद्धतीच्या पोषाखांची लाट महाराष्ट्रात खूप उशिरा म्हणजे पंधराव्या शतकानंतर आली.
कपड्याच्या व्यवसायात येण्यापूर्वी शिंपीमंडळी पशुपालन (अहीर), शेती (मराठा, चतुर), कपड्यांचा व्यापार (बाहुसार), वस्त्रे रंगवणे आदि व्यवसायात होतीच. त्यामुळे शिंपिकाम स्वीकारले तरी मूळचे व्यावसायही कमीअधिक प्रमाणात सुरूच राहिले. या मंडळींची शेतीही असे, असे दिसून येते. या व्यवसायत स्थिरता येताच पुढे त्यांनी शेती स्वत: न कसता कुळांना खंडाने देण्याची पद्धत सुरू झाली. नामदेव महाराजांनी एकाठिकाणी स्वतःला कीर्तन कुळवाडी म्हणजे शेतकरी म्हटले आहे. हा संदर्भ महत्त्वाचा मानायला हवा.
तत्कालीन शिंपी समाज हा ब-यापैकी सधन होता असे अनुमान काढता येते. तत्कालीन शिंपी हे कापड विकण्याचे आणि तेच शिवून देण्याचेही काम करत. असल्यामुळे त्यांच्याकडे आर्थिक बरकत असणे स्वाभाविक मानता येते. शिंप्यांना ‘शेठ’ (शेट/शेटी) ही उपाधी लावली जात असे. आजही त्यात फारसा बदल झालेला नाही. विशेषतः खान्देशात तर शिंपी एकमेकांना ‘शेठ’ म्हणूनच संबोधताना आढळतात. संत नामदेवांच्या पूर्वजांना शेट किंवा शेटी ही उपाधी असल्याचं संतांच्या अनेक अभंगांतूनच दिसून येतं.
गोणाई दामासेठी जाले पाणिग्रहण। संसारी असोन नरसी गावी ।।
दामशेटी हरुषिला । दासी जनीने ओवाळीला ।। ( संत जनाबाई)
द्वारकेहुनि विठू पंढरीये आला । नामयाचा पूर्वज दामशेटी वहिला।। ( संत एकनाथ)
नामदेवांच्या कुटुंबाचे मूळपुरुष यदुशेटी. त्यापुढच्या पिढ्या म्हणजे हरिशेटी, गोपाळशेटी, गोविंदशेटी, नरहरीशेटी या सगळ्यांच्या नावापुढे शेटी ही उपाधी आहेच. म्हणजे काही पिढ्यांची सधनता या कुटुंबात निश्चितपणे दिसून येते. नामदेवाचे वडील दामाजींनाही दामा’शेटी’ ही उपाधी होतीच.
नामदेवांनी आपला जन्म शिंपी कुळात झाल्याचे स्पष्टपणे नोंदवले आहे. त्यामुळे त्यांच्या जातीविषयी अन्य काही संतांप्रमाणे वाद नाही. ते जीवनभर हाच व्यवसाय करत असावेत असेही अनुमान या अभंगावरून करता येते,
सिंपियाचे कुळीं जन्म मज जाला।
परि हेतू गुंतला सदाशिवी ।।
रात्रिमाजीं सिवी दिवसामाजी सिवी ।
आराणूक जीवी नोव्हे कदा ।।
सुई आणि सुतळी कात्री गज दोरा ।
माडिला पसारा सदाशिवी ।।
नामा म्हणें सिवी विठोबाची अंगी ।
म्हणोनियां जगी धन्य जालों ।।
या प्रसिद्ध अभंगात नामदेव आपल्या जातीचा कुळाचा उल्लेख अभिमानाने करताना आढळतात. हिंदीतही नामदेवांच असंच एक पद आहे,
सीवणा सीवणा सीऊ सीऊ। रामबिना हूँ कैसे जीऊँ।।
अनंत नामका सिऊ बागा। जा सीवत जमका डर भागा।।
सुरतकी सुई प्रेमका धागा। नामेका मन हरिसी लागा ।।
हीच परंपरा फक्त वारकरीच नाही तर देशभरातल्या अन्य संतांनीही पुढे चालवल्याचे दिसून येते. त्यातून त्या त्या समाजाचा जातिविषयक न्यूनगंड दूर करण्याचे काम झाले. असे असले तरी शिंपी समाज हा ‘यातिहीन’, ‘शूद्र’ असाच मानला गेला होता. ‘कहां करू जाती, कहां करू पाती’ असं जातींच्या पलीकडे गेलेल्या नामदेवांनाही जातिभेदाचे चटके भोगावे लागलेच. त्यामुळे नामदेवांनीही विठ्ठलाला साकडे घातलाना आपल्या जातीचा उल्लेख केलेले हिंदी पद प्रसिद्ध आहे,
हीन दीन जाती मोरी पंढरीके राया।
ऐसा तुमने नामा दरजी कू बनाया ।।
उत्तम व्यवसाय, सधनता आणि विठ्ठलाला नैवेद्य देण्याच्या अधिकाराएवढे सामाजिक वजन असूनही त्यांना जातीवरून बोलणी खावीच लागली. पुढे नामदेवांचे परमभक्त झालेल्या परिसा भागवतांनी नामदेवांची जातीवरून केलेली टवाळी अभंगातून मांडून महत्त्वाचा सामाजिक दस्तऐवजच ठेवला आहे. ‘तू शिंपी नामा, आम्ही उत्तम याति’ असं परिसा भागवतांकडून नामदेवांना ऐकून घ्यावे लागले होते. हा ज्ञानाचा दुजाभाव होता. ज्ञानाच्या क्षेत्रात नामदेवांनी मारलेली मुसंडी तत्कालीन उच्चवर्णींयांना सहन होताना दिसत नाही. पण त्यांना नामदेव सोडत नाहीत. आपल्या अभंगातून सरळ उत्तर देतात,

वेश्या होती तेचि पतीव्रता जाली।
मागील ते बोली बोलों नये।।
विष्णुदास नामा विठ्ठली रंगला।
तो शिंपी वहिला म्हणो नये।।

याच आशयाचा आणखी एक अभंग आहे

काकविष्टेमाजी जन्मे तो पिंपळ।
तया अमंगळ म्हणो नये।।
नामा म्हणे तैसा जातीचा मी शिंपी।
उपमा जातीची देऊ नये।।

नामदेवांचे घराणे श्री विठ्ठलाचे अनन्यसाधारण भक्त होतेच. पंढरपूरला असताना विठ्ठलाचा नैवद्य दाखवण्याची जबाबदारी या घराण्याकडेच होती. यातून एक तर्क निघतो तो म्हणजे एक तर अद्याप वारीची परंपरा सुरु झाली नव्हती. विठ्ठल मंदिर तोपर्यंत बडव्यांच्या ताब्यात गेले नव्हते. त्यामुळेच नामदेवांना ज्ञानेश्वरांना भेटण्यासाठी १२९१ च्या आसपास त्यांना आळंदीला जावे लागले. वारीची परंपरा आधीपासून असती आणि ज्ञानेश्वरादी संत जर वारकरी असते तर त्यांची भेट पंढरपुरीच झाली असती. समजा वारीची परंपरा पूर्वापार असेल तर यातून निघणारा दुसरा अर्थ असा की, मग ज्ञानेश्वर हे वारकरी संप्रदायाचे नव्हते. ते पंढरपुरी त्यामुळेच कधी गेले नव्हते. ज्ञानेश्वर हे मूळचे नाथसंप्रदायी होते हे त्यांच्याच अमृतानुभवावरुन स्पष्ट दिसते. त्यामुळे वारकरी संप्रदायाचे आद्य जनक आणि आद्य संत नामदेव महाराजच ठरतात. संत ज्ञानेश्वर समजा जर नंतर वारकरी संप्रदायात प्रवेशले असले तरी ते केवळ नामदेवांमुळेच, असे त्यांच्या जीवनातील कल्पित कथा दूर सारुन पाहिले असता स्पष्ट होते. भागवत धर्माची ध्वजा देशभऱ नेण्याचे अचाट कार्य नामदेवांनी केले. फक्त शिंपी समाजालाच नव्हे तर संपूर्ण मानवजातीला अभिमान वाटेल असे हे कार्य!

द्न्यानेश्वर व नामदेवांच्या भेटीबाबत वा अगदी उभयतांच्या उत्तर भारत-भ्रमणाबाबत माहिती देणारे जे आत्मचरित्रात्मक अभंग आदी या नांवाने प्रसिद्ध आहेत तेच मुळात उत्तरकाळात कोणीतरी अन्य व्यक्तीने लिहिलेले आहेत हे आता सिद्ध झालेले आहे. आदीमद्धे अगदी नामदेवांनंतरच्या संतांचीही नांवे यतात त्यामुळे ते अभंग नामदेवांनी लिहिले असनणे शक्य नाही.

नामदेव स्वत: सं<त होते एवढेच नव्हे तर चोखा मेळा, कर्म मेळा, जनाई, सोयराबाई अशा अनेक संतांनाही त्यांनी घडवले. चोख मेळ्याला अस्पृष्य मानले जात होते याचा एकही पुरावा नाही. चोख्यअ मेळ्याचा "बडवे मज मारिती..." वगैरे जे काही अस्पृश्यता दर्शक अभंग आहेत ते उत्तरकाळात कोणीतरी घुसवले असावेत अशी दाट शंका यावी अशी परिस्थिती आहे. या अशा घालघुसडवाल्यांपासुन कोणताही संत...अगदी द्न्यानेश्वर...तुकारामही सुटलेले नाहीत. असो.

नामदेवांच्या घराण्याचे मूळ गाव रिळे. ते सांगली जिल्ह्याच्या शिराळे तालुक्यात आहे. शिराळे गावच्या पश्चिमेकडून बिळाशी रस्त्यावर रिळे नावाचे गाव आहे. नामदेवांचा मूळपुरुष यदुशेट याच ठिकाणी वास्त्यव्याला होता, असे मानले जाते. यादवांचे साम्राज्य असताना मराठवाडा परिसर समृद्ध होता. सगळा व्यापारउदीम तिथे एकवटला होता. अशाकाळात यदुशेटींचे कूळ आजच्या हिंगोली जिल्ह्यातल्या नरसी गावी गेले. पुढे दामाशेटी कुटुंबासह पंढरपुरात आले. त्यामुळे त्या काळात क्वचितच आढळणारी स्थित्यंतरे या घराण्यात आढळतात. या घराण्यात व्यापारानिमित्त प्रवास असल्यामुळेच हे शक्य झाले आहे. एखाद्या स्थिर शेतकरी जातीत नामदेवांचा जन्म झाला असता, तर ते जसे देशभर फिरले तसे फिरण्याची मानसिकला असती का, हे तपासायलाच हवे.
पण एक नक्की की नामदेवांच्या रुपात शिंपी समाजाला एक आदर्श मिळाले. आपल्या शिंपी पोटजातीपुढे त्यांचे नाव आदराने आणि अभिमानाने घेतले जाऊ लागले. आज फक्त महाराष्ट्रातीलच नाही तर जवळपास देशभरातील शिपी समाज नामदेवांना आपला आदर्श मानतो. विशेषतः मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या हिंदी भाषक पट्ट्यात आपले आडनाव नामदेव लावण्याची परंपरा आहे. तिथे विविध पोटजातींतील शिंपीही एकच आडनाव लावतात. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थानसह सबंध उत्तर भारतात शिंपी समाज नामदेवांचे नाव लागतोच पण हा प्रभाव दक्षिण भारतातही आहे. ‘तीर्थयात्रांमुळे नामदेवांचा प्रभाव दक्षिण भारतातील विखुरलेल्या दर्जी, छिप्पिगा या अल्पसंख्य लोकांवर पडला. तेव्हापासून ती अल्पसंख्य ज्ञाती आपणांस नामदेव म्हणवू लागली व मद्रास (तामिळनाडू) राज्यातील भूसागर व मल्ला या ज्ञाती नामदेव हेही आपल्या ज्ञातीचे समानार्थक नाव मानू लागले.’ याशिवाय आंध्रप्रदेशातील शिंपी स्वतःला नामदेव मेरू म्हणवून घेतात.
नामदेवांच्या काळातील भारतातील शिंप्यांची उपकरणे म्हणजे कात्री, सुया आणि गज. गजाने कापड मोजणे, दोरीने ग्राहकाची मापे घेणे, कात्रीने कपडा कापणे आणि सुई-दो-याने शिवणे. शिवणे हातानेच करावे लागत असल्याने ते अर्थातच अत्यंत किचकट, कौशल्याचे पण कष्टाचे काम असे. त्यामुळे अर्थातच या कामाचा मोबदला चांगला मिळत असेल अशी आपली कल्पना होईल. पण बारा-व्या तेराव्या शतकानंतर महाराष्ट्रात बलुतेदारी पद्धतीचा प्रवेश झाला आणि या समाजाची आर्थिक अवनती व्हायला सुरुवात झाली. ज्या प्रमाणात काम त्या प्रमाणातील मोबदलाच थांबला. कापड व्यापारही वैश्यांच्या ताब्यात जावू लागला. त्याचाही फटका शिंपी समाजाला बसला. यादवकाळानंतर इस्लामी सत्ता जशा महाराष्ट्रात स्थिर झाल्या त्याचा समाजजीवनावर मोठा परिणाम झाला. त्यात वारंवार येणारी अवर्षणे. मुस्लिम काळात महाराष्ट्रात उच्चभ्रू सत्ताधारी आणि लष्करी वर्गाच्या वेशभूषेत बराच बदल झाला. शिंपी समाजाने या नव्या वेषभूषांचे शिवण आत्मसात केले असले तरी सर्वच शिंपी समाजाला ती कामे मिळू शकत नव्हती. शहरांत स्थिर झालेल्यांनाच त्या कामांचा लाभ होई. कापडव्यापार त्यांच्या हातातून गेल्याने त्यांना व्यापा-यांच्या मेहरबानीवर व्यवसाय करावा लागू लागला.
युरोपात मात्र या उद्योगाची भरभराट होत होती. नित्य नव्या फॅशन्स स्त्री-पुरुषांसाठी पुढे आणल्या जात होत्या, त्या लोकप्रियही होत होत्या. सैनिकांसाठी गणवेश शिवण्याचाही उद्योग मोठा होत चालला होता. हाताने कपडे शिवत बसणे, तेही एवढ्या मोठ्या प्रमाणावर शक्यच नव्हते. त्यामुळे पंधराव्या शतकापासूनच शिलाई मशीन बनवण्याचा प्रयत्न युरोपात सुरू झाला. पण परिपूर्ण आणि उपयुक्त शिलाई मशीन बनायला १८३० साल उजाडावे लागले. बार्थेल्मी थिमोनियर या फ्रेंच संशोधकाने नवीन कार्यक्षम शिलाई मशीनचा शोध लावला. त्यानंतर दहा वर्षांत त्याने ८० मशीन्स बनवून सैनिकी गणवेश शिवण्याचा कारखानाच टाकला. पण त्याचे दुर्दैव असे की हाताने शिलाई करणा-या शिंप्यांनी एका रात्री त्याच्या कारखान्यावर हल्ला केला आणि त्याच्या मशीन्सची तोडफोड केली. एकच मशीन वाचले. ते घेवून तो इंग्लंडला पळाला. १८५७ साली त्याचा गरीबीत मृत्यू झाला. पुढे सिंगर यांनी अमेरिकेत होवेच्या आराखड्यावर आधारित शिलाई मशीनला १८४४ साली बाजारात आणले. आजतागायत सिंगर मशिन्सनी शिलाई मशीनच्या जगावर अधिराज्य गाजवले. एक इतिहास घडवला.
भारतात शिलाई मशीनचा प्रवेश झाला तोच १९व्या शतकाच्या अखेरीस. आधी नवीन तंत्राला विरोध झाला असला तरी एक-दोन दशकांत भारतीय शिंपी मशीनला सरावले. त्यात वेळोवेळी होत गेलेल्या बदलांनाही आत्मसात करत गेले. इंग्रज काळात भारतीय सैन्याच्या वेशभूषेत बदल होऊ लागलेला होताच. पण या बदलांचाही फारसा आर्थिक लाभ शिंपी समाजाला होवू शकला नाही. पन्नासच्या दशकात रेडीमेड कपड्यांनी तर खेडोपाडी पसरलेल्या शिंप्यांवर वाताहत होण्याची पाळी आणली. जे शिकले ते अन्य व्यवसायांत शिरले. सरकारी वा कारखान्यांत नोक-या करु लागले. जे नाही शिकले ते परंपरागत व्यवसाय कसाबसा करत राहिले.
रेडीमेड कपडे शेवटी कुशल कारागीरालाच शिवावे लागत असले तरी त्यात अन्य जातीय पुरुष-स्त्रिया मोठ्या प्रमाणात घुसल्या. त्यामुळे स्पर्धा प्रचंड वाढली. खुद्द शिंपी समाजाचे या व्यावसायातील स्थान आता डळमळीत झाले आहे. राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक स्थान पार रसातळाकडे चालले आहे. सर्व पोटजातींच्या संघटना आहेत. पण त्यांचे महत्कार्य म्हणजे वधु-वर मेळावे घेणे. समाजाच्या उत्थानासाठी प्रयत्न होत नाहीत. नामदेव महाराजांसारखे महान राष्ट्रसंत या समाजातून आले. त्यांनी ज्ञानदीप उजळवून जगाला प्रकाश दिला. प्रत्येकाच्या हृदयात करुणेचा सागर निर्माण केला. अशा नामदेवांना घडवणारा समाज तो हाच, यावर आता सहजी विश्वास बसणे अवघड आहे!

(टीप: हा लेख श्री. सचीन परब यांच्या साक्षेपी संपादनाखाली आषाढी एकादशीनिमित्त प्रसिद्ध होत असलेल्या रिंगण या संत नामदेव महाराजांवरील विशेषांकात प्रसिद्ध होत आहे. या लेखातील संत नामदेवांबद्दलची माहिती, अभंग हे श्री. परब यांनी टाकुन या लेखाची गुणवत्ता वाढवली आहे. मी त्याबद्दल त्यांचा नितांत आभारी आहे.)

field_vote: 
0
No votes yet