आपलं नशीबच.......!

मॅथ्यू हॅरिसन या लेखकाचे The 7 Laws of Magical Thinking हे पुस्तक आजकाल Best Seller list वर गाजत आहे. या लेखकाने काही काही वेळचे आपले अविवेकी वर्तन आपल्याला सुख समाधान व मानसिक शांती मिळवून देण्यास कसे कारणीभूत होते याचे विश्लेषण केले आहे. त्यावरून आपल्यातील बहुतेकांचा नशीबावर भरपूर विश्वास आहे, असा निष्कर्ष त्यानी काढला आहे. काही जण योगायोग असे गोंडस नाव देवून आपला नशीबावर विश्वास नाही असे दाखविण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु मनातल्या मनात मात्र नशीबाला कोसत असतात.

ऊन, पाऊस, पाणी, वारा, थंडी, इत्यादी नैसर्गिक नियमाबद्दल आपले काही ठराविक ठोकताळे असतात. पावसाळ्याच्या दिवसात चुकून घरी छत्री विसरून बाहेर पडल्यास हमखास पाऊस पडणार व आपण चिंब भिजणार. शेवटी आपलं नशीब म्हणत गप्प बसणार. मॉलमध्ये सामानांची ट्रॉली सरकवत 5-6 काउंटरपैकी एका काउंटरपाशी बिल देण्यासाठी क्यूमध्ये आपण उभे राहतो. थोड्या वेळाने पलिकडचा क्यू तुलनेने कमी लांबीचा व लवकर लवकर पुढे सरकत आहे हे लक्षात येते. आपण वेळ वाचविण्यासाठी क्यू बदलतो. थोड्या वेळात पूर्वीच्या क्यूमधील आपल्यासमोर उभा असलेला ग्राहक बिल भरून निघूनसुद्धा जातो व आपल्यामागे उभा असलेलासुद्धा! आपण मात्र अजूनही प्रतिक्षेतच! पुन्हा एकदा आपलं नशीबच xxxx म्हणत तडफडतो. बँकेत काही तातडीचे काम करण्यासाठी जावे तर बँक बंद वा तिथला संगणक बिघडलेला. एटीएमवर पैसे काढायला जा, शटर बंद... एक ना दोन.. असे कितीतरी उदाहरणं असतील. म्हणूनच आपले नशीब आपल्यापेक्षा पुढे जाऊन आपला सूड घेत असते, एवढे तरी मान्य करायला हवे. तार्किकदृष्ट्या अत्यंत योग्य वाटणारी आपली कृती खरोखरच आपलं नशीब बदलू शकेल का?

या संदर्भात चाचणी घेतल्यानंतर काही मजेशीर गोष्टी पुढे आल्या. एका सर्वेक्षणात आपण विकत घेतलेल्या लॉटरी तिकीटाची आपल्या मित्राबरोबर अदलाबदल केल्यास आपल्या लॉटरी तिकिटाला बक्षीस मिळेल का? हा प्रश्न विचारल्यावर सुमारे 90 टक्के लोकांनी तसे काही होणार नाही असे तर्कशुद्ध उत्तर दिले. परंतु याच प्रश्नाचे उत्तर आपल्या पूर्वानुभवावरून देण्यास सांगितल्यावर सुमारे 46 टक्के लोकांनी बक्षीस लागेल असे सांगितले. एखाद्या शत्रुच्या तिकीटाची अदलाबदल केल्यास शत्रुला बक्षीस नक्की मिळेल यावर अनेकांचा विश्वास होता.

नोकरीच्या इंटरव्ह्यूसाठी एखादा विशिष्ट प्रकारचा शर्ट घातल्यास इंटरव्ह्यू सोपा जाईल अशी एक अटकळ आपल्या मनात असते. आपल्या अशा कृतीतून आपण आपल्या नशीबाला भुरळ पाडण्याच्या प्रयत्नात असतो. अशीच एखादी अतार्किक भन्नाट कृती करून आपण आपल्या नशीबाला चकवू शकतो यावर आपला ठाम विश्वास असतो. हळू हळू पुढे सरकत असलेल्या मॉलमधील क्यू बदलून दुसऱ्या काउंटरच्या क्यूत उभे राहणे हे याच विश्वासाचे द्योतक आहे.

मुळात आपण स्वत:बद्दल विचार करताना नकारात्मक दृष्टीने विचार करत असतो. त्यामुळे आपला क्यू वेळखाऊ आहे, या काउंटरवरचा बिल करणारा आळशी आहे, समोरच्या ग्राहकाकडे भरपूर सामान आहे... अशा प्रकारच्या विचारांची मालिका आपल्याला नाउमेद करते व आपण कुठली तरी अविवेकी, अतार्किक कृती करण्यास तयार होतो. आपण ज्या प्रकारे विचार करत सुटतो त्याचप्रमाणे घटना घडणार याची पुरेपूर खात्रीसुद्धा आपल्याला असते.

ही मानसिक प्रक्रिया तीन पातळीवर चालते; नकारात्मक विचार करून नशीबाला चकवणे, गोष्टी अपेक्षेप्रमाणे न होणे व शेवटी आपला (चुकीचा) अंदाज खरा ठरणे. जाणीवपूर्वक केलेल्या कृतीसाठी जास्त बौद्धिक श्रम लागतात. आपली जाणीव शाबूत आहे की नाही यासाठी मानसतज्ञ अमुक एका तीन आकडी संख्येमधून (उदा: 564) प्रत्येक वेळी 3 वजा करत जाण्यास सांगितले जात असते. परंतु याचीसुद्धा आपल्याला भीती वाटू लागते. मानसतज्ञ हाच अवघड प्रश्न मला विचारणार या धास्तीमुळे आपली वजाबाकी नक्की चुकणार. अशा प्रकारच्या नकारात्मक विचारांच्या साखळीमुळे आपण गांगरून जातो. व माहित असलेल्या गोष्टीसुद्धा विसरू लागतो.

नशीबाला चकवण्याच्या नादात आपण विनाकारण धोका पत्करत असतो. किंवा फाजिल विश्वास बाळगत असतो. आपणच काही ठोकताळे ठरवतो. व त्या आधारे नशीबाला फसवत आहे या धुंदीत असतो. मुळात आपल्याला यश हवे असते, परंतु विचार मात्र अपयशाचा करत असतो. थोडीशी स्तुती केल्यास अपशकुन होणार याची मनात कुठेतरी धुकधुक असते. म्हणूनच आपल्या वागण्यात वा बोलण्यात मनापासून दाद दिली आहे असे कधीच होत नाही. मीठ म्हटलं की अपशकुन होते म्हणून मिठाला साखर म्हणत आपण गृहिणीला तोंडघशी पाडतो. आपण जे काही नकारात्मक म्हणतो तसेच होत जाणार याची एक अव्यक्त भीती आपल्या मनात असते म्हणूनच शुभ बोल रे नाऱ्या... ही म्हण प्रचलित झाली असावी. सचिन शंभर धावा काढू शकणार नाही असे मनात आले की आपले वागणेसुद्धा त्याप्रमाणे बदलत जाते. जीवविमा न उतरविण्याचे कारणही हेच असावे. कारण विमा उतरवले की आपण मरणार याची मनोमन खात्री असते.

पिढ्यान पिढ्या आलेल्या रूढी, परंपरा, इष्ट - अनिष्ट प्रथा आपण पाळत असतो. त्यातील अनेकांचा आधुनिक जीवनशैलीशी काहीही देणे घेणे नसते. त्या टाकाऊ असतात. तरीसुद्धा (विकृत स्वरूपात तरी का होईना) त्यांचे पालन केले जाते. कारण कोण जाणे, त्या न पाळल्यास आपण गोत्यात येऊ हाच विचार त्यामागे असतो.

त्यापायी अशा प्रकारच्या श्रद्धांना तडा देणे, त्यातून श्रद्धावंतांना बाहेर काढणे, त्यांच्या मनातील भीती घालवणे, त्याना विवेकी बनवणे दिवसे न दिवस कठीण होत आहे.

field_vote: 
2
Your rating: None Average: 2 (2 votes)

प्रतिक्रिया

जोपर्यंत मनुष्यप्राणी "उजवा मेंदू" घेऊन जन्माला येत आहे तोपर्यंत श्रद्धेचं (so called अविवेकाचं) अस्तित्व अबाधित आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मार्मीक. गंमत म्हणजे, विवेकाबाबतही अविवेक केला जातो. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुरवातीच्या परिच्छेदांसाठी मर्फीने निअयमच बनवून ठेवला आहे "If anything can go wrong it will go wrong". एकुणच या नकारात्मक विचारांना हे एक वाक्य अचुक पण नियमांत बांधते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!