ऑलिंपिक २०१२: क्रीडाप्रकार-६ (U-Z)

ऑलिंपिक २०१२: क्रीडाप्रकार: A-B C-E F-H I-S T U-Z
===
या भागात आपण इंग्रजी आद्याक्षर U ते Z ने सुरू होणाऱ्या क्रीडाप्रकारांची माहिती करून घेणार आहोत. अर्थात यात अर्थात यात व्हॉलिबॉल(Volleyball), वॉटर पोलो(Water Polo), भारोत्तोलन (Weightlifting), कुस्ती (Wrestling) अश्या शेवटच्या ४ खेळांची माहिती करून घेणार आहोत. चला तर सुरू करूयात
-------

व्हॉलिबॉल(Volleyball)


१८९५ मध्ये विल्यम्स जी. मॉर्गन याने 'मिन्टोनेट' (mintonette) नावाने एक खेळ सुरू केला होता. त्याचा उद्देश होता की हा YMCA जिममध्ये वयस्क लोकांना बास्केटबॉलला पर्याय म्हणून खेळायला आवडेल. एका शतकात या खेळाचे स्वरूप बदलत हा ऑलिंपिकमधील अत्यंत चुरशीचा आणि भरपूर लोकप्रिय असा खेळ झाला आहे

भारतासह बहुतांश देशांमध्ये बऱ्यापैकी खेळल्या जाणाऱ्या या खेळात एकूण दोन सुवर्णपदके पणाला लागलेली असतात. एक पुरूष संघाचे व एक महिला संघाचे. सहा जणांच्या संघात खेळल्या जाणाऱ्या या खेळाचे नियम बहुपरिचित आहेत तेव्हा त्याची पुनरुक्ती करत नाही.

ऑलिंपिकमध्ये या स्पर्धा पूल बनवून पद्धतीने खेळवल्या जातील. १२ संघांना दोन सहा संघांच्या गटांमध्ये विभागले आहे. त्यातील सर्वोत्तम आठ संघ उप-उपांत्य, उपांत्य स्पर्धा खेळातील. उपांत्य फेरीतील विजेते सुवर्णपदकासाठी तर उपांत्य फेरीतील पराभूत ब्रॉन्झ पदकासाठी लढतील.

स्पर्धा कुठे होणार?: अर्ल्स कोर्ट

स्पर्धा कधी होणारः सदर स्पर्धा २८ जुलैपासून सुरू होतील. व पदक १२ ऑगस्टला प्रदान होईल

बीजिंग ऑलिंपिकचे निकालःबीजिंग ऑलिंपिक्समध्ये ब्राझील आणि अमेरिकेमध्ये दोन्ही गटात अंतिम सामने झाले होते. एक सुवर्ण अमेरिकेने तर एक ब्राझीलने जिंकले

यावेळी भारताकडून कोण?
अपात्र/संघ उपलब्ध नाही

यावेळी भारताला पदकाची आशा?
गैरलागू

===========

वॉटर पोलो(Water Polo)

१९०० पासूनच्या प्रत्येक ऑलिंपिक्समध्ये खेळल्या गेलेल्या या खेळाविषयी जरा विस्ताराने लिहितो.

इथेही बॉलगेम्सप्रमाणे चेंडू गोल-जाळ्यात भिरकावणे व गोलकीपरने तो अडवणे असते. प्रत्येक संघात सात खेळाडू असतात. एक स्पर्धा आठ मिनिटांच्या चार भागात विभागलेली असते. एका संघाला प्रतिस्पर्ध्यावर गोल करायला केवळ ३० सेकंद असतात नाहीतर बॉल दुसऱ्या संघाकडे जातो.
यात कठीण गोष्ट अशी असते की खेळाडूंना पुलच्या कडेला-भिंतींना अथवा तळाला स्पर्श करणे वर्ज्य असते. ज्यामुळे अटीतटीच्या सामन्यात तर एकावेळी स्पर्धक तीन मैल पोहावे इतके हातपाय मारतो Smile

या खेळात कितीही वेळा सबस्टिस्ट्युशन केलेले चालते. मात्र त्यांना पाण्यात एका ठराविक भागातूनच शिरावे व बाहेर पडावे लागते.
एकूणच वेगवान असणारा हा खेळ अत्यंत अटीतटीचा असतो. या स्पर्धेतही महिला व पुरूष अशी दोन सुवर्णपदके पणाला लागलेली असतात

स्पर्धा कुठे होणार?: वॉटर पोलो अरेना या खास निर्माण केलेल्या ठिकाणी या स्पर्धा होतील. सदर स्थान स्पर्धेसाठी सज्ज झाले आहे.

स्पर्धा कधी होणारः सदर स्पर्धा २९ जुलै ते १२ ऑगस्ट दरम्यान होतील

बीजिंग ऑलिंपिकचे निकालः अमेरिका दोन्ही स्पर्धेत अंतिम फेरीत पोहोचूनही नेदरलँड आणि हंगेरीने तिला हरवत सुवर्णपदके पटकावली होती

यावेळी भारताकडून कोण?
अपात्र/संघ उपलब्ध नाही

यावेळी भारताला पदकाची आशा?
गैरलागू

===========

भारोत्तोलन (Weightlifting)

एकूण १५ सुवर्णपदके देऊ शकणार्‍या या खेळाविषयी गेल्या काही वर्षात भारतात जागृती होत आहे. हा क्रीडाप्रकार अतिशय पुरातन आहे. अत्यंत सोप्या पद्धतीने समजवायचं तर जास्तीत जास्त वजन उचलणार तो जिंकणार या पद्धतीचा हा खेळ आहे. अर्थातच वजन उचलणं हे तुमच्या शरीराच्या वजनाशी संबंधीत असतं तेव्हा विविध वजनी गटात स्पर्धा घेतल्या जातात. ऑलिंपिक्समध्ये महिला व पुरूष मिळून १५ वजनी गटात स्पर्धा होतील.

यात प्रत्येक स्पर्धकाला दोन प्रकाराने वजन उचलायचे असते. स्नॅच पद्धतीमध्ये एकाच फटक्यात जमिनीवरून डोक्याच्यावर (हात वर-सरळ) वजन उचलून दाखवायचे असते. तर 'क्लीन अँड जर्क' पद्धतीत हे वजन दोन टप्प्यात उचलले जाते. पहिल्या टप्प्यात खांद्यावर आणि मग डोक्यावर एक जर्क देऊन उचलले जाते. या दोन्ही प्रकारात तीन संधी मिळतात. दोन्ही प्रकारातील सर्वोत्तम खेळीची बेरीज केली जाते व एकूण जास्तीत जास्त वजन उचलणारा स्पर्धक विजयी ठरतो

स्पर्धा कुठे होणार?: एक्सेल या खास 'इन्डोअर' खेळांसाठी निर्माण केलेल्या ठिकाणी या स्पर्धा होतील.
स्पर्धा कधी होणारः सदर स्पर्धा २८ जुलैपासून सुरू होतील व ७ ऑगस्टपर्यंत चालतील

बीजिंग ऑलिंपिकचे निकालः गेल्यावेळी चिनी खेळाडूंनी ८ वजनी गटांत सुवर्णपदके मिळवून आपले वर्चस्व सिद्ध केले होते

यावेळी भारताकडून कोण?
पुरुष ६९ किलो गट: कतुलु रवी कुमार (३ राष्ट्रकुल सुवर्णपदके)
महिला ४८ किलो गटः गान्गबम सोनिया चानु

यावेळी भारताला पदकाची आशा?
माझ्यामते यंदा भारताला या खेळात पदक मिळण्याची आशा धरता येऊ नये आहे.

===========

कुस्ती (Wrestling)

जगातील सर्वात पुरातन खेळांपैकी एक समजला जाणार्‍या या खेळाचा कैफ महाराष्ट्रासाठी - भारतासाठीदेखील नवा नाही ख्रि.पू ७०८ मध्ये जुन्या ऑलिंपिक्समध्येदेखील हा खेळ खेळला गेला होता. भारताचे पहिले वैयक्तिक पदक 'खाशाबा जाधव' याने याच खेळात मिळवल्याचे अनेकांना पाठ झाले असेल. मात्र आपल्याकडे खेळली जाणारी लाल मातीतली कुस्ती आणि इथे चटईवर खेळली जाणारी कुस्ती यात कमालीचा फरक आहे. तंत्र, फिटनेस, पकडी इत्यादी अनेक बाबतीत चटईवर खेळताना बदल करावे लागतात.

ऑलिंपिक्समध्ये दोन प्रकारची कुस्ती खेळली जाईल ग्रीको रोमन आणि फ्रीस्टाईल. ग्रीको रोमन कुस्तीमध्ये केवळ कमरेच्या वरच्या भागाचा वापर करता येतो तर फ्रीस्टाईल कुस्तीमध्ये असे कोणतेही बंधन नाही. प्रतिस्पर्ध्याची पाठ टेकल्यास तो तिथल्या तिथे हरतो. अन्यथा दोन मिनिटांच्या तीन फेर्‍या होतात व विविध पेचांना दिलेल्या गुणावरून विजेता ठरतो. या स्पर्धांमध्ये दोन मिनिटे हा किती मोठा वेळ आहे याचा उत्तम प्रत्यय येतो Smile

यंदा ७ पदके पुरूष ग्रीको रोमन, ७ पदके पुरूष फ्रीस्टाईल आणि ४ पदके महिलांच्या कुस्तीसाठी अशी एकूण १८ सुवर्णपदके पणाला असतील

स्पर्धा कुठे होणार?: एक्सेल या खास 'इन्डोअर' खेळांसाठी निर्माण केलेल्या ठिकाणी या स्पर्धा होतील.

स्पर्धा कधी होणारः या स्पर्धा ५ ते १२ ऑगस्ट दरम्यान चालतील

बीजिंग ऑलिंपिकचे निकालः आपल्या लौकिकाला जागून रशियाने ६ सुवर्णांसह ११ पदकांची लयलूट केलीच होती. जुन्या सोवियत देशांनी मिळून एकूण २३ पदके जिंकली होती. भारताच्या सुशील कुमारनेही (ज्याला यंदाच्या ध्वजधारकाचा मान मिळाला आहे.)ब्रॉन्झ पदक पटकावले होते.

यावेळी भारताकडून कोण?
यावेळी भारतातर्फे चार पुरुष खेळाडू पात्र ठरले आहेतः
५५ किलो: अमित कुमार
६० किलो: योगेश्वर दत्त (२ आशियाई सुवर्ण, १ राष्ट्रकुल सुवर्ण, १ राष्ट्रकुल कांस्य)
६६ किलो: सुशील कुमार (ऑलिंपिक ब्रॉन्झ, जागतिक खेळात सुवर्ण)
७४ किलो: नरसिंग यादव (राष्ट्रकुल सुवर्ण)

यावेळी भारताला पदकाची आशा?
अर्थात सुशीलकुमार कडून अपेक्षा आहेत.
नरसिंग यादव हा मुंबईतील तिकिट चेकरचा मुलगा. जमेल तसे बॉक्सिंग शिकलेला राष्ट्रकुल स्पर्धेत शेवटच्या मिनिटाला 'रिप्लेसमेंट' म्हणून घेतलेला. त्याने सुवर्ण पटकावले होते. ते नशिबाने मिळाले की टॅलेंट आहे ते आता समजेल

========================

ही लेखमालिका इथे संपते आहे. दोन दिवसांत ऑलिंपिक्स सुरू होते आहे. आशा आहे की या लेखमालिकेमुळे ऐसी अक्षरेच्या वाचकांना यंदा खेळ बघताना अधिक मजा येईल.

field_vote: 
0
No votes yet